झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतीयांच्या पराक्रमाचे प्रतीक. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात आघाडीवर असलेल्या लक्ष्मीबाईचा टाइम साप्ताहिकाने गौरव केला आहे, तो जगाच्या इतिहासातील “टॉप टेन’ पत्नींच्या यादीत. साहसाचा, पराक्रमाचा आदर्श मानल्या जाणार्या झाशीच्या राणीचा हा उल्लेख तिच्या कारकिर्दीची वेगळ्या अर्थाने दखल घेणारा आहे. मिशेल ओबामा, मेलिंदा गेट्स या नावांमुळे पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या कामात सहभागी होणारी अर्धांगिनी हा त्या निवडीचा निकष दिसतो. या महिलांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून मदत केली. झाशीच्या राणीच्या बाबतीत बोलायचे तर तिचे मोठेपण वरच्या इयत्तेतले.
अमेरिकेच्या टाईम मासिकाने भारतीय राणीने इंग्रजांविरुद्ध गाजवलेल्या पराक्रमाचा असा सन्मान केला ही केवळ मराठीच नव्हे तर समस्त भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.
दैनिक सकाळच्या २५ जुलैच्या अंकातील हा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन-जगातील सर्वोत्तम-दहा स्त्रियांमध्ये झाशीची राणी
आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दखल ब्रिटनच्या टाईम मासिकाने घेतली हे चांगलंच आहे. पण त्यांचं नाव अतिशय शूरवीर महिला या यादीत असायला हवं. न की कर्तुत्त्ववान पतिच्या मागे खंबीरपणे उभं राहणार्या पत्निंच्या यादीत. कारण राणी लक्ष्मीबाई यांचे पती आजारीच असायचे आणि त्यांना मूल होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी राज्याला वारस म्हणून त्यांच्या नात्यातील एका मुलाला दत्तक घेतले. पती निधनानंतर राणी लक्ष्मीबाई झाशी संस्थानचा कारभार दत्तक मुलाच्या नावाने सांभाळत होत्या. इंग्रजांनी झाशी संस्थान ताब्यात घेण्यासाठी दत्तकविधान नामंजूर केलं. त्यामुळेच झाशीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या शत्रू झाल्या. नंतर १८५७च्या राष्ट्रीय उठावात त्यांनी तात्या टोपेंच्या खांद्याला खांदा लावून समरात आपल्या दत्तक मुलाला पाठीशी घेऊन उडी घेतली. हे झालं त्यांच्या पती निधनानंतर काही वर्षांनी. एकतर त्यांच्या विषयी अर्धवट चुकीची माहिती पुरवली जाते आणि त्यावर आधारित त्यांना कुठल्यातरी यादीत मानाचं स्थान दिलं जातं. गंमत म्हणजे सारा पालीन ही अमेरिकन बाई (सगळ्यांनाच या बाईंचं कर्तुत्त्व माहिती आहे) या यादीत पाचव्या स्थानावर आहे. मला असं वाटतं की झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची चुकीच्या यादीत दखल घेतली आहे आणि त्यांच्या पुढे या यादीत असणार्या महिलांची आणि त्यांची बरोबरी कदापि होऊ शकत नाही. आपण या सगळ्याला दुरूस्त करण्यासाठी पाऊलं उचलली पाहिजेत.
प्रिय श्रीमती शांतिसुधा यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले मत व त्यामागील विचार पूर्णपणे पटतात. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईने जो असामान्य पराक्रम घडवला तो मुख्यतः पतीच्या पश्चात् घडवला. त्यामुळे तत्त्वतः ’पतीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणारी पत्नी’ अशा स्त्रियांच्या यादीत तिचे नाव तसे पाहता योग्य नव्हे. परंतु बहुधा पूर्वीच्या काळी (गेल्या शंभर ते चार-पाचशे वर्षांपूर्वीच्या काळात) पतीच्या अनुपस्थितीतही एवढा प्रचंड पराक्रम गाजवणार्या स्त्रिया जगाच्या इतिहासातही फारशा सापडणार नाहीत. त्यामुळे अशा स्त्रियांची यादी करणे कठीणच, किंबहुना अशक्यही असावे. परंतु त्याचबरोबर पराक्रमी, खंबीर स्त्रियांची यादी बनवताना झाशीच्या राणीकडे दुर्लक्ष करणेही शक्य नाही. म्हणूनच बहुधा त्यांनी तिचे नाव या यादीत घातले असावे. इथे ’पतीच्या मागे’ (behind one’s husband) म्हणजे ’पतीच्या पश्चात्’, ’पतीच्या अनुपस्थितीत’ (in his absence) असा काहीसा ओढूनताणून अर्थ लावला तर ते जमून जाईल. लक्ष्मीबाईच्या अलौकिक शौर्याचा अनुल्लेख करण्यास त्या टाईम मासिकाची मंडळी धजली नाहीत, हेच त्याचे मर्म आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
हा टाईम मासिकाचा भारतीय वर्गणीदार वाढविण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता जास्त.
