मराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर

मराठीमधील पहिला ज्ञानकोश (विश्वकोश) डॉ० श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सुमारे ८५ वर्षांपूर्वी जिद्दीने १२-१३ वर्षे झटून एकहाती तयार केला. त्यातील माहिती आजही अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी अशीच आहे. मराठीमध्ये जागतिक दर्जाचा ज्ञानकोश आणण्यासाठी आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींची पर्वा न करता ह्या उपक्रमासाठी आपले सर्वस्व पणाला लावून शेवटी केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या सार्वजनिक ससून रुग्णालयात एखाद्या अतिसामान्य दरिद्री माणसाप्रमाणे मृत्यू पावले. अशा अलौकिक पुरुषाचे मराठी माणसावर मोठे ऋण आहेत. मराठी माणसाला त्यांचे विस्मरण होणे हा कृतघ्नपणा ठरेल. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश (http://ketkardnyankosh.in/) सर्वांना मुक्तपणे पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी  ’यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ ह्या संस्थेने नुकताच महाजालावर उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. अशी संकेतस्थळे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने पुनःपुन्हा भेट द्यावी अशी तीर्थस्थळेच होत. त्यानिमित्ताने खालील माहितीपर लेख प्रसिद्ध करीत आहोत. 

इंग्रजीत इंटरनेटवर विविध प्रकारचे अनेक ज्ञानकोश (Encyclopaedia) उपलब्ध आहेत. ब्रिटानिका, काँप्टन, कोलंबिया, एनकार्टा, वर्ल्ड बुक वगैरे इंग्रजी ज्ञानकोश गेली दहा-बारा वर्षे ऑनलाईन आहेत. मात्र एकही संपूर्ण मराठी ज्ञानकोश २०१३ साल उजाडलं तरी इंटरनेटवर आलेला नव्हता. तसे, गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारच्या मराठी विश्वकोशाचे १ ते १९ खंड नेटवर आलेले होते (http://marathivishwakosh.in/) पण २० वा खंड अजून तयार झालेला नसल्याने विश्वकोशाचे काम आजही अपूर्ण स्वरूपातच आहे. सरकारी विश्वकोशाला त्यामुळेच आज तरी संपूर्ण ज्ञानकोश म्हणता येत नाही. मुद्दा हा की महाजालाच्या (इंटरनेटच्या) इतिहासाने नोंद केली आहे की मार्च २०१३ पर्यंत मराठीमध्ये एकही संपूर्ण ज्ञानकोश महालालावर उपलब्ध नव्हता. मात्र १२ मार्च २०१३ रोजी http://ketkardnyankosh.in/ ह्या संकेतस्थळाने महाजालाला पहिला संपूर्ण मराठी ज्ञानकोश दिला. मराठीत महाजालावर असलले हे एक संपूर्ण, विशाल आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे संदर्भस्थळ आहे.

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांचा ज्ञानकोश

http://ketkardnyankosh.in/ वर ह्या ज्ञानकोशाचा परिचय नेमक्या शब्दात दिला आहे. तो संपूर्ण परिचय आवर्जून वाचायला हवा. त्यातील खालील परिच्छेद उदधृत करण्याचा मोह येथे आवरत नाही. परिचय म्हणतो “डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे त्यांच्या ज्ञानकोशांचे प्रमुख संपादक होते. ज्या काळात केतकरांनी ज्ञानकोशाच्या २३ खंडांचे काम केले तो काळ १९१६ ते १९२८ हा आहे. ह्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना ‘हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही’ अशा प्रकारचा सल्ला दिला होता. पण केतकरांचा निर्धार पक्का होता. त्या निर्धाराला चिकटून सर्व संकटांवर मात करीत त्यांनी १२ वर्षांमध्ये हा ऐतिहासिक महत्त्वाचा मराठी प्रकल्प पूर्ण केला. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पुरेशी आर्थिक ताकद वा साधनसामग्री आपल्याकडे नाही याची जाणीव डॉ. केतकरांना त्यावेळी नसेल असे संभवत नाही. पण मराठी ज्ञानकोश निर्मितीच्या पराकोटीच्या महत्त्वाकांक्षेने पेटून उठत त्यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे पदरचे सारे पैसे टाकून कामाला सुरूवात केली. शेवटी केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या ससून रुग्णालयात एखाद्या अतिसामान्य दरिद्री माणसाप्रमाणे मृत्यू पावले. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या पत्नीला १०० रूपये उसने मागण्याची वेळ आली अशी नोंद त्यांच्या चरित्रात आहे. मुद्दा हा की ब्रिटीशांच्या काळात मराठी ज्ञानकोश निर्मितीसाठी त्यांनी केलेला त्याग हा अनन्यसाधारण आहे.”

