पन्हाळा: एक अनुभव. मराठी माणसाची अधोगती – स्वाभिमान ते निरभिमान

आपले एक पुण्याचे मित्र श्री० सलील कुळकर्णी यांनी सांगितलेला एक भावपूर्ण अनुभव. वाचून पहा आणि आपल्या भावना अवश्य कळवा.

—————————————

प्रिय मराठी बांधवांनो,

सप्रेम नमस्कार.

मी मध्यंतरी काही कामानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. तिथून एके दिवशी मराठी माणसाच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक अशा पन्हाळगडाला भेट दिली. तिथे आलेला अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो. महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचे वर्तमान यात जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे, केवळ ऐहिक प्रगतीच्या दृष्टीनेच नव्हे तर अगदी मूलभूत स्वभाव वैशिष्ट्य़ांमध्येसुद्धा. स्वदेश व स्वसंस्कृतीसाठी दिल्लीच्या मोगलाईशी प्राणपणाने लढणारा मराठी माणूस आज दिल्लीश्वरांपुढे गोंडा घोळण्यात धन्यता मानतो. फारशी, अरबी भाषांमधील शब्दांच्या आक्रमणापुढे मराठी भाषा लोप पावण्याची भीती ओळखून मराठीभाषाशुद्धीसाठी मराठीतील (बहुधा देशातील) पहिला राजव्यवहार शब्दकोश बनवून घेणार्‍या पराकोटीची दूरदृष्टी असलेल्या शिवछत्रपतींचे वंशज म्हणवणार्‍या आपणाला आज आपल्या राज्यात आपल्या मायबोलीची व संस्कृतीची पूर्णपणे उपेक्षा करून इंग्रजी आणि हिंदी भाषांची जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नांबद्दल काहीही खंत न वाटता उलट त्यात प्रतिष्ठा वाटते.

हा टोकाचा परस्परविरोध मला पन्हाळा-भेटीत अधिक प्रकर्षाने जाणवला व त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता लक्षात येताच शरमेने मान खाली झाली.

माझी ही रडकथा तुम्हालाही ऐकवावी व माझ्या दुःखात सहभागी करून घ्यावे या उद्देशाने हे पत्र लिहित आहे. (आनंद एकटाच उपभोगावा आणि दुःखात मात्र वाटेकरी शोधावे असा माणसाचा स्वार्थी स्वभाव असतो, त्यालाही हे धरूनच आहे म्हणा.)

पन्हाळा हे कोल्हापूरपासून केवळ २० कि०मी०वर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुमारे ४००० लोकवस्तीचे एक गाव. क्षेत्रफळ विस्तीर्ण म्हणजे ४०० एकराचे असले तरीही तसे हे खेडेच. जमीन ही काळ्या कातळाची व जांभा दगडाची असल्यामुळे शेती अशी नाहीच. गुरांना चरायलाही फारशी माळराने नाहीत. पाण्यासाठी विहीरी मात्र बर्‍याच आहेत असे म्हणतात. पण एकंदरीत शेती व दूधदुभत्याच्या अभावामुळे येथील स्थानिक जनता उदरनिर्वाहासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुख्यतः पर्यटनावरच अवलंबून. पण पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ऋतुकालावर अवलंबून (seasonal) असल्यामुळे एकंदरीत तशी गरीबीच आढळते. शिक्षणाचे प्रमाणही फार नसावे. एकूण लोकसंख्येपैकी बरेच मुसलमान आहेत आणि तेही शिवाजी महाराजांवर प्राणापलिकडे निष्ठा असणारा व त्यांच्यासाठी बलिदान करणारा पन्हाळ्याचाच सिद्दी वाहब (महाराजांचा अंगरक्षक सिद्दी हिलाल याचा मुलगा) याच्या नावाने शपथ घेणारे. सर्वांची मातृभाषा, (पितरभाषासुद्धा) मराठीच.

Read More »