मराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)

शिक्षणव्यवस्थेत मराठीचं भलं व्हावं यासाठी शासनानं काय करावं असं तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विचारल्यावर मी तत्काळ म्हटलं : एक, मराठी माध्यमाच्या शाळांमधलं इंग्रजीचं अध्ययन सुधारावं; दोन, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधलं मराठीचं अध्यापन सुधारावं, किंबहुना त्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेसाठी मराठी अनिवार्य करावं; आणि तीन, दीर्घकालीन उपायांसाठी ‘राज्य मराठी विकास संस्थे’ची स्थापना करावी.

भाषेचा विकास आणि ती ऐकणाऱ्या आणि बोलणाऱ्या मंडळींचा बौद्धिक, भावनिक, नैतिक विकास हातात हात घालून होत असतो. मराठीचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास यांना वेगळं काढता येणार नाही.

————

प्रसिद्ध भाषावैज्ञानिक कै० पद्मश्री अशोक केळकर ह्यांचा हा लेख आपल्या अमृतमंथन परिवाराचे सदस्य श्री० विजय पाध्ये ह्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.

लेखाची पीडीएफ प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. –} अमृतमंथन_मराठी भाषा आणि संस्कृती (ले० अशोक केळकर)

◊ ◊ ◊

मराठी भाषा आणि संस्कृती : १९९७

(‘मराठी भाषा जगवायची कशी?’ ह्या विषयावरील १९९७ मधील परिसंवादासाठी लिहिलेल्या मूळ टिपणाची संस्कारित प्रत)

अशोक रा॰ केळकर

(‘भाषा आणि जीवन’ त्रैमासिकाच्या (एप्रिल-सप्टेंबर २०१५) ‘अशोक केळकर विशेषांका’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संपादित अंश साभार पुनःप्रकाशित)

—————–

.१.

सुमारे १५-१६ वर्षांपूर्वी मराठी भाषेला कुणीच वाली नव्हता. काही मंडळी तर म्हणत, की काय असं ठेवलंय तुमच्या त्या गांवढ्या मराठीत? माझा मित्र सदाशिव भावे याला ‘ग्रीन कार्ड मानसिकता’ म्हणत असे. त्या वेळी आम्ही काही समविचारी मंडळींनी मराठी भाषा नुसती जगली पाहिजे असं नाही तर ती अनेक अंगांनी फळली फुलली पाहिजे असं निग्रहानं प्रतिपादन करायला सुरुवात केली. त्या वेळी ‘अंग्रेजी हटाव’ म्हणणारा एक गट होता. त्याच्याशी आम्ही हातमिळवणी तर केली नाहीच, उलट असल्या आततायी मित्रांपासून मराठीला वाचवा असंही म्हटलं. (माझा एक तमिळ मित्र एकदा म्हणाला होता की संस्कृतला आणि हिंदीला शिव्या देण्यापेक्षा आणि इंग्रजीचे गोडवे गाण्यापेक्षा आम्ही तमिळ भाषेच्या भल्यासाठी जिव्हाळ्याने काम केलं असतं तर एव्हाना ती भाषा कुठच्या कुठे गेली असती – ते माझ्या पक्कं लक्षात राहिलं होतं) स्थिती किती वाईट होती याचा दाखला द्यायचा तर एक आठवण देतो – मला काहीजण म्हणत : तुमचं स्वतःचं इंग्रजी इतकं चांगलं आहे तर तुम्ही मराठीची बाजू का बरं घेता? मी त्याला म्हणायचा, इंग्रजीचं पाहुणी म्हणून अवश्य स्वागत आहे पण सासू म्हणून नाही. थोडक्यात सांगायचं तर, मराठीचा पक्ष घेताना आम्ही भावनांना आवाहन केलं नाही तर विचारांना हात घातला.

