प्रिय अमृतयात्री गट,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अमृतमंथनावरील विचारमंथन चर्चापीठापुढे एक विषय चर्चेसाठी ठेवत आहे.
“काव्य आणि कविता या दोन शब्दांचे अर्थ एकच की भिन्न?”
शाळेत असताना आम्ही दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत असे समजत आलो.
पण आपण रामायण, महाभारत यांचा उल्लेख महाकाव्ये असा करतो, महाकविता असा नाही. (अजूनतरी तसे ऐकण्यात आलेले नाही). म्हणजे त्यांत काहीतरी अंतर असावे असे आता वाटते आहे.
अमृतमंथन परिवारातील सुबुद्ध बांधवांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.
कलावे, लोभ असावा.
आपलाच,
कल्पेश कोठाळे
.
आपले मित्र श्री० कल्पेश कोठाळे ह्यांच्या शंकेबद्दल आपले काय मत आहे? आपले विचारपूर्ण स्पष्टीकरण प्रस्तुत नोंदीखालील चर्चाचौकटीत सविस्तरपणे मांडावे.
– अमृतयात्री गट
.
तुम्ही जे म्हणताय ते खरंय. काव्य आणि कविता हे दोनही शब्द वेगवेगळ्या अर्थाचे आहेत. काव्य म्हणजे असे पद्य की ज्यात कथा सामावलेली आहे. जसे कालीदासाने लिहीलेले शाकुंतल, मेघदूत ही काव्ये आहेत. त्या पद्य स्वरूपातील कथा आहेत. कदाचित अजुन एक फरक असाही असू शकतो की या पद्य स्वरूपातील कथांना एका विशिष्ट वृत्तात लिहीलेलं आहे. पण कविता म्हणजे गद्य कविता पण असतात. शक्यतो कवितां मध्ये कथा सामावलेली नसते तसेच त्या विशिष्ट वृत्तातही लिहीलेल्या नसतात. काही कविता या मुक्त छंद स्वरूपातील असतात. काव्य मुक्तछंद स्वरूपात असते की नाही याचा अंदाज नाही.
प्रिय श्रीमती अपर्णा लळिंगकर अर्थात ’शांतिसुधा’ यांसी,
सप्रेम नमस्कार.
आभारी आहोत. आपले विचारपूर्ण उत्तर प्रसिद्ध करीत आहोत. पाहूया इतर मित्रांना काय म्हणायचे आहे ते.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
काव्य हा गुणवाचक (भाववाचक नाम) शब्द आहे तर कविता हे सामान्यनाम आहे. एकाच गुणाचा संग्रह होऊ शकत नाही, म्हणूनच काव्यसंग्रह असा शब्द जरी रूढ झालेला असला तरी तो भाषाविज्ञानानुसार सदोष आहे, त्याऐवजी कवितासंग्रह हाच शब्द वापरावा असे प्रतिपादन केले जाते. डॉ० द०भि० कुलकर्णी ह्यांनी अशाच अर्थाचं विवेचन केलं असल्याचं स्मरतं.
अर्थात शास्त्राद्रूढिर्बलीयसी हे वचन सर्वमान्य आहेच.
प्रिय श्री० विजय पाध्ये यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण व्याकरणाच्या अंगाने केलेले विवेचन चर्चापीठावर प्रसिद्ध करीत आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मी अजुन एक-दोन जणांशी या विषयावर बोलले. त्यातून मिळालेली माहीती.
काव्य हे मुख्यत: दैवी गोष्टींशी, अपौरूषेय, पौराणिक, ऐतिहासिक गोष्टींशी संबंधीत असते. त्याचा लेखन कालावधी आणि एकूणच लांबी खूप मोठी असते.
कविता हे अतिशय साध्या विषयांवर, पौरूषेय विषयांशी संबंधीत असते. कवितेची लांबी तसेच ती लिहीण्यास लागणारा कालावधी तुलनेने कमी असतो. दीर्घकविता जरी असल्या तरी त्यांची तुलना रामायण, महाभारत, मेघदूत, शाकुंतल यांच्याशी होऊ शकत नाही.
