विचारमंथन – तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)

अमृतमंथन परिवारातील प्रिय मित्रांनो,

हल्लीच काही दिवसांपूर्वी, आपले एक मित्र, मराठीचे अभ्यासक, श्री० सुशांत देवळेकर यांनी मराठीप्रेमी मित्रमंडळापुढे एक प्रश्न मांडला, तोच अधिक विस्तृत चर्चेसाठी, विचारमंथनासाठी आपणा सर्वांपुढे मांडीत आहोत. प्रश्न असा आहे:

——————

नमस्कार,

कविवर्य भा. रा. तांबे ह्यांच्या एका कवितेत ‘तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो. ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला’ ह्यात तिन्ही सांजा म्हणजे नेमकं काय? तीन सांजा कोणत्या? त्या मिळाल्या म्हणजे काय? एरव्ही आपण ‘सांज झाली’ असं म्हणतो. ‘सांजा झाल्या’ असं म्हणत नाही. ‘तिन्ही सांजेची वेळ’ असं म्हणतो. ‘तिन्ही सांजांची वेळ’ असं म्हणत नाही.

तरी ‘तिन्ही सांजा’ ह्या प्रयोगाचा काही संदर्भ माहीत असल्यास तो कळवावा ही विनंती.

सुशान्त शं. देवळेकर

—————-

तर मित्रांनो, डोक्यास चालना द्या, कपाटातील शब्दकोश/ज्ञानकोशांवरची धूळ झटकून ते चाळून पहा, महाजालावर शोध घ्या, बाबा-आजी-काका-अण्णांशी चर्चा करा, आपल्या शाळेतील शिक्षकांशी पुन्हा संपर्क साधा, चिंतन करा आणि आपले प्रतिपादन या विचारमंथनाच्या चर्चापीठावर मांडा.

भाषा, साहित्य, कला, संस्कृती, परंपरा, विज्ञान, निसर्ग, इतिहास, सामान्य ज्ञान… अशा कुठल्याही विषयातील प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ आपण प्रस्थापित करूया.

ह्या खेळाने आपल्या सर्वांच्याच ज्ञानात भर पडू शकेल. या खेळात जय-पराजय काहीच असणार नाही. सर्वांचाच जय कारण सर्वांनाच त्याचा फायदा व्हावा.

आपल्या सूचना, आपले विचार या लेखाखालील रकान्यात मांडा, म्हणजे ते आपल्या सर्वच वाचकमित्रांना वाचता येतील.

आपल्यालासुद्धा असेच काही प्रशंसू (प्रश्न-शंका-सूचना) विचारमंथनासाठी मांडायचे असतील तर ते अवश्य amrutyatri@gmail.com या पत्त्यावर पाठवा.

.

आपल्या उत्तरांची आणि नवीन प्रशंसूंची वाट पाहतो.

.

राजकवि तांबे यांची मूळ कविता:

.

तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला

आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला

तिन्ही सांजा…

.

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा

चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गंभीर निशा

त्रिलोकगामी मारूत, तैशा निर्मल दाहि दिशा

साक्षी ऐसे अमर करूनि हे तव कर करि धरिला

तिन्ही सांजा…

.

नाद ऐसा वेणूत, रस जसा सुंदर कवनांत

गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षात

पाणी जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णात

हृदयी मी साठवी तुज तसा जिवित जो मजला

तिन्ही सांजा…

.

गीत : भा० रा० तांबे (भास्कर रामचंद्र तांबे)

संगीत: पं० हृदयनाथ मंगेशकर

गायिका: लता मंगेशकर

राग: मिश्र यमन

.

– अमृतयात्री गट

.

80 thoughts on “विचारमंथन – तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)

  • प्रिय श्री० अभिजित यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   विचारमंथनाचा श्रीगणेशा केल्याबद्दल आभार. आपण अंदाज (guess) केला आहे असे म्हणता. थोडा अधिक वेळ घेऊन आपण थोडा अधिक विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक अंदाज (studied, considered opinion) मांडू शकलात तर पहा. आपल्याकडील कोश उघडून पहा. आई-बाबा, आजी-आजोबा ह्यांच्याशी चर्चा करा.

   या खेळात सर्वांचाच जय होणार आहे; कारण सर्वांनाच त्याचा फायदा व्हावा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अविनाश भोंडवे यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपला तर्क विचारासाठी आपल्या मित्रमंडळींसमोर ठेवूया. पाहूया इतरांना काय वाटतं ते.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

   • तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला हे तांबे यांचं गीत, मराठी गाण्यांच्या एका प्रसिद्ध वेबसाईट प्रमाणे, १९०२ मधलं. म्हणजे ११८ वर्षांपूर्वीचं ! म्हणजे आगदी पहिला मराठी चित्रपट येण्याआधीचं. तो आला १९१३ मध्ये आणि त्यानंतर जेव्हा सिनेमा वयात आला त्यानंतरचं प्रेमी युगुल हे बरचसं चित्रपट प्रभावित. परंतु या गाण्यातील प्रियकर हा त्याही पूर्वीचा. एवढ्या जुन्या काळातलं, हे विशुद्ध, कामभावने विरहित म्हणजे, मराठीत प्लेटॉनिक प्रेम. आजकालच्या पिढीच्या प्याचअप-ब्रेकअप आणि शारीर आकर्षणा पलीकडचं प्रेम. या प्रेमात, “आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये” असं कोणी यायचं होतं. आणि “कभी मेरे साथ कोई रात गुजार..” असलं प्रेम तर कोणाच्या स्वप्नात देखील नसेल. तर सांगायचा मुद्दा म्हणजे, या गाण्यातील प्रियकर, आपल्या प्रियेला वचन देतो आहे. तो म्हणतोय,

    आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला
    तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला..

    तू मला माझ्या जीवा पेक्षा अधिक आहेस. असं वचन मी तुला या संध्याकाळी देतो. तो प्रियकर तिन्हिसांज किंवा संध्याकाळ झाल्यावर असे नाही म्हणत. वेळ जरी संध्याकाळचीच सुचवायची असली तरी त्याला त्याहूनही अधिक काही सुचवायचं असावं. तीनी – सांजा मिळाल्या असे म्हणतो आहे. मराठी शब्द तिनिसांज आणि तिहिसांज मिळून बोली भाषेत तिन्हीसांज असा झाला असावा कदाचित. दोन्हीचा अर्थ संध्याकाळ. संस्कृतमध्ये संध्या-काल. किंवा दिवस आणि रात्र यांचा संधि काल. पण तांबे तिनि सांजा असं म्हणतात. आणि त्या देखील मिळाल्या असं म्हणतात. आणि आशावेळी हा प्रियकर त्याच्या सखीला हे वचन देतो आहे. पहिली सांज उन्हे उतरू लागल्यावर होते, दुसरी सूर्य मावळल्यावर, तर संधिप्रकाशाची वेळ म्हणजे तिसरी सांज. अशा तीनही सांजा मिळण्याची वेळ, म्हणजे मधली सांज, अर्थात सूर्य मावळतानाची. ही तीनही सांजा मिळण्याची वेळ, संधिकाल अर्थात बोली भाषेत संध्याकाळ. संध्याकाळ ही प्रेमी युगुलांची आवडती वेळ. कुणी लांबून पहिलं तर ओळखू येणार नाही पण एकमेकांना मात्र दोघेही स्वच्छ पाहू शकतात, नाही का? म्हणून आवडती. प्रेम विव्हल करणारी, हळवेली वेळ. अशा वेळी प्रेमी युगुलांच्या आणाभाका चालतात.
    ही कविता ही अशीच एक आणाभाकेची, प्रेयसीला वचन देणारी. ही कविता १९०२ मधली तर तांबे यांचा जन्म, ऑक्टोबर २७, १८७३ चा. म्हणजे वय २९ वर्षे. पाहिल्याच कडव्यात आलेल्या “आजपासूनी” या शब्दामुळे कवितेखालच्या तारखेला महत्व येते. जे (फार थोडे कवि) आपल्या कवितेखाली तारीख लिहितात त्यापैकी राजकवी तांबे हे एक. ते तर इतके व्यवस्थित आहेत की, कवितेखाली त्या कवितेचे वृत्त वगैरे देखील लिहीत असत म्हणे. त्यामुळे शक्यता ही निर्माण होते की, ही कविता त्यांच्या त्याच दिवशीच्या अनुभवाशी किंवा घटनेशी किंवा भावनेशी निगडीत असावी. अगदीच नसेल तरी, या भावना त्यांच्या लेखणीतून उतराव्यात, असे काही या तारखे आसपास घडले असावे हे मानायला हरकत नाही. या तारखेचे, त्यांच्या जीवनातील महत्व शोधायचा खूप प्रयत्न केला. परंतु थेट संबंधित काही नाही मिळाले. नाही म्हणायला, १८९७ मध्ये त्यांचा विवाह वारुबाई जावडेकर यांच्याशी झाला, १९३७ मध्ये “ग्वाल्हेरचे राजकवी” हा बहुमान त्यांना मिळाला आणी साधारण १९०० साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, ही माहिती मिळाली. त्यातले १९०० साल देखील वेगवेगळ्या ब्लॉग्ज वर वेगवेगळे दिसते. एकुणात थेट या तारखेशी संबंध सांगणारे काही मिळाले नाही.
    लग्न झालेले असल्याने आणी कवि ‘तांबे’ असल्याने कोणा दुसर्‍या स्त्रीविषयी असे लिहिण्याची शक्यता विचारात घेणे शक्य नाही. बरं लग्नानंतर पाच वर्षांनी लिहिलेली ही कविता आहे. मग पाच वर्षांनी ते आपल्या पत्नीला “आजपासून” असे अभिवचन का देतात ? त्यांच्या मुलांच्या आणि मुलांच्या जन्मदिनांकाविषयी काही माहिती नाही मिळाली. त्यामुळे, स्पष्टपणे पत्नीच्या गरोदरपणात वगैरे, असे तिला म्हटले असल्याची शक्यता काही पडताळता नाही आली.

    तुम्ही म्हणाल, १००-१२५ वर्षांपूर्वीच्या कवीच्या जीवनाचं एवढं उत्खनन करायचं काय कारण ? तर कोणतेही भावगीत, किंबहुना गीत, हे आधी उत्तम कविता असतं. कविताच नव्हे तर कोणतंही वाङ्मय ही त्या कर्त्याची अभिव्यक्ती असते. कविता हा तर त्या कवी किंवा कवयित्रीच्या नुसत्या कल्पनांचा नव्हे तर भावनांचा आविष्कार असतो. प्रत्येक कवितेच्या मागे तो कवी, त्याचं घटित, अघटित, स्वभाव, मानसिकता, आवड, प्रेम आणी बरंचं काही अंतर्भूत असतं. कवितेचे शब्द लिहिले जात नाहीत तर त्याच्या अंतरंगातून उतरतात, पाझरतात. असं मला वाटतं.
    म्हणून मग कविता जाणून घ्यायची तर कवी देखील समजून घ्यायला हवा, नाही का ? नाहीतर, ग्रेस च्या, “तुला पहिले मी नदीच्या किनारी” तिल स्त्री ही त्याची प्रेयसी नव्हे तर सावत्र आई आहे हे कसे कळेल? किंवा “आरती प्रभुंची “ती येते आणिक जाते, येताना कधी काळ्या आणते” मधील “ती” प्रेयसी ही त्यांची “प्रतिभा” आहे हे कसं कळावं ? खुद्द, तांबे यांच्या ‘मधु मागशि माझ्या सख्या, परी मधुघटचि रिकामे पडती घरी ! या कवितेतील “सख्या” हा कोणा नायिकेचा सख्या नव्हे, तर त्यांच्या कवितेचा रसिक. त्याला ते सांगताहेत, की आजवर तुझी सेवा केली, परंतु तुला जरी माझ्या कवितेचा मध चाखायचा असेल, तरी माझे मधुघट आता रिकामे पडले आहेत. कवी पर्यन्त पोहोचू शकलो, तर कविते पर्यन्त पोहोचायचे खरे द्वार उघडेल. आता या ओळी पहा,

    नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत
    गंध जसा सुमनांत,
    रस जसा बघ या द्राक्षांत, पाणी जसे मोत्यांत
    मनोहर वर्ण सुवर्णांत,

    तांबे ग्वाल्हेर कडचे त्यामुळे उर्दू शायरीचा अभ्यास आणी प्रभाव दोनही त्यांच्या कवितेतून येणं सहज शक्यय. त्यामुळच आपल्या प्रियेला वचन देताना भावनेच्या भरात ते थोडे अतिशयोक्त उपमांचा वापर करणे देखील सहज शक्यय. आहो म्युन्सिपलिटीत महिना पाच हजारावर काम करणारा कारकून देखील, आपल्या प्रियेला चंद्र आणून द्यायची भाषा, प्रेमात करतोच की.

