मराठीचा बोलु कौतुके… (ले० अमृता गणेश खंडेराव, दै० लोकसत्ता)

“तुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते. तुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे नागरिक बनवत आहोत की लंडनचे, असा मला प्रश्न पडतो. भारताच्या संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल. ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि ही संस्कृती सर्वत्र भाषेत विखुरलेली आहे. लोकांची कामं करायची असतील तर लोकांच्या समस्या समजल्या पाहिजेत. लोकांच्या समस्या समजायच्या असतील तर लोकभाषा आली पाहिजे. लोकभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद शक्य नाही.”

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२ च्या लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला अमृता गणेश खंडेराव ह्यांचा एक उत्तम आणि विचारप्रवर्तक लेख.

आज इंग्रजी शाळांमधून ज्या पद्धतीने भाषा शिकवली जात आहे त्यातून मुलांची भाषिक सौंदर्याचा, साहित्य संपदेचा आस्वाद घेण्याची क्षमता आणि वृत्तीच मुळापासून छाटून टाकली जात आहे. राष्ट्राबद्दल, राज्याबद्दल, भाषा आणि संस्कृतीबद्दल जी ओढ आणि अस्मिता वाटायला पाहिजे तीच वाटेनाशी झाली आहे. इंग्रजी साहित्याचा आस्वाद घ्यावा इतकं इंग्रजीचं ज्ञान मिळत नाही आणि मराठी साहित्याचा आस्वाद घ्यावा तर मराठी वाचन कौशल्य अवगत नाही. वाचनकौशल्याचा विकास झाल्याशिवाय ज्ञानग्रहणक्षमतेचा कसा विकास होईल? ‘ना घर का ना घाट का’ अशी विद्यार्थ्यांची अवस्था झाली आहे. मुलं भाषिक बकालपणाचा बळी ठरत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या त्रभाषिक सूत्रानुसार शालेय स्तरावर इतकी वर्षे मराठी प्रथम भाषा म्हणून शिकवली जात असे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची चलती सुरू झाल्यानंतर सेमी इंग्रजी असा प्रकार उदयास आला आहे. वस्तुत: पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य केल्यानंतर दहावीपर्यंत विद्यार्थ्यांला इंग्रजी भाषा उत्तम तऱ्हेने अवगत व्हायला काहीच हरकत नाही. परंतु पालकांचा या पद्धतीवर विश्वास बसलेला दिसत नाही. मग संपूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मराठी तृतीय/ निम्न दर्जाची भाषा म्हणून शिकवली जाते.

मराठी माध्यमातली मुले पाचव्या इयत्तेत मराठी वाचनकौशल्यात बऱ्यापैकी पुढे गेलेली असतात. वाचलेले समजणे आणि लिखित व मौखिक पद्धतीने उद्धृत करण्याची क्षमता त्यांच्यात आलेली असते. इसापनीती, पंचतंत्र, दैनिक वृत्तपत्रे, इतर बालवाङ्मय ती वाचू शकतात. त्याचा आस्वाद आणि आनंद घेऊ शकतात. याउलट इंग्रजी माध्यमातली मुले हे सर्व वाचू शकत नाहीत. बरं, नाही मराठी तर इंग्रजी वाचन. पण इंग्रजीत उपलब्ध असलेले बालवाङ्मय त्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यातल्या त्यात हुशार मुलं ते वाङ्मय वाचू शकतात, पण त्याचा आस्वाद लुटणे ही क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नसते.

महाराष्ट्राचा विचार करता इथली प्रादेशिक भाषा मराठी असल्याकारणाने मराठीत विपुल साहित्य/ बालसाहित्य वाचनासाठी उपलब्ध असते.
त्या तुलनेने इंग्रजी साहित्यसंपदा मर्यादित आहे. मराठीतले साहित्य वाचताना सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ एकच असल्यामुळे आकलन आणि आस्वाद एकाच पातळीवर चालू राहतो. इंग्रजी साहित्याचा आस्वाद घेताना विद्यार्थ्यांना अनेकदा या अडचणी येतात. उदाहरणच द्यायचे झाले तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून ज्या ऱ्हाइमस् अथवा कविता शिकविल्या जातात त्यात एक कविता अशी आहे,

To market to market
to buy a fat pig
home again home again
jiggetti jig.
To market to market
to buy a fat hog
home again, home again,
jiggeti jog.

