हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)

“आपल्या मराठी भाषेत इतके उत्तम शब्द उपलब्ध असतानाही त्यांच्याऐवजी हिंदी पंडितांनी जन्माला घातलेला, विपर्यस्त अर्थाचा शब्द आपण विनाकारण का रूढ करतो, असे कोडे मला पडले.”

२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठीभाषा दिन म्हणून पाळला जातो. मराठीतील सध्याच्या अग्रगण्य मासिकांपैकी एक समजल्या जाणार्‍या ’अंतर्नाद’ मासिकाने त्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या फेब्रुवारी २०११च्या मराठीभाषा विशेषांकातील श्री० सलील कुळकर्णी यांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

अमृतमंथन_हिंदी वाक्यम् प्रमाणम् _ले० सलील कुळकर्णी__110127

या विषयी आपल्यालाही काही सूचना, भाष्य करायचे असेल किंवा ’हिंदी वाक्यम्‌’ प्रमाणम्‌’ची आणखी काही उदाहरणे मांडायची असतील तर आपले टिपण लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य लिहा.

– अमृतयात्री गट

ता०क० अशाच विषयावरील लोकमान्य टिळकांचा खालील दुव्यावरील लेखही अवश्य वाचून पहा.

पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)

.

Tags : ,  

65 thoughts on “हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)

  • प्रिय श्री० महेंद्र कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिसादाबद्दल, अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे.

   आपल्याला हा विषय जर महत्त्वाचा वाटत असेल तर मग आपण सर्वांनी ह्या विषयाच्या विविध पैलूंवर जास्तीत जास्त लोकांसमोर चर्चा करून ह्या विषयाचे महत्त्व अधिकाधिक लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्या आधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच हिंदीच्या आक्रमणाला बळी न पडण्याची दक्षता सतत बाळगली पाहिजे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० महेंद्र कुलकर्णी यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपल्या पत्राबद्दल आभार. बरेच दिवसांनी आपले पत्र आले आहे.

     राजकारणी हा सर्वच क्षेत्रात हुशार व पारंगत असतो असे केवळ आपल्याच देशात मानले जाते. आपले राजकारणी उद्योजक, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, डॉक्टर, अर्थतज्ज्ञ वगैरे सर्वांनाच नेहमी उपदेश व मार्गदर्शन करीत असतात. त्यांची सत्ता हे कारण सोडल्यास इतर कुठल्याही दृष्टीने त्यांना तसे करण्याचा नैतिक, शैक्षणिक, कर्तृत्वप्राप्त असा अधिकार नसतो. पण तरीही आपल्या देशात त्यांचे सर्वजण एका कानाने ऐकून घेतात व दुसर्‍या कानाने सोडून देतात. मध्यंतरी कॉंग्रेस श्रेष्ठींवर चिडलेल्या नारायण राणेंनी कॉंग्रेस नेत्यांवर २६/११च्या संदर्भात आरोप केले; तेव्हा एकाने त्याबद्दल न्यायालयात फिर्याद दाखल केली की “राणेंना जर खरोखरच माहिती असेल तर त्यांना ते सर्व कळवण्यास भाग पाडून शासनाने संबंधितांवर कृती करावी”. त्यावर न्यायालयाने जवळजवळ असेच म्हटले की “राजकारण्यांच्या बोलण्याला कुठे महत्त्व द्यायचे? ते असेच मूर्खपणाचे बरळत असतात.” असे म्हणून त्यांनी ते प्रकरण निकालात काढले. आपल्यालाही आबांच्या बाबतीतही तसेच करावे लागेल.

     जे राज्यशासन मराठी शाळांची मुस्कटदाबी करीत आहेत त्यामधील मंत्र्यांना स्वभाषेबद्दल कितीशी आपुलकीची भावना असणार?

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 1. प्रिय श्री सलील कुलकर्णी यांस,
  सप्रेम नमस्कार!
  तुमच्या लेखातील मुद्यांशी १००% सहमत.
  व्यस्त, शहीद, परिवार……….खरंच किती शब्द उगाचच घुसडले गले आहेत आपल्या मराठीत. स्वर्गिय हा शब्द “स्वर्गवासी” साठी वापरणे म्हणजे याची परिसीमाच झाली.

  मराठी वाचवा या आंदोलनाआंतर्गत सर्व प्रथम पत्रकार, वृत्तवाहीन्यांवरील निवेदक तसेच मराठी शिकवणारे शिक्षक यांसाठी शुद्ध मराठीचं प्रशिक्षण आयोजित केलं पाहीजे आणि ते अनिवार्य केलं पाहीजे. पण मग काही लोक “कोणती भाषा शुद्ध” असाच प्रश्न उपस्थित करतील. साधारण १० दिवसांपूर्वी श्री किशोर दरक यांचा सकाळ मधील भाषेचे शिक्षण यांवरील लेख वाचलात का? विशिष्ट समाजात, जातीत, शहरात बोलली जाते तीच मराठी शुद्ध म्हणजे प्रमाण मानून मुलांना का शिकवायचं? पहिली पासून मुलांना त्यांच्या बोली भाषेतील मराठीत सर्व विषय शिकवावेत……….यासारखे आणि बरेच गोंधळाचे मुद्दे त्या लेखात त्यांनी मांडले होते. http://www.esakal.com/esakal/20110118/5301751081729487979.htm
  आपलं त्याविषयी काय मत आहे?
  अपर्णा

  • प्रिय सौ. अपर्णा लळिंगकर अर्थात ’शांतिसुधा’ यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिसादाबद्दल, अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे.

   १. प्रस्तुत लेखाबद्दल: आपल्याला हा विषय जर महत्त्वाचा वाटत असेल तर मग आपण सर्वांनी ह्या विषयाच्या विविध पैलूंवर जास्तीत जास्त लोकांसमोर चर्चा करून ह्या विषयाचे महत्त्व अधिकाधिक लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्या आधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच हिंदीच्या आक्रमणाला बळी न पडण्याची दक्षता सतत बाळगली पाहिजे.

   मी आपल्याला एक गोष्ट सुचवू इच्छितो. हे पत्र आपण थेट अंतर्नाद मासिकाचे संपादक श्री० भानु काळे यांना (bhanukale@gmail.com) का पाठवत नाही?
   किंवा आपण आपला विचारपूर्ण प्रतिसाद अमृतमंथनावरील त्या लेखाच्या (http://wp.me/pzBjo-BF) खालील चर्चा चौकटीमध्ये का नोंदवत नाही?
   आणि सर्वात उत्तम म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी का करीत नाही? अंतर्नाद व अमृतमंथन ह्या दोन्ही चर्चापीठांवर वाचकांच्या पत्रांना विशेष महत्त्व दिले जाते.

   आपल्या पत्रात आपण आपल्याला आलेले असेच अनुभव, अशा प्रकारच्या स्वतःहून आपण स्वीकारलेल्या हिंदीच्या आक्रमणाची आणखी काही उदाहरणेसुद्धा आपण वाचकांच्या नजरेस आणून देऊ शकता व त्याबद्दल आपले मत मांडू शकता.

   २. बोलीभाषांबद्दल: बोलीभाषा प्रत्येक ५०-१०० किमीवर बदलते. म्हणूनच तर प्रमाणित भाषा सर्वांशी संवादासाठी व औपचारिक शिक्षणासाठी वापरली जाते. लिहिण्यासारखे खूप आहे. काही विशिष्ट मुद्द्यांबद्दल चर्चा करायची असेल तर तसे करू.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. हेच आपल्या मराठी भाषिकांचे दुखणे आहे. महाराष्ट्रात राहतो पण हिंदीशिवाय पान हलत नाही. मी लोकलमध्ये हा अनुभव घेतला आहे. एक उदाहरणच पहा. मी गाडीतून उतरण्यासाठी दरवाजात उभा होतो. मागून एक माणूस मला विचारतो,”आपको उतरना है क्या”. मी म्हणतो पण धक्के मारू नका, स्टेशन आल्यावरच उतरीन. माणूस मराठी होता म्हणून त्याला म्हटले, “तुम्ही मराठी, मी मराठी, मग हिंदीत का बोलता”. त्यावर त्याचे उत्तर, “हिंदीमे किधर बोला”. आता सांगा काय करणार अशा लोकांपुढे.

  • प्रिय श्री० अनिल करंबेळकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आम्ही सर्व अमृतमंथनाचे परिवारसदस्य आपली चीड नक्कीच समजू शकतो. आपण म्हणता तशी स्थिती झाली आहे खरी. पण मला असं वाटतं की मुख्यतः मोठ्या शहरांत ही स्थिती अगदी वाईट आहे, लहान शहरांत कमी. पण लहान शहरे मोठ्या शहरांच्या मागे फरफटत जात आहेत. त्यांच्याच प्रमाणे स्वभाषेला लपवून ठेवून इंग्रजी आणि हिदी भाषांबद्दल आदर बाळगणे म्हणजेच सुशिक्षितपणा, विशालहृदयीपणा अशा चुकीची समजुती त्यांच्या डोक्यात घुसवल्या जात आहेत. मोठ्या शहरातील मंडळी ज्या फ्याशनी करतील त्या आपणही करायच्या नाहीतर आपल्याला अडाणी समजले जाईल अशी जी भीती लहान शहरांत व गावांत असते त्याचाच हा वेगळा अविष्कार. दहा वर्षांपूर्वीपर्यंत अगदी पुण्यातही परिस्थिती बरीच आटोक्यात होती. पण गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने आलेल्या ऐटीत राहणार्‍या आयटी’च्या परप्रांतीयांच्या व देणगी देऊन प्रवेश घेणार्‍या काळ्या पैशाच्या धनिकांच्या पोरट्यांपुढे आपण पूर्णपणे गुडघे टेकल्यामुळे आपल्याच राज्यात आपलीच आई पोरकी झाली. तिच्या नशीबी इतरांच्या भाषांच्याहून खालच्या दर्जाचे जीवन आले. याला कारणीभूत आपणच सर्व नाही काय?

   आपले राजकारणीही आपलेच प्रतिनिधी. आपल्यालाच आईच्या हलाखीबद्दल लाज, चाड नाही; तर त्यांना कुठीन असणार? इतर राज्यांत स्थानिक जनतेच्या प्रचंड दबावामुळेच राजकारणी स्वभाषेच्या संवर्धनाचे धोरण पाळतात. एरवी ती मंडळी स्वतःच्या आईलाही विकण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आणि तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे.

