भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध भाषांची भाषिक वर्चस्वासाठी साठमारी सुरू झाली होती. लोकसंख्येमुळे हिंदी भाषेला संसदेमध्ये इतरांहून अधिक सदस्यसंख्याबल लाभलं होतं. अशा वेळी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेले आणि देशाची राज्यघटना तयार करण्यात सिंहाचा वाटा असणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी केलेला वास्तव्याचा अभ्यास आणि त्यावरून आराखडे बांधून दूरदृष्टीने केलेले भाकित किती अचूक ठरले हे आपण सर्वच पडताळून पाहू शकतो. त्यांच्या ह्या अचूक भविष्यकथनासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नव्हे तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, कायदा, भाषाविज्ञान अशा विविध विषयांचा त्यांचा केवळ अभ्यासच नव्हे तर त्यांवरील प्रभुत्व हेच आधारभूत होते हे सहजच समजून चुकते.