राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत (दैनिक लोकसत्ता)

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तत्कालीन विचारवंत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग आदी मराठीऐवजी इंग्रजीत लेखन करीत असल्याबद्दल सडकून टीका केली. त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांचा इंग्रजीतून लेखन करण्याचा सल्ला धुडकावत कटाक्षाने ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’ असा रांगडा सवाल करत आपले लेखन मराठीतून केले. हयातभर मायमराठीसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या पण त्यांच्याच नावाने चालणार्‍या मंडळाचे संकेतस्थळ मराठीमध्ये नाही.

दैनिक लोकसत्तेच्या २७ फेब्रुवारी २०१४ च्या अंकातील मराठीभाषा-दिन-विशेष लेख आणि त्याबद्दल आपल्या अमृतमंथन परिवारातील श्री० सलील कुळकर्णी ह्यांनी लोकसत्तेला लिहिलेले पत्र प्रसिद्ध करीत आहोत.

राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत

राम जगताप, मुंबई

Published: Thursday, February 27, 2014

मराठी भाषेविषयी सतत चिंता व्यक्त केली जाते आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही केले जातात, पण ज्यांच्यावर मायमराठीच्या जतन-संवर्धनाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडूनच मराठीची हेळसांड पाहायला मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळ. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी आयुष्यभर आपले सर्व लेखन आवर्जून मराठीतच केले. हयातभर मायमराठीसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या पण त्यांच्याच नावाने चालणाऱ्या मंडळाचे संकेतस्थळ मराठीमध्ये नाही. राजवाडे यांच्या निधनानंतर वर्षभरातच (१९२७) या मंडळाची स्थापना झाली. इतिहासाचे अभ्यासक-संशोधक यांना संदर्भ साधने पुरवणे, त्यांना ऐतिहासिक अभ्यासासाठी चालना देणे हे या मंडळाचे प्रमुख काम आहे. पण याची माहिती देणारे मंडळाचे संकेतस्थळ http://rajwademandal.org मात्र इंग्रजीमध्ये आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तत्कालीन विचारवंत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग आदी मराठीऐवजी इंग्रजीत लेखन करीत असल्याबद्दल सडकून टीका केली. त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांचा इंग्रजीतून लेखन करण्याचा सल्ला धुडकावत कटाक्षाने ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’ असा रांगडा सवाल करत आपले लेखन मराठीतून केले. 

राजवाडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या मंडळात १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रे, त्यापैकी तीस हजार हस्तलिखिते आहेत. त्यातील बहुतांशी मराठी असून बाकीची पíशयन, मोडी, पोर्तुगीज आणि इंग्रजीमध्ये आहेत, तर मंडळाच्या ग्रंथालयात २७ हजार मराठी व इंग्रजी पुस्तके आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेणाऱ्या, त्याचा अभ्यास करणाऱ्या कुणालाही मोलाची ठरेल अशी साधनसामग्री मंडळाकडे आहे, पण त्याची माहिती देणारे मंडळाचे संकेतस्थळ मात्र इंग्रजीमध्ये असल्याने त्याचा उपयोग अभ्यासक -संशोधक यांना म्हणावा तसा होत नाही. इंग्रजी तरी नीट असावे, तर तसेही नाही. संकेतस्थळाच्या मुख्य पानावरच स्पेिलगच्या अनेक चुका आहेत. त्यामुळे इतर भाषकांवर एका मराठी संशोधन संस्थेची छाप पाडण्याचा या संकेतस्थळाचा हेतू असलाच, तर तोही साध्य होण्याची शक्यता नाही!

मायमराठीचे कडवे पुरस्कर्ते असलेले राजवाडे जे लेखन भारतीय पातळीवर जायला हवे ते इंग्रजीमध्ये अनुवादित करून घेत, पण आपले लेखन मात्र मराठीतूनच करत. इतर भाषकांना आपले लेखन अनुवादातूनच माहीत व्हायला हवे, अशी राजवाडे यांची धारणा होती.

२००२पासून संगणकावर आणि महाजालावर सर्व भारतीय लिप्यांत लिहिण्याची आणि तो मजकूर सरसकट दिसण्याची सोय उपलब्ध झाली आहे. युनिकोड संकेतप्रणाली वापरून आपल्याला कोणत्याही भारतीय लिपीत संकेतस्थळ रचता येते. आज मराठीत कित्येक संकेतस्थळे देवनागरी लिपीतच सहज वापरता येतात. पण २०१० पासून सुरू असलेले मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीमध्ये आहे. हयातभर मायमराठीसाठी खस्ता खाणाऱ्या राजवाडे यांचा त्यांच्याच नावाने चालणाऱ्या मंडळानेच केलेला पराभव म्हटला पाहिजे.

