विचारमंथन: चार अक्षरी वैशिष्ट्यपूर्ण शब्द ओळखा (प्रश्नकर्ता: डॉ० उमेश करंबेळकर)

“नाशिकच्या डॉ. वि. म. गोगटे सरांनी आम्हाला एक कोडे घातले होते; चार अक्षरी वैशिष्ट्यपूर्ण शब्द शोधून काढण्याबद्दल….”

अमृतमंथन परिवारातील मराठी भाषाप्रेमींसाठी आपले एक मित्र डॉ० उमेश करंबेळकर (एम०डी०, आयुर्वेद) यांनी एक कोडे पाठवले आहे; जे खालीलप्रमाणे आहे.

——————

सप्रेम नमस्कार,

नाशिकच्या डॉ. वि. म. गोगटे सरांनी आम्हाला एक कोडे घातले होते; चार अक्षरी वैशिष्ट्यपूर्ण शब्द शोधून काढण्याबद्दल.  ते म्हणाले की मराठीत एकच वर्ण चार वेळा आलेले चार अक्षरी असे चारच अर्थपूर्ण शब्द आहेत; ते शब्द ओळखून दाखवा. (मामा-मामी, काका-काकी असे जोडशब्द नव्हेत).  ते चार शब्द कोणते ते आम्हाला सांगता आले नाही. आपल्याला ते चार (किंवा त्याच प्रकारचे त्याहून अधिक) शब्द शोधून काढता येतील काय?

– डॉ. उमेश करंबेळकर

——————
तर मित्रांनो, ही स्वतःच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचणी समजावी व केवळ स्मृतीवरूनच ते शब्द आठवून काढावेत, शब्दकोशांचा उपयोग करू नये अशी विनंती.)

डॉ० उमेश करंबेळकरांनी या कोड्याचे उत्तर ज्यांना आधीच सांगितले आहे; त्यांनी कृपया आपल्या इतर मित्रांना या कोड्यात स्वतंत्रपणे भाग घेऊ द्यावा. आपण कुठलीही मदत करू नये.

आपले उत्तर कृपया या लेखाखालील स्तंभात नोंदवावे.

– अमृतयात्री गट

.

32 thoughts on “विचारमंथन: चार अक्षरी वैशिष्ट्यपूर्ण शब्द ओळखा (प्रश्नकर्ता: डॉ० उमेश करंबेळकर)

    • प्रिय श्री० अभिजित यांसी,

      अरे वा. आणखी काही वाचकांनी यात भर घातली तर आपण चार शब्दांच्याही पुढे जाऊ काय?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • प्रिय श्री० अभिजित यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        ठणठणठणठण ह्यात एक तर दोन व्यंजने येतात. शिवाय दुसरे म्हणजे ह्यात ठण या ध्वनिनाचक शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. त्यापेक्षा वेगळा स्वतंत्र अर्थ त्याला नाही. आपल्याला काय वाटते.?

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      बोंबाबोंब, तंतोतंत, लालेलाल हे शब्द माहित आहेत. पण छिःछिःछिःछिः, छेछेछेछे, यूयूयूयू, जाजाजाजा, असे शब्द म्हणजे एकापुढे एक असे लिहिलेले चार शब्द नाही का होणार?

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

        • प्रिय श्रीमती शुद्धमती राठीयांसी,

          सप्रेम नमस्कार.

          तूर्तातूर्त दोन व्यंजनांचा शब्द आहे. तेव्हा तो तूर्तास बाजूला ठेवू. छीछीछीछी व छेछेछेछे असतील तर उत्तम. आपण चारहून अधिक शब्द शोधले असे म्हणू शकू. पण त्याआधी ह्या शब्दांचे शब्दकोशाचे संदर्भ द्याल काय?

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      तूर्तातूर्त असा शब्द ऐकलेला नाही. शब्दकोशात आहे का? की रस्त्यांवरील पाट्यांवर? त्याचा अर्थ काय? पुन्हा त्यात रफाराच्या स्वरूपात र हे व्यंजन येतेच आहे.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      चेचाचेची – म्हणजे ठेचाठेची?

      आणखी काही सूचना?

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अभिजित यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आधीच्याच (ठणठणठणठण) शब्दाप्रमाणे हा (ठंठंठंठं) शब्दही चालेल असे वाटत नाही. तसे ढंढंढंढं, टंटंटंटं असे विविध ध्वनिवाचक शब्द सुचतात.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० मिलिंद कुलकर्णी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      चार अक्षरी शब्द एकाच मूळाक्षराने/वर्णाने बनलेला अपेक्षित आहे. म्हणून लगोलग, लगबग हे शब्द चालणार नाहीत. चटचट, टपटप, पटपट, भसाभस, कटकट, झपझप, टुकटुक, हुरहुर असे शब्दही चालणार नाहीत.

