महाराष्ट्र राज्यानं आम्हाला काय दिलं? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

“माझ्या मनातला, वर उल्लेखिलेला तो प्रश्न मला असं सांगतोय की गुजराथ आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या प्रगतीची तुलना करून पाहा. काय आढळतं? अगदी पहिली बाब म्हणजे, तुलना करण्याइतपत तरी महाराष्ट्राची अवस्था आहे का? गुजरातनं जी प्रगती केली आहे, तिच्या जवळपास जाण्याची तरी महाराष्ट्राची पात्रता आहे का? ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याकरतासुध्दा किमान पात्रता असावी लागते. नाही तर हसंच होण्याचा संभव राहतो, असं म्हणतात.”

प्रा० राईलकर सरांचा एक नवीन लेख. ह्या लेखात आज राईलकर सरांचा सूर काही वेगळाच जाणवतो आहे. अगदी प्राथमिक शाळेपासून ते एम०ए०च्या वर्गांपर्यंत त्यांनी अध्यापन केलेले आहे. संपूर्ण आयुष्य खर्‍या अर्थाने शिक्षकाची भूमिका (त्याला आपण पेशा, व्यवसाय म्हणू शकणार नाही, धंदा-उद्योग तर नाहीच नाही) जगलेल्या राईलकर सरांसारख्या देशप्रेमी, स्वाभिमानी, आशावादी आणि इतरांना सतत प्रेरणा व स्फूर्ती देणार्‍या आदरणीय व्यक्तीला देखील हताश, वैफल्यग्रस्त (frustrated) वाटून असे उद्गार काढावे लागण्यासारखी टोकाची परिस्थिती सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे; हे आमचे, आमच्या पिढीचे, मोठेच दुर्दैव नव्हे काय?

प्रा० राईलकर सरांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

अमृतमंथन_महाराष्ट्र राज्यानं आम्हाला काय दिलं_ले० प्रा० राईलकर_100531

.

आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा. शक्य असल्यास राईलकर सरांकडूनच उत्तर मिळवू.

.

– अमृतयात्री गट

.

ता०क० प्रा० राईलकर सरांचे इतर लेख खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.

खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

.

11 thoughts on “महाराष्ट्र राज्यानं आम्हाला काय दिलं? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

  1. ति स्व प्रा राईलकर यांस,

    सा नमस्कार.

    आपला लेख वाचला. अमृतयात्री गटाला जरी तुमचा त्यातील सुर निराशावादी वाटत असला तरी मला तो अधिक आक्रमक असा वाटला. छान झाला आहे हा लेख. शेवटचा परिच्छेद म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र द्वैभाषिक राज्य करून त्यांचा कारभार श्री नरेंद्र मोदीयांना चालवायला देणे…….ही कल्पना एकदम आवडली. मी बरीच वर्षे नरेंद्र मोदी यांची चाहती आहे. बंगळूर मध्ये एका पुस्तकांच्या मॉल मध्ये मी नरेंद्र मोदी: द आर्कीटेक्ट ऑफ मॉडर्न स्टेट हे एम के कामत आणि कालिंदी रणधेरी यांनी लिहीलेले पुस्तक विकत घेतले त्यावेळी काऊंटर वरच्या माणसाने मला तुम्ही गुजराथी आहात का? असा प्रश्न विचारला. मी त्यांना विचारलं, कां? तर त्यांनी उत्तर दिलं तुम्ही आवर्जुन हे पुस्तक विकत घेता आहात म्हणून विचारलं. पुस्तक खूपच उत्तम आहे. अगदी टीस्टा सेल्वाड, अरूंधती रॉय यांपासून ते बरखा दत्त, टाईम्स ऑफ इंडीया, केंद्र सरकारने नेमलेली चौकशी समिती आणि मानवाधिकार आयोगाने नेमलेली चौकशी समिती यांच्या चौकशीतील आणि परिणामी निकालातील फरक याचा व्यवस्थित उहापोह संदर्भासहित केला आहे. गुजरातचा विकास नरेंद्र मोदींनी कसा घडवुन आणला त्याची सुध्दा सविस्तर माहीती दिली आहे. रूपा प्रकाशनाचे पुस्तक आहे. तुमच्या लेखातील काही दाखले वाचून मला त्या पुस्तकाचीच आठवण झाली. ज्यांना गोध्रा नंतरच्या दंगली, तसेच गोध्रा चौकशीत काय समोर आले आणि वर उल्लेखिलेल्या लोकांचा खोटारडेपणा या विषयी अधिक माहीती वाचायची असल्यास वर उल्लेखलेले पुस्तक जरूर वाचावे. सगळ्या शंका दूर होतील.

    धन्यवाद.
    क लो आ

    अपर्णा लळिंगकर

    • प्रिय अपर्णा लळिंगकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या माहितीपूर्ण पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत.

      राईलकर सरांचा सूर नेहमीपेक्षा वेगळा अशा दृष्टीने वाटला की जे महाराष्ट्र राज्य काही दशकांपूर्वी संपूर्ण भारतात सर्वाधिक प्रगत होते त्याला आपल्याच स्वार्थी आणि नाकर्त्या राजकर्त्यांनी व एकंदरीत सर्वच राजकारण्यांनी व नेत्यांनी मिळून अधोगतीला नेले ह्याबद्दलच्या खंत, उद्वेग, चीड, वैफल्य, हताशपणा अशा भावना त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होतात. सर स्वतः हातपाय गाळून बसलेले नाहीत किंवा इतरांना तसा ते सल्लाही देत नाहीत. पण माणसाला कधीकधी टोकाच्या विश्वासघातामुळे धक्का बसतो, सात्त्विक संताप येतो, पण तो विश्वासघात करणार्‍यांपुढे समाज पुरेशा एकजुटीने, पुरेशा त्वेषाने लढत नाही आहे ह्याबद्दल खिन्नता, वैषम्य वाटते, तसा हा प्रकार आहे.

      सरांनाही आपण त्यांच्या मनातील भावना आपल्यापुढे स्पष्ट करून मांडण्याची विनंती करूया.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय सौ० अपर्णाताईंना,

      सप्रेम नमस्कार.

      आपला कयास खरा ठरला. प्रा० राईलकर सरांचं उत्तर खालीलप्रमाणे:
      ——————–

      मला निराशा मुळीच नाही. तसा समज झाला असेल तर मी क्षमा मागतो. पुष्कळदा सरळ केलेल्या सूचनेचा परिणाम हवा तसा होत नाही. मुद्दाम उलट बाजू घेतली की आपला मुद्दा अधिक परिणामकारक होतो. म्हणून उलट सूचना करयाची कल्पना मला एका डॉक्टरांनी सुचवली.

      कॉलेजात सत्रमान्यता मिळवण्याकरता काही अटींचं पालन व्हावं लागतं. किमान उपस्थिती, वर्गात आणि प्रयोगशाळेत. कवायतींना पुरेशी उपस्थिती, इत्यादी. पण असं सरळ सांगितलं तर विद्यार्थी दुर्लक्ष करतात. म्हणून उलट सूचना करायच्या. अशी एक सूचना मी कॉलेजातल्या सूचनाफलकावर लावली होती. जर सत्रमान्यता नको असेल तर वर्गात उपस्थित राहू नका, प्रयोग पूर्ण करू नका, मैदानावर नियमित जाऊ नका, इत्यादी…. तिचा चांगलाच परिणाम झाला.

      अपर्णाला विनंती एकच की तिनंही आता लिहायला सुरुवात करावी. तिच्याजवळ पुष्कळ माहिती आहे. जे पुस्तक तिनं विकत घेतलं त्यावर लिहावं. बाकी तिचा प्रतिसाद फारच चांगला आहे. उत्साहवर्धक आहे.