    तर, या कडव्यातून ते सांगतात, ‘हृदयीं मी साठवीं तुज तसा, जीवित तो मजला’. जीवित म्हणजे जिवाचाच भाग, माझ्या जीवात, आत्म्यात, वेगळा न काढता येण्या इतका अंगभूत. बासरी मध्ये नाद, काव्यात काव्यरस, फुलांत गंध, द्राक्षात रस, मोत्यात पाणी, तर सुवर्णाचा सोनेरी रंग या अंगभूत गोष्टी आहेत. त्या त्यांच्यापासून वेगळ्या काढल्या तर त्यांचे स्वरूपच नष्ट होईल. बासरी मधला सुर काढून घेतला तर तिला बांबू म्हणावे लागेल. तांबे म्हणतात, तू इतकी माझी अंगभूत आहेस, तू माझं मुलरूप, मुळस्वभाव आहेस. तुझ्याविना माझं अस्तित्व नाहीसे होईल.
    कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा
    चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा
    त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा
    साक्षी ऐसे अमर करुनी हे तव कर करी धरिला

    मरिचिमाली म्हणजे सूर्य, कनक म्हणजे सोने, चक्रवाल म्हणजे क्षितिज. सोन्याच्या गोळ्या (म्हणजे गोळी चे अनेकवचन नव्हे) प्रमाणे भासणारा सूर्य सुयश मिळवून देणारा तर तो क्षितिजावर आल्यावर येणारी गभीर (गंभीर नव्हे) म्हणजे खोल,गहन अशी रात्र; त्रिलोकगामी म्हणजे तिन्ही लोकात संचार करणारा मारुत, म्हणजे वारा, तसंच निर्मल दाही दिशा. या सार्‍यांना स्मरून मी तुझा हात हाती घेतला आहे. या सार्‍या वर्णीलेल्या गोष्टी चिरंतन आहेत. न संपणार्‍या अशा चिरंजीव आहेत. उगा “तुझ्या आईची” वगैर शपथ नाही ही.

    त्यामुळंच, प्रथमदर्शनी जरी ही कविता, प्रियकराने प्रेयसीला उद्देशून अशी भासली तरी, ती इतकी साधी नसावी असं वाटतं. त्यातून हे गीत आहे, लता दिदींच्या आवाजात. त्यात, “सखे” असे संबोधन. म्हणून की काय, पण हे गाणं कोणी स्त्री आपल्या मैत्रिणीला उद्देशून म्हणत असावी असं देखील वाटते. त्यातून आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला, इथे एकताना माझ्या ऐवजी माझा असं ऐकलं गेलं तर, कोणी प्रेयसी हे गीत आपल्या प्रियकरला म्हणते आहे असे वाटेल. आणी, साक्षी ऐसे अमर करुनी हे, तव कर करी धरिला हे दुसर्‍या कडव्यातील आणी हृदयीं मी साठवीं तुज तसा, जीवित तो मजला हे तिसर्‍या कडव्यातील अंतिम चरण, याच समजाला घट्ट देखील करतं. पुन्हा, अशा प्रकारच्या अतीव भावना सहसा स्त्री व्यक्त करते.
    माहीत नाही पण अशा विविध विचारांच्या गोंधळामुळे, ही कविता तांबे यांनी त्यांना आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार झाल्या नंतर आपल्या प्रतिभेला दिलेलं हे वचन असू शकेल असं भासतं. मग ह्या इतक्या अतीव अंतरिक आणी पवित्र वाचनाला खरा अर्थ लाभू शकेल. ‘मधु मागशि माझ्या सख्या, परी’ यातील “सख्या” हे संबोधन जसं रसिकाला उद्देशून आहे तसंच, या कवितेतील “सखे” हे संबोधन आपल्या प्रतिभेला उद्देशून उच्चारले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्गातील चिरंतन घटनांना साक्षी ठेवून, संध्याकाळसारख्या, जणू प्रेमीयुगुलांनी आणा-भाका घ्याव्यात यासाठीच घडत असलेल्या हळव्या, अंतरिक, अशा चिरंतन घटने समयी, कवीने आपल्या प्रतिभेला “आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला” असे म्हणणे अधिक समर्पक वाटते. तुम्हाला काय वाटते ?

    – मिनिष उमराणी | ०३, मार्च, २०२०

    • अतिशय विचार पूर्वक केलेलं कवितेच रसग्रहण वाचून खूप आनंद झाला, मराठीतल्या अशाच कवितांचा उत्तम रसग्रहण आणि अर्थमंथन वाचायला नक्कीच आवडेल , धन्यवाद

     • प्रिय श्रीमती राधिका अभयंकर यांसी,

      सस्नेह नमस्कार.

      आपली प्रतिक्रिया वाचून फार आनंद वाटला. ह्या अनुदिनीवरील इतर लेखांवरही नजर फिरवावी, आवडतील ते सावकाश वाचावेत, त्यांबद्दल प्रतिक्रिया कळवाव्या, आवडलेले लेख इतर समरुची मित्रमंडळींना वाचायला द्यावेत.

      आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  • प्रिय हेमा ठकार यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपली उपपत्तीही (theory) खरी असू शकते. आपल्या इतर पंडितमित्रांचे काय म्हणणे आहे याबद्दल?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. माझ्या मते दिवसाचे प्रहर चार, तीन तासांचा एक प्रहर, असे दिवस आणि रात्रीचे मिळून आठ प्रहर (अष्टौप्रहर) होतात. त्यामधील दिवसाचे तीन प्रहर संपल्यानंतर येते ती सायंकाळ म्हणजे सांज. कवीला असे म्हणावयाचे असेल की दिवसाचे तीन प्रहर वाट बघून जेथे सायंकाळ होते त्यावेळी ‘आजपासुनी जीवे अधिक तु माझ्या ह्रदयाला’ असे वचन देतो आहे. याठिकाणी अजून एक संदर्भ असा देता येईल तो म्हणजे सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी जे बोलले जाते ते मनापासून सांगीतलेले सत्य आहे असे प्रियकर त्याच्या प्रेयसीला पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. सांजा झाल्या असे म्हणण्यामागे एकतर सांज चे अनेकवचन सांजा असू शकते किंवा यमक जुळवितांना असा प्रयोग झाला असावा. किंबहूना सांजा हा तत्कालीन प्रचलित शब्द असावा.

  अशी माझी समजूत आहे. संदर्भाला काही वापरले नाही हे येथे नमूद करतो.

  आपला
  श्रीनिवास गर्गे

  • प्रिय श्री० श्रीनिवास गणेश गर्गे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   प्रियकर प्रेससीला देत असलेल्या वचनाबद्दलचे, आश्वासनाबद्दलचे आपण केलेले अनुमान कवितेच्या संदर्भात योग्य असावे असे वाटते. तांब्यांनी त्या शब्दप्रयोगाने कवितेच्या अनुभवात खूपच जिवंतपणा आणला आहे यात शंका नाही. पण तिन्ही सांजा हा शब्दप्रयोग राजकवि भा० रा० तांब्यांच्या या कवितेच्या जन्माच्या आधीचाच आहे. मग त्या शब्दप्रयोगाचा मूळ, सर्वसामान्यांसाठीचा अर्थ काय असावा?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय राज्यश्री क्षीरसागर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले (व श्री० गर्गे यांचे) प्रतिपादन लक्षात घेण्याजिगे आहे. पण तिन्हीसांज हा जर एक शब्द आहे असे म्हटले तर मग तो तिन्ही आणि सांज या दोन शब्दांचा समास होऊन बनलेला जोडशब्द असणार. मग त्या समासाची फोड कशी असावी? त्यावरूनच त्या जोडशब्दाचा अर्थ लावता येईल, नाही का?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. अविनाश बोंडवे यांचेशी सहमत आहे. कारण सायंकाळाला सुरुवात पश्र्चीमेकडून होते आणि पूवेँला अंधार दाटू लागतो अशावेळी उत्तर, दक्षिण या दोनही दिशांना पश्र्चिमेकडील मावळतीच्या सुर्यापासून विविध रंगी छटा निर्माण होतात आणि हळूहळू सूर्य मावळल्यानंतर पश्र्चिमेत विलीन होतात. ‘तिन्ही सांजा’ हा शब्द या तिन्ही दिशांवरून आला असावा. तिन दिशांना सायंकाळ होत आहे या अर्थाने तो घ्यावा. असे वाटते.

  • प्रिय श्री० श्रीनिवास गर्गे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   म्हणजे आता श्री० अविनाश भोंडवे, आपण व श्रीमती राजश्री क्षीरसागर ह्यांचे एकमत झालेले दिसते. आपल्या इतर मित्रांना काय वाटते?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. ’तिन्ही सा‌न्जा’ हा शब्दप्रयोग बोली भाषेत प्रचलीत आहे. उदा. कित्येकदा आजी नातवाला दटावते, ’तिन्ही सान्जा असे अभद्र बोलू नये.’येथे अनेकवचनी प्रयोग जोर किम्वा महत्व देण्याकरिता केला जात असावा. जसे, ’केंव्हाच्या भुका लागल्या आहेत’.
  तीन का? चार किंवा दोन का नाही? मला वाटते की पहिली सांज उन्हे उतरू लागल्यावर होते, दुसरी सूर्य मावळल्यावर होते आणि तिसरी सांज म्हणजे संधिप्रकाशाची वेळ.

  • प्रिय श्री० प्रभाकर बापूंना,

   सप्रेम नमस्कार.

   खरं आहे. पूर्वी आजीच्या काळी तिन्हीसांजा झाल्या, दिवेलागणीची वेळ झाली असे शब्दप्रयोग नेहमी ऐकू यायचे. यावेळेला विशेष महत्त्व होतेच. थोडा चांगली वेळ, पवित्र वेळ असाही भाग त्यात असे.

   सांज या शब्दाचा, संध्या या शब्दाशी संबंध असावा असे वाटते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • डॉ० उदय वैद्य यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गर्गेंचे बहुमत वाढते आहे असे दिसते.

   दुसर्‍या कोणाला काही वेगळे प्रतिपादन करायचे आहे का?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय डॉ० उदय वैद्य यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   होय. अगदी खरं आहे आपलं म्हणणं. भा० रा० तांबेंच्या कविता वाचताना त्यामधील अर्थ जाणून खरोखरच मन भारावून जाते. ग्वाल्हेरच्या संस्थानातील या राजकवीने मराठीचा झेंडा उत्तरेमध्येही दिमाखात उंच फडकवत ठेवला.

   आपल्याबरोबरच मम म्हणत आम्ही अमृतमंथन परिवारातील सर्व मराठीप्रेमीही राजकवि भास्कर रामचंद्र तांबे यांना सादर, नम्र अभिवादन करतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. Mazyamate tinhisaanj ha ekach shabda asava. (samas aslyas tyababat mala mahitee nahi, pan kadachit samas naselhi.). Tinhisaanj ha sandhiprakash va twilight la samanarthi shaba asava. Mhanje sandhiprakash agadi thodavel asato mhanoon…pan mala shri Bhondawe va Garg yanche mhanane barobar vatate. shri. Karandikar yanche shevatache vakya vichar karanyasarkhe nahi ka?
  Aso.
  mazhe nav Rajyashree aahe , te lihitana marathiteel J ardha va tyala Y jodun aahe
  yethe marathi kase lihave, te kuni sangu shakel ka?

  • प्रिय राज्यश्री क्षीरसागर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   चुकीचे नाव लिहिल्याबद्दल क्षमा असावी. वाचताना धांदरटपणा झाला. कुणाचेही नाव कधीही चुकीचे लिहू, उच्चारू नये, ही अगदी प्राथमिक गोष्ट आहे. शेकस्पियरने (शेक्सपियर नव्हे) “नावात असे काय ठेवले आहे?” असे म्हटले असले तरीही प्रत्येकच माणसाची काही प्रमाणात तरी नाव ही व्यक्तिमत्व सूचित करणारी ओळख असते. तेव्हा ते योग्य पद्धतीनेच उच्चारायला पाहिजे. चुकीबद्दल क्षमा मागतो. बर्‍याच वेळा इंग्रजी स्पेलिंगांमुळे मात्र घोटाळा होतो. भारत आणि भरत यांचे स्पेलिंग एकच असू शकते, तसेच रमा आणि रामा यांचे. असो. विषयांतर झाले.