      आतापर्यंत खालील चार शब्द मिळाले.

      तंतोतंत (अभिजित, शुद्धमती ताई)
      बोंबाबोंब (अभिजित, शुद्धमती ताई)
      लालेलाल (अभिजित, शुद्धमती ताई)
      चेचाचेच (चेचाचेची) (शुद्धमती ताई)
      शुद्धमती ताईंनी छीछीछीछी, छेछेछेछे हे शब्द सुचवले आहेत व आपल्याकडे मराठी शब्दकोशाचे संदर्भ आहेत असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी तसे संदर्भ दिले की मग त्याही शब्दांची यादीत भर घालावी लागेल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० रवि भावे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.

      मान्य. हा चार अक्षरी शब्द एकाच वर्णातून बनला आहे हे खरे आहे. अर्थात हा मूळ अविकारी शब्द नव्हे. त्यास प्रत्यय लागले आहेत. पण ते नसावेत असे स्पष्ट प्राध्यापक साहेबांनी म्हटलेले नसल्यामुळे हा शब्दही वैध ठरेल असे वाटते.

      प्राध्यापक महाशयांपेक्षाही एक अधिक शब्द शोधून काढल्याबद्दल अभिनंदन.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. मारामारी हा शब्द ,पूर्वीच रूढ झाला आहे. मूळ शब्द [ क्रियापद ] : मारणे. तसेच [1 ] चेचाचेची हा शब्द तयार होवू शकतो. त्याचे क्रियापद : चेचणे.
    [2] चोचाचोची हा शब्द तयार होवू शकतो. त्याचे क्रियापद : चोचणे. [ अर्थ चुमब्न घेणे. ] [3] चोचोचेचा : चोचो नावाचा एक वेल आहे. चेचा म्हणजे चटणी किंवा ठेचा , त्यामुळे चोचोचेचा म्हणजे चोचो ची चटणी.

    • प्रिय श्री० राजेश सुर्वे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      Sosasos ह्याचा उच्चार काय? सोसासोस असा काय? हा रूढ मराठी शब्द आहे काय? त्याचा अर्थ काय? कुठल्या शब्दकोशात हा शब्द सापडेल?

      नवीन शब्द शिकायला आपणा सर्वांनाच आवडतं. तेव्हा वरील तपशील कळवावेत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० विकी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      शुशुशीशी हा रूढ मराठी शब्द आहे काय? असलाच तर तो मामामामी प्रमाणे जोडशब्द (द्वंद्व समास) होईल. नाही का? एकच अर्थपूर्ण शब्द होत नाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

        • प्रिय श्रीमती माधवी जोशी यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          डॉ० उमेश करंबेळकरांच्या मूळ लेखात ह्या कोड्याचे उत्तर नव्हते. आपल्यासारख्यांच्या आग्रहास्तव आम्ही त्याविषयी करंबेळकरांना विचारले. त्यांचे उत्तर असे. “तंतोतंत, बोंबाबोंब ,लालीलाल, आणि चेंचाचेंच” हे ते चार शब्द.
          मात्र लालीलाल हा शब्द वगळता इतर चार-अक्षरी शब्द हे “एकच वर्ण चार वेळा आलेले चार-अक्षरी अर्थपूर्ण शब्द आहेत” असे म्हणता येईल का? कोड्याच्या ह्या उत्तरावर विद्वानांचे एकमत होईल का? अशी आम्हाला (अमृतयात्री गटाला) व्यक्तिशः शंका वाटते. उदा० तं (त्‌+न्‌+अ), तो (त्‌+ओ), त (त्‌+अ) ही तिन्ही अक्षरे (स्वराना बाजूला केले तरी) समानवर्णी मानायची काय? अमृतमंथन अनुदिनीच्या मराठीभाषेच्या विद्वान वाचकांना ह्याबद्दल काय वाटते? अवश्य कळवावे.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

    • प्रिय विद्याधर दाते यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      होय. चोचीचाच हा शब्द होतो खरा. पण त्यांना प्रातिपदिकच (मूळ शब्दच) अभिप्रेत होते की काय कोण जाणे. मात्र तसे त्यांनी स्पष्टपणे उल्लेखलेले नाही. हेदेखील खरे. तेव्हा चोचीचाच हाशब्द चालायला हवा.

      उत्तरास फारच उशीर झाल्याबद्दल दिलगिरी. आपले पत्र चुकून बाजूला दृष्टिआड राहून गेले.

      अमृतमंथनावरीलइतर लेखांवरूनही नजर फिरवावी.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.