अमृतमंथन-परिवाराचे सदस्य श्री० संजय नाईक ह्यांनी मराठी भाषेमधून विज्ञानाच्या प्रसारासाठी झटणार्या ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या वतीने खालील पत्रक आपल्या माहितीसाठी पाठवले आहे.
थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५व्या जन्मवर्षानिमित्त – ‘मराठी विज्ञान परिषद’, पुणे विभाग, यांचे तर्फे ‘गणित–प्रयोग–उपक्रम स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे.
गणित विषय शिकविताना अनेक शिक्षक विविध प्रकारच्या प्रतिकृती वापरून गणित विषयातील एखादी संकल्पना मुलांना सोपी करून समजावून देतात. काही शिक्षक किंवा पालक, कोडी अगर ठोकळे यांचा उपयोग करून वस्तुपाठ सोपा करून दाखवितात, तर काही जण कवितेच्या माध्यमाचा वापर करून तोच हेतू साध्य करताना दिसतात. अशा शिक्षकांना किंवा पालकांना किंवा गणित विषयात अशा प्रकारचे प्रयोग केलेल्या गणितविषयप्रेमींना या ‘गणित–प्रयोग–उपक्रम स्पर्धे’त भाग घेण्याचे आम्ही ‘मराठी विज्ञान परिषदे’तर्फे आवाहन करीत आहोत. स्पर्धकांनी आपल्या प्रयोगाची/उपक्रमाची माहिती दि. १५ जुलै २०१२ पर्यंत लेखी स्वरूपात खालील पत्त्यावर पाठवावी. त्याचबरोबर आपले व आपल्या गणित-प्रयोग-उपक्रमाचे छायाचित्र जरूर पाठवावे. प्राथमिक फेरीत निवड झालेल्या व्यक्तींना अंतिम फेरीत आपल्या प्रयोगाचे सादरीकरण करावे लागेल. अंतिम फेरीत निवडल्या गेलेल्या उत्तम उपक्रमांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
आपण गणिताच्या अभ्यासासाठी तयार केलेले प्रारूप/प्रतिकृती (मॉडेल), कोडी, कविता इत्यादींची कल्पना आपल्याला कशी सुचली? ते प्रत्यक्षात आणताना आपणाला कोणत्या अडचणी आल्या? आपण त्या अडचणींवर कशी मात केली? आपल्या प्रतिकृतीला विद्यार्थीवर्ग, सहकारी तसेच विषयतज्ज्ञांकडून कसा प्रतिसाद मिळाला? आपल्या प्रतिकृतीचा वापर इतरांना कशा प्रकारे करता येईल? असे यशस्वी उपक्रम गणिताच्या प्रसारासाठी उपयोगी पडावे म्हणून त्यांच्याबद्दलच्या माहितीचे संकलन करून मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, एक पुस्तक छापणार आहे, त्यात आपली प्रतिकृती समाविष्ट करण्यास आपली अनुमती असेल का? ह्या मुद्द्यांबद्दलचे आपले अनुभव/विचार आम्हाला नक्की कळवावेत.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क – संजय भामरे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४११०३०, चलभाष – ९५५२५२६९०९, ई-मेल mavipa.pune@gmail.com.
.