मुंबईतील गिरणी कामगाराची उध्वस्त धर्मशाळा

मुंबईतील लालबाग-परळ भागातील गिरणगाव हा होता मुंबईतील मराठी संस्कृतीचा शेवटचा मोठा गड. पण आमच्या स्वार्थी, लोभी व बेईमान राजकारण्यांनी (सर्वच पक्षातील) गिरणीमालक, बांधकाम व्यावसायिक आणि परप्रांतीय धनिक यांना फितूर होऊन तो शेवटचा गडही मराठा स्वराज्यातून काढून प्रतिपक्षाच्या हवाली केला.

“शेवटच्या गिरणी कामगाराचे पुनर्वसन होईपर्यंत कुठल्याही गिरणीची एक वीटही काढू देणार नाही” अशा वल्गना करणार्‍या राजकारण्यांनी अनेक गिरण्या जमीनदोस्त होऊन त्यांच्या जागी अनेक इमारती व मनोरे बनले तरी अजुनही गिरणीकामगारांच्या घरांसाठी एक वीटही रचलेली नाही. गिरणीकामगाराची कर्मभूमी उध्वस्त करून त्या जागेवर धनदांडग्या परप्रांतीय पाहुण्यांसाठी धर्मशाळा बांधल्या गेल्या.

शनिवार, १८ डिसेंबर २०१०च्या लोकसत्तेच्या लोकमानस सदरातील श्री० चंद्रकांत मांजरेकर यांचे “निवार्‍यासाठी किमान शब्द खर्ची घाला” हे पत्र वाचले आणि मनात कालवाकालव झाली. आम्हा मराठी माणसांनी स्वतःच्या निरभिमानामुळे, अनास्थेमुळे जी अनेक घोर पापे केली आहेत किंवा घडू दिली आहेत त्यातील मुंबईच्या लाखो गिरणी कामगारांचे संसार उखडून उध्वस्त करण्याचेही एक मोठे पाप आहे. कारण त्याला मराठी माणसाचा स्वकेंद्रित, स्वार्थी व उदासिन स्वभावच कारणीभूत आहे. मांजरेकरांचे पत्र वाचून मनात अपराधी भावना दाटून आली. काय करावे सुचेना. तशाच मनोवस्थेत मी वर्तमानपत्राच्या संपादकांना एक पत्र खरडले व धाडून दिले. अजुनपर्यंत ते प्रसिद्ध झालेले नाही. यापुढे होईल की नाही ते सांगता येत नाही. पण आपले मन उघडे करून निदान अमृतमंथनाच्या सूज्ञ, स्वाभिमानी मराठी वाचकांपुढे सादर करावे असे वाटल्याने खाली देत आहे. मूळ लेखही त्याखाली जोडला आहे.

श्री० चंद्रकांत मांजरेकर यांचे लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले पत्र आणि त्यावरून श्री० सलील कुळकर्णी यांनी लोकसत्तेला लिहिलेले पत्र खाली वाचा.

अमृतमंथन_मुंबईतील गिरणी कामगाराची उध्वस्त धर्मशाळा_101226

आपल्या वाचकांपैकी कोणालाही श्री० चंद्रकांत मांजरेकर यांचा संपर्क क्रमांक माहीत असल्यास कृपया कळवावा.

प्रस्तुत घटनेने आपलेही हृदय हेलावले असेल तर प्रस्तुत लेखाचा दुवा (http://wp.me/pzBjo-At) जास्तीत जास्त मराठीप्रेमींना अग्रेषित करा. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने निषेध केल्यास पाषाणहृदयी शासनाला काही पाझर फुटतो का ते पाहू.

आपली मते व प्रतिक्रिया लेखाखालील चौकटीत अवश्य नोंदवावीत.

– अमृतयात्री गट

.

6 thoughts on “मुंबईतील गिरणी कामगाराची उध्वस्त धर्मशाळा

  1. गिरणी कामगाराची झालेली परवड ही कुणाही सामाल्य व सह्रुदय माणसाला हेलावून टाकेल अशी आहे. पण आमच्या राजकारणी लोकांना ह्रुदयच नाहीच; अगदी दगडाचे देखील. कारण दगड सुद्धा दुभंगतो पण ही मंडळी जराही आतून हलणार नाहीत. मजदूर संघ देखील कसा अपवाद ठरावा?