या कवितेत घोडागाडी चालविणारा एक हॅट घातलेला लहान मुलगा आणि त्याच्यासोबत गाडीत एक शुभ्र गुबगुबीत डुक्कर बसलेले आहे. कोपऱ्यात छतावर चिमणी (धूर बाहेर काढणारी चिमणी) असलेलं विटांचं घर आहे. हे पाहून आणि वाचून बरेच प्रश्न पडतात. महाराष्ट्रात घोडागाडी फार कमी आढळते. त्यापेक्षा ग्रामीण भागाला बैलगाडी सार्वत्रिक माहीत आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्या खेडय़ात चिमणीची घरं आहेत? कुठल्या भागात बाजारातून जाडीजुडी डुकरं विकत मिळतात? आणि कोणते लोक बाजारात जाऊन डुक्कर विकत आणतात? बैलगाडी हाकताना ‘हुर्र्र हो’ असा आवाज काढला जातो, पण ‘जिगेटी जिग’ हा आनंददर्शक चीत्कार महाराष्ट्रीय मुलाने जन्मात तरी ऐकलेला असतो का? डुकराचे मास खाणारी एखाद-दुसरी जमात महाराष्ट्रात अस्तित्वात आहे; परंतु ही लोकं गाडीत घालून डुकरं विकत आणत नाहीत, तर काठीला पाय बांधून नेतात. अशा आपल्या भाषेशी, मातीशी, संस्कृतीशी कुठलाही संबंध नसणाऱ्या कविता शिकविण्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत.

बालवयात (वाचता न येण्याच्या वयात) पाठ केलेल्या कविता, गाणी, गोष्टी मुलाचे भावविश्व समृद्ध करण्याचे काम करत असतात. आईच्या कडेवर बसून चांदोबा बघत खाल्लेला दूधभात किंवा चिऊ-काऊ पाहात खाल्ले जाणारे बाळघास बाळाला काय देत नाहीत? आईचा स्पर्श, वात्सल्य, मातृभाषेचा लळा, पोट भरल्याचा आनंद, आपल्या भौगोलिक परिस्थितीत निर्माण झालेलं अन्न.. या साऱ्या गोष्टी बाळाला आंतरिक सुखाचा प्रत्यय देतात. इंग्रजी शाळेत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी शिक्षकवर्ग इंग्रजीतून बोलत नाहीत. मुख्यत: हिंदीतून बालकांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात. मध्ये मध्ये इंग्रजी शब्द पेरतात, कारण प्रादेशिक भाषेच्या पाश्र्वभूमीतून आलेली बालके अचानक एकदम अनोळखी भाषेचे ध्वनी ऐकून गोंधळून जाऊ शकतात. त्या दिवसानंतर कधी विद्यार्थ्यांची गरज म्हणून तर कधी शिक्षकाची मर्यादा म्हणून वर्षांनुवर्षे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हिंदीतून संवाद केला जातो. त्या शाळेतल्या मधल्या सुट्टीत शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गप्पागोष्टी ऐकल्या तर या शाळांना इंग्रजीऐवजी हिंदी माध्यमाच्या शाळा का म्हणू नये, असा प्रश्न पडतो. इंग्रजी अवगत नसल्यामुळे अशा शाळांमधून प्रथम भाषेप्रमाणे हिंदी सर्रास वापरली जाताना आढळते. शिक्षक आपली भाषा वापरत नसल्यामुळे येणारा परकेपणा हिंदीच्या वापरामुळे कमी होतो, पण मातृभाषा वापरताना होणारा सहजतेचा आणि आंतरिक समाधानाचा प्रत्यय मात्र या व्यवहारातून मुलांना मिळत नाही.