   ————
   तीन आणि सांजा हे दोन शब्द स्वतंत्र व वेगळे आहेत, हे आपल्याला पटते ना? मग ते दोन्ही जोडले जाऊन तयार झालेला तीनसांजा हा शब्द सामासिकच असला पाहिजे. जसे दश+आनन=दशानन, tri+pod=tripod असे सामासिक शब्द. समासात एकत्र आलेल्या शब्दांच्या एकमेकांशी असलेल्या विशिष्ट नात्यामुळे त्यांच्यामधून तयार होणार्‍या सामासिक शब्दाला त्या दोन शब्दांपेक्षा वेगळा असा एक नवीनच अर्थ प्राप्त होतो. जसे दशानन म्हणजे ’दहा तोंडे’ असा अर्थ नाही तर ’दश आहेत आनन (तोंडे) ज्याची असा’ म्हणजेच दशानन रावण याचे ते नाव आहे. tri (three, त्रि, तीन) + pod (ग्रीक podos, pous = पद, पाय). म्हणूनच tripod म्हणजे केवळ ’तीन पाय’ नव्हे तर ’तीन पाय असलेले’ स्टूल किंवा स्टॅंड. मराठीत तिवई, तिपाई.

   राज्यश्री हा देखील सामासिक शब्दच आहे. राज्य+श्री=राज्यश्री. राज्य म्हणजे kingdom, country, royalty, rule, reign. governance, इत्यादी. श्री म्हणजे wealth, riches, affluence, prosperity, plenty, majesty, royalty, grace, splendour, excellence, इत्यादी. ’राज्याची श्री’ अशी या समासाची फोड होऊ शकते. यावरून राज्यश्री या शब्दाचा अर्थ ध्यानात यावा.

   संस्कृत, मराठीप्रमाणे इंग्रजी भाषेत एवढा खोलवर विचार करीत नाहीत. म्हणून आपल्याला वाटते की इंग्रजीत समास नाहीत, व्याकरणाची कटकट कमी आहे. पण खरं म्हणजे समास इंग्रजीमध्येही आहेत. फक्त त्यांचा विचारच केला जात नाही. उदा० customer service हा ग्राहकसेवा या शब्दाप्रमाणे समासच आहे. ग्राहकसेवा म्हणजे ग्राहकाची सेवा. तसेच customer service म्हणजे customer ची service, customer साठी service.

   न्यूटनने सफरचंद खाली पडताना बघितल्यावर गुरुत्वाकर्षणाबद्दल विचार केला व गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. म्हणजे काय, तर ते आधी होतेच; पण त्याने त्याचे अस्तित्व जगाच्या लक्षात आणून दिले. त्याच्या आधी सर्व जग सफरचंदे खाली पडताना पाहत होते; पण कोणालाही त्यात विचार करण्याजोगे काही वाटले नव्हते. तसाच हा प्रकार. असो.

   तसेच तीन आणि सांजा (संध्या) असे दोन शब्द येऊन त्यांचा एकत्रितपणे वेगळा अर्थ तयार झालेला असू शकतो, किंबहुना झालाच आहे. तो काय हे आपण शोधायचे.

   ————-
   संगणकावर मराठीमध्ये लिहिण्यासाठी खालील लेख पहावा.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/27/संगणकावर-युनिकोड-टंक-वाप/

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. नमस्कार,
  या कवितेत ‘तीनी सांजा झाल्या’ न म्हणता ‘तीनी सांजा मिळाल्या’ म्हटले आहे। सांज म्हणजे संधि असे ही मानता येइल काय? सूर्य आणि नक्षत्र नसतांना दिवस, रात्रीचे संधि चा हा काळ म्हणजे संध्याकाळ। (अहोरात्रस्य या संधिः सूर्यनक्षत्रवर्जिता। सा तु संध्या समाख्याता मुनिभिस्तत्वदर्शिभिः -आचारभूषण )। त्रिकाल-संध्या करिता सूर्य अस्त होतांना नक्षत्र दिसे पर्यंत, दुपारी सूर्य डोक्यावर असतांना, सूर्योदयापूर्वी नक्षत्र असेपर्यंत उत्तम वेळ असे ठरविले गेले। (प्रातः संध्यां सनक्षत्रां मध्याह्ने मध्यभास्कराम। ससूर्याँ पश्चिमां संध्यां तिस्त्रः संध्या उपासते -देवी भागवत)। आशा वेळेस संध्या केल्याने फळ प्राप्ति होते म्हणजे हा पवित्र वेळ। आशा वेळेस मंत्रोच्चार इत्यादि करावेच तर वैदिक कृत्यांत अपवित्रता येइल असे काही करू नए।

  एकूण अशा पवित्र वेळी इच्छा व्यक्त करणे त्या इच्छेची तीव्रता व्यक्त करण्यासारखे। प्रत्येक सान्जेत एक विशिष्ट अशी सुन्दरता असते, वातावरण असतो। तेंव्हा तीनी सांजा मिळाल्या तर काय मिळालं कल्पना करून त्या वचना मागील पवित्रता, निर्मलता, निष्ठा लक्षात येते असे माला वाटते। प्रशंसू नाही तूर्त प्रशंसा स्वीकारा।

  • प्रिय श्री० भास्कर भट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   सांजवेळ म्हणजे संधिकाल हे नाते समजण्यासारखे आहे. शिवाय आपण उद्धृत केलेले संस्कृत चरणही अत्यंत बोधकारक आहेत. अनेक आभार.

   या तीन संधिकालांच्या वेळी संध्या करणे तीच त्रिसंध्या नाही का? खरोखरच आपले उत्तर प्रशंसापात्र आहे.

   क०लो०अ०

   अमृतयात्री गट

 6. श्री. सुशांत देवळेकरांचे धन्यवाद! तुम्ही सांगीतलेला तिसरा पैलू विचार करण्याजोगा आहे. सकाळ, दूपार व सायंकाळ अशा तिन वेळी त्रिकाळ संध्या केली जाते. आणि या वेळा देखील पुण्य (पवित्र) वेळा समजल्या जातात. तिसर्‍या संध्येची वेळ म्हणजे तिन्ही सांजा असाव्या का?

  तिन्ही सांज हे दोनही शब्द वेगळे असावे. तिन्हीसांज ही संधी नसून संधीप्रकाशाची वेळ आहे. (अरे वा! मला पुलंसारखी कोटी करता आली की)

  • प्रिय श्री० श्रीनिवास गर्गे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले अनुमानही श्री० भास्करभट्टांनी संस्कृतश्लोकांच्या आधारावर मांडलेल्या उपपत्तीशी जुळते आहे.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 7. मराठीतले काही शब्द अनेकवचनी असूनही एकवचनीसुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ, भेट/भेटी, माळ/माळा, भेर/भेरी, फेर/फेरी, साळ/साळी, जात/जाती, धिंड/धिंडी, बोळवण/बोळवणी, पाठवण/पाठवणी, तीथ/तिथी, गाज/गाजा, तीज/तिजा वगैरे शब्दांतला दुसरा शब्द. लज्जापासून झालेला लाज हा शब्द लाजा म्हणून वापरला तरी तोच अर्थ होतो. संध्यापासून निघालेला सांज आणि सांजा या दोघांचे अगदी तसेच. हे दोन्ही शब्द एकवचनी आहेतच शिवाय सांजा हा अनेकवचनीही आहे.
  आता मूळशब्द तिनिसांज/तिनिसांजा किंवा तिहीसांज/सांजा. दोन्ही शब्द केव्हातरी एकत्र झाले आणि तिन्हीसांज/सांजा हा शब्द तयार झाला. तिनिसांजचा अर्थ दिवसातला तिसरा संधिकाल. पहिला पहाट, दुसरा माध्यान्ह आणि तिसरा सूर्यास्तकाळ. यातल्या तिन्हीचा ’तीनही’शी काहीही संबंध नसावा. तसे असते तर तिन्हीसांज हे एकवचनी रूप झाले नसते, आणि समासात ’ह’ हे अव्यय आले नसते. म्हणजे शब्द बनला असता तीनसांज किंवा त्रिसंध्या.
  थोडक्यात काय, तर कवितेतला तिन्हीसांजा हा समास नाही, ते क्रियाविशेषण आहे, आणि त्याचा अर्थ तिसर्‍या संधिकाळी असा आहे, तीनही संधिकाळी असा नाही.
  कवितेतला तिन्हीसांजा हा शब्द खरे तर एकवचनी हवा होता; कवीने निष्कारण त्याला अनेकवचनी केले. भारा तांब्यांची ही कविता वाचून लोक इतके भारावून गेले असणार की तांब्यांनी ’मिळाल्या’ हे अनेकवचनी क्रियापद का वापरले हे त्यांना विचारायचे त्यांना भान राहिले नसावे. कदाचित त्यांना मिळाल्यामिळाल्या म्हणायचे असेल. म्हणजे संध्याकाळी भेटतांभेटतां. बाकी, “तिन्हीसांजा सखे गिळाया” असे जरी तांब्यांनी लिहिले असते तरी लोकांनी स्वीकारले असते आणि आपण इतक्या वर्षांनी त्या कवितेच्या ओळीचा अर्थ लावीत बसलो असतो.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   कवितेचे रसग्रहण, काव्यास्वाद, कवितेवर भाष्य व कवितेतील त्रुटी दाखवण्याइतकी आमची कुवत, लायकी, पोच नसल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. आपले प्रतिपादन आपल्या वाचकांसमोर यथोक्त ठेवतो.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 8. कवितेचे रसग्रहण वगैरे सोडून द्या, पण केवळ अर्थ लावण्यासाठी भाषेचे अल्पसे ज्ञान, प्रामाणिकपणा, खुले मन, अंधश्रद्ध नसणे एवढ्या गोष्टी पुरेश्या आहेत. भगवद्गीतेवर, मनुस्मृतीवर, इस्लाम सोडून अन्य धर्मांवर आणि सरकारच्या शैक्षणिक धोरणावर टीका करताना आपण कचरत नाही, तर इथे का भ्यावे?

 9. सांजा हा संध्याचा अपभ्रंश आहे. दिवसात एकूण तीन संधिकाल अथवा संध्याकाळ होतात. पहाट व सकाळ यामध्ये ,सकाळ व दुपार यामध्ये, दुपार व रात्र यामध्ये. या संधीकाली संध्या करायची अशीही पद्धत होती. आपण म्हणतो त्या संध्याकाळी तीन संधिकाल पूर्ण होतात म्हणून तिन्ही सांजा असे म्हटले आहे.

  • प्रिय सौ० उमा बोडस यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले मत पटते. सर्वांचेच विचार हळूहळू जवळ येऊ लागले आहेत. लवकरच आपण निश्चित अर्थनिर्णयापर्यंत पोचू असे वाटते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० विशाल नार्वेकर यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपण अम्हणता तशीदेखील शक्यता दिसते आहे. तीनसांज असाही उच्चार मराठीत केला जातो. त्याचेच तोच अर्थ व्यक्त करणारे कानडी शब्दांतर म्हणजे मुस्संजे असू शकते.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

      • प्रिय श्री० विशाल नवेकर यांसी, (की नावेकर?)

       सप्रेम नमस्कार.

       सर्वप्रथम आपले आडनाव चुकून नार्वेकर असे लिहिल्याबद्दल क्षम्यताम्. आमचे विशाल नार्वेकर नावाचे एक मराठीप्रेमी मित्र आहेत. त्यांचेच पत्र असावे असे वाटले आणि घाईघाईत तसेच नाव लिहिले. हलगर्जीपणा झाला एवढे खरे. “नावात काय आहे?” असे कोणीही म्हटले तरी ते दुसर्यांघच्या नावाच्या बाबतीत असते. स्वतःच्या नावाच्या बाबतीत नाही. माणसाचे नाव योग्यच प्रकारे लिहायला हवे, असे आम्हाला वाटते. असो.

       आम्ही “तशीदेखील शक्यता दिसते आहे” असे जे म्हटले ते कानडीत मुस्संजे असा शब्द असण्याबद्दल नाही, तर कानडीतील मुस्संजे आणि मराठीतील तिनसांज ह्या शब्दांमागे एकच भावना असावी, असू शकते, असे म्हणायचे होते.

       आपण दिलेल्या माहितीमुळे आमच्या भाषाविषयक सामान्यज्ञानात भर पडली. त्याबद्दल आभार.