आज स्थिती खूप सुधारली आहे असं नाही. १९८० साली बारशीच्या साहित्यसंमेलनात मी म्हटलं की इंग्रजीचा भोळा सोस आणि इंग्रजीचा तिटकारा दोन्ही एकाच न्यूनभावाचे आविष्कार आहेत. आजही ते दिसतात. परंतु हेही खरं की स्थिती तितकी दारुण राहिलेली नाही. मराठीचा अधिक्षेप उघडपणे कुणी करत नाही. मराठीच्या बाजूनं बोलणाऱ्या मंडळींचं प्रमाण वाढलं आहे – पूर्वी मराठीकडे पाठ फिरवणारी किंवा तिच्या विरोधात बोलणारी काही मंडळीदेखील आम्हाला येऊन मिळत आहेत. ‘भाषा आणि जीवन’ त्रैमासिकाचं पंधरावं वर्ष चालू झालं आहे. शासनाला हळूहळू जाग येत आहे. शिक्षणव्यवस्थेत मराठीचं भलं व्हावं यासाठी शासनानं काय करावं असं तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विचारल्यावर मी तत्काळ म्हटलं : एक, मराठी माध्यमाच्या शाळांमधलं इंग्रजीचं अध्ययन सुधारावं; दोन, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधलं मराठीचं अध्यापन सुधारावं, किंबहुना त्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेसाठी मराठी अनिवार्य करावं; आणि तीन, दीर्घकालीन उपायांसाठी ‘राज्य मराठी विकास संस्थे’ची स्थापना करावी. सांगायचा मुद्दा, या तीनही दिशांनी शासनानं कमी-अधिक पावलं टाकली आहेत. मराठीच्या पक्षपात्यांच्या वैचारिक आवाहनाला थोडंबहुत यश मिळत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे बदलत्या परिस्थितीचा रेटा मराठीच्या बाजूनं आहे. महाराष्ट्रातला सत्ता-समतोल बदलत चाललेला आहे. मराठी भाषेकडे आणि साहित्याकडे प्रथम भारतीय आणि नंतर जागतिक संदर्भात पहायची आपल्याला सवय होत आहे – आपले कोणते अभिमान वृथा होते आणि कोणते रास्त आहेत याची आपल्याला जाण येत आहे. उदाहरणार्थ, मराठी रंगभूमीला इतर देशीविदेशी रंगभूमींकडून किती शिकण्यासारखं आहे हे कळलं. उलट, मराठी दलित साहित्यामुळे इतर भारतीय दलितांना आत्मनिवेदनाची प्रेरणा मिळाली आहे. पहिल्या जागतिक मराठी परिषदेपासून अनिवासी मराठी भाषकांचं लक्ष केवळ महाराष्ट्राच्या अर्थकारणाकडे नव्हे, तर मराठी भाषा आणि साहित्य यांच्याकडेही वळलं आहे. ग्रीन कार्ड मानसिकतेवर परस्पर उतारा मिळत आहे आणि नंतर लेखन होऊ लागलं आहे, आणि त्यामुळे आजच्या परिसंवादातल्याप्रमाणे विविध क्षेत्रांमधली मंडळी मराठीचा पक्ष घेऊ लागली आहेत.

