“आपल्या भाषेद्वारे धन, मान व ज्ञान मिळू लागले तर या परिस्थितीत निश्चितच फरक पडू शकेल. हे सर्व बदल ओघाने, टप्प्या-टप्प्यानेच होतील; पण त्यासाठी योग्य अशी वातावरणनिर्मिती प्रथम घडवून आणली पाहिजे.”
‘अंतर्नाद’ मासिकाच्या २०११ या वर्षाच्या दिवाळी अंकातील ‘मराठीपण जपणे म्हणजे नेमके काय?’ या विषयावरील परिसंवादातील श्री० सलील कुळकर्णी यांचा हा लेख.
◊ ◊ ◊
आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे
(‘अंतर्नाद’ २०११ दिवाळी अंकातील लेख)
मराठीपण जपण्याविषयी विचार करण्याआधी आपण ‘मराठी म्हणजे काय?’, ‘मराठी माणूस म्हणजे कोण’ आणि ‘मराठीपण म्हणजे काय’ या मुद्द्यांवर थोडासा विचार करू या.
मराठी म्हणजे काय? आपण जेव्हा ‘मराठी’ हा शब्द सामान्यार्थाने वापरतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी एकत्रितपणे अभिप्रेत असतात. त्यात केवळ मराठी प्रमाणभाषाच नव्हे तर त्याचबरोबर बहुजनांमध्ये वापरल्या जाणार्या तिच्या प्रादेशिक उपभाषा, तसेच अहिराणी, झाडी, शाहिरी, मालवणी, वर्हाडी ह्यांच्यासह मराठीच्या विविध बोलीभाषा, शिवाय मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी समाज, तसेच मराठी माणूस आणि त्याची अस्मिता, मानसिकता, जीवनपद्धती, त्याच्या रूढी, परंपरा इत्यादी सर्वांचा एकत्रितपणे समावेश असतो.
मराठी कोण? ‘प्रथमपासून महाराष्ट्रातच वसलेल्या कुळात जन्मलेला तो मराठी’ अशी मराठी माणसाची अत्यंत संकुचित व्याख्या अनेकदा केली जाते. पण मग अनेक पिढ्या बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, बेळगाव, कारवार, तंजावूर, मॉरिशस अशा देशविदेशातील विविध ठिकाणी स्थायिक असणार्या आणि आपल्या मराठीपणाबद्दल अभिमान बाळगणार्या मंडळींचे काय? काही अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रातील काही समाजगटांचे मूळ भारताबाहेरून आलेल्या शक-कुशाण जमातींमध्ये आहे तर इतर काही गट उत्तर भारतातील किंवा दक्षिण भारतातील विविध ठिकाणांहून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत. मग ती मंडळी मराठी मानायची नाहीत का? शिवाय या व्याख्येनुसार महान उद्योगपती वालचंद हिराचंद शेठ किंवा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, ज्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अत्यंत अभिमान वाटतो, अशा अनेक नररत्नांना अमराठी ठरवावे लागेल. काही इतिहासकारांच्या मते स्वतः शिवाजी महाराजांचे कूळही मेवाडातील शिसोदिया या राजपूत राजवंशाशी संबंधित आहे. तसे असले तर मग मराठी साम्राज्याची स्थापना करणार्या या अवतारी पुरुषास आपण अमराठी म्हणावे काय? महाराष्ट्रात राहणारे मालपाणी, शहा, पांडे, अशी आडनावे असणारी किंवा धर्माने मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू असणारी अशी अनेक माणसे मला माहीत आहेत की ज्यांना आपल्या मराठीपणाबद्दल मुंबई-पुण्याच्या उच्चभ्रू मराठी मंडळींपेक्षाही अधिक अभिमान वाटतो आणि त्यातील कित्येकजणांनी मराठी साहित्य, संस्कृती व समाजाच्या उन्नतीसाठी व सन्मानासाठी बहुमूल्य हातभार लावलेला आहे. म्हणूनच ’जो स्वतःला मराठी समजतो तो मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची सोपी व्याख्या करावी असे मला वाटते. ही व्याख्या त्याच्या जन्मस्थान, वसतिस्थान, वांशिक पार्श्वभूमी, आडनाव, धर्म, पंथ, जात इत्यादी घटकांवर मुळीच अवलंबून नाही. त्याचबरोबर पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्रात राहणार्या व येथील कायदेशीर अधिवासपत्र मिळवलेल्या, पण तरीही मराठी भाषेला व संस्कृतीला परकी मानणार्या व्यक्तीस मराठी मानता येणार नाही असेदेखील मला वाटते.