      • ति स्व. प्रा राईलकर यांस,

        सा नमस्कार

        मला लिहायला आवडेल. तुम्ही विषय सुचवा. फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे वेळाची. पण विषय समजला आणि जर डोक्यात मांडणी तयार असेल तर वेळ काढू शकते.

        धन्यवाद,

        अपर्णा

        • प्रिय सौ० अपर्णा लळिंगकर यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपला निरोप राईलकर सरांकडे पोचवूच.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

  2. pannaas varshaannee ka hoeena aapaN tulanaa kartoy aaNi vaastavikata lakshaat ghetoy. malaa vaaTate aapaN satat ashee tulana karat rahava, phakta gujarath sheech naahi tar vaampantheenche varchaDh asalelya keraLa saarkhya pragat rajyashee suddhaa (zar mudda rajyaachya prgathichaach asel tar). striyaanvar hoNare atyaachaar vagaLata keraLa rajyaat shikshaN, aarogya va moolabhoot kshetraantlya savalateent jhalelee pragati sampoorNa raashtra saaThee ek aadarsh ase aahe.
    sanskruti, swabhimaan, sahishNuta ityadeencha aapla phaar moTha jhenda khara, paN adhoon- madhoon khalee baghitle naahee tar nehmeech khalee baghaychi paaLee yeNyachi shakyata hi aahe. Ek chaanglee suruvaat jhalee hoti sahakar chaLvaLeela paN haLoo haLoo rajkaaraNaane tyaache joDe banavoon paayaat ghatle. maahitee adhikaar vaaparle tar mrutyu nishchit aahe ithe.
    Dar roz kuThe tari ek shetkari…. to hee maraThee maNoos. Tithe chiraDle jaate te maharashtrachech swabhiman. Tyala mumbaila ye kam deto ase saangoon nighoon gela maraThi MaaNoos. Tyaachya paTheeshee aahot he kaLvaayla phursat aahe kay? Vidarbha haataatoon nisTatoy ha kevaL duhswapna kay? VegLa jhaala tari tithlya maraThi asmiteche kay uddhaar hoNar? MaraaTh vaaDyaat hi kaahi phaar ashee pragati naahee. paN itar anek rajyanpeksha maharashTra ha bara aahe. Phaar phaar bara aahe. paN vegane adhogatee kaDe vaatchaal asalelya kaahi rajayantli kusanskruti ithe hi haLoo haLoo pasarat aahe. Hoeel titkya vegane aapaN yogya ritya puDhle paool Takle pahije.
    He vichar kuNa vyakti, samuday, bhashaa ityadeen baddal poorvagrah dooshit naahi.

    • प्रिय श्री० भास्कर भट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले विचार बहुतांशी पटले. ते आपल्या सर्वच वाचकांपुढे विचारासाठी मांडूया.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • प्रिय श्री० भास्कर भट्ट यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        प्रा० राईलकर सरांचं उत्तर खालीलप्रमाणे:
        ——————–

        संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती द्वैभाषिक राज्यातून झाली होती. म्हणून मी गुजरातशी तुलना केली. आणखी कणाबरोबर कुणी तुलना केली तर चांगलंच. अवश्य करावी.

        मनोहर

  3. स्वतःकडेच काही देण्यची इच्छा वा कुवत नसेल त्याने इतरांकडून काही मिळविण्याची अपेक्षा का धरावी?

    • प्रिय श्री० मनोहर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      प्रा० राईलकर सरांना हे विधान मुळीच लागू होणार नाही. त्यामुळे ते आपण कोणाला उद्देशून केले आहे ह्याची कल्पना येत नाही.

      राईलकर सरांनी संपूर्ण आयुष्य एक शिक्षक म्हणून पुढील पिढी (पिढ्या?) घडविण्यात घालवले. इतरही बरेच सामाजिक उपक्रम केले परंतु त्याबद्दल इथे लिहित नाही. आज एक्याऐंशीव्या वर्षी देखील ते संगणकाच्या सहाय्याने लेखन करतात, पुस्तके लिहितात, तरूण पिढीला सल्ला, उपदेश, देतात, विविध समाजगटांचे मार्गदर्शन करतात. त्यांचा हुरूप पाहून आमच्यासारख्या अनेकांना वेळोवेळी स्फूर्ती, उत्तेजन मिळते व निराशेमधून पुन्हा उभे राहण्यास हुरूप मिळतो.

      आज खरं म्हणजे आपल्या समाजात उलटच परिस्थिती आहे. सामान्य मराठी माणूस आपण बरे व आपले दैनंदिन सांसारिक आयुष्य बरे असे म्हणून तेवढ्याच चक्रात फेर्‍या मारीत बसतो. त्याच्या बाहेर येण्याची त्याची इच्छा किंवा धाडसच नसते. आज ढळढळीतपणे चाललेल्या अनेक अन्यायकारी गोष्टी सामान्य माणसाने मोठ्या संख्येने (एकादुसर्‍याने नव्हे) विरोध केल्यास घडू शकणार नाहीत. पण सामान्य माणसाला त्यात रसच नसतो.

      सामान्य माणसाच्या शिवाय दुसरा एक असा वर्ग आहे की जो सामान्यांच्याहून थोडा बलवान (पैसा + सत्ता ह्या समीकरणानुसार, बुद्धी, प्रामाणिकपणा, चारित्र्य, कृती करण्याची इच्छा इत्यादी गुणांमुळे नव्हे) आहे पण समाजामध्ये चाललेल्या दुष्टचक्रातूनच त्याच्या पैशाची व सत्तेची निर्मिती होत असल्यामुळे त्या चक्राला विरोध करण्याची त्याला इच्छाच नसते. उलट अशा प्रवृत्तींना खतपाणी घालण्याकडेच त्याचा कल असतो. उदाहरणार्थ गेली चार-पाच वर्षे पैसे नसल्याचे कारण सांगून मराठी शाळांना नियमानुसार देणे असलेले अनुदानही न देणारे आपले दरिद्री राज्यशासन जेव्हा स्वतःहून दारू गाळण्याच्या कारखान्यांच्या नवनवीन योजना सुरू करते व दारूसाठी अनुदान देऊ करते तेव्हा त्यांना कोणीही (अभय बंगांसारखे थोडके निःस्वार्थी लोक वगळता) नेते विरोध करीत नाही. राजकारणातील विरोधी पक्ष तर नाहीच नाही. कारण दारू कारखान्यांची खिरापत वाटलेल्यांच्या यादीत विरोधी पक्षांच्याआ महायोद्ध्यांची नावे देखील अंतर्भूत आहेत. त्यामुळे अशी माणसे शासनाकडून सुवर्तनाची कशी काय अपेक्षा ठेवणार किंवा त्यांच्यावर दबाव घालणार किंवा तसे न घडल्याबद्दल चीड व्यक्त करणार? म्हणजे कुवत असूनही स्वार्थ गुंतलेला असल्यामुळे अशा माणसांना शासनाकडून अपेक्षा किंवा मागणी करण्याची नैतिक लायकी नसते.

      म्हणजे ज्या माणसाने तत्त्वनिष्ठेने आयुष्य जगले आहे, समाजाच्या उद्धारासाठी थोडा तरी खारीचा वाटा उचलला आहे, अशा व्यक्तीलाच शासनाच्या, समाजाच्या, देशाच्या, जगाच्या अधःपतनाबद्दल वैफल्य, खंत, उद्वेग, चीड वाटू शकते. अशा प्रकारच्या तीव्र भावना त्याबद्दल स्वतः काहीच न करणार्‍या निर्विकार (Xढ हा शब्द वापरण्याचे टाळतो) सामान्य माणसांनाही वाटत नाहीत किंवा समाजाच्या टाळूवरचे लोणी खाण्यास सवकलेल्या निर्लज्ज, स्वार्थी, नालायक पुढार्‍यांच्याही मनाला शिवत नाहीत.

      आयुष्यात केवळ नाकासमोर साधे-सोपे-स्वार्थपरायण आयुष्य न जगता यथाशक्ती आटापिटा करून समाजासाठी काही करीत असलेल्या अनेक लहानथोर माणसांना वेळोवेळी आयुष्यात निराशेचे क्षण येतात. माणसाला कधीकधी विश्वासघातामुळे धक्का बसतो. तो धक्का व त्याबद्दलची प्रतिक्रिया ही विश्वासघात करणार्‍यांपुढे समाज पुरेशा एकजुटीने, पुरेशा त्वेषाने लढत नाही आहे ह्याबद्दलची खिन्नता, वैषम्याची भावना असते, सात्त्विक संताप असतो. अनेक मोठ्यामोठ्या लेखक, कवी, समाजकारण्यांनाही जीवनात कधी ना कधी अशा परिस्थितीमधून जावे लागले आहे. कुसुमाग्रजांनीही अशा प्रकारचे उद्गार काढले आहेत. अमृतमंथनावरील दुसर्‍या एका लेखाखालील चर्चेत आदानप्रदान झालेल्या विचारांपैकी काही इथे उद्धृत करतो.

      {{अनेक थोर कवी व लेखकांना कधीकधी निराशा, दुःख, वेदना, चीड, विषाद, खंत, चिंता, भय अशा भावनांनी ग्रासले आहे व तसे त्यांनी आपल्या वाङ्‌मयकृतीमध्ये स्पष्टपणे व्यक्तही केले आहे.

      कुसुमाग्रजांनी मूळ कविता लिहिल्यावर त्यांना समाजातील सत्य परिस्थितीमुळे कधीच खंत वाटली नसेल असे आपण म्हणू शकतो का? मराठी भाषेची अवस्था व तिची शासनाकरवी होत असलेली अवहेलना पाहून तात्यासाहेब शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांनी “मराठी भाषा ही फाटक्या वस्त्रानिशी मंत्रालयाच्या दाराशी सोनेरी मुकुट लेऊन उभी आहे” असे जे म्हटले होते ते फारशा अभिमानाने, कौतुकाने व विशेषतः “ताठ मानेने” म्हटले असेल का?

      ह्याच अमृतमंथन अनुदिनीवरील कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची खालील कविता अवश्य वाचा आणि त्यातील भावना आपल्यासारख्या स्वाभिमानी मराठ्याच्या हृदयाला भिडते की नाही, काळजाला बोचते की नाही, ते सांगा.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/29/’अखेर-कमाई’-कवी-कुसुमाग्/

      भावनांचे प्रकार निरनिराळे असतात. काही माणसांना दुसर्‍याला छळून स्वतःच्या तुंबड्या भरण्यात स्वर्गानंद मिळतो. पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हजारो कोटी कमावले तरी त्यांना ते अपुरे वाटतात. हजार कोटीचे लाख कोटी का नाही होत म्हणून दुःख वाटते. तर इतर काही माणसांचे मन दुसर्‍याच्या दुःखामुळे पिळवटते. शासनकर्ते समाजाच्या हिताबद्दल उपदेश करताना केवळ स्वार्थासाठी समाजाला नाडून समाजाची अधोगती करीत आहेत हे पाहून चीड येते. अशा शासनास इतर नेतेही जाब विचारत नाहीत, सामान्य जनतेमधील तथाकथित सुशिक्षित मंडळीही शासनाच्या नालायकपणाकडे दुर्लक्ष करतात हे सर्व पाहून त्यांचे मन नक्कीच व्यथित होते. अशा माणसांना आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तींनी आपल्या कुवतीप्रमाणे पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर यथाशक्ती चळवळ उभी करण्यास आपण स्वेच्छेने व आपल्या कुवतीनुसार मदत केली पाहिजे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s