प्रिय ’शांतिसुधा’ यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या विचारपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
‘काव्य’ आणि ‘कविता’ ह्या शब्दांचा अर्थ एकच की वेगवेगळा हा थोडा गंमतीचा प्रश्न आहे.
प्रश्नकर्त्यांना ज्या कारणामुळे हा प्रश्न पडला आहे ते कारण म्हणजे महाकाव्य असा प्रयोग रूढ आहे. पण महाकविता असा प्रयोग आढळत नाही. त्यांचे निरीक्षण अगदी योग्य आहे. आता दोन संज्ञांचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा आहे हे कसं ठरवायचं? हा मोठा कठीण प्रश्न आहे. नारळ आणि श्रीफळ ह्या संज्ञा एकाच गोष्टींच्या वाचक आहेत की वेगवेगळ्या? जर वस्तू हा संदर्भ अभिप्रेत असेल तर त्या दोन्ही संज्ञांचे अर्थ एक आहेत असं म्हणता येईल. पण प्रयोजन हा संदर्भ पाहिला तर ह्या संज्ञा (निदान काही अंशी तरी) वेगवेगळ्या अर्थाच्या आहेत.
सामासिक शब्दांच्या संदर्भात असा प्रश्न प्रकर्षाने पडतो. सामासिक शब्द हा दोन वा अधिक घटकपदांनी मिळून बनलेला असतो. त्यातील घटकपदे अनेकदा आहेत तीच वापरावी लागतात. तशाच समान (!) अर्थाची इतर पदं वापरता येत नाहीत. उदा. मुख आणि तोंड, चेहरा हे शब्द समानार्थी आहेत की नाहीत? पण मुखचंद्र हे रूढ आहे. पण तोंडचंद्र, चेहराचंद्र हे काही बरं वाटत नाही. घोडा आणि अश्व हे समान अर्थाचे शब्द आहेत की नाहीत? पण घोडागाडी म्हणतात तसं अश्वगाडी म्हणत नाहीत.
म्हणजे संज्ञा समानार्थी आहेत की नाहीत हे ठरवताना त्यांचा समासघटक म्हणून होणारा वापर हा आपल्याला चकवू शकतो. काव्यशास्त्राच्या (किंवा क्रियेच्या किंवा साहित्यशास्त्राच्या) परिभाषेत सांगायचं तर शब्दाच्या ठिकाणी अर्थ व्यक्त करणारी शक्ती अभिधा ही योग (म्हणजे अवयवांना जोडून), रूढ (म्हणजे अवयव लक्षात न घेता) आणि योगरूढ (अवयव आणि रूढी दोन्ही लक्षात घेऊन) अशा तीन तऱ्हेने अर्थ व्यक्त करते. पाठक ह्यात पाठ् + अक असे अवयव पाडता येतात. पण मंडप ह्या शब्दाचे असे अवयव पाडता येत नाहीत. पण पंकज ह्या शब्दात पंके जाति (चिखलात जन्मलेले) असे अवयव पाडता आले तरी ती संज्ञा केवळ कमळालाच उद्देशून वापरता येते. बेडूकही चिखलातच जन्मतो पण त्याला पंकज म्हणत नाहीत. इथे रूढीला अधिक महत्त्व आहे. तोच प्रकार महाकाव्य ह्या संज्ञेबाबत घडतो असे वाटते.
काळाचा विचार केला तर लिखित व्यवहारात तरी काव्य ही संज्ञा आधीच्या टप्प्यावरची आहे कविता ही नंतरच्या टप्प्यावरची. किंवा काव्य हा संस्कृत शब्द आहे. कविता हा मराठी (प्राकृत/ देशी). त्यामुळे कालिदासादिकांच्या रचनांचा उल्लेख करण्यासाठी आधी तो शब्द रूढ झाला.
