विधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो !!

उत्तर प्रदेशात राज्यस्थापनेच्या नंतर १९५१ वर्षी हिंदी ही राज्याची राज्यभाषा अशी घोषित करण्यात आली. बर्‍याच काळानंतर काही (अर्थातच राजकीय) कारणांस्तव १९८९ वर्षी ऊर्दू भाषा ही देखिल हिंदीच्या जोडीने राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आली. पण तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त कुठल्याही भाषेत, अगदी राज्यभाषेचा दर्जा असलेल्या ऊर्दूतही, आमदारास शपथ घेऊ देत नाहीत. आणि हीच मंडळी आमच्या राज्यात येऊन आमच्या राज्यभाषेऐवजी एका परप्रांताच्या भाषेत (हिंदीत) शपथ घेण्याबद्दल आमच्याशीच दादागिरी करतात आणि आमचेच राज्यकर्ते त्यांची भलामण करतात. अर्थात असे सर्व केवळ आपल्या महाराष्ट्रातच घडू शकते.

अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचे न्याय्य आणि नैतिक अधिकार आणि मान कायदेशीर पद्धतीने मिळवून देऊन राज्यात तिला वादातीत असे सर्वोच्च स्थान मिळवून देणे आपल्याच हातात आहे. आपण सामान्यजनांनी राज्यातील सर्व पक्षांच्या आमदारांवर जनमताचा दबाव आणून इतर अनेक राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाची (लेखी व तोंडी) अधिकृत व्यवहाराची आणि शपथेची ’एकमेव अधिकृत भाषा’ म्हणून राज्यभाषा (मराठी) अधिकृतपणे स्वीकारून तसे लवकरात लवकर घोषित करण्यास भाग पाडले पाहिजे.

याच विषयावर विवेचन करणारा श्री० ज्ञानेश महाराव यांचा चित्रलेखा या पाक्षिकाच्या दिनांक २३ नोव्हेंबरच्या अंकातील ’मराठी जिंकले! मराठी हरली!’ हा लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे, तो अवश्य वाचा.

अमृतमंथन-मराठी जिंकले मराठी हरली_ले० ज्ञानेश महाराव_चित्रलेखा_231109

आपले प्रतिमत (feedback) खालील रकान्यात लिहून अवश्य कळवा.

– अमृतयात्री गट

11 thoughts on “विधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो !!

  1. अत्यंत सुंदर आणि महत्वाचा लेख.

    मला वाटतं, अधिकार मिळवायचा असतो तो मिळत नसतो.
    तसेच आपल्या अतिसहिष्णुपणाचा हा परिणाम आहे.

    • प्रिय श्री० दामोदर कुलकर्णी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अगदी अचूक बोललात. स्वतःच्या घरात मालक मालकासारखा राहिला आणि त्याने पाहुण्याला पाहुणा म्हणून आतिथ्य करतानाच त्याच्या मर्यादाही वेळोवेळी लक्षात आणून दिल्या व तो पाहुणा घरातील नियमांप्रमाणे वागला नाही तर त्याला त्याबद्दल तंबीही दिली तर मालकाला स्वतःचे अधिकार आपोआपच मिळतात. पण जर मालकाने पाहुण्याला डोक्यावर चढवले आणि तो आपल्या घरी आला हे आपले उपकार असे मानून त्याच्या पुढे नोकरासारखे लोटांगण घालत राहिला आणि त्याने धपाटे घातले तरी ती मला शाबासकीच होती असे म्हणून लोचटासारखे त्याच्या समोर वागत राहिला तर त्याला स्वतःच्याच घरी मालक म्हणून काय अधिकार काय अधिकार राहणार?

      इतर राज्यातील स्थानिक मालकाच्या पहिल्या प्रकारात मोडतात आणि फक्त महाराष्ट्रातील स्थानिक दुसर्‍या प्रकारात.

      अतिसहिष्णूता हा शब्द फारच सौम्य आहे. मराठी माणसाची वर्तणुक ही स्वतःच्या भाषेप्रती अनास्थेची, औदासिन्याची एवढीच नव्हे तर न्यूनगंडाची असते. ज्याला स्वतःबद्दल व स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान नाही त्याला इतर लोक काय मान देणार?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. Namaskar
    Khare tar hyasathi apan sarva marathi mansech jababdar ahot.
    Jevha apan sarva vyaharat marathitach bolu.
    Sarkar sarva shalamadhe Marathi vishay anivarya karel.
    Fakta 15 varshe maharashtrat vastava yevadhech nahi tar Marathi bolu shakel tyalach nokari kiva bakiche hakka milatil.

    Ani Marathichi kuni upeksha kaeli tar sarva chavatalun uthtil.
    Tarach Marathichi upeksha Thambel

    .

    • प्रिय श्री० विनय आठल्ये यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले चारीही मुद्दे योग्यच आहेत. पण बहुसंख्य मराठीजनांच्या भाषेप्रतीच्या अनास्थेमुळे, औदासिन्यामुळे, न्यूनगंडामुळे व स्वाभिमानीपणास संकुचितपणा समजून बावळटपणाला उदारमतवादीपणाचा मुलामा चढवण्याच्या वृत्तीमुळे आपण ही फळे भोगीत आहोत.

      आपण स्वाभिमानाने पेटून उठून शासनाला व सर्वच राजकारण्यांना आपल्या भाषेच्या, संस्कृतीच्या आणि सर्वसामान्य मराठी जनतेच्या हितासाठी योग्य ती कृती करण्यास भाग पाडले पाहिजे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय डॉ० नीळकंठ पटवर्धन यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      गूगलवाल्यांना जर एक हजार मराठी मंडळींनी पत्रे पाठवली तर ते लगेच बदलतील. पण आपण तसे करू शकू का?

      गूगल, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांचे भाषांचे पर्याय पाहिले तर लक्षात येईल की मराठीच्या मानाने एक-चतुर्थांश, एक-दशांश एवढी लोकसंख्या असणार्‍या भाषांनाही मराठीपेक्षा अधिक सोयी असतात. कारण आपण मराठीचा पर्याय मागत नाही, आणि असलेला वापरत नाही.

      भाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि लिहिणे करायला पाहिजे.

      शाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर बराहाच्या मदतीने मराठीतून लिहिणे फारच सोपे आहे. त्यासाठी याच अनुदिनीमधील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख पहा. अनेकांनी या माहितीच्या सहाय्याने मराठी लेखन सुरू केले आहे. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.

      अन्यथा जी-मेलवरील मराठी लिप्यंतराची (transliteration) सुविधा वापरून पहा. व्यक्तिशः आम्हाला बराहातून टंकलेखन अधिक सोयीचे वाटते. सवयीने वेगही वाढतो.

      कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. शुभस्य शीघ्रम्‌I  

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० सौरभ देशमुख यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण दिलेल्या दुव्यावरील लेख उत्तमच आहे. आपल्या मराठी-अभिमानी मित्रांच्या माहितीसाठी आपल्या अनुदिनीवर प्रसिद्ध करण्याचा मोह आवरला नाही. तसा तो ’अबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानांचा कित्ता गिरवावा’ या शीर्षलाखाली प्रकाशित केला आहे. कृपया पाहून घ्या.

      आपले आम्ही अत्यंत आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० सोमनाथ पवार यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      जो मराठीच्या हितरक्षणाचे काम करेल तो आपला. जो मराठीचे नुकसान, अपमान, अहित करेल तो आपला शत्रू. याव्यतिरिक्त राजकीय पक्षांच्या थेट पाठिंब्याविषयीच्या वा विरोधासाठीच्या चर्चेसाठी हे व्यासपीठ आपण वापरणे टाळूया.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s