सेमी-इंग्रजी ही दिशाभूलच (ले० उन्मेष इनामदार, दै० लोकसत्ता)

आईचे दूध हा नवजात बाळासाठी नैसर्गिक व सर्वोत्तम आहार आहे हे त्रिकालाबाधित सत्य असताना शिशुआहार बनवणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन हे बाळासाठी मातेच्या दुधापेक्षाही जास्त पोषक असल्याच्या जाहिराती करीत होत्या.बालहक्कांसाठी लढणारे याविरुद्ध न्यायालयात गेले. आईच्या दुधाला दुसरा कोणताही पर्याय नाही हे शास्त्रीय सत्य न्यायालयाने मान्य केले. कंपन्यांचे संशोधन अहवाल फेटाळले गेले. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम असून, आमचे उत्पादन हे त्याखालोखाल असल्याच्या पुनर्जाहिराती सदर कंपन्यांना करणे भाग पाडले.

आपल्या अमृतमंथन परिवाराचे सदस्य श्री० उन्मेष इनामदार ह्यांचे ३ सप्टेंबर २०१२च्या लोकसत्तेच्या अंकात आलेले एक उत्तम लेखवजा पत्र खाली सादर करीत आहोत. नक्की वाचा.

‘सेमी-इंग्रजी माध्यम : एक सुवर्णमध्य’ हा वसंत काळपांडे यांचा लेख जनसामान्यांची दिशाभूल करणारा आहे. त्यांनी दिलेली आकडेवारी फसवी आहे. वास्तव हे आहे की, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे गल्लोगल्ली पीक आल्यामुळे मराठी माध्यमात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक नाहक भयभीत झाले. त्यांच्या मनातील भीती व गंड दूर करणे हे शासनाचे कर्तव्य होते. ते करण्याऐवजी त्यांच्यापुढे लोटांगण घालण्याचा प्रकार म्हणजे सेमी-इंग्रजी व इंग्रजी माध्यम.

सुमारे २५ वर्षांपूर्वीचा एक संदर्भ या ठिकाणी उद्बोधक वाटतो. आईचे दूध हा नवजात बाळासाठी नैसर्गिक व सर्वोत्तम आहार आहे हे त्रिकालाबाधित सत्य असताना शिशुआहार बनवणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन हे बाळासाठी मातेच्या दुधापेक्षाही जास्त पोषक असल्याच्या जाहिराती करीत होत्या. स्तनपानाऐवजी हे उत्पादन बाळाला भरविल्याने आईचे शरीरही सुडौल राहत असल्याचा खोटा प्रचार केला जात होता. बनावट प्रयोगशाळांचे संशोधन अहवाल त्यासाठी दिले जात होते. बालहक्कांसाठी लढणारे याविरुद्ध न्यायालयात गेले. आईच्या दुधाला दुसरा कोणताही पर्याय नाही हे शास्त्रीय सत्य न्यायालयाने मान्य केले. कंपन्यांचे संशोधन अहवाल फेटाळले गेले. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम असून, आमचे उत्पादन हे त्याखालोखाल असल्याच्या पुनर्जाहिराती सदर कंपन्यांना करणे भाग पाडले.

मातृभाषेतून शिक्षणाचा मुद्दासुद्धा वरील प्रकरणाहून जराही वेगळा नाही. बालकाचे वयाच्या ४ ते ५ वर्षांपर्यंत मातृभाषेतून एका विशिष्ट पातळीपर्यंत सहज शिक्षण आईच्या सहवासात होत असते. पुढील शालेय शिक्षणासाठी हा एक मजबूत पाया असतो. किंबहुना हा पाया गृहीत धरूनच शालेय शिक्षणाची आखणी केली गेलेली आहे. शालेय शिक्षण मातृभाषेतून असल्याने त्याची या पायाशी घट्ट सांगड घातली जाते. शालेय शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असल्यास आधीचा पाया अव्हेरला जातो व बालकाच्या शालेय शिक्षणाची उभारणी पायाहीन बनते. इंग्रजी किंवा सेमी-इंग्रजी माध्यमांकडे असलेला पालकांचा ओढा हा पूर्णपणे अज्ञान, स्वार्थी राजकारण्यांकडून झालेली दिशाभूल व प्रवाहपतितता यांचा परिणाम आहे. मेंढय़ांच्या कळपात मेंढय़ांना चालताना एकमेकांच्या अंगाला अंग घासल्यामुळे सुरक्षित वाटते. कळपातून एक जरी मेंढरू बाहेर आल्यास त्याला असुरक्षित वाटून ते परत कळपात येते; परंतु आपण सर्व मिळून कसायाकडे चाललो आहोत हे त्यांना कळत नसते. पालकांचा इंग्रजी, सेमी-इंग्रजी माध्यमाचा ओढा हा असाच कळपात राहण्याचा प्रकार आहे. पालकांची अवस्था मुकी बिचारी कुणी हाका अशी झाली आहे. त्यातून त्यांनी बाहेर येणे आवश्यक आहे. मातृभाषेतून शिक्षण हेच नैसर्गिक व सर्वोत्तम शिक्षण आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण हे अनैसर्गिक, अशास्त्रीय व दुय्यम दर्जाचे शिक्षण असून, जे मराठी भाषिक पालक आपल्या बालकांना ते देत आहेत ते काल्पनिक लाभासाठी बालहक्क, नैसर्गिक शिक्षण, नैतिकता यांच्याशी अक्षम्य तडजोड करीत आहेत. वास्तविक अशा शिक्षणाला या स्वतंत्र, सार्वभौम म्हणवणाऱ्या देशात बंदीच असायला हवी. शिशुआहाराबाबत फसवणूक करणाऱ्या कंपन्यांप्रमाणेच इंग्रजी माध्यमाच्या व्यापाऱ्यांपर्यंत कायद्याचे हात कधी ना कधी पोहोचतील; परंतु त्यासाठी लढाई चालू ठेवावी लागेल.

……………..

आपले प्रतिमत (feedback) ह्या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

ता०क० श्री० उन्मेष इनामदार ह्यांनी काही काळापूर्वी आपल्या ह्या अमृतमंथन अनुदिनीवर लिहिलेला लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

साहित्य मंडळास मराठीतून शिक्षणाबद्दल प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन (ले० उन्मेष इनामदार)

.

15 thoughts on “सेमी-इंग्रजी ही दिशाभूलच (ले० उन्मेष इनामदार, दै० लोकसत्ता)

 1. नमस्कार,
  आपण जे आईच्या दूधाच उदाहरण दिलंत ते रास्तच आहे. परंतु एक गोष्ट आपण विसरलात. आईच्या दुधाला सोडून बाळ नंतर पूर्ण आहार घेण्यास सुरुवात करतो.
  माझं शिक्षण सातवी नंतर सेमी इंग्रजी मध्ये झालं. आणि मला खरंच ११-१२ सोपी गेली.
  माझं असं ठाम मत आहे कि प्रत्येक मराठी शाळेत सेमी इंग्रजी सातवी नंतर अनिवार्य करावी. त्याची कारणे पुढील प्रमाणे.
  १. मराठी, इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र हे विषय स्थानिक पातळी वरील विषय आहेत. ते मराठी मध्येच शिकवले तरच मनाला भिडतात.
  २. फक्त विज्ञान आणि गणित हे दोनच विषय इंग्रजी मधून शिकवावेत. कारण गणित आणि विज्ञान हे वैश्विक विषय आहेत. आणि वैश्विक भाषा म्हणजे इंग्रजी हीच होय.

  आता आपल्यापैकी काही जर्मनीच उदाहरण देतील. त्याना मला असं सुचवायचं आहे कि, जर्मनी मध्ये त्यांची स्थानिक भाषा, बोली भाषा आणि विज्ञानाची भाषा हि अनादी काला पासून एकच आहे. ह्याच कारणामुळे विसाव्या शतकापर्यंत त्यांच्या कडील वैग्न्यानिक साहित्य इंग्रजी पेक्षा श्रेष्ठ होते. आणि सध्या technological प्रगती मुळे जर्मन इंग्रजी भाषांतराचे अनेक उपाय त्यांच्याकडे आहेत. आणि आता जर्मन, फ्रेंच आणि चीनी लोकं सुद्धा इंग्रजी शिकण्याला प्राधान्य देतात. त्याचा अर्थ असा होत नाही कि त्यांना त्यांची भाषा प्रिय नाही. त्याचा अर्थ असा होतो कि त्यांना बाहेरील जगासोबत बोलण्यासाठी एका दुव्याची गरज भासत आहे.. कारण जग जवळ येत आहे.

  मी इंग्रजी चा उदो उदो करत नाहीये पण मला कृपा करून कोणी सांगेल का कि मागच्या १० वर्षात ५ तरी उच्च गुणवत्ता असलेले मराठी साहित्य निर्माण झाले आहेत का? मराठी शाळेतच जर कोणी जाणारच नसेल तर मराठी साहित्य निर्माण तरी कुठून होणार?? १२ नंतर चे शिक्षणच जर इंग्रजी मध्ये होणार असेल आणि या लहान जगात जर एकमेकाशी व्यवहार करायचा असेल तर इंग्रजी वाचून पर्याय नाही. किमान गणित आणि विज्ञान तरी इंग्रजीतूनच व्हायला पाहिजे.