काव्य आणि कविता ह्यांतील एक भेद मात्र करता येतो. काव्य ही संज्ञा जुन्या काळी व्यापक अर्थी (आज आपण साहित्य म्हणतो त्या अर्थी गद्य किंवा पद्य स्वरूपाच्या रचनांसाठी) वापरली जात असे. काव्यशास्त्र हा शब्द हेच सांगतो. पण कविता हा शब्द विशिष्ट प्रकारच्याच (गद्य किंवा पद्य) रचनांसंदर्भात वापरण्यात येतो. ह्या काव्य ही संज्ञा मात्र व्यापक आणि मर्यादित अशा दोन्ही अर्थी वापरात आहे. बी कवींचे समग्र काव्य इ. प्रयोगांवरून हा मर्यादित अर्थ स्पष्ट होतो.
तात्पर्य कविता ह्या अर्थी काव्य आणि कविता ह्या दोन्ही संज्ञा रूढ आहेत. पण साहित्य ह्या अर्थी कविता हा शब्द वापरता येत नाही. काव्य हा वापरता येतो.
प्रिय श्री० सुशान्त देवळेकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
किती सुंदर विवेचन आपण केलेत? व्याकरण, रूढी, संदर्भ, भाषाविकास इत्यादी भाषाशास्त्राच्या विविध अंगांनी केलेला हा उहापोह उत्कृष्ट आहे. आपल्या सर्व मराठीभाषाप्रेमींना सुरस तर वाटेलच पण अधिकाधिक मंडळींना या चर्चापीठावर आपापले प्रश्न मांडण्यास व त्यांवर विविध अंगांनी चर्चा करण्यास उद्युक्त करेल. अत्यंत आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
कविता म्हणजे ” Poem” आणि काव्य म्हणजे “Poetry”
“काव्य” हा “वाडमय-प्रकार” , जसे “गद्य” आणि “पद्य”
“रामायण” आणि “महाभारत” ही दोन्ही “खण्डकाव्ये” म्हणून द्न्यात आहेत. कदाचित त्यांना “प्रचंड अखंड काव्ये” म्हणणे इष्ट होईल
वास्तविक ती अनेक कवितांचे संग्रहच हॊत. त्यांना रूढीनुसार खण्डकाव्ये
म्हणत असावेत.
— अविनाश बा. जगताप
प्रिय श्री० अविनाश जगताप यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले मत मांडल्याबद्दल आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
खंडकाव्य म्हणजे महाकाव्याच्या कक्षेत न येणारे कथात्मक काव्य. महाकाव्याप्रमाणे जीवनाच्या सर्वांगीण किंवा बृहत् चित्रणाकडे न वळता निवडक भागावर कटाक्षाने भर देणारे काव्य म्हणजे खंडकाव्य. उदा० मेघदूत, टेनिसनचे प्रिन्सेस, गिरीशांचे कमल, यशवंतांचे बन्दीशाला वगैरे.
खंडकाव्यात महाकाव्याची खोली आणि व्याप्ती नसते.
वाल्मीकींचे रामायण, व्यासांचे महाभारत, होमरची इलियद व ओदिसी,कालिदासाचे रघुवंश, नरेंद्रकवीचे रुक्मिणी-स्वयंवर किंवा केरळच्या अतुलकवीचे मूषिकवंश ही महाकाव्ये आहेत.
खंडकाव्याहून छोटी काव्ये म्हणजे आख्याने व उपाख्याने. उदा० चिलयाख्यान, ध्रुवाख्यान, अंबरीशाख्यान, मुक्तेश्वराचे हरिश्चंद्राख्यान, मोरोपंतांची कचोपाख्यान व नलोपाख्यान वगैरे.
गद्यपद्यमय काव्याला चंपूकाव्य म्हणतात. उदा० त्रिविक्रमभट्टाची नलचंपू व मदालसाचंपू. सरतेशेवटी, सगळ्यात छोट्या काव्याला चारोळी म्हणतात.
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
माहितीबद्दल आभार.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट