पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्दूचा पर्याय (डीएनए, १३ फेब्रुवारी २०११)

पोलिसांसारख्या राज्यातील विविध ठिकाणच्या विशेषतः गावोगावच्या सामान्य माणसांशी सतत संबंध येणार्‍या नोकरीसाठी राज्याची भाषा जाणणे आवश्यक नाही का?

महाराष्ट्रात मराठी भाषेचे व मराठीमाणसाचे महत्त्व कमी करणे तसेच महाराष्ट्रात पूर्वीपासून राहणार्‍या मराठी मुसलमानांच्या मनात मराठीबद्दल दुजाभाव निर्माण करणे असा हा मराठीद्वेष्ट्यांचा दुहेरी डाव आपण सर्वांनी एकत्रितपणे हाणून पाडायला हवा.

महाराष्ट्रात मुसलमानांसाठी पोलिसखात्याच्या प्रवेशपरीक्षा व मुलाखतींसाठी मराठीऐवजी उर्दू भाषेचा पर्याय देण्याची राज्य शासनाची योजना आहे. आपले मित्र श्री० अजय मराठे यांनी या विषयीच्या डी०एन०ए० या इंग्रजी दैनिकात १३ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीकडे आपले लक्ष वेधले आहे. ती बातमी आणि त्याबद्दलचे विवेचन खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्दूचा पर्याय_डीएनए_110214

आपल्याला या विषयी काय वाटते? आपली मते लेखाखालील चर्चा चौकटीत अवश्य मांडा.

– अमृतयात्री गट

.

6 thoughts on “पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्दूचा पर्याय (डीएनए, १३ फेब्रुवारी २०११)

 1. अमृतमंथन_पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्दूचा पर्याय_डीएनए_110214

  हा दुवा pdf_auto_file या फ़ॉर्‌मॅटमध्ये आहे. जसे हिंदी वाक्यं प्रमाणम्‌ मला उघडता आले नाही, तसे हेही जमले नाही. दुवा उघडण्यासाठी कोणती प्रणाली संगणकावर स्थापित करायला पाहिजे ह्याचा अजून शोध लागलेला नाही.
  मराठी वाचणारी माणसे महाराष्ट्रातल्या पोलीसखात्यात सगळीच असतात, तेव्हा त्या खात्यात उर्दू जाणणारीदेखील असायला हवीत यासाठी सरकारने स्वीकारलेले धोरण योग्य आहे. इतर लिप्या वाचण्यासाठी माणसे सहज मिळतात, पण उर्दूसाठी फक्त मुसलमानांवरच अवलंबून राहणे उचित नाही. एकदा का उर्दू लिपी सर्वच माध्यमांच्या शाळांत शिकायची सोय झाली की प्रश्न सहज सुटेल. उर्दू ही फक्त मुसलमानांची भाषा आहे ही निव्वळ गैरसमजूत आहे.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   एखाद्या विषयातील कागदपत्रे वाचायला हवी असल्यास त्या भाषेचे दोन-चार जाणकार संपूर्ण पोलीसखात्याला पुरतील. त्यासाठी लोकांना स्थानिक भाषा न जाणता त्या केवळ भाषेच्या जोरावर पोलीसखात्यात प्रवेश घ्या असे सांगणे कितपत उचित आहे? तसं म्हटलं तर उर्दूच का इतरही विविध भाषांतील कागदपत्रांचे भाषांतर कधी ना कधी लागत असेल. म्हणून सर्वच भाषांचे पर्याय राज्यभाषेला देणार काय? असे इतर राज्यांत किंवा देशांत होते का? बरं, अशा प्रकारे राज्यभाषेव्यतिरिक्त इतर भाषेच्या जोरावर प्रवेश मिळवलेले पोलीस जन्मभर फक्त भाषांतरेच करीत बसणार का? त्यांना पोलीसांची इतर कामे करण्यास स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक नाही का? अमेरिकेतही हल्ली मोठ्याप्रमाणात अरबी कागदपत्रांच्या भाषांतराची आवश्यकता भासत असेल. मग त्यांनी इंग्रजी न जाणणार्‍या लोकांना केवळ अरबी भाषेच्या जोरावर पोलीस खात्यात घ्यायचे का? आणि मग असे लोक पोलीसांची इतर कामे न करता आल्यामुळे केवळ भाषांतरेच (जेव्हा काम असेल तेव्हा) करीत बसणार का?

   राज्य पातळीवर राज्याची भाषा व देशाच्या पातळीवर देशाची भाषा यांच्याबाबतीत तडजोड होऊच शकत नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. हा प्रयत्न हाणून पाडायला हवा. मुसलमान लोक मराठी शिकू शकतात . आज पर्यंत सर्वच मुसलमान लोक मराठी शिकत आले आहेत मग पुढे शिकण्यात काय अडचण आहे ? आणि उर्दू काय फक्त मुसलमानांची भाषा आहे का ? मग बंगाली मुसलमान कसे बंगाली बोलतात ? तामिळ मुसलमान कसे तामिळ बोलतात ? उलट, मराठी मूळे त्यांना या मातीशी – या संस्कृतीशी एकजीव होता येईल !!!

  • प्रिय श्री० राजेश पाटील यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   आपले मत प्रसिद्ध करीत आहोत. आपले म्हणणे सत्य आहे. इथले सर्व मुसलमानही याच राज्यात पिढ्यान्‌ पिढ्या रहात आहे, याच भूमीवर कष्ट करतात आणि याच मातीत उगवलेले अन्न ते खातात. ते इतर मराठ्यांएवढेच मराठी आहेत यात शंकाच नाही. धर्म-जात अशासारख्या मुद्द्यांवर मराठी माणसांत फूट पडू देता कामा नये.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. एखादी व्यक्ती मुसलमान आहे, की हिंदू आहे की ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी धर्माची आहे ह्याचा, कोणत्या भाषेत तिने परीक्षा द्यावी ह्याच्याशी काय आणि कसा काय संबंध पोहोचू शकतो? राज्याची अधिकृत भाषा जी कोणती असेल त्याच भाषेत सर्व व्यवहार होणे अनिवार्य आहे. त्याला पर्याय असताच कामा नये.

  मुसलमान धर्मीयांचे संख्याबळ पोलिसदलात कमी असेल तर त्याचे कारण त्यांच्या भाषेत प्रश्नपत्रिका सोडवण्याची सोय उपलब्ध नाही हे स्वीकारताच येणार नाही. ते स्वीकारले तर मग प्रत्येक व्यक्ती आपल्याला हव्या त्या भाषेचे माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी हट्ट धरू लागेल आणि आपले लुळेपांगळे सरकार लांगूलचालन करण्याच्या वृत्तीतून आणखीच कमकुवत होईल. धर्माचा आणि भाषेचा मुळीच संबंध लावला जाता कामा नये आणि पोलिसदलच काय, कोणत्याही सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत राज्याच्या अधिकृत भाषेतच सर्व व्यवहार करायला पाहिजेत असे खडसून बजावले पाहिजे.

  विजय

  • प्रिय श्री० विजय पाध्ये यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   आपले मत १००% योग्य आहे. वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s