आर्यांनी भारतावर आक्रमण करून तो पादाक्रांत केला, असा जावईशोध ब्रिटिशांनी स्वतःच्या आक्रमणाच्या समर्थनार्थ लावला. त्या काल्पनिक उपपत्तीच्या (theory) द्वारे पाश्चात्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्या खोडसाळ उपपत्तीचे सांगोपांग खंडन करण्याकरता डॉ० डेव्हिड फ्रॉली ह्यांनी १९९४ साली एक पुस्तक लिहिले. नाव “The Myth of the Aryan Invasion of India”. प्रकाशक “Voice of India, N. Delhi” जेमतेम ५६ पानांची ही पुस्तिका संशोधनानं भरलेली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर भारतातील प्रत्येक देशभक्त नागरिकाला अभिमानास्पद वाटेल, असे आहे. प्रस्तुत पुस्तकातील शेवटच्या, म्हणजे समारोप-रूप छेदिकेचा हा स्वैर मराठी अनुवाद.
डॉ० डेव्हिड फ्रॉली ह्यांच्या पुस्तकाच्या ह्या निष्कर्षपर समारोपाच्या भागाचे मराठी भाषांतर खालील दुव्यावरही उपलब्ध आहे.
Amrutmanthan_आर्य आक्रमण-समारोप_डॉ० डेव्हिड फ्रॉली_प्रा० मनोहर राईलकर_150816
.
आर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप
(मूळ लेखक डेव्हिड फ्रॉली. मराठी अनुवाद प्रा. मनोहर रा. राईलकर)
(डेव्हिड फ्रॉली (David Frawley) हे एक अमेरिकन विद्वान असून हिंदुधर्माच्या प्रेमात पडून त्यांनी हिंदु धर्माचा स्वीकार केला. आणि वामदेवशास्त्री असं नवीन नावही घेतलं. वेदांचा सखोल अभ्यास केल्यामुळं त्यांना वेदाचार्य अशी पदवीसुद्धा मिळाली. खरं तर, त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आयुर्वेद होय. त्या व्यतिरिक्त त्यांच्या चिंतनात, वेद, प्राचीन इतिहास, पुरातत्त्वीय उत्खननातून सापडलेल्या पुराव्याच्या अध्ययनातून प्राचीन इतिहासाचं पुनरवलोकन, इत्यादि. अमेरिकेतील वेदांचा अभ्यास करणार्या संस्थेत सध्या ते प्राध्यापक आहेत.)
आर्य-आक्रमण सिद्धांताचे आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर कोणकोणते दुष्परिणाम झाले आहेत आणि होत आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच आक्रमण-सिद्धांताचा पुरस्कार करून त्यांनी काय काय साध्य केले हेही समजून घेतले पाहिजे.
(एक) ह्या सिद्धांतामुळे उत्तरेची आर्य संस्कृति आणि दक्षिणेची द्रविड संस्कृति असे (देशाचे) दोन (काल्पनिक) भाग पाडता आले. त्यातून परस्परांत शत्रुत्वाची भावना निर्माण करता आली. आणि हिंदूंमध्ये भेदभाव पेरता आला. आर्य आणि द्रविड नावाचे दोन भिन्न वंश असल्याची भावना वाढीस लावता आली. मात्र, प्रत्यक्षात, असे दोन भिन्न वंश असल्याचा कोणताही शास्त्रशुद्ध पुरावा नाही. पण, त्यातून उद्भवलेले ताणतणाव दुर्दैवाने आजही टिकून राहिले आहेत.
(दोन) भारतावर त्यांनी केलेल्या आक्रमणाच्या समर्थनाकरता त्यांना एक सबब मिळाली. नाही तरी पूर्वी आर्यांनीही भारतावर आक्रमण केले होतेच, असं म्हणून त्यांनी स्वतःच्या आक्रमणाचे समर्थन केले. त्याचप्रमाणे नंतर मुस्लीमांना आणि इतर आक्रमकांनाही ते आयतेच कारण मिळाले.