  ह्या सगळ्या मध्ये जर सेमी इंग्रजी.. जो खरोखरच सुवर्ण मध्य आहे त्यास अट्टाहासापायीपायी विरोध करणे म्हणजे मराठी शाळांना कायमचं मरण घोषित करणे असं होईल.

  बऱ्याच दिवसानंतर मराठी लिहित आहे.. चूक भूल क्षमा.

  • प्रिय श्री० कपिल अंधारे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल आभारी आहोत. पत्राच्या उत्तरास विलंब झाल्याबद्दल आम्ही आपली क्षमा मागतो. मधल्या काळात आम्ही प्रस्तुत लेखाचे मूळ लेखक श्री० उन्मेष इनामदार ह्यांच्याशी संपर्क साधून त्यांना ह्या लेखाबद्दल येणार्‍या वाचकांच्या पत्रांना उत्तर देण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केलेली आहे. आपल्या कार्यव्याप्त दिनक्रमातून वेळ काढून ते सर्व पत्रांना उत्तरे देणार आहेत. कदाचित उत्तरास काही दिवसांचा अवधी लागेल, पण तरीही आपण उत्तर मात्र देऊच, असे त्यांनी सांगितले आहे.

   तेव्हा आता आपले पत्र प्रसिद्ध करीत आहोत. लवकरच लेखक आपल्या पत्रास उत्तर देईल. मध्यंतरीच्या काळात आपण ह्या लेखाच्या संबंधातील प्रतिक्रिया व अमृतमंथनावरील नवीन लेख ह्यांच्याबद्दल विपत्राद्वारे थेट सूचना मिळवण्यासाठी जी सोय आहे तिचा उपयोग करून घ्यावा, ही विनंती.

   ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याप्रमाणे इतर मराठीप्रेमी वाचकही आपापली मते मांडून चर्चेत भाग घेतील अशी आशा करू या.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. माझ्या ’लोकसत्ता’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पत्राची आपण दखल घेऊन ते पत्र अमृतमंथन परिवारातील सदस्यांना अग्रेषित केल्याबद्दल आपला आभारी आहे.

  उन्मेष इनामदार.

  • प्रिय श्री० उन्मेष इनामदार यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या लेखावर येणार्‍या प्रतिक्रियांना आपणच उत्तर द्यावे, ही आमची विनंती मान्य केलीत ह्याबद्दल सर्व वाचकांच्या वतीने आभार मानतो.

   ह्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणे आणि सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनातील विविध किंतूंचे निराकरण करण्याच्या दृष्टीने विचारांची देवाण-घेवाण होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या लेखात मांडलेल्या विचारांचे सविस्तर स्पष्टीकरण आपणच सर्वयोग्य प्रकारे करू शकता, तर तेवढे वेळात वेळ काढून आपल्या मातेची ती एक सेवाच आहे, हे जाणून आपण अगत्याने आमची विनंती मान्य केलीत ह्याबद्दल खरोखरच आनंद वाटला. 

   ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्यासारखे मराठीप्रेमी वाचक आपापली मते मांडून चर्चेत भाग घेतील अशी आशा करू या.

   आपण ह्या लेखाच्या संबंधातील प्रतिक्रिया व अमृतमंथनावरील नवीन लेख ह्यांच्याबद्दल विपत्राद्वारे थेट सूचना मिळवण्यासाठी जी सोय आहे तिचा उपयोग करून घ्यावा, ही विनंती.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • प्रिय श्री कपिल अंधारे यांसी,

    सादर नमस्कार,

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

    मातेचे दूध पिणारे बालक काही विशिष्ट काळानंतर इतर आहार घेण्यास सुरुवात करते ही गोष्ट मी विसरलेलो नाही. माझे पत्र आपण कृपया नीट वाचा. आईच्या दुधावर त्याचे जे पोषण होते तो पुढील आहार घेण्यासाठी मजबूत पाया असतो असे मी म्हटले आहे. शिक्षण हे एक शास्त्र आहे. जगभर आजवर शिक्षणशास्त्रावर फार मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेले आहे. अनेक संशोधकांनी आपली हयात यावर खर्च केलेली आहे. आपल्या देशाला त्याचा गंध नसला तरीही आजवर जगातील कोणत्याही देशातील एकाही शिक्षणशास्त्रज्ञाने शिक्षणासाठी मातृभाषेला पर्याय असल्याचे विधान केलेले नाही. आपल्या देशातही जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले व आहेत. त्यांचेही हेच मत आहे. . (दुर्दैवाने आपल्या देशात शिक्षणतज्ज्ञांची उपेक्षा होते व अशिक्षित राजकारणी हे तज्ज्ञ असल्याप्रमाणे शिक्षणाबाबतचे निर्णय घेतात.महाराष्ट्र शासनाने पूर्व प्राथमिक शिक्षणात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या प्रा. राम जोशी समितीचा अहवाल लपवून ठेवला होता. लोकवाड्मयगृह प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला आहे तो आपण जरूर मिळवून वाचावा.) तेंव्हा अशा या शिक्षणशास्त्रात मूल जन्मल्यापासून त्याच्या कानांवर पडणार्‍या मातृभाषेतून होणार्‍या सहज शिक्षणाला फार फार महत्त्व आहे. जसा इमारतीचा जमिनीखाली घातला जाणारा पाया असतो तसे. शालेय शिक्षण जर मातृभाषेत असेल तरच ती इमारत या पायावर उभी राहाते; अन्यथा पाया रामेश्वरी आणि इमारत सोमेश्वरी असा प्रकार होतो. हा माझा मुद्दा आपण कृपया नीट समजून घ्यावा.

    शिक्षणशास्त्रात स्थानिक, वैश्विक असे विषयांचे वर्गीकरण नसते. जर्मन, जपानी फ़्रेन्च या भाषा जगभर शिकल्या जातात. मराठीसुद्धा इतर अनेक देशांत अभ्यासली जाते; परंतु त्यांच्यापेक्षा कमी. याचे कारण आपण इंग्रजी भाषिक अशी आपली चुकीची ओळख जगाला करून दिलेली आहे. “आता जर्मन, फ्रेंच आणि चीनी लोकं सुद्धा इंग्रजी शिकण्याला प्राधान्य देतात.” ही आपली माहिती क्षमा करा, चुकीची आहे. जपानमध्ये आठवड्यातून फक्त १ तास तेही जपानी माध्यमातून इंग्रजी शिकवतात. इंग्रजी/सेमीइंग्रजी माध्यमातून नव्हे. चीन, जर्मनी, फ़्रांस येथेही याहून फारसे वेगळे काही नाही. आपण इंग्रजी शिकणे व इंग्रजी माध्यमातून शिकणे यात गल्लत करीत आहात. आपल्या देशातसुद्धा इथे जन्मलेल्या भाषांतूनच प्रत्येक विकास झालेला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम काय इंग्रजी शाळेत शिकायला जात होते, की कालिदास, व्यास, वाल्मिकींनी इंग्रजीची शिकवणी लावली होती? आपण जर्मन व इंग्रजी यामध्ये तांत्रिक प्रगतीमुळे भाषांतर सोपे झाले आहे असे म्हणता ते योग्यच आहे. पण ते मराठीलासुद्धा लागू नाही का? भाषेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानातील प्रगती इतकी झपाट्याने होते आहे की अहो, उद्या कोणती भाषा श्रेष्ठ हा वादच कालबाह्य होणार आहे. प्रत्येक भाषा ही ज्ञानभाषाच आहे हे आजच वास्तव बनले आहे. गरज आहे ती नवीन ज्ञान निर्माण करू शकणार्‍या माणसांची. ते ज्ञान जगातील कोणत्याही भाषेत न्यायला तंत्रज्ञान समर्थ आहे. जगाशी संवाद साधायला इंग्रजी शिकण्याची गरज एके काळी होती. आज तंत्रज्ञानाने ती नाहीशी केलेली आहे.

