मराठीमध्ये शुद्धलेखनाचे जे नियम गद्याला असतात तेच पद्याला असतात. पण आज या विषयी बरेचसे गैरसमज लोकांच्या मनात दृढमूल झालेले आढळतात. ’जुन्या मराठी कवितांमधील लेखन आजच्या पिढीला व्याकरणदृष्ट्या चुकीचे व अशुद्ध वाटत असल्यास त्यात सत्य किती व भ्रम किती’ या मुद्द्यावर विचार करताना तिच्या अनुषंगाने माझ्या मनात आणखीही काही छोट्याछोट्या उपशंका उद्भवल्या. त्या सर्वांचा यथामति सांगोपांग विचार करून माझे विचार मांडतो.
मध्यंतरी सौ० सत्त्वशीला सामंत यांचा मराठी भाषेच्या शुद्धलेखनाच्या संबंधातील गांगलांच्या टीकेला उत्तर देणारा लेख आपल्या या अमृतमंथन अनुदिनीवर प्रसिद्ध झाला होता. श्री० महेश कुलकर्णी या आपल्या वाचकमित्राने त्या लेखाखाली एक शंका विचारली होती. त्यांनी विचारले, “जुन्या मराठी कविता वाचतांना बरेचदा शब्दांची चुकीची ह्रस्व-दीर्घ रूपे वापरलेली दिसतात. मग जे नियम गद्य प्रकारासाठी आहेत ते कवितेसाठी नाहीत, असे आहे का?” या शंकेला उत्तर देण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले. मला ही शंका महत्त्वाची वाटते. या शंकेमध्ये मांडलेल्या मुद्द्यावर विचार करताना त्या निमित्ताने मला सुचलेले तदनुषंगिक इतर मुद्देही मांडून मी एक टिपण तयार केले. ते खाली देत आहे.
श्री० सलील कुळकर्णी यांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचू शकता.
अमृतमंथन_निरंकुशाः कवयः_111002
आपली मते या लेखाखालील चर्चा चौकटीत अवश्य नोंदवावीत.
– अमृतयात्री गट
ता०क० अमृतमंथनावर प्रसिद्ध झालेले मराठी भाषाविज्ञान व व्याकरणविषयक लेख खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.
मराठीच्या शोधात गांगरलेले गांगल (ले० सत्त्वशीला सामंत, लोकसत्ता, २३ डिसेंबर २०१०)
मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)
.
निरंकुशा: कवयः हा लेख सलील कुलकर्णी यांच्या आधीच्या लेखांइतकाच चांगला आहे. पण यात व्यक्त केलेले विचार काही नवे नाहीत. चालीच्या सोयीसाठी झालेले अत्यल्प र्हस्व-दीर्घाचे दोष, क्वचित यतिभंग आणि एखाद्या शब्दाचे सहन होण्याइतपत विकृतीकरण कवीला क्षम्यच असते.
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार.
{{चालीच्या सोयीसाठी झालेले अत्यल्प र्हस्व-दीर्घाचे दोष, क्वचित यतिभंग आणि एखाद्या शब्दाचे सहन होण्याइतपत विकृतीकरण कवीला क्षम्यच असते.}}
ते खरेच. पण हल्ली कधीकधी ते प्रमाण बर्याचदा ‘अत्यल्प, क्वचित्, एखादे’ एवढेच राहात नाही. दर्जेदार कवींची भाषा, अभिव्यक्ती अत्युत्तम असतेच पण त्याचबरोबर अशा सवलती घेतल्याची उदाहरणे फारच विरळ असतात हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. शिवाय लेखकाला इतर मुद्दे लक्षात आणून द्यायचे होते ते असे की हा प्रकार, अशा सवलती सर्वच भाषांतील कवींना विद्यमान/उपलब्ध असतात; मात्र संस्कृतकाव्यात त्या तशा घेतलेल्या फारशा आढळत नाहीत. हे संस्कृत काव्याचे व कवींचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
{{पण यात व्यक्त केलेले विचार काही नवे नाहीत.}}
आता हा थोडा व्यक्तिसापेक्ष भाग झाला. प्रस्तुत लेखकाने बराच वेळ खर्ची घालून, थोडीफार शोधाशोध करून हा लेख लिहिला. ज्या मूळ प्रश्नावरून हा विषय सुचला त्या प्रश्नाच्या परिघाच्या बर्याच बाहेर जाऊन काही मुद्दे मांडले. हे सर्व केवळ ह्याच उद्देशाने की आजच्या इंग्रजीमाध्यमशिक्षित आणि मराठी साहित्यापासून नकळत अंमळ दूर गेलेल्या, पण अजुनही मायबोली मराठीबद्दल आस्था व प्रेम असणार्या सर्वसामान्य, तरुण मंडळींच्या कानावरून हे मुद्दे जावेत, कुठल्याही काव्याचे रसग्रहण करताना हे मुद्दे त्यांनी ध्यानात ठेवावेत, विविध भाषांच्या अंगभूत गुणांची (साहित्यनिर्मिती ही वेगळी गोष्ट झाली) व विविध लेखकांच्या भाषांकौशल्याची तुलना करताना ह्या मुद्द्यांचे भान राखावे. असेच काही उद्देश धरून हा थोडासा पसरट लेख लिहिला.