   अर्थात आपण मराठीप्रेमींनी सातत्याने, वारंवार आपल्याला जमेल त्या मार्गाने स्वाभिमानाचा प्रसार करीत राहिले पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासारखी अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवली त्याचप्रमाणे आपणही ही परिस्थिती बदलू शकतो. पण आपली एकी पाहिजे व आपल्या कृतीत सातत्य पाहिजे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • अशा लोकांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. काहीही झाल तरी चालेल, फक्त आणि फक्त मराठीतच बोलायचं.
   त्याला मराठी समजेल कि नाही, मग त्याला कस वाटेल, ह्या सगळ्याचा विचार आपण का करायचा?

   • प्रिय श्री० विनोद सोबले यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    आपल्या पत्राबद्दल आभार.

    बहुसंख्य मराठी माणसांनी आपल्याप्रमाणे निश्चय केल्यास परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या खालील लेखातही या मुद्द्याबद्दल विवेचन केलेले आहे. लेख अवश्य वाचा.

    आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे — } http://wp.me/pzBjo-Iv

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

 3. श्री. सलील कुळकर्णी यांचा फेब्रुवारी २०११ च्या ‘अंतर्नाद’मधील लेख मराठी भाषेत हिंदी शब्दांची विनाकारण सरमिसळ करणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण हे सरसकट पाहत असतो आणि हतबल होऊन त्याच्या आहारी जात असतो. श्री. सलील यांचे शतशः अभिनंदन.
  मंगेश नाबर

  • प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.

   आपल्याला एखादे नवीनच तत्त्व समजले व पूर्णपणे पटले, की मग आपला संबंधित गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपण तशा चुकांबद्दल अतिशय जागरूक व संवेदनशील होतो आणि मग तशा अधिकाधिक गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतात. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या भाषेची काळजी घेतलीच पाहिजे व तसे इतरांनाही समजावून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. “हिंदी वाक्यम् प्रमाणम्” साठी श्री.सलील कुळकर्णी आणि ‘अंतर्नाद’चे आभार.वाक्यम् ऐवजी शब्दम् असायला हवे होते,असे माझे मत आहे. मराठी भाषेत हिंदी/उर्दू भाषेतील शब्द ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु अलिकडच्या काळात या दोन्ही भाषेतील शब्द ज्या वेगाने शिरले आहेत ते बघता आपल्या मायबोलीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवते. बरं,एवढ्यावरच हा प्रकार थांबला असता तरी समजण्यासारखे होते. परंतु दिवसागणिक नवनवीन शब्दांची घुसखोरी ही सुरूच आहे.गंमत म्हणजे त्या सर्व शब्दांना मराठीत पर्यायी सुंदर शब्द आहेतच. हे असेच चालत राहिले तर मराठी वाक्यात मराठी-हिंदीचे “प्रोपोर्शन” ६०-४० किंवा ८०-२० असे होईल की काय अशी भीती वाटते. ही भीती काही अनाठायी नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास “किल्ली वा किल्ल्या” या शब्दाची जागा “चावी वा चाव्यांनी” अशी घेतली आहे जणू चावी हाच शब्द शुद्ध असावा (आहेच) अशी अनेकांची ठाम समजूत झाली आहे. नवीन पिढीला चावी हाच शब्द योग्य वाटतो, किल्ली काय हे माहीत ही नाही. कहर असा की चावीने मराठी शब्दकोषात स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. अलिकडच्या काळात मटार(वाटाणा),उद्देश(उद्दिष्ट),तापमान(तपमान),दौड (धाव) असे अनेक शब्द वाक्प्रचारात (नव्हे साहित्यात देखील) दिसून येतात. ही मराठीची मृत्यूघंटाच होय. मराठी बांधव परस्परांशी (हे जाणून देखील की दोघे मराठी भाषिकच आहोत) पूर्णचे पूर्ण वाक्यच किंवा संभाषणच हिंदीतून करायला लागले आहेत हा तर एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. याविषयाचे गांभीर्य त्वरित ओळखून आपण कृती करूया. फक्त मराठीत बोलूया.

  • प्रिय श्री० दीपकराव (दीपकजी नव्हे) राईरकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या आपुलकीच्या पत्राबद्दल अतिशय आभारी आहोत.

   श्री० सलील कुळकर्ण्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आपण हिंदीचा बराच प्रभाव असलेल्या विदर्भात स्थायिक आहात. शिवाय आपल्या आयुष्यातील बराच काळ आपण उत्तर भारतात (बिहारात?) घालवला आहे. शिक्षणही कदाचित मराठी शाळेत घेतलेले नसेल. असे सर्व असूनही आपल्या मराठी भाषेची शुद्धता, आशयात स्पष्टपणे दिसून येणारी मायबोलीविषयीची तळमळ, अभ्यासू उत्तर हे सर्व पाहून आपले अत्यंत कौतुक वाटते. सलीलरावांनी आणखी सांगितल्याप्रमाणे आपणही विदर्भातील एका दैनिकात अशाच प्रकारचा मराठी भाषेवरील हिंदीच्या अनिष्ट प्रभावाबद्दल एक उत्तम लेख लिहिला होता.

   आपले पत्र वाचल्यावर सूक्ष्म निरीक्षण शक्तीचेही कौतुक करावेसे वाटते. आपण वानगीदाखल दिलेले ’चावी’सारखे शब्द हे आपण मूळ ’किल्ली’सारख्या शब्दांच्या जागी विनाकारण जबरदस्तीने प्रस्थापित करतो आहोत याची ९९% मराठीजनांना पुसटशीही जाणीव नसेल. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरात जेव्हा लोकांच्या तोंडी किल्ली हा शब्द सर्वत्र ऐकला तेव्हाच आम्हाला ही जाणीव झाली, त्या आधी ह्याची कल्पनाच नव्हती. मटार (हिरवा वाटाणा) ही बहुधा पुणेकरांची विशेष देणगी. मुंबईत महापालिकेच्या, बेस्ट बशींच्या पाट्यांवर व त्यामुळे बर्‍याचदा सामान्य मराठीजनांच्या तोंडी ’सेनापती बापट मार्ग’, ’महर्षि कर्वे मार्ग’, ’सावरकर मार्ग’ असे अशिष्ट शब्द येत असले तरी पुण्याचे कर्मठ विद्वान मात्र त्यांचे ’एस० बी० रोड’, ’कर्वे रोड’ असे शुद्धीकरण करून घेतातच.

   आपल्याला एखादे नवीनच तत्त्व समजले व पूर्णपणे पटले, की मग आपला संबंधित गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्यापूढे आपण तशा चुकांबद्दल अतिशय जागरूक व संवेदनशील होतो आणि मग आजूबाजूच्या तशा अधिकाधिक गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतात. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या भाषेची काळजी घेतलीच पाहिजे व तसे इतरांनाही समजावून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वच मिळून यथाशक्य ते सतत करीत राहू. किती परिणाम होईल कोण जाणे. पण केल्यामुळे मनाला तरी कृतकृत्यता लाभेल.

   आपण अशिक्षित किंवा अडाणी आहोत असा इतर लोकांचा (गैर?)समज होईल अशा भीतीने खरेच कमी शिकलेली आणि त्यांच्याबरोबर स्वतःला अतिशिक्षित म्हणवणारी मराठी माणसे देखील मराठीला बाजूला बसवून इंग्रजी किंवा हिंदीमध्येच बोलतात. अनेकदा समोरचा माणूस मराठी आहे किंवा मराठी जाणतो, याची खात्री असूनदेखील. आता अशा या न्यूनगंडग्रस्त स्वभावाला काय औषध आहे? स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल आत्मविश्वास असेल तर आपण अशा बाह्य उपकरणांद्वारे सुशिक्षित, हुशार म्हणवून घेण्याचा प्रयत्न करणार नाही.

   खरं म्हणजे हिंदी भाषकांचा प्रदेश हा प्राचीन काळी हिंदूंच्या रामकृष्णादी देवतांचा व ऋषिमुनिंचा प्रदेश असला तरी आज शिक्षण, संस्कृती, सम्पन्नता इत्यादी कुठल्याही दृष्टींनी आदर्श प्रदेश मानला जात नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रीयांनी स्वतःच्या भाषेला कम-अस्सल समजून हिंदी भाषा बोलण्यात धन्यता मानावी अशा स्वाभिमानशून्यतेच्या व स्वतःला हीन मानण्याच्या वृत्तीला काय म्हणावे?

   यावर उपाय म्हणजे आपण सर्वांनी आपल्या राज्यात शक्यतो सर्वत्र मराठीचाच वापर करायचा आणि तोही भेसळमुक्त मराठीचा.

   आता थोडेसे वाक्यम्‌-शब्दम्‌च्या घोळाबद्दल. सलीलरावांचे म्हणणे असे:
   (संस्कृत वचने व व्याकरणाचा किचकट कीस याबद्दल वाचायला आवडत नसलेल्यांना कदाचित वाचण्यास कंटाळा येईल.)

   पहिला मुद्दा म्हणजे प्रस्तुत लेखात आपला आक्षेप केवळ हिंदी शब्द वापण्याबद्दलच नाही, तर हिंदीच्या सारखे व्याकरण पाळणे किंवा हिंदीच्या धाटणीची वाक्यरचना करण्याबद्दलही आहे. ’मला मदत कर’ याच्या ऐवजी ’माझी मदत कर’ असे म्हणणे किंवा ’मी असे करतो’ या ऐवजी ’मी एक काम करतो’ असे म्हणेणे अशा रचना अयोग्यच आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लेखात विस्तारभयास्तव त्याबद्दल फार विवेचन केलेले नाही.