डॉ. केतकरांची पार्श्वभूमी

संकेतस्थळावर डॉ. केतकरांचे अल्पचरित्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की “केतकरांची आर्थिक स्थिती अगदी सुरूवातीपासूनच सामान्य होती. वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजे १९०६मध्ये मोठ्या पराकाष्ठेने पैसे गोळा करून पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथे पाच वर्षे राहिले. तेथून १९११ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांच्याकडे अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठातून घेतलेल्या एम.ए., आणि पीएच.डी. ह्या पदव्या होत्या. पीएच.डी. साठी त्यांनी लिहीलेल्या प्रबंधाचा विषय होता ‘The history of caste in India’. अशी भरगच्च शैक्षणिक अर्हता वयाच्या २७ व्या वर्षी असणाऱ्या माणसाच्या स्वागतासाठी चलाख इंग्रजांनी सहजपणे पायघड्या अंथरल्या असत्या. पण केतकरांनी त्या तयार सुखाकडे पाठ फिरवली आणि मराठीसाठी प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे ठरवले. मराठी ज्ञानकोशाच्या निर्मितीच्या आतबट्ट्याच्या कामासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित करून टाकले.”

केतकर ज्ञानकोशाची वैशिष्ट्ये

मराठीतील पहिला ज्ञानकोश इतकेच मर्यादित वैशिष्ट्य असते आणि त्याचे अंतरंग पोकळ असते तर कालौघात ते काम विस्मृतीत गेले असते. पण केतकरी ज्ञानकोशाचे एकूण २३ खंड हे आजही एखाद्या भक्कम शिल्पासारखे संदर्भाची हजारो लेणी एकत्र असावीत असे आहेत. १९२८ ते २०१३ ह्या अवधीत त्याची पुस्तकी आवृत्तीही निघालेली नाही. त्यामुळे नव्या पिढीतील अनेकांना त्याची माहितीच नाही. नव्हे, डॉ. श्री.व्यं. केतकर हे नावच त्यांना माहीत नाही. सानेगुरूजींनी डॉ. केतकरांसंबंधी एक लेख त्या काळात लिहीला होता. त्यात सानेगुरूजी लिहितात, “ज्ञानकोश संपादून महाराष्ट्राला अशीं कामें करता येतात ही श्रध्दा त्यांनी दिली. शब्दकोश, चरित्रकोश, धर्मकोश, व्यायामकोश असें विविध कोशवाङमय मराठीत निर्माण झालें, होत आहे, याची स्फूर्ति ज्ञानकोशकारांनीं दिली. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर त्यांच्या थोर स्मृतीला पूज्यभावानें प्रणाम करणें हें महाराष्ट्रीयांचे कर्तव्य आहे. ज्ञानकोशकार केतकरांनीं मराठींत एक नवीन युग निर्मिलें. अमेरिकेंत हिंदुधर्मांतील जाति या विषयावर निबंध लिहून त्यांनी डॉक्टर पदवी मिळविली. ते हिंदुस्थानांत आले. त्यांच्या डोळयासमोर मराठी ज्ञानकोशाची भव्य कल्पना उभी राहिली. शंभर शंभर रुपयांचे भांडवल त्यांनी उभारले. शंभर रुपये भरणारास ज्ञानकोशाचे सर्व भाग मिळणार होते. या शंभरांची किंमत पुढें अर्थात वाढली. प्रथम नागपूरला हें मंडळ काम करुं लागलें. पुढें पुण्यास आलें. आणि तेथेंच हें भगीरथ कार्य त्यांनी अनेकांच्या सहकार्यानें पुरें केलें. त्या कार्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. सरकारनेंहि पाठिंबा दिला नव्हता. डॉक्टर केतकरांच्या निष्ठेनें हें काम पार पाडलें.” सानेगुरूजींचा तो संपूर्ण लेखही संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध आहे. ज्यांना केतकरांच्या ज्ञानकोशांची रचना कशी आहे यासंबंधी सविस्तर माहिती हवी आहे त्यांनी संकेतस्थळावरील http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-03-46/11527-2013-03-09-03-09-36 ह्या दुवा अवश्य उघडावा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाची कामगिरी

http://ketkardnyankosh.in/ हे संकेतस्थळ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, ह्या सेवाभावी संस्थेच्या मालकीचे आहे. केंद्रीय कृषिमंत्री असलेले शरद पवार हे ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. संकेतस्थळावर लिहिलेल्या प्रस्तावनेत भूमिका मांडताना ते म्हणतात “ १९२० ते १९२९ ह्या काळात प्रकाशित झालेले डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर संपादित महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड हा पहिला मराठी ज्ञानकोश. ज्ञानाचा खजिना मराठी भाषेत कोशाच्या स्वरूपात पहिल्यांदा उलगडला त्याला आता ९० वर्षे उलटली. हे २३ खंड नंतर कधीच पुनर्मुद्रित झाले नाहीत… उगवत्या पिढ्यांसाठी मराठी भाषेतील तो ज्ञानाचा खजिना जपून ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे..” हे जबरदस्त संकेतस्थळ जगासाठी मोफत उपलब्ध केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शरदराव पवार ह्या दोघांचेही आभार मानावे तेवढे थोडे.