यापूर्वीचा आपला पत्रव्यवहार पाहता असे वाटते की आपला मराठी, संस्कृत व इंग्रजी (कदाचित इतरही काही) भाषांचा व भाषाविज्ञानाचा चांगला अभ्यास असावा. त्यामुळेच प्रस्तुत लेखातील मुद्दे आपल्याला जुने (व सामान्य?) वाटले असावेत. कदाचित मूळ प्रश्नकर्ता श्री० महेंद्र कुलकर्णी यांचीदेखीलही तशीच भावना झाली असू शकते. परंतु वर सांगितल्याप्रमाणे ते काही विशिष्ट उद्देशाने लिहिले होते. मराठी, भाषा, संस्कृती, तसेच भारतीय संस्कृती, परंपरा इत्यादी विषयांबद्दल जेव्हा जशी संधी मिळेल तेव्हा लिहायचे, असा प्रयत्न आम्ही करत असतो. विशेषतः मराठी माणसाच्या स्वाभिमानास पुन्हा टेकू देऊन तो ताठ उभा करणे हे तर आपले आद्य कर्तव्य मानतो. आपण समजून घ्याल अशी आम्ही आशा बाळगतो.
क०ओ०अ०
– अमृतयात्री गट
प्रस्तुत लेखात अकारण काही टंकनदोष झाले आहेत. भाषेविषयीच्या लेखात किरकोळ दोषही मोठे भासतात. दोष असे : काठिन्यस्तर किंवा काठीण्यपातळी. काठिण्यपातळी अनुचित असावा. काणा डोळा म्हणजे चकणा डोळा? कानाकडे डोळा या अर्थाने काना डोळा हवे. आपसुकच की आपसूकच, नक्की काय ते माहीत नाही. क्वचित्(च) ऐवजी क्वचित(च) नको? तसं म्हटलं न लिहिता तसे म्हटले शोभले असते.
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या सूचनापूर्ण (सूचनाविष्ट?) पत्राबद्दल आभार. आपल्या सूचनांना लेखकाचे उत्तर खालीलप्रमाणे.
———————
{{प्रस्तुत लेखात अकारण काही टंकनदोष झाले आहेत.}}
खरं तर, लेख लिहिताना आपण निर्देशित केलेल्या मुद्द्यांवर मुद्दाम काही विचार केला नव्हता. पण आपण सूचित केलेले मुद्दे सुरस, विचारार्ह वाटले. त्यामुळे थोडा विचार करून, थोडीफार शोधाशोध करून खालीलप्रमाणे प्रतिसाद द्यावासा वाटतो.
{{भाषेविषयीच्या लेखात किरकोळ दोषही मोठे भासतात.}}
शंभर टक्के मान्य.
१. {{काठिन्यस्तर किंवा काठीण्यपातळी. काठिण्यपातळी अनुचित असावा.}}
मूळ संस्कृत शब्द = कठिन (विशेषण).
त्याचे संस्कृतमधील भाववाचक नाम = काठिन्य.
मराठीमध्ये संस्कृत कठिन, काठिन्य हे शब्द पूर्वी कठिण, काठिण्य असे लिहिले जात असत. पण जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी प्रस्तुत लेखात उल्लेख केलेला शासकीय निर्णय जाहीर झाला आणि कठिण हा शब्द कठीण असा लिहिला जाऊ लागला. परंतु ’काठिन्य’च्या ’काठिण्य’ ह्या रूपांतराला मात्र शासनाने हात लावला नाही. त्यामुळे ’काठिण्य’ हा शब्द तसाच राहिला. पण मराठीत ’काठिन्य’ असा शब्दही मान्य आहे असे दिसते.
संस्कृत प्रवीण-प्रावीण्य हे शब्द शासनाने मराठीत तसेच ठेवले. मात्र कठीण-काठिण्य अशी विचित्र, विजोड जोडी तयार केली. का कुणास (केवळ शासकीय पंडितांसच) ठाऊक !!
हल्ली काठिण्यपातळी हा शब्द फारच बहुविद्यमान (common place) झाला आहे. शाळेमधील आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्यावर शालांत परीक्षेची ’काठिण्यपातळी कमी करणे’ (दर्ज्याची पातळी आणखी खाली आणणे) असे प्रयत्न सध्या चालले आहेत. अर्थात ’काठिण्यपातळी’पेक्षा ’काठिन्यस्तर’ हा शब्द नक्कीच अधिक चांगला वाटतो. संस्कृत शब्द आणि संस्कृतेतर शब्द (किंवा तद्भव पण संस्कृतपासून बरेच दूर गेलेले शब्द) यांचा योग (combination) थोडा विचित्र वाटतो हे खरेच आहे.
२. {{काणा डोळा म्हणजे चकणा डोळा? कानाकडे डोळा या अर्थाने काना डोळा हवे.}}
कानाडोळा याची ’कानाकडे डोळा करणे’ ही व्युत्पत्ती खरीच आहे. पण मराठीत ’न’चा ’ण’ करण्याकडे कल असल्यामुळे तो तसा अपभ्रंश झाला असावा. परंतु ’कानाडोळा करणे’ हे अधिक योग्य आहे. (लेखात सुधारणा केली आहे.)
३. {{आपसुकच की आपसूकच, नक्की काय ते माहीत नाही.}} ’आत्मन्’ या संस्कृत शब्दावरून प्राकृतमार्गे मराठीत आपण हा शब्द आला. ’आपण’चे ’आप’ हे संक्षिप्तरूप.
’आत्मसुख’ची प्रथम ’आपसुख’/’अपसुख’ व नंतर ’आपसुक’/’अपसुक’ अशी तद्भव रूपे झाली.
प्रस्तुत लेखात उल्लेख केलेल्या शासनाच्या दीडशहाण्या नियमावलीपैकी “उपान्त्य ’इ’ व ’उ’ दीर्घ लिहायचा” हा नियम मानायचा झाला तर आज ’आपसूक’ हे रूप अधिक योग्य म्हणायला लागेल.
४. {{क्वचित्(च) ऐवजी क्वचित(च) नको?}}
पुन्हा ’क्वचित्’ हे शुद्ध संस्कृत रूप झाले. मराठीत (हिंदीप्रमाणे) काहीकाही शब्दांत अकाराचा पूर्ण उच्चार न करता केवळ व्यंजनाप्रमाणे ’पायमोडका’ उच्चार करतात. त्यामुळे कधीकधी पाय मोडलेल्या अक्षराचाही तसा स्वराशिवाय उच्चार करत असल्यामुळे लिहिताना पाय मोडणे टाळतात. हल्ली हिंदीच्या नादी लागून खान्देश (खानदेश) असे भयंकर लेखनही सर्रास (सररास?) केले जाते.
क्वचित् हे संस्कृतप्रमाणे १००% शुद्ध लेखन. पण आजच्या मराठीत किंचित असे लिहून किंचित् असा उच्चार करण्याची पद्धत आहे, हेदेखील खरे.
५. {{तसं म्हटलं न लिहिता तसे म्हटले शोभले असते.}}
हल्ली बोली (तोंडी) भाषेप्रमाणे लिहिताना देखील ए-कारा ऐवजी अं-कार लिहिले जाते. अर्थात न लिहिणे हे सर्वथा योग्य. मी मूळचा मुंबईचा असल्यामुळे लिहिताना ’अं’ हा प्रकार बराच कमी वापरतो. पण देशावर (पुणे, कोल्हापूर इ० ठिकाणी) ती पद्धत अधिक फैलावलेली आढळते. ’तिथं’ (तिथे), ’इकडं’ (इकडे), ’त्यामुळं’ (त्यामुळे), ’पुढं’ (पुढे) अशी मुंबईत सामान्यतः न वापरली जाणारी रूपेसुद्धा इथे पुण्यात बर्याचदा वापरली जातात, बोलतानाच नव्हे, तर लेखनातदेखील. (असो. मूळ लेखात सुधारणा केली आहे.)
सूचनांबद्दल पुन्हा आभार मानतो.
क०लो०अ०
———————-
क०ओ०अ०
– अमृतयात्री गट
काठिन्य शब्द मान्यच आहे, पण काठिण्य नाही. माझ्या आठवणीप्रमाणे शालीय शिक्षणाच्या बाबतीत काठीण्यपातळी हाच शब्द सरकारी परिपत्रकांत असावा. प्रवीण म्हणजे वीणा वाजवण्यात प्रगत, हा मूळ अर्थ. ‘प्रविण’ कधीही वाचला गेलेला नाही(विण्यात की विणण्यात प्रगत?).