ग. ह. पाटलांची ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो’ ही कविता पाठय़पुस्तकातून शिकलेल्या पिढीचे भावजीवन आपल्या ग्रामसंस्कृतीशी जुळलेले होते. काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, मोठय़ा शहरातल्या मुलांना बैलगाडी, उखळ, ऐरण, जाते, औत हे शब्द नुसते चित्र पाहून आकलन होत नाहीत. पण मग परदेशातली डुकरं गाडीतून विकत आणायची संस्कृती त्यांना आकलन होते का? त्यापेक्षा दृक्श्राव्य माध्यमे वापरून भारतातलं खेडेगाव, तिथली व्यवस्था आणि तिच्यातल्या समस्या, तिथलं ग्रामजीवन शिकवणं फार अवघड आहे का? या निमित्ताने इंडियात जगणाऱ्या मुलाला भारतातल्या संस्कृतीची तोंडओळख तरी होईल.

‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन’ या कवितेपेक्षा सातपुडा, सह्य़ाद्री, ताजमहाल, भाक्रा नानगल यांची वर्णनं असलेल्या कविता का नसाव्यात? महाराष्ट्रात इतके निर्मितीक्षम शिक्षक आहेत, कवी आहेत की ते या विषयांवर इंग्रजीत छान गाणी लिहू शकतात. शासनाने, शैक्षणिक संस्थांनी त्यांना तशी विनंती करावी. नको तुम्हाला मराठी तर नको, नको प्रादेशिक भाषा तर नको, पण तुम्हाला अखंड भारत आणि त्यातील विविधताही वज्र्य आहे काय?

भाषा कंगाल झाली आहे. तुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते. तुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे नागरिक बनवत आहोत की लंडनचे, असा मला प्रश्न पडतो. भारताच्या संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल. ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि ही संस्कृती सर्वत्र भाषेत विखुरलेली आहे. लोकांची कामं करायची असतील तर लोकांच्या समस्या समजल्या पाहिजेत. लोकांच्या समस्या समजायच्या असतील तर लोकभाषा आली पाहिजे. लोकभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद शक्य नाही.

वर्गात जालियानवाला बाग हत्याकांड शिकवल्यानंतर माझ्या चंद्रकला नावाच्या मैत्रिणीने माझा हात घट्ट धरला आणि ती मला म्हणाली, ‘‘या सगळ्या इंग्रजांना मी एके दिवशी हाकलून देणारे बघ.’’ कच्च्या मातीच्या घरात राहणाऱ्या कोवळ्या चंद्रकलेच्या मनात इतका ‘काँक्रीट’ देशाभिमान रुजवणाऱ्या आमच्या कौलारू जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आमचे मराठी माध्यमातले शिक्षक दोघांना सलाम. हा परिणाम केवळ मातृभाषेमुळे साधला गेला होता.

मी स्वत: इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भाषा विषयाचं अध्यापन केलं आहे. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की, या शाळेतल्या मुलांकडे इंग्रजीचं जे ज्ञान आहे ते फार वरवरचं आहे. त्यांना दुसऱ्याने बोललेलं इंग्रजी समजतं, पण स्वत:चं भाषाप्रभुत्व त्यांच्याकडे फार कमी आहे. त्यांना शब्दांचे अर्थ समजतात, पण ‘मिनिंग बिटविन द लाइन्स’ कळत नाही. शब्दार्थ समजतो, पण आशय आकलनात समस्या येतात. ना ती मराठी कादंबरी वाचू शकत, ना इंग्रजी नॉवेल समजू शकत आणि वाचनसंस्कार नसल्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासातल्या भाषिक विकासाचा टप्पा त्यांना ओलांडता येत नाही. वाचनसंस्कार पक्का नाही तर वाचनवेड कुठून असणार? याचा मौखिक आणि लिखित स्वरूपाच्या अशा दोन्ही अभिव्यक्तींवर परिणाम होतो.

