जुने उत्तमोत्तम साहित्य पुनःप्रसिद्ध करणारे ‘ऐसी अक्षरे’ हे द्वैमासिक

प्रिय मराठीसाहित्यप्रेमी मित्रहो,

सप्रेम नमस्कार.

‘बेलवलकर हाऊसिंग’ ह्या मराठी बांधकाम-व्यावसायिक गटातर्फे  ‘ऐसी अक्षरे’ हे द्वैमासिक प्रसिद्ध केले जाते. त्यात दर दोन महिन्यांनी बेलवलकरांद्वारे नावाजलेल्या मराठी साहित्यिकांचे उत्तमोत्तम साहित्य पुनःप्रकाशित केले जाते. आपले वाचायचे राहून गेलेले असे विविध ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मराठी साहित्यिकांचे लेख, कथा, कविता इत्यादी आपल्याला सहजपणे ऐसी अक्षरेमध्ये वाचायला मिळतात. मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यसागरात बुडी मारून त्यातील निवडक रत्ने दर दोन महिन्यांनी ‘ऐसी अक्षरे’च्या ताटात वाढून मराठी रसिकांसमोर सादर केली जातात. बेलवलकरांनी मराठीसाहित्यप्रेमी जनांस उपलब्ध करून दिलेल्या ह्या सुविधेचा आपण सर्वांनी अवश्य फायदा घ्यावा.

‘ऐसी अक्षरे’मधील मराठी साहित्याच्या निवडीच्या मासल्यासाठी म्हणून खालील दुवा उघडून ‘ऐसी अक्षरे’चा ताजा अंक पहा.

http://www.belvalkarhousing.com/downloads/July-Aug 2012 New.pdf

अशाच प्रकारच्या मराठीतील नावाजलेल्या साहित्यिकांच्या साहित्याचा अलोट खजिना उघडण्यासाठी खालील किल्लीचा उपयोग करा आणि आनंद लुटा.

http://www.belvalkarhousing.com/downloads.php

पूर्वीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या काही साहित्यिकांची नावे. – प्रल्हाद केशव अत्रे / केशवकुमार, वि० वा० शिरवाडकर / कुसुमाग्रज, शांता शेळके, पु० ल० देशपांडे, मंगेश पाडगावकर, ना० सी० फडाके, नारायण धारप,  श्री० ज० जोशी, रत्नाकर मतकरी, ग० दि० माडगूळकर, डॉ० नरेन्द्र जाधव, विंदा करंदीकर, वसंत बापट, ग्रेस, भा० रा० तांबे, पी० सावळाराम, पु० भा० भावे, वामन चोरघडे, अरविंद गोखले, मधू मंगेश कर्णिक, शरच्चंद्र मुक्तिबोध, वि० स० खांडेकर, आर० के० नारायण, महेश एलकुंचवार, आरती प्रभू, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, भालचंद्र नेमाडे, दि० बा० मोकाशी, जी० ए० कुलकर्णी, नरहर कुरुंदकर, गं० बा० सरदार, विश्वास पाटील, वसंत कानेटकर, विद्याधर पुंडलिक, रमेश मंत्री, द० मा० मिरासदार, शंकर पाटील, चिं० वि० जोशी, राम गणेश गडकरी, महादेवशास्त्री जोशी, होनाजी बाळा, शाहीर रामजोशी, पठ्ठे बाबूराव, मुकुंदराज, संत नामदेव, संत चोखामेळा, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ… आणखी इतरही अनेक.

गेल्या दहा वर्षांतील ऐसी अक्षरेच्या अंकांच्या तावडीतून कोणते उत्तम मराठी साहित्यिक सुटलेले आहेत, हाच एक संशोधनाचा विषय व्हावा.

आज सहजगत्या हाती न लागणारे असे उत्तमोत्तम मराठी साहित्य मराठी रसिकांस सहजासहजी उपलब्ध करून दिल्याबद्दल बेलवलकर हाउसिंगचे अध्वर्यु श्री० शरच्चंद्र बेलवलकर आणि श्री० समीर बेलवलकर, संपादक श्री० पद्मनाभ हिंगे यांचे आणि समस्त बेलवलकर हाऊसिंगच्या गोतावळ्याचे मनःपूर्वक आभार.

ह्या खजिन्याची माहिती आपल्या सर्व मराठीप्रेमी मित्रमंडळींना अवश्य द्या. सर्वांनी मिळून हा खजिना लुटू, लुटत राहू.

चला, नियमितपणे उत्तमोत्तम मराठी साहित्य वाचू.

– अमृतयात्री गट

ता०क० आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मते ह्या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा. ‘ऐसी अक्षरे’चे संपादक श्री० पद्मनाभ हिंगे ह्यांच्यापर्यंत आपण त्या अवश्य पोचवू.

