“समासात दोन शब्दांचा संयोग होतो. हे शब्द सुटे स्वतंत्र शब्द म्हणून वावरू शकतात. समासात ते सलग लिहिले म्हणजे त्या पदांत समासाच्या स्वरूपाचा संबंध आहे हे कळतं. सुटं लिहिल्याने त्यांतला संबंध समासाच्या स्वरुपाचा आहे की अन्य कोणता हे ठरवावं लागतं. उदा. ’शंकराचार्य मठातील विहिरीत पडल्याने बालिका जखमी’ असा बातमीचा मथळा एका वृत्तपत्रात मी वाचला. आणि शंकराचार्य पडल्याने बालिका कशी काय जखमी झाली असेल ह्याचा विचार करू लागलो.”
परभाषांच्या प्रभावामुळे ज्याबद्दल अनेकदा गैरसमज होतो अशा मराठी शुद्धलेखन व व्याकरणाच्या एका महत्त्वाच्या पैलूबद्दल श्री० सुशांत देवळेकर यांनी केलेला ऊहापोह.
’मराठी बाणा’ या संकेतस्थळावर एप्रिल २००८मध्ये प्रकाशित झालेल्या या लेखाचा दुवा खाली दिला आहे. लेख अवश्य वाचा.
http://maraathibaanaa.blogspot.in/2008/04/blog-post.html
आपल्या सूचना, शंका, अभिप्राय खालील चर्चाचौकटीमध्ये अवश्य मांडावे. श्री० सुशांत देवळेकरांना त्यांबद्दल प्रतिसाद देण्याची आपण विनंति करू.
– अमृतयात्री गट
ता०क० अमृतमंथनावर प्रसिद्ध झालेले मराठी भाषाविज्ञान व व्याकरणविषयक लेख खालील दुव्यांवर वाचू शकता.
मराठीच्या शोधात गांगरलेले गांगल (ले० सत्त्वशीला सामंत, लोकसत्ता, २३ डिसेंबर २०१०)
मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)
’निरंकुशाः कवयः’ व इतर काही मुद्दे (ले० सलील कुळकर्णी) –} http://wp.me/pzBjo-Hb
मराठीबाणावरचा तो लेख फार जुना आहे, आणि त्यावर आलेले प्रतिसादही काही फार लक्षणीय नाहीत. माझ्या मते, संस्थानामे लिहिताना वा लेखाचा किंवा पुस्तकाचा मथळा लिहिताना, विकृत अर्थ होत असला तरीही सामासिक शब्द तोडूनच लिहावेत. संदर्भाने बहुधा अर्थ समजतो. मात्र त्यासाठी पूर्वपदातले अंत्य इकार-उकार मुळात र्हस्व असतील तर ते तसेच ठेवावेत.. उदा०कृषि संजीवनी, विधि महाविद्यालय, वगैरे.–
प्रिय श्रीमती शुद्धमति राठी यांसी,
स० न०
आपले प्रतिमत मूळ लेखाचे लेखक श्री० सुशांत देवळेकर यांना धाडले असता त्यांनी खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे.
————————–
श्रीम. राठी ह्यांचा प्रतिसाद पाहिला. त्यांनी त्यात संस्थानामे सामासिक असतील तर घटकपदं तोडून लिहावीत असं म्हटलं आहे. मात्र असं का करावं ह्याविषयी त्यांनी काहीही म्हटलेलं नाही. त्यामुळे त्याविषयी मांडण्यासारखं नवं काहीच नाही. माझं म्हणणं मी त्या लेखात मांडलं आहेच. त्याला अमुक परिस्थितीत अपवाद करावा तर का करावा ह्याविषयी काही युक्तिवाद असेल तर त्यावर मत मांडता येईल. नाही तर त्यांचं मत मला मान्य नाही एवढं म्हणून थांबणं पुरेसं आहे.
– सुशांत देवळेकर
————————–
तेव्हा आपले मत ज्या निकषांवर आधारित आहे, त्याबद्दल थोडे अधिक स्पष्टीकरण दिल्यास सुशांत देवळेकर त्याबद्दल आपली भूमिका मांडू शकतील.
आभार.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
संस्थांची मोठी नावे त्यांतले शब्द जोडून लिहिले तर अवाचनीय होतात. अनाथविद्यार्थीगृह किंवा संगणकविद्यामहाविद्यालय इ. पुस्तकांचे, लेखांचे मथळे आदी सामासिक शब्द तोडून लिहिले तर अर्थ समजायला मदत होते..असले शब्द असलेली पाने संगणकावर सहज शोधता येतात. नाव आणि आडनाव ही खरे तर सामासिक शब्दाची पदे असतात, ती आपण तोडून लिहितो. नाही की, नीलकण्ठदीक्षितविरचित नीलकण्ठविजयचम्पूसारखीच आणखी उदाहरणे : महेन्द्रविक्रमपल्लवविरचित भगवदज्जुकीयम्., अश्वत्थामाबाळाचार्यगजेंद्रगडकर यांचे मुम्बय्युच्चन्यायालयाभियोगनिकालपत्र.;—SMR
श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राला श्री० सुशांत देवळेकर यांचे उत्तर खालील प्रमाणे.
————
संस्थांची नावं मोठी असतील तर ती अनुषंगक (-) घालून लिहावीत असा पर्याय मी मूळ लेखात सुचवलेला आहे. त्यामुळे पदच्छेदही दाखवता येतो आणि वाचनही सोपं होतं असं माझं मत आहे. तसं केलं तर विशाल महिला संमेलन ह्या लेखनातून होणारा महिला विशाल की संमेलन विशाल हा गोंधळ टाळता येतो. उदा. विशाल महिला-संमेलन (म्हणजे विशाल हे संमेलनाचं विशेषण आहे महिलांचं नाही.)
नावं आणि आडनावं आपण तो़डून लिहितो हे खरं आहे. पण त्या रचनांमध्ये पदांच्या क्रमामध्येच त्याचा अन्वय कसा करावा ह्याची सूचना असते. उदा. पहिले नाव मधले नाव आडनाव ह्यात पदांचा एकमेकांशी संबंध काय हे त्या क्रमानेच स्पष्ट होतं. उदा. गोपाळ गणेश आगरकर ह्या नामलेखनपद्धतीचं आकलन आगरकर-कुलोत्पन्न गणेशपुत्र गोपाळ असं लगेच होऊ शकतं. अर्थात नामलेखनपद्धतीतही काही वेगळे आकृतिबंध असतातच. उदा. दाक्षिणात्य नावे (ग्रामनाम व्यक्तिनाम उदा. सर्वपल्ली राधाकृष्णन्) अशी क्रमावरून अन्वय समजून घेण्याची सोय इतर प्रकारच्या सामासिक पदांत विशेषतः ती पद दोनांहून अधिक घटकांनी साधलेली असतील तर उपलब्ध होत नाही. म्हणून ही पदं तोडून लिहिण्याची सवलत सर्वत्र वापरू नये असं मला वाटतं.
– सुशांत देवळेकर
————
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
अनाथ विद्यार्थी गृह किंवा विशाल महिला संमेलन अशा प्रकारे तीन शब्दांनी बनलेल्या सामासिक शब्दांतला पहिला शब्द विशेषण असला की अर्थाचा गोंधळ होणारच. केवळ त्यावेळी, त्यांतले विशेषण वेगळे लिहून उरलेले शब्द मध्ये विग्रह चिन्ह घालून किंवा न घालता लिहिणे समजू शकते. परंतु त्यासाठी सरसकट विग्रह चिन्हे वापरून लांबलचक शब्द बनवायची गरज नाही.भारतरत्न डोक्टर भीमराव-रावजी-आंबेडकर-कला-विज्ञान-वाणिज्य-महा-विद्यालय असलीपाटी संस्थेवर लावायची पाळीयेईल.–शं-
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. श्री० सुशांत देवळेकर यांचे उत्तर खालीलप्रमाणे.
———————–
केवळ तीन पदांनी मिळून बनलेल्या सामासिक शब्दांत प्रारंभी विशेषण असतानाच अर्थाचा गोंधळ शक्य आहे असं नाही. मुळात एकमेकां शेजारी मध्ये जागा सोडून लिहिलेल्या शब्दांचा संबंध लेखनसरणीतून नेमकेपणाने दाखवण्याचा मुद्दा आहे.
उदा. महिला वैद्य हे लेखन घ्या. त्याचा अर्थ ‘वैद्य असलेली महिला’ असा अभिप्रेत असेल (म्हणजे महिला हे पद वैद्य ह्याचं विशेषण असेल तेव्हा) इथे दिलं आहे तसं जोडून लिहायला हवं. पण ‘महिलांची वैद्य’ असा अर्थ अभिप्रेत असेल तेव्हा केवळ ‘महिला’ हे रूप विशेषण नाही. ‘महिलांची’ ह्या षष्ठ्यंत म्हणून विशेषण ठरणाऱ्या पदातील विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होतो. अशा वेळी महिला-वैद्य लिहावं असं म्हणणं आहे. अर्थ पाहून तो इतरांनाही चटकन कळावा ह्यासाठी सामासिक पदांचे घटक जोडून लिहावेत असं सांगणं आहे.
सामासिक शब्दांची घटकपदं जोडून लिहिण्याच्या विचारामागे अर्थांकनाच्या आणि आकलनाच्या दृष्टीने असलेली सोय गृहीत आहे. ती सोय हवी असेल तर मग कितीही लांब असला तरी सामासिक शब्द सलग लिहिला पाहिजे. रांग लावण्यात सोय असते तशी गैर सोयही असतेच. कोणतंही नियमन हे सर्वस्वी सुखावह असणार नाही.
————————
क०लो०अ०
– अमृतयात्री गट