   दुसरा मुद्दा म्हणजे वाक्य व प्रमाण या शब्दांच्या अर्थसंबंधाबद्दल.
   वाक्य ह्याचा इथे अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे – a precept, rule, dictum; an aphorism; सिद्धांत; नियम, तत्त्व.
   प्रमाण ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ ’प्रमीयते अनेन इति’ – ज्याचे निकष लावून ज्ञानाच्या सत्यासत्यतेचे, योग्यायोग्यतेचे मोजमाप केले जाते असे हे. म्हणजे ज्याच्या आधारे माणसाला मिळणारे ज्ञान सत्य आहे असे तो मानतो किंवा मानू शकतो त्याला प्रमाण असे म्हणतात. पतंजलि मुनींच्या योगशास्त्रात प्रमाणाचे तीन उपप्रकार सांगणारे खालीलप्रमाणे सूत्र सांगितले आहे.
   प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि । (पातंजल योगसूत्राणि – समाधिपाद १.७)
   म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम असे प्रमाणांचे तीन प्रकार आहेत.
   प्रस्तुत परिस्थितीत लागू होणारा प्रमाणाचा प्रकार म्हणजे ’आगम प्रमाण’. आगम म्हणजे आप्तवाक्य. इथे आप्त या शब्दाचा अर्थ – ’आप्तस्तु यथार्थ वक्ता।’ म्हणजे नेहमी यथार्थ विश्वसनीय, विसंबून-अवलंबून राहण्यासारखा, प्रामाणिक, डोळे झाकून विश्वास ठेवावा असा ज्ञानाचा स्रोत. श्रुति-स्मृति (वेद, शास्त्रे व स्मृतिग्रंथ) इत्यादींमधील ज्ञान (वेदवाक्य, स्मृतिवाक्य, शास्त्रवचन) हेही आगम आहेत. आप्त म्हणजे आदरणीय, विश्वसनीय अशी व्यक्तीही असू शकते. उदा० गुरु (गुरुवचन), मातापिता, आदरणीय ज्ञानी-विद्वान अशी व्यक्ती ज्यांनी आपल्याला केलेला उपदेश नेहमीच हितकर, लाभदायक असणार अशी आपली खात्री असते.
   यावरून लक्षात येईल की अशा शास्त्रोक्त ज्ञानाच्या बाबतीत वाक्य किंवा वचन हे शब्द doctrine म्हणजे (धार्मिक) शिकवण, शिक्षण, बोध, उपदेश; किंवा इतर सिद्धांत, (प्रतिपादित) मत, नियम, तत्त्व; यांच्या बाबतीत वापरले जातात. या लेखात हिंदी लोकांनी काहीही म्हटले, कितीही गाढवपणा केला, तरीही आपण त्यांचे म्हणणेच प्रमाण मानतो, त्यांचेच तत्त्व खरे आहे असे मानतो, असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. आता प्रस्तुत संदर्भात ’वचन’ असा शब्द वापरला नाही. कारण वचन या शब्दाचा अर्थ मराठीत बहुधा ’शपथ, प्रतिज्ञा’ अशा प्रकारचा होतो. म्हणून ’हिंदी वचनम्‌ प्रमाणम्‌’ म्हणण्याऐवजी ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌’ असे म्हटले. (अर्थात खरे म्हणजे काटेकोर व्याकरणानुसार ’हिंदीवाक्यम्‌’ हा एक शब्द पाहिजे, पण हल्ली आपण अनेकवेळा इंग्रजीप्रमाणे समास तोडूनच लिहितो.)

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. मराठी शब्द असताना हिंदी शब्द, तोही अस्थानी किंवा विपरीत अर्थाचा वापरणे ही चूक आहेक. या चुकीला काही लोक प्रतिष्ठा देत असतील, तर आपण मात्र ही बाब कमीपणाची आहे हे वारंवार सांगत राहिले पाहिजे.-अनिल गोरे(मराठीकाका)

  • प्रिय श्री० अनिल गोरे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल अतिशय आभारी आहोत. आपले म्हणणे अगदी योग्य आहे. स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा नव्हे आणि न्यूनगंड हीप्रतिष्ठेची बाब नव्हे हे आपण सतत लोकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बर्‍याचदा अशा गोष्टी स्पष्ट झाल्या की मग त्यांना स्वतःहूनच अशा चुका लक्षात येऊ लागतील.

   आपल्याला एखादे नवीनच तत्त्व समजले व पूर्णपणे पटले, की मग आपला संबंधित गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपण तशा चुकांबद्दल अतिशय जागरूक व संवेदनशील होतो आणि मग तशा अधिकाधिक गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतात. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या भाषेची काळजी घेतलीच पाहिजे व तसे इतरांनाही समजावून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 6. Dear Shri. Saleel Kulkarani,
  I give below my letter written to the editor of Antarnaad.
  प्रिय संपादक ‘अंतर्नाद’, श्री. भानु काळे यांस,
  सस्नेह नमस्कार.
  आज आपल्याला हे लिहिण्याचे कारण, की आपला फेब्रुवारीचा अंक. या अंकावरील कुसुमाग्रजांचे सुबक छायाचित्र आणि अंकातील मराठी भाषेचा आपल्याच प्रदेशात, आपल्या समाजात, आग्रह धरणा-या चार विचारी लेखकांचे विचार करायला लावणारे लेख. यातील श्री. सलील कुलकर्णी ( की श्री. सलील कुळकर्णी ? ) यांचा लेख, ” हिन्दी वाक्यं प्रमाणं “, मला पुनःपुन्हा वाचावासा वाटला. या पत्रात मी फक्त याच लेखावर लिहिणार असलो तरी इतर तीनही लेख त्याच तोडीचे आहेत. त्या सर्व लेखकांना आणि मुखप्रुष्ठ्कार श्री. ल.म. कडू यांना माझे धन्यवाद कळवा.
  भानुराव, मी जरी मूळचा मराठी असलो, तरी आमच्या गेल्या तीन पिढ्या कोलकात्यात म्हणजे कट्टर बंगभाषी लोकांच्या सहवासात गेल्या आहेत. शिवाय माझे व्यवसायानिमित्त दक्षिणेपासून पश्चिम ते ईशान्येपर्यन्त भ्रमण सतत चालू असते. येथे सर्वत्र मला त्या त्या भाषांचे वर्चस्व दिसून आले आहे. अपवाद आपल्या मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा. आपण मराठी भाषिक फारच सोशिक बुवा, असे मला तुलनेने सांगावे लागते. सीमा प्रांतात सोडा, पण मुम्बई व पुण्यात मराठीचे प्रमाण कमी कमी झाले आहे. येथे मला कोणत्याही भाषेला किंवा प्रान्तान्ना कमी लेखायचे नाहीये. किंबहूना आपण आपली अस्मिता कशी जपावी हे तेथे जाउन शिकावे. एकच गोष्ट आपल्या समोर मांडतो. महाराष्ट्रीय असलेले पण भारताच्या अखंड एकात्मतेचा आदर्श असलेले श्री. एकनाथजी रानडे तमिळ प्रदेशात जाउन कन्याकुमारीच्या समुद्रकिना-यावर स्वामी विवेकानंद यांचे अभूतपूर्व असे स्मारक जनतेच्या सहकार्यावर उभारतात, तर काही वर्षांनंतर त्या भव्य स्मारकाशेजारी कुणा प्राचीन तमिळ कवीचे त्याहून तिप्पट उंचीचे स्मारक उभे केले जाते. ते पाहिल्यावर विवेकानंद स्मारक खुजे वाटावे. त्याची शोभा कमी व्हावी, हा हेतु नसेल ना ? याचे तेथे कुणालाही जाणवू नये याचे आश्चर्य वाटते.
  यावर श्री. सलील यांनी दिलेला उतारा हाच प्रभावी मंत्र आहे. त्यांची अनुदिनी ( ब्लॉगसाईट ) म्हणजे ते आपले विचार प्रत्यक्ष आचरणात कसे आणतात, याचे उत्तम उदाहरण आहे. सलील यांच्या अनुदिनीचा पत्ता त्यांच्या आपण पान १३ वरील दिलेल्या माहितीत द्यायला हवा होता.
  ती आहे : https://amrutmanthan.wordpress.com/ . त्यांचे घोषवाक्य आहे – मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे… मराठी संस्कृती व तिच्याच अनुषंगाने भारतीय संस्कृती. सर्व लेख मुख्यतः याच सूत्राला धरून असतात. तिच्यावरील लेखांवर नजर टाकावी.
  आपला,
  निखिल शाळिग्राम
  ११७, दुर्गा प्रसाद, हाजरा रोड, कोलकाता ७०० ००५.
  इ-मेल : nikheel.shaligram@gmail.com

  • प्रिय श्री० निखिल शाळिग्राम यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले पत्र वाचल्यावर ते ’तीन पिढ्या बंगालात घालवलेल्या’ एका मराठी माणसाचे असेल असे शक्यच वाटत नाही. तीनशे पिढ्या महाराष्ट्रात घालवलेल्या आमच्या कितीशा मराठी बांधवांना एवढे उत्तम, सहज, विचारपूर्ण, स्वाभिमानाने ओथंबलेले व शब्द-अर्थ-व्याकरण या तिन्ही दृष्टींनी चोख असे मराठी लिहिता येईल याबद्दल शंकाच वाटते.

   आपण ’भानुजी’ असे न म्हणता ’भानुराव’ म्हणालात; यातच सर्वकाही आले. एवढी एक गोष्टसुद्धा आपल्या मराठी भाषेच्या आणि मराठी संस्कृतीबद्दलच्या ज्ञानाबद्दल व आपल्या दर्जेदार मराठी वाचनाच्या छंदाबद्दल बरेच काही सांगून जाते.

   श्री० सलील कुळकर्णी म्हणतात त्याप्रमाणे स्वभाषा व स्वसंस्कृतीबद्दलचे प्रेम म्हणजे काय हे त्यांना बंगालात (खडगपूर येथे) पाच वर्षे वास्तव्य केल्यावरच लक्षात आले. जो माणूस महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांत व इतर देशांत प्रवास करतो, वास्तव्य करतो, तेथील लोकांच्या स्वतःच्या संस्कृती, भाषा, देश, परंपरा इत्यादींबद्दलचा अभिमान, त्यानुसार त्यांचे वागणे याचे जो निरीक्षण करतो त्यालाच महाराष्ट्रीयांत काय न्यून आहे याची स्पष्ट जाणीव होते. अन्यथा इथेच आयुष्य काढणार्‍यांची वृत्ती बर्‍याचदा कूपमंडूक बनलेली आढळून येते. आपल्या पत्रावरूनही ह्याच सिद्धांताला बळकटी मिळते. मात्र इतर भाषिकांना स्वाभिमानाची शिकवण आईच्या पोटात असल्यापासूनच मिळते. त्यासाठी आपल्या गावाबाहेरही पाऊल टाकण्याची त्यांना आवश्यकता नसते. आणि हे सर्व केवळ श्रीमंतच नव्हे तर आसाम, उडिस्सा (नक्की उच्चार आपणच सांगावा), व इतर गरीब राज्यांच्या बाबतीतही तेवढेच सत्य आहे.

   आपल्या उत्तम पत्राबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो.