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आधीच्या आमच्या पत्रातील {{संस्कृत प्रवीण-प्राविण्य हे शब्द शासनाने मराठीत तसेच ठेवले.}} हे वाक्य चुकीचे लिहिले गेले आहे. ते {{संस्कृत प्रवीण-प्रावीण्य हे शब्द शासनाने मराठीत तसेच ठेवले.}} असे हवे होते. प्रविण असा शब्द योग्य नव्हेच.
’काठिण्य’ असा शब्द बर्याच ठिकाणी आढळतो. – अरुण फडकेंचे शुद्धलेखन (काठिन्य/काठिण्य), प्रा० यास्मिन शेख (काठिन्य/काठिण्य, काठिन्य/ण्य-पातळी), दाते-कर्वे (काठिण्य) व इतरही काही ठिकाणी हे शब्द आढळतात.
असो. आपल्या अभ्यासाबद्दल आम्हाला आदर वाटतो. परंतु खरं सांगायचं तर या शब्दाने मूळ लेखाच्या उद्देशात काही फरक पडणार नाही. ही अशी एक महान साहित्यकृती नव्हे की जिच्या एकेका शब्दाचे विश्लेषण-रसग्रहण करावे. त्याचबरोबर या लेखात तशा अत्यंत ढोबळ, प्राथमिक, वीट आणणार्या चुकाही नाहीत. तेव्हा या लेखातील शब्दांचा फार कीस पाडण्यात आपण आपला वेळ नको घालवू या. याच कारणास्तव आपली अशाच प्रकारची साखरेची साले काढणारी चिकित्सक (कीसकारी?) पत्रे कृपया परत घ्यावीत, अशी नम्र विनंती.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
ठीक आहे, माझे सर्व प्रतिसाद, त्यांचे आता काही काम उरले नसल्याने, खोडून टाकावेत.
जुन्या शुद्धलेखनाचे नियम परत वापरात आणावेत या सत्त्वशीला सामंत आणि दिवाकर मोहनी यांच्या मतांशी मी सहमत आहे. खरोखरच तसे होईल यासाठी श्री. सलील कुलकर्णींनी प्रयत्न करावेत. माझी साथ असेल.
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
महाराष्ट्रशासनाने मराठी केलेल्या शुद्धलेखनाच्या नियमातील काही नियम खरोखरीच विचित्र व मूर्खपणाचे आहेत असे आमचे मत आहे. निदान संस्कृतामधून आलेल्या तत्सम शब्दांना तरी त्यांनी असे विचित्र नियम लागू करायला नको होते. तद्भव तसेच प्राकृतातून वा इतर भाषांमधून आलेल्या शब्दांच्या बाबतीत त्यांनी हवा तो हैदोस घालावा.
अर्थात आपणा सामान्य माणसांना याबाबतीत काय व कितपत करता येईल, याबद्दल शंका वाटते. सत्त्वशीला सामंत आणि दिवाकर मोहनी यांच्यासारखे अभ्यासू, जाणकार व प्रामाणिक तज्ज्ञ फार कमी आहेत. शासनाला आधी सांगितलेल्या उत्तराप्रमाने गणित सोडवून दाखवणारे सोयीस्कर तज्ज्ञ हवे असतात. ’काठिन्यपातळी कमी करणे’ या नावाखाली लोकानुनयासाठी शासन काहीही करते. शाळेतील आठवी पर्यंतच्या वर्गांच्या परीक्षा रद्द करणे हा महामूर्खपणाचा निर्णय आहे, हे जगातील कोणीही तज्ज्ञ (प्रामाणिक तज्ज्ञ, राजकारण्यांना मिंधा असलेला नाही) सांगेल. पण ते लक्षात कोण घेणार? केवळ आपल्या सत्तेचा विचार करणार्या राजकारण्यांना तरूण पिढी, समाज, संस्कृती आणि या सर्वांचे भविष्य यांबद्दल काहीही देणेघेणे नसते.
निदान आपल्यापुरते तरी आपण ’तत्सम शब्दाचे’ मूळ रूप लिहिताना तरी ते मूळ संस्कृत शब्दांप्रमाणेच लिहावे असे मला वाटते. या विषयी श्रीमती सत्त्वशीला सामंत यांनी आपल्या ’व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’ (डायमंड प्रकाशन) या पुस्तकात उत्तम विवेचन केलेले आहे. ते बरेचसे पटते. नक्की वाचून पहा.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
माझे या पूर्वीचे सर्व प्रतिसाद, आता त्यांचे काहीच प्रयोजन न उरल्याने, खोडून टाकावेत.
शुद्धलेखनाचे अनुस्वारांच्या नियमसकटचे जुने नियम परत अमलात आणावे या सत्त्वशीला सामंत आणि दिवाकर मोहनी यांच्या मतांशी मी सहमत आहे. श्री. सलील कुलकर्णींना त्या कामासाठी माझी साथ असेल.