दरवर्षी मराठी-भाषा-दिन ह्या एकाच दिवशी अचानक मराठी माणसाचा मायबोलीबद्दलचा अभिमान उफाळून येतो...
पण माझ्याच राज्यात, माझ्याच गावात, मी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये साधे दैनंदिन व्यवहारही करू शकत नाही, घराबाहेर मला माझी भाषा फारशी ऐकूच येत नाही, फारशी कुठे वाचायला मिळत नाही, उलट कुठे मराठीमध्ये बोलल्यास बाहेरील फालतू उपरे टॅक्सी-रिक्षावाले किंवा फेरीवाले- दुकानदारसुद्धा माझ्याकडे तुच्छतेने पाहून “मराठी नही समझता. हिंदीमे बोलो !!” असे फर्मावतात, ह्याबद्दल मराठी माणसाला कसलीच खंत वाटत नाही.
.
‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय?
ले० सलील कुळकर्णी
[लेखकाने हे पत्र एका प्रसिद्ध मराठी वृत्तपत्राला लिहिले होते. ते प्रसिद्ध झाले नाही. पण मराठी माणसाच्या माहितीसाठी आणि त्याने अंतर्मुख होऊन विचार करावा ह्यासाठी अमृतमंथन ह्या मुक्त अनुदिनीवर ते चढवले आहे.]
.
दि० २७ फेब्रुवारी २०१७
प्रिय संपादक,
सप्रेम नमस्कार.
आज मराठी-भाषा-दिनाच्या निमित्ताने सर्वकडून शुभेच्छा ऐकू येत आहेत. पण ‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय? मराठी-भाषा-दिवस हा केवळ आपापसात पोकळ अभिमान व्यक्त करून फुकटच्या फुशारक्या मारायचा दिवस झालेला आहे. दरवर्षी मराठी-भाषा-दिन ह्या एकाच दिवशी अचानक मराठी माणसाचा मायबोलीबद्दलचा अभिमान उफाळून येतो. मग अत्यंत उत्साहाने दुसर्या मराठी माणसाकडे तो व्यक्त करायचा मात्र घराबाहेर पडल्याबरोबर शेपूट वळवून आत घालायची आणि हिंदीचे आणि इंग्रजीचे पाय चाटायचे, ही मराठी माणसाची मराठी-भाषा-दिवस साजरा करायची कल्पना !! पण माझ्याच राज्यात, माझ्याच गावात, मी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये साधे दैनंदिन व्यवहारही करू शकत नाही, घराबाहेर मला माझी भाषा फारशी ऐकूच येत नाही, फारशी कुठे वाचायला मिळत नाही, उलट कुठे मराठीमध्ये बोलल्यास बाहेरील फालतू उपरे टॅक्सी-रिक्षावाले किंवा फेरीवाले- दुकानदारसुद्धा माझ्याकडे तुच्छतेने पाहून “मराठी नही समझता. हिंदीमे बोलो !!” असे फर्मावतात, ह्याबद्दल मराठी माणसाला कसलीच खंत वाटत नाही.
“महाराष्ट्रातील मराठीजनांनी आपापसात काय हवी ती स्वाभिमानाची नाटकं करावी, पण प्रत्यक्ष समाजव्यवहारांत त्यांनी दुय्यम नागरिक म्हणूनच महाराष्ट्रात राहायला हवे” हा नियम आता महाराष्ट्रात सर्वमान्य झालेला आहे. रेल्वे आणि इतर सरकारी संस्थांतच नव्हे तर खासगी संस्थांत आणि कंपन्यांतदेखील मोठ्या संख्येने राज्याबाहेरच्या माणसांना आणून नोकर्या आणि कामाची कंत्राटे दिली जातात. तसे इतरत्र चालत नाही, फक्त महाराष्ट्रातच चालू शकते. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाप्रमाणे इतर राज्यांत स्थानिक भाषेत पाट्या, फॉर्म (प्रपत्रे) उपलब्ध करणार्या सर्वच बॅंकाना महाराष्ट्रात ती गोष्ट अशक्यच नव्हे तर कमीपणाची वाटते, कारण हिंदी ऐकल्यावर किंवा वाचल्यावर मराठीची गरजच नाही अशी त्यांचीच नव्हे तर मराठी माणसांचीही खात्री झालेली असते. त्यामुळे सामान्यजनांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातील लोकांना नेमण्यापेक्षा उर्वरित भारतातून आपापल्या पित्त्यांना नेमून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे आणि मराठी माणसाला मात्र उपाशी ठेवणे, हे सहजशक्य होते.