   नेहमी संपर्कात राहू. महाराष्ट्रात येण्याचा बेत केल्यास कळवा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 7. आपला लेख वाचला ,खूप आवडला ,केवळ तुमचा आहे म्हणून नव्हे तर वास्तविकता आहे नि वाचनीय आहे म्हणून ,
  मराठी लेखनात माझ्याही खूप चुका होत आहेत तुम्ही सांगितल्या प्रमाणे सुधारणा करीत आहेच .हा लेख इतरांनाही पाठविला आहे .
  आपले दोन्ही मेल आय डी आहेत माझ्याकडे,खरे तर अलीकडे बनावट नावाने खूप मेल येतात म्हणून या आधीचा माझा मेल मी त्याकरीताच पाठविला होता .
  आपण वेळोवेळी माझ्या मेल ला उत्तर देता त्यासाठी आभारी आहे !!!!

  • प्रिय अपेक्षा चौधरी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले लेखन वाचताना एक वेगळाच अनुभव येतो. पूर्वी शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीने दिलेल्या गाण्यांच्या संगीतातील शंकरची गाणी कुठली व जयकिशनची कुठली ही ओळखणे हा स्वतःला तज्ज्ञ म्हणवणार्‍या रसिकांचा खेळ असे. त्याचप्रमाणे आपले लेखन वाचतानाही त्यात दोन भिन्न व्यक्तींच्या लेखनाची सरमिसळ झाली आहे असे वाटत राहते. लेखाचा काही भाग उत्कृष्ट अभिव्यक्ती असलेला व उत्कृष्ट मराठी भाषेची जाणकार असणार्‍या व्यक्तीने लिहिला असावा असे वाटते. तर कधी कधी थोडासा भाग आंग्लमाध्यमशिक्षित, मराठीचे मर्यादित वाचन व जाण असणार्‍या व्यक्तीने मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केलेला असावा असा वाटतो. आम्हाला वाटते की आपल्यात एका चांगल्या लेखकाच्या प्रतिभेच्या गुणाचे अंकुर आहेत. आपण त्याला योग्य ते खतपाणी घालून त्याची परिश्रमपूर्वक जोपासना करावी. आपण सरावाने उत्तम लेखन करू शकाल अशी खात्री वाटते. जगप्रसिद्ध वक्ता चर्चिल ह्याची गोष्ट आपल्याला माहित असेलच.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 8. प्रिय सलीलजी,
  तुमचा ‘अंतर्नाद’ च्या ताज्या अंकातील ‘मराठी’ वरील लेख फारच आवडला. योग्य विषयावरील, योग्य शब्दात मांडलेले विचार वाचून फारच समाधान झाले.
  लेख थोडा ‘पसरट’ झाला आहे, आणि काट-छाट करून जास्त परिणामकारक होईल, असे माझे मत असले, तरी ते ‘auditor ‘ ची छिद्रान्वेषी सवय असे म्हणून दुर्लक्ष केले तरीही हरकत नाही!
  पुनश्च अभिनंदन!

  • प्रिय श्री० राजेंद्रराव यांसी,

   सप्रेम नमस्कार.
    
   आपल्या विचारपूर्ण आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल, अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहोत.
    
   आपल्या पत्रात आपण आपल्याला आलेले असेच अनुभव, अशा प्रकारच्या स्वतःहून आपण स्वीकारलेल्या हिंदीच्या आक्रमणाची आणखी काही उदाहरणेसुद्धा आपण वाचकांच्या नजरेस आणून देऊ शकता व त्याबद्दल आपले मत मांडू शकता.
    
   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     शिवाजी, संभाजी, बाळाजी अशा प्रकारे नावातच जी हा आदरार्थी प्रत्यय (honorific termination) पूर्वी जोडून पूर्ण नाव तयार केले जाई हे खरे आहे. तेव्हा मग तसेच नाव मानले जाई. शिवाजी हा माणूस आपले नाव शिवाजी असेच लिही. पण केवळ आदरार्थी संबोधनापुरते नावापुढे ’जी’ जोडणे (उदा० अमिताभजी, राखीजी, लताजी इत्यादी) हा प्रकार मराठीत उत्तरेमधूनच आलेला असावा.

     शीखात सर्वांच्या नावापुढे ’साहेब’ असे आदरार्थी अव्यय जोडण्याची पद्धत असावी असे वाटते. उदा० ग्रंथसाहेब.

     पूर्वी मराठीत बहुधा ’राव’ (राऊचा अपभ्रंश), ’पंत’, ’बुवा’, ’भाऊ’, ’दादा’, इत्यादी आदरार्थी किंवा आपुलकीदर्शक जोडशब्द पुल्लिंगी नावांच्यापुढे लावले जात. स्त्रियांच्या बाबतीत बाई हे आदरार्थी बिरुद असे. उदा० राणी लक्ष्मीबाई, संत जनाबाई, राजमाता जिजाबाई, श्रीमती नाथीबाई ठाकरसी, बाई यमुनाबाई नायर रुग्णालय इत्यादी.) पूर्वी बाई हा शब्द इंग्रजीमधील लेडी या उच्च बहुमानार्थी शब्दाच्या तोडीचा मानला जात असे.

     पण हल्ली मराठी माणसाला इंग्रजी किंवा हिंदी शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग केल्याशिवाय वाक्याला पुरेसा जोर, महत्त्व, मान, लाभला आहे असे वाटत नाही त्याचप्रमाणे “राव आणि पंत या शब्दांत काही पुरेसा आदर व्यक्त होत नाही व त्यासाठी इंग्रजीमधील सर किंवा हिंदीमधील जी असे शब्दप्रयोग करणे अपरिहार्य आहे” असे इंग्रजीच्या मानसिक गुलामगिरीत रुतलेल्या व दिल्लीश्वरांपुढे हांजी-हांजी करण्यात धन्यता मानणार्‍या महाराष्ट्रातील निरभिमानी धुरिणांना वाटू लागले. त्यामुळे सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी ही ’जी-जी’ची मोठी लाट आली. “यशवंतराव चव्हाणांच्या यशवंत या नावापुढे केवळ मराठीतील राव हा जोडशब्द लावण्याने त्यांच्याबद्दल पुरेसा आदर व्यक्त होणार नाही” अशा विचाराने रावच्याही पुढे जी लावून यशवंत चव्हाणांना यशवंतरावजी चव्हाण असे एकापुढे एक आदराचे डबे लावलेली नावाची आगगाडी बहाल केली गेली.

     मराठी स्वाभिमानाचे अत्युच्च प्रतीक असणार्‍या स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांना तात्याराव व त्यांच्या बंधूस बाळाराव असेच म्हणत हे मात्र आम्ही नेहरूजी, इंदिराजी, अटलजी, राजीवजी, सोनियाजी, राहूलजी, प्रियांकाजी यांच्यापुढे ’जी-जी’चे पोवाडे गात असताना पूर्णपणे विसरलो.

     शेवटी “हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌” हेच आपण अंतिम सत्य मानतो.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 9. नमस्कार,
  दुर्दैवाने, मला अमृतमंथनवर श्री. सलील कुलकर्णी यांच्या लेखाचा उर्वरित भाग वाचता आला नाही. विविध प्रकारे दुव्यांवर टिचक्या मारून पाहिल्या, पण प्रत्येक टिचकीनंतर अमृतमंथनचे तेच ते पान उघडते. फक्त एकदा, हा लेख पीडीएफ़ डॉक्युमेन्ट या फ़ॉर्‌मॅटमध्ये आहे आणि तो वाचण्यासाठी आपल्याला योग्य ते सॉफ़्टवेअर उतरवून घ्यायला पाहिजे असे काहीसे आले. यापूर्वी अमृतमंथन किंवा मराठी + एकजूट यांवरील लेख वाचताना असली अडचण कधीही आली नव्हती.
  त्यामुळे सलील कुलकर्णींच्या लेखावर काहीही प्रतिक्रिया देणे शक्य नाही. एकतर अंतर्नादचा अंक मिळवून वाचला पाहिजे किंवा अमृतमंथननेच काहीतरी करून लेख वाचण्यायोग्य लिपीत प्रकाशित केला पाहिजे.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   नक्की काय अडचण आहे ते समजायला मार्ग नाही. आता पुन्हा तपासून पाहिले तर सर्व योग्य दिसते आहे. इतर कोणीही तशी तक्रार केलेली नाही. आपण खालील दुवा उघडून पहावा. थेट लेखाच्या पी०डी०एफ०चा दुवा आहे.

   Click to access e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8_e0a4b9e0a4bfe0a482e0a4a6e0a580-e0a4b5e0a4bee0a495e0a58de0a4afe0a4aee0a58d-e0a4aa1.pdf

    
   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • जमले नाही. आपण दिलेल्या दुव्यावर टिचकी मारल्यावर ’आपल्याला हे पान उघडायचे आहे की जपून ठेवायचे आहे?’ अशी पृच्छा करणारी एक संवादपेटी उघडते. काहीही करून पान उघडायचा प्रयत्‍न केला की परत अमृतमंथनचे तेच ते पान उघडते. लेखाचा दुवा उघडण्यासाठी कुठलीतरी खास प्रणाली संगणकावर असायला हवी असे वाटते. इतरांच्या संगणकावर ती प्रणाली आधीच स्थापलेली असावी.

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आता काय करावं ते सुचत नाही. इतर कोणलाही अशी अडचण येत नाही. आपल्याला देखीलप्रथमच, याच लेखासंबंधात आली. मग तो अमृतमंथन-वर्डप्रेसचाच दोष असेल का? असलाच तर काय करावं? याबद्दल नक्की कोणी काही उपाय (आपल्याला अभिप्रेत असलेली खास प्रणाली) सुचवू शकेल काय?

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 10. प्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,

  सप्रेम नमस्कार.
   
  आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिमताबद्दल (feedback) अत्यंत आभारी आहोत. बर्‍याच दिवसांनी पुन्हा अमृतमंथनाच्या चर्चापीठामध्ये सहभागी झाला आहात. स्वागत.

  पुस्तक या शब्दाची नक्की व्युत्पत्ती ठाऊक नाही. आपटेंच्या संस्कृतकोशात तो शब्द आहे. मोल्स्वर्थ यांनी तो शब्द मूळ संस्कृत आहे असेच दाखवले आहे. कृ० पां० कुलकर्ण्यांच्या व्युत्पत्तीकोशात तो शब्द दाविडी पुसु, पुस्त या शब्दांपासून तयार झाला अशी नोंद आहे. पण नक्की काहीच कळत नाही.

  टिळकांच्या वरील लेखात सांगितल्याप्रमाणे अपवाद म्हणून काही शब्द ’पिठांत मीठ’ या न्यायाने स्वीकारायला हरकत नाही. तसेच बस, टेबल, डॉक्टर असे शब्द आपण स्वीकारले आहेत.

