मराठीतील नियतकालिकांची परंपरा तब्बल १८५ वर्षांची. त्यांतील लेखनाने प्रबोधन आणि कल्पकता यांची सांगड घालत मराठी भाषेला सौष्ठव प्राप्त करून दिले. या दीर्घ आणि समृद्ध परंपरेतील कालसुसंगत लेखन ‘आज’च्या वाचकांना उपलब्ध करून देणारा ‘पुनश्च’ हा उपक्रम २१ सप्टेंबर रोजी वाचकार्पण होत आहे. अॅप व संकेतस्थळ या नव-तंत्रमाध्यमांद्वारे सुरू होणाऱ्या या आगळ्या उपक्रमाविषयी..
रविवार दि० १७ स्प्टेंबर २०१७ दिवशीच्या लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लेख खाली साभार पुनःप्रसिद्ध करत आहोत. मराठीसाहित्यप्रेमींनी अवश्य वाचावा. दर्जेदार मराठीसाहित्य वाचण्यासाठी आसुसलेल्या साहित्यप्रेमींना नियमितपणे दर्जेदार साहित्याची पुनश्च भेट घडवून आणण्यासाठी योजलेल्या ह्या ‘पुनश्च’ उपक्रमामध्ये अवश्य लाभ घ्या आणि आपल्या समधर्मी आप्तमित्रांनाही त्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करा. अशा उपक्रमाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला तर त्याचा विस्तार होऊ शकेल आणि मराठीमध्ये पुन्हा एकदा उत्तम वाचनसंस्कृती निर्माण होऊ शकेल.
.
पुनश्च!
अॅप व संकेतस्थळ या नव-तंत्रमाध्यमांद्वारे सुरू होणाऱ्या या आगळ्या उपक्रमाविषयी..
लेखक : किरण भिडे
‘पुनश्च’ची स्थापना करून साहित्याचा, वाचनानंदाचा सोहळा सुरू करताना आनंदाबरोबरच जबाबदारीची जाणीव आहे. आणि एक हुरहुरही. मराठी नियतकालिकांच्या गेल्या १८५ वर्षांच्या इतिहासातून निवडक कालसुसंगत साहित्य निवडून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ही जबाबदारी आपण पार पाडू शकू ना, ही ती हुरहुर. ‘पुनश्च’ अर्थात punashcha.com सुरू करण्यामागील आमची भूमिका, कोणाकोणाचं या कार्यात सहकार्य लाभले याबद्दल आधी थोडंसं..
मध्ये एक दिवस रत्नागिरीला गेलो होतो. १९९५-९६ साली पूर्ण एक वर्ष फिनोलेक्स कंपनीत नोकरीला होतो. एवढे दिवस तिथे राहूनही लोकमान्यांचे स्मारक, पतितपावन मंदिर, किल्ला या गोष्टी बघायच्या राहूनच गेल्या होत्या. तो योग त्या दिवशी आला. सहकुटुंब रत्नागिरी दर्शनाचा कार्यक्रम आखला. मी राहायचो ती फिनोलेक्स कंपनीची कॉलनीदेखील या प्रेक्षणीय स्थळात घुसडून दिली. खरं तर मला तिथेच जाण्यात होता; बाकी तीन गोष्टींशी माझ्या काही आठवणी जोडलेल्या नव्हत्या. नॉस्टॅल्जियात किती ताकद असते ना! एखाद्या टाइम मशिनसारखी ती आपल्याला गतकाळात फिरवून आणते. पण ही जुनी स्मारकं जर चांगल्या पद्धतीने राखली असतील तर त्यांच्यातही तेवढीच, किंबहुना त्याहून अधिक ताकद असते याची मला लोकमान्यांचे स्मारक बघितल्यावर कल्पना आली. ते वाडय़ासारखं दिसणारं घर, आत सर्वत्र लावलेले फोटो, लोकमान्यांनी लिहिलेले लेख वगैरे गोष्टी त्याच टाइम मशिनचं काम करीत होत्या. फिरत फिरत मी केसरीतल्या लोकमान्यांनी लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखापाशी आलो. उभ्या उभ्याच तो लेख वाचला. आणि मी लोकमान्यांच्या प्रतिभेने अवाक् झालो. काही लेखन किती कालातीत असतं ना! रत्नागिरीहून आल्यावर मला नादच लागला असे लेख शोधून काढून वाचण्याचा. १८३२ साली मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू झालं होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर ते पूर्ण मराठीत नसायचं. म्हणजे त्यातील काही लेख इंग्रजीत असायचे. पूर्ण मराठीतलं पहिलं वृत्तपत्र होतं ‘मुंबई अखबार’. ते सुरू झालं १८४० साली. त्याच्या पुढच्याच वर्षी भाऊ महाजन यांनी ‘प्रभाकर’ हे वृत्तपत्र सुरू