(तीन) वैदिक संस्कृतीचा उदय मध्यपूर्वेतील संस्कृतीनंतरचा असून ती त्याच संस्कृतीपासून जन्माला आली असेही प्रतिपादन करायला कारण मिळाले. भारताची प्राचीन संस्कृति एकसंध नसून ती अनेक संस्कृतींच्या संकरातून निर्माण झाली, असे प्रतिपादता आले, हडाप्पा संस्कृति कशी लुप्त झाली, हे वास्तव दाबून ठेवता आले. आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे तुकडे करून दाखवता आले. मध्यपूर्वेचे भौगोलिक सान्निध्य आणि बायबल व ख्रिस्ती संस्कृति यांच्यांतील संबंधांच्या मदतीने, हिंदु संस्कृतीचे मूळ रूप पाश्चात्त्य संप्रदाय आणि संस्कृति यांच्याखाली दाबून टाकता आले.
(चार) वास्तविक वेदांमध्ये गणित, ज्योतिषशास्त्र, यासंबंधीचे उच्च किंवा प्रगत पातळीवरचे पुष्कळ उल्लेख आढळतात. पण, आक्रमण-सिद्धांताच्या आधारे, भारतीय संस्कृति खरे म्हणजे ग्रीक संस्कृतीपासूनच उदयाला आली, असे प्रस्थापित करता आले. आणि त्यावरून मूळ भारतीय संस्कृति ग्रीस, युरोप, येथील संस्कृतींच्या तुलनेत किती हीन पातळीची आहे, असेही दाखवता आले.
(पाच) मार्क्सवाद्यांनाही ते एक आयतेच कोलीत मिळाले, परकीय ब्राह्मणांनी स्थानिक हीन जातींच्या शूद्रांवर हल्ले केले, असे प्रतिपादन करून त्यांना वर्गविग्रहाच्या तत्त्वाचा प्रसार करता आला, इतकेच काय, पण आक्रमण-सिद्धांताचा आधार घेऊन, परकीय ब्राह्मणांनी येथील स्थानिक मागास वर्गीयांवर आक्रमण केले व त्यांना शूद्र बनवले, असाही प्रचार करण्याचे त्यांचे कारस्थान आजही यशस्वी होत आहे.
आर्य-आक्रमण सिद्धांतामुळे केवळ वेदांनाच हीन लेखता आले, असे नसून पुराणांनाही क्षुद्र ठरवता आले. बुद्ध, कृष्ण यांच्याही पूर्वी होऊ गेलेल्या शेकडो पराक्रमी राजांच्या इतिहासावर काल्पनिक भारुडं असल्याचा आरोप करण्याचे कारस्थान साधता आले. हे राजे वेदपूर्व आणि अनार्य होते, असे “सिद्ध” करण्यात आले. वास्तविक भारतीय युद्धात भारतातल्या झाडून सार्या क्षत्रियांनी, वीरांनी, योद्ध्यांनी आपली उपस्थिति लावली होती. पण ते युद्ध फालतू चकमकींच्या पातळीवर ढकलण्याचे कारस्थानही साधता आले. म. व्यासांनी तिचे अकारण उदात्तीकरण केले, असा ठपकाही त्यांच्यावर ठेवता आला. थोडक्यात, आक्रमण सिद्धांताच्या आधारावर संपूर्ण हिंदु परंपरा आणि प्राचीन वाङ्मय यांना क्षुद्र ठरवता आले. या तत्त्वाच्या आधाराने हिंदूंच्या वेदपुराणांना भाकडकथांच्या पातळीवर आणि ऋषिमुनींच्या चरित्रांना कल्पित कथांच्या पातळीवर ढकलता आले.