    या कामगारांच्या बायका, मुली यांच्यावर यामुळे काय काय गुजरले याचे यथार्थ चित्रण त्याकाळच्या अनेक साहित्यकृतींतून दिसते. फार करूण आहे ते!

    शासन स्वतः कानाडोळा करत आहे व इतरांनाही सोयीस्कररित्या विसरायला लावत आहे.

    • प्रिय सौ० अश्विनी धर्माधिकारी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सहवेदना समजतात.

      {{मजदूर संघ देखील कसा अपवाद ठरावा?}}
      आमच्या मते सामान्य माणसाची झुंड-मानसिकता ही मेंढरांप्रमाणे असते. वर्गातील इतर मुलांप्रमाणे आपणही महागातील ब्रॅण्डेड कपडे वापरावे असे मुलांना ज्या कारणाने वाटते, त्याच कारणाने मोठी माणसेही मेंढरांप्रमाणे वागतात आणि पुढचे मेंढरू खड्ड्यात पडले की त्याच्या मागून डोळे झाकून मागचे मेंढरूही खड्ड्यात उडी मारते, तसाच हा प्रकार. तेव्हा दत्ता सामंतांची बेडकी पोटात हवा भरून फुगत होती. तिच्या वचकाबद्दल अवाजवी विश्वास वाटणार्‍या गिरणी कामगाराने स्वतःहून खड्ड्यात उडी मारली खरी. पण जेव्हा दत्ता सामंतांच्या हातातून लढा निसटला तेव्हा त्यांची परिस्थिती पानिपतामधील नेतृत्वहीन मराठ्यांसारखी झाली. आणि गनिमाने आपल्या फितूर राजकारण्यांच्या मदतीनेच त्यांना कापून काढले. पानिपतात जेवढी मराठी घरे उद्धवस्त झाली त्यापेक्षा अधिक मुंबईच्या गिरणी संपात झाली.

      {{शासन स्वतः कानाडोळा करत आहे व इतरांनाही सोयीस्कररित्या विसरायला लावत आहे.}}
      हे राजकारण्यांचे नेहमीचेच डावपेच आहेत. प्रथम मोठ्यामोठ्या तोंडी फुशारक्या मारल्या. प्रत्येक गिरणी कामगाराला घर व संपूर्ण आर्थिक भरपाई मिळाल्याशिवाय गिरण्यांचा पुनर्विकास करूच देणार नाही असे म्हणणार्‍या राजकारण्यांनी गपचूप कधी गिरण्या विकल्या व त्या जागी मनोरे कधी बांधले गेले हे नोकरीच्या मागे धावणार्‍या इतर मुंबईकरांच्याही लक्षात आले नाही. उघडकीला आलेला प्रत्येक राजकीय घोटाळा अशाच प्रकारे सावकाश पचवला गेला. खातानाही आवाज नाही, पचवतानाही आवाज नाही. कामगार नेते म्हातारे झाले, काही मरूनही गेले. संसार देशोधडीला लागले. मुले वाईट मार्गाला लागली. पण शासनाला सामान्य जनतेचा विचारच कुठे असतो? ते श्रीमंत उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिक ह्यांच्याशी भागीदारी करून गरीबांच्या टाळूवरील लोणी खातात.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. समर्थ रामदास स्वामींचा एक ष्लोक आहे:
    कळे आकळे रूप हे द्न्यान होता
    तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था
    मनी मानसी शब्द कुंठीत आहे
    तो गे तो चि तो राम सर्वत्र पाहे!!
    सध्याच्या काळात राम तर दूरच राहिला पण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार्या मराठी राजाकारण्यांचे हे कर्त्रूत्व पाहून
    तो गे तो चि तो हराम सर्वत्र पाहे
    असे म्हणावेसे वाटते.
    महाराष्ट्राला त्यांच्यापासून वाचविणारा कोणी तरी राम उत्पन्न होण्य़ाची आज गरज आहे.
    बाळ संत

    • प्रिय श्री० बाळ संत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण उद्धृत केलेला श्लोक व आपले भाष्य चपखल योग्य आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s