सचिवालय, मंत्र्यालय की मंत्रालय? (प्रश्नकर्ता: यशवंत कर्णिक)

कधी ना कधी तरी हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवला असेल. पण कालांतराने तो मागे पडला असेल. आज आपले एक अत्यंत ज्येष्ठ असे मराठीप्रेमी वाचकमित्र श्री० यशवंत कर्णिक यांनी खालीलप्रमाणे प्रश्न विचारला आहे, त्यावर चर्चा करू.

सप्रेम नमस्कार.

‘अंतर्नाद’ कालच आलाय. ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌!’ हा लेख वाचायला घेतलाय. त्याच्या अनुषंगाने एका लहान गोष्टीबद्दल मला आलेली शंका व्यक्त करतो.

या लेखात मराठीत नवीन रूढ झालेल्या उत्तमोत्तम शब्दांच्या यादीत ‘मंत्रालय’ हा शब्द दिला आहे. ‘मंत्रालय’ म्हणजे मंत्री ( ministers ) जिथे असतात किंवा बसतात ते ठिकाण अथवा कचेरी असे गृहीत धरून हा शब्द शासकीय विद्वानांनी पाडला व तो रूढ झाला. पूर्वी ह्या ठिकाणास ‘सचिवालय’ ( Secreariat ) म्हणत. पुढे लोकसत्ता आली, मंत्री तिथे बसू लागले तेव्हां त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यासाठी “मंत्रालय’ हा शब्द निर्माण करण्यात आला. इंग्रजीत मात्र ते ठिकाण Secretariat च राहिले. त्याचे Ministeriat झाले नाही.

माझी शंका अशी की ‘मंत्रालय’ हा शब्द व्याकरण दृष्टया योग्य आहे का? सचिव शब्दाचे रूप सचिवालय होते तर ‘मंत्री’ ह्या शब्दाचे ‘मंत्रालय’ कसे होऊ शकेल? मंत्री + आलय = ह्याचे रूप ‘मंत्र्यालय’ नाही का होणार? मंत्र+आलय याचे रूप ‘मंत्रालय’ होईल. ‘मंत्र्यालय’ हा शब्द चमत्कारिक आहे, लिहायला तर सोडा, उच्चारायला सुद्धा कसातरीच वाटतो. म्हणून काय चुकीचे रूप वापरात आणायचे? छत्रपतींच्या काळी मंत्र्यांना ‘प्रधान’ म्हणत (अष्टप्रधान). ‘मंत्रालय’ असा चुकीचा शब्द पाडण्याऐवजी ‘प्रधानालय’ असा शब्द योजला असता तर? ‘मंत्रालय’ शब्द कानांना ठीक वाटतो खरा पण तो ‘उत्तम’ शब्दांपैकी एक आहे ह्या मताचा प्रतिवाद करावासा वाटतो म्हणून ही शंका.

– यशवंत कर्णिक

—————

श्री० यशवंत कर्णिक ह्यांच्या शंकेबद्दल आपले काय मत आहे? आपले विचारपूर्ण स्पष्टीकरण प्रस्तुत नोंदीखालील चर्चाचौकटीत सविस्तरपणे मांडावे.

ता०क० श्री० यशवंत कर्णिक ह्यांनी केलेल्या विपुल साहित्यनिर्मितीपैकी काही खालीलप्रमाणे.

  • उरूस आणि इतर कथा (कथासंग्रह) १९६७
  • दाटला चहूकडे अंधार (नाटक) १९६८ (गोमंतक नाट्य अकादमी पुरस्कार प्राप्त)
  • निळा डोह (कादंबरी) १९७३ (गोवा कला अकादमी पुरस्कार प्राप्त)
  • शोधितो किनारा (कादंबरी) १९७६
  • पंखहीन (कादंबरी) १९८४ (गोकअ पुरस्कार)
  • डोलकाठी आणि इतर कथा (कथासंग्रह) २००५ (आपटे वाचनमंदिर, इचलकरंजी, पुरस्कार प्राप्त)
  • ब्रह्मकमळ (कथासंग्रह) २००६ (मुंबई मराठी साहित्य संघ पुरस्कार)
  • अकेली और अछूती (हिंदी) १९८७ (श्रीमती रेश्मा हुसेन-सक्सेना यांच्या सहयोगाने)
  • पणजी नभोवाणीवर ३०हून अधिक नभोनाट्ये व कथाकथने
  • मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांत स्फुटलेखन
  • श्रीराम पांडुरंग कामत संपादित विश्वचरित्रकोशात ८००हून अधिक नोंदी
  • कुंपणवेल (कथासंग्रह) प्रकाशनाच्या मार्गावर

– अमृतयात्री गट

.

11 thoughts on “सचिवालय, मंत्र्यालय की मंत्रालय? (प्रश्नकर्ता: यशवंत कर्णिक)

  1. आपली शंका अगदी योग्य आहे,विवेचनही तत्वनिष्ठ (लॉजिकल) आहे. यावर चर्चा व्हावी/व्हायलाच हवी. परंतु माझ्या मते मराठीत हिंदी (आणि उर्दू) भाषेचे शब्द ज्या वेगाने शिरकाव करीत आहेत, ती जास्त मोठी काळजीची बाब आहे. याला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. आधीच शिरून ऱूढ झालेले, एवढेच नव्हे तर शब्दकोषांतही स्थान मिळवलेल्या शब्दांच्या आहारी मराठी (आणि पर्यायाने आपण मराठी बांधव) गेलेली असतांना त्यात दिवसागणिक असंख्य हिंदी शब्दांची घुसखोरी ही निश्चितच धोकादायक गोष्ट आहे. यावरही विचार झाला पाहिजे.

    • प्रिय श्री० दीपक गजानन राईलकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे खरे आहे. हिंदी (तसेच इंग्रजीदेखील) भाषेचे आक्रमण (आपण स्वखुषीने आमंत्रण करून लादून घेतलेले) हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. त्याबद्दल प्रत्येक मराठीप्रेमीने स्वतः जागृत व संवेदनशील तर रहायलाच पाहिजे, पण इतरांनाही जागे करायला पाहिजे. आपण बिहारमध्ये आयुष्याचा बहुतांश काळ घालवलेला असूनही आपली या विषयीची जागरूकता पाहून आश्चर्ययुक्त आदर वाटतो.

      पण आम्हाला असेही म्हणावेसे वाटते की वरीलप्रमाणे हिंदी-इंग्रजीचा गाळ काढत असतानाच आपल्या भाषेला सतत नवीन उत्तमोत्तम शब्दांची गंगादेखील जोडायला पाहिजे. आणि तसे करताना प्रत्येक शब्द – अचूक भावार्थ, उपायोजनयोग्यता, उच्चार व लेखनाची सुलभता, सुसंस्कृत शब्दघटना – इत्यादी निकषांवर घासून घ्यायला पाहिजे.

      आपली परिस्थिती रात्र थोडी आणि सोंगे फार अशी आहे. खूप काम करायचे आहे. त्यासाठी अधिकाधिक हात आपल्या हाताला जोडून घ्यायला पाहिजेत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. सेक्रेटरियेट म्हणजे सचिवालय, सचिव बसतात ते कार्यालय. त्या शब्दाऐवजी वापरण्यासाठी मंत्रालय हा शब्द तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी दिला. तो शब्द मंत्र्यालय, म्हणजे मंत्री बसतात ती जागा अशा अर्थाचा नाही. खलबत किंवा सल्लामसलत करणे असा आशय असलेल्या संस्कृतमधील मंत्र्‌(मंत्रति/मंत्रयति) या धातूपासून मंत्रालय हा शब्द बनला आहे. त्याचा मथितार्थ, जिथे मंत्रणा करतात ते ठिकाण. त्यामुळे हा शब्द पूर्णपणे व्याकरणाधिष्ठित आणि शुद्ध आहे.

  3. मंत्रालय शब्द तर सर्वस्वी चुकीचा आहे. कारण मूळ शब्द मंत्रिन् असा
    आहे. (मंत्र असा नाही.) संधी करताना मंत्रि इतकाच भाग घ्यायचा जसं मंत्रिमंडळ, विद्यार्थिभांडार. त्यामुळं मंत्र्यालय हा बरोबर वाटतो. आणि सचिवालय तर बरोबर आहेच. आता प्रश्न असा की भाषेच्या दृष्टीन ठीक झालं. पण ते वर्णन सार्थ आहे का? तिथं जे काम चालतं, त्याचं काही प्रमाणात तरी यथार्थ वर्णन त्या शब्दामुळं होतं का?

    मनोहर

    • आदरणीय प्रा० मनोहर राईलकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

      आपले मत प्रसिद्ध करीत आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • मूळ शब्द मंत्र(अर्थ : सल्लामसलत, खलबत, राजकार्यविचार) आहे मंत्रिन्‌ नाही हे वर सांगून झालेच आहे. ‌मंत्रालय हा शंभर टक्के शुद्ध शब्द आहे, आणि तो तिथे चालणार्‍या कामाशी सुसंगत आहे..

        • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

          संस्कृतमधील मूळ अर्थाप्रमाणे मंत्र या शब्दाचा आपण सांगितलेला अर्थ योग्यच आहे. अर्थात “तो मंत्रालयात चालत असलेल्या कामाशी सुसंगत आहे” या आपल्या विधानाबद्दल मतांतरे असू शकतात. आजकाल मंत्रालयात काम ते काय चालते याबद्दल अधिक चर्चा न केलेलीच बरी.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अरुण शिंदे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      लेखाखालील चर्चाचौकटीमधील चर्चादेखील अवश्य वाचावी. मन्त्र या संस्कृत शब्दाचा अर्थ सल्लामसलत, गुप्तमसलत असा आहे. राजाला मंत्री, सचिव इत्यादि मंडळी जो सल्ला देतात तो सल्ला. अशी मसलत, विचारविमर्श, चर्चा जिथे चालते ते ठिकाण, सदन म्हणजे मंत्रालय असा अर्थ होतो.

      आपण अमृतमंथनावर नवीनच वाचक दिसता. इतर लेखांवरही अवश्य दृष्टिक्षेप टाकावा. आपले प्रतिमत (feedback) कळवा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

Leave a reply to अमृतयात्री उत्तर रद्द करा.