    आपण गेल्या दहाएक वर्षांतील मराठी साहित्याच्या दर्जाबद्दल जे म्हणता त्याने माझ्याच म्हणण्याला पुष्टी मिळते . ही तर शिक्षणाचे जे माध्यमांतर गेल्या दहाएक वर्षात झाले आहे त्याचीच फळे नव्हेत काय? इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी काय परदेशातून येतात की काय? इथलेच विद्यार्थी जे मातृभाषेच्या माध्यमातून शिकून असामान्य बुद्धीमान बनणार होते त्यांना इंग्रजी माध्यमात लोटून अतिसामान्य परीक्षार्थी माणसे बनवली. जे गरुडभरारी घेऊ शकणार होते त्यांचे पंख छाटून त्यांच्या चिमण्या बनवल्या. ही या इंग्रजी/सेमीइंग्रजी माध्यमाची देणगी आहे. सेमीइंग्रजी/इंग्रजी माध्यम जर उपकारक आहे असे आपण म्हणता तर यात शिकलेल्यांनी कोणत्याही एखाद्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याची उदाहरणे दाखवता येतील का? उलट ना धड मातृभाषा ना धड इंग्रजी बोलता, लिहिता, वाचता येणारी पिढी मात्र तयार झाली. सेमीइंग्रजी/इंग्रजी माध्यम हे लोकांनी कोणते ज्ञान निर्माण केले आहे त्याची फक्त माहिती मिळवण्याच्या मर्यादित उपयोगाचे आहे. मातृभाषेचे माध्यम हे मूलभूत संशोधनाला प्रवृत्त करणारे उपलब्ध ज्ञानाच्या पलिकडे जाऊन नवीन शोध लावण्याच्या अमर्याद कक्षा असलेले माध्यम आहे हेच जगाचा इतिहास व शिक्षणशास्त्र सांगते. कुबड्या ह्या अपंगांसाठी असतात. सुदृढांना त्या लोढणे ठरतात. तुम्हाला सेमी इंग्रजी माध्यमामुळे ११वी-१२वी सोपी गेली असेल. परंतु शिक्षणाचा उद्देश हा इतका र्‍ह्स्व नसतो. नुकतीच एक बातमी वाचली. तुम्हीही वाचली असेल. जगातल्या पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. किती लज्जास्पद बाब आहे ही! याचे कारण हेच आहे की आम्ही शालेय शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंत आपल्या नसलेल्या इंग्रजी माध्यमातून शिकतो. त्यामुळे आपल्याकडे सर्वजण फक्त परीक्षा सोपी जाण्यापुरतेच शिकतात व शिकवतात. मूलभूत संशोधन व नवीन ज्ञान निर्मिती फक्त मातृभाषेतूनच होत असते.

    • श्री० कपिल अंधारे आणि श्री० उन्मेष इनामदार ह्या दोघांचेही अत्यंत मनःपूर्वक आभार.

     अमृतमंथनाची स्थापना ज्या उद्देशांसाठी केली होती, त्यापैकी एक असेच होते की सर्व मराठीप्रेमींनी आपली मते, आपले आक्षेप, आपल्या शंका मोकळेपणाने मांडाव्या व त्यावर कुठलीही व्यक्तिगत कटुता न मनात आणता, मराठी भाषा, संस्कृती मराठी माणूस, भारतीयत्व, भारतीय परंपरा ह्यांच्या बद्दलचा अभिमान इत्यादी विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हावी. अशा विचारांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार हा सर्वच पक्षांना फायदेशीर ठरतो. आपल्याला नवनवीन माहिती समजते, नवनवीन विचार, मते, दृष्टिकोन समजतात, आपली दृष्टी विशाल होते.

     आम्हाला असे वाटते आहे की श्री० कपिल अंधारे हे आजच्या उभरत्या नवीन तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत तर श्री० उन्मेष इनामदार हे किंचित प्रौढ, पूर्णपणे मराठी भाषेत शिक्षण घेऊन(ही?) आयुष्यात उत्तम प्रकारे स्थिरस्थावर झालेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. बहुधा साठ-सत्तर सालापर्यंतचा मराठीचा भरभराटीचा काळ त्यांनी पाहिला, अनुभवला असावा.

     दोहोंच्याही मातृप्रेमाबद्दल यत्किंचितही शंका घ्यायला जागा नाही, हे निश्चित. कपिल हे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये आपले मराठीपण जपताजपता कोणता सुवर्णमध्य गाठता येईल ह्याबद्दल आपले विचार मांडत आहेत, तर उन्मेष हे ‘आजची ही परिस्थिती मुळातच सदोष, अपवादात्मक (जगभरातील बहुतेक स्वाभिमानी देशांमधील परिस्थिती पाहता) असल्यामुळे ती मुळातूनच बदलायला हवी’ ह्या मताचे आहेत. बर्याचदा एखाद्याच्या शरीराला कर्करोगाची लागण झाली असते. रोग हळूहळू पसरत असतो. त्याच्या परिणामस्वरूप शरीरातील एकेक कार्यसंस्था निकामी होऊ लागते. पण मूळ कारण न समजल्यामुळे डॉक्टर जर त्या त्या संस्थेसाठीच औषध देऊ लागला तर कर्करोग तसाच राहतो व भराभर पसरू लागतो. श्री० उन्मेष ह्यांचे मत बहुधा तसे असावे. आज स्वातंत्र्याला पासष्ट वर्षे होऊन गेली तरीही आपल्या देशात अशिक्षितांची संख्या फारच मोठी आहे. ह्याचे कारणच हे आहे की आपण सर्वसामान्य जनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण न देता लांबच्या, परक्या देशातील भाषेतून शिक्षण घ्यावयास लावतो. एक उदाहरण घेऊ. – isosceles triangle, trachea, oesophagus, gynaecologist हे शब्द सामान्य शाळकरी मराठी मुलाला अधिक लवकर समजतील व लक्षात राहतील की समद्विभुज त्रिकोण, श्वासनलिका, अन्ननलिका, स्त्रीरोगतज्ज्ञ हे शब्द? (पुन्हा त्यांचे शुद्धलेखन-स्पेलिंगे लक्षात ठेवणे ही महाभयंकर शिक्षा तर बाजूलाच राहिली.)

     देशाच्या स्वातंत्र्यानंतर नेमलेल्या राष्ट्रीय एकात्मता मंडळ, (National Integration Council), अधिकृत भाषा आयोग (Official Language Commission), राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठीचा कोठारी आयोग, भावनिक एकात्मता समिती (Emotional Integration Committee) अशा विविध तज्ज्ञ समित्यांच्या शिफारशीवर आधारून भाषावार प्रांतरचना, अधिकृत भाषा धोरण अशी विविध धोरणे व कायदे देशात केले गेले आहेत. त्या सर्वाच्या शिफारशींमध्ये एक समान सूत्र म्हणजे – ’प्रत्येक राज्याने आपापली भाषा व संस्कृती यांची प्रगती व संवर्धन साधणे आणि बहुजन समाजाला शिक्षण, माहिती, रोजगार व इतर सर्व सोयी आणि व्यवस्था स्थानिक भाषेतच उपलब्ध करून देणे, यामुळेच भारताच्या विविधतेमधून एकता अबाधित राहील एवढेच नव्हे तर ती वृद्धिंगत होईल.’

     बर्याणचदा भाषिक संदर्भही इतिहास, भूगोल व संस्कृतीशी निगडित असतात. हल्ली मुलांना शाळेत लहानपणीच इंग्रजी भाषा शिकवताना फळा-फुलांची उदाहरणे म्हणून ’डॅफोडिल्स’ ही फुले आणि ’बेरीज’ ही फळे असे शिकवतात. पण डॅफोडिल्स आणि बेरीज हे पदार्थ त्यांच्या शाळांतील शिक्षकांनीही जन्मात कधी पाहिलेले नसतात. तेव्हा ते केवळ पोपटपंची करण्यावाचून अधिक काय शिकवणार? अशा परिस्थितीत सामान्य मराठी मुलाला, विशेषतः गावांतील ८० टक्के विद्यार्थ्यांना चाफा, मोगरा, आंबा, चिंचा, शहाळी अधिक भावतील हे शिक्षणाधिकार्यांच्या लक्षात येत नाही का?

     आज संपूर्ण युरोपातील विविध देश आपापल्या भाषांतच समाजव्यवहार करतात. युरोपात इंग्लंड वगळता इतर कुठल्याही देशात इंग्रजीमधून विधी (कायदे), न्यायव्यवस्था, संसदव्यवस्था, पोलीस असे शासकीय व्यवहार किंवा इतर दैनंदिन समाजव्यवहार चालत नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात भराभर प्रगती साधून भारताच्या पुढे गेलेल्या जपान, इस्रायल, चीन, कोरिया, ब्राझिल इत्यादी देशांपैकी एकाही देशाने स्वतःची भाषा बाजूला ठेवून शासकीय व समाजाचे व्यवहार, न्यायव्यवहार, शिक्षणव्यवस्था इत्यादी संस्था इंग्रजी भाषेत चालवल्याचे आढळत नाही. त्याउलट भारतदेश गेली पासष्ट वर्षे इंग्रजीची शेपूट धरून चालला असूनही तो दरडोई उत्पन्न, शिक्षणाचा प्रसार, उच्चशिक्षणाचे व संशोधनाचे प्रमाण, सार्वजनिक स्वास्थ्यसेवांचा दर्जा, शेती व इतर क्षेत्रांतील सरकारच्या विविध योजना व सुविधांची परिणामकारकता अशा विविध घटकांच्या बाबतीत त्या सर्व देशांच्या मानाने मागे पडला आहे. केवळ भ्रष्टाचाराच्या निर्देशांकाच्या बाबतीत आपण या देशांवर आघाडी मिळवलेली दिसते. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशात सामान्य माणसाला त्याच्या भाषेतून शिक्षण, प्रशिक्षण व माहिती देण्यात येत नाही. आपण जनतेला परकीय भाषेच्या बोंडल्यातून शिक्षण भरवण्याचे ठरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा ओतूनदेखील आपल्या देशात आपण गावोगावी, तळागाळातील अतिसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाचा फारसा प्रसार करू शकलेलो नाही. सामान्य जनतेतील अज्ञानामुळेच सरकारी मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोचत नाही किंवा पोचली तरी तिचा ८०-९०% भाग विविध मध्यस्थ व दलाल यांनी आधीच शोषून संपवलेला असतो.

