गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

पुष्कळांना गोहत्याबंदीच्या मागणीमागं काही तरी भाबडेपणा असला पाहिजे असं वाटत असतं. आणि ती मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून आल्यानं स्वतःला प्रतिष्ठित मानणारे काही डुड्ढाचार्य/र्या तिची टिंगलटवाळी करीतही असतात. त्यामागं काही तरी राजकीय हेतू असणार, अशीही शंका काहींना असते. काहींना हा व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला वाटतो. गोमांस निर्यातीतून मिळणारा पैसा घटेल, याचीही चिंता कित्येकजण, व्यक्त करीत असतात. काहींना ती हिंदूंची अंधश्रद्धा वाटते. त्याकरता त्यांना स्वा. सावरकरांच्या मतांचा आसरा घेण्यालाही लाज वाटत नाही. प्रस्तुत प्रश्नाचा विचार धार्मिक दृष्टीनं न करता आर्थिक दृष्टीनं केला पाहिज, असाही कैक जणांचा आग्रह असतो. मुसलमानांचा पुळका येणारे हिंदू तर आपल्या देशात पोत्यानं आहेत. समाजवादी, कम्यूनिस्ट, काँग्रेस, पुरोगामी. म्हणून तर आता ह्या दाव्याच्या निमित्तानं स्पष्ट झालेली आर्थिक बाजूच आपण पाहू म्हणजे झालं.

आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही. पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची. आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे. इंग्रजीत एक प्रसिद्ध विधान (म्हण) आहे.  If you can’t convince, confuse. लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्यावा.

मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही. पण, डॉ. राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं. मूळ निवाडा पुष्कळ मोठा आहे. पण, सांस्कृतिक वार्तापत्र नावाच्या पाक्षिकाच्या संपादकांनी (श्री. मिलिंद शेटे) तो थोडक्यात दिला आहे. श्री शेटे यांचे आभार मानून तुमच्याकरता तो इथं सादर करीत आहे. हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

श्री. राजीव दीक्षित (आता कै.) इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते. यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील. एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वौच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल.

– प्रा० मनोहर राईलकर

गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

(ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र)

काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.) ह्या सर्वांतून प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते. ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले.

१-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ (कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले.

कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते., सोली सोराबजी २० लक्ष, कपिल सिब्बल २२ लक्ष, महेश जेठमलानी (राम  जेठमलानींचे पुत्र) ३२ ते ३४ लक्ष. हे कसायांच्या बाजूने उभे होते. राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता. कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता. दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.” न्यायाधीशांनी विचारले, “आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.” त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली.

गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते.

कसायांचे दावे (१) गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात करतो. (२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय. (३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार? (४) गायींमुळं परकीय चलनही मिळते. (५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.” दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे. आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल.

(अपूर्ण…)

.

प्रस्तुत संपूर्ण लेखाची पीडीएफ प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. –} अमृतमंथन_गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

◊ ◊ ◊

.

ह्या न्यायालयीन प्रकरणाबद्दलचे श्री० राजीव दीक्षित ह्यांचे संपूर्ण भाषण खालील दुव्यावर ऐकू शकता. — } https://www.youtube.com/watch?v=i7xaTCfA7js

मध्ययुगीन काळात भारतातील मुसलमान आणि इतर सत्ताधीशांनीही गोहत्येस उत्तेजन दिले नाही, किंबहुना अनेकांनी गोहत्येवर बंदीच घातली. पहा – Cattle slaughter in India — } Cattle slaughter in India

पुढील लेखही अवश्य वाचून पहा. Was Lord Ram Really Born? A Chronological Study –} Was Lord Ram Really Born? A Chronological Study

.

10 thoughts on “गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

    • प्रिय श्री० विजय आजगावकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. आपले विधान अत्यंत उचित आहे.

      हा लेख भारतीय जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटल्यामुळेच आम्ही त्याला इथे पुनःप्रसिद्धी दिली.

      आपण ही आपल्या परीने तो आपल्या आप्तमित्रांना वाचावयास द्यावा.

      त्या लेखाखाली दिलेले दुवे उघडून इतर लेखांवरही दृष्टी फिरवावावी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. गायींच्या शेण आणि गोमुत्राची जी महती आपण सांगितली आहे, त्याचे इकॉनॉमिक्स मांडले आहे ते केवळ अशा गायींना एकत्रितपणे गोठ्यात ठेवले तरच शक्य आहे. वस्तुस्थिती अशी आहे की गायी भाकड झाल्या की न मारण्याच्या श्रद्धेपोटी त्या सोडून दिल्या जातात आणि मग त्या रानोमाळ खाद्य शोधत इतस्तत: फिरत रहातात. त्यांच्या खुरांच्या खाली वनस्पती नष्ट होत जातात, मातीवरचे आच्छादन निघून गेल्यामुळे मातीची अपरिमित धूप होऊ लागते, उन्हाच्या कडाक्यात मातीमधला ओलावा निघून जाऊन वार्‍याबरोबर धुळीच्या स्वरुपात ती उडून जाते आणि डोंगर उघडे बोडके होतात. पुढच्या पावसाळ्यात त्याच्यावर गवताची काडीही उगवत नाही. उंचावर जाऊन परिसरातले डोंगर पहा एकमेकींना छेद देणा‍र्‍या गुरांच्या वाटांनी डोंगर भरून गेलेला दिसतो. शंकरपाळ्यांसारखी वाटांची नक्षी डोंगरावर दिसते ती त्यामुळेच.

    एकत्रितपणे गोमूत्र आणि शेण गोळा करण्यासाठी गुरांना एकत्र ठेवावे लागेल जे आपल्याकडे कधीच घडत नाही कारण भाकड गाईला कोण चारा घालेल? नाहीतर तुम्ही खताची जी आकडेवारी उभी केली आहे ती विचारात घेता आतापर्यंत भारतभर सेंद्रिय शेती दिसायला पाहिजे होती. धार्मिक भाबडेपणा बरोबरच वैज्ञानिक भाबडेपणालाही सध्या जोर आलेला आहे तो असा! भटकणार्‍या बेवारस गुरांमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते आहे. गुरांची संख्या आणि त्यांची उत्पादकता यांचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. सद्यस्थितीमध्ये उत्पादकतेपेक्षा नुकसानच जास्त दिसते आहे. गुरांच्या अतिसंख्येमुळे मिथेन वायूही वातावरणात प्रमाणाबाहेर मिसळला जातो. गाय ही पाळीव प्राणी म्हणून लोकप्रिय झाली ती तिच्या उपयुक्ततेमुळेच ना? माणसाने पाळल्यामुळे, संरक्षण दिल्यामुळे तिची संख्या वाढली; तर ती आटोक्यात ठेवणे आणि तिची उपयुक्तता नुकसानीत जात नाही ना हे पहाणे हेही माणसाचेच कर्तव्य आहे. म्हणूनच “गाय हा एक उपयुक्त पशू आहे” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विधानाचा योग्य तो अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. त्या विचाराला सोयीस्कर बगल देऊन कुठलातरी छुपा हेतू साध्य करण्याची व्यर्थ धडपड कुणीच करू नये.

    • प्रिय श्रीमती भारती केळकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण प्रस्तुत लेख अत्यंत काळजीपूर्वक वाचून, त्यावर विचार करून, आपले आक्षेप नोंदवलेले आहेत, हे स्पष्टच आहे. त्याबद्दल आपले कौतुक, अभिनंदन करावेसे वाटते. बुद्धिमान आणि विद्वान व्यक्तींचे, मग त्यांचे विचार पटो अथवा न पटो, कौतुक केलेच पाहिजे. आपले पत्र आपल्याप्रमाणेच इतर वाचकांच्या मनातील शंकांबद्दल विचार इथे मांडण्यास कारणीभूत झाले, हे त्यातील मुख्य फलित होय. विचारपूर्ण चर्चेतूनच (आणि मग त्यातून निष्पन्न होणार्या तत्त्वांनुसार कृतीमुळेच) माणूस, समाज, देश, जग प्रगती करीत असते. तेव्हा आपल्या ह्या पत्राबद्दल आभार.

      प्रथम खाली आम्ही आमचे सर्वसामान्य निवेदन मांडले आहेत आणि त्यापुहे प्रा० मनोहर राईलकर ह्यांनी आपल्या प्रत्येक आक्षेपास दिलेले उत्तर सादर केले आहे.

      आमचे (अमृतयात्री गटाचे) निवेदन :

      १. गाय हा मानवासाठी, निदान आपल्या देशासाठी, त्याच्या जन्मभर उपयुक्त / उपकारक ठरणारा प्राणी आहे, हे एकदा लक्षात आले की त्याच्या पालन-पोषणासाठी योग्य ते उपाय करणे हे अनुषंगाने प्राप्त होतेच. मात्र सर्वच उपाय शेतकरी मंडळी व्यक्तिगत पातळीवर करू शकत नाहीत, हेदेखील सत्यच आहे. तशी अपेक्षाही करणे योग्य नव्हे. मात्र आज शेतीसाठी आणि इतर अनेक प्रकारच्या उद्योग-व्यवसाय-रोजगार-इत्यादी गोष्टींच्या बाबतीतही राज्यशासन आणि केंद्रशासन वेळोवेळी, विविध प्रकारे नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे साहाय्य करीत असते. शिवाय गायीचे रक्षण-पालन-पोषण करणे हे केवळ नागरिकांचेच नव्हे तर राज्यशासनाचे आणि केंद्रशासनाचेही सांविधानिक कर्तव्य (constitutional duty) आहे, हे प्रस्तुत निवाड्यात न्यायाधीशांनी अत्यंत निस्संदिग्धपणे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे जिथे जिथे आवश्यक आहे तिथे दोन्ही पातळींवरील शासनांनी आपापला सहभाग आणि साहाय्य देऊ करणे, त्यांचे अनिवार्य कर्तव्यच आहे. तसे घडल्यास आपल्या मनातील बहुतेक सर्व शंकांचे ढग दूर होतील. अर्थात इतर अनेक विषयांप्रमाणे भारतातील सरकारे आपली कर्तव्ये किती सुक्षमतेने (efficiently) पार पाडतील ह्याबद्दल शंकेची पाल आपल्या सर्वांच्याच मनात चुकचुकत राहिली, तर ते अस्वाभाविक नाही.

      २. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणामागची पार्श्वभूमी (background of the court case) प्रथम नीट लक्षात घेऊ.

      अर्जदार होती राजीव दीक्षित नामक सामान्य पण अत्यंय उच्चशिक्षित व्यक्ती. त्यांनी एम.टेक.ची पदवी आय.आय.टी कानपूरमधून प्राप्त केली होती आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली होती. ते अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशासाठी व्यतीत केले. (संदर्भ – https://mr.wikipedia.org/s/610)

      बचाव पक्ष होता कुरेशी नामक कसायाचा व्यवसाय करणारी मुसलमानांतील एक जमात.

      अर्जदाराचा अधिवक्ता (वकील) – अर्जदाराला महागातील प्रसिद्ध अधिवक्त्यास (एकाही) आपल्या बाजूने उभे करणे शक्य नसल्यामुळे शेवटी न्यायालयाने जो अधिवक्ता दिला, तो त्याने स्वीकारला.

      बचावपक्षाचे वकील – सोली सोराबजी, कपिल सिब्बल, महेश जेठमलानी, इत्यादी. ही मंडळी आज न्यायालयातील आपल्या प्रत्येक अवतरणास (appearance) पाच ते दहा लाख रूपये घेतात. इतर शुल्क वेगळे. त्यांच्या दृष्टीने हे प्रतिष्ठेचे प्रकरण असल्यामुळे त्यांनी इतरही अधिवक्त्यांची आणि जगभरातील विविध विषयतज्ज्ञांची मदत घेतली असणारच.

      शिवाय ह्या प्रकरणाच्या बर्याचशा कालखंडात तथाकथित सेक्यूलरवादी कॉंग्रेसचेच शासन असल्यामुळे त्यांच्या अधिवक्त्यांनीदेखील नेहरू आणि पवारांच्या तत्त्वाचाच पाठऔरवठा केला असणार, हेदेखील समजू शकते.
      न्यायदानाची जबाबदारी – सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांचे घटनापीठ. असे घटनापीठ फारच कमी प्रकरणांत नेमले जाते. प्रस्तुत प्रकरण दूरगामी परिणाम असणारे, घटनेचे विशेष निरूपण (interpretation) करणारे असल्यामुळेच त्याला एवढे महत्त्व दिले गेले.

      ३. कसाई लोक आपल्या व्यवसायासाठी कोंबड्या, बकर्या इत्यादी प्राण्यांचीही कत्तल करतात. भारतात मांसाहारी व्यक्तींच्या आहारात इतर प्राणी आणि मासे ह्यांच्या मानाने गायीचे मांस फारच कमी प्रमाणात समावेश असतो. कसायांनी इतर प्राण्यांची कत्तल करण्यावर प्रस्तुत निवाड्याने निर्बंध घातलेले नाहीत. कुरेशी लोक डुकराचे मांस मात्र विकत नाहीत कारण त्याला त्यांच्या धर्मात निषिद्ध मानले आहे.

      ४. ह्या प्रकरणात प्रत्येक पुरावा, प्रत्येक तर्कवाद, प्रत्येक संदर्भ काळजीपूर्वक पडताळला गेला. आणि मगच त्या सात जणांच्या घटनापीठाने वरीलप्रमाणे ऐतिहासिक निवाडा दिला. असा निर्णय केवळ भावनेच्या भरात, अज्ञानाच्या आधारे, बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून दिला असेल अशी शंकादेखील मनात आणणे म्हणजे भारतदेशाच्या न्यायसंस्थेचा, राज्यघटनेचा आणि देशातील प्रत्येक भारतीयाचाच अपमान ठरेल. त्यामुळे छुपा हेतू इत्यादी आरोप हेच कुठला तरी छुपा हेतू मनात ठेवून किंवा काही विशिष्ट राजकारण्यांच्या फूसलावणीमुळे केलेले असावेत, असेही कदाचित कोणी म्हणू शकेल. (तशी परिस्थिती नाही अशी आम्हाला आशा असली तरी वितंडवादात असे आरोप केले जातात.)

      ५. वरील प्रकरणात बहुधा सर्वच प्रकारच्या बाबींवर सविस्तर चर्चा झालेली आहे. तरीही कोणाला काही नवीन बाबी सापडल्या असतील तर त्यांनी कसायांच्या कुरेशी जमातीच्या संघटनेशी संपर्क साधून हे प्रकरण पुनर्विचारासाठी ९ किंवा ११ न्यायाधीशांच्या घटनापीठाने विचार करण्यासाठी अर्ज करावा. तसे होऊन त्याचा निवाडा कुरेशी मंडळींच्या बाजीने लागल्यास ह्या प्रकरणात संबंधित व्यक्तीला काही कोटी रुपये सहज मिळवता येतील. आम्ही सामान्य माणसे शुभेच्छा देण्याहून आणखी वेगळे काय करू शकतो?

      ६. प्रत्यक्ष श्री० राजीव दीक्षित ह्यांचे ह्या संबंधातील पुढील दुव्यावरील निवेदन अवश्य ऐकावे. –} https://www.youtube.com/watch?v=i7xaTCfA7js

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      —-

      प्रा० मनोहर राईलकरांनी श्रीमती भारती केळकर ह्यांच्या विविध आक्षेपांस दिलेले मुद्देसूद उत्तर :

      आक्षेप (१) – गायींच्या शेण आणि गोमूत्राची जी महती आपण सांगितली आहे, त्याचे इकॉनॉमिक्स मांडले आहे, ते केवळ अशा गायींना एकत्रितपणे गोठ्यात ठेवले तरच शक्य आहे.

