गर्भाशयातील बाळांचा संवाद (आस्तिकांचे नास्तिकांना उत्तर?) (अनुवाद : प्रा० मनोहर राईलकर)

आस्तिक आणि नास्तिक मंडळींमध्ये वादविवाद, झगडे होत असतातच. आस्तिक नास्तिकांना अश्रद्ध, असंस्कृत, पापी, भ्रष्ट इत्यादी विशेषणे लावतात तर नास्तिक आस्तिकांना अंधश्रद्ध, अडाणी, मूर्ख, अकलेचे कांदे, विश्वविघातक, बुद्धिशत्रू इत्यादी विशेषणांनी संबोधतात. न्यूटनला तेव्हा न माहीत असलेल्या गोष्टी पुढच्या वैज्ञानिकांना माहीत झाल्या. आणि न्यूटनने मांडलेले काही सिद्धान्त पुढे चुकीचेही ठरले. न्यूटनच्या खांद्यावरून आईनष्टाईन चढला. परंतु पुन्हा त्याने सांगितले ते आणि तेवढेच अंतिम सत्य असे म्हणता येईल काय? त्यात बदल, विस्तार होतो आहेच ना? होत राहणार आहेच ना?

आधुनिक विज्ञानाला Physical Entity (द्रव्य) नसलेल्या पदार्थांबद्दल पुरेशी कल्पना आहे काय?

आधुनिक विज्ञानाला काही मर्यादा आहेत किंवा नाहीत? असल्यास, त्या मर्यादा मान्य न करता आधुनिक विज्ञानास स्वीकारार्ह तेवढेच सत्य असे म्हणायचे काय?

प्रस्तुत लेख हे आस्तिकांचे बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणार्‍या नास्तिकांना वरील पद्धतीचेच उत्तर आहे. मूळ इंग्रजी लेख Dr. Wayne Dyer ह्यांचा असून त्याचे मराठी भाषांतर प्रा० मनोहर राईलकर ह्यांनी केलेले आहे. अर्थात इथे वाद संपणार नाहीच. एकमेकांच्या विमताचा अधिकार मान्य करून मतसहिष्णुता दाखवणे हे मात्र आवश्यक आहे.

गर्भाशयातील बाळांचा संवाद_Conversation in the Womb_150215

.

गर्भाशयातील बाळांचा संवाद : प्रसूतीनंतरचे जीवन

(हा मधुर संवाद डॉ. वायन डायर (Wayne Dyer) ह्यांच्या Your Sacred Self ह्या पुस्तकातून घेतला आहे.)

आस्तिकांचे नास्तिकांना उत्तर?

(मराठी अनुवाद : प्रा. मनोहर राईलकर)

टीप : एखादी वस्तू प्रत्यक्ष पाहिल्याविना पुष्कळांना खरं वाटत नाही. इंग्रजीत, “Seeing is believing” अशी एक म्हणही आहेच. जे दिसेल तेवढंच खरं, असं कित्येकांचं ठाम मत असतं. त्यांच्याकरता हा एक उद्बोधक संवाद. निरीश्वरवादी, गणिती, बुद्धिप्रामाण्यवादी, तर्कनिष्ठ कार्यकारणभाव पद्धतींवर विश्वास असणारे वैज्ञानिक यांच्यासाठी.

काहीही गृहीत धरू नका आणि आपल्या मर्यादित अनुभवावरून आणि ज्ञानावरून काढलेल्या निष्कर्षालाच अंतिम सत्य मानू नका. आपल्या अनुभवाला येणार्‍या वातावरणापेक्षा वास्तव पराकोटीचं भिन्न असू शकतं, इतकंच तूर्त लक्षात असू द्या. (प्रा० मनोहर राईलकर)

0000

आईच्या पोटात दोन जुळी बाळं आपसांत संवाद करीत होती. एकानं दुसर्‍याला विचारलं, “प्रसूतीनंतर (इथून बाहेर गेल्यावर) जीवन असतं, असं तुला वाटतं काय?”