     महाराष्ट्रीय माणसाला राष्ट्रीय एकात्मतेची सर्व जबाबदारी केवळ आपल्याच खांद्यावर आहे असे वाटत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील दोन अवतरणे खाली सादर करतो. ती ’आपल्या राज्यभाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे संकुचितपणा’ या महाराष्ट्रात पसरविल्या जाणार्या खोडसाळ संकल्पनेला छेद देतात. (आपल्या पत्रातील राष्ट्रभक्तीसंबंधातील प्रश्न त्या न्यायाधीशांना विचारले असते तर त्यांची काय प्रतिक्रिया झाली असती याबद्दल मी काहीच अंदाज बांधू शकत नाही.)
     In a writ petition filed against the decision of the Government of Karnataka of making the Kannada language compulsory in the schools, the Supreme Court, while supporting the State Government, has noted: “Whether one may like it or not, linguistic states in this country have come to stay. The purpose and object of these linguistic states is to provide with greater facility, the development of the people of that area educationally, socially and culturally, in the language of that region.”
     While rejecting the writ petition filed against the decision of the Government of Maharashtra of making study of the Marathi language compulsory for the standards V to X in the schools, the Supreme Court observed: “Ipso facto it is not possible to accept the proposition that the people living in a particular state cannot be asked to study the regional language. While living in a different state, it is only appropriate for the linguistic minority to learn the regional language. In our view, the resistance to learn the regional language will lead to alienation from the main stream of life, resulting in linguistic fragmentation within the state, which is an anathema to national integration.” It is the misfortune of the people of Maharashtra that in spite of winning this case in the Supreme Court, the rulers of the state have totally failed so far as implementation of the decision is concerned.”
     वरील दोन्ही निर्णयांत सर्वोच्च न्यायालयाने महात्मा गांधी आणि देशाची राज्यघटना यांचा वारंवार उल्लेख केला आहे हे विशेष!

     याला सर्वात मूलभूत कारण म्हणजे किरकोळ अपवाद वगळता आम्हाला, आमच्या तथाकथित सुशिक्षित, इंग्रजीशिक्षित आणि उच्चभ्रू वर्गाला या प्रश्नाची चाडच नाही. त्यांचे स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे उत्तम चालले आहे. शिवाय ’आमच्या आजूबाजूच्या फारशा कुठल्याही घरातील मुले इंग्रजी शाळेत जात नसल्यामुळे देशाचे इंग्रजीकरण पूर्ण झाले आहे’ असेच ते मानतात. पण आजही पुण्यातील ७०-७५% व राज्यातील ८०-८५% मुले इंग्रजी शाळांत जात नाही हे वास्तव त्यांना माहितच नसते. कारण या उच्चभ्रू जनतेची सर्वसामान्य समाजाशी असलेली नाळच तुटलेली आहे. ’त्यांना पाव मिळत नसेल तर केक खाऊ दे’ (Let them eat cake if they do not have bread) असे म्हणणार्या लेडी आंत्वानेत (Queen Marie Antoinette) प्रमाणे आपले हे उच्चभ्रू, पैसेवाले किंवा उच्चशिक्षित लोक आहेत. परंतु दुर्दैवाने त्यांचाच आवाज ऐकला जातो. सामान्य माणसाला जणू अस्तित्वच उरलेले नाही.

     आज जगातील अनेक देशांत विविध क्षेत्रांतील श्रेष्ठ असे, अगदी नोबेल पारितोषिक विजेते असलेलेही असे बहुसंख्य तज्ज्ञ आहेत, ज्यांनी सर्व उच्चशिक्षण आपापल्या मातृभाषेतून घेतलेले आहे. हे कसे शक्य झाले? तर त्या देशांत जगभरात वेळोवेळी विविध भाषांमधून प्रसिद्ध होणारे संशोधन, प्रकाशित होणारी उत्तमोत्तम पुस्तके इत्यादींचे ताबडतोब आपल्या भाषेत भाषांतर केले जाते व ते विविध माध्यमांच्या द्वारे जनतेस उपलब्ध करून दिले जाते. महाजाल हे या दृष्टीने आधुनिक युगातील अत्यंत प्रभावी माध्यम आहे. ज्याप्रमाणे जर्मनीमध्ये वैद्यकक्षेत्रात झालेल्या संशोधनाची माहिती ताबडतोब इंग्लंड-अमेरिकेत इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिली जाते; त्याचप्रमाणे ती फ्रान्स देशात फ्रेंचमध्ये, चीनमध्ये स्थानिक भाषांत तर इस्रायलमध्ये हिब्रू भाषेत उपलब्ध करून दिली जाते. तशीच व्यवस्था महाराष्ट्रात (किंबहुना भारतातील प्रत्येक राज्यात) व्हायला हवी. राष्ट्रकुल देशांच्या खेळांचे आयोजन किंवा असेच इतर विविध अनावश्यक पांढरे हत्ती पोसण्यात हजारो कोटी रूपये खर्च करण्यापेक्षाही वरील मूलभूत महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तसे झाल्यास सर्वच भारतीय भाषांचे सबलीकरण व समृद्धीकरण घडेल व त्याचा आतापर्यंत वंचित राहिलेल्या भारतातील बहुसंख्य समाजास मोठा फायदा होईल.
     असो. ह्या विषयावर बोलण्यासारखे खूपच आहे.

     कपिल आणि उन्मेष, तसेच ही चर्चा वाचणार्या सर्व मराठीप्रेमींना एक विनंती करावीशी वाटते. अमृतमंथनावर ह्या विषयावर अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. कदाचित त्यामध्ये कपिल ह्यांच्या शंकेला उत्तर देणारे मुद्दे येऊनही गेले असतील. तेव्हा आपण सर्वांनी निदान खालील काही लेख तरी काळजीपूर्वक वाचावे आणि मग आपण पुढील चर्चा करू. अशा चर्चेत व्यक्तिगत पैलू येऊ नयेत, आपण सर्व एकाच मातेची लेकरं आहोत, तिच्याबद्दल आपल्याला सर्वांनाच अत्यंत प्रेम आहे, हे लक्षात घेऊन आपुलकीने ही चर्चा चालू ठेवू.

     आपल्या मराठीप्रेमी वाचकांनादेखील आपली मते मांडण्यास आमंत्रण देत आहोत.

     इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९) –} http://wp.me/pzBjo-8x

     Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8

     https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/

     https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/09/पालकांनी-चालवलेला-बालकां/

     Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH

     https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/03/शहाणा-भारत-आणि-वेडा-जपान-ल/

     जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (ले० प्रा० मनोहर राईलकर) –} http://wp.me/pzBjo-zo

     https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/22/’मणभर-कर्तृत्वाचा-कणभर-द/

     https://amrutmanthan.wordpress.com/2010/06/13/english-not-the-medium-malaysia’s-dilemma/

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

    • मराठी शाळा बंद व्हाव्या, मुलांची मराठी संस्कृतीशी नाळ तुटावी असं मराठी माणसांना नक्कीच वाटत नाही. अगदी इंग्लिश मिडीयममधे मुलं घालणाऱ्या पालकांनाही वाटत नाही. मिडीयम इंग्लिश असलं, तरी इतर वळण मराठी असणाऱ्या, मराठी कार्यक्रम साजरे करणाऱ्या कितीतरी शाळा आहेत. या कार्यक्रमांना पालकही उत्साहाने पाठिंबा देतात. माध्यम कुठलंही असलं, तरी मुलांना इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषा चांगल्या याव्या, आणि महाराष्ट्रीय संस्कृती, इतिहास याची चांगली जाण निर्माण व्हावी, असंच सर्वसाधारण मराठी माणसांना वाटतं. पालकांच्या अनुभवाचा आणि इच्छांचा आदर राखून मुलांच्या हितासाठी काय करता येईल, असा विचार केला, तर तो जास्त व्यवहार्य ठरेल. एकाच वेळी दोन भाषा माध्यमांचा (आजच्या काळात) उपयोग करायचा झाला, तर केंद्रीय विद्यालयांसारख्या शाळांतील अनुभवांचाही वस्तुनिष्ठ विचार नक्कीच व्हायला हवा.
     भारतात इंग्रजी माध्यमात शिकलेल्या आणि नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रचंड आहे. काही मोजकी उदाहरणे;-
     भक्ती बर्वे-इनामदार, नीना कुलकर्णी, अतुल कुलकर्णी(सेमी-इंग्रजी), विक्रम पंडित, चंदा कोचर, इंद्रा न्युयी, अमर्त्य सेन, सी. व्ही. रामन. ही यादी कितीतरी वाढवता येईल. श्री. उन्मेष इनामदारांनी अशा व्यक्तींचा शोध नक्कीच घ्यावा. कपिल अंधारे किंवा त्यांच्यासारख्या शंका मनात असणाऱ्या कोणाचेच केवळ भावनात्मक आवाहन किंवा वस्तुस्थितीच्या निकषांवर न टिकणाऱ्या विधानामुळे समाधान होऊ शकत नाही. वस्तुस्थितीला सामोरे जायची तयारी ठेवली तरच मराठीसाठी काहीतरी भरीव करता येईल अरण्यरुदनातच समाधान मानायचे ठरवले असेल तर मग मार्गच खुंटला.

