पूर्णविराम व लघुरूपचिन्ह एकसारखेच असावे की भिन्न? (प्रश्नकर्ता: ’जय महाराष्ट्र’)

श्री० ’जय महाराष्ट्र’ या आपल्या अमृतमंथन-परिवारातील सदस्याने विचारलेल्या शंकेला थोडे वेगळा आकार देऊन अमृतमंथनाच्या विचारी वाचकांसमोर ठेवीत आहोत.

————-

’जय महाराष्ट्र’ यांची शंका अमृतमंथनावर हल्लीच प्रकाशित केल्या गेलेल्या ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ ! (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकासंबंधात आहे. ते म्हणतात:

“मला एक मुद्दा आपल्यापुढे विचारार्थ मांडायचा आहे. ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ ! (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकात आपण जो फुगीर बिंदू किंवा टिंब दिले आहे तशी चिन्हे सामान्यपणे हिंदीमध्ये वापरली जातात. अशी ही पद्धत मी इतर बर्‍याच मराठी प्रकाशकांनीही आपल्या पुस्तकांत वापरल्याचे पाहिले आहे. पण मला व्यक्तिशः असे वाटते की आपण या बाबतीत मोठ्या फुगीर टिंबांचे एवढे कौतुक करण्याचे काही कारण नाही. आपण वर उल्लेखलेल्या लेखाचे शीर्षक ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ ! (ले. सलील कुळकर्णी)’ असे का लिहू नये? फुगीर टिंबात एवढे काय मोठे वैशिष्ट्य सामावलेले आहे?”

————

अमृतमंथनच्या सुविद्य वाचकांनो,

श्री० ’जय महाराष्ट्र’ यांच्या या शंकेबद्दल आपल्याला काय वाटते? अवश्य कळवा. आपल्या दृष्टीने टोकदार टिंबाचा पूर्णविराम व पोकळ वर्तुळाकार पूज्याचे लघुरूप (short form) दर्शक चिन्ह अशी भिन्न पद्धतीची चिन्हे देण्यामागील कल्पना काय आहेत? त्यांचे फायदे-तोटे काय? ती चिन्हे एकसारखीच असावीत की वेगवेगळी? या प्रश्नांचा उहापोह व संबंधित विषयाबद्दल अधिक माहितीची चर्चा या विचारमंथन चर्चापीठावर करूया. अर्थात त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य पाहिजेच.

या विषयासंबंधित माहिती, आपले मत, कारणमीमांसा या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

ता०क० वर उल्लेख केलेल्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे आहे.

हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)

.

19 thoughts on “पूर्णविराम व लघुरूपचिन्ह एकसारखेच असावे की भिन्न? (प्रश्नकर्ता: ’जय महाराष्ट्र’)

  1. पूर्णविरामाचं चिन्ह आणि लघुरूपदर्शक चिन्ह ह्यांमध्ये फरक आहे हेच दर्शविण्यासाठी पूर्णविराम व शून्य अशी वेगवेगळी योजना केली जाते. मराठीतील अनेक पुस्तके (विशेष करून मौज प्रकाशन गृहाकडून प्रकाशित केली गेलेली) असा फरक दर्शवून छापलेली आढळून येतात. पूर्णविराम चिन्हाचा उपयोग वाक्य पूर्ण झालं असल्याचं, व म्हणून विराम घेत असल्याचं दर्शवलं जावं, तर शून्याचा उपयोग लघुरूप दर्शवण्यासाठी करावा, म्हणजे विराम न घेता वाचन चालू राहावे असं सुचवलं जाईल. श्री०पु० भागवत ह्यांनीच अशा योजनेचा प्रथम अंगीकार केला व मी त्यांच्याप्रती असलेल्या पूज्यभावामुळे ती पद्धत अनुसरली. (मौजेतर्फे प्रकाशित केल्या गेलेल्या व श्री०पुं०नी सूत्रं हाती घेण्याआधीच्या प्रकाशनांमध्ये असा फरक दर्शवला गेलेला नाही असे आढळते.) त्या पद्धतीचं कौतुक म्हणून नाही. सलील कुळकर्णी ह्यांनाही ती पद्धत वापरणं योग्य वाटलं म्हणून त्यांनीही ती अनुसरली.

    मराठीच्या लेखनात सदर पद्धतीबाबत विवक्षित अशी शैली म्हणून स्वीकारली गेली आहे काय, वा तिच्यासंबंधी चर्चा झाली आहे काय ह्याची कल्पना नाही.

    • प्रिय श्री० विजय पाध्ये यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपली ही माहिती अमृतमंथन परिवारसदस्यांना सुरस वाटावी. आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. पूर्णविरामचे चिन्ह आणि संक्षेपवाचक चिन्ह ह्यांसाठी वेगवेगळ्या खुणा असणे कधीही चांगलेच आहे. त्या दृष्टीने सध्या रूढ असलेला अनुक्रमे भरीव बिंदू आणि पोकळ बिंदू (पूज्याकार) ह्यांचा वापर हा दोन वेगळी चिन्हे हवीत असे म्हणताना स्वागतार्हच मानायला हवा असे मला वाटते.
    संगणकप्रक्रियेत अशी वेगळी चिन्हे असण्याचे काही लाभ आहेत. उदा. वाक्याचा शेवट आणि संक्षेपशब्द ह्यांना वेगळी चिन्हे असतील (आणि त्या चिन्हांसाठी वेगळे संकेतांक असतील) तर संगणकाला ह्या दोन गोष्टी स्वतंत्रपणे ओळखता येतील.
    मात्र तरीही पूज्य ह्या चिन्हासंदर्भात एक अडचण जाणवते ती अशी की मराठीत ते चिन्हं अंक लिहिताना वापरण्यात येते. अर्थात वाचताना शून्य कुठे वाचायचे आणि संक्षेप कुठे समजायचा हे आपण ओळखतो. पण ह्यावरून एक संदर्भ आठवला. इतिहासाचार्य राजवाड्यांनाही हा प्रश्न पडला होता.
    ‘मराठींतील शुद्धलेखनासंबंधी व विरामचिन्हांसंबंधी काहीं सूचना’ हा त्यांचा निबंध वाचण्याजोगा आहे. त्यात मराठीत रूढ होत असलेल्या इंग्रजीतून आलेल्या विरामचिन्हांची सविस्तर चर्चा आहे. त्यांतील कोणती स्वीकार्य, कोणती त्याज्य, तसे का, आणि कोणती नवी विरामचिन्हे हवीत ह्याचा मर्मभेदी ऊहापोह केलेला आहे. त्यात त्यांनी मांडलेली सूचना अशी की संक्षेपचिन्ह म्हणून मोडी लिपीत उभ्या दुरेघीचा वापर करीत. उदा. रा।। रा।। (टंकात दुरेघी नीट उमटत नाही. वरच्या शिरोरेघेला ती जोडून हवी.) ह्याच चिन्हाचा वापर संक्षेपचिन्ह म्हणून करावा. मात्र मराठी लेखनाच्या पुढच्या वाटचालीत राजवाड्यांच्या ह्या सूचनेचा विचार झालेला आढळत नाही.

    • प्रिय श्री० सुशान्त देवळेकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले अभ्यासपूर्ण व उत्तम माहितीपूर्ण विवेचन सर्व वाचकांनी वाचायलाच हवे. आपण संदर्भिलेला इतिहासाचार्य राजवाड्यांचा ‘मराठींतील शुद्धलेखनासंबंधी व विरामचिन्हांसंबंधी काहीं सूचना’ हा निबंध कुठे मिळेल? आपल्या अमृतमंथनपरिवार सदस्यांच्यापुढे आपण तो सादर करू शकू काय?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अविनाश जगताप यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      पूर्णविराम चिन्ह म्हणजे full stop. लघुरूपचिन्ह म्हणजे short form दर्शविण्यासाठी दिलेले टिंब. उदा० स० का० पाटील, शि० प्र० मंडळी इत्यादी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

        • प्रिय श्री० अविनाश जगताप यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आभारी आहोत. आता विविध वाचकांनी नोंदलेली भाष्ये पाहून आपले मत काय आहे ते अवश्य कळवा. आपल्यासारख्या ज्येष्ठ व मराठीचे उत्तम ज्ञान असणार्‍या जिनिव्हाकराचे विचार ऐकायला आम्हा सर्वांनाच नक्की आवडेल.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

  3. मराठीच्या परंपरागत लेखनपद्धतीनुसार मोठ्या शब्दाचे लघुरूप लिहिल्यावर त्याच्या लगत एक छोटे पोकळ शून्य काढतात. असे करावे असे महाराष्ट्र सरकारच्या एका परिपत्रकात आहे. प्रत्यक्षात मात्र, मौज प्रकाशन आणि आणखी काही मोजकी प्रकाशने सोडली तर ही पद्धत कुणी फारशी पाळत नाही.
    हिंदी व्याकरणाच्या पुस्तकात संक्षेप-सूचक चिह्न म्हणून असेच पोकळ शून्य दिले असते, पण हिंदीतही ते फारसे वापरले जात नाही. आपणच सुरुवात केली तर मराठीत ही पद्धत रूढ होण्यास वेळ लागणार नाही.

    हे शून्य आकाराने फार छोटे असते आणि ते मराठी-इंग्रजीतल्या
    शून्यापेक्षा(०-0) किंवा इंग्रजी ओ(o/O)पेक्षा वेगळे दिसते. गमभन या टंकांत कॅपिटल सी काढला की हे चिन्ह उमटते.

  4. मराठीतली टिंबे :
    मराठीत टिंबाचा वापर (१) खणखणीत उच्चाराच्या अनुस्वारासाठी (२) अर्धानुनासिक उच्चरणासाठी(उदा० हं हं!) (३) बोली भाषेतील दीर्घ अकारासाठी(उदा० व्याह्यानं धाडलं घोडं, घोडं कसंबसं चालं!)(४) पूर्णविरामाकरिता (५) नावाची आद्याक्षरे लिहिताना(उदा० ग.दि.मा., म.सा.प)) (६) मोठ्या शब्दाच्या लघुरूपांनंतर(सा.न.वि.वि., सह.बॅंक मर्या.) (७) दशांशचिन्हासाठी (८) गणितामध्ये अक्षरांनी दाखविलेल्या संख्यांमधला गुणाकार दाखवण्यासाठी (९) अर्धविरामात(;),
    विवरणचिन्हासाठी(:) आणि गाळलेल्या मजकुराची खूण म्हणून(…)
    केला जातो.
    इंग्रजीत टिंब केव्हा देत नाहीत? : (१) रसायनशास्त्रात मूलद्रव्याची खूण लिहिल्यानंतर(उदा० C=कार्बन, Ag=अर्जेन्टम=चांदी) (२) एकक दाखवण्यार्‍या चिन्हानंतर(उदा० kWh=किलोवॉट-अवर्‌‌/ज़, KB=किलोबाइट्‌/स, Mb=मेगॅबिट्‌/स, mb=मिलिबार्‌/ज़) (र) रुपया/ये किंवा डॉलरच्यासारख्या चिन्हानंतर (४) मूळ शब्दातले शेवटचे अक्षर संक्षिप्त रूप दाखवणार्‍या लघुरूपात असल्यास. उदा० Dr = DoctoR, Mrs = MistresS. परंतु, Capt. = Captain, Prof. = Professor आणि (५) जगजाहीर असलेल्या संक्षेपात, उदा० USA, USSR वगैरे.
    जर्मन लिपीत दशांशचिन्हासाठी स्वल्पविराम वापरतात.

  5. सप्रेम नमस्कार.

    श्री० ’जय महाराष्ट्र’ यांच्या मुद्द्याच्या अनुषंगाने पुढील पत्र लिहित आहे. या आधी श्री० विजय पाध्ये व श्री० सुशांत देवळेकर यांनी दिलेली माहितीही अत्यंत रोचक आहे.

    देवळेकरांनी लघुरूपदर्शक चिन्हास संक्षेपवाचक चिन्ह म्हटले आहे. बहुधा तो प्रमाणित शब्द असावा. देवळेकरांनी माहिती द्यावी.

    माझ्या समजुतीप्रमाणे लिहिताना विरामचिन्हे (punctuation marks) देण्याची पद्धत आपण भारतीयांनी इंग्रजांकडून घेतली. पुरातन काळापासून संस्कृतमध्ये पठणासाठी मूलतः मौखिक पद्धत वापरली जात होती, त्यामुळे विरामचिन्हांच्या उपयोगाचा विचारच नव्हता. पुढे संस्कृतसाठी लेखनपद्धती विकसित झाल्यावरही दण्ड आणि द्विदण्ड (।, ॥) वगळता इतर विरामचिन्हे नव्हती असे दिसते. अर्थात संस्कृत ही भाषाच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की तीमधील वाक्यरचनेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी इतर भाषांएवढे विरामचिन्हांवर अवलंबून रहावे लागत नाही. मात्र सामान्यपणे कुठल्याही भाषेत तोंडाने बोलताना हेल, उच्चार करताना स्वर उच्च-नीच करून किंवा लघु-दीर्घ विरामकालाच्या मदतीने अर्थ स्पष्ट होण्यास मदत होत असली तरीही लिखित पाठ्याचा अर्थ सहजस्पष्ट होण्यास विरामचिन्हांचा फार उपयोग होतो हे खरेच आहे. म्हणून अर्वाचीन संस्कृत लेखनात विरामचिन्हांचा उपयोग सुरू झाला आणि तसाच तो मराठी व इतर अलिकडील भारतीय भाषांतही होऊ लागला.

    मराठीत पूर्णविरामाचे चिन्ह म्हणून संस्कृतप्रमाणे दण्ड न वापरता इंग्रजीप्रमाणे टिंबाचाच पूर्णविराम (full stop, full point) म्हणून स्वीकार केला गेला. इंग्रजीप्रमाणे पूर्णविरामासाठी व शब्दांचा संक्षेप किंवा लघुरूप (short form) दर्शविण्यासाठी अशा दोन्ही ठिकाणी टिंबाचाच विरामचिन्ह म्हणून उपयोग केला जाऊ लागला. श्री० गो० नी० दांडेकर, स्वा० सावरकर, न्या० रानडे, ‘म०रा०वि०म०’, इ० (इत्यादी), ल०सा०वि०, ही झाली संक्षेपाची उदाहरणे. पण नंतर काही मंडळींनी असा विचार केला की पूर्णविराम व संक्षेपदर्शक चिन्ह अशा दोन प्रकारच्या चिन्हांतील फरक स्पष्टपणे दाखवण्यासाठी दोन भिन्न विरामचिन्हे दाखवली पाहिजेत. त्यासाठी त्यांनी पूर्णविरामचिन्ह इंग्रजीप्रमाणेच ठेवून संक्षेपदर्शक चिन्ह म्हणून पोकळ टिंब (पूज्य) वापरणे सुरू केले. तसाच दृष्टिकोन असलेल्या मौज प्रकाशनाच्या मंडळींनीही बर्याच दशकांपूर्वी या दोन स्वतंत्र विरामचिन्हांचा उपयोग आपल्या सत्यकथा, मौज अशी मासिके व आपण प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांत सुरू केला. त्यासाठी शून्याहून थोडे लहान व अक्षराच्या तळाच्या पातळीला उमटणारे एक स्वतंत्र प्रकारचे संक्षेपदर्शकचिन्ह (म्हणजे त्या चिन्हासाठी एक स्वतंत्र खिळा) निर्णयसागर प्रेसने आपल्या टंकसंचात प्राप्त करून दिले होते. पुढे डी०टी०पी० हा संगणकीय प्रकार सुरू झाल्यावर ’आकृती’चे निर्मातेही एक वेगळे टंकचिन्ह आपल्या संचात उपलब्ध करून दिलेले होते. नंतर युनिकोडने टंकाच्या संकेताक्षरांचे प्रमाणीकरण केले तेव्हा हिंदी, मराठी, संस्कृत, नेपाळी, बोडो या सर्वांना एकच टंकप्रणाली दिली. त्यात हे वैशिष्ट्यपूर्ण लघुरूपचिन्ह मात्र समाविष्ट केले गेले नाही. त्यामुळे आता जर संक्षेपदर्शक चिन्ह पूर्णविरामापेक्षा वेगळे असे दाखवायचे असेल तर त्यासाठी शून्य ह्या अंकाचा उपयोग करावा लागतो. तो सुदैवाने इंग्रजी झिरोएवढा मोठा नाही. पण तो उंचीने मध्यभागी येतो, पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम अशा इतर विरामचिन्हांप्रमाणे खालच्या पातळीला उमटत नाही. ते एक त्याचे वैगुण्य आहे.

    माझे हिंदी पुस्तकांचे वाचन नगण्य असले तरीही नजरेत आलेली हिंदी पुस्तके, शाळेतील पाठ्यपुस्तके व हल्ली दिसणारी हिंदी वर्तमानपत्रे व मासिके यांपैकी कुणीही स्वतंत्र संक्षेपदर्शक चिन्ह वापरलेले आठवत नाही. मुळात मराठीतही ते फार अपवादानेच वापरले जाते. त्यामुळे ते वैशिष्ट्य आपण हिंदी मंडळींची नक्कल करून उचलले असे तर नक्कीच म्हणता येणार नाही.

    देवळेकरांनी सांगितलेल्या रा॥ रा॥ (रा० रा०), प्रमाणे साहेब (सो।) व असे इतरही काही संक्षेप हाती लिहिण्याच्या काळी प्रमाण मानले जात होते. तेही हल्ली लोप पावलेले दिसतात.

    आपला नम्र,

    समीर जोशी

  6. स॰न॰वि॰वि॰

    सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं न लिहिता इथं मुद्दामच संक्षेपचिन्हाचा (संगणकीय वर्णव्यवस्थेचा वापर करून चर्चापीठावरील सर्व उपस्थित संबंधितांना दंडवत घालीत आहे.

    वि॰वा॰ शिरवाडकर, रा॰ग॰ गडकरी, रा॰ब॰ कुमठेकर रस्ता वगैरे सर्व उदाहरणांत मी संक्षेपचिन्हाचा (संक्षेपवाचक चिन्हाचा) उपयोग करून दाखवला आहे तो पाहावा. ह्या उदाहरणांत दिलेल्या चिन्हाचा(पूज्याचा किंवा पोकळ टिंबाचा, शून्याचा नव्हे!) वापर यथायोग्य पद्धतीनं झाला आहे काय त्यासंबंधी अभिप्राय द्यावा अशी विनंती आहे.

    जाता जाता, पोकळ टिंब, पोकळ शून्य असा शब्दप्रयोग का केला जातो ते मला विचारावंसं वाटतं. टिंब म्हणजे टिंब. बिंदू. टिंब पोकळ कसं करता येईल? शून्यात पोकळी असते हे उघड आहे, तेव्हा त्यामागे पोकळ हे विशेषण योजण्याची गरजच नाही.

    विजय पाध्ये

    • प्रिय श्री० विजय पाध्ये यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण बारकाईने केलेल्या विचाराबद्दल व सूचनेबद्दल आभार. टिंब व बिंदू हे पोकळ असता कामा नयेत आणि शून्य हे स्वाभाविकतः पोकळच असणार हे तांत्रिकदृष्ट्या योग्यच आहे. पण शून्य म्हटल्यावर मोठा गोळा डोळ्यासमोर येतो व वाचकांचा गैरसमज होण्याचा संभव आहे. शिवाय ज्यापमाणे भूमितीमध्ये बिंदूला लांबी-रुंदी-क्षेत्रफळ नसते व म्हणून ते कागदावर पेन्सिलीने काढणे चुकीचे आहे हे माहित असूनही केवळ सोय म्हणून, वाचकांना ’प्रत्यक्ष’ (डोळ्यासमोर) चित्राद्वारे आपली संकल्पना स्पष्ट करून सांगण्यासाठी आपण बिंदू दाखवण्यासाठी कागदावर एक लांबी-रुंदी-क्षेत्रफळ असलेला ठिपका काढून दाखवतो त्याचप्रमाणे एक लहानसे, पोकळ, गोल चिन्ह हे सांगण्यासाठी पोकळ पूज्य, टिंब असे म्हटले.

      आपण वाचकांसमोर ठेवलेल्या नवीन प्रकारच्या संक्षेपचिन्हाबद्दल वाचकांनी आपली प्रतिमते नोंदवावीत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. माझा स्वतःचाच अभिप्राय
    —————–

    आता माझ्या असं नजरेस आलं आहे की माझ्या पत्रात उदाहरणादाखल दिलेल्या आद्याक्षरांत वा उपाध्यांमध्ये संक्षेपवाचक चिन्हाचं स्थान वर सरकलं आहे, ते अक्षराच्या तळाशी यायला पाहिजे. ते शक्य होईलसं वाटत नाही, कारण ज्या यूनिकोड टंकाचा वापर सदर संक्षेपचिन्हासाठी केला आहे त्याच्यात तांत्रिक बदल करणं मला शक्य नाही.

    विजय प्र॰ पाध्ये

    • प्रिय श्री० विजय पाध्ये यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      नाही. या संस्थळावरील पाठ्यात तरी आपले नवीन पद्धतीचे संक्षेपचिन्ह अक्षराच्या खालच्या पातळीलाच दिसते आहे. त्यामुळे आपल्याला हवा असलेला परिणाम साधला जातो आहे असे वाटते. आमचा काही गैरसमज झालेला असल्यास त्याचे कृपया निराकरण करावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  8. “माझ्या समजुतीप्रमाणे लिहिताना विरामचिन्हे (punctuation marks) देण्याची पद्धत आपण भारतीयांनी इंग्रजांकडून घेतली.” आपण घेतली नाहीत, तर थॉमस कॅन्डी नावाच्या मराठी शब्दकोशकर्त्या ब्रिटिश सैन्याधिकार्‌याने ही विरामचिन्हे पुणेकरांवर ’लादली’. पुढे सर्वच भारतीय भाषकांचे मराठीचे अनुकरण केले.

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार. ’घेतली’हा शब्द मोघमपणे ’आली’ या अर्थी योजला होता. नेमक्या स्रोताचा अभ्यास केलेला नव्हता.

      पण मराठीमध्ये तसे होणे क्रमप्राप्तच होते. त्यास नकार देणे शक्यच नव्हते. आज आपण विरामचिन्हांशिवाय मराठी लिहिले तर त्याची काय गत होईल हे प्रत्यक्षात प्रयोग करून पाहू शकतो. आज सर्वच भारतीय व जगातील इतर चारपाचशे वर्षांहून अधिक जुन्या असणार्‍या भाषांत ही विरामचिन्हे घेतली गेली आहेत, आली आहेत किंवा लादली गेली आहेत.

      मराठीच्या आधी बंगाली भाषेतही इंग्रजांनी बरेच कोशकार्य, व्याकरणाचा अभ्यास वगैरे केले होते. त्यामुळे मराठीच्या द्वारे इतर भारतीय भाषांत विरामचिन्हांचा प्रसार झाला असे म्हणणे कितपत योग्य ठरेल याबद्दल शंका वाटते.

      आणि जर समजा मराठीने ही ’लादणी’ स्वीकारण्याचा ’मूर्खपणा’ केला नसता व ती नाकारली असती तर इतर कुठल्याही भारतीय भाषेत विरामचिन्हे पोचलीच नसती असेही म्हणणे धाडसाचेच ठरावे.

      ज्याप्रमाणे रेल्‌-वे, टपाल खाते, दळणवळणाची साधने, मुद्रणव्यवस्था व इतर शोध व व्यवस्था राज्यकर्त्या इंग्रजांनी स्वतःच्या राज्यकारभाराच्या फायद्यासाठी भारतावर ’लादले’ असे म्हटले जाऊ शकते. पण जरी पर्याय असता तरी तशी ’लादणी’ मराठी किंवा सर्वच भारतीयांनी नाकारणे हितकर ठरले असते काय?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

Leave a reply to शुद्धमती राठी उत्तर रद्द करा.