ह्या सर्व खटपटी-लटपटींमागील उद्देश काय तर, हिंदूंच्या तुलनेत पाश्चात्त्य संस्कृति, संप्रदाय, राजकीय पद्धति कशा श्रेष्ठ आहेत, असे प्रतिपादन करून भारतावर सामाजिक, आणि आर्थिक दडपशाहीसुद्धा करता आली. यासाठी पदोपदी आक्रमण सिद्धांताचा आधार घेतला गेला. परिणामतः आपल्या ऋषिमुनींचे तत्त्वज्ञान, आपली सभ्यता व संस्कृति वगैरे सांगितल्या जातात तेवढ्या उच्च पातळीच्या नाहीत. असा हीनगंड हिंदूंच्या मनात रुजवता आणि वाढवता आला, आणि त्यांनाही आपल्या हीन संस्कृतीची लाज वाटू लागली. आपल्या सभ्यता आणि संस्कृतींना कोणताही शास्त्रीय अथवा ऐतिहासिक पाया नसून ती सारी काल्पनिक भारुडे आहेत, अशी भावना हिंदूंच्या अंतःकरणात दृढमूल झाली. सांस्कृतिक, सामाजिक, इत्यादि प्रगति प्रथम मध्यपूर्वेत, नंतर युरोपात होऊन मग तिचा प्रसार आपल्या देशात झाला असे त्यांनाच वाटू लागले. पाश्चात्त्यांच्या तुलनेत आपली संस्कृति सभ्यता क्षुद्र आहेत, याबद्दल त्यांची मनोमन खात्री होऊ लागली.
[टीप: आर्य टोळ्या टोळ्यांनी भारतावर आक्रमण करून आले, असं आजही काही विद्वान लिहितात, तेव्हा खेद होतो. मग त्यांना पत्र लिहिणं शक्य असेल तर मी लिहितो. आणि प्रस्तुत पुस्ताकाचा संदर्भ देऊन स्वतःच्या ऐतिहासिक कल्पना सुधारून घेण्यास सुचवतो. अनुवादक.]
पण, खरे तर ह्या दृष्टिकोनाला शास्त्रीय अथवा पुरातत्त्वीय संशोधनाचा काडीचाही आधार नाही. त्यातून केवळ सांस्कृतिक साम्राज्यवादच डोकावतो. हिंदूंना हीन लेखायचे आणि त्यांच्यांत नाना प्रकारचे भेद वाढवायचे. “फोडा आणि झोडा” ही जी कुटिल नीति इंग्रजांनी आपल्या राजकीय आक्रमणाच्या समर्थनाकरता पसरवली होती तीच पाश्चात्त्य विद्वानांनी वेदवाङ्मयाच्या बौद्धिक क्षेत्रातही अवलंबली.
कहर म्हणजे वस्तुनिष्ठ आणि प्रत्यक्ष पुरातत्त्वीय संशोधनाच्या, शास्त्रशुद्ध आधारांच्या आणि पुराव्यांच्या साह्याने ज्यांनी सरस्वती संस्कृतीचा मागोवा घेतला आणि आक्रमण सिद्धांताला आव्हान दिले, त्यांच्यावरच, दुर्दैवाने राजकीय हेत्वारोप करण्यात आला. तोसुद्धा कुणाकडून? स्वतःचाच राजकीय हेतु साधण्याकरता आक्रमण सिद्धांताचे कातडे ज्यांनी सातत्याने पांघरले त्यांनी, म्हणजे भारतातल्याच मार्क्सवाद्यांनी! गंमत म्हणजे, भारतात बहुसंख्येने नांदणार्या हिंदूंना अभिमान वाटावा असा सज्जड पुरावा ज्यांनी पुढे आणला त्यांचीच, मार्क्सवाद्यांनी जातीय म्हणून हेटाळणी केली.
सारांश, आक्रमण-सिद्धांताचा अवलंब करण्यामागे कोणतेही वाङ्मयीन वा पुरातत्त्वीय कारण नसून केवळ राजकीय आणि धार्मिक स्वार्थ हे एकमेव कारण होते. हे करण्याकरता चिकित्सक बुद्धीऐवजी स्वार्थी पूर्वग्रहांचाच आधार घेण्यात आला. होय, हे पूर्वग्रह, कदाचित, जाणून बुजून करून घेतलेले नसतीलही. ज्या राजकीय किंवा पंथनिष्ठ विचारांचा मार्ग त्यांनी वर्षानुवर्षे केला होता, त्यांच्या प्रभावामुळे स्वच्छ आणि स्वतंत्र विचार करण्याच्या त्यांच्या शक्तींवर झापडेही आली असतील. जगाकडे पाहताना आपल्याच संस्कृतीबद्दलच्या पूर्वग्रहांचा पुनर्विचार आताशी कुठे आपण करू लागलो आहोत. जागतिक संदर्भात त्याची आवश्यकताही आहे. एकोणिसाव्या शतकातील राजकीय आणि वैज्ञानिक दृष्टिसुद्धा पूर्वग्रहदूषित आणि कालबाह्य असल्याचे जर आढळते, तर इतिहासाचे अवलोकन करतानाही एकोणिसाव्या शतकात पूर्वग्रदूषित आणि कालबाह्य दृष्टीचा वावर स्वाभाविकच म्हणायचा.
पुरातत्त्वशास्त्राकडे नव्या दृष्टीने पाहण्याचे काम अलीकडे चालू झाले आहे. विशेषतः स्थानिक विद्वान आपलाच पूर्वेतिहास जेव्हा नव्याने तपासून पाहण्याचे अवघड कार्य जेव्हा अंगावर घेतात, तेव्हा नव्या दृष्टिकोनाचा अवलंब अटळ ठरतो. त्यातही, भारताच्या प्राचीन इतिहासातील अर्थ चुकीचे लावल्याचे लक्षात आल्यावर तर त्यांचे नव्याने पुनरवलोकन करण्याची व त्यांचे यथातथ्य दर्शन घेण्याची आवश्यकताही नाकारता येणार नाही. मध्यपूर्वेबाहेरील आणि मध्यपूर्व संस्कृतींची वैशिष्ट्ये नेमकी समजून घेण्यातील अपात्रता, हाच वेदांचा आणि मध्यपूर्वेच्या इतिहासाचाही यथातथ्य अर्थ लावण्यातला मुख्य अडसर होय. जगभर नव्याने सापडलेल्या पुराव्यांच्या प्रकाशात जगातील इतरही संस्कृतींचा इतिहास पुनश्च तपासून पाहिला जाईल, अशी अपेक्षा करायला आता अडचण वाटत नाही.
युरोपीय विद्वानांनी मांडलेल्या आक्रमण-सिद्धांताला कुणीच – हिंदूंनीसुद्धा – आव्हान दिले नाही, हे दुर्दैव होय. त्यातही वसाहतवादाला सातत्याने विरोध करणार्या मार्क्सवाद्यांनीसुद्धा असली वसाहतवादी मीमांसा स्वीकारावी, हे तर विलक्षणच म्हणायला हवे. स्वा. दयानंद सरस्वती, लो. टिळक, योगी अरविंद, यांनी तर हा सिद्धांत स्पष्टपणे नाकारला होता. तरीही बहुतेक हिंदु विद्वान, अजाणता आजही तो स्वीकारतात. आणि हिंदूंनाच गौण स्थान देणारी हिंदु इतिहासाची मीमांसा करण्याचे स्वातंत्र्य पाश्चात्त्य, विशेषतः ख्रिस्ती पंडितांना घेऊ देतात. माक्सम्यूलर, ग्रिफिथ, मोलियर विल्यम्स यांच्यासारख्या एकोणिसाव्या शतकातील ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेली वेदांची भाषांतरे कित्येक हिंदु केवळ स्वीकारतात. एवढेच नव्हे, तर त्यांना आदराने मान्यताही देतात. ख्रिश्चनांना हिंदु धर्म स्वीकारायला प्रवृत्त करील असा बायबलचा आणि बायबलकालीन इतिहासाचा अर्थ लावला तर आधुनिक ख्रिश्चन त्याचा स्वीकार करतील काय? मग आपल्याच संस्कृतीचे, इतिहासाचे चुकीचे अर्थ लावणारी आणि त्यांना व आपल्या देशाला गौण स्थान देणारी पाश्चात्त्यांची पुस्तके अद्यापही भारतातील विद्यापीठे वापरातात, हे नवल नव्हे काय?