मराठीपण म्हणजे काय? ‘अस्मिता’ हा शब्द संस्कृतमधील ‘अस्मि’ (मी आहे) या क्रियापदापासून निर्माण झाला. ‘माझे असणेपण’ ही भावना ‘अस्मिता’ या शब्दातून अभिव्यक्त होते. त्यालाच मराठीमध्ये स्वत्व, किंवा ढोबळपणे व्यक्तित्व, ओळख, परिचय (इंग्रजीत ‘identity’) असे म्हणता येईल. (इथे आजच्या राजकारण्यांनी ‘अस्मिता’ या शब्दाला दिलेल्या ‘अभिमान’ किंवा ‘गर्व’ अशा प्रकारच्या चुकीच्या व विकृत अर्थच्छटा आपण बाजूला ठेवू.) मराठी समाजाच्या संदर्भात ‘अस्मिता’ म्हणजेच त्याचे ‘मराठीपण’ आणि म्हणजेच मराठीजनांच्या मराठी असण्यामुळे त्यांच्यात सामान्यतः आढळणारे व्यवच्छेदक गुण. यात केवळ स्वभाववैशिष्ट्येच नव्हे तर संस्कृती, रूढी, परंपरा, मानसिकता, आवडीनिवडी, शारीरिक वैशिष्ट्ये, अंगभूत कौशल्ये अशा इतर अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यांचाही समावेश असतो. त्या समाजातील माणसांच्या विविध वैशिष्ट्यांचा तो ढोबळ मानाने ‘म.सा.वि’ असतो. यालाच आपण त्या गटाचा ‘समाजस्वभाव’ असेही म्हणू शकू.
संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचू शकता.
आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे_111105
◊ ◊ ◊
.
आपल्या प्रतिक्रिया, आपली मते या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
ता०क० प्रस्तुत लेखातील काही मुद्द्यांबद्दलचे संदर्भ किंवा अधिक सविस्तर चर्चा खालील लेखांत आढळतील. वाचून पाहा.
Tags: अस्मिता, भाषाभिमान, भाषाविषयक धोरण, मराठी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी माध्यम,मराठी माध्यमातून शिक्षण, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठीची चळवळ, मराठीचे प्रश्न, महाराष्ट्र, मातृभाषा, मायबोली,राज्य शासन, राज्यशासन, शिक्षणविषयक धोरण, शिक्षणाचे माध्यम, सलील कुळकर्णी, स्वाभिमान, EDUCATION POLICY, GOVERNMENT, MAHARASHTRA, MARATHI, MARATHI LANGUAGE, MEDIUM OF EDUCATION,MOTHER TONGUE, PRIDE, SALEEL KULKARNI, SELF ESTEEM, STATE GOVERNMENT
.
aai cha man apan rakhala pahije te apale adaya
kartavya aai tya aadhi aai la aaich mananavayas
aai ne shikvave karan aai shabdatale prem mummy
kivha mom madhe nahi
प्रिय श्रीमती अरुंधती गुंजकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले पत्र वाचून आनंद झाला. अपल्यासारखी मायबोली-प्रेमी माणसे आज अल्पसंख्य असली तरी ही जात (वर्ग या अर्थी) अजूनही पूर्णपणे नष्ट झालेली नाही. आपण आपली मते व्यक्त करीत राहू, इतरांना पटवून देत राहू.
आपण आपल्या पत्रात व्यक्त केलेले मत योग्यच आहे. पण ते आजच्या आधुनिक (?) युगातील आई-वडिलांना कुठे पटते आहे? आपल्याला मम्मी-पप्पा म्हणवून घेतले की आपल्याला जणू बढतीच मिळाली आहे असा आनंद त्यांना वाटतो. ह्या न्यूनगंडमूलक अज्ञानाला काय म्हणावे?
आपल्या मताशी जुळणारे बरेच लेख अमृतमंथनावर आहेत. शोधून सवडीने वाचा. लेखांखाली आपले प्रतिमत (feedback) अवश्य नोंदवा. आपल्या मायबोली आणि मायसंस्कृतीविषयक मतांचा प्रसार झाला पाहिजे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
[…] आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे … –}} https://wp.me/pzBjo-Iv […]