“माझ्या भाग्यानं विपुल आणि समृद्ध प्रेमजीवन माझ्या वाट्याला आलं. ते मी नि:संकोचपणानं जगलो. प्रांजळपणाने, निरागसपणाने जगलो. अगदी धुंद होऊन आणि सर्व प्रकारचे धोके पत्करून जगलो. त्यावर मी पापाचे शिक्के कधीच मारले नाहीत. उलट, मी ती पुण्यसाधनाच मानली. आपल्या आणि प्रेयसीच्या प्राणाचा ठाव घेण्याच्या या आर्त भक्तीनं प्रेमभावनेच्या शारीर पातळीपासून आत्मिक पातळीपर्यंतच्या तिच्या चढत्या ‘सिंफनीज’ मला उमगत गेल्या. आपल्यावर जिवाभावाने प्रेम करणारी स्त्री ही आपली संरक्षक आणि संजीवन देवता आहे, अशी माझी जन्मजात श्रद्धा आहे.”
दैनिक लोकसत्तेच्या रविवार, दि० २३ ऑक्टोबर २०११च्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा कविवर्य मंगेश पाडगावकरांनी घेतलेल्या कविवर्य बा० भ० बोरकरांच्या कविवर्य पाडगावकरांनी घेतलेल्या एका उत्तम मुलाखतीचा अंश. कविवर्य बोरकरांच्या मूळ मुलाखतीतील हा अल्पसा अंश असला, तरी या शितावरून मूळ भाताच्या कसाची आणि प्रतीची कल्पना येते. बोरकरांच्या कवितांच्या धुंदीचा अल्पसा अनुभव ह्यातूनही घेता येतो. मात्र खर्या अर्थाने शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध ह्या पाचही प्रकारच्या ऐंद्रिय सुखांचा पूर्णानुभव देणार्या बोरकरी धुंदीत बुडून जाण्यासाठी त्यांच्या कविता मुळातूनच वाचायला हव्यात. शिवाय त्या वाचताना, त्यांचे रसग्रहण करताना आपल्या आयुष्यातील प्रेमानुभव पुन्हा जगताना कदाचित बोरकरांच्या कवितेची शिडी वापरून आपण बोरकरांच्या भावनानुभवांची उंचीदेखील गाठू शकू.
लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला कविवर्य बोरकरांच्या मुलाखतीचा अंश खालील दुव्यावर वाचून पहा.
अमृतमंथन_रमलरात्रीत रंगलेले बोरकर_111023
आपली मते, काव्यानुभव याबद्दल या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य लिहा.
– अमृतयात्री गट
ता०क० अमृतमंथनावर प्रसिद्ध झालेल्या काही मराठी कविता खालील दुव्यावर सापडतील.
.