मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.
सौ० शुभदा रानडे-पटवर्धन
………
स्वरार्थमणी : रागरससिद्धांत
लेखिका: गानसरस्वती किशोरी आमोणकर
राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १५८, मूल्य : ४०० रुपये
वाणीच्या वा वाद्याच्या माध्यमातून जे स्वरमय साकार होते, व्यक्त होते, ते सारे संगीत या शब्दाने ओळखले जाते. ज्याला आपण संगीत म्हणतो, ती खरे म्हणजे स्वरभाषा आहे. मानवी भावसृष्टीचे म्हणजेच मनोवस्थांचे साक्षात तसेच रमणीय दर्शन घडवणारे सौंदर्यप्रधान गायनवादन हेच रागसंकल्पनेचं अधिष्ठान आहे. स्वरमाध्यमातून व्यक्त होणारी श्रवणप्रधानता आणि तर्कनिष्ठता – म्हणजे विवक्षित रागात ठराविकच स्वर येतात, त्या रागाचा विशिष्ट असा एक मुख्य वादी स्वर असतो इत्यादी विधाने- यांना महत्व असते; ते त्या रागाच्या मूळ स्वरूपाचे तत्व, भाव, आणि शास्त्र जाणून घेण्यासाठी किंवा रागभावाच्या वातावरणाची साधारण कल्पना येण्यासाठी. स्वरभाषा हे जसे शास्त्र आहे, तसेच ते भाव प्रकट करणारे नाट्यही आहे आणि काव्यही आहे. राग म्हणजे तालबद्ध, शब्दबद्ध आणि स्वरबद्ध असलेली बंदीश नव्हे. रागविस्तार किंवा रागदर्शन हे वाद्यावर वाजवल्या जाणा-या कोणत्याही तालाच्या आधाराने मांडलेले स्वरप्रकटीकरण किंवा शब्दबद्ध वा नोटेशनबद्ध केलेले संगीतही नव्हे. मग राग म्हणजे नेमके काय, याचा विचार होणे आवश्यक आहे.