केलं, ज्यात लोकहीतवादींची शतपत्रे प्रथम प्रकाशित झाली होती. तिथपासून आपल्याकडे नियतकालिकांची एक उज्ज्वल परंपराच सुरू झाली. (मराठी माणसाची प्रकट होण्याची ऊर्मी किती जबरदस्त आहे याचा अंदाज येण्यासाठी फक्त विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे उदाहरण घेतले तरी पुरे. उण्यापुऱ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात (वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर ‘मराठी शालापत्रक’ आणि ‘विचार लहरी’ ही नियतकालिकं चालवत) स्वत:चे ‘निबंधमाला’ मासिक काढले, ‘केसरी’-‘मराठा’ ही वृत्तपत्रे काढली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्थादेखील टिळक-आगरकरांबरोबर काढली.) ‘निबंधमाला’, ‘शतपत्रे’, आगरकरांचे ‘सुधारक’ यांतील लेख वाचायला मिळाले. या लेखांचे संग्रहच पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे ते मिळणं सोपं होतं. पण खरी मदत झाली बदलापूरच्या श्याम जोशी यांच्या ‘ग्रंथसखा’ वाचनालयाची. तिथे गेलो आणि हिरे-माणकांनी भरलेली एखादी गुहाच आपल्याला मिळावी असा आनंद झाला. म्हणाल ते जुनं पुस्तक, नियतकालिक तिथे उपलब्ध आहे. १९०९ साली का. र. मित्र यांनी काढलेल्या ‘मनोरंजन’ या पहिल्या दिवाळी अंकापासून ते महाराष्ट्रभरात प्रकाशित झालेले इतरही अनेक दिवाळी अंक तिथे मिळाले. ‘माणूस’, ‘सत्यकथा’, ‘ललित’ यांचे सर्व जुने अंक एकगठ्ठा होतेच; पण लहानपणी वाचलेले आणि (अजूनही ज्यांची नावं लक्षात आहेत आणि ज्यामुळे मराठी भाषेची गोडी लागली) ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ किंवा ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ अशी बहारदार सदरे असलेले ‘अमृत’, ‘विचित्रविश्व’चेही सर्व अंक होते. ‘अंतर्नाद’, ‘आजचा सुधारक’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ अशा वैचारिक स्वरूपाचे लेख ज्यात मुख्यत्वेकरून असतात असे अंक वाचताना खूप आनंद मिळत होता. एका बाजूला त्या लेखांच्या ‘चिरतरुण’ असण्याचं कौतुक वाटत होतं, तर दुसऱ्या बाजूला ‘याचाच एक अर्थ असा, की परिस्थितीत काहीच बदल/ सुधारणा नाही’ हे कळून वैषम्यही. पण हे तर सामाजिक विषयाच्या चिंतनासंदर्भातील लेखांबद्दल झालं. ललित साहित्यातले कितीतरी अन्य प्रकार, जसे की- अनुभवकथन, कला/ साहित्य रसास्वाद, कथा, स्थलवर्णनात्मक लेख सापडले जे त्या त्या नियतकालिकाच्या वाचकांपलीकडे कितपत पोहोचले असतील शंकाच आहे.
वाटलं, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचायला हवं. कसं? पुन्हा छापील माध्यमातून गेलो तर मर्यादित वाचकांपर्यंतच ते पोहोचेल. जर डिजिटल माध्यमाची मदत घेतली, तर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचणे शक्य आहे; शिवाय एकदा हे साहित्य डिजिटाइज झाले, की कायमस्वरूपी उपलब्ध राहील. भविष्यातही कोणाला ते वाचायचे असल्यास सहज शक्य होईल. दुसरे कोणीतरी करेल अशी अपेक्षा करीत वाट पाहण्यापेक्षा आपणच हे काम करायचे ठरले. मनात योजना तयार होत होती. जुन्या उपलब्ध ललित साहित्यातून असे कालसुसंगत लेख शोधून काढायचे. ते डिजिटल स्वरूपात आणायचे. आणि वेबपोर्टल व अॅपद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवायचे, अशी ती योजना. आज भरपूर साहित्य (?) ऑनलाइन स्वरूपात विनाशुल्क वाचायला लोकांना उपलब्ध असताना आपण त्यात भर घालणे सयुक्तिक वाटले नाही. म्हणूनच अत्यल्प का होईना, वर्गणी भरू इच्छिणाऱ्या वाचकांनाच यात सामील करून घ्यायचे वगैरे गोष्टी ठरवल्या.