     • प्रिय श्री० वसंत काळपांडे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत.

      सुदैवाने अमृतमंथनाचे सर्वच वाचक अत्यंत प्रगल्भ असून ह्या चर्चापीठावरील चर्चा नेहमीच गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे केलेल्या असतात. कुठल्याही दोन व्यक्तीत, अगदी जुळ्या भावंडातदेखील सर्व विषयांवर संपूर्ण एकमत असणे शक्य नाही. परंतु आपली मते अभ्यासपूर्वक, सकारण चर्चापीठासमोर मांडणे, दुसर्‍याची मते सहिष्णुतेने, आदरपूर्वक ऐकून घेणे, आपले एखादे मत योग्य नव्हते असे वाटले, तर तसे मोकळेपणाने मान्य करणे, मात्र कुठल्याही परिस्थितीत चर्चेला थिल्लर किंवा परस्परविद्वेषाचे स्वरूप न येऊ देणे हे शिष्टजनांचे पथ्य ह्या चर्चापीठावर स्वतःहूनच प्रत्येकाने पाळले आहे, ही आपणा सर्वांच्याच दृष्टीने आनंदाची बाब आहे.

      आपले प्रस्तुत पत्रदेखील इतर वाचकांप्रमाणेच अत्यंत योग्य रीतीने आपली बाजू मांडणारे आहे, त्याबद्दल आपले आभार.

      आता हे पत्र चर्चापीठावर प्रकाशित होत आहे. त्यावर मूळ लेखाचे लेखक श्री० उन्मेष इनामदार तसेच इतर वाचकांनी चर्चा करावी. आपण चर्चा करीत असलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावर सांगोपांग चर्चा होणे कधीही चांगले. इनामदारांनी आपल्या लेखाखालील चर्चेबद्दल वेळोवेळी आपली मते, आपली बाजू मांडण्याचे मान्य केलेले आहे. मात्र त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे त्यांना कधी कधी थोडा वेळ लागेल, एवढेच त्यांनी कळवले आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहू.

      एक मुद्दा मात्र आम्ही इथे पुन्हा स्पष्ट करू इच्छितो की मराठी माध्यमाचा आग्रह धरणारेच खरे मराठीप्रेमी आणि मराठी भाषा व संस्कृतीचे अभिमानी, मराठीच्या प्रेमाचा, अभिमानाचा सर्व मक्ता त्यांनाच दिलेला आहे, असे कोणी मानत असेल असे वाटत नाही आणि आपणही तसे मनात आणू नये. ह्या बाबतीत श्री० कपिल अंधारे ह्यांचे पत्र प्रसिद्ध करण्याच्या वेळी आम्ही केलेली खालील नोंद पुन्हा उद्धृत करीत आहोत.

      ———–

      अमृतमंथनाची स्थापना ज्या उद्देशांसाठी केली होती, त्यापैकी एक असेच होते की सर्व मराठीप्रेमींनी आपली मते, आपले आक्षेप, आपल्या शंका मोकळेपणाने मांडाव्या व त्यावर कुठलीही व्यक्तिगत कटुता न मनात आणता, मराठी भाषा, संस्कृती मराठी माणूस, भारतीयत्व, भारतीय परंपरा ह्यांच्या बद्दलचा अभिमान इत्यादी विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हावी. अशा विचारांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार हा सर्वच पक्षांना फायदेशीर ठरतो. आपल्याला नवनवीन माहिती समजते, नवनवीन विचार, मते, दृष्टिकोन समजतात, आपली दृष्टी विशाल होते.

      आम्हाला असे वाटते आहे की श्री० कपिल अंधारे हे आजच्या उभरत्या नवीन तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत तर श्री० उन्मेष इनामदार हे किंचित प्रौढ, पूर्णपणे मराठी भाषेत शिक्षण घेऊन(ही?) आयुष्यात उत्तम प्रकारे स्थिरस्थावर झालेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. बहुधा साठ-सत्तर सालापर्यंतचा मराठीचा भरभराटीचा काळ त्यांनी पाहिला, अनुभवला असावा.

      दोहोंच्याही मातृप्रेमाबद्दल यत्किंचितही शंका घ्यायला जागा नाही, हे निश्चित. कपिल हे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये आपले मराठीपण जपताजपता कोणता सुवर्णमध्य गाठता येईल ह्याबद्दल आपले विचार मांडत आहेत, तर उन्मेष हे ‘आजची ही परिस्थिती मुळातच सदोष, अपवादात्मक (जगभरातील बहुतेक स्वाभिमानी देशांमधील परिस्थिती पाहता) असल्यामुळे ती मुळातूनच बदलायला हवी’ ह्या मताचे आहेत.

      ————

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • सप्रेम नमस्कार.

       अशा चर्चांमध्ये आपणा सर्वांचे मुख्य उद्दिष्ट मराठी माणसाचा, भारतीयाचा उत्कर्ष, विकास, असेच आहे. केवळ मार्ग भिन्न आहेत. आणि विविध मार्गांपैकी कुठला मार्ग अधिक सोयिस्कर, योग्य प्रकारे आपल्या उद्दिष्टाकढे नेणारा ह्याबद्दल आपण चर्चा करीत आहोत.

       तेव्हा चर्चेत भाग घेणार्‍या वाचकांना एक नम्र सूचना. कोणाच्याही पत्राला उत्तर देताना त्याने मांडलेले मुद्दे योग्य आहेत असे वाटल्यास तसे स्पष्ट लिहावे आणि न पटलेल्या मुद्द्यांबाबत आपली कारणे, आपला तर्कवाद मांडावा. अन्यथा आपण उत्तरात स्पर्श न केलेले मुद्दे आपल्याला पटले आहेत असा समज होऊ शकतो. शिवाय बर्‍याचदा आपण आधीच्या मुद्द्यांना उत्तर न देताच नवीन मुद्दे मांडत गेलो तर ही चर्चा कधीच निष्कर्षाप्रत येणार नाही. निदान हे-हे मुद्दे ह्या-ह्या कारणांसाठी व्यक्तिशः ह्यांना पटत नाहीत, एवढा तरी निष्कर्ष त्यातून काढता यायला हवा.

       अमृतमंथनावर ‘मराठी भाषा, मराठी संस्कृती व मराठी माणूस ह्याच्या अनुषंगाने बरेच लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांवर सर्वच वाचकांनी नजर टाकावी. आपल्या काही मतांना दुजोरा देणारी किंवा विमत व्यक्त करणारे मुद्दे, घटना, तर्कवाद इत्यादी त्यात आलेले असू शकतील. जुन्याच मुद्द्यांवर पुनःपुन्हा दळत बसण्यात काहीच अर्थ नाही. नवीन नवीन मुद्दे पुढे यावेत.

       मधून मधून आम्हीदेखील ह्या चर्चेमध्ये डोकावून आपली मते मांडू. अर्थात आमची मते ही पुन्हा आमची व्यक्तिगत मते. त्यावरदेखील चर्चा व्हावी.

       सर्व वाचकांचे आभार.

       क०लो०अ०

       – अमृतयात्री गट

     • मराठी शाळा बंद व्हाव्या, मुलांची मराठी संस्कृतीशी नाळ तुटावी असं मराठी माणसांना वाटतं असं कुणाचंच म्हणणं नाही. परंतु “आम्ही आमच्या मुलांना अधिक पैसे भरून इंग्लिश मीडियममध्ये घातलं आहे. मराठी शाळांत गरीब अशिक्षित पालकांची मुलं जातात. त्या शाळा बंद पडत असतील तर सरकारने काय ते पाहावे. आमचे त्याच्याशी काही देणे घेणे नाही.” असं इंग्रजी माध्यमात मुलांना घालणार्‍या पालकांचं म्हणणं नाही असं कुणी छातीठोकपणे सांगू शकेल का? असंख्य सुमार दर्जाच्या इंग्रजी माध्यम शाळा विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगली यावी यासाठी ती उत्तम प्रकारे शिकवण्याऐवजी शाळेत इतर कोणत्याही भाषेत बोलण्यास बंदी घालतात; आणि पालकांना हे आवडते, शासनालाही चालते ही वस्तुस्थिती काय दर्शवते? आणि श्री. वसंत काळपांडे म्हणतात की “मिडीयम इंग्लिश असलं, तरी इतर वळण मराठी असणाऱ्या, मराठी कार्यक्रम साजरे करणाऱ्या कितीतरी शाळा आहेत.” कित्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळा अशा आहेत की तेथे मुख्याध्यापकासह कोणाही शिक्षकाला चांगले इंग्रजी येत नाही. केवळ पालकांना आकर्षित करून भरमसाठ फी उकळण्यासाठी “इंग्लिश मीडियम” अशी पाटी लावलेली असते. सर्व व्यवहार मराठी, हिंदी किंवा इतर भाषेत चालतात. अशा शाळांबद्दलच श्री. वसंत काळपांडे यांनी वरील भाष्य केले असावे. आणि तसं नसलं तरी हा उत्तम शाळा असण्याचा निकष आहे असं कोणत्या शिक्षणशास्त्रज्ञाने ठरवलं? इंगजी माध्यमात मुलांना घालणार्‍या पालकांनी त्यांच्या पाल्याच्या शालेय फीच्या ५० टक्के रक्कम सरकारला मराठी शाळांच्या विकासासाठी द्यावी असा नियम जर केला तर त्यातले किती जण याचे स्वागत करतील?