सामाजिक आणि सांस्कृतिक पूर्वग्रहांसंबंधांत केलेल्या टीकेबद्दल पाश्चात्य विद्वानांचा गट फार हळवा आहे. वैदिक इतिहासाबाबतच्या पूर्वग्रहांबाबत जर आपल्या पंडितांनी ठाम उभे राहायचे ठरवले तर प्राचीन इतिहासातील कित्येक घटनांचे पुनरवलोकन करता येईल. कारण, आजवर पाश्चात्त्यांनी लावलेले कोणतेही अर्थ वस्तुनिष्ठ टीकेपुढे टिकाव धरूच शकणार नाहीत. पण, स्वस्थच बसायचे असे हिंदु पंडितांनी ठरवले तर ते अर्थ तसेच चालू राहतील. आणि मग त्यातून होणार्या परिणामांचा दोष आपले पंडित दुसर्या कुणाला देऊ शकणार नाहीत, हे निर्विवाद. ही बाब अशी सहजासहजी उडवून लावण्यासारखी नाही. त्यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण कोणत्याही संस्कृतीचे मूल्यांकन ऐतिहासिक दृष्ट्या कसे होते, यातूनच सामाजिक आणि बौद्धिक संदर्भात जगाने त्या संस्कृतीच्या भवितव्याकडे कसे पाहावे, हे ठरत असते. आपल्या संस्कृति आणि धर्म यांच्याबद्दल मांडलेले चुकीचे विचार बिनबोभाट स्वीकारणे, त्यांच्याबद्दल कसलाही आक्षेप उपस्थित न करता ते सहन करीत राहणे, म्हणजे सहिष्णुता नव्हे तर ती केवळ आत्मवंचनाच होय.
टीप: डॉ. फ्रॉली ह्यांनी भारतीय विद्वानांना अन्यत्र, आणखी एक विनंती केली आहे. तीही पुढं देत आहे. अनुवादक.
अलीकडेच काही वर्षांपूर्वी मेहेरगड इथं पुराणवस्तुशास्त्राच्या संशोधकांनी केलेल्या उत्खनानावरून निखळ भारतीय संस्कृती आणि सभ्यता इ.स.पू. 7000 वर्षांपूर्वीची असल्याचं उघड होतं. ख्रिस्तापूर्वी निदान 3000 वर्षांपूर्वीची येथील संस्कृती अतिशय प्रगत असल्याचं आणि सिंधू व सरस्वतीच्या खोर्यांत कितीतरी नगरं वसलेली असल्याचंही आढळून आलं आहे. ख्रिस्तयुगापूर्वी दोन सहस्र वर्षांपूर्वी वैदिक काळात जेव्हा सरस्वती नदी आटली तेव्हा तेथील समाज पूर्व दिशेला गंगेपाशी सरकले असावेत. आणि तिथं ती आणखी भरभराटीला आली असावी. भारतीय लोक बाहेरून कोठून तरी भूमीवर आक्रमण करून इथं आले ही कल्पना आता धुक्यासारखी वितळून गेली आहे. अगदी प्रागैतिहास-कालापासून ही संस्कृती व सभ्यता अव्याहतपणं अस्तित्वात असल्याचे सज्जड पुरावे मिळाले आहेत. दुर्दैवानं स्वातंर्यानंतरही गेली पन्नास वर्षं येथील पंडित आपल्या मूळ स्रोताबद्दल नवीन संशोधन न करता अजूनही पाश्चात्त्यांचीच नक्कल करीत राहिले आहेत. स्वामी विवेकानंद आणि अरविंदबाबू ह्या आपल्या महान् विभूतींनी मांडलेल्या आपल्या उज्जवल परंपरेचा आणि दिव्य भविष्याचा त्यांना विसरच पडला आहे. एकीकडे आध्यात्मिक मार्गदर्शनाकरता पाश्चात्यच आपल्याकडे पहात असताना दुसरीकडे आपले बुद्धिवंत त्यांच्या पुढं अगदीच लाचारीनं वागतात, असं जरी नसलं तरी त्यांचीच महती गात, त्यांचाच अनुनय करताना आढळतात.
o-O-o
.
प्रस्तुत लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या.
– अमृतयात्री गट
.
संबंधित विषयांवरील खालील लेखही अवश्य वाचावेत.
भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Traditions) –} भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Traditions)
Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System
A History of Sanskrit Literature by Arthur A. Macdonell –}} A History of Sanskrit Literature by Arthur A. Macdonell
.