       क०लो०अ०

       – अमृतयात्री गट

 10. Shi. S. Bhaskarbjabhatta yanche mhanane barobar vatate. Shuddhamati Rathi yanche ha samas nasun kriyavisheshan aahe yacha vichar karata yeil ka?
  Amrutyatri gatakadun kshma magitali gelyane mala sankoch vatala. mi fakt barobar kay aahe te sangitale. mazya navacha artha mala mahiti aahe. pan aapan savistar uttar dilyabadal aabhar. Samas mhanaje kay he hi mahiti hote. pan tinhisanj ha samas nasava asech natate. tyat keval sandhiprakashachi vel evdhech apekshit asave. kadachit Sangeet denare Pandit. H. Mangeshkar ya sandarbhat kahi sangu shakteel ka?

  • प्रिय श्रीमती राज्यश्री क्षीरसागर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   दुसर्‍याच्या नावाबद्दल आपण नेहमीच जागरूक असायला पाहिजे. रूसी मोदींना त्यांच्याटिस्को कंपनीमधील शेकडो (हजारो?) कामगारांची नावे अचूक उच्चारासह (बिहारी, बंगाली, उडिया) माहित असत असे ऐकले. या लहानसहान गोष्टींना फार महत्त्व आहे. माणसाचे नाव म्हणजे संगणकीय सांकेतिक संख्या नाही. नावामागे अर्थ, इतिहास, भावना असतात. त्याबाबतीत घोडचूक घडल्यास क्षमा मागायलाच हवी.

   समास म्हणजे काय व आपल्या नावाचा अर्थ काय हे आपल्यालाच शिकवणे हा आमचा दीडशहाणेपणाचा हेतू नव्हता. पण आज महाजालावर विहार करणार्‍यांत अनेक अशी आंग्लमाध्यमशिक्षित तरूण मंडळी असतात की ज्यांना समास व बरेच संस्कृतोद्भव शब्द माहित नसतात, मात्र उत्तम मराठी शिकून घेण्याची इच्छा, आवड असते. अशा तरूण मंडळींना डोळ्यासमोर ठेऊन कधीकधी उत्तरे लिहितो. तेव्हा गैरसमज नसावा. (शिवाय आपण तरूण नाहीत असेही सूचित करण्याचा हेतू नाही, हेदेखील स्पष्ट करू इच्छितो. राग नसावा. अमृतमंथनावर फक्त लोभच अपेक्षित आहे. हिरीरीने वाद घालताना सुद्धा !!)

   भास्करभट्टांनी खरोखरच उत्तम माहिती पुरवली. शेवटी आपणा भारतीयांसाठी भारतीय संस्कृती ही एक अमाप संपत्ती आहे.

   समास व क्रियाविशेषण या पूर्णपणे वेगळ्या वर्गातील संकल्पना आहेत व त्या परस्परव्यतिरेकी (mutually exclusive) नाहीत. समास म्हणजे दोन (किंवा अधिक) स्वतंत्र शब्द एकत्र येण्याची स्थिती; तर क्रियाविशेषण हे शब्दाचे एक व्याकरणीय रूप आहे. उदा० वंशपरंपरां (वंशपरंपरेने) मिळालेली जमीन. या वाक्यात वंशपरंपरा हा समासही (षष्ठी तत्पुरुष) आहे व क्रियाविशेषणही आहे. बुद्धिपुरस्सर, शास्त्रदृष्ट्या हे सामासिक शब्ददेखील क्रियाविशेषणेच आहेत, नाही का?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 11. सांजा हा संध्याचा अपभ्रंश आहे. दिवसात एकूण तीन संधिकाल अथवा संध्याकाळ होतात. पहाट व सकाळ यामध्ये ,सकाळ व दुपार यामध्ये, दुपार व रात्र यामध्ये. या संधीकाली संध्या करायची अशीही पद्धत होती. आपण म्हणतो त्या संध्याकाळी तीन संधिकाल पूर्ण होतात म्हणून तिन्ही सांजा असे म्हटले आहे

  • प्रिय सौ० उमा बोडस यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले हे पत्र दुबार मिळाले आहे. असे वाटते. तेच उत्तर पुन्हा लिहितो.

   आपले मत पटते. सर्वांचेच विचार हळूहळू जवळ येऊ लागले आहेत. लवकरच आपण निश्चित अर्थनिर्णयापर्यंत पोचू असे वाटते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 12. राजकवि भा.रा.तांबे यांची कविता वाचाताना काय वाट्ले माहीत नाही पण हात आपोआपच नमस्कार करते झाले.

  आतापर्यंत आलेल्या मतप्रहावांविरुद्ध मला जायचे आहे असे नाही परंतु मला असे वाटते कि भा.रा.तांबे यांच्या मनात त्यावेळी नक्कीच एक वयस्कर व्यक्ती असावी जिच्या आयुष्याच्या तीन अवस्था (बालपण,तरुणपण आणि म्हातारपण)पार झालेल्या आहेत आणि त्याला येणारी रात्र म्हणजेच आयुष्याचा शेवट अस्वस्थ करतो आहे अश्यावेळी तो आपली अतिशय जवळची व्यक्ती म्हणजेच पत्नी (कारण तोपर्यंत सर्व पाखरांनी आपली घरटी बांधलेली असतात) तिला तो वचन देतो आहे की आज पासुन माझ्या जिवापेक्शा तु मला अधिक प्रिय आहेस…

  कदाचित हे मत पचनी पडने कठिन आहे परंतु सर्व जबाबदारया पार पाड्लेली वयस्कर व्यक्ती समोर ठेवून पाहाल तर नक्कीच तुम्हाला चित्र समजेल….
  बाकी भा.रा.तांबे याच्या कवितेवर भाष्य करण्याची आपली पात्रता नाही तर भगव्दगीता आणि मनुस्म्रुती फारच लांबची गोष्ट आहे…
  याठिकाणी कोणालाही प्रत्तुतर देण्याचे प्रयोजन नाही तर ह्या प्रकारे आपणच आपल्या साहित्याला कमी लेखतो आहोत, आज संस्क्रॄत शिकण्याची गरज वाढली आहे कारण ह्याच भाषेत असे अनेक दाखले आहेत ज्याचा वापर करुन ब-याच जणांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे…
  विषयांतरासाठी तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे.

  धन्यवाद.

  • प्रिय श्री० सुरेश भागडे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या भावना पोचल्या, अगदी सखोल.

   {{याठिकाणी कोणालाही प्रत्तुतर देण्याचे प्रयोजन नाही तर ह्या प्रकारे आपणच आपल्या साहित्याला कमी लेखतो आहोत, आज संस्क्रॄत शिकण्याची गरज वाढली आहे कारण ह्याच भाषेत असे अनेक दाखले आहेत ज्याचा वापर करुन ब-याच जणांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे…}}

   भाषा ही माणसाला आपल्या संस्कृतीशी जोडणारी नाळच आहे. अनेक शब्दांचे अर्थ हे त्यामागील संस्कृतीवर अवलंबून असतात व म्हणूनच ते दुसर्‍या भाषेत भाषांतरित करणे कठीण (अनेकदा अशक्यच) असते. उदा० सच्चिदानंद हा शब्द घ्या. त्यातील सत्‌, चित्‌ आणि आनंद याचे काय भाषांतर करणार? म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी पाश्चात्य मंडळी संस्कृतचा अभ्यास करतात आणि आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. ते संस्कृत शिकून आयुर्वेदाचा अभ्यास करून नवीन प्रतिजैवके (antibiotics) शोधून काढतात, हळद, कडूलिंबासाठी पेटंट घेऊ पहातात. आणखी पंचवीस वर्षात संस्कृतमधील बरेचसे ज्ञान त्यांनी आपल्या नकळत मिळवून त्याचा उपयोग केलेला असेल.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 13. नमस्कार,
  शुद्धमती ताईंना बहुतेक असं म्हणायचां आहे की आपण इसलाम मधल्या चांगल्या गोष्टींवर सुद्धा मंथन करावे। अप्रसंगी असेल पण या पूर्वी आपण आपल्या श्रद्धा व अन्धश्रद्धांचा प्रश्न सोडवू या। आपुला पाया वैदिक संस्कृतीत आहे। कर्मकाण्ड हाच वैदिक संस्कृति चा आधार। वृक्षाला फांद्या फुटावं तसं यातून नाना प्रकारचे श्रद्धा उद्भवलेल्या आहेत। एक प्रकारची श्रद्धा बाळगतो म्हणून इतर प्रकार अन्धश्रद्धा का वाटावेत? फुलं, फळ हाईब्रीड होऊ द्यावे पण मूळ तसेच असावे। हे अपायकारी मुळीच नाही, याचे लाभ लक्षात घ्यायला हवे। जर माझा कुठे गैरसमज झाला असेल तर कृपया क्षमा करावे।

 14. नमस्कार,
  श्रीयुत सुरेश भाग्ड़ेंचे मांडलेले मत फारच सुन्दर आहे, या करिता त्यांचे अभिनन्दन व्हावे। तरी म्हातारपण पार पडलेल्या वयातली जोडपे भावानांत्मक दृष्टया एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून असलेली, एकमेकांवर संपूर्ण विश्वास असलेली, एकमेकांच्या मनांतल्या गोष्टींची स्पष्ट जाणीव असलेली असतांत। म्हणून युगलांची प्रेमपूरक वचनं तरुण वयांत असतात। पक्ष्या घरटी बांधून ठेवतात ते पुढचं संसार मांडायसाठी हे ही तरुणपणात असावं। काही असो, असं सुन्दर अर्थ काढून त्यांनी या मंथन प्रक्रियेची शोभा वाढविली आहे।
  आधीच सांगितल्यानुसार या व्यासपीठावर चर्चा (उत्तर-प्रत्युत्तर) आमंत्रित आहे। मराठी चा संस्कृतशी सम्बन्ध माय-लेकी सारखं आहे। मराठी साहित्य एक सागर आहे तर संस्कृत एक महासागर। अशा अथांग साठयातून एक थेम्ब जरी घेतला तर चव मिळेलच आणि महासागर कमी होणार नाही। संस्कृत श्लोकां वर आधीच पंडितान्नी भाष्य केले आहेत। हा साहित्य, संस्कृत च्या अभ्यासा करीता व्याकरणा मार्फ़त शिकण्यापेक्षा, अनेक पट सोपं आहे। फ़क्त प्रामाणिक पणे हे भाष्य जसच्या तसं वापरावं, आणि आपले विचार पूर्वग्रहरहित असावे। नाही तरी, कांवळ्याच्या शापानं ढोर मरत नाही।

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   श्री० सुरेश भांगडे यांचे प्रतिपादन (interpretation) जरी वेगळ्या प्रकारचे, थोडे अनपेक्षित वाटले तरी ते स्वतः कवीलाही कदाचित नाकारता येणार नाहीत. उलट मूळ कवितेच्या पंक्तितून कदाचित कवीला स्वतःलाही न जाणवलेली पण योग्य आणि उत्कृष्ट अर्थनिर्मिती सादर करणार्‍या रसिकाच्या सृजनशीलतेची व कल्पकतेचीही दाद द्यायलाच हवी.

   {{मराठी साहित्य एक सागर आहे तर संस्कृत एक महासागर। अशा अथांग साठयातून एक थेम्ब जरी घेतला तर चव मिळेलच आणि महासागर कमी होणार नाही।}}
   हे खरंच. आणि त्यातूनही असे अमृताचे थेंब आपल्यासारख्याच्या ओंजळीमधून आयतेच विनाकष्ट प्यायला मिळाले तर आणखी काय हवे? आपल्या प्रत्येक पत्राने हा आनंद दिला आहे.

   {{नाही तरी, कांवळ्याच्या शापानं ढोर मरत नाही।}}
   ही म्हण आजच्या काळात लागू आहे की नाही याबद्दल शंका वाटते. आजच्या भारतीय मुशीतील (Indian pattern) लोकशाहीमध्ये असेच कावळे मोठ्या संख्येने जमून एखाद्या ढोराला, गाईला लक्ष्य करतात व आपल्या शापानेच नव्हे तर टोचा मारून ठार मारून टाकतात. अशी उदाहरणे आपणा सर्वांनाच माहित आहेत. आणि अशा प्रकारे इतरांच्या मांसावर माजलेले हे कावळे आता गिधाडाएवढे मोठे झाले आहेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 15. Mahoday!

  Replying in English script but the language is Marathee.

  Saanj ya shabdaachaa arth ;Tupaamadhye bhijavalelee Kapasaachee Vaat, va tya vaateecha Diva. Reference: (Marathee- Marathee-English Shabdakoash):K B Dhavalay prakaashan.compiled by Mr. Sirmokaadam ..