एका ऐन मोक्याच्या वेळी हा परिसंवाद होत आहे. त्यासाठी दोन गोष्टी गृहीत धरल्या आहेत. एक म्हणजे मराठी भाषा जगणं इष्ट आहे आणि दुसरी म्हणजे तिचं हे जगणं धोक्यात आलेलं आहे. ही दोन्ही गृहीतकं तपासण्याची गरज आहे. मराठी भाषा जगणं का इष्ट आहे याची स्पष्ट कल्पना असल्याशिवाय ती कोणत्या स्वरूपात जगायला पाहिजे याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. मराठी दुबळ्या स्वरूपात जगली तर त्या जगण्याला काय अर्थ आहे? मराठी भाषेला पूर्वीही कालानुक्रमे संस्कृत आणि फार्सी भाषेचा सासुरवास होता, आता इंग्रजीचा आणि काही अंशी हिंदीचा सासुरवास होत आहे. पूर्वीच्या काळी मराठी त्यातून सुखरूप बाहेर पडली, एवढंच नव्हे, तर त्या त्या भाषांमधून तिनं स्वतःचं पोषणही करून घेतलं. तीच क्रिया आजही कशी चालू राहील याचा विचार करावा लागेल. निरक्षर स्त्रीपुरुषांमुळे पूर्वी मराठी जगली (पंडितकवी मोरोपंतांनी नितान्तसुंदर स्त्रीगीतं लिहिली.) आजही जगत आहे. पण लोकांना निरक्षर न ठेवताही तोच कार्यभाग कसा साधता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही गृहीतकृत्यं मुळातून तपासून बघणं हा खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रकार आहे. या दिशेनं विचार करायचा तर भाषा आणि संस्कृती यांच्या संबंधांचा आपल्याला मुळापासून विचार करावा लागेल.

आपल्याकडे विचार करण्याच्या दोनच पद्धती सध्या ठाऊक आहेत – एक, व्यवहाराच्या पातळीपुरता विचार करायचा आणि सैद्धांतिक विचारांची उपेक्षा करायची; दुसरी, सैद्धांतिक पातळीवर विचार ठेवून व्यावहारिक पातळीकडे दुर्लक्ष करायचं. पण अशा अनुक्रमे आंधळ्या किंवा पांगळ्या पद्धतीनं का म्हणून विचार करायचा? संस्कृती आणि भाषा यांच्याबद्दल सैद्धांतिक भूमिका घेऊन आपण का सुरुवात करू नये? व्यवहाराची आठवण तर आपल्याला पदोपदी ठेवायचीच आहे.

..

‘संस्कृती’ या शब्दाची व्याख्या मी करत बसणार नाही. ‘कल्चर’ या इंग्रजी शब्दाला इतिहासाचार्य राजवाड्यांनी ‘संस्कृती’ हा प्रतिशब्द बनवला आणि रवींद्रनाथ ठाकुरांनी त्या काळात बंगालीत प्रचलित असलेला ‘कृष्टी’ हा प्रतिशब्द बाजूला सारून हा नवा मराठी शब्द आनंदाने स्वीकारला याची मी फक्त आठवण करून देतो. म्हणजे काय झालं पाहा – इंग्रजीच्या खिडकीतून एक नवी, उपयुक्त संकल्पना घेतली, पण तिच्याकडे आपण मराठीच्या डोळ्यांनी निरखून बघितलं. बंगाली भाषकांनी इंग्रजीमधलं ‘अ‍ॅग्रिकल्चर’चं उपमान कायम ठेवलं होतं, तसं न करता राजवाड्यांच्या प्रतिभेनं भारतीय विचारातल्या ‘संस्कार’ या संकल्पनेशी या नव्या संकल्पनेचा सांधा जोडून दिला. माणसाच्या मनावर आयुष्यभर सतत होणाऱ्या बऱ्यावाईट संस्कारांच्या संचिताशी संस्कृतीचा सांधा जुळला हे फारच बरं झालं. मराठी भाषेचं यामुळे प्रदूषण न होता उलट पोषणच झालं. संस्कृतीचा स्वभाव स्पष्टपणे कळायला यामुळे मदत होते. संस्कृती ही घाऊक प्रकार नसून ती त्या त्या संस्कारांमधून बनत जाणारी गोष्ट आहे. हे संस्कार जसे मुद्दाम घडवले जातात तसे कळत-नकळत परिस्थितीमुळे आपोआपही घडतात. ते जसे सु-संस्कार असतात तसे कु-संस्कारही असू शकतात. ते स्वकीयांचे असतात तसे परकीयांचेही असू शकतात. झालेला संस्कार बुजून जाऊ शकतो, बुजून गेलेला संस्कार पुन्हा प्रकट होऊ शकतो.