.

6 thoughts on “जुने उत्तमोत्तम साहित्य पुनःप्रसिद्ध करणारे ‘ऐसी अक्षरे’ हे द्वैमासिक

 1. श्री. पद्मनाभ हिंगे यांस स.न.वि.वि.
  ’अमृतमंथन’मधून आपल्या उपक्रमाविषयी कळले. मी कै. श्री. रघुवीर सामंत यांची कन्या.
  आमचे भाई पेशाने शि़क्षक होते आणि कै. जयवंत दळ्वी, कै. ज्ञानेश्वर नाडकर्णी, रवीन्द्र पिंगे या साहित्यिकांना शालेय वयातच लेखनास उद्युक्त करणारे होते.
  त्यांचे साहित्य पुन्हा वाचकांपर्यंत पोचावे यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांची काही पुस्तके (’हृदय’ हा शब्दचित्रसंग्रह, ’उपकारी माणसे’ ही त्रिखंडात्मक कादंबरी) आम्ही मराठीपुस्तके.कॉम या संकेतस्थळावर त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी (२४ डिसेंबर २००९) टाकली. त्यांचे साहित्य विविधांगी आहे. कथा, कादंबरी, निबन्ध, कविता, नाटक, चरित्र, इ. प्रकार त्यांनी लीलया हाताळले. ’शब्दचित्र’ हा साहित्यप्रकार त्यांनीच मराठीत प्रथम आणला.
  आपल्या द्वैमासिकात त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाज़ी काय करावे लागेल हे कृपया कळवावे. मी नाशिकमध्ये स्थित आहे व माझी भावंडे मुंबईत. प्रतिसादाची वाट पहाते.
  सस्नेह,
  छाया देव (९४२०७८४६४८)

  • प्रिय श्रीमती छाया देव यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल आभार. श्री० रघुवीर सामंतांचे साहित्य उत्स्फूर्तपणे वाचकांसाठी खुले करून देण्याचा आपला मनोदय स्तुत्य आहे. ऐसी अक्षरे द्वैमासिकात ते प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने आपले पत्र प्रस्तुत मासिकाचे संपादक श्री० पद्मनाभ हिंगे ह्यांच्यापर्यंत पोचवत आहे. त्यांचे पत्रोत्तरही आपल्याला कळवूच.

   ऐसी अक्षरेच्या निमित्ताने आपली ओळख झाली ह्याचा आनंद वाटला. अमृतमंथन परिवारातर्फे आपले आभार.

   अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही डोळ्याखालून घालावेत.

   मराठी संस्कृती व तिच्याच अनुषंगाने भारतीय संस्कृती. सर्व लेख मुख्यतः याच सूत्राला धरून असतात. मराठी माणसाचा ’स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा’ हा गैरसमज दूर करून त्याचा न्यूनगंड नाहीसा करून मराठीपणाबद्दलचा स्वाभिमान वाढवण्याचा हा प्रयत्न आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० गुर्जरपाध्ये यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या सूचनेबद्दल आभार.

   “ऐसी अक्षरे”च्या माध्यमातून अनेक मराठी साहित्यप्रेमी मंडळी मराठी भाषेतील प्राचीन उत्तमोत्तम लेण्यांना भेट देतात. अनेक मित्रांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. उत्तम साहित्य वाचण्याची सवय झालेल्यांना नियमित रतीब न मिळाल्यास ती मंडळी अस्वस्थ होणारच.

   आपला निरोप “ऐसी अक्षरे”च्या संपादकमंडळापर्यंत पोचवलेला आहे. ते ह्यावर लवकरच तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे.

   क०लो०अ०

   अमृतयात्री गट

 2. माझ्या मागील सूचनेला आपण उत्तर दिले परंतु कै. श्री. सामंतांचे साहित्य ‘ऐसी अक्षरे’मध्ये कसे सामील करता येईल याबद्दल काही मार्गदर्शन मिळाले नाही व तो विषय तसाच राहिला.
  ‘साहित्यसागरातून काढलेली रत्ने ‘ऐसी अक्षरे’ च्या तबकात मांडून रसिकांसमोर ठेवली जातात’ असे म्हणणे अधिक उचित ठरेल.

  • प्रिय श्रीमती छाया देव यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या ह्यापूर्वीच्या पत्राला “ऐसी अक्षरे”कडून उत्तर मिळालेले दिसत नाही. आपला निरोप आम्ही “ऐसी अक्षरेच्या” संपादकमंडळाकडे पोचवला होता. आता पुन्हा आपले हे पत्रदेखील त्यांच्याकडे अग्रेषित केलेले आहे. आपल्या सूचनेला त्यांच्याकडून लवकरच प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s