      पालकांची इच्छा व अनुभव हा जर शिक्षणाचे माध्यम व शासनाचे धोरण ठरवण्याचा निकष असेल तर मग शिक्षणावर आजवर जगात जे असंख्य प्रयोग झालेले आहेत त्यांचे, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लेटो पासून ते जॉन डुई, थोरो, टागोर, गांधींपर्यंतच्या विचारवंतांचे विचार, अनेकांनी यासाठी आपली हयात घालवून जे संशोधन केले त्यांचे निष्कर्ष यांचे काय करायचे? की ते आपल्या काहीच उपयोगाचे नाही? आणि जगातले जे शेकडो देश त्यांचा आदर करून मातृभाषेतच शिक्षण देतात आणि प्रचंड प्रगती करतात त्यांची पद्धत अव्यवहार्य आहे असं श्री.वसंत काळपांडे यांना म्हणायचे आहे की काय? तसे असेल तर जगात शिक्षण, संशोधन यात आपण भारतीय मागासलेले कसे? त्यांच्यापेक्षाही जास्त दर्जाचे कोणते संशोधन/प्रयोग आपल्या देशात कोणत्या शिक्षणतज्ज्ञांनी करून मातृभाषेपेक्षा इंग्रजी ही भारतीयांसाठी शिक्षणाचे माध्यम म्हणून अधिक हितकारी आहे असा निष्कर्ष काढला याची माहिती श्री. वसंत काळपांडे यांनी दिली असती तर तो एक चांगला प्रतिवाद ठरला असता. आणि त्या शेकडो देशांनाही भारतीय अत्याधुनिक संशोधनातून नवीन मूल्यवान व व्यवहार्य विचार मिळाले असते.

      “भारतात इंग्रजी माध्यमात शिकलेल्या आणि नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रचंड आहे.” असे श्री.वसंत काळपांडे म्हणतात. किती टक्के आहे ते सांगता येईल का? मराठी माध्यमातून शिकून नेत्रदीपक कामगिरी केलेल्यांपेक्षा किंवा इंग्रजी/सेमीइंग्रजी माध्यमात शिकून नेत्रदीपक कामगिरी न करणार्‍यांपेक्षा ती जास्त आहे का? आणि जी नावे ते सांगतात ती सर्व मंडळी आपल्या नेत्रदीपक कामगिरीचे श्रेय केवळ आपल्या इंग्रजी/सेमीइंग्रजी माध्यमाला देतात का? आणि आजवर ज्या लाखो मराठी मुलांवर इंग्रजी माध्यम लादले ती जर मराठी माध्यमातून शिकली असती तर त्यांचे नुकसान झाले असते किंवा सर्वांनाच इंग्रजी/सेमीइंग्रजी माध्यमातून शिकवल्यास नेत्रदीपक कामगिरी करणार्‍यांचे प्रमाण वाढेल असा निष्कर्ष त्यातून निघतो का? याबाबत काही सर्वेक्षण/संशोधन कुणी केले आहे काय? अर्थातच सर्व प्रश्नांची उत्तरे “नाही” अशीच आहेत.

      वस्तुस्थिती ही आहे की शिक्षणाचे माध्यम हे इंग्रजी/सेमीइंग्रजी असावे हा निर्णय गुंडपुंड वृत्तीच्या भ्रष्टाचारी राजकीय पुढार्‍यांनी घेऊन त्याचा पालकांच्या शिक्षणशास्त्रातील अज्ञानाचा फायदा घेऊन पद्धतशीर प्रचार गेल्या वीसएक वर्षांत केला आहे. मराठी माध्यमाच्या शाळा राजकारण्यांना ’फायदेशीर’ नसल्या तरी त्या कायद्याने बंद करता येत नाहीत म्हणून त्यांची अवस्था वाईट करायची, त्या अनाकर्षक व दयनीय करून डबघाईला कशा येतील हे पाहायचे जेणे करून लोकांनी विषेशत: सधन लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालावे व राजकारण्यांचा शिक्षणाचा धंदा तेजीत चालावा. कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून प्रचंड प्रमाणावर राजकारण्यांना पोसणारा काळा पैसा तयार होतो. महाराष्ट्रात किती इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा ह्या उघडपणे वा छुपेपणाने कोणत्याही राजकारण्याशी संलग्न नाहीत ते श्री. वसंत काळपांडे सांगू शकतील का?

      • सप्रेम नमस्कार.

       श्री० उन्मेष इनामदार ह्यांनी श्री० वसंत काळपांडे ह्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तरादाखल लिहिलेले पत्र प्रकाशित करीत आहोत. शिवाय आणखीही काही मुद्दे मनात आले, ते खाली लिहिले आहेत.

       {{भारतात इंग्रजी माध्यमात शिकलेल्या आणि नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रचंड आहे. काही मोजकी उदाहरणे;- भक्ती बर्वे-इनामदार, नीना कुलकर्णी, अतुल कुलकर्णी(सेमी-इंग्रजी), विक्रम पंडित, चंदा कोचर, इंद्रा न्युयी, अमर्त्य सेन, सी. व्ही. रामन. ही यादी कितीतरी वाढवता येईल.}}

       ह्याबद्दल इनामदारांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याशिवाय –

       १. मराठीत शिकून नेत्रदीपक कामगिरी करणार्‍यांची नावे देता येतीलच की. किंबहुना आज पन्नाशीच्या पुढील वयोगटातील बहुसंख्य मंडळी मराठीमाध्यमशिक्षितच होती.

       २. आपण दिलेली ही झाली भारतातील इंग्रजीशिक्षित मंडळींची यादी. अशीच यादी इस्रायल, जर्मनी, चीन, कोरिया, जपान, फ्रान्स, बेल्जियम, रशिया ह्या देशांमधील इंग्रजीशिक्षित आणि पुढे नेत्रदीपक कामगिरी केलेल्या मंडळींची देता येईल काय? नाही. कारण त्या देशांत स्वभाषेत उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था असते. तेथील नोबेल पारितोषिकविजेत्या संशोधकांनी इंग्रजीचा अभ्यास केलेला नसतो, एवढेच नव्हे तर जपान, चीन इत्यादी देशांतील संशोधकांना इंग्रजी बोलताच येत नाही. पण तरीही ते देश भारताहून अधिक संशोधन करतात. ते देश भारताहून बहुतेक सर्वच क्षेत्रांत अधिक प्रगती करतात. त्यांच्या देशांत, अगदी भारतानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या इस्रायल देशातही, शिक्षणाचा प्रसार भारताहून कितीतरी अधिक प्रमाणात झालेला आहे.

       {{श्री. उन्मेष इनामदारांनी अशा व्यक्तींचा शोध नक्कीच घ्यावा. कपिल अंधारे किंवा त्यांच्यासारख्या शंका मनात असणाऱ्या कोणाचेच केवळ भावनात्मक आवाहन किंवा वस्तुस्थितीच्या निकषांवर न टिकणाऱ्या विधानामुळे समाधान होऊ शकत नाही. वस्तुस्थितीला सामोरे जायची तयारी ठेवली तरच मराठीसाठी काहीतरी भरीव करता येईल अरण्यरुदनातच समाधान मानायचे ठरवले असेल तर मग मार्गच खुंटला.}}

       भारतात ही वस्तुस्थिती कोणी निवडली? इतर देशांत ती तशी का निवडली नाही? इस्रायलने अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यावर हिब्रू भाषेला राष्ट्रभाषा ठरवून त्यातून शिक्षणाचा प्रसार करून नोबेलविजेते कसे निर्माण केले? खुद्द इंग्लंडमध्ये चारशे वर्षांपूर्वी शिक्षणाची, समाजाची, साहित्याची व ज्ञानाची भाषा म्हणून इंग्रजी वापरलीच जात नव्हती. तिची हेटाळणी होत असल्यामुळे इंग्रजीत बोलणे अडाणीपणाचे समजले जात असे. इंग्रजीतून वैद्यकीय उच्च शिक्षण दिले तर रोगी मरतील, न्यायालयात कायद्याचा वाद घालण्याएवढी तिची लायकी आहे का? इंग्रजी ही केवळ गुंडमवाल्यांची भाषा, असे सर्वसामान्यतः (तेव्हाच्या उच्चभ्रू लोकांकडून) मानले जात होते. मग इंग्लंडमध्ये सामान्य जनतेच्या हितासाठी कायदे करून फ्रेंचला का हुसकावून लावण्यात आले? इंग्रजी भाषेची प्रगती त्यानंतरच का झाली?

       म्हणजे जी भारतात वस्तुस्थिती आहे ती इतर देशांत नाही कारण त्यांनाच ती पसंत नाही. आज भारतात स्वातंत्र्यानंतर जन्मलेली मंडळी पूर्वीच्या मंडळींच्यापेक्षाही मानसिकदृष्ट्या इंग्रजीचे अधिकच गुलाम झालेले दिसतात.