दुसरा उत्तरला, “का नाही? नंतर काही तरी असणारच. कदाचित, तेव्हाच्या त्या आयुष्याची पूर्वसिद्धता करण्याकरताच आज आपण इथं आहोत असंही असू शकेल.”

“छट्, काही तरीच तुझं,” पहिलं बाळ म्हणालं, “प्रसूतीनंतर काहीच असू शकत नाही. आणि असलंच तरी ते कशा प्रकारचं असणार?”

दुसरं बाळ म्हणालं, “मला कल्पना नाही. पण, इथल्यापेक्षा तिथं अधिक प्रकाश असेल. कदाचित आपण आपल्या स्वतःच्या पायांनी चालू शकू, तोंडानं खाऊ शकू. ज्याची आत्ता आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, अशा प्रकारच्या आणखीही काही वेगळ्याच संवेदना किंवा जाणीवा आपल्याला होऊ शकतील.”

“सगळाच खुळचटपणा.” पहिलं बाळ म्हणालं. “चालणं? ही कल्पना तर अशक्यच आहे. आणि आपल्याच तोंडानं खाणं? निव्वळ आचरटपणा. अरे, आपल्याला जे काही लागतं, ते सगळं तर ह्या नाळेतूनच आपल्याला मिळत आहे, नाही का? मात्र ती अत्यंत आखूड आहे. त्यामुळे तिच्या योगे प्रसूतीनंतरचं स्वतंत्र जीवन ही कल्पना कोणत्याही तर्कात बसत नाही.”

दुसर्‍यानं आपलं म्हणणं सोडलं नाही. ते म्हणालं, “मला वाटतं की प्रसूतीनंतर काही तरी असावं. कदाचित ते इथल्यापेक्षा पूर्णतः निराळं असेल. कदाचित, तिथं आपल्याला ह्या नाळेची गरजच भासणार नाही.” पहिलं बाळ म्हणालं,

“निव्वळ वेडगळपणा. आणि तिथं जीवन म्हणून काही असेलच, तर मग आजवर तिथून कुणी कधी परतलं कसं नाही? म्हणून मी म्हणतो की प्रसूती ही जीवनाची अखेरच होय. त्यानंतर सर्वत्र अज्ञात आणि निःस्तब्ध शांतता आणि अंधार. नंतर काहीही उरत नाही.”

“हूँऽऽऽ” दुसरं बाळ म्हणालं, “पण, आपल्याला तिथं नक्की आपली आई भेटेल. ती आपली सर्वपरीनं काळजीही घेईल.”

पहिलं उद्गारलं, “आई? आई म्हणजे काय? आई ह्या कल्पनेवर तुझा विश्वास आहे? हे सर्व हास्यास्पद आहे. आई अशी कोणी असेलच तर ती सध्या आहे तरी कुठं?”

दुसरं बाळ म्हणालं, “अरे ती आपल्या अवतीभोवतीच सर्वत्र आहे. ती आपल्याला वेढून राहिली आहे. खरं तर, आपण तिचाच अंश आहोत. आपण राहतो ते सर्व जगसुद्धा तिचाच अंश आहे. तिच्यातच तर आपण राहतो. तिच्याविना आपल्या ह्या जगाला स्वतंत्र अस्तित्वच नाही.”

पहिलं बाळ म्हणालं, “मला तर ती कुठं दिसत नाही. यावरून तिला अस्तित्व असणं शक्य नाही, हाच एकमेव तर्कशुद्ध निष्कर्ष निघतो.”

ह्यावर दुसरं बाळ उत्तरलं, “कधी कधी जर आपण शांत असलो आणि एकाग्रतेने व लक्षपूर्वक ऐकत राहिलो; तर तिचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. दूरवरून कुठून तरी येणारा, मायेने ओथंबलेला, तिचा आवाजही आपल्याला ऐकू येतो.”

–  this lovely parable is from  by Dr.  Wayne Dyer 15 September 2013.Ya Haqq!

https://darvish.wordpress.com/tag/wayne-dyer/

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s