  Doodh-Dahee-Lonee- yaa teen avasthamadhoon mag toop milatay.Tya arthee” tinhee” haa shabda vaparla gela asaavaa.anya kahee sandarbha laagat nahee.

  Arvind M Govilkar.

  • प्रिय श्री० अरविंद गोविलकर यांसी,

   आपण विचारांना काही नवीनच दिशा दिलीत. सर्वांसमोर मांडूया.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • ढवळ्यांच्या कोशात सांज म्हणजे वात हा अर्थ दिला आहे याचे आश्चर्य वाटते. मग सांजवात म्हणजे वातवात? सांज या शब्दाचे कोशातले सामान्यपणे आढळणारे अर्थ : (१) संध्याकाळ (२) श्रावण महिन्यात रात्री देवापुढे करतात ती शोभिवंत मांडणी. (३) भुताखेतांना अर्पण करायचा नवीन धान्याचा नैवेद्य (४) सत्य (५) ज्या जमिनीपासून जेवढे पीक आतापर्यंत निघत आले आहे तेवढेच निघेल अशी जमिनीच्या सत्यत्वाबद्दलची श्रद्धा.
   यां सर्व अर्थांमध्ये वात हा अर्थ कुठेच आलेला नाही. ढवळ्यांना कुठे मिळाला, ढवळ्यांनाच ठाऊक.

  • प्रिय प्राध्यापक आनंद कटिकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रशंसापर पत्राबद्दल अमृतमंथनाच्या समस्त वाचक परिवाराच्या वतीने आपले आभार मानतो. मराठीच्या प्राध्यापकांना प्रस्तुत चर्चा चांगली, उपयुक्त व योग्य वाटली याचा खरोखरच आनंद वाटला. श्री० भास्करभट्ट, श्री० भांगडे, व आणखी काही परिवार सदस्य हे नेहमीच विचारपूर्ण आणि विचारप्रवर्तक लिहित असतात. त्यांच्या उत्तरात त्यांची बुद्धी, विचारी स्वभाव, अनुभव, ज्ञान व विषयाचे उत्तम विश्लेषण करण्याचे कसब दिसून येते. इतर काही अनुदिनीच्या मानाने या अनुदिनीवर कमी प्रमाणात लेख प्रसिद्ध होत असले तरीही लेखांचा व त्याबद्दलच्या चर्चेचा दर्जा मात्र राखला जातो याचे आम्हा सर्वांनाच समाधान वाटते. आपणही अशा चर्चेत शक्य तसा सहभाग घ्यावा.

   आपल्या पत्राबद्दल सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 16. मराठीत तीन आणि चार या दोन शब्दापासून बनणारे समास : तीनचार, तीनचारदा, तीनदाचारदा, तिसराचौथा, तिसर्‍यांदाचौथ्यांदा, तिसर्‍याचौथ्यांदा, तिन्हीचारी वगैरे. संख्या दहापेक्षा मोठी असेल तर साठसत्तरावा, किंवा विसापंचविसावा असलेही समास होतात. हे सर्व समास वैकल्पिक द्वंद्व या नावाने ओळखले जातात. ज्या सामासिक शब्दांच्या शेवटी दा हे अक्षर आले आहे ते शब्द क्रियाविशेषण म्हणून वापरता येतात

  कवी यशवंतांची एक कविता आहे :
  अजुनी कसे येती ना परधान्या राजा ?
  किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हिसांजा !

  या कवितेतला शब्द तिन्हिसांजा असा आहे. तर भा. रा. तांब्यांच्या कवितेत(जर वर दिलेली कविती योग्य प्रकारे टंकित झाली असेल तर) तिन्ही सांजा हे दोन शब्द आहेत. साहजिकच हा (अव्ययीभाव किंवा अन्य) समास नाही किंवा ह्या शब्दांनी मिळून क्रियाविशेषणही होत नाही.(होत असते तर भा.रा.तांब्यांच्या वेळच्या शुद्धलेखनाच्या नियमांनुसार सांजातल्या जा वर अनुस्वार आला असता.–मोल्सवर्थ पान ३८० पहा.) http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82&display=utf8&table=molesworth याचा अर्थ स्पष्ट आहे की सांजा हे अनेकवचन आहे. आणि तीनही सांजा होऊन गेल्या असून आज त्या इथे एकत्र मिळाल्या आहेत हाच एकमेव अर्थ ध्वनित केला गेलेला आहे. या सांजा म्हणजे बाल्यावस्था, तारुण्य आणि प्रौढावस्था समजायला काहीही हरकत नाही. कवीला कदाचित हेच अभिप्रेत असावे.

 17. मित्रांनो,

  नमस्कार.

  माझे काही विचार मांडतो. कितपत योग्य आहेत ते सर्वांनी विचार करून ठरवावे.

  प्रथम आपण कोश तपासून प्राथमिक माहिती जमवू व मग ती एकमेकांना जोडू.
  ——————-
  आपटेंच्या संस्कृत शब्दकोशाप्रमाणे:

  संधि (सं०) = join; joint; union; junction; connection; (सांधा; जोड;)

  संधिवेला (सं०) = 1- the time of twilight 2- any connecting period. (संधिकाल, सांजवेळ यांच्याशी संबंधित.)

  संधा (सं०) = 1- union; association; 2- intimate union; close connection;

  संध्या (सं०) = 1- union. 2- joint, division. 3- morning or evening twilight

  संध्याकाल (सं०) = 1- the period of twilight. 2- evening.

  त्रिसंध्यी (सं०) = the three periods of the day; i.e. dawn, noon and sunset.

  त्रिसंध्यं (सं०) = at the time of three Sandhyas
  ———————-

  evening = संध्याकाळ;
   
  eventide = the latter part of the day (the period of decreasing daylight from late afternoon until nightfall); संधिकाल; संध्याकाळ;  
   
  twilight = संधिप्रकाश;

  —————–
  मराठी शब्दकोश:

  सांज = संध्याकाळ, अस्तमान; (उदा० “तेचि संकल्पाची सांज जै लोपे I”).

  सांजवळ = सांजवेळ; संध्याकाळ. सांज(जा)वणे, सांजळणे = संध्याकाळ होणे; (उदा० दिवस साजावितो.).

  सांजे, सांझे = संध्याकाळी.

  सांजा(जो)ळ = (गोव्याची मराठी) संध्याकाळ (उदा० सांजोळे दिव्यासी तेल.).

  त्रिकाल-ळ=सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीन वेळा.

  तीन संध्या म्हणजे प्रातः, माध्याह्न, सायं.

  त्रिसंध्या=त्रिकालसंध्या; दिवसाचे तीन संधिकाल; प्रभात, मध्यान्ह व सायंकाळ यावेळी केलेली संध्या;  

  व्युत्पत्ती: संस्कृत- संध्या; प्राकृत- संज्झा; गुजराथी- सांज. पंजाबी, हिंदी, बंगाली, ओडिया- संझ. सिंहली- संदी; संद. असे विविध भाषांतील संबंधित शब्द व्युत्पत्तिकोशात आढळतात.

  म्हणजे सांज, सांजवेळ हे शब्द संध्या, संध्याकाळ (संध्यावेळ, सायंकाळ, संधिकाल; संधिप्रकाशाची वेळ) यांच्याशी संबंधित आहेत असे नक्की वाटते. (संधिकाल = रात्र व दिवस किंवा दिवस व रात्र ह्यांना जोडणारा काळ.)

  —————–
  आता संध्यावेला, सांजवेळ आणि संध्याकाळ यांचा संबंध सिद्ध झाल्यावर तीनसांज या शब्दाचा त्रिसंध्या यासब्दाशी संबंध असावा असे वाटते. मराठीत सहसा फक्त तिसर्या संधिकालालाच संध्याकाळ असे ढोबळपणे मानले जाते. त्रिसंध्येपैकी तिसरी संध्या करायची ही वेळ. म्हणजे त्रिसंध्येपैकी तिसर्या संध्येची वेळ म्हणून तिला तीनसांजेची वेळ असे नाव पडले असावे. संध्याकाळ झाल्यावर आमची आजी “तीनसांज झाली” असेच म्हणायची. यावेळेच्या (तीनसांज होण्याआधी) घरातील केर काढायचा व दरवाज्यात पणती (मुंबईत दिवा) (घरात लक्ष्मी येण्याची वेळ), देवाकडे (सांजवात) व घरातही पुरेसा उजेड पडेल असे दिवे लावायलाच पाहिजे, अशी रीत होती. थोडक्यात काय तर ही सर्वच दृष्टीने पवित्र वेळ समजली जायची.

  अशा वेळी प्रियकर प्रेयसीला आठवण करून देतो, “सखे, तीन्हीसांजा मिळाल्या.” (आता इथे मिळाल्या म्हणजे काय? “तिन्ही सांजा लोटल्या, होऊन गेल्या” असा अर्थ असावा.) “संध्याकाळची ती पवित्र वेळ झाली. अशा पवित्र वेळी मी तुला वचन देतो (देई वचन तुला).”

  इथपर्यंत थोडंफार जमलं असं वाटतं. पण पुन्हा “आजपासून, जीवे अधिक तू माझ्या, हॄदयाला” याचा अर्थ पुन्हा अस्पष्टच राहिला आहे. आजपासून म्हणजे यापुढे, आयुष्यभर. पण जीवे म्हणजे काय? जीवाला की जीवतेस/जीवशील? “तू माझ्या हृदयाला अधिक जीवशील/जीवतेस” म्हणजे काय? भावतेस असे का? “जीव की प्राण” असण्याशी काही संबंध आहे का? या पैलूवरही विचार व्हावा. मला तरी काही सुचत नाही.

  पुढचे कडवे:
  पुढे कनकगोल असा जो उल्लेख आहे तो मावळत्या सूर्याचा असणार. मरीचिमाली म्हणजे काय समजत नाही. पुढचा थोडासा चाचपडत अंदाज लावता येईल. चक्रवाल म्हणजे क्षितिज. एकंदरीतच पवित्र, शांत, गंभीर, निर्मल अशा योजलेल्या विशेषणांवरून कवीला ही वेळ पवित्र वाटते आहे हे तर स्पष्टच आहे. अशा वेळी सर्वांना साक्षीला ठेऊन, प्रेयसीचा हात हाती घेऊन कवी तिला (शांत, गंभीर भावनेने व निर्मल मनाने) वचन देतो. ती वेळ त्यांच्या आयुष्यात अमर, कायमची अविस्मरणीय, ठरणार आहे ह्याचीही तो जाणीव करून देतो.

  यापुढील कडवे अधिकच सुंदर आहे.
  पाव्याचा सर्वात मूलभूत, वैशिष्ट्यपूर्ण, लाक्षणिक, व्यवच्छेदक गुणधर्म म्हणजे त्यातील सुमधुर नादस्वर; तसेच काव्यातील रस हाच काव्याचा प्राण; फुलाचा गुणविशेष म्हणजे त्याचा सुगंध; तेच महत्त्व द्राक्षाच्या बाबतीत त्याच्यामधील रसाचे-आसवाचे; मोत्याचे वैशिष्ट्य, महत्त्व हे त्याच्यामधील पाण्यामुळे (इथे पाणी म्हणजे त्याचे वैशिष्ट्यपूर्ण तेज, कांती, झळाळी, lustre); आणि सोन्याचा व्यवच्छेदक गुण म्हणजे मनाला मोहवून टाकणारा त्याची लाक्षणिक रंगछटा; हे स्वभावधर्म जसे त्या-त्या वस्तुमध्ये पुरेपूर भरलेले असतात व तेच त्या वस्तुचा प्राण असतात; त्याचप्रमाणे मी तुला माझ्या हृदयात साठवलेले, भरून ठेवलेले आहे. आणि हाच गुण म्हणजे माझा प्राण आहे, माझ्या जिवंतपणाचे प्रमाण आहे. तो असेपर्यंत मी जिवंत असेन.

  असा काहीसा ढोबळ अर्थ धडपडत, अडखळत मला लागतो. इतर मित्रांनी त्यावर अधिक बारकाईने कलाकुसर करावी.

  • प्रिय श्री० समीर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण कवितेच्या रसग्रहणासाठी घेतलेले परिश्रम स्तुत्य आहेत. आपल्या निरूपणातील रिकाम्या जागा आपली इतर मित्रमंडळी भरून काडतील काय?