  आपण म्हणता ते खरेच आहे. शब्दांचा एक गुणधर्म मित्राप्रमाणे आहे. एखादा शब्द नवीन असताना विचित्र, परका वाटतही असेल. पण नित्यवापराने तो ओळखीचा, आपलासा, जवळचा वाटू लागतो. आपण इंग्रजी शब्दच ऐकत राहतो आणि मग मराठी शब्द कधीतरी ऐकला की तो परका, बोजड, विचित्र वाटतो. उदा० आम्हा इंग्रजीप्रचूर भाषा ऐकण्याची सवय असणार्‍या शहरी मंडळींना ’डिस्ट्रिब्यूशन’ हा शब्द ’वितरण’, वाटप’ ह्या शब्दांपेक्षा हलकाफुलका, सोपा, जवळचा (?) वाटतो. त्याचप्रमाणे ट्रकिया, ईसोफेगस, एक्झिक्यूशन, गायनॅकॉलॉजिस्ट, पॉस्च्यूमस, डायाबीटिस, असे शब्द श्वासनलिका, अन्ननलिका, कार्यवाही, स्त्रीरोगतज्ज्ञ, मरणोत्तर, मधुमेह ह्यांच्यापेक्षा अधिक चांगले वाटतात, नाही का? ते खरोखरच अर्थवाही आहेत का? हलकेफुलके आहेत का? (स्पेलिंगचा चक्रव्यूह तर बाजूलाच ठेवू.) शेवटी ऐकून ऐकूनच ते जिवलग होतात व अंगवळणी (कानवळणी) पडतात व त्यामुळेच ही सर्व मानसिकता बनते.

  मध्यंतरी राईलकर सरांच्या एका लेखात वाचल्याप्रमाणे जपानी भाषेतही इंग्रजी शब्दांना धडाधड प्रतिशब्द निर्माण करतात व वापरू लागतात. प्लॅटफॉर्मला ते म्हणतात – चढ-उतार-स्थान. त्यांनी शब्द असे सोपे केले आहेत की सामान्य माणसांना सहज कळावेत.

  पूर्वी अनेक वर्षे रेल्वे’ला आगगाडी हा शब्द आम्ही सर्रास वापरत होतो. तेव्हा तो कधीच खुळचट वाटला नाही. बालपणापासून अग्निरथ हा शब्द ऐकला तर तोही योग्य वाटला असता. एक उदाहरण सांगतो. लहानपणी आम्ही omelette ला ’अंड्याचा पोळा’ किंवा ’आमलेट’ असे म्हणत असू. जरा मोठे झाल्यावर मूळ इंग्रजी शब्द ऑमलेट असा आहे हे समजले तेव्हा तो शब्द कसातरीच वाटला. ऑमलेट’पेक्षा आमलेट हाच शब्द बरा आहे असेही वाटले. नेहमी नळाला णळ म्हणणार्‍याला तोच शब्द योग्य वाटतो. नळ हा शब्द जेवढा शुद्ध मराठी आहे असे आपल्याला वाटते तेवढाच णळ हा शब्द शुद्ध आहे असे त्याला वाटते. त्याला अयोग्य असेही म्हणावेसे वाटत नाही. कारण त्यात वैश्विक सत्य वगैरे काहीच नाही, साधा सवयीचा, सरावाचा प्रश्न आहे. भारतातील माणसाला डाव्या बाजूने गाडी चालवण्याची सवय असते. तो अमेरिकेत गेल्यावर त्याला काही दिवस विचित्र वाटणारच. अशा अनेक गोष्टी प्रथम त्याला खटकतात. नंतर काही वर्षे (किंवा जेमतेम काही महिनेदेखील) अमेरिकेत वास्तव्य झाल्यावर तोच भारतीय माणूस “आमच्या अमेरिकेत यू नो, वुई ड्राईव्ह ऑन दी राईट साईड ऍण्ड हेन्स मी इंडियात आल्यावर आय गेट ऍब्सोल्यूटली कनफाऊंडेड बिकॉज ऑफ दी फनी सिस्टिम हियर इन दिस कण्ट्री” असे म्हणायला कमी करत नाही.
  म्हणूनच स्वभाषेतील शब्द जुनाट व विचित्र वाटण्यामागे ’सवय नसणे’ हेच एकमेव कारण आहे असे आम्हाला वाटते. अर्थात हे मत भारतातील बर्‍याच मंडळींना पटणार नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे.
   
  क०लो०अ०

  – अमृतयात्री गट

 11. अमृतमंथन डॉट कॉम या अनुदिनीचे श्री.सलील कुळकर्णी यांच्या’अंतर्नाद’ मासिकाच्या फेब्रुवारी २०११ च्या अंकातील “हिंदी वाक्यं प्रमाणं” या लेखावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इंग्रजी व हिंदी भाषांमधील शब्दांचे मराठी भाषेत कसे प्रतिशब्द लिहावे याच्या मार्गदर्शनासाठी एक उत्तम अनुदिनी आहे. श्री. नरेंद्र गोळे यांची ती अनुदिनी आहे, http://shabdaparyay.blogspot.com/
  तरी मला conformity या शब्दाचा योग्य मराठी प्रतिशब्द हवा आहे. तो त्यात मिळाला नाही. आपण सुचवाल का ?
  मंगेश नाबर.

  • प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   एका चांगल्या उपक्रमाबद्दल माहिती दिल्याबद्दल आभार. परिश्रमपूर्वक ही शब्दार्थसूची बनवल्याबद्दल श्री० नरेंद्र गोळे यांचे अभिनंदन करायला पाहिजे.

   शब्दकोश निर्मिती हे एक अत्यंत महत्त्वाचे काम असून ते फार विचारपूर्वक करायला पाहिजे. कारण त्यामधील योग्यायोग्य गोष्टींवरून लोक शब्दांचे अर्थ ठरवतात, आणि नवनवीन शब्द प्रस्थापित होतात. त्याचा दीर्घकालीन परिणाम आपल्या भाषेवर होतो. म्हणून त्यात चुका असताच कामा नयेत. सरकारी नोकरशाहीतील बाबूंच्या द्वारे ज्याप्रकारे हिंदीची वाट लावणे चालू आहे; त्यावरून आपण धडा घ्यायला हवा.

   प्रस्तुत संकेतस्थळाबद्दल काही निरीक्षणे अशी:

   १. बहुतेक शब्द हे तांत्रिक, पारिभाषेतील संज्ञा आहेत. त्यापेक्षा सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात वारंवार लागणारे शब्द प्रथम घ्यायला हवे होते. यातील अनेक शब्द आम्ही दैनंदिन आयुष्यात कधीच ऐकत, वापरत नाही. उदा० edammame (सोयाबीनसारख्या शेंगा), mutual induction (सहप्रेरणा); nobel elements (राजस मूलद्रव्य); इत्यादी शब्द आपणापैकी कितीजणांनी दैनंदिन आयुष्यात एकदा तरी वापरले असतील का अशी शंका वाटते.
   २. काही शुद्धलेखनाच्या/spellingsच्या चुका राहून गेल्या आहेत. त्या काळजीपूर्वक दूर करायला पाहिजेत. अन्यथा लोकांचे गैरसमज होतात. उदा० दिप्ती (दीप्ती); स्थितीस्थापक (स्थितिस्थापक); phenomenona (phenomenon/phenomena); phosporescence (phosphorescence); Branchitis (Bronchitis ).
   ३. काही शब्दांचे अर्थ अगदीच ढोबळ मानाने दिले आहेत. पण त्यांचे अचूक अर्थ थोडे वेगळे आहेत. उदा० theory (सिद्धांत); conjectural (सहमतीचा); postulates (गृहितके); Astute (तुटकपणे धूर्त, कावेबाज); Blanket (पांघरूण).
   ४. काही शब्दांचे विज्ञान/शास्त्रातील अर्थ दिले आहेत व सामान्य जीवनातील अर्थांकडे दुर्लक्ष केले आहे. उदा० interference (व्यतिकरण, उच्छेद); series (क्रमवारी); आंदोलक (oscillator).

   एकंदरीत पाहता, गोळे साहेबांचे उद्दिष्ट उत्तम आहे, त्यांनी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. पण अधिकाधिक लोकांच्या उपयोगास येण्याच्या दृष्टीने व लोकांना अचूक तीच माहिती पुरवण्याच्या दृष्टीने त्यांनी थोड्या सुधारणा कराव्यात अशी एक छोटीशी विनंतीवजा नम्र सूचना करावीशी वाटते.

   आपले आभार व गोळे साहेबांचे कौतुक व अभिनंदन. त्यांनी इच्छा व्यक्त केल्यास अमृतमंथन परिवारातील भाषाप्रेमी मंडळींनाही सहयोगासाठी आवाहन करता येईल.

   ता०क० आपल्या विनंतीप्रमाणे conformity या शब्दाला मराठी प्रतिशब्द सुचवण्यासाठी वाचकांना विचारमंथन व्यासपीठावर स्वतंत्रपणे आवाहन केलेले आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 12. Dear sir,

  Its great to read ur articles. I wasnt aware that so many words are loaned from Hindi. It were words like rangarang etc which i used to quickly notice.

  I have another pt to add. The dot which u give for abbreviations, is actually used in Hindi. i have seen this practice in many other Marathi book publishers and it may not sound very significant, but i think we dont need to get influenced by unnecessary big dots. A example is shown below-

  हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)

  Why cant we write it as हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले. सलील कुळकर्णी)

  • प्रिय श्री० ’जय महाराष्ट्र’ यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल आभार. आपण विचारलेली शंकाही जरी कुणाच्या पटकन्‌ लक्षात येण्यासारखी नसली तरीही महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता ती विचारमंथनाच्या चर्चापीठावर (पूर्णविराम व लघुरूपचिन्ह एकसारखेच असावे की भिन्न? (प्रश्नकर्ता: ’जय महाराष्ट्र’) या शीर्षकाखाली मांडली आहे. पाहूया कोण काय प्रतिसाद देतो ते.