मध्यंतरी मंडळाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे संकेतस्थळ मराठीत करू शकलो नाही. सध्याचे इंग्रजी संकेतस्थळही घाईगर्दीत झालेले आहे. चालू वर्ष हे राजवाडे यांचं दीडशेवे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये तयार करत असून ते अत्याधुनिकही केले जाणार आहे. 

संजय मुंदडा, कार्याध्यक्ष, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे

 http://www.loksatta.com/mumbai-news/rajwade-research-centers-website-in-english-385567/

आदरणीय संपादक (दैनिक लोकसत्ता) यांसी,

सप्रेम नमस्कार.

आजच्या (दि० २७ फेब्रु०च्या) अंकात ‘राजवाडे संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत!’ ही बातमी प्रसिद्ध केलीत हे उत्तम झाले. ते संकेतस्थळ खरोखरच मराठीभाषेबद्दल अभिमान बाळगणार्‍या व्यक्तीच्या डोळ्यात खुपावे आणि त्याचे हृदय जळावे, असेच आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी केलेले मौल्यवान संशोधन आणि लिखाण त्यांनी जर इंग्रजीतून केले असते, तर त्यांना कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी मिळाली असती. असे असूनही कीर्ती, आर्थिक फायदा इत्यादी गोष्टींची तमा न बाळगता केवळ एक तत्त्व म्हणून त्यांनी केवळ मराठीतच लेखन केले. मराठी भाषा मुमूर्षु तर नाहीच उलट ती अत्यंत सक्षम आहे आणि तिला आपण अधिकाधिक विकसित करीत राहायला हवी, अशीच त्यांची दृढ भावना होती. श्री० संजय मुंदडा ह्यांनी दिलेले “मंडळाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मराठीऐवजी इंग्रजीत संकेतस्थळ केले” ही सबब वाचून हसू आले. “मराठी भाषेत लिहिण्याचे पेन महाग असल्यामुळे मी इंग्रजीत लेखन करतो” ह्या विधानाएवढेच दांभिकपणाचे श्री० मुंदडा ह्यांचे विधान आहे. राजवाड्यांच्या जीवनध्येयाचा अपमान करणार्‍या आणि स्वतः कुठलेही संशोधन न करणार्‍या ह्या मंडळींनी ‘राजवाडे संशोधन मंडळ’ अशा नावाच्या संस्थेवर अधिकारपदे भूषवावीत (?) हे अगदीच विचित्र आहे. आता त्यांचे बिंग फुटल्यावर तरी ही मंडळी मनाची नाही तर जनाची लाज बाळगून संपूर्ण संकेतस्थळ मराठीत प्रस्थापित करतात का, ते पाहू.

क०लो०अ०

सलील कुळकर्णी

.

वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवाव्या.

– अमृतयात्री गट

.

2 thoughts on “राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत (दैनिक लोकसत्ता)

  1. मायबोली मराठी भाषा दिना निमित्त आपले अभिनंदन . आपली भाषा आपली मायबोली बद्दल अभिमान असणे हे योग्यच पण याबरोबर आपली मायबोली हि ज्ञान भाषा , व्यावहारीक भाषा होण्यासाठी कोणताही न्युनगंड न ठेवता तिचा अंगीकार करून पाठपुरवठा करणे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे .

    • प्रिय श्री० विजय जामदार यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      पत्राबद्दल आभार.

      आपले म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून निदान महाराष्ट्रात तरी सर्वच क्षेत्रांत मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करायला हवा. बॅंक, एटीएम, हॉटेल, रस्त्यावर, कार्यालयात, सरकारी व खासगी संस्थांमध्ये, सर्वच ठिकाणी शक्यतो मराठीमधून बोलणे आणि लिहिणे करीत राहायला हवे. इतर राज्यांप्रमाणे आणि इतर देशांप्रमाणे स्थानिक भाषेच्या ज्ञानाशिवाय महाराष्ट्रात स्थायिक होणे शक्यच नाही, अशी परिस्थिती आल्यास मराठीला पुन्हा मान मिळू लागेल. अन्यथा – ‘मराठी कशाला शिकायची? ती घाटी लोकांची भाषा!’ अशा प्रकारे तिची हेटाळणी करणे चाल्च राहील.

      आपण खालील लेख वाचले आहेत काय?

      आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख) — } http://wp.me/pzBjo-Iv

      इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९) –} http://wp.me/pzBjo-8x

      हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९) –} http://wp.me/pzBjo-9W

      महेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण –} http://wp.me/pzBjo-Gs

      Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8

      Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH

      अमृतमंथनावर असे अनेक लेख आहेत. अवश्य वाचून पहा. आवडल्यास आपल्या मित्रांनाही वाचण्यास द्या.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s