गेल्या पन्नास वर्षांत विदर्भाचे हिंदीकरण पूर्ण झाल्यावर आता लवकरच तो महाराष्ट्रापासून तोडून ‘स्वतंत्र’ केला जाईल. ते यशस्वी झाल्यावर मग मुंबईची मनपा आणि महाराष्ट्राचे राज्यशासन अमराठी लोकांच्या हातात जाऊन पुढील काही वर्षांत मुंबईलादेखील ‘स्व-तंत्र’ करण्याचे प्रयत्न केले जातील. मध्यंतरीच्या काळात पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी शहरे हिंदीकरणाच्या रांगेत पुढे सरकत आहेतच. शेवटी हरयाणा आणि राजस्थान ह्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्राची भाषादेखील हिंदीची पूर्णतः उपभाषा/मांडलिकभाषा सिद्ध होईल आणि मग तिचेही हिंदीमध्ये विसर्जन केले जाईल आणि त्यांच्या भाषांप्रमाणे जनगणनेच्या वेळी मराठीभाषकांची संख्यादेखील हिंदीच्या भाषकसंख्येत जमा केली जाईल. अशा प्रकारे ह-रा-म ह्या तिन्ही राज्यांवरील हिंदीची सत्ता सफळसंपूर्ण होईल. त्याहून इतर राज्यांतील जनता मात्र अशा प्रकारे लाचार आणि न्यूनगंडग्रस्त नसल्यामुळे हिंदीला अधिक मांडलिक मिळण्याची शक्यता मात्र नाही.
तेव्हा मराठी-भाषा-दिनी मराठी माणसाने तोंडाने कितीही मराठीप्रेमाच्या बाता मारल्या तरी ह्या स्वाभिमानशून्य समाजाच्या नाड्या ज्यांच्या हातात आहे असे मराठीद्वेष्टे राजकारणी, उद्योगपती, सरकारी अधिकारी, नेते इत्यादी मंडळी आपल्याला मनातून छद्मीपणे हसतच आहेत, ह्याचे भान ठेवूनच त्याने निमूटपणे आपण मांडलिकाचे कर्तव्य चोखपणे बजावत राहायला हवे, हे अनिवार्य आहे.
आपला नम्र,
सलील कुळकर्णी
कोथरूड, पुणे.
………………..
हा संपूर्ण लेख पुढील दुव्यावरदेखील उपलब्ध आहे. –}} अमृतमंथन – ‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय?
प्रस्तुत लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील चर्चा चौकटीत अवश्य नोंदवाव्या.
– अमृतयात्री गट
.
‘स्थानिक मराठी माणसांचा मान राखणे’ ह्या विषयावरील खालील दुव्यांवरील लेखदेखील अवश्य वाचा.
स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे…. –}} http://wp.me/pzBjo-6W
परराज्यांतून येणार्या विद्यार्थ्यांना ‘तमिळ’ शिकावीच लागेल! – मुख्यमंत्री जयललिता –}} http://wp.me/pzBjo-K4
तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली (प्रेषक: श्री० आरोलकर) –}} http://wp.me/pzBjo-gw
’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता) –}} http://wp.me/pzBjo-ad
इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९) –} http://wp.me/pzBjo-8x
हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९) –} http://wp.me/pzBjo-9W
एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) –} http://wp.me/pzBjo-d8
.