   विचारमंथनाच्या संबंधित लेखाखालील चर्चेकडे लक्ष ठेवा. RSS Feed वापरून आपण अमृतमंथनावरील नवीन प्रतिसाद व नवीन लेख ईमेलद्वारे थेट मागवून घेऊ शकता. याबद्दल मदत पाहिजे असल्यास कळवावे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 13. “’चावी’सारखे शब्द हे आपण मूळ ’किल्ली’सारख्या शब्दांच्या जागी विनाकारण जबरदस्तीने प्रस्थापित करतो आहोत याची ९९% मराठीजनांना पुसटशीही जाणीव नसेल. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरात(हा शब्द कोल्हापुरात असा हवा!) जेव्हा लोकांच्या तोंडी किल्ली हा शब्द सर्वत्र ऐकला तेव्हाच आम्हाला ही जाणीव झाली, त्या आधी ह्याची कल्पनाच नव्हती.”
  चावी हा शब्द हिंदीतून अलीकडेअलीकडे मराठीत आला आहे असे मला मुळीच वाटत नही. १८३१ साली प्रसिद्ध झालेल्या मोल्सवर्थच्या कोशात किल्ली, चावी. कुंजी, चोरकिल्ली, चोरचावी, चोरकुंजी,गुरुकिल्ली(गुरुचावी नाही!) हे सर्व शब्द दिलेले आहेत. ठकारांच्या कोशात(इ.स. २०००) कळसाठी पर्यायी शब्द म्हणून चावी, चाप, घोडा, साधन, युक्ती, शक्कल, हातोटी, खुबी, मर्म, टूक, मेख, मख्खी, गुरुकिल्ली, रहस्य, मर्मस्थान, खोडी, चहाडी, चुगली इत्यादी शब्द दिले आहेत. या यादीत चावी आहेच. भाटवडेकरांचा कोश किल्लीसाठी खुबी,चावी, परवलीचा शब्द, इंगित आणि कळ हे शब्द देतो. एकूण काय, तर चावी(चा चमच्यातला!) हा मराठी शब्द आहे. हिंदीत चाबी/चाभी(च चमेलीतला)आहेत, चावी नाही. मराठी अनेकवचन चाव्या, हिंदी चाबियॉ. माझ्या मते, जी अनेकदा फिरवावी लागते किंवा फिरवता येते ती चावी, आणि जी एकदाच फिरवली की काम होते ती किल्ली. त्यामुळे, नळाच्या तोटीची, घड्याळाची, फोनोची, खेळण्याची ती चावी आणि वाहनाची आणि कुलपाची ती किल्ली.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या विवेचनावरून असे लक्षात येते की किल्ली व चावी हे कळ या ढोबळ वस्तूचेच दोन विशिष्ट प्रकार. कुलुप उघद-बंद करण्यासाठी वापरतात तो कळीचा प्रकार म्हणजे किल्ली व घड्याळ, तंबोरा, नळाची तोटी, खेळणे इत्यादी यंत्र चालवण्यासाठी/निटावण्यासाठी (set, adjust करण्यासाठी) वापरतात तो प्रकार म्हणजे चावी असे सर्वसाधारणपणे मानले जाते. अर्थात हा अगदीच कडक नियम नसून थोडाफार लवचिक आहे.

   आपण पुरवलेली ही संशोधनात्मक माहिती इतर वाचकांच्या समोर ठेवूया. आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 14. पुस्त, पुस्तक, ग्रंथ इत्यादी : संस्कृतमध्ये पुस्त्‌(पुस्तयति) हा धातू आहे; अर्थ, आदर करणे(तुला:वास्तपुस्त), बांधणे. ज्याप्रमाणे ग्रंथ्‌(ग्रंथयति-बांधणे) या धातूपासून ग्रंथ हा शब्द तयार झाला त्याचप्रमाणे तशाच अर्थाच्या पुस्त्‌ धातूपासून पुस्त, पुस्तक, आणि पुस्तिका हे संस्कृत शब्द व्युत्पन्‍न झाले असले पाहिजेत. थोडक्यात काय तर,
  पुस्त(क) म्हणजे बांधणी केलेले (कागद वगैरे).

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   संस्कृतमध्ये पुस्त्‌ (१० उ०प) पुस्तयति-ते असा धातू आहे खरा पण तो अर्वाचीन संस्कृतमधील असावा असे दिसते. हा धातू आपटेंनी (१० उ०प०) सांगितला आहे तर कलोनच्या शब्दकोशात (१० प०प०) असा दाखवला आहे. जुन्या संस्कृत ग्रंथातील काहीही उदाहरणे सापडली नाहीत. कृ० पां० कुलकर्णींच्या मराठी व्युत्पत्तीकोशात तर स्पष्टच लिहिले आहे की “पुस्तक हे संस्कृतीकरण नंतरचे”.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 15. हिंदी वाक्यम प्रमाणम हा लेख वाचला. अनेक मराठीप्रेमिंच्या मनातील साल तुम्ही खुलासेवार मांडला आहे. मराठी सेरीअल्स्मधून तर फार हिंदी मराठी बोलले जाते. हल्ली तुझ्याशी हा शब्द वापरलाच जात नाही. त्याऐवजी तुझ्याबरोबर असे म्हटले जाते. तेरे साथचे भाषांतर.
  हा लेख वृत्तपत्रातून यायला हवा. सर्वसामान्य लोकांपर्यंत मातृभाषएविशायीची तळमळ पोचायला हवी. या गोष्टीकडे गांभीर्याने पहिले जात नाही. … माधुरी तळवलकर

  • प्रिय श्रीमती माधुरी तळवलकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार. आपण सुचवलेले उदाहरण अत्यंत योग्य आहे. अशी आणखी काही उदाहरणे लक्षात असल्यास अवश्य कळवावीत. आपण दक्ष राहण्यासाठी अशा उदाहरणांची यादीच करायला पाहिजे.

   हल्ली वर्तमानपत्रात लेख प्रकाशित होणे फार कठीण झालेले आहे. आपण उत्सवमूर्ती (सेलिब्रिटी) असाल तर आपले काहीही लेखन प्रसिद्ध होते. अन्यथा तसे दुरापास्तच.

   अर्थात अंतर्नादचा वाचकवर्ग संख्येने कमी असला तरी तो मराठीची प्रगल्भ जाण असणारा, विचार करणारा आहे, हे महत्त्वाचे.

   आपण श्री० सलील कुळकर्णींचे या आधीचे खालील लेख वाचले आहेत काय?

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • भानु काळे यांचे निवडक लेख असलेले एक पुस्तक नुकतेच विकत घेतले. त्यात एक लेख आहे त्यांनी अंतर्नाद कसे सुरु ठेवले या बद्दल.

    बरेच दिवसांपासून मनात आहे की अंतर्नाद ब्लॉग वर एक लेख लिहून लोकांना हे मासिक घेण्यासाठी आवाहन करावे. अतीशय सुंदर असलेले मासीक , पण फक्त १५०० च्या आसपास प्रती असतात असे वाचनात आले होते, आणि तेंव्हा पासुनच त्यांच्यावर लिहीण्याचा विचार करतोय, पण राहुन जातं! नक्की लिहीतो पुढचे पोस्ट ’अंतर्नाद’ वर.

    • प्रिय श्री० महेंद्र यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपल्या भावनांबद्दल कौतुक वाटते. मराठीतील वाचक चळवळीस ज्या-ज्या प्रकारे हातभार लावणे शक्य आहे त्या सर्व प्रकारे आपण यथाशक्ती प्रयत्न करीत राहायला पाहिजेत.

     आजच्या मितीस ’अंतर्नाद’ हे निर्विवादपणे मराठीतील अतिशय सुंदर मासिकांपैकी एक आहे. मात्र त्याचे वर्गणीदार १५०० पेक्षा नक्कीच कितीतरी अधिक आहेत. अर्थात कुठल्याही मराठी मासिकाचा जीव तो केवढा! १०-११ कोटीच्या महाराष्ट्रात ’अंतर्ननाद’सारख्या उत्तम मासिकाचा चार-पाच हजारांचा खप असला तरी आपणा मराठीप्रेमींना ही शरमेचीच बाब वाटायला पाहिजे हे खरेच. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच यथाशक्ती प्रयत्न करावेत.

     क०लो०अ०

 16. प्रिय श्री सलील कुळकर्णी यांस,
  सप्रेम नमस्कार.
  आपल्या ‘अंतर्नाद'(फेब्रुवारी २०११)मधील लेखावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मला त्याबद्दल आनंद वाटतो.तथापि एका प्रतिक्रियेवर मला माझे मत मांडावेसे वाटते.श्रीमती माधुरी तळवलकर यांनी प्रतिक्रिया देताना,हा लेख वृत्तपत्रातून यायला हवा,असे मत व्यक्त केले आहे. मलाही ‘साधना’ साप्ताहिकामधील माझ्या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या एखाद्या लेखावर तसे सुचवले जात असे. सध्या माझे लेखन गोव्याच्या ‘नवप्रभा’ या दैनिकात प्रसिद्ध होत असते. तेव्हा आता एक दोन लेख ‘लोकसत्ता’कडे पाठवा असे काही मित्र सुचवतात.हा सरळ सरळ ‘अंतर्नाद’,’साधना’,’नवप्रभा’ यांसारख्या तुलेनेने छोट्या नियतकालिकांचा अपमान आहे, असे नाही वाटत ? मोठी वर्तमानपत्रेच, ती काय वाचली जातात आणि अन्यत्र प्रसिद्ध झालेले कुठे जाते, असे मला विचारावे वाटते.निदान ‘अंतर्नाद’मध्ये लिहिणा-या श्रीमती माधुरीताईन्नी तरी असे लिहायला नको होते. या संदर्भात मला ग्रंथालीने काही वर्षांपूर्वी एक अभिनव उपक्रम केला होता,त्याची आठवण येते. त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र कानाकोप-यात प्रसिद्ध झालेले निवडक लेख, कथा, इत्यादी साहित्य संपादित/ संकलित करून त्याचे ८ खंड प्रकाशित केले होते. त्यातील एक लेख आमच्या कै. वा.वि. भट यांच्या ‘संग्रहालय’ या चक्क १६ पानी मासिकातील कै.वसंत शिरवाडकर यांचा एक उत्तम लेख पुनः प्रसिद्ध केला होता. या मासिकात कै. शरच्चंद्र गोखले यांसारखे विद्वान सातत्याने लिहित असत. माधुरीताईन्च्या प्रतिक्रियेवर आपण दिलेल्या उत्तराशी मी सहमत आहे, हे वेगळे सांगायला नकोच.
  मंगेश नाबर

  • प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपली प्रतिक्रिया श्री० सलील कुळकर्णींच्या पर्यंत पोचवली आहे व आपण पुरवलेली माहिती अमृतमंथन परिवारातील सर्वच कुटुंबीयांच्या वाचनासाठी इथे सादर करीत आहोत. आभार.

