Summary of the Western Ghats Ecology Expert Panel (Dr. Madhav Gadgil Committee) Report
केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री० जयराम रमेश ह्यांनी नेमलेल्या डॉ० माधवराव गाडगीळ ह्यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम-घाट-परिसर-तज्ज्ञ-गटाने पाहणी आणि अभ्यास करून आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. (मध्यंतरी इतरही काही पर्यावरणसंबंधी प्रकरणात कडक भूमिका घेतल्यामुळे श्री० जयराम रमेशांची बदली करण्यात आली होती.) प्रस्तुत अहवाल राजकारणी आणि उद्योगपतींना मान्य न झाल्यामुळे सरकारने तो जाहीरच केला नाही. शेवटी केंद्रीय माहिती आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर नाईलाजाने तो प्रसिद्ध करावा लागला. पण स्पष्ट कारणे देऊन त्यातील शिफारशी मान्य किंवा अमान्य करण्याच्या ऐवजी केंद्र सरकारच्या नवीन मंत्रीमहोदयांनी त्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठित करून त्याला गोठवण्याचे प्रयत्न सुरू केले. कोकणातील विविध राजकीय पक्षांतील राजकारणीदेखील त्याला विकासविरोधी ठरवून तो रद्द करून घेण्याचे नेटाने प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने आपल्या संकेतस्थळावर त्या अहवालाचा गोषवारा प्रसिद्ध केला. परंतु तो जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता असे माधवराव गाडगीळांचे मत आहे.
एकंदरीत कुठल्याही प्रकारे तर्कशुद्ध प्रतिवाद न करता तज्ज्ञगटाच्या निरीक्षणांना, विचारांना, निष्कर्षांना व सूचनांना केंद्रसरकार, संबंधित राज्यशासने आणि स्थानिक राजकारणी हे केवळ दादागिरीच्या जोरावर हा अहवाल दडपून टाकू पाहात आहेत, असे वाटते. परंतु सर्वसामान्य जनतेला त्या विषयातील सत्य परिस्थिती समजावी म्हणून डॉ० माधवराव गाडगीळांनी ह्या अहवालाचा मराठीमध्ये मथितार्थ सांगणारे काही टिपण केलेले आहे. त्याचा प्राथमिक खर्डा आम्ही खालील दुव्यावर उपलब्ध करून देत आहोत.
Amrutmanthan_Sahyadreechyaa Kadyaakadoon_Dr Madhav Gadgil_121031
(धारिणी बरीच मोठी आहे. उघडण्यास नेहमीपेक्षा थोडा अधिक वेळ लागू शकतो. कृपया थोडी वाट पहा.)
वाचकांच्या मनात कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर त्यांनी त्या मनमोकळेपणाने योग्य शब्दांत ह्या लेखाखालील चर्चाचौकटीत नोंदवाव्या. वाचकांच्या प्रामाणिक सूचना, अभिप्राय ह्यांचे स्वागतच होईल. डॉ० माधवराव गाडगीळ स्वतः वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. कोणालाही ह्यातील काही भाग उद्धृत करावासा वाटला, तर अवश्य करावा. डॉ० माधवराव गाडगीळांनी आपली त्यास काहीही हरकत नसल्याचे कळवले आहे.
– अमृतयात्री गट
ता०क० आपल्या अमृतमंथन अनुदिनीवर पश्चिम घाट पर्यावरणासंबंधातील ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखांचे दुवे खाली दिले आहेत. पूर्वी वाचले नसल्यास हे लेख अवश्य वाचा.
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया (माधवराव गाडगीळ, लोकसत्ता दि० २६ ऑगस्ट २०१२)
.