   अत्यंत आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 18. कनकगोल म्हणजे सोनेरी गोल, अर्थात, मावळता सूर्य. मरीचि म्हणजे किरण. मराचिमाली म्हणजे किरणांची माळ गळ्यात घालणारा; सूर्य.
  चक्रवाल म्हणजे वर्तुळ किंवा घेरा. चक्रार्धचक्रवाल म्हणजे अर्धवर्तुळ. जुनी कल्पना अशी होती की सात बेटांनी बनलेल्या पृथ्वीभोवती डोंगरांची वर्तुळाकार रांग आहे. तिला संस्कृतमध्ये चक्रवाल, चक्रवाड किंवा लोकालोक म्हणतात. आपट्यांनी दिलेला क्षितिज हा अर्थ त्याच्या जवळपासचा आहे.
  जुन्या शब्दकोशांत क्षितिजाला अंबरान्त आकाशकक्षा, दिक्चक्र, दिक्तट, दिगंत, दि्ङ्‌मंडल हे प्रतिशब्द दिले आहेत, त्यांत चक्रवालचा समावेश नाही.
  >>जीवे म्हणजे काय?<< कदाचित, जीवणे(=जगणे) या धातूचे एक रूप. (१) वर्तमानकाळ : उदा. तुका म्हणे=तुका म्हणतो. म्हणून, जीवे=जगतो-ते. (२) चालू वर्तमानकाळ : उदा. नावरे=आवरत नाही; जीवे=जगत आहे. (३) विध्यर्थ : उदा. खावे असे वाटते. तसेच जीवे=जगावे. (४) रीतिभूतकाळ : उदा. ती पुढे पळे, मी मागून धावे. जीवे= जगत असे. (५) क्रियासंततिकाळ : उदा. मावळेपर्यंत= केव्हातरी अगोदरपासून ते मावळण्याची क्रिया होईपर्यंत सतत. जीवे=जीवन आहे तो(पर्यंत) (६) रीतिभूतसंभवकाळ : उदा. जर तो जगे तर लढे. जीवे=(जर)जगला-ली. (७) भविष्यकाळ " उदा. बचें(गे) तो और भी लढें(गे). जीवे=जगेन.
  जीवे हे क्रियापद नसेल तर जीवे=जिवाने(जीव+एं). जीव शब्दाची तृतीया, प्रत्यय नें-नीं-एं-शीं पैकी एं.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपली उपपत्ती योग्य असावी. पण मग त्या दोन्हीमधील कुठली अधिक योग्य वाटते? ती वापरून कडव्याचे रसग्रहण कसे करावे याबद्दल आपले विचार काय?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 19. कवि भा. रा. तांबे यांची ही अतिशय सुंदर प्रेमकविता.
  यातील पहिल्या कड्व्यात त्या वेळेचं वर्णन आहे तर दुसर्या कडव्यात प्रेमरसात बुडालेल्या व्यक्तीला दिसणार्या, जाणवणार्या रस,गंध,रुपाचे वर्णन आहे.म्हणुनच हि व्यक्ती तरुण असावी असं वाटतं.
  य़ा व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अतिशय चोखंदळपणे तिन्हिसांजेची वेळ निवडली आहे.
  चक्रवाल हा पवित्र आणि पृथ्वीला व्यापणारा मोठा पर्वत दिवस व रात्र वेगळे करतो असा पुराणात उल्लेख आहे.म्हणजे वेळ व वेळेचं पावित्र्य या दोन्ही गोष्टी आल्या.
  तिन्हीसांजा एकवचन कि अनेकवचन१ कवितेत वापरु शकतो कि गद्यातही१
  दिशा व प्रहर, दोन्ही मिळणारी वेळ म्हणुन मिळाल्या म्हटलं असावं.
  सौ.अरुणा ढेरे यांच्या स्त्री व संस्कृती या पुस्तकात भा.रा.तांबे यांच्या
  दुसर्या कवितेच्या ओळी उद्धृत केल्या आहेत, त्यातही असाचं शब्दप्रय़ोग
  आहे.
  या निमित्ताने एका चांगल्या कवितेचा अर्थ कळला.त्यासाठी व मराठी टंकलेखन शिकविल्याबद्दल देवळेकरांचे खुप खुप आभार.

  • प्रिय डॉ० नीना आंबेकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   {{म्हणुनच हि व्यक्ती तरुण असावी असं वाटतं.}}
   कविता स्फुरत असताना कवीला आपल्या ऐहिक, शारीरिक वयाचा विसर पडलेला असतो. प्रेयसीबद्दल भावना व्यक्त करताना तो अत्यंत तरूण असतो, लहान मुलांचे विचार मांडताना तो बालक असतो, गंभीर उपदेश करताना तो ऐंशीच्या घरातील दीर्घानुभवी, परिपक्व वृद्धही असतो. कधी कधी तर तो वयाच्या बंधनापलिकडे जाऊन एखाद्या संकल्पनेच्या भूमिकेतूनही आपले विचार मांडतो. तेव्हा भा० रा० तांब्यांचं तेव्हाचं (कविता रचण्याच्या काळचं) खरं वय काय होतं असा अभ्यास करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आपल्याला जर कवीच्या भावना तरूण वाटत असतील तर तो आपल्यापुढे स्वतःच्या भावना मांडणारा कवी तरूणच असणार. आपले अनुमान योग्यच आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 20. सस्नेह नमस्कार,
  तिन्हीसांजाबाबत थोडेसे – व्युत्पति कोशात असे लिहिले आहे की तीन/ तिन्हीमधे मूळ धातू तृ असा आहे. त्याचा एक अर्थ
  दोनच्या पलीकडले असा आहे. कारण पूर्वी दोनच्या पलीकडले क्रमांक माहिती नव्हते. त्यामुले तीनचा अर्थ ‘च्या पलीकडले’ असा होतो. तिन्हीसांजा मधे असा अर्थ असेल तर सान्जेच्या पलीकडची वेळ म्हणजे तिन्हीसांजा असे असू शकेल. म्हणजे तिन्हीसांजा हा एकच शब्द असू शकेल.
  याचा अधिक खुलासा अभ्यासक करू शकतील, असे वाटते.
  राज्यश्री क्षीरसागर

  • प्रिय श्रीमती राज्यश्री क्षीरसागर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण पुरवलेली माहिती नवीनच आहे. त्यावर अभ्यास व्हावा, विचारचिंतन व्हावे. आपल्या सर्वांच्याच ज्ञानात भर पडू शकेल.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० आनंद गाडगीळ यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   अरे वा !! ही तर अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत. राजकवी भा० रा० तांब्यांची ही सुंदर कविता. आणि तिचे रसग्रहण करणार स्वतः एक अत्यंत संवेदनशील कवयित्री असलेली व पद्याप्रमाणेच गद्यातही समर्थपणे लिहू शकणारी शांता शेळकेंसारखी श्रेष्ठ व्यक्ती. असा दुग्धशर्करायोग जुळवून आणणार्‍या त्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवू शकाल काय? म्हणजे त्याचे नाव, प्रकाशक इत्यादी… आपले पत्र वाचल्यावर आपल्या प्रत्येक रसिक मराठीप्रेमीस ते पुस्तक कधी एकदा वाचू असे झाले असेल.

   आपल्या इतर वाचकांपैकी कोणालाही त्या पुस्तकाची माहिती असल्यास त्यांनी ती कृपया इथे कळवावी अशी आपल्या सर्व वाचकमित्रांच्या वतीने आग्रहाची विनंती आम्ही करतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 21. नमस्कार,
  कविवर्य भा. रा. तांबे ह्यांची कविता वाचताना उद्भवलेली शंका श्री. अमृतयात्री ह्यांनी अमृतमंथन ह्या अनुदिनीवर घातली आणि त्यानिमित्त उत्तम अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणली ह्याबद्दल अमृतयात्री आणि सर्व सहभागी चर्चाकर्ते ह्यांचे मनःपूर्वक आभार. मनात खूप दिवस रुतलेला हे प्रश्न प्रकटपणे मांडायचं कारण म्हणजे माझा मित्र शैलेश वैते ह्यालाही हेच प्रश्न पडले होते. आणि त्याने ते मला विचारले. त्यामुळे शोधाशोध होऊ शकली.
  मी प्रश्न लिहिताना तिन्ही सांजा असा शब्दप्रयोग केला होता. तो केवळ स्मरणावर विसंबून केला होता. पण ‘तांबे यांची समग्र कविता’ ह्या व्हीनस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संग्रहात पाहिले असता ‘तीनी सांजा’ असे छापलेले आढळले.
  तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला
  आजपासुनी जिवें अधिक तूं माझ्या हृदयाला
  माझ्याकडे असलेली प्रत ही १९९५ ची नववी आवृत्ती आहे. ह्या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे संपादन प्रा. माधवराव पटवर्धन ह्यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी तांब्यांना पाठ दाखवून निश्चित केले होते अशी नोंद ह्या पुस्तकात दिलेल्या १९५३च्या निवेदनात केलेली आहे.
  ह्यातील तीनी आणि तिन्ही ह्यांच्या अर्थात भेद आहे असे दिसत नाही. ही ह्या शब्दयोगीतील हकाराचा काही वेळा लोप झालेला आढळतो. उदा. दोन्ही/दोनी, चारही/चारी, सहाही/साही, दहाही/दाही तसेच तीनही = तीनी.
  ‘तीनी सांजा’ ह्या शब्दप्रयोगातील ‘सांज’ हा शब्द संध्या ह्या शब्दाशी संबंधित आहे आणि तीनी सांजा ह्या प्रयोगाचा त्रिकाल संध्या ह्या संकल्पनेशी संबंध आहे हे सर्वसाधारण मत मान्य होण्यासारखे वाटते. श्री. भास्करभट्ट ह्यांनी उद्धृत केलेल्या श्लोकांतून ते त्रि-काल कोणते हेही स्पष्ट होते. पण तीनी ह्या पदाचा सांज ह्या पदाशी कोणता संबंध आहे? तीनी सांजा ह्या प्रयोगातील सांजा हे पद नाम आहे का? त्याच्या शेवटी येणारा आकार हा अनेकवचनाचा प्रत्यय म्हणून आला आहे का? तीनी ह्या पदातील ही हा समावेशक शब्दयोगी आहे का? की तीनी सांजा हे क्रियाविशेषणच आहे? असे काही प्रश्नही चर्चेत मांडण्यात आले आहेत.
  महाराष्ट्र-शब्दकोशात ‘तिनसांज-जा, तिनिसांज-जा, तिन्हीसांजा स्त्री. (एव.अव.)’ अशी नोंद आहे. त्याचा अर्थ ‘संध्याकाळची वेळ; संध्याकाळ’ असा दिलेला आहे. त्याचे उदाहरण म्हणून ‘किरकिरती रातकिडे । झाल्या तिनिसांजा’ ही यशवंतांची काव्यपंक्ती दिली आहे. त्याचप्रमाणे ‘तिनसांजां, तिनि(न्हि)सांजां – क्रिवि.’ अशीही नोंद आहे आणि तिचा अर्थ ‘संध्याकाळच्या वेळी’ असा आहे.
  श्रीमती राठी ह्यांनी मांडलेला तर्क बरोबर आहे. सांजा हे नाम आहे. मिळाल्या ह्या पदातील मिळ ह्या धातूचा अर्थ एकत्र येणे असा आहे असं दिसतं. तो बरोबर असेल तर तीनी हे सांजा ह्याचं विशेषण आहे. मिळाल्या हे रूप क्रियापद (भूतकाळी) असेल किंवा कृदन्त (पूर्वकालवाचक). त्रिकाल संध्येतील वेगवेगळे पुण्याकाल एकत्र येतात अशी सुंदर कल्पना ह्यातून दिसते.
  श्री. समीर ह्यांनी जीवे ह्या पदाचा ऊहापोह करण्याचा छान प्रयत्न केला आहे. कवितेचा वर उल्लेखलेल्या पाठात जिवें असेच रूप आले आहे. महाराष्ट्र-शब्दकोशात जीवणे, जिवणे अशा नोंदी (अकर्मक) क्रियापद म्हणून दिल्या आहेत आणि त्यांचा अर्थ जगणे असा दिला आहे. पण इथे जीव हे नामपद असावे आणि जिवें हे त्याचे तृतीयेचे रूप असावे. भावे ओवाळितो ह्यातील भावे ह्यासारखे.
  सांज असा प्रयोग अधिकरणार्थी असा मी तरी ऐकलेला/ वाचलेला नाही. पण मला ‘मुंबईचे वर्णन’ ह्या गोविंद नारायण माडगांवकर ह्यांनी लिहिलेल्या (प्रथमावृत्ती १८६३, चौथी आवृत्ती २००२, वरदा बुक्स, पुणे, पृ. २४-२५) ह्या पुस्तकात “हल्ली दोहींसांज तोफा पूर्वीप्रमाणें मारितात, परंतु लोकांस रात्रीचें फिरण्याची मनाई नाही.” असं वाक्य आढळलं. त्यात दोहींसांज रात्री आठ वाजता आणि पहाटे पाच वाजता तोफा वाजत असा संदर्भ आहे. ह्या प्रश्नामुळे काही माहिती शोधता आली. त्यात आपण सर्वांनी भाग घेतला ह्याबद्दल शेवटी पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

  • प्रिय श्री० सुशांत देवळेकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्यासारख्या मराठीप्रेमी तसेच मराठीभाषेचा व भाषाविज्ञानाचा अभ्यासक असलेल्या व्यक्तीकडून प्रकृत विषयाच्या बाबतीत शोध व चौकशी करून पाठवलेले हे टिपण उत्तमच आहे. आपल्या इतर वाचकांच्या उत्तमोत्तम प्रतिक्रियांचा परामर्शही आपण घेतला आहेत, हेदेखील चांगले झाले.