भाषिक अभिव्यक्तीत संभाषण आणि लेखन दोन्ही पातळ्यांवर बहुतांश मुले मागे पडतात. त्यामुळे अनेकदा भावनिक विकासात अडथळा निर्माण होतो. भाषेचा भावनिक विकासात मोठा वाटा असतो. मला ज्याप्रमाणे सुख हवेसे वाटते, तसेच ते दुसऱ्यालाही आवश्यक आहे. मी सुखी व्हायचं असेल तर माझा समाजही सुखी व्हावा लागतो, या भावना भाषेद्वारे वैश्विक पातळीपर्यंत पोहोचवता येतात. ‘जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत!’ अशी सर्वाभूती परमेश्वराची जाणीव मातृभाषेशिवाय मिळत नाही. मातृभाषेद्वारेच व्यक्तीचा भावनिक विकास पूर्णत्वाला जाऊ शकतो. अशा समृद्ध भावविश्व असलेल्या व्यक्तीच्या सामाजिक बांधीलकीच्या भावनाही ठाम असतात. अशी सामाजिक बांधीलकी असेल तर समाजात एकोपा आणि निरोगी जीवनव्यवहार होऊ शकतात. ही फार मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणाची तीन वर्षे इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी काय शिकवावे याबाबत शासनाने निश्चित धोरण ठरवले पाहिजे.

माझ्या वर्गातली दोन मुले अशी होती की, ज्यांची आई कधीच पालकसभेला येत नसे. एका महिन्यात दोघांची दप्तरे ऑफिसमध्ये नेऊन ठेवली आणि ‘आई आल्याशिवाय देणार नाही’ असे सांगून दोघांना घरी पाठवले. दुसऱ्या दिवशी एकाची आई आली. ती म्हणाली, ‘‘मी खानावळ चालवते त्याची याला लाज वाटते. याची इंग्रजी माध्यमाची फी आमच्या कुटुंबाला परवडत नाही. वडील खासगीत नोकरी करतात, पण हा खूप हुशार आहे म्हणून याला इंग्रजी शाळेत टाकला. मला दुसरं काही येत नाही म्हणून मी लोकांचे डबे करून देते.’’ दुसऱ्या मुलाची आई तीन दिवसांनंतर आली. तोपर्यंत तो मुलगा शाळेतच आला नाही. ती खूप अवघडल्यासारखी दिसत होती. ती म्हणाली, ‘‘मी नऊवारी लुगडं नेसते त्याची याला लाज वाटते. म्हणून तो मला शाळेत येऊ देत नाही. आज मी दुसऱ्याकडून सहावारी मागून आणलं आणि नेसून आले आहे.’’ मला माझ्या भाषेचाच लळा नाही तर ती बोलणाऱ्या माणसांबद्दल कसं प्रेम वाटणार? आईच्या कष्टाची, नेसण्याची, व्यवसायाची लाज वाटण्याचं कारण जर हाय-फाय शाळा होत असतील तर उद्या यांना आपल्या समाजाची, देशाची, संस्कृतीची लाज वाटेल. आपल्या देशाच्या नागरिकत्वाची लाज वाटेल. हा देश सुधारण्यापेक्षा सोडून जाणं सोपं वाटेल.

प्रश्न फक्त भाषेचा नाही, पण प्रश्नाच्या मुळाशी भाषा आहे. आईला आधुनिक पेहराव घालून ‘हाय-हॅलो’ करता येत नाही म्हणून आईची लाज वाटते. दगडाधोंडय़ाची आहे म्हणून भाषेची लाज वाटते. आपण वय वर्षे तीन ते सहा या अत्यंत कोमल संस्कारक्षम वयात मुलांच्या मनावर काय बिंबवत आहोत त्याची ही फळं आहेत. खिल्लारी बैलजोडी सोडून घोडागाडीतून डुकरं विकत आणायला निघाल्यावर दुसरं काय होणार आहे?

लोकसत्तेमधील मूळ लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=247854:2012-09-02-14-55-27&catid=363:2011-08-09-18-22-46&Itemid=367

आपल्या प्रतिक्रिया ह्या लेखाखालील चर्चाचौकटीमध्ये अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s