प्रिय श्री० मनोहर यांसी,
सप्रेम नमस्कार.
राणी लक्ष्मीबाईंचे नाव यादीत घातल्यामुळे कितीसे भारतीय त्या मासिकाचे वर्गणीदार होतील याबद्दल शंका वाटते. ते मासिक काही फार स्वस्तातले नव्हे. फारशा मध्यमवर्गीयांनाही परवडणारे नव्हे. श्रीमंत वर्गापैकी बहुसंख्य उच्चभ्रूंना आपल्या भारतीय इतिहास, संस्कृती व परंपरांशी फारसे देणे-घेणे नसते. त्यामुळे मूळची मराठी असलेल्या राणी लक्ष्मीबाईचे नाव प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांच्यापैकी फारसे कोणी वर्गणीदार होतील हे संभाव्य वाटत नाही.
थोडा असाही विचार करावा की दुसरा अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्गणीदार मिळवण्यासाठी राणी लक्ष्मीबाईचे नाव घातले असे म्हणणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका घेण्यासारखेदेखील ठरेल. ऑस्कर आणि मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स आणि तत्त्सम पारितोषिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भानगडी, लांड्यालबाड्या चालतात, हे सर्वश्रुतच आहे. परंतु या बाबतीत आमच्या राणीला तिची लायकी नसतानाही सत्कारित केले असे म्हणणे हे अपमानास्पद ठरेल. आपल्याला काय वाटते?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
👉 राणी लक्ष्मी बाईचे पती गंगाधर नेवाळकर ह्यानी भावकीतील बालक दामोदर ह्यास दत्तक घेऊन सदर दत्तक-विधानास मान्यता देऊन दामोदर ह्यास झाशी मांडलिक संस्थानचा वारस जाहिर करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल डलहौसीना कलकत्ता येथे विनंती अर्ज सादर केला होता *
तथापि मान्यता मिळण्यापूर्वीच गंगाधर नेवाळकर ह्यांचे निधन झाले!
➡ कंपनी नियमानुसार संस्थानिक रितसर वारसाविना वारल्यास सदर संस्थान खालसा होत असे*
👉 त्या मुळे पती निधन होताच राणी लक्ष्मी बाई नेवाळकर ह्यानी लगोलग डलहौसीना संस्थान खालसा न करता दत्तक विधान मंजुर होण्यास विनंति अर्ज सादर केला*
तथापि लॅार्ड डलहौसीनी सदर अर्ज फेटाळुन झाशी संस्थान खालसा करुन ईस्ट इंडिया कंपनी अमलात आणले!
अन् मग लक्ष्मीबाई त्वेषाने उद्गारल्या: ” माझी झाशी मी देणार नाहीं!”
👉 लॅार्ड डलहौसीने राज्य-विस्तार हव्यासाखातर असे न करता➡
जर राजा गंगाधर नेवाळकर ह्यांच्या निधनोत्तर नियमास अपवाद करुन दत्तक विधान मंजुर केले असते आणि झाशी संस्थानचे मांडलिक अस्तित्व तसेच अबाधित ठेवले असते तर वयाच्या २२ व्या वर्षी हकनाक मारल्या गेलेल्या राणी लक्ष्मी बाई नेवाळकरानी संस्थान कारभार व्यवस्थित चालवुन आदर्श निर्माण केला असता हे निश्चित ***
प्रिय श्री० दिलीप सावळे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राला उत्तर द्यायचे नजरचुकीने राहून गेले त्याबद्दल क्षमा मागतो.
आपले म्हणणे पूर्णतः पटले. अमृतमंथनाच्या वाचकांसाठी ते प्रसिद्ध करीत आहोत.
अमृतमंथनावरील इतर लेखांवरही नजर घालावी.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट