भटकंतीची आवड असणारे, पुरातन भारतीय संस्कृतीचे जिज्ञासू किंवा अभ्यासक, सृजनकलांचे भोक्ते, तरल भावनाशील मनाच्या व्यक्ती अशा विविध स्वभावपैलूंच्या माणसांनी आयुष्यात एकदा तरी अवश्य भेट द्यावी आणि मन तृप्त करावे असे हे ठिकाण.
‘स्त्री-पुरुषांचं एकमेकांमध्ये मिसळून एकाकार होणं म्हणजे जीवनातील परमोच्च सुख होय… या सुखसमाधीतूनच निर्वाणप्राप्ती होते…’ हे तत्त्वज्ञान खजुराहोच्या कामशिल्पांतून अनुभवायला मिळतं. लेखिकेचे हे उद्गार ऐकल्यावर आचार्य रजनीश (ओशो) यांच्या ’संभोगातून समाधीकडे’ या तत्त्वज्ञानाच्या स्फूर्तीमागे ह्या शिल्पांचाही काही भाग असेल का, अशी शंका मनाला स्पर्श करून जाते.
राधिका टिपरे यांच्या लेखातील आणखी काही वेचे.
‘केवळ अप्रतिम’! या एका शब्दामध्ये खजुराहोचं संपूर्ण कलाविश्व सामावलं जातं…..
या परमोच्च सुखाच्या क्षणांना शिल्पांद्वारे बंदिस्त करताना कलाकारांनी एक विलक्षण सहजतेचा अनुभव दिला आहे. या कामशिल्पांतून वासनेची बीभत्सता जाणवत नाही. ही शिल्पं पाहताना अलिप्त तटस्थतेचा अनुभव मिळतो. या अवीट सौंदर्यानं नटलेली स्त्री-पुरुष देहांची कामशिल्पं तत्कालीन समाजजीवनाचा आरसा बनून सामोरी येतात……
साधारणपणे दहाव्या आणि अकराव्या शतकात (इ.स. ९५० ते इ.स. १०५०) शंभर वर्षांच्या कालखंडात या सुंदर मंदिरांची निर्मिती झाली, असं मानलं जातं. इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या सुंदर मंदिरांचे निर्माण व्हावे, हे आश्चर्यकारक आहे. कारण एक-दोन नव्हे, तर अशा ८५ मंदिरांची निर्मिती चंदेला राजांच्या कारकीर्दीत झाली होती. त्यापैकी आज केवळ २२ मंदिरे काळाच्या कसोटीवर तग धरून उभी आहेत……..
या अभिव्यक्तीद्वारे सर्व जगाला कळले पाहिजे की स्त्री-पुरुष संबंध ही निसर्गातील एक सहजसुंदर क्रिया आहे. स्त्री-पुरुषांचे देहमीलन होणे, हा एक नितांत सुंदर अनुभव आहे.जीवनातील नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे. हा अनुभव हा जीवनातील उत्कटतेचा परम क्षण असून ही गोष्ट त्याज्य नसून जीवनावश्यक बाब आहे…….
लोकसत्ता, चतुरंग पुरवणी (१८ जुलै २००९) मधील राधिका टिपरे यांचा पूर्ण लेख खालील दुव्यावर पहा.
स्त्री कडुन अशा शिल्पा ला भेट व त्याचे वर्णन हे थोडे आस्चर्य कारक वाटले. सुरेख वर्णन.
प्रिय श्री० प्रभाकर कुलकर्णी यांसी,
सप्रेम नमस्कार.
गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)
अहो, त्या बाईंचा अजिंठा-वेरूळ ह्या विषयाचा सखोल अभ्यास आहे. औरंगाबादच्याच आहेत त्या. पुरातत्त्व किंवा अशाच कुठल्याशा विषयात त्यांनी एम०ए० केलेले आहे.
प्रस्तुत लेखातील काही वर्णनात्मक वाक्ये ही स्त्री-पुरुषांच्या शरीरातीत तरल भावनिक संबंधांविषयी आहेत. ती एका स्त्रीने लिहिली आहेत ह्याचे आपल्याला प्रथम आश्चर्य वाटते खरे. पण उत्तम स्त्री-पुरुषसंबंध (शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक अशा तीनही पातळीवरून) जेवढा पुरुषाच्या आनंदासाठी, तेवढाच स्त्रीच्याही आनंदासाठी असतो, निदान असावा, नाही का? दोघांनाही तो स्वर्गीय सुखाचा अनुभव देणारा असावा. मग त्याबद्दलची स्वानुभूती स्त्रीसुद्धा तेवढ्याच सक्षमपणे व्यक्त करू शकली पाहिजे, नाही का?
लेखिकेचे खरोखरच कौतुक करायला पाहिजे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट