पुस्तक परीक्षण – ‘ध्वनितांचें केणें’ (ले० मा० ना० आचार्य)

प्राचीन भारतीय वाङ्‌मयातील महाभारत व मध्ययुगीन मराठी वाङ्‌मयातील ज्ञानेश्वरी यांसारख्या विविध श्रेष्ठ साहित्यकृतींवरील लेखावरील एक संशोधनपर टीका. ध्वनित म्हणजे सूचकार्थ, hint, implied meaning. थोर विद्वानांच्या निरूपणात राहून गेलेल्या लहानसहान नजरचुकांमुळे किंवा संदर्भविश्लेषणामध्ये अनवधानाने झालेल्या प्रमादांमुळे कधी कधी मोठमोठे अनर्थकारी मिथ्यापवाद पसरतात. त्यांचाच झाडा प्रा० आचार्यांनी या पुस्तकात घेतला आहे. त्यात त्यांनी दुर्गाबाई भागवतांसारख्या साक्षेपी विदुषींनाही जाब विचारण्यास कमी केलेले नाही.

व्यासपर्वाचा पैस, मत्स्यभेदाचा चकवा, एकलव्य, पुरूरवा आणि उर्वशी ही प्रकरणे विशेषच साक्षात्कारी वाटली. वैज्ञानिक संशोधनात जी कटाक्षाची दृष्टी लागते तीच दृष्टी साहित्यिक संशोधनातही ठेवावी लागते हे प्रा० आचार्यांच्या लेखनावरून वारंवार जाणवते.  वाचकांनी हे पुस्तक वाचावे व त्यातील आचार्यांच्या अभ्यासपूर्ण, अचूक लिखाणाचा आनंद स्वतः अनुभववावा.

अशा या असाधारण, चाकोरीपेक्षा वेगळ्या पुस्तकाचे सुबोध जावडेकर यांनी केलेले एक उत्तम परीक्षण सादर करीत आहोत. (मराठी अभ्यास परिषदेच्या ’भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकातून साभार.)

(पुस्तक-परीक्षण पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. अमृतमंथन_परीक्षण_ध्वनिताचें केणें_241209 )

.

अनाग्रही सर्वसमावेशक संशोधन

पुस्तक: ध्वनिताचें केणें

लेखक: प्रा० मा० ना० आचार्य.

पद्मगंधा प्रकाशन, पुणे. (२००८)

पृष्ठे २७८. किंमत रु० २५०/-

परीक्षक: सुबोध जावडेकर

.

‘ध्वनितांचें केणें’ हे पुस्तकाचे नाव आपल्याला कोडयात टाकतं. ध्वनित म्हणजे जे उघड नाही ते, आडवळणानं सांगितलेलं, हे आपल्याला माहीत असतं. तेव्हा ध्वनित म्हणजे सूचित किंवा गुह्य असणार. पण ‘केणें’ म्हणजे काय बुवा? असा प्रश्न बहुतेकांच्या चेहर्‍यावर उमटेल. केणें म्हणजे गाठोडं. ‘ध्वनितांचें केणें’ म्हणजे गूढार्थाचं गाठोडं. हा ज्ञानेश्वरीतला शब्दप्रयोग आहे. एखाद्या गोष्टीला वरवर दिसतो त्यापेक्षा काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो अशा वेळी हा शब्दप्रयोग वापरतात. प्राचीन साहित्यामध्ये आणि संतवाङ्मयामध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्यांमध्ये वरकरणी दिसतं त्यापेक्षा काहीतरी वेगळंच लेखकाला सांगायचं असतं. अशा जागा नेमक्या हेरून मा०ना० आचार्यांनी हे गूढार्थाचं गाठोडं आपल्यासमोर सोडलेलं आहे.

मा०ना० आचार्य यांचा देवकथांचा, पुराणकथांचा, मिथकांचा दांडगा अभ्यास आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत या भाषांतील साहित्याचं त्यांचं भरपूर वाचन आहे. याचे पुरावे पुस्तकात जागोजागी विखुरलेले आहेत. प्राचीन भारतीय वाङ्मय, वेदपुराणे, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये, संतसाहित्य, याच्याबरोबरीनं आधुनिक साहित्य आणि समीक्षा या सर्व क्षेत्रांत त्यांचा सहज संचार चालू असतो. त्यांच्या या चतुरस्र व्यासंगाला सुरेख ललितशैलीची जोड मिळाल्यामुळे या पुस्तकाला रूढ समीक्षाग्रंथाचं स्वरूप न येता काव्यशास्त्रविनोदाच्या सुरेल मैफलीचं रूपडं आलं आहे.

एखाद्या गोष्टीकडे बघताना वेगवेगळया कोनांतून त्याच्यावर प्रकाश टाकायची आचार्यांना आवड आहे हे तर पुस्तक वाचताना सहजच लक्षात येतं. ज्याबद्दल लिहायचं त्याच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती मिळवून ती वाचकांपुढे सादर करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. पण हे करताना केवळ संदर्भांचा ढीग वाचकाच्या पुढयात ओतून त्याला चकित करावं, त्याचं डोकं भिरभिरवून टाकावं, असा त्यांचा उद्देश नसतो. तर एकाच विषयाचे अनेकविध पैलू दाखवून वाचकाला त्या विषयाचा सर्वांगानं परिचय करून देण्यावर त्यांचा भर असतो.

पण मला जाणवलेलं या पुस्तकाचं सर्वांत विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची अनाग्रही, सर्वसमावेशक भूमिका. एखाद्या घटनेचा किंवा कथेचा स्वत:ला जाणवलेला अन्वयार्थ सांगताना केवळ आपलीच बाजू खरी आणि इतरांची चुकीची असा दुराग्रह आचार्य मुळीच धरत नाहीत. उलट आपण सांगितल्यापेक्षा वेगळा अर्थ लावणारा संदर्भ कुठे सापडला तर त्याचा आवर्जून उल्लेख करायला ते बिचकत नाहीत. पुष्कळ पुस्तकांत असं लक्षात येतं की लेखकानं एक कुठलंतरी प्रमेय स्वीकारलेलं असतं. आणि मग स्वत:च्या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ आपल्या बाजूचे पुरावे, आपल्या गृहिताला पुष्टी देणार्‍या गोष्टी, इतरांचे आपल्या भूमिकेला पाठिंबा देणारे अभिप्राय यांच्या याद्यांच्या याद्या तो लेखक पुस्तकातून सादर करत असतो. ‘हा जय नावाचा इतिहास आहे’, ‘कर्ण खरा कोण होता?’ अशी काही सहज आठवणारी उदाहरणे.

मा०ना० आचार्य यांनी मात्र कुठल्याच मुद्द्याच्या संदर्भात अशी बनचुकी भूमिका घेतलेली नाही. एखाद्या गोष्टीच्या अनुषंगाने जेवढे म्हणून उलटसुलट मुद्दे त्यांना आढळले ते सगळेच्या सगळे, काहीही न लपवता, कुठलीही संपादकीय कात्री न लावता, त्यांनी वाचकांच्या समोर ठेवले आहेत. पूर्वसूरींच्याबरोबरीनं समकालीन अभ्यासकांच्या मतांचीही चर्चा केली आहे. सर्व मुद्दे वाचकांसमोर यावेत आणि मग वाचकाने स्वत:च काय तो निष्कर्ष काढावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं. त्यांची भूमिका सच्च्या अभ्यासकाची आहे. विनम्र आणि काहीशी तटस्थ. कुठलाही अभिनिवेश नाही. चलाखी नाही. किंवा डावपेच नाहीत. पूर्वग्रहाचा किंवा अहंकाराचा वारासुध्दा त्यांना कुठं स्पर्शून गेलेला नाही. अशा स्वरूपाचे पुस्तक लिहिताना लेखकाची भूमिका कशी असावी याचा हा वस्तुपाठ आहे.

पुस्तकात पहिल्या भागाला त्यांनी ‘भरती’ हे नाव दिलंय. या विभागातल्या पाच लेखांत केंद्रीभूत विषयाच्या अनुषंगाने इतरही भरपूर माहिती त्यांनी दिली आहे. गणेश ही देवता, श्रीकृष्ण ही व्यक्ती, अश्वत्थ हा वृक्ष, खेचर ही भूतयोनीसारखी योनी आणि संत नामदेवांचं त्यांच्या अभंगांतून दिसणारं व्यक्तिमत्त्व असे हे पाच विषय आहेत. विषयांची ही केवळ यादी वाचूनच आपण थक्क होतो. किती नानाविध विषय आचार्यांना दिसतात आणि त्यावर लिहिताना ते किती रंगून जातात हे पाहायला मुळातून पुस्तकच वाचायला हवं.

दुसर्‍या ‘झडती’ या भागामध्ये मान्यवर संशोधकांनी कळत नकळत केलेल्या प्रमादांची झाडाझडती घेतलेली आहे. विवेचनाच्या ओघात डॉ० हे०वि० इनामदार, मंगरूळकर, केळकर, राजवाडे, दांडेकर, न०म० सोमण, गो०म० कुलकर्णी, दुर्गा भागवत, ना०गो० नांदापुरकर, सातवळेकर, स्वामी स्वरूपानंद अशा अनेक विद्वानांच्या मतमतांतराचा धांडोळा त्यांनी इथं घेतलेला आहे. अभंग, ओव्या, भारूड, भागवत, पुराणं, असा त्यांच्या अभ्यासाचा विस्तृत प्रदेश आहे. ज्या ज्या ठिकाणी काही चुकीचे अर्थ लावले गेले आहेत, विचार न करता काहीतरी ठोकून दिलं आहे, त्याचं पुरेपूर माप त्यांनी त्या त्या संशोधकाच्या पदरात घातलं आहे. ‘व्यासपर्वाचा पैस’ या मोठया लेखात दुर्गाबाईंच्या ललितरम्य भाषेला, अभिजात रसिकतेला, जीवनातलं नाटय नेमकेपणानं टिपणार्‍या प्रतिभेला दाद देतानाच दुर्गाबाईंनी केलेले घोटाळे, गफलती, वाचकांची वंचना यावर कठोर टीकाही केली आहे.

तिसर्‍या ‘फिरती’ या भागात तीन लेख आहेत. त्यात अहल्या, एकलव्य आणि पुरुरवा यांच्या मूळ कथेत, आणि त्यामुळे अर्थातच आशयात, झालेल्या बदलांचा मागोवा त्यांनी त्यांच्या शैलीत घेतला आहे. तो घेताना केवळ प्राचीन कवींचीच नाही तर विंदा करंदीकर आणि पु०शि० रेगे यांच्यासारख्या अर्वाचीन कवींचीही साक्ष त्यांनी काढलेली आहे. हे लेख लिहिताना त्यांनी केलेली काटेकोर मांडणी बघण्यासारखी आहे.

आचार्यांची भूमिका नम्र असली तरी कुठंही बोटचेपी, गुळमुळीत झालेली नाही. पहिल्या भागात तर अशा काही जागा आहेत की ज्यांच्याबद्दल लिहिताना त्यांना देवदेवतांबद्दल धीट शब्दात लिहावं लागलं आहे. एवढयातेवढयावरून भावना दुखावल्या जाणार्‍या आजच्या युगात अशा नाजूक जागांबद्दल लिहिणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. ती त्यांनी कशी साधली आहे ते बघण्यासाठी ‘देवा तू चि गणेशु’ या लेखातल्या गणेशजन्माची कथा मुद्दाम डोळयाखालून घालावी.

पुराणग्रंथांचा अभ्यास असला तरी आचार्यांची मनोधारणा अजिबात पारंपरिक, पुराणमतवादी, कोती नाही. उलट ती खरोखरीची उदारमतवादी, कित्येकदा तर प्रखर स्त्रीवादीही आहे हे लक्षात येतं. आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये स्त्रीच्या मुक्त वासनांचा आविष्कार अनेकदा मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. स्त्रीच्या या आदिम कामभावाबद्दल लिहिताना आचार्यांची लेखणी कुठं अडखळल्याचं जाणवत नाही. द्रौपदी, अहल्या, लोपामुद्रा, यमी यांच्या चित्रणात हे प्रकर्षानं दिसून येतं. आनंदरामायणामध्ये आलेल्या पिंगलेच्या कथेत रामाला वसिष्ठांच्या पायांवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते व सीतेला आपल्या शुध्दतेची खात्री पटवावी लागते हा भागही गमतीचा आहे. ‘अहल्या शिळा…’ हा लेख तर फारच सुरेख जमला आहे. त्यात ऋग्वेदापासून थेट विंदा करंदीकरांपर्यंत अनेकांनी अहल्येच्या कथेकडे कसं पाहिलं आहे याचा विचक्षणपणे आढावा घेतला आहे.

विनोद हा अभ्यासू वृत्तीला मारक असतो असा गैरसमज, का कुणास ठाऊक, आपल्याकडे प्रचलित आहे. अत्यंत गांभीर्याने केलेलं लिखाणसुध्दा काडेचिराईताचा काढा पिऊन करायची आवश्यकता नसते. अधूनमधून कोपरखळया, थट्टामस्करी, अवखळपणा असला तरी विषयाच्या गांभीर्याला मुळीच बाधा येत नाही अशी आचार्यांची धारणा आहे. ‘अहल्या शिळा…’ या लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या ‘अपौरुषेय(!)’ ओळी आणि त्या चुटक्यानं लेखाची सुरुवात करायची कल्पना तर अफलातूनच आहे. अशा प्रसन्न शैलीमुळे पुस्तकाची वाचनीयता कितीतरी पटीनं वाढली आहे यात शंका नाही.

पुस्तकाचं मुखपृष्ठ रविमुकुल यांचं आहे; त्याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. पिवळया पडलेल्या कागदावर जुन्या पोथ्यांत असतात तशी. बोरूने रेखलेली, फिकट होत चाललेली, ढबोळी अक्षरं आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर ‘ध्वनिताचें केणें’ असं काळयाभोर ठसठशीत अक्षरात ग्रंथाचं नाव, पुस्तकाचं स्वरूप आणि लेखकाची भूमिका याबद्दल बरंच सांगून जातं.

आचार्यांचं हे पुस्तक वाचताना त्यांची शैली, अभ्यास, भाषा, प्रतिभा, संदर्भसंपन्नता यांबाबतीत ‘युगान्त’ ह्या इरावती कर्व्यांच्या पुस्तकाची वारंवार आठवण होते. कोणत्याही पुस्तकाचा यापेक्षा जास्त गौरव कुठल्या शब्दांत करता येईल?

◊ ◊ ◊

परीक्षणावरील आपले अभिप्राय खालील रकान्यात अवश्य नोंदवावेत.

– अमृतयात्री गट

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s