       भाषा हे साधन असते, ज्ञान हे साध्य आहे. ज्ञान मिळवायचे म्हणजे इंग्रजी भाषेतूनच शिकायला हवे अन्यथा ज्ञान मिळणारच नाही, असे केवळ भारतातच मानले जाते, जपान-चीन-कोरिया-स्पेनमध्ये नाही.

       उन्मेष इनामदारांसारख्या मंडळींचे मत असे आहे की वस्तुस्थिती चुकीची आहे, ती दैवाने नाही तर आम्हीच ओढवून घेतलेली आहे. तेव्हा आपणच ती बदलू शकतो. ह्याबद्दल शंका वाटणार्‍या कोणीही इनामदारांनी सांगितल्याप्रमाणे मातृभाषेपेक्षा इंग्रजीमध्ये शिक्षण अधिक चांगले असे म्हणणार्‍या राजकारण्यांचे नव्हे तर शिक्षणतज्ज्ञांचे संदर्भ दाखवून द्यावेत. शिवाय राष्ट्रीय शिक्षण धोरणासंबंधीचे कोठारी आयोग, यशपाल समिती ह्यांचे अहवाल, राष्ट्रीय एकात्मता समितीचा अहवाल हेदेखील वाचून पहावेत आणि मग तज्ज्ञ ह्या विषयी काय म्हणतात ते सांगावे.

       साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जी हलाखीची परिस्थिती होती, जनतेचे हाल होत होते, स्त्रियांवर अत्याचार होत होते, त्यावेळी इतर सर्वांनी ही ‘वस्तुस्थिती’ मान्य करून त्यातून स्वतःच्या दृष्टीने त्यातल्यात्यात फायदेशीर मार्ग निवडले. सर्व मराठी सरदारांनी मोगल किंवा इतर शाह्यांच्याकडे चाकर्‍या पत्करल्या. शिवाजी हा एकच अवतारी पुरुष जन्मला ज्याने स्वराज्याचे स्वप्न पाहिले. इतर सर्वांच्या दृष्टीने तो मूर्खपणा होता आणि वस्तुस्थिती नाकारून केलेले अरण्यरुदनच होते. पण तो माणूस ‘जे योग्य आहे तेच मी करणार’ असे म्हणून त्या कामाला लागला. त्याला सर्वसामान्यांनी साथ दिली. उच्चभ्रूंनी अर्थातच सुरुवातीस विरोधच केला. पण त्याने निश्चयाने स्वराज्याची क्रांती घडवली. स्व-राज्य, स्व-भाषा, स्व-संस्कृती ह्यांचा त्यांनी उत्कर्ष केला. पुढे पेशव्यांनीच पुन्हा उर्दूचा प्रसार करून आपली नाणीदेखील उर्दूमध्ये अक्षरे लिहून पाडली. शिवाजी महाराजांनी शिकवलेला भाषिक स्वाभिमान त्यांनी काही प्रमाणात दुर्बळ केला.

       असो. तर मुद्दा असा की ही वस्तुस्थिती चुकीची असेल तर आपण सर्व मिळून बदलू शकतो की नाही? की तीच योग्य आहे, जगभरात मातृभाषेतून शिक्षण घेत असतील व प्रगती करीत असतील, पण आम्ही इंग्रजीचाच पाठपुरावा करणार, मूठभर लोकंच त्यामुळे शिकली आणि मग त्यांनी सर्वसामान्य जनतेला अशिक्षित ठेवले व नाडले तरी हरकत नाही, असेच म्हणून ती वस्तुस्थिती स्वीकारायची असेल तर मग आहे तसेच चालणार. भारतात शिक्षणाचा प्रसार संथपणेच होणार. विषमताच राहणार. बहुसंख्यांचे हालच होणार. कारण भारताचे भवितव्य, सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची माहिती नसणारी मंडळीच ठरवतात.

       आजची परिस्थिती शिवकालीन परिस्थितीएवढी मोगलाईची नाही. तेव्हा एक शिवाजी जरी जन्मला नाही तरीही बहुसंख्यांनी ठरवले तर आपण ही परिस्थिती बदलू शकते.

       क०लो०अ०

       – अमृतयात्री गट

       • कितीतरी मुद्दे मांडण्यासारखे आहेत, दाखले देण्यासारखे आहेत. परंतु माझ्या एका शंकेचे निरसन श्री. वसंत काळपांडे करतील काय? की माझ्या इंग्रजी माध्यमाद्वारे शिक्षणाचे व्यापारीकरण व भ्रष्टाचार हे मुद्दे श्री. वसंत काळपांडे यांना उत्तर देण्याच्या लायकीचे वाटत नसावेत. तसे असेल तर मग इतर प्रत्येक ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार करणारे राजकारणी शिक्षणाच्या या बाबतीत मात्र भ्रष्टाचार करायचा सोडून देशवासीयांच्या विकासाचा, उज्ज्वल भवितव्याचा इतक्या प्रामाणिकपणे विचार करतात आणि शिक्षणतज्ज्ञांचा तसेच न्यायालयांचासुद्धा एवढा विरोध डावलून अतिशय हिताच्या अशा इंग्रजी माध्यमाचा नेटाने पुरस्कार करतात हे कसे काय? जनतेवरचे किंवा देशावरचे त्यांचे प्रेम फक्त इथेच कसे काय उतू जाते? जसे अट्टल दारुडे कटाक्षाने फक्त देवळात जाताना दारू पिऊन जात नाहीत तशी ही भ्रष्टाचारी मंडळी भ्रष्टाचार अतिशय अपवित्र व शिक्षणाचे क्षेत्र पवित्र मानतात की काय? की या देशात भ्रष्टाचार नाहीच असे श्री. वसंत काळपांडे यांचे मत आहे?

        • मला इतर काही कामांमुळे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी.
         श्री. उन्मेष इनामदार यांनी अतिशय उतावळेपणाने एकाच दिवशी दोन वेळा अभिप्राय दिले. अमृतयात्री यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिष्टसंमत पथ्ये पाळणे आवश्यक नाही काय? ते वापरत असलेल्या भाषेवरून तसे दिसत नाही. अमृतयात्री यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्व ‘किंचित पोक्त’ असल्यामुळे तसे घडत असावे. व्यवसायात किवा प्रत्यक्ष जीवनात आलेल्या कटू अनुभवांमुळेही असे घडू शकते. असो.
         त्यांनी श्री. कपिल अंधारे यांना दिलेल्या उत्तराच्या संदर्भात मी माझे अभिप्राय दिले होते. श्री. इनामदार यांनी इतर अनेक मुद्दे नंतर उपस्थित केले आहेत त्याबद्दल अभिप्राय देऊन चर्चा भरकटू द्यावी असे मला वाटत नाही.
         श्री. इनामदार यांनी “इंग्रजी/सेमी-इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांनी कोणत्याही एखाद्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याची उदाहरणे दाखवता येतील काय?” असे विधान केले होते. त्याला उत्तर म्हणून मी काही उदाहरणे दिली होती. आता हे विधान मागे घेण्याऐवजी अशांची टक्केवारी काय असा प्रश्न ते विचारतात. आकडेवारी दिलीच आणि ती त्यांना सोयीची वाटत नसेल तर तिचे सरळ फसवी किंवा दिशाभूल करणारी असे वर्णन करायचे असा इनामदारी खाक्या दिसतो. अनेक अज्ञानमूलक विधाने ते साक्षात्कार झाल्यासारखे करत असतात. वास्तविक पाहता सर्व अमराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने पूर्वीच घेतला असूनही “सर्वच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत इंग्रजी हा विषय अनिवार्य असलाच पाहिजे” असा प्रस्ताव ते २०१०मध्ये देतात. राजकारणी अशिक्षित असतात असा श्री. इनामदार यांचा समज का झाला आहे? अशा चुकीच्या विधानांमुळे अकारण हसे होते.
         अमृतयात्री यांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भाषा हे साधन आहे, तर ज्ञान हे साध्य आहे हेच खरे. अन्यथा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात अगदी पी. एचडी. पर्यंत कला शाखेत मराठी माध्यमातूनच ८०% पेक्षा जास्त विद्यार्थी शिकले आहेत. या परिस्थितीत इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा ज्ञानशाखांची किती भरभराट व्हायला पाहिजे होती. पण तसे घडले नाही.
         मी मराठी माध्यम असावे ह्याच मताचा आहे. पण आहे त्या परिस्थितीत व्यवहार्य मार्ग काढून पुढे जावे असे माझे मत आहे. मराठी भाषा आणि संस्कृती यांच्याबद्दल जे पोटतिडीकीने बोलतात ते साहित्यिक (साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांपासून) आणि. ‘मराठी शाळा लढा’ देणारे नेतेच जर त्यांच्या मुलांना/नातवंडांना इंग्रजी माध्यमात टाकत असतील तर इतर पालकांची अज्ञानी मेंढरे म्हणून हेटाळणी करायचा आपल्याला अधिकार कसा पोहोचतो? महाराष्ट्रात अजूनही मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचीच संख्या खूप जास्त आहे. महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमात केवळ १४% विद्यार्थी शिकतात. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात हे प्रमाण ३६% एवढे जास्त आहे.
         अभिजन समाजातील मुले इंग्रजी शाळांमध्ये शिकतात याचे दु:ख करत बसण्यापेक्षा मराठी माध्यमात शिकत असलेल्या बहुजन समाजातल्या मुलांना मराठी आपली भाषा कशी वाटेल, त्यांच्या भाषांना आपण प्रमाण भाषेत कितपत सामावून घेतो याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची खरी गरज आहे.