      उत्तर – मी कोणतीही महती सांगितली नाही. तीन विषयांत अभियंता असलेल्या, परंपरेनं शेतकरी असलेल्या आणि प्रत्यक्ष अभ्यास केलेल्या राजीव दीक्षित यांनी सर्वोच्च न्यायालयापुढं ते मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मा. न्यायाधीशांनी तर काही बाबी प्रत्यक्ष पडताळून पाहिल्या आणि मग त्यांना ते पटले. खात्री करून घेऊन नंतरच त्यांनी आपला निकाल दिला आहे. त्यामुळं आता असल्या बाबींवर आपण चर्चा करण्याचा काही लाभ नाही. कदाचित तो न्यायालयाचा अपमानही ठरू शकेल; मात्र, मी विधि विषयातील जाणकार नाही.

      अमृतयात्री – आमच्या वरील निवेदनातील पहिलीच बाब पहा.

      आक्षेप (२) – वस्तुस्थिती अशी आहे की गायी भाकड झाल्या की न मारण्याच्या श्रद्धेपोटी त्या सोडून दिल्या जातात आणि मग त्या रानोमाळ खाद्य शोधत इतस्तत: फिरत रहातात. त्यांच्या खुरांच्या खाली वनस्पती नष्ट होत जातात, मातीवरचे आच्छादन निघून गेल्यामुळे मातीची अपरिमित धूप होऊ लागते,उन्हाच्या कडाक्यात मातीमधला ओलावा निघून जाऊन वाऱ्याबरोबर धुळीच्या स्वरूपात ती उडून जाते आणि डोंगर उघडे बोडके होतात. पुढच्या पावसाळ्यात त्याच्यावर गवताची काडीही उगवत नाही. उंचावर जाऊन परिसरातले डोंगर पहा एकमेकींना छेद देणा‍र्याज गुरांच्या वाटांनी डोंगर भरून गेलेला दिसतो. शंकरपाळ्यांसारखी वाटांची नक्षी डोंगरावर दिसते ती त्यामुळेच.

      उत्तर आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला इतका अनुभव असेल तर त्यांनीच त्यावर काही उपाय सुचवायला हवेत.

      अमृतयात्री – आमच्या वरील निवेदनातील पहिलीच बाब पहा.

      आक्षेप (३) – एकत्रितपणे गोमूत्र आणि शेण गोळा करण्यासाठी गुरांना एकत्र ठेवावे लागेल. ते आपल्याकडे कधीच घडत नाही कारण भाकड गाईला कोण चारा घालेल? नाहीतर तुम्ही खताची जी आकडेवारी उभी केली आहे ती विचारात घेता आतापर्यंत भारतभर सेंद्रिय शेती दिसायला पाहिजे होती.

      उत्तर – हे करायला हवं, हे तर निश्चितच. ते घडत नाही, हे तर खरंच आहे. म्हणून मूळ उद्देश चुकीचा ठरत नाही. निरिंद्रिय खतामुळंच तर शेतीचा कस कमी झाला आहे, असं आयआरएसच्या सांगण्यावरून दिसतंच. (आक्षेप ४ वरील उत्तर पाहा.) केवळ टीका करून काय उपयोग? इतकी माहिती असेल तर त्या दृष्टीनं काही सुचवायला हवे होते.

      आक्षेप (४) – धार्मिक भाबडेपणा बरोबरच वैज्ञानिक भाबडेपणालाही सध्या जोर आलेला आहे तो असा! भटकणाऱ्या बेवारस गुरांमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते आहे. गुरांची संख्या आणि त्यांची उत्पादकता यांचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. सद्यस्थितीमध्ये उत्पादकतेपेक्षा नुकसानच जास्त दिसते आहे. गुरांच्या अतिसंख्येमुळे मिथेन वायूही वातावरणात प्रमाणाबाहेर मिसळला जातो.

      उत्तर – जी गोष्ट आय.आर.एस.च्या वैज्ञानिकांनी आपल्या प्रयोगशाळेत सिद्ध केली तिला वैज्ञानिक भाबडेपणा असं म्हणणं निव्वळ हेकेखोरपणा ठरेल. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्व संबंधितांनी फसवलं, असा अनुचित अर्थ त्यातून अप्रत्यक्षपणं ध्वनित होतो. गाय कापणं हा आमचा धार्मिक अधिकार आहे, असं सांगून तसा प्रयत्न प्रतिपक्षानंच तर केला होता. आणि न्यायाधीशांनी वेळ देऊनही त्यांना तसं सिद्ध करता आलं नाही, हेही प्रस्थापित झालं आहे. त्यानंतरच न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला आहे. म्हणजे प्रतिपक्षानंच नायायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, असं ठरतं.

