मराठी जनतेची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका (मराठी+एकजूट)

खरं म्हणजे मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे. ह्या जाहीरनाम्यातील सूचनांबद्दलच्या शासनाच्या कार्यवाहीचे येत्या काळात मूल्यमापन करून मराठी माणसाने शासनाचे प्रगतिपुस्तक भरावे आणि त्यातील कामगिरीवरूनच पुढील निवडणुकीच्या वेळी ह्याच शासनकर्त्यांना पुन्हा प्रवेश द्यायचा की बोटाला धरून बाहेरची वाट दाखवायची ह्याचा निर्णय घ्यावा.

’मराठी+एकजूट’ उपक्रमाद्वारा सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यासंबंधी सूचना पाठवण्याबद्दल केलेल्या जाहीर आवाहनास ’मराठी+एकजूट’ मित्रपरिवाराकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. ’मराठी+एकजूट’ परिवारातील विविध मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने सूचना पाठवल्या. काहींनी ’मराठी+एकजूट’ला पुन्हापुन्हा विपत्रे पाठवून नवनवीन मुद्दे कळविले. इतक्या सर्व सूचनांमधून निवडणी व संकलन करणे ही एक अत्यंत कठीण प्रक्रिया होती. त्यासाठी वेगवेगळे निकष वापरावे लागले. त्यापैकी काही सूचना ह्या बर्‍याचशा सारख्या पण वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या होत्या. काही सूचना परस्परविरोधीही होत्या. काही सूचना दिशादर्शक पण ढोबळ स्वरूपात होत्या; म्हणजे त्यातून शासनाने नक्की काय करावे हे स्पष्ट होत नव्हते. उदा० “लोककलांना उत्तेजन देण्यासाठी योजना आखाव्यात. मराठी माध्यमाच्या शाळांना उत्तेजन द्यायलाच हवे.” ह्यातून निश्चित कृतिमुद्दे स्पष्ट होत नाहीत. अशा विविध प्रकारच्या सूचनांच्या राशीमधूनच स्पष्ट मुद्दे निवडून, त्यापैकी बहुसंख्य वाचकांना मान्य होतील अशा किंवा निदान ज्यांच्याबद्दल कमीतकमी मतभेद असू शकतील अशा मुद्द्यांचे संकलन व संपादन करून अंतिम यादी तयार केली व ती सांस्कृतिक धोरण समितीस पाठवून दिली.

अर्थात आपल्या मुद्द्यांवर विचार करून समिती त्यांचा आपल्या अहवालात समावेश करते का आणि तसा केला तरीही त्यावर शासन कार्यवाही करते की ह्या अहवालालाही राम प्रधान समितीच्या २६/११ बद्दलच्या अहवालाप्रमाणेच गडप करून टाकते ही पुढची गोष्ट.

मोठ्या संख्येने सूचना आल्याने व त्यातील बर्‍याचशा थोडक्यात आणि स्पष्ट व निश्चित शब्दांत नसल्यामुळे संकलन व संपादनाच्या प्रक्रियेला जरा अधिक वेळ लागला. त्यात काही जाणकारांची मदत घ्यावी लागली. पण एकूणच वाचकांनी ज्या तळमळीने व आपलेपणाने, स्वतःच्या कौटुंबिक समस्येप्रमाणेच वेळ, विचार व श्रम खर्च करून आपल्या सूचना पाठवल्या त्यामागील भावना लक्षात घेतल्यावर खरोखरच अत्यंत समाधान वाटते. अजुनही मोठ्या प्रमाणात मराठी माणसाला स्वभाषेबद्दल, स्वसंस्कृतीबद्दल, स्वराज्याबद्दल अत्यंत प्रेम, अभिमान, कळकळ, आस्था वाटत आहे, हे सर्व पाहिल्यावर मनात येते की, – “होय. अजुनही धीर सोडण्यात अर्थ नाही. अजुनही वेळ गेलेली नाही. ज्याप्रकारे अत्यंत दारूण परिस्थितीतून इंग्रजांनी पाचशे वर्षांपूर्वी आपली भाषा निराशजनक परिस्थितीतून खेचून बाहेर काढली व तिचे मोठ्या प्रमाणात संवर्धन केले; ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न सत्यात आणून स्वराज्य, स्वसंस्कृती व स्वभाषा ह्यांचे पुनरुज्जीवन व संवर्धन केले; ज्याप्रकारे भारताच्या जनतेने विविध मार्गांनी लढा देऊन इंग्रजांपासून स्वातंत्र्य प्राप्त केले आणि ज्याप्रकारे पन्नास वर्षांपूर्वी मराठी जनतेने शंभरावर हुतात्म्यांचा बळी देणारा निकराचा लढा देऊन देशाच्या घटनेच्या भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वांवर आधारित असे स्वतःचे मराठी राज्य मिळवून राज्यातील जनतेच्या प्रगतीची, स्वभाषा व स्वसंस्कृतीच्या जोपासनेची व संवर्धनाची सूत्र व जबाबदारी स्वतःच्या हातात घेतली; त्यांचेच स्मरण करून अजुनही स्वकर्तृत्वाच्या आधारे स्वाभिमानी मराठी माणूस मराठी समाज, मराठी भाषा व मराठी संस्कृती ह्यांची सतत प्रगती करणारी, खर्‍या अर्थाने ज्याला स्वराज्य म्हणता येईल अशी महाराष्ट्रीय समाजव्यवस्था निर्माण करू शकतो.”

सांस्कृतिक धोरण समितीला पाठवलेल्या २९ पानी यादीमध्ये एकूण ९७ मुद्द्यांचा समावेश आहे. त्यातील काही मुद्द्यांच्या खाली विविध उपमुद्देही आहेत. कृपया काळजीपूर्वक वाचा. सूचनांची संपूर्ण यादी खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यासंबंधी सूचना_मराठी+एकजूट_130310

ह्या यादीतील काही मुद्द्यांबद्दल मतभेद असण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्द्यांवर आपण अवश्य चर्चा करू, पण ’मराठी+एकजूट’ ह्या सूत्रास जराही तडे जाऊ न देता !!

.

(वरील मजकूर ’मराठी+एकजूट’ उपक्रमाकडून साभार प्राप्त.)

– अमृतयात्री गट

.

10 thoughts on “मराठी जनतेची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका (मराठी+एकजूट)

    • प्रिय श्री० यशवंत कर्णिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध व्यक्तीच्या शाबासकीमुळे खूपच आनंद होतो, प्रोत्साहन मिळते. पण प्रस्तुत सूचनासंकलनाचे श्रेय मुख्यतः मराठी+एकजूट उपक्रमास जायला हवे. ते आम्ही पोचते करूच.

      शाळेत मराठी विषयाचा अभ्यास सक्तीचा करण्याबद्दल आपले विधान १०१% योग्य आहे. “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” ह्या लेखातील खालील अंश पहा.
      ———-
      आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घटनेमधील तरतुदींप्रमाणे अनुसूची-८ मधील सर्व भाषांचे (संबंधित राज्य शासनाच्या मदतीने) वेगाने संवर्धन करणे व त्या आधुनिक ज्ञानाच्या दळणवळणाचे प्रभावी माध्यम होण्याच्या दृष्टीने योग्य ती कृती करणे यासाठी स्वत: केंद्र सरकार बांधील आहे.

      भारताची राज्यघटना व इतर कायद्यांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयानेही स्थानिक भाषेच्या बाजूनेच निर्णय दिले आहेत.

      कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षणात कानडी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या रिट याचिकेत राज्य शासनाची बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘कोणाला आवडो अथवा न आवडो, परंतु या देशात भाषावार राज्यरचना व्यवस्थित प्रस्थापित झाली आहे. अशा भाषावार राज्यरचनेचा उद्देश असाच आहे की प्रत्येक राज्यातील लोकांची त्यांच्या राज्यातील भाषेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे.’

      महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणात पाचवी ते दहावीच्या वर्गाना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धचा रिट अर्ज फेटाळताना महात्मा गांधींच्या मताचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘वस्तुत: एखाद्या राज्यात वास्तव्य करणार्‍या लोकांना तेथील स्थानिक भाषा शिकण्यास सांगता कामा नये असे प्रतिपादन मुळीच मान्य करता येणार नाही. परक्या प्रदेशात राहताना भाषिक अल्पसंख्याकांनी स्थानिक भाषा शिकून घ्यायला पाहिजे हे तत्त्व पूर्णपणे उचितच आहे. आमच्या मते स्थानिक भाषा शिकण्यास विरोधाच्या भावनेचे पर्यवसान समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होण्यात होते आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात भाषेवर आधारित विखंडन (तुकडे-तुकडेत पडणे) होते व तसे घडणे ही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने निंद्य गोष्ट आहे.’ (अर्थात या प्रकरणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जिंकूनही आपण निवडून दिलेले राज्यकर्ते तो निर्णय अमलात आणण्याच्या बाबतीत मात्र सपशेल हरलेले आहेत हे महाराष्ट्रीय जनतेचे मोठेच दुर्दैव.)
      ———-
      संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचता येईल.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. संस्कृत आणि कदाचित तिच्यापेक्षाही प्राचीन असलेली तमिळ या अभिजात भाषा आहेत, यात कसलाही संशय नाही. तेलुगू आणि कन्नड यांनाही तो दर्जा मिळाला आहे, तेव्हा त्यासाठी पुरेसा विचार झाला असेल असे गृहीत धरायला हरकत नाही. मराठीला हा दर्जा मिळावा अशी आपली इच्छा असली तरी, भाषेला अभिजात म्हणण्यासाठी काही कसोट्यांना उतरावे लागते. त्या कसोट्या अशा :-
    (1) भाषेचे प्राचीन काळापासून अस्तित्व असणे (२) १५०० ते २००० वर्षांपूर्वीचे वाङ्‌मय किंवा त्याची नोंद उपलब्ध असणे. (३) भाषा पिढ्यान्‌पिढ्या बोलणार्‍यांना तिच्यातील प्राचीन वाङ्मयाचा मोठा हिस्सा आपली मौलिक परंपरा आहे असे वाटत असणे. (४) भाषेत मुळातूनच स्वतंत्र वाङ्‍मयाची निर्मिती झालेली असणे. (५) जुन्या स्वरूपातून नवीन स्वरूपाकडे येताना एकवेळ कालसातत्य नसले तरी चालेल पण, आधुनिक काळापेक्षा प्राचीन भाषेचे आणि तिच्यातील वाङ्मयाचे स्वरूप अगदी भिन्न असणे.
    महाराष्ट्री नावाची प्राकृत भाषा इ.स.पू.५००-६०० या काळापासून इ.स.५००-६०० या काळापर्यंत अस्तित्वात होती. महाराष्ट्री अपभ्रंश भाषा चौथ्या शतकात उत्पन्‍न झाली. मराठी भाषेत वाङ्‍मयनिर्मितीला दहावे शतक उजाडावे लागले. अशा परिस्थितीत मराठीला अभिजात भाषा ठरवण्यापूर्वी ती वर दिलेल्या कसोट्यांना उतरेल की नाही, कोण ज़ाणे? –SMR

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      पाहूया काय होते ते. पण त्यांना कृती तर सुरू करू दे. आपल्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असतीलच.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. Chalaa aapan aaple kaam tar suru kele aahe,
    Aataa sarkar chalavnaare GADARBH ANI ASHWA avtaar kaay kartaat te paahoo.
    MaSaaS madhe APLYAA muMa nee PALVAAT Marathee veedyaapeeth prashnaavar vaaprun,NARO VA KUNJARO VAA sandesh dilaa aahech.
    Marathee maansaas Maratheet bolmyaa cha salla denare DHRMADHIKARI saaheb Marathee kavitechaa gruhpath karu shakle naahit,
    AAPLYAALAA KHAROKHARACH ASHAA OONTAAVARLYAAN CHI JAROOR AAHE KAA ?

    • प्रिय मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले प्रश्न आम्ही सर्व मराठी वाचकांपुढे मांडतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      ही लांबलचक यादी बनवण्यामध्ये आपल्या अनेक वाचकांचा सहभाग आहे. अशा लष्करच्या भाकर्‍या भाजण्यास मदत केल्याबद्दल सर्वांचेच कौतुक केले पाहिजे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. Namskar,
    Aaple Vind Taawade MHANTAAT TE KHRECH AAE,mARATHEE CHAA FAR KAMEE ANUWAADITAR BHASHAT ZAALAA AAHE,
    Pan aataa Gadkri,BJP che killedaar ani Vinod jee nee aataa BJP chyaa sarv prachar prasaar patrat,MAAGCHYAA KORYAA BHAAGAAT JAR EKHAADI MARATHI GOSHT TYAA TYAA PRANTAA CHYAA BHAASHET ANUVAADEET KARUN CHAAPLEE,Tasech patra chyaa pakitanvar arthasahm CHAROLYAA,KAVEETAA chaaplyaa tar MARATHEE SAHEETYAA CHEE BAREECH SEWAA HOIL,
    Geet Raamayanaa chyaa karyakramaa itkech hyaa che mahatw aahe pan BJP CHYAA GHODYAALAA taach MAARU SHAKTEEL?
    aamchyaa pathbalaa sah shubhechhaa rahteel.
    Jay Maharashtra Maate,
    Jay Bharat Jananee.

    • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      भाजपने महाराष्ट्रात आपले प्रचारांचे फलक, भाषणे, घोषणा ह्यांच्यासाठी मुख्यतः हिंदीचाच उपयोग केला आहे. कर्नाटकासारख्या इतर राज्यांत मात्र स्थानिक भाषेला डोक्यावर घेतले जाते. तेव्हा भाजपचे मराठीप्रेम कितपत खरे कितपत बेगडी?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s