योजनेबद्दल अधिक माहिती अशी–
सध्या दर आठवडय़ात बुधवारी एक आणि शनिवारी एक असे मिळून दोन लेख वर्गणी भरणाऱ्या वाचकांना पाठवायचे. अनुभवकथन, चिंतन, कविता/ चित्रपट रसास्वाद, अर्थकारण, समाजकारण, राजकारण तसेच विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, पालकत्व, तत्कालीन घटनांवरचे लेख.. अशा विविध विषयांवरचे लेख त्यात असतील. वाचक हे लेख एकतर संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपवर वाचू शकतील. त्यावर प्रतिक्रियाही देऊ शकतील. आलेल्या सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी वाचण्याची सोय असेल. शिवाय आपल्याला आवडलेला लेख इतरांनीही वाचावा असं वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करून ‘पैसे भरून हा लेख वाचावा’ असं आवाहनही करू शकतील. आज जरी लेखाच्या लेखकाला आपण ठरावीक पैसे देणार असलो (जे खरे तर त्या लेखाच्या मूल्यापुढे खूप कमी असतात) तरी पुढे लेखाच्या वाचनप्रियतेशी लेखकाचे मानधन जोडण्याचा इरादा आहे. तंत्रज्ञानामुळे ही जोडणी शक्य होईल. त्यासाठी वाचकांनी तो लेख विनाशुल्क प्रसारित करण्याचा मोह टाळायला हवा. वर्षभरात असे १०४ लेख आपल्याला वाचायला मिळतील तेही फक्त १०० रुपयांत. म्हणजे लेखाची किंमत १ रुपयाहूनही कमी ठेवली आहे. कुठचाही वाचक त्यामुळे ‘परवडत नाही’ हे कारण देऊ शकणार नाही. हे सध्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये. नंतर दुसऱ्या टप्प्यात ‘अंतर्नाद’मध्ये आलेला ‘बंद करा ही समाजसेवेची दुकानदारी’ या शरद जोशींच्या दीर्घ लेखासारखे लेख, वेगवेगळ्या विषयांवरचे परिसंवाद (उदा. ‘साहित्यिक आणि लोकशाही शासन संस्था’, ‘राजस’ दिवाळी अंक, १९७७ ), मुलाखती/ कथाकथन/ अभिवाचनाच्या ध्वनीफिती असे वेगवेगळे साहित्य प्रकार a-la-cart स्वरूपात उपलब्ध करून देता येतील. हवा असलेला प्रकार वाचक डाऊनलोड करून घेऊ शकतील. तसेच वाचकांस ‘अनुभवकथन’सारख्या एखाद्या विशिष्ट लेखन प्रकाराचे सभासदत्व हवे असल्यास तसेही करता येईल. एखाद्याला जुन्या अंकातला लेख हवा असल्यास तो उपलब्ध करून देता येईल.. करता येण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, केवळ घेणाऱ्याची इच्छा आणि देणाऱ्याची क्षमता या दोन्ही गोष्टींचा मिलाफ घडून यायला हवा. याआधीही प्रयत्न झालेत, परंतु ‘पुनश्च’ एखादा प्रयत्न हवा.
◊ ◊ ◊
अधिक माहितीसाठी पुनश्चच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
लोकसत्तेच्या अंकातील मूळ लेखाचा दुवा : पुनश्च! (ले० किरण भिडे)
.
मराठी वाचनप्रेमींनी हा लेखदेखील अवश्य वाचावा. –}} मराठीमध्ये बोलणारी पुस्तके – एक अभिनव उपक्रम
– अमृतयात्री परिवार
.
Tags: AUTHOR, अभिजात, पुस्तके, मराठी, लेख, लेखक, लेखन, वाचक, वाचन, संस्कृती, साहित्य, BOOKS, CLASSICAL,LITERATURE, MARATHI, READING, WRITER, WRITING
.