मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. उद्याच्या ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्त विशेष लेख.
टाहो
ले० सई परांजपे
(लोकसत्ता, लोकरंग, दि० २६ फेब्रुवारी २०१७ ह्या अंकातील लेख साभार पुनःप्रसिद्ध)
‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.
गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबा करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘shop’ या शब्दावरून ‘shoppe’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.
सई परांजपेंचा पूर्ण लेख पुढील दुव्यावर वाचा. –}} टाहो (ले० सई परांजपे)
.
लोकसत्तेतील मूळ लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
http://www.loksatta.com/lekha-news/marathi-language-day-marathi-language-marathi-word-1419390/
.
प्रस्तुत लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील चर्चा चौकटीत अवश्य नोंदवाव्या.
– अमृतयात्री गट
.
मातृभाषा मराठीच्या संबंधातील आणखी काही लेख खालील दुव्यांवर वाचू शकता.
मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर) –} http://wp.me/pzBjo-oB
महेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण –} http://wp.me/pzBjo-Gs
’मायबोली मराठी भाषा दिन’ व ’मायबोली मराठी सप्ताह’ साजरा करण्यासाठी कार्यक्रम (वृत्त व आवाहन) –}} http://wp.me/pzBjo-hp
भाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक) –} http://wp.me/pzBjo-GQ
इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९) –} http://wp.me/pzBjo-8x
एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) –} http://wp.me/pzBjo-d8
मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर) –}} http://wp.me/pzBjo-fD
Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8
समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का? (ले० उन्मेष इनामदार) –} http://wp.me/pzBjo-wD
स्वा० सावरकर आणि ’महापौर’चा जन्म (दै० सामना दि० २२ ऑक्टोबर २०१०) –}} http://wp.me/pzBjo-wQ
.
मी आपला अभिप्राय लिहूच शकलो नाही. हा कुणाचा दोष आहे? पुढं टंकलंच जात नाही. काय करू? लिखिकेनं पहिल्याच वाक्यात घातलेला कमअस्सल शब्द कुठल्या भाषेतला आहे? यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरे जनाः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥ स्वतःपासून सुरुवात करायला हवी. अन्यथा ते परोपदशे पांडित्यं होतं.
मनोहर