      अमृतयात्री – आमच्या वरील निवेदनातील बाब क्र० ४ आणि ५ पहा.

      आक्षेप (५) – गाय ही पाळीव प्राणी म्हणून लोकप्रिय झाली ती तिच्या उपयुक्ततेमुळेच ना? माणसाने पाळल्यामुळे, संरक्षण दिल्यामुळे तिची संख्या वाढली; तर ती आटोक्यात ठेवणे आणि तिची उपयुक्तता नुकसानीत जात नाही ना हे पहाणे हेही माणसाचेच कर्तव्य आहे. म्हणूनच “गाय हा एक उपयुक्त पशू आहे” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विधानाचा योग्य तो अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे.

      उत्तर – तेच तर राजीव दीक्षितांनी सिद्ध केलं. त्यांच्या मांडणीत उपयुक्ततेचाच तर विचार झाला आहे. तोच तर त्यांचा मुख्य विचार होता. त्यांनी ते कल्पनेबाहेर सिद्ध केलं. मा. न्यायाधीशांना ते मान्य झालं, तेव्हाच तर त्यांनी निकाल दिला. पुन्हा गोवंशाची उपयुक्तता अगदी त्याच्या मरणापर्यंत असते, हे तर कैक सहस्र वर्षांच्या अनुभवांतीच सिद्ध झालं आहे. ६८ वर्षं होऊन गेली तरी आपल्यालाच ते कळत नाही. त्याकरताच तर घटनाकारांनीही गोहत्याबंदीचा विषय घटनेतही अंतर्भूत केला आहे. आणि केवळ गायच कशाला, सर्व गोवंशच उपयुक्त आहे, हेच राजीव दीक्षितांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मा. न्यायाधीशांपुढं सिद्ध केलं.

      आक्षेप (६) – त्या विचाराला सोयीस्कर बगल देऊन कुठलातरी छुपा हेतू साध्य करण्याची व्यर्थ धडपड कुणीच करू नये.

      उत्तर (अ) – मी स्वतः तर कुठल्याही राजकीय पक्षाचा अगदी एक दिवससुद्धा आणि प्राथमिक सभासदही नव्हतो. आणि आता माझं वय ८६ वर्षांच्या वर आहे. तेव्हा इथून पुढंही माझा छुपाच काय, कोणताच हेतू असण्याचा संभव नाही. तसं आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं असेल तर माझ्यावर अकारण हेत्वारोप करून त्या विषय सोडून माझा अकारण अपमान करीत आहेत, असं मला स्पष्टपणं वाटतं. त्याकरता कोणतीही सबब न सांगता त्यांनी विनाअट माझी क्षमा मागणं इष्ट होईल. माझी तशी मागणीही आहे.

      (आ) राजीव दीक्षितांचा तर छुपा वा उघड हेतू न्यायाधीशांनाही दिसला नाही. आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला दिसला असला तर तो सांगावा आणि आता तर ते दिवंगत आहेत. एकूणच छुपा हेतू असल्याचा आरोप अपमानकारक ठरतो. हेतू सिद्ध तरी करावा अन्यथा क्षमायाचना करावी. तर्क संपला की अशिक्षित मनुष्य हातघाईवर येतो आणि सुशिक्षित मनुष्य शिव्यागाळी करू लागतो, हेच इथं प्रस्थापित होत आहे.
      अमृतयात्री – आमच्या वरील निवेदनातील चवथी बाब पहा.

      समारोप: (अ) गाय कापण्याला मुस्लीम धर्माची आज्ञा आहे, हे तर असत्यच ठरलं. तेव्हा असलाच तर प्रतिपक्षाचाच काही तरी छुपा हेतू असण्याचा संभव. आणि ते तर सिद्धच झालं.

      (आ) खरं तर एकदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला म्हणजे तो निर्बंध होतो. तिथं कुणीही काहीही करू शकत नाही. केवळ पुनर्विचार करण्याकरता याचिका दाखल करून प्रयत्न करता येतो. जर त्या निर्णयालाच आक्षेप असेल आणि आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीची तशी इच्छा असेल तर तसा प्रयत्न करायला माझी आडकाठी असण्याचं कारण नाही.

      (इ) गोहत्याबंदी हा विषय घटनेनंच मान्य केला आहे. तरीही इतक्या वर्षांत त्यावर कृती का केली नाही असा प्रश्न विचारणं अधिक वाजवी ठरलं असतं.

      (ई) गोहत्याबंदीमुळं देशाची आर्थिक अवस्था लक्षणीयरीत्या सुधारणार आहे, हे तर न्यायालयातच सिद्ध झालं आहे. अशा परिस्थितीत आत्ता दिसणाऱ्या, पुढं येणाऱ्या अडचणींवर उत्तर शोधणं हेच रास्त मार्ग ठरतील. आणि त्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणं, आवश्यक असेल तर आपल्या खाण्याच्या सवयींना मुरड घालणं, हेच प्रत्येक राष्ट्रभक्ताचं आद्य कर्तव्य ठरतं. अन्यथा, स्वातंत्र्याकरता आपल्या संसारावर निखारे ठेवणाऱ्या देशभक्तांचा (स्वा. सावरकरही धरून) तो अधिक्षेप ठरेल. आणि त्यांच्याबद्दल दाखवण्यात येत असलेला आदरभाव केवळ ढोंग ठरेल.

      (उ) आजपर्यंतच्या संवैधानिक कर्तव्यांत गायीचे रक्षण ह्याचीसुद्धा संवैधानिक कर्तव्य म्हणून भर घातली गेली आहे.

      – प्रा० मनोहर राईलकर

    • प्रिय श्री० संजय प्रभाकर पारकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. आपले विधान अत्यंत उचित आहे. गाय हा प्राणी केवळ धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक भरभराटीसाठीदेखील अत्यंत आदरणीय आणि पवित्र आहे. म्हणूनच गाईचे रक्षण-पालन-पोषण करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

      त्या लेखाखाली दिलेले दुवे उघडून त्या इतर लेखांवरही दृष्टी फिरवावावी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अरविंद कामेरकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      पत्राबद्दल आभार. आपण श्री० राजीव दीक्षित ह्यांचे यूट्यूबवरील व्याख्यान (दुवा दिलेला आहे) ऐकलेत काय? प्रस्तुत लेख आणि ते व्याख्यान मिळून सर्वच महत्त्वाच्या बाबी त्यात समाविष्ट केलेल्या असतील असे वाटते. त्यातून मूळ (६६ पानी) निर्णयपत्र पाहायचे असल्यास लेखात उल्लेखलेल्या http://www.supremecourtcaselaw.com ह्या दुव्यावर पाहावे. आवश्यक वाटल्यास एखाद्या अधिवक्यामित्राची किंवा कायद्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याची मदत घ्यावी लागे. आम्ही तसा प्रयत्न केलेला नाही. काही विशेष उल्लेखनीय बाबी आढळल्यास त्या सर्वांपुढे ठेवाव्या.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. किसी प्रकार से हम कीटनाशक भी खुद तैयार कर सकते क्या हैं ? सदरचे लेख मराठी भाषेत मिळावे कारण आँकड़ा व बेशम झाडाचा मराठीत अर्ध काय?माहिती मिळावी

    • प्रिय श्री० संजय इंदलकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सूचनेबद्दल आभार. परंतु अशा शास्त्रीय विषयांवरील लेखन त्या त्या विषयात तज्ज्ञ असणार्‍या व्यक्तींकडूनच करून घेणे इष्ट असते. आमच्या पाहण्यात तरी तशी कोणी तज्ज्ञ व्यक्ती नाही.

      आपल्या अमृतमंथन अनुदिनीच्या उद्दिष्ट विषयांशी संबंधित लेखनाला इथे प्रसिद्धी देण्याबद्दल निश्चित विचार होईल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s