   आपले टिपण आपल्या मित्रबांधवांच्या वाचनासाठी प्रसिद्ध करीत आहोत. आपल्या टिपणाच्या निमित्ताने आपल्या रसिक मराठी वाचकांनी या विषयावर चर्चा पुढे चालू ठेवायला हरकत नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 22. “द्वादैशैतानी नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ” अशांसारख्या संदर्भांवरून त्रिसंध्या म्हणजे तीन संध्या (संधिकाळ – सकाळ, दुपार, संध्याकाळ) हे स्पष्ट होतेच आहे. यातला “तिसरा” संधिकाळ झाला म्हणजे “तिन्ही संधिकाळ संपले” अशा अर्थाने “तिन्ही सांजा मिळाल्या” (कदाचित तीन संध्यांना मूर्तरूप देऊन जणूकाही त्या तिघींचे दिनकार्य संपले आणि त्या एकत्र आल्या किंवा संपल्या..)

  “तीन सांजा संपल्या..किंवा तिसरी सांज संपली” असे टोकदार गद्य लिहिता आले असते पण शेवटी चाकूने बेसिक दाढी होत असतानाही आपण जिलेट वगैरे वापरतो आणि “फोम”ही करतो कारण जगण्यात नुसती माहिती नको असून ती अलंकारिक असणं ही एक गरज आहेच.

  नुसत्या सलामत अली पेक्षा नजाकत अली भला. म्हणून मोठ्या नजाकतीने कविवर्यांनी “तीन” किंवा “तिसरी” ऐवजी “तिन्ही” सांजा असं म्हटलंय आणि नुसते घड्याळ बघून साडेसहा “झाले” असे सांगण्या ऐवजी “मिळाल्या” असा काव्यात्म शब्द वापरला आहे असं वाटतं.

  तिन्ही काळ (दिवसाचे किंवा आयुष्याचे) मी वाट पहातोय ही छटा ही आहेच.

  कविता, चित्रं या फॉर्मची खास ब्युटी हीच आहे ना की वाचणा-याला एक नवा सुंदर अर्थ काढायला खूप वेगवेगळे वाव ठेवणं. आपापल्या जगात आपण असेच खूप छान अर्थ काढून खूपदा हे फॉर्म एन्जॉय करू शकतो. गद्य लिखाणात सहसा एकदा जे वाचले तेच दुस-यांदा दिसते.

  • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल अत्यंत आभारी आहोत. आपले प्रस्तुत रसग्रहण हे बरेचसे कविमनाच्या, सृजनशील कलावंताच्या अंगाने झालेले असल्यामुळे अधिकच मौज वाटते. कवीने किंबहुना कुठल्याही कलावंताने एखाद्या सुंदर कलाकृतीला जन्म दिला की मग तीवर तिचा एकाधिकार राहत नाही. ती सर्व रसिकांची होते. सर्वच रसिक आपापल्या मतांनुसार, दृष्टिकोनानुसार, कुवतीनुसार, कल्पनेच्या झेपेनुसार तीमध्ये निरनिराळे अर्थ, विचार, कल्पना शोधतात. त्यातील अनेक निरूपणे (interpretations) त्या कलाकृतीच्या जन्मदात्यालाही सुचलेली नसतात. पण ह्यातच तर रसिकांच्या कलाप्रेमाचे, सृजनात्मकतेचे, रहस्य दडलेले आहे.

   {{कविता, चित्रं या फॉर्मची खास ब्युटी हीच आहे ना की वाचणा-याला एक नवा सुंदर अर्थ काढायला खूप वेगवेगळे वाव ठेवणं. आपापल्या जगात आपण असेच खूप छान अर्थ काढून खूपदा हे फॉर्म एन्जॉय करू शकतो.}}

   कलावंत स्वतःहून वाव ठेवतो की उत्तम, हुशार, अनुभवी, प्रतिभाशाली रसिक तसा वाव त्या कलाकृतीत स्वतःच निर्माण करतात हे सांगणे कठीण. मूळ कलाकृती जन्माला घालणार्‍यालाही न सुचलेले सौंदर्य रसिक त्या कलाकृतीमध्ये पाहू शकतात. आकाशातील ढगात कोटी सुंदर, तरुण स्त्री पाहतो, तर कोणी म्हातारी चेटकीण. कोणी हरिणांची जोडी पाहतो तर कोणी झाडे-वेली.

   आपले प्रतिपादन इतरांच्याहून वेगळे आहे त्यामागेही हेच तत्त्व आहे, नाही का?

   {{गद्य लिखाणात सहसा एकदा जे वाचले तेच दुस-यांदा दिसते.}}
   ह्या बाबतीत महान, थोर, अनुभवी समीक्षाकार आक्षेप घेतील. गद्य लिखाणही पद्याएवढेच, कलात्मक, रसिकाच्या रसग्राहक बुद्धीला आव्हान देणारे असू शकते असे ते नक्कीच म्हणतील. शेकस्पीयरच्या (शेक्सपीयर हा उच्चार चुकीचा आहे, असे मध्यंतरी वाचले म्हणून ही दक्षता) नाटकांचेही किती निरनिराळे अर्थ लावले गेलेले आहेत व लावले जात आहेत. रामायण-महाभारतापासून (आपण ते गद्यातच वाचले असल्यामुळे आम्ही त्याची गणना गद्यातच केली) अगदी अलिकडच्या गद्य कलाकृतींपर्यंत सर्वांवर होणार्‍या टीका (या शब्दाचा मूळ अर्थ घ्यावा) ह्या अनेकदा पूर्णपणे भिन्न प्रतिपादन करणार्‍या असतात. आणि तसे अनुभव केवळ तेंडूलकरी साहित्याच्या बाबतीतच नव्हे तर शिरवाडकरी आणि खांडेकरी साहित्याच्या बाबतीतही येतात. अशा ह्या कलाकृती म्हणजे मोठ्या नदाप्रमाणे असतात. कोणीही त्यात उडी मारावी व आपापल्या पद्धतीने, आपापल्या आवडीनुसार मनसोक्त डुंबावे, पोहावे किंवा त्याच्या लहरीवर हेलकावत झोपून जायचे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने, आपापल्या कुवतीच्या प्रमाणात आनंद लुटावा. कोणाला त्यात मगरी दिसतील तर कोणाला उत्तमोत्तम कमळांचे ताटवे. एकाच व्यक्तीचा प्रत्येक वेळेचा अनुभवही वेगवेगळा असू शकतो. शेवटी सौंदर्य हे पहाणार्‍याच्या डोळ्यात असते अशी म्हण इंग्रजीत, संस्कृतमध्ये व इतरही काही भाषांत आहेच. आणि प्रत्येकाची सौंदर्यदृष्टी कदाचित परिस्थितीप्रमाणे, मनस्थितीप्रमाणे बदलूही शकेल, असे आम्हाला वाटते. असो. शेवटी ही प्रमेये प्रत्येकाने आपापल्या अनुभवानुसार मांडावीत व सोडवावीत.

   {{तिन्ही काळ (दिवसाचे किंवा आयुष्याचे) मी वाट पहातोय ही छटा ही आहेच}}
   तीन संध्याकाल व आयुष्याचे त्रिकाल यांची आपण केलेली जोडणी सुरस वाटली.

   आपल्या सुंदर रसग्रहणात्मक टीकेबद्दल पुन्हा आभार मानतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • मला असे वाटते या कवितेत तिन्हीसांजा हा शब्द कदाचित त्या दोघांच्या म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या मनातल्या ,कल्पनेतील सांजेविषयी असेल ज्या सांजवेळी आपण तिला किंवा त्याला भेटणार आहोत ती सांज कशी असेल असावी असं…दोघांच्या कल्पनेतील सांजा एकत्र झाल्या आणि त्या तिन्हीसांजा मिळाल्या

 23. शब्दांचा असा कीस काढणं आवडणारी माणसं इथं भेटली ह्याचा आनंद मला ह्या माझ्या आत्येकाकांच्या कवितेचा अर्थ थोडा जास्त कळायला लागला त्याच्याइतकाच वाटतो!

  पण मला एक नाही, दोन वेडं आहेत; माझं दुसरं वेड म्हणजे एंजिनियरिंग. त्यामुळे आत्ताप्र्यंतच्या उहापोहाचं ‘नेट-नेट’ किंवा सारांश मला काय कळला ते स्पष्ट करावसं वाटतं. पण त्याआधी दोन गोष्टी सांगू इच्छितो:

  (१) देवळेकरांनी वरती लिहिलं आहे:
  ‘आजपासुनी जिवें अधिक तूं माझ्या हृदयाला’
  माझ्याकडच्या तांब्यांच्या समग्र कवितेच्या २००४ च्या आवृत्तीत ह्यातली ‘जी’ दीर्घ आहे.
  (२) There’s no difference in pronunciation among these three ways of trasliterating ‘Shakespeare’:
  शेकस्पियर शेक्सपियर शेक्स्पियर
  (unless you pronounce the क in the second and the स in the third transliteration fully – which I trust was NOT your intention). I think the confusion/doubt occurs because of the inability of Indians to get their linguistic minds fully around the concepts of syllables and accents. (We tend to conflate between syllables and जोड(अक्षरे). ‘Shakespeare’, for example, is a two-syllable word, not five, which, I dare say, will come as a surprise to some of you. ‘Scrounged’ is a one syllable word.)

  हं, तर आता तो सारांश असा:

  – ‘तीनी सांजा सखे मिळाल्या’ म्हणजे संध्याकाळचा तो शुभ प्रहर झालाय्. “माझ्या अन् तुझ्या आयुष्यात सुद्धा तोच प्रहर झालाय्” असा अर्थ सुद्धा चुकीचा ठरणार नाही. (Tambe, as you may know, had a very satisfying family/conjugal life; raised 6 kids; loved his wife dearly. And he had tremendous empathy for women, including young widows who our hallowed tradition let wither all their lives in a corner of the household. The point being: his implying a sunset of his own life need not conflict with the passion of the protagonist toward the object of his love interest.)

  – ‘आजपासुनी तूं माझ्या हृदयाला अधिक जीवें’ चा अर्थ अजून स्पष्ट झाला नाहिये (though I believe that’s how it is to be parsed; i. e., जीवें is indeed a conjugation of a VERB [Sorry, I’ve reached the limits of my Marathi!]) I’m inclined to interpret what he WANTS to say as: “From now on, you’ve become even dearer to me”, but no meaning of जीवें — not as a noun declension, nor as an adverb, nor as a verb conjugation, makes it evident — in the context of the other words in the line. And neither Bhaskar Kaka nor my father, who’s briefly mentioned in that book of (may I call it?!?) wondrous poetry is alive for us to ascertain for sure.

  • प्रिय श्री० अजित डोंगरे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   तांब्यांच्या कविता अजरामर आहेत. कालिदासादी श्रेष्ठ कवींच्या साहित्यकृतीवर अजुनही लोक संहोधन करीत असतात, नवनव्या संदर्भांनी नवनवे अर्थ लावतात, पीएचड्या मिळवतात. तशीच योग्यता तांब्यांच्या कवितांचीदेखील आहे.

   आपण केलेले रसग्रहणात्मक विश्लेषण उत्तम आहे. त्यातून आपल्या रसिकतेची आणि काव्यशास्त्रामधील ज्ञानाची साक्ष घडते.

   अत्यंत आभारी आहोत.