   श्रीमती माधुरी तळवलकरांची भूमिका व भावनाही योग्यच आहेत. खरं म्हणजे आपणा सर्वांच्याच आपल्या मातृभाषेविषयीच्या भावना, तळमळ सारखीच आहे. तिची अवहेलना पाहून अनेकदा आपणा सर्वांचेच हृदय तीळतीळ, कधीकधी तर शेरशेर तुटते. काय करावे ते समजत नाही. मग आपण वेगवेगळे उपाय एकमेकांना सुचवतो. कुठलाही एक उपाय रामबाण नाही हे आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या मनातील जळजळ, तळमळ, खळबळ इतर बहुसंख्य मराठी मंडळींपर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रत्येकाने शक्य त्या सर्व, लहानमोठ्या मार्गांचा यथाशक्ती अवलंब करावा. कुठल्या उपायाचा किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही. पण निदान आपल्याला स्वतःला कर्तव्यपूर्तीचे समाधान तरी नक्की मिळेल. ह्या रोगाची लागण पसरली तर या व्यक्तिगत जळजळीतूनच एक अधिक व्यापक चळवळ जन्म घेऊ शकते.

   ज्या वाचकांनी खालील लेख वाचले नसतील त्यांनी ते अवश्य वाचावेत. आपल्या वैफल्यग्रस्त मनाला पुन्हा उभारी मिळू शकेल.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

   आपले व माधुरीताईंचे मनःपूर्वक आभार. आपणासारख्या मंडळींमुळेच आपल्या आई-मायबोलीला अजूनही थोडीफार आशा आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय सलील कुळकर्णी
   मी नुकतेच एक पुस्तक घेतले विकत भानू काळे यांचे अंतर्नाद मधे प्रसिद्ध झालेले निवडक लेख असलेले, त्यामधल्या एका लेखामधे वाचक संख्या १५०० च्या आसपास आहे असा उल्लेख आलेला आहे .
   मी सध्या लिहायला घेतलेला लेख पुर्ण केला, की पुढचा लेख नक्कीच भानू काळेंच्यावर असेल.
   मला स्वतःला चांगले लिहिता येत नाही, पण चांगले वाचायला नक्की आवडते. 🙂 धन्यवाद..

   • प्रिय श्री० महेंद्र कुलकर्णी यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

    १५०० वाचकसंख्येचा उल्लेख केला ते पुस्तक लिहिल्याला काही वर्षे झाली असावीत. तेव्हा अंतर्नाद कदाचित आजच्या मानाने नवीन असेल. असो.

    अंतर्नादवर अवश्य लेख लिहावा. अंतर्नादसारखे मराठी मासिक हे इतर उथळ, फिल्मी किंवा टॅब्लॉईडस्‌ प्रमाणे भरपूर पैसे कमावण्यासाठी चालवलेले नसते. काही तत्त्वांसाठी केलेले ते एक निष्ठापूर्ण कार्य असते. अशा बाबतीत चोख, प्रामाणिक काम करणार्‍याला आपण यथाशक्य पाठिंबा, प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. अंतर्नादबद्दल अवश्य लिहा. अशा उपक्रमांच्या बाबतीत मैखिक विज्ञापना फार महत्त्वाची ठरते.

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

  • प्रिय श्रीमती माधुरी तळवलकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपला निरोप श्री० सलील कुळकर्णींपर्यंत पोचवीत आहोत. त्यांचा विपत्ता (ई-मेल पत्ता) saleelk@gmail.com असाच आहे. इतर mail to: इत्यादी भाग वगळून नुसत्या नेमक्या विपत्त्यावर पत्र पाठवून पाहावे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 17. वृत्तपत्रात लेख येण्याबाद्दल्चे तुमचे मत अगदी खरे आहे.
  वेगळा विचार मांडणार्याचे लेखन प्रकाशित करण्यापेक्षा अभिनय इत्यादीमध्ये गती असणाऱ्यांचे लेख छापण्यात त्यांना जास्त रस असतो. किती विसंगत न!

  … माधुरी त.

  • प्रिय श्रीमती माधुरी तळवलकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आजच्या मराठी वर्तमानपत्रांचा दर्जा, त्यांची भाषा, विशेषतः त्यांच्या चटकदार पुरवण्या पाहिल्या की ती सर्व टॅब्लॉईड प्रकाराकडे अधिकाधिक झुकू लागली आहेत असे वाटते.

   अभिनयाची गती कोणाला किती आहे हे कोणी व कसे ठरवायचे? महाराष्ट्र शासनाद्वारे सईफ अलि खान या प्राण्याच्या (ज्याच्यावर प्राण्यांची बेकायदेशीर शिकार केल्याचे आरोप आहेत त्याच्या) नावाची पद्मश्री’साठी शिफारस होते आणि त्याच्याहून कितीतरी अधिक चांगला अभिनय करणार्‍या उत्तमोत्तम मराठी नाटक-चित्रपटांतील कलाकारांनी संपूर्ण आयुष्य वेचले असले तरी त्यांना तसा किताब मिळण्याची सूतराम शक्यता नाही. आज हयात असलेल्यांच्या पैकीदेखील डझन दोन डझन कलाकारांची नावे तर नक्कीच सांगता येतील. शिवाय साहित्य, कला, आणि इतर अनेक क्षेत्रात असे श्रेष्ठ लोक आहेत की ज्यांचा पद्मश्री’साठी नक्कीच विचार व्ह्यायला हवा. पण आपल्याला परक्याचा उदो-उदो करून व स्वकीयांची हेटाळणी करून आपण संकुचित नाही तर अत्यंत विशालहृदयी आहोत असे सिद्ध करायचे असते. अशा करंटेपणाला काय म्हणावे?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्रीमती वैशाली चिटणीस यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   अमृतमंथन परिवारात आपले स्वागत असो. अमृतमंथनाला आपल्यासारख्यांच्या आधाराची, आश्रयाची नक्कीच आवश्यकता आहे.

   या चर्चाचौकटीच्या खालील “Notify me of new posts via email.” हा पर्याय स्वीकारल्यामुळे आपल्याला यापुढे अमृतमंथनावरील प्रत्येक नवीन लेखाबद्दल ताबडतोब सूचना मिळत जाईल. तो वाचून आपण आपले प्रतिमत (feedback) किंवा आनुषंगिक माहिती लेखाच्या खालील चर्चाचौकटीमध्ये नोंदवू शकता.

   मराठी भाषा व संस्कृतीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करीत असताना कविश्रेष्ठ माधव जुलियनांच्या खालील ओळी ध्यानात ठेवू.

   हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
   जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी ॥
   मराठी असे आमुची मायबोली……      (कवी माधव जुलियन)

   भेटूच पुन्हा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 18. मान देण्यासाटी राव हा शब्द जसा आपल्याला पुरेसा वाटत नाही, तसेच ताई, दादा या शब्दाविशायीही होते. हल्ली तिची दीदी आणि दादाचा भैया झाले आहे. माझा मुलगा मात्र ताई म्हणतो.

  माधुरी त.

  • प्रिय श्रीमती माधुरी तळवलकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण अगदी चपखल उदाहरणे दिलीत. या सर्वाला आपला न्यूनगंडच मूळतः कारणीभूत आहे. त्यामुळेच बायकोची ओळख करून देताना तिला ’मिसेस’ असे न म्हणता ’पत्नी’ किंवा ’बायको, सौभाग्यवती, गृहिणी, गृहस्वामिनी, मालकीणबाई’ इत्यादी कुठल्याही नावाने संबोधल्यास ती जागच्या जागेवर घटस्फोटच देईल अशी भीती (एरवी मनात तशी स्वप्ने अनेकदा पाहिलेली असली तरीही) वाटते. तशीच परिस्थिती मिस्टर (पती, नवरा, घो, दादला इ०), टॉयलेट (संडास, परसाकडे) अशा अनेक शब्दांची. स्वतःला पप्पा-मम्मी असे मुलांकडून म्हणवून न घेतल्यास समाजात आपल्याला अडाणी समजले जाईल असा केवळ कमी शिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षितांचाही ठाम समज असतो. गुलामगिरीच्या भावनेतून ’साहेबांची’ भाषा ही उच्च, कुलीन, अभिजनांत बोलायची भाषा, असे समीकरण आपल्या मनात ठसल्यामुळे जुन्या साहेबांचे इंग्रजी शब्द व नवीन साहेबांचे हिंदी शब्द आपण त्यांच्याबद्दलच्या वचकाखाली वापरतो. पुढे ते कानवळणी पडल्यावर तेच शब्द योग्य, चपखल, जोरदार, अन्वर्थक, सर्वमान्य असे वाटू लागते. हा सर्व सवयीचा परिणाम. धोतर नेसलेला माणूस विद्वान असला तरी त्याचा आपण मान राखत नाही आणि सुटाबुटातील गोरा मूळचा अतिसामान्य असला तरी त्याच्याकडे आदरसंकोचाने पाहतो तसलाच हा प्रकार.

   ———–
   प्रस्तुत लेखातील खालील परिच्छेद या विषयाच्या अनुषंगाने आहेत.

   हिंदी चित्रपट संपूर्ण भारतात….. (विहिरीचे पाणी मचूळ असले तरीही)
   शिवाजी महाराजांनी भाषाशुद्धीसाठी….. (शिवाजी महाराजांची प्रगल्भता व दूरदृष्टीबद्दलचा परिच्छेद)
   स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात तसेच स्वातंत्र्यानंतरच्या…..
   ———-
   आपल्याला काय वाटते?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 19. नमस्कार,
  आपल्या भाषेबद्दल असलेल्या स्वाभिमानाने काही वेळेस आपण कूपमन्डूक सारखे वागण्याची शक्यता असल्यामुळे जपून राहणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ भाषेबद्दल अतिशय संवेदनशील असे बांगाली (शिकलेले सुद्धा) कोलकता मधील ‘गोखले रोड’ ला ‘गोखेल रोड’ असेच म्हणतांत. आम्ही मात्र नागपूर मधील ‘टागोर रोड’ ला ‘टगोरे रोड’ असे कधीच म्हणत नाही. आम्ही पण त्यांच्यासारखेच केले नाही म्हणून आमच्यांत काही न्यूनगंड आहे असे नाही, हेच मी सांगू इच्छितो.
  आम्ही कधीही विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर दुप्पट अशी मोठी आपल्या राज्यांतल्या थोरांची प्रतिमा उभारून स्वाभिमान व्यक्त करीत नाही. स्वाभिमानाच्या नादात मराठी माणूस मूर्खपणा करीत नाही, तर त्याला न्यूनगंडही समज़त नाही.
  वारंवार आपण न्यूनगंडग्रस्त आहोत असे म्हटल्याने ‘मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…’ यांचा कदाचित अपमान होईल असे वाटते.

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   इंग्रजीसारखी परदेशी आणि त्यात पुन्हा थोटी भाषा. अशा थोटीच्या ओंजळीने पाणी प्यायचे म्हटल्यावर असे घोटाळे होणारच.

   बंगाली लोक Gokhaleचा उच्चार pale, sale प्रमाणे गोखेल असा करतात. आपण Tagoreचा उच्चार more, pore प्रमाणे टागोर असा करतो.

   एरवी बांद्रा (वांद्रे), गोवा (गोवे किंवा गोयें), सायन (शीव), नासिक (नाशिक) असे अनेक इंग्रजाळलेले उच्चार प्रचलित आहेतच.

   आम्ही कधीही विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर दुप्पट अशी मोठी आपल्या राज्यांतल्या थोरांची प्रतिमा उभारून स्वाभिमान व्यक्त करीत नाही. हे खरे. पण मणिशंकर अय्यर सारख्या अतिसामान्य राजकारण्याने अंदमानातील स्वा० सावरकरांबद्दल अनुदार उद्गार काढून सावरकरांबद्दलचा शिलालेख काढून फेकून दिल्यावरही आपण शेपूट घालून बसतो. आमचे नेते, राज्यातील विविध राजकारणी, राज्यातील व केंद्रातील मराठी मंत्री आणि आम्ही दहा कोटींची जनता तोंडातून ब्रही न काढता गप्प बसलो. म्हणूनच आम्हाला नेहमी गृहित धरले जाते. हे इतर कुठल्याही राज्याच्या बाबतीत घडू शकणार नाही. महाराष्ट्रात मराठीला अनावश्यक (redundant) केली आहे तसे इतर कुठल्याही स्वाभिमानी राज्यात व देशात चालवून घेतले जाणार नाही.

   आपल्या चुका, आपले होत असलेले भावनिक अधःपतन आपण मान्य केलेच पाहिजे. अन्यथा त्यावर तोडगा तरी कसा शोधणार?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 20. तुमचा ” हिंदी वाक्यं प्रमाणं ” हा लेख आवडला .

  इथे नागपूरला तर हिंदीच जास्त प्रचलित आहे .
  शाळेत मराठी भाषा शिकविणार्या शिक्षकालाच जर
  भाषेच योग्य ज्ञान नसेल तर भाषेची नावड आणि
  अधःपतन आणखी वेगाने होत रहाते .

  माझ्या कॉन्व्हेंट मध्ये शिकणार्या मुलाला ” डोळ्यात
  अंजन घालणे ” चा वाक्यात उपयोग त्याच्या शिक्षिकेने
  ” बहिणीने भावाला धडा शिकविले तर भावाच्या डोळ्यात
  अंजन आले ” ( कुठून आले बुवा ? ) असा लिहून दिला होता .

  या शिक्षिकेने माझ्या डोळ्यात अंजन घातल्याने मी
  मुलाचा भाषांचा अभ्यास घेऊ लागले हे मात्र खरे .
  त्यामुळे तो आज उत्तम मराठी लिहू शकतो .

  चलभाष हा भ्रमणध्वनी पेक्षा जास्त सोपा पर्याय आहे .
  सोपी आणि शुद्ध मराठी ” स्वर्गीय ” झाली आहे .

  अभ्यासपूर्ण आणि उत्तम लेखाबद्दल हार्दिक आभार .

  कल्पना जोशी

  • प्रिय श्रीमती कल्पना जोशी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   आपल्या आपुलकीच्या कौतुकाबद्दल आभार. या प्रश्नावर आपण सर्वजण मिळूनच उपाय काढूया.

   आपल्या डोळ्यात अंजन (याचा संस्कृतमध्ये काजळ असाही अर्थ आहे) घालणार्‍या अंजनाबाईंना आमचाही (कोपरापासून) नमस्कार सांगा.

   दुर्दैवाने गेल्या ३०-४० वर्षांत विदर्भातील हिंदीकरण फारच वाढले. शहराबाहेरील गावाखेड्यांतील बोलीभाषा या मुख्यतः मराठीच्याच बोली आहेत. पण शहरांत मात्र हिंदीचेच फार स्तोम माजले आहे. राज्यभाषा अनावश्यक (redundant) झाली आहे. अर्थात या सर्वाचा दोष आपण आपल्याच माथी स्वीकारायला पाहिजे आणि मग त्याबद्दल सतत यथाशक्ति प्रयत्न करीत राहिले पाहिजे.

   ’मोबाईलफोन’साठी ’चलभाष’ या प्रतिशब्दाचा आणखी एक फायदा असा की मग ’लॅण्डलाईन’साठी ’स्थलभाष’ असा आनुप्रासिक शब्दही वापरायला मौज वाटते.

   खास नागपूरकरांसाठी खालील लेख साक्षात्कारी ठरावेत.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

   वाचून आपले प्रतिमत (feedback) अवश्य कळवा.

   अमृतमंथनावरील इतर लेखही अवश्य वाचा. आपले विचार, मते, सूचना कळवीत जा. अमृतमंथनावरील प्रत्येक नवीन लेख मिळण्यासाठीचा पर्याय निवडू शकता.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 21. इंग्रजी उच्चारांबद्दल गैरसमज : भारतीय शब्दांच्या इंग्रजी उच्चारांबद्दल गैरसमज फार आहेत. हे गैरसमज इंग्रजीत शब्दांची स्पेलिंगे कशी करावीत हे नीटसे माहीत नसल्यानेच, केवळ होतात.
  >>एरवी बांद्रा (वांद्रे), गोवा (गोवे किंवा गोयें), सायन (शीव), नासिक (नाशिक) असे अनेक इंग्रजाळलेले उच्चार प्रचलित आहेतच. <<

  इंग्रजीत आकारान्त शब्द नाहीत. India चा उच्चार इन्डिअ असा होतो. Chinaचा चायनं आणि Poona चा उच्चार पुनं असा होतो. इंग्रजीत ण नाही, त्यामुळे पुणं होणार नाही. शेवटी आ असा उच्चार हवा असेल तर h लावावा लागतो. उदा० Allah.
  इंग्रजीत एकारान्त उच्चार हवा असेल तर ay किंवा ey चा वापर करावाच लागतो. वांद्रे असा उच्चार हवा असेल तर स्पेलिंग Vandre करावे लागले असते. मग परत त्याचा उच्चार काही जणांनी व्हॅन्डर असा केला असता. त्यापेक्षा Bandra असे स्पेलिंग करून जवळजवळ योग्य मराठी उच्चाराचा मान राखला गेला आहे. वबयोरभेदः, यजयोरभेदः अशी संस्कृत सूत्रे आहेत. त्यामुळे व च्या जागी ब वापरणे ही फार मॊठी गलती नाही. संस्कृतमध्ये परवानगी नसली तरी स ऐवजी श वापरणे सर्व भारतीय भाषांना मान्य आहे. त्यामुळे शुभलक्ष्मीचे स्पेलिंग Subbalakshmi, नाशिकचे Nasik, आणि सोलापूरचे Sholapur करणे फारसे चुकीचे नाही. इंग्रजीत अर्धनासिक उच्चार नाहीत. फ़्रेन्चमध्ये आहेत. त्या धर्तीवर मराठीतील गांव, शींव, यांची स्पेलिंगे Ganv वा sheenv अशी करण्यापेक्षा ती Gaon व Sion अशी केली हे इंग्रजांचे आपल्यावर उपकार आहेत. Tagore, Cawnpore, Kirkee, Wanorie, Osmanabad ही स्पेलिंगे कशी योग्य आहेत हे आता ज्याचे त्याने शोधून काढावे. त्याचबरोबर Panjim, Margaon, Pernem, Mapusa, Dabolim ही पोर्तुगीजांनी केलेली स्पेलिंगे कशी योग्य होती तेही पटवून घ्यावे.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

   इंग्रजी व्याकरण, लिपी आणि स्पेलिंगे या बाबतीत खूपच लंगडी आहे. पण तरीही आपण इंग्रजीबद्दल संशोधन करून तिची भलामण करीत बसण्यापेक्षा आपल्या भाषांना आपल्या देशात योग्य स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करू या. निदान अमृतमंथनाचा तरी तोच उद्देश आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 22. नमस्कार सलिलराव,

  रावच म्हणेन, कारण हळूहळू हि पद्धतही नाहीशी होतेय आणि त्याची जागा हिंदी धाटणीचं “जी” हे प्रत्यय घेतंय.

  आपल्या लेखाबद्दल सांगायचं तर लेख उत्तमच आहे, माझ्या मनातही हे विचार वारंवार येत असतात, आणि आपला लेख प्रकशित झाल्यापासून आज मी प्रतिक्रिया देईपर्यंत ७ वर्षांत परिस्थिती अजूनही खालावत आहे. संख्यात्मकम, व्यहारात्मक ओहोटीबरोबरच मराठीची दर्जात्मक दृष्ट्याही सतत घसरण सुरुच आहे. आता लोकं मुंबईत, पुण्यात ऐवजी हिंदी पद्धतीचं मुंबई मध्ये, पुणे मध्ये असं लिहायला देखील लागले आहे. गुजरातेत, पंजाबात, बिहारात हे तर केव्हाच मागे पडलंय (किंवा तसं म्हणायला लोकांना कदाचित लाज वाटत असेल). लोकांच्या आडनावाला आधी व्यवस्थित म्हणायचे पाटलाला, सावताला आता पाटील ला, सावंत ला असं काहीतरी विचित्र बोलण्या- लिहिण्याची पद्धत रूढ झाली आहे ( नावांच्या बाबतीत रामाला, गणेशाला असं बोलणं तर केव्हाच लयाला गेलंय). शब्दाला प्रत्यय जोडून लिहिण्याची पद्धतही हळू हळू मागे पडतेय. सिंधुदुर्गसारख्या ठिकाणी सार्वजनिक गणपतीला “सिंधुदुर्गाचा राजा” ऐवजी “सिंधूदुर्ग चा राजा” असे म्हणायचा – लिहायचा प्रघात पडलाय.
  त्याचबरोबर, अजून एक बांडगुळ मराठीला चिकटून आहे ते म्हणजे, अतिशय चुकीच्या पद्धतीने मराठी स्थानांची नावं इंग्रजीत लिहणे. आता यात सर्वात मोठा दोष शासनाचा आहे कारण त्यांनीच स्वतःला हिंदिगुलाम मानून चुकीचं इंग्रजी पद्धतीचं लिखाण स्वीकारलं. त्यामुळे आज सिंधुदुर्गाचं इंग्रजीत Sindhudurga ( सिंधुदुर्ग ) असं न लिहिता Sindhudurg ( सिंधुदुर्ग् ) असं लिहिणं सुरु आहे. मुंबईतही मार्ग ह