भाषा हे या संस्कारांचं एक महत्त्वाचं माध्यम असतं. भाषेच्या मार्फत बोलणारा ऐकणाऱ्यावर कळत-नकळत संस्कार करत असतो. मात्र पुष्कळदा सामान्य सुशिक्षित माणसं समजतात त्याप्रमाणे, भाषा म्हणजे केवळ आपलं पूर्वनिश्चित मनोगत दुसऱ्याला कळवायचं म्हणजे संज्ञापनाचं साधन नसतं. त्याखेरीज, भाषा साधन असण्याच्या पलीकडे जाऊन माध्यम बनते – इतरांशी बोलता बोलता आपण स्वतःशीही बोलत असतो. आपलं मनोगत नेमकं काय आहे हे निश्चित करण्यामध्ये भाषेचाही वाटा असतो. भाषा हे कळण्याचं म्हणजे ज्ञापनाचं माध्यमही असतं. परिणामी, भाषेचा विकास आणि ती ऐकणाऱ्या आणि बोलणाऱ्या मंडळींचा बौद्धिक, भावनिक, नैतिक विकास हातात हात घालून होत असतो. मराठीचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास यांना वेगळं काढता येणार नाही.

मराठी भाषा जगणं इतर भारतीयांसाठीही महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र जगला तरच भारत जगेल अशा अर्थाचा सेनापती बापटांचा भावोत्कट उद्गार मला इथे अभिप्रेत नाही. मराठी संस्कृती हे भारतीय संस्कृतीचं एक वेगळं वळण आहे. इतर प्रादेशिक संस्कृतींप्रमाणे तिच्याकडूनही काहीएक भर पडलेली आहे. इरावती कर्वे म्हणत त्याप्रमाणे मराठी संस्कृतीत उत्तर-दक्षिणेचा एक वेगळा संगम आहे, आणि काही बाबतींत ती उत्तर-दक्षिणेपेक्षा निराळी आहे. महाराष्ट्रात रयतवारी पद्धत असल्यामुळे इथे पार दबून गेलेले खेडूत नाहीत. इथे पत्नी पतीला कधी नमस्कार करीत नाही. इथे ब्राह्मण-संस्कृती आणि श्रमण-संस्कृती यांचा निर्मितिशील संघर्ष आहे. इथल्या भक्तीमध्ये शरण्यभावापेक्षा सख्यभावाला प्राधान्य आहे, देवळात भक्तांना दुरूनच पाहणारा देव इथे नाही, महंतांच्या वंशपरंपरा किंवा शिष्यपरंपरा चालवणाऱ्या आरामशीर गाद्या इथे नाहीत. भक्तीमध्ये बौद्धिक चर्चेचा आणि लोकशिक्षणाचा धागा मिसळलेला आहे. उत्तरेत कबीर एकटा पडला, इथे त्याला बरीच दोस्तमंडळी मिळाली असती. एकोणिसाव्या शतकातल्या भारतीय प्रबोधनाचा मराठी आविष्कार वेगळा आहे, त्यातून सकस वैचारिक गद्याची परंपरा इथे तयार झाली. वारकरी पंथाचं मूल्यांकन करण्याच्या निमित्तानं इथे एक धर्मसमीक्षा उभी राहिली. इथले शास्त्री-पंडितही आहिताग्नि राजवाड्यांसारखे किंवा केवलानंद सरस्वतींसारखे स्वतंत्र बाण्याचे. इथले ख्रिस्तीही मिशनऱ्यांशी वाद घालणारे. इथले परिवर्तनवादी वेगळ्या पद्धतीनं काम करणारे. दिवसा सूर्यग्रहणाचे अचूक वेध घेणारे पण संध्याकाळी ग्रहणपर्वाचे आचार पाळणारे दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचे वैज्ञानिक इथे मिळणार नाहीत. एक काळ असा होता की मराठी बाण्याचे सकस हिंदी चित्रपट महाराष्ट्राने भारताला दिले. (आज मात्र हिंदी चित्रपटांमधली निकस वळणं पकडणारे दरिद्री मराठी चित्रपट इथे निघतात.) अनेक प्रादेशिक संस्कृती हे भारताचं वैभव आहे असं अनंतमूर्ती म्हणतात ते योग्यच आहे.

.३.

मराठी भाषेचं जगणं इष्ट असलं तरी ते धोक्यात आलं आहे या दुसऱ्या गृहीतकाकडे आपण आता वळू.

मराठी भाषा मुळात अस्तित्वात कशी आली?

एक तर स्वाभाविकपणे निरंतर चालणाऱ्या भाषिक परिवर्तनातून. दुसरं म्हणजे उच्चारण, शब्दसंग्रह, आणि व्याकरण या तीनही स्तरांवर खोलवर जाणारे द्राविड संस्कार आत्मसात् करण्यातून (गुजराती आणि हिंदी यांच्यापासून मराठी किती वेगळी पडते यामुळे!) तिसरं म्हणजे स्थलांतर आणि वंशवृद्धी यामुळे लोकवस्ती वाढल्यावर स्वाभाविकपणे होणारे प्रादेशिक विघटन आणि त्यातून उद्भवणारी प्रादेशिक अस्मिता. आणि चौथं म्हणजे मध्यंतरी निस्तेज झालेल्या नागर संस्कृतीचं पुनरुज्जीवन.

मराठी अस्तित्वात आली तेव्हापासूनच मराठीला महत्त्व देण्याचं कारणच काय या शंकेला तिला तोंड द्यावं लागलं आहे. अशी आव्हानं मराठी भाषेला नवी नाहीत. ज्ञानेश्वर, एकनाथ, महानुभाव चक्रधर यांसारख्या विविध भक्तिमार्गियांनी झेललेलं संस्कृतचं आव्हान, ‘राज्यव्यवहारकोश’ किंवा ‘आज्ञापत्र’ यासारखी रचना करून मराठी स्वराज्यानं झेललेलं फार्सीचं आव्हान, सुरुवातीच्या आंग्लविद्याविभूषितांनी शैक्षणिक आणि लोकशैक्षणिक पातळ्यांवर झेललेलं इंग्रजीचं आव्हान या ऐतिहासिक घटितांबद्दल आतापर्यंत बरंच बोललं गेलेलं आहे. त्याची पुनरुक्ती मी करत नाही. मला लक्ष वेधायचं आहे ते मराठीनं आपलं वळण न सोडता आपलं पोषण या आव्हानांमधून कसं करून घेतलं याकडे. संस्कृत शब्दभांडारातून मराठीनं मोकळेपणानं उसनवारी केली आहे. पंडिती काव्यात तर ती जाणवतेच, पण संतकाव्यातही ती जाणवत राहते. अगदी निरक्षर ‘स्त्रीशूद्रादिकां’च्या मराठीतही कितीतरी संस्कृत शब्द पोचले आहेत हे पाहणी केल्यावर दिसून येतं. महानुभावांनी वैचारिक दर्जाची निर्मिती केली ती संस्कृतच्या अनुकरणातून. पुढे अव्वल इंग्रजीपर्यंत त्यात व्हावी तशी वाढ झाली नाही, तरी पत्रव्यवहारातून काही वैचारिकता दिसून येते. फार्सी किंवा इंग्रजी शब्द सरळ उसने न घेता त्यांना प्रतिशब्द बनवण्याची ऊर्मी मराठीला आली तेव्हा मराठीनं संस्कृतचा उपयोग करून घेतला. संस्कृतमधली राजप्रशस्ती आणि फार्सीमधली इतिवृत्तात्मक तवारीख यांच्या मिलाफातून मराठी बखर जन्माला आली. हौस, मौज, ख्याली, खुशाली, तबियत, ऐश, आराम, दोस्ती, जमाना इत्यादी शब्दांतून काही वेगळ्या सांस्कृतिक जाणिवा मराठीत आल्या. कायदा आणि न्यायव्यवहार यांची भाषा प्रथम फार्सीतून आणि नंतर इंग्रजीतून घडत गेली. इंग्रजीतून केवळ नवतंत्रज्ञान आणि विज्ञान आलं नाही, तर नवं सामाजिक-राजकीय तत्त्वज्ञान आलं – कधी शब्द आयात करून, कधी प्रतिशब्द योजून, कधी ‘चळवळ’ सारख्या जुन्या शब्दांना नवं सामर्थ्य देऊन. वैचारिक गद्यातून नवी वाक्यरचनाही कधी आली. ‘मराठीचं जगणं इष्ट असलं तरी ते धोक्यात आलं आहे’ हे इंग्रजी वळणाचं वाक्यच घ्या. खास मराठी वळणानं बोलायचं तर ‘मराठी जगायला पाहिजे खरं, पण तिला धोका पोचणार आहे’ असं काहीतरी म्हणायला लागेल. संस्कृत वैचारिक गद्यात ही वाक्यरचना कशी होईल हेही पाहावं. तुलना केल्यावर कदाचित जाणवेल की ते इंग्रजी वळण ही वैचारिक गद्याची गरज आहे, विदूषकी आणि टवाळी यांच्या पलीकडची आणि इंग्रजी वळण म्हणून तिला नाक मुरडण्याची गरज नाही. विनोद आणि शृंगार आणि इष्क यांच्यापेक्षा निराळा असा प्रेमाविष्कार ही इंग्रजीची आणखी एक देणगी.

इंग्रजीतून केवळ वैज्ञानिक परिभाषा आणि वैचारिक माहिती घ्यायची नाही आहे, तर वैज्ञानिक दृष्टीला अनुकूल अशा तटस्थ, काटेकोर, वस्तुनिष्ठ भाषासरणीचाही अंगीकार करायचा आहे. शालेय पातळीवर काय किंवा महाविद्यालयीन पातळीवर काय, भाषेच्या तासाला केवळ व्याकरणनैपुण्य किंवा साहित्यास्वाद शिकवायचा नसतो, तर भाषाव्यावहारनैपुण्य शिकवायचं असतं; नवे संस्कार घडवायचे असतात, मात्र नवे संस्कार म्हणजे नीरस बोधामृत पाजायचं नसतं. दुर्दैवानं आपल्या पाठ्यपुस्तक-निर्मात्यांना याची काही जाणीव किंवा जाण दिसत नाही. (आचार्य अत्र्यांच्या पाठ्यपुस्तकांची अजूनही आठवण काढावीशी वाटते.)

पण हे सर्व करताना मराठीची स्वाभाविक बलस्थानं, उदाहरणार्थ तिचा ‘फटकळपणा’, गमवायला नको. ‘कन्झ्युमरीझम’ शब्दासाठी हिंदीमधल्या ‘उपभोक्तावाद’पेक्षा मराठी ‘चंगळवाद’ अधिक ओळख देणारा. भावना दुखवल्या जाणं हा एक पोरखेळच झाल्यामुळं प्रसारमाध्यमांच्या भाषेला एक जबर कोमटपणा येत आहे अशी मला धास्ती वाटते. भाषेची बलस्थानं म्हणजे केवळ शब्दसंग्रहाची बाब नाही, त्यासाठी वाक्यरचनेचाही विचार करायला हवा. भारतीय संस्कृतीचं स्थान जुन्या काळापासून एक अविभाज्य अंग राहिलं आहे ते म्हणजे जीवनाबद्दलची एक विशिष्ट जाणीव. माणसाचं चरित्र पाहिलं तर त्यातल्या कोणत्याही घटिताला दोन अंगं असतात ही ती अखंड जाणीव. एक अंग म्हणजे बाहेरच्या वस्तूच्या अधीन राहून काय ते भोगणं. दुसरं अंग म्हणजे आतल्या ‘स्व’च्या अधीन म्हणजे स्वाधीन राहून काय ते करणं. साहजिकपणे पुष्कळदा दोन पर्यायी वाक्यरचना आपल्याला उपलब्ध असतात – एक, भोगवट्याची, दुसरी करतुकीची. जशी संस्कृतमध्ये ‘मया ज्ञातम्’ आणि ‘अहं जानामि’ अशी जोडी आहे, तशीच मराठीमध्येही – ‘मला ठाऊक आहे’ हा भोगवटा आणि ‘मी जाणून आहे’ हे करतूक. (इंग्रजीमध्ये मात्र ‘I know’ म्हणून भागवावं लागतं आणि तसं करताना भोगवट्याचं अंग काहीसं दुर्लक्षित राहतं.) अशीच इतर त्रिकं म्हणजे ‘त्याला कारण समजलं : तो कारण समजला : he understood the reason.’; ‘त्याला ओझं पेललं : त्यानं ओझं तोललं : he balanced the load’; ‘मला राग आला : मी रागावलो : I felt angry’; ‘तिला त्याचं काही वाटलं नाही : तिनं त्याचं काही मानलं नाही : she didn’t mind the thing’. या वारसा-हक्कानं आलेल्या जाणीवांपोटी आलेलं शहाणपण मग अगदी अशिक्षित बाईच्या तोंडूनही ऐकायला मिळतं : “पोराला परक्षेचं लई टेन्शन आलं पघा. पन म्यां म्हटलं, पोरा, आसं टेन्शन घिवू नगंस!” इथं ‘टेन्शन’ ही आधुनिक अनुभूती पारंपरिक शहाणपणानं कशी झेलली आहे ते बघावं. “अहो, उपकार कसले? माझ्या हातून मदत झाली एवढंच!” हा त्या शहाणपणाचा दुसरा नैतिक आविष्कार – त्याचा एक धागा थेट गीतेपर्यंत पोचणारा (अध्याय ११, श्लोक ३३ पाहावा). मराठीतून इंग्रजीत अनुवाद करताना हे बारकावे व्यक्त करायला इंग्रजीत कसा त्रास पडतो ते ध्यानात येतं. ‘टेन्शन येणे’ आणि ‘टेन्शन घेणे’ यातला फरक स्पष्ट होईल असा इंग्रजी अनुवाद करून पाहावा.

.४.

आपल्याला मराठी अवश्य जगवायची आहे, पण ती कशीबशी जगवायची नाही. ती अशी जगवायची आहे की ती एकाच वेळी देशी आणि आधुनिक वळण घेऊ शकेल, संस्कृत शब्दांच्या अतिरेकामुळे ती गुदमरून गेलेली नसेल, नवे विचार सोपे करून सांगण्याच्या नादात ती विचारांचा व्याप आणि खोली हरवून बसणार नाही. हे जर व्हायचं असेल, तर मराठीभाषक तज्ज्ञ, संशोधक, विचारवंत यांनी विविध विषयांवर, विशेषतः आपापल्या विषयांवर, बोलायला आणि लिहायला पाहिजे; सकस विचार पण दुबळी भाषा, किंवा डौलदार भाषा पण पोचट विचार असं होऊ नये याची काळजी वाहायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला सामान्य मराठी भाषकांनी जांभूळ तोंडात ढकलून द्या असं न म्हणता या मंडळींना अर्ध्या वाटेपर्यंत चालून सामोरं जायला पाहिजे. प्रकाशक, विविध संस्था, आणि शासन यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता या परस्परसंवादाला पोषक परिस्थिती उत्पन्न करायला पाहिजे. त्याच बरोबर उत्तम वैचारिक लेख आणि पुस्तकं यांचं परभाषांतून मराठीत आणि (आपण तशी उमेद बाळगू या) मराठीतून परभाषांत अनुवाद करायला उत्तेजन द्यायला पाहिजे. (या ठिकाणी परभाषा म्हणजे केवळ इंग्रजी नव्हे, तर फ्रेंच, जर्मन, अरबी, बंगाली, हिंदी अशा इतर भाषाही.)

मराठी भाषेला सलाइनवर ठेवायची वेळ आलेली नाही, पण टॉनिक द्यायची वेळ नक्कीच आलेली आहे – कणखर आत्मविश्वास आणि वास्तवाचं सजग भान हे ते टॉनिक.

◊ ◊ ◊

संदर्भ

अशोक रा॰ केळकर, ‘राजभाषा मराठीचा वाद’, महाराष्ट्र टाइम्स, १८ मे १९८०. समावेश : वैखरी : भाषा आणि भाषा व्यवहार, मुंबई : मॅजेस्टिक, १९८३.

व्यावहारिक मराठी : गरज, मागणी, पूर्ति. नवभारत ऑगस्ट-सप्टेंबर १९८१ जोड अंक विशेषांक म्हणून (डेक्कन कॉलेजमधील चर्चासत्र १९८१).

अशोक रा॰ केळकर, ‘महाराष्ट्र राज्य शिक्षणक्षेत्रातील मराठी आणि इतर भाषांचे स्थान’, मराठी अभ्यास परिषद पत्रिका, पावसाळा : १९८९. समावेश : मध्यमा : भाषा आणि भाषा व्यवहार, पुणे : मेहता प्रकाशन, १९९६.

उडुपि रा॰ अनंतमूर्ति, ‘विविधता आहे, म्हणूनच भारत अजूनही टिकून आहे’, साप्ताहिक सकाळ ३०-०३-१९९६ (इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद : श्यामला वनारसे).

◊ ◊ ◊

मराठी भाषेसंबंधीचा खालील लेखही अवश्य वाचा.

मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी) –} http://wp.me/pzBjo-EV

.

6 thoughts on “मराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)

    • सर्वश्री थिंकमराठी संघ यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या मासिकाच्या जाहिरातपर पत्रास प्रसिद्धी देत आहोत. पण ही अनुदिनी ?शी वापरली जाऊ नये. शिवाय आपण मराठीचा ध्यास घेतलेला आहात आणि मराठीचाच सतत विचार करीत आहात असे आपल्या संघाच्या नावावरून वाटते. अमृतमंथन अनुदिनीदेखील मराठी भाषेच्या, मराठी संस्कृतीच्या आणि मराठी माणसाच्या हिताचाच विचार करण्यासाठी स्थापन केलेली आहे. पण आपणल्याला आपल्या मायबोली मराठीचा विचार आपल्या मराठी भाषेतच करता येणे शक्य नाही काय? कृपया विचार करावा, अशी आपुलकीची सूचना.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० धनंजय भाट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या टिपणापैकी “लोकमान्य टीळकांचा भाषा विचार विषयक लेख” एवढाच भाग दिसला. पुढील टिपण लिहायचे राहून गेले किंवा कसे? कृपया मोकळेपणाने मनातील विचार लिहावेत.

      अमृतमंथनावर फेरी मारून त्यावरील लेखांवरून नजर फिरवावी. आपल्या आवडीचे वाटलेले लेख संपूर्ण वाचावेत. आपल्या मनातील विचार लेखाखालील चौकटीत मांडावेत.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० कृष्ण पुरकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार.

      मी पुण्यातील जाणकार मित्रांकडे चौकशी केली. त्यांच्या मते बुकगंगा किंवा इण्टरनॅशनल बुक डेपो (खंडुजीबाबा चौक, लकडी पुलाजवळ, पुणे) इथे चौकशी करावी. बहुधा मिळेल.

      अमृतमंथन अनुदिनीवरील इतरही लेख वाचून पाहावेत आणि आपला अभिप्राय कळवावा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s