   अमृतमंथनावर असे इतर अनेक लेख आहेत. जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा सहज फेरफटका मारावा, लेखांवर दृष्टी टाकावी. स्वारस्य वाटतील ते लेख संपूर्ण वाचावेत, त्याखाली आपली मते नोंदवावीत. आवडलेले लेख मित्रमंडळींना अग्रेषित करावेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० अजित डोंगरे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   माहितीबद्दल आभार. कवीला देशकालादी बंधने कोण लावणार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 24. Dear All

  First of All Very Sorry i m writing in English as baraha not working today properly.

  baryach divasanni punha lihiti aaahe…

  Hya kavitevar mage dekhil lihile hote pan atta kahi navin mat mandanar aahe…
  Tinhi Sanja hya shabd prayogavar aapan sarvanni pushkal mat mandali aahet.
  Kharetar Tinhi Sanja ha ek shabd proyog nahich aahe tar to aahe anubhav ( Pratyaksh aapan sarv gheu shaku asa anubhav) Aapalya sarvachya sharirat asatat tin nadya( Left sympethetic Nervous system, Right sympethetic Nervous system and para sympethetic nervous system) ani satt chakra astat.( Subtle System). paiki makad hadat asaleli positive energy (Kundalini Shakti) jagrut jhaluavar hi sarv system karyanvit hote ani tyacha anubhav aapalyala gheta yeto.(Free of Cost and as on scientific Base)Ashya vyaktila tyachya tinhi nadya jagrut zalyamule parameshwarachi anubhuti gheta yete ani tya mulech Anandachya dohi anand tarang asa anubhav gheta yeto ani mag ( Aaj pasuni jeeve adhik tu mala) jivapekhsahi he parameshwara tu mala adhik priy aahes ha bhav aapoaapach vyakt hoto.
  adhik kahi lihit nahi karan ha vishay pharach motha aani titkach mahatvpurn aahe tyamule anubhav mahtawach..
  Adhik mahiti karata pudhil website pahavi
  http://www.sahajayoga.org or http://www.sahajayoga.org.in
  (Experiencing since last 8 yrs)
  Ethe kahihi promote karanyacha hethu nahi aapan sarvanni yacha anubhav gheun padatala karava ani magach aapal mat tharavave.

  Punha ekda marathi tun n lihita aalyabaddal kshama aasavi.
  Aapala
  Suresh Bhagade

  • प्रिय श्री० सुरेश भगडे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   आपण पुरवलेल्या माहितीबद्दल आभार. अमृतमंथनाच्या वाचकांच्या वाचनासाठी ती येथे प्रसिद्ध करीत आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 25. श्री करंदीकर म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे.
  मला छान आठवतं लहानपणी मला “तिन्हीसांजा बाहेर फार वेळ खेळू नकोस. आता घरी ये.” असे म्हणून आई बोलवायची.
  या कवितेमध्ये भा.रा.तांबे आपल्या सहचारिणीला सांगत आहेत कि आयुष्याच्या तिन्हीसांजा आता झाल्या आहेत.
  आपण आता एकमेकांचे हातात हात घेऊन पुढे जायचे आहे आणि मी तसे करण्याचे तुला वचन देत आहे.
  तांब्यांच्या कितीतरी कवितांमध्ये हा आयुष्याच्या संध्यासमयीचा सूर आढळतो.
  तशीच ही कविता.
  हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांनी आणि लताबाईंच्या गळ्याने ही कविता अजरामर केली आहे हे मात्र खरे.
  नमस्कार

  • प्रिय श्री० विश्वास ढेकणे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल आभार. फार जुनी चर्चा पुन्हा चालू केलीत. (चाळवलीत?) तो चर्चेचा काळ खरोखरच मजेत गेला. अनेक लोकांनी आपापल्या डोक्यास ताण देऊन मांडलेली निरूपणे (interpretations) वाचण्यात मनोरंजन तर होतेच, पण ज्ञानात भर पडते आणि एक वेगळाच आनंद मिळतो.

   जुन्या चर्चेवरील आपले हे नवीन विचारपुष्प सर्वांपुढे सादर करीत आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 26. नविन विषय कसा सुरु करावा ? मला एक व्युत्पत्ती शोधायची होती ? आपण साधनेत उत्कटता हवी , तरलता हवी असे म्हणतो.
  यातील ‘ तरलता ‘ या शब्दाचा नेमका अर्थ काय ?
  तरल भाव , तरल वृत्ती . . . ! ?

  शब्दकोशात अर्थ असे :
  अस्थिर , कंपयुक्त , हलणारे , चंचल , क्षणिक , द्रव , पातळ / tremulous or quivering.

  मात्र हे अर्थ संदर्भ सोडून वाटतात.

  कोणाला व्युत्पत्ती सांगता येईल ?

 27. आज मला कोणीतरी आणखीन् एक विवरण पाठवलं – सुदैवानं लेखिकेच्या नावासहित. (नाहीतर बऱ्याच वेळी लोक लेखकाचं नाव पाठवायला विसरतात.) त्यात काही नवे विचार आहेत म्हणून पूर्णपणे पोस्ट करतो आहे. (पोस्ट लहानसंच आहे, तरी लेखिकेच्या परवानगीशिवाय पोस्ट केल्याबद्दल तिची माफी मागतो!)

  तिन्ही सांजा..त्रिसंध्या

  आज सकाळी एका मैत्रिणीने विचारलं होतं की कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत ‘तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : “तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला…”
  तसेच ‘झाल्या तिन्ही सांजा, करून शिंगार साजा..’ या गाण्यातही तिन्ही सांजा असा अनेकवचनातच शब्द प्रयोग केला आहे.. असं का बरं..?
  मग मलाही हे लक्षात आलं की खरंच,
  ह्यात *’तिन्ही सांजा’* म्हणजे काय? एरवी आपण ‘सांज झाली’ असे म्हणतो; ‘सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. ‘तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; ‘तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे म्हणत नाही. तर , ‘तिन्ही सांजा’ या शब्दप्रयोगाला काही संदर्भ आहे का?

  तिन्हीसांजा हा खरंतर आपल्या नेहमीच्या वापरातला आणि सोपा शब्द आहे. पण आज मात्र तोच अवघड वाटायला लागला.

  आणि मनात प्रश्न आला, सांज म्हणजे संध्याकाळ. सांजा हे त्याचे अनेकवचन असेल …पण मग तिन्ही सांजा म्हणजे काय? कुतूहलाने शब्दकोशात पाहिले. तिथे तिन्ही सांजा म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ असेच दिलेले. पण *तिन्ही* म्हणजे काय?

  …आणि मग दोन्ही गाण्यांचे lyrics पुन्हा पुन्हा ऐकले..त्यातून काही संदर्भ लागतोय का हे चाचपडून पाहिलं..
  मग अर्थातच गुगल ची मदत घेतली. प्रथम तर गुगल वर तिन्ही सांजा असे टाइप करताच भराभरा चार पाच सांज्याच्या रेसिप्यांचे व्हिडीओज दिसायला लागले…!!
  पण मग आणखी नेटाने गुगलून पाहिलं तर ही अशी माहिती मिळाली की-

  ‘तिन्ही सांजा’ हा शब्दप्रयोग ‘त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर(भाषा तज्ञ) ह्यांनी सुचविले आहे. ‘त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो.

  *पहाट आणि सायंकाळ* ह्या *दिवस व रात्रीच्या* सीमारेषेवरील दोन संध्या व *माध्याह्न* ही *सकाळ व दुपार* ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या….तिन्ही सांजा !!*

  ‘तिन्हीसांज’ प्रमाणे ‘त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे.

  हा अर्थ समजल्यानंतर जेंव्हा
  तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गीत परत वाचलं तेंव्हा वाटलं..की रात्र सम्पून दिवस सुरू होताना रात्र व सकाळ एकजीव असलेली एक सुंदरशी पहाट म्हणजे पहिली सांज..
  दिवस वर येऊन सकाळ व दुपार एकजीव असतानाची ती दुसरी सांज..
  व दिवस सम्पताना दिवस व रात्रीच्या सुरवातीच्या जो एक एकजीव काळ असतो ती म्हणजे तिसरी सांज..
  दिवसाच्या या चक्रात असे तीन संधिकाल असतात पण पहिल्या संधिकाली-म्हणजेच सांजवेळी आपण रात्र व दिवसाची सुरवात वेगळी करू शकत नाही… दुसऱ्या व तिसऱ्या संधिकाली – सांजवेळीही असेच!!
  त्यामुळे, “तिन्ही सांजा” हे कदाचित एकजीवतेचे प्रतीक म्हणून वापरले असावे.. असे मला वाटते.
  तिन्ही सांजा गीताच्या पहिल्या कडव्यात सर्व शाश्वत गोष्टीना साक्षी मानून तुझा हात हाती घेतला आहे ,तो ही तिन्ही सांजांची एकजीवता स्मरून..असा भावार्थ जाणवतो.
  दुसऱ्या कडव्यात नाद- बासरी, रस- कविता, पाणी- मोती..अशा उदाहरणातून द्वैत- अद्वैत ही कल्पना मांडली आहे..माझ्या हृदयातील जीव म्हणजे तू अशी एकजीवता म्हणजेच द्वैतातील अद्वैत सांगून पुन्हा तिन्ही सांजा हे रूपक वापरत गाणे समेवर येते..

  झाल्या तिन्ही सांजा या गाण्यात ही अशीच एकजीवता अपेक्षित आहे, असे वाटते.
  हा मला समजलेला अर्थ आहे.
  आज त्या मैत्रिणीने तिन्ही सांजा बद्दल विचारलं म्हणून मी ही बारकाईने शब्द व अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला. 👍

  – अपर्णा कुलकर्णी

 28. नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत
  गंध जसा सुमनांत,
  रस जसा बघ या द्राक्षांत, पाणी जसे मोत्यांत
  मनोहर वर्ण सुवर्णांत,
  Agree

  द्वैत- अद्वैत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवातील काही विचार येथे दिसून येतो

  वेणूत म्हणजे बासुरीत नाद
  फळात, रस
  गंध सुमनात
  वर्ण सुवर्णात
  प्रकट होण्याआधीच जसा आत दडलेला किंवा सामावलेला असतो
  असे ज्ञानेश्वर म्हणतात
  तेव्हढे हे वचन तीव्र or intense आहे
  दवेत

  द्वैतामुळेच मानवावाला अनुभव येतात
  द्वैत संपले की जो अनुभव येतो तो निखळ प्रेमात, वचनात असतो हेच कदाचित कवीवर्याना सुचवायचे नसेल?

 29. अर्थ साधा आहे. हें तिन्ही सांज ह्या शब्दांच अनेकवचन आहे. इंग्लिशमध्येदेखील असं अनेकवचन करतांत. उदा. Waters of Narmada were shimmering in moonlight.

  मराठी असं एकवचन अनेकवचनांचा परस्पर उपयोग करून देते. उदा. नलुच्या लग्नाला शंभर सव्वाशे माणूस जेवला असेल.

  तिन्ही सांजा म्हणजे आजचीच संध्याकाळ नाही तर दररोज संध्याकाळी. लोकांना कां हें समजत नाही हें मला कळत नाही. ह्या कवितेंत भा रा तांबे तिन्ही सांज ह्या संयुक्त शब्दाचं अनेकवचन करत आहेत. मला ह्याचा अर्थ मराठी सहावीपासून समजला आहे.

  अरविंद प्रधान
  माॅन्ट्रीयाल, कॅनडा

  • Sorry, but I find this interpretation unsatisfactory for multiple reasons. The “frinstance” examples you’ve given are quite distinct and do not substantiate your interpretation for तिन्ही सांजा.

   To claim तिन्ही सांजा.is the plural of तिन्ही सांज doesn’t make sense because then you have to assign some meaning to तिन्ही distinct from तीन ही (“All three”). I don’t know what तिन्ही can mean as an adjective (विशेषण) to the singular सांज. But perhaps this part of your explanation was a typo. Perhaps you didn’t mean “तिन्ही सांजा.is the plural of तिन्ही सांज”. Perhaps you only meant “सांजा.is the plural of सांज”?

   Regardless, what you say further doesn’t stand to logic, either. You claim तीन is meant to generalize – “रोज सायंकाळी”. Why on earth would the poet use three as the number to pluralize सांज? What is so special about three? Why not 5 – or 7 – or 10?

   We do know what is special about तिन्ही सांजा – and it relates to the three transitioning periods in the course of a single day, as several interpreters have identified above. So Tambe’s meaning somehow derives from that, IMO.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s