 3. शेजारच्या छोट्या मुलाला विचारलं, तू हुशार आहेस का रे बाळ? “हो”. मग सांग बघू, बे दुणे किती, तर पटकन सांगतो “चार”. आता तेरा साते किती सांग बघू? विचारलं तर म्हणतो, “काका तुमची शर्टाची बटणं वरखाली आहेत.” पुन्हा तेच विचारलं तर म्हणतो “काका तुम्ही दाढी नीट नाही केली आहे”. वसंतराव काळपांडे यांची उत्तरे काहीशी अशीच आहेत. त्यांच्याकडून अपेक्षित असलेली उत्तरे देण्याऐवजी मूळ लेखातून त्यांनी वाचकांची दिशाभूल केली ती केलीच शिवाय माझी वैयक्तिक निदा करून वाचकांचे लक्ष दुसरीकडे वळवून येथेही वाचकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो.

  त्यांच्याकडून पुढील प्रश्नांची उत्तरे अपेक्षित होती.

  १. मी दिलेला आईच्या दुधाचा दाखला शिक्षणाला लागू कसा नाही?

  २. भारतात मातृभाषेपेक्षा इंग्रजी हे माध्यम म्हणून अधिक हितावह आहे हा शोध कोणत्या शिक्षणशास्त्रज्ञाने कोणत्या संशोधनाअंती लावला?

  ३. जगातले शेकडो देश जे आपल्या मातृभाषेतूनच सर्व शिक्षण देतात व प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती करतात त्यांचे कोणते व्यावहारिक नुकसान झाले आहे?

  ४. भारतासह जगभर असंख्य शिक्षणतज्ञांनी प्रचंड प्रयोग व संशोधन करून मातृभाषा हेच शालेय शिक्षणाचे माध्यम आहे हा निष्कर्ष निरपवादपणे काढलेला आहे. शासनाने नेमलेल्या प्रत्येक समिती/आयोगानेही अशीच शिफारस केलेली असताना ते धुडकावून त्याच्या विपरीतच का केले जाते?

  ५. अशिक्षित, गुंड व भ्रष्ट राजकारण्यांनी इंग्रजी हे शिक्षणाचे माध्यम लूटमार व भ्रष्टाचाराच्या उद्देशाने पद्धतशीरपणे प्रचार करून लोकांवर लादलेले आहे हे खोटे कसे?

  ६. जगातल्या २०० अव्वल विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही याचे कारण आपले अव्वल विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या किडीला बळी पडून मागे राहिले हे खोटे कसे?

  महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमात शिकणारे फक्त १४ टक्के आहेत त्यामुळे मराठीला काहीही धोका नाही हे काळपांडे यांचे म्हणणे तर अत्य़ंत आक्षेपार्ह आहे. याचा अर्थ मराठीचा वेलू फक्त १४ टक्के किडला आहे. ही कीड १४ टक्क्यांवर थांबली आहे का? तर तसेही नाही. आणि रसाळ, गोमटी फळे येणार्‍या फांद्यांनाच हा किडीचा प्रदुर्भाव झालेला आहे.

  {{मराठी भाषा आणि संस्कृती यांच्याबद्दल जे पोटतिडीकीने बोलतात ते साहित्यिक (साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांपासून) आणि. ‘मराठी शाळा लढा’ देणारे नेतेच जर त्यांच्या मुलांना/नातवंडांना इंग्रजी माध्यमात टाकत असतील तर इतर पालकांची अज्ञानी मेंढरे म्हणून हेटाळणी करायचा आपल्याला अधिकार कसा पोहोचतो?}}

  परंतु अशी अपेक्षा वसंतराव करतातच कसे काय? एखाद्या भयंकर रोगाची साथ पसरल्यावर कित्येक पहिलवानांना तसेच डॉक्टरांनासुद्धा त्या रोगाची लागण होत नाही काय? इथे तर सर्व सत्ता, पैसा, शक्ती व शासकीय यंत्रणा वापरून हा रोग पसरवला जातो आहे.

  ७. सर्व जग याबाबतीत आधुनिक शिक्षणशास्त्रानुसार चालत असताना आपल्या देशात पालकांची इच्छा हा शिक्षणाच्या माध्यमाचा निकष कसा काय होऊ शकतो यावरही ते बोलत नाहीत. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी लोकांच्या इच्छेवर सोडल्या तर चालतील? धोरण म्हणून काही असते की नाही? कुणी म्हणतील आम्ही रुपयाऐवजी डॉलरमधे आपसात व्यवहार करू. चालेल? कुणी म्हणेल आम्ही जन गण मन ऐवजी इंग्लंडचे राष्ट्रगीत म्हणू. चालेल? कुणी म्हणेल आम्हाला चीनचा किंवा जपानी झेंडा आवडतो. आम्ही तो फडकवणार. चालेल?

  ८. सेमीइंग्रजी हा व्यवहार्य मार्ग असे वारंवार ते सांगतात पण हा व्यवहार नेमका कोणता हे ते सांगत नाहीत.

  व्यवहार म्हणजे काय? जगातल्या गुगल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, सोनी, कॅनन, निकॉन अशा बलाढ्य कंपन्यांचे कोणतेही उत्पादन पाहा. ते वापरणार्‍याला या कंपन्या भाषेचा पर्याय देतात. यात जगातल्या ६०-७० तरी भाषा असतात. यात मराठी तर सोडाच पण हिंदीसुद्धा बरेचदा नसते; कारण त्यांच्या लेखी आपण भारतीय हे इंग्रजी भाषिक असतो. पण त्यात असलेल्या या काही भाषांची नावे पाहा. Faeroese, Galician, Inuktitut, Maltese, Maori, Sotho, Tatar, Tswana, Xhosa, Zulu अशा जगाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात तुलनेने अतिशय लहान भाषिक समूहाकडून परंतु अतिशय अभिमानाने बोलल्या जाणार्‍या भाषा त्यात असतात. याचे कारण या मोठ्या कंपन्यांना बाजारपेठेचा इतका लहानसा भागसुद्धा गमवायचा नसतो. म्हणून ते लहान समूह असला तरी त्यांच्या पुढे गुढघे टेकून ती भाषा चांगली येणार्‍यांना कामावर ठेवून त्यांच्याकडून ती भाषासुद्धा आपल्या उत्पादनात समाविष्ट करतात. यातून दोघांचाही फायदा होतो. याला म्हणतात व्यवहार. वसंतराव काळपांडे म्हणतात तो व्यवहार नसून गुलामगिरी आहे. ’व्यवहार’ असेलच तर तो भ्रष्ट राजकारण्यांसाठी. मी राजकारण्यांना अशिक्षित, गुंड, भ्रष्ट म्हटल्याने वसंतरावांना राग का यावा? राजकारणी अशिक्षित नसल्याचा दावा वसंतराव करतात. तर मग कोणता राजकारणी इतका उच्चविद्याविभूषित आहे की ज्याने सर्व तज्ज्ञ समित्या/ आयोग यांच्या अभ्यासपूर्ण शिफारशी धुडकावून मनमानी करणे क्षम्य ठरते, ते तरी सांगावे. म्हणजे आम्हीही त्याच्याकडे अत्यादराने पाहू. केवळ निरर्थक विधाने काय उपयोगाची?

  तंत्रज्ञान जसजसे आणखी प्रगत होत जाईल तसे शिक्षण या गोष्टीचा इंग्रजी भाषेशी फारसा संबंध नाही हे सत्य भारतीय जनसामान्यांना हळूहळू समजत जाणारच आहे. त्या वेळी इतकी वर्षे ही मंडळी मुलांच्या शिक्षणाच्या वाटेवर इंग्रजीचे सापळे लावून कशी लोकांची लूटमार करत होती ते लक्षात येणारच आहे. पण तोपर्यंत होणारे नुकसान टाळण्यासाठी जेवढ्या लवकरात लवकर हे घडेल तेवढे चांगले.

 4. सप्रेम नमस्कार.

  श्री० उन्मेष इनामदारांचे पत्र प्रकाशित करीत आहोत.

  ह्यापुढे प्रत्येकाने आपल्या प्रत्येक नवीन मुद्द्यास नवीन अनुक्रमांक द्यावा आणि दुसर्‍याच्या मुद्द्याचा प्रतिवाद करताना त्याचा स्पष्ट संदर्भक्रमांक द्यावा.

  दुसर्‍याच्या सर्व मुद्द्यांना उत्तरे देऊन मगच आपले नवीन मुद्दे मांडावे.

  सर्व वाचकांनी नुकताच प्रकाशित झालेला खालील लेखदेखील अवश्य वाचावा.

  हे शिक्षण आपलं आहे? (ले० प्रा० मनोहर राईलकर) –} http://wp.me/pzBjo-O7

  आम्ही मागे सुचवलेले इतर लेख वाचले आहेत का? इथे चर्चा होत असलेल्या बर्‍याच मुद्द्यांचा ऊहापोह आधीच तिथे झालेला आहे.

  क०लो०अ०

  – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s