संकेतस्थळाची वैशिष्ट्ये

http://ketkardnyankosh.in/ हे युनिकोड मजकूराने युक्त असे संकेतस्थळ Design, Search आणि Navigation ह्या तिन्ही दृष्टींनी अप्रतिम आहे. संकेतस्थळाच्या रचनाकारांनी त्यासाठी घेतलेले परिश्रम ठायी ठायी दिसतात. केतकरांच्या २३ खंडांमध्ये एकूण बारीक टायपातील १२५०० मराठी पाने आहेत. ती युनिकोडमध्ये उपलब्ध करणे हे काम खरोखरीच जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखे होते. पण पूजासॉफ्ट टेक्नॉलॉजिज कंपनीचे माधव शिरवळकर, विश्वनाथ खांदारे आणि त्यांचे सहकारी यांनी ते समर्थपणे पेलले.

आपण एकवार ह्या संकेतस्थळाला भेट दिलीत तर ते तुमच्या संदर्भांसाठीचे एक नित्याच्या भेटीचे स्थळ बनून राहील, ह्यात शंका नाही. मराठीत आजही अशी कामे होत असतात, आणि महाजालावरही अशा मराठी मुद्रा दिसतात ही जगातील तमाम मराठीजनांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. पूजासॉफ्टच्या माधव शिरवळकर यांचा ईमेल पत्ता info@pujasoft.net असा आहे.

–    संजय बांदेकर

.

आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा. आपल्या सूचनांना श्री० माधव शिरवळकर निश्चित उत्तर देतील.

– अमृतयात्री गट

.

केतकरांच्या जिद्दीबद्दल दुर्गाबाईंनी सांगितलेली माहिती, महात्मा गांधींचे विक्षिप्त वर्तन ह्यासंबंधित माहिती देणारा खालील दुव्यावरील लेख अवश्य वाचा!

केतकर-पिडीयाचे (महाराष्ट्रीय ज्ञानकोश) भारतीयांना वावडे, विकिपीडिया मात्र जोरात!

.

Tags: ,

.

6 thoughts on “मराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर

  1. ज्ञानकोशाबद्दल आदरणीय शरदराव पवार साहेब व आदरणीय माधवराव शिरवळकर साहेबांचे अभिनंदन कै.केतकरांचा अमूल्य ठेवा आपण वाचकांना उपलब्ध करून दिला .असेच साहित्य यापुढेही मिळावे हि विनंती

    • प्रिय श्री० संतोष दत्तात्रय जोशी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      श्री० माधवराव शिरवळकर ह्यांनी ह्या उपक्रसाठी खूपच परिश्रम घेऊन तो यशस्वी करून दाखवला.

      आपले म्हणणे खरे आहे. मराठीतील अशी अनेक महत्त्वाची कामे, अनेक मौल्यवान ग्रंथ महाजालाद्वारे लोकांच्या पुढ्यात सादर करून त्यांना योग्य प्रसिद्धी मिळायला हवी. मराठी विकिपीडियाचाही उपयोग इतर भारतीय भाषांप्रमाणेच वाढायला हवा. त्यासाठी आजच्या तरूण पिढीने जिद्दीने कंबर कसून ही कामे प्रत्यक्षाट आणायला हवीत.

      क०लोअ०

      – अमृतयात्री गट

  2. कै. केतकर यांचे ज्ञानकोशाबद्दल आदरणीय शरद पवारसाहेब व माधवराव शिरवळकरसाहेब यांचे अभिनंदन असाच ज्ञानाचा नवनवीन ठेवा उपलब्ध करून द्यावा हि विनंती

    • श्रीमती अनुराधा यांसी,

      सस्नेह नमस्कार.

      त्या संकेतस्थळाचा पत्ता बदलेला दिसतो आहे. आता (https://ketkardnyankosh.in/) ह्या दुव्यावर ते संकेतस्थळ उघडते आहे. प्रयत्न करून पाहा.

      अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखांवरूनही नजर फिरवा. जे आवडतील ते वाचा. इतरांना वाचायला द्या. प्रतिक्रिया मांडा.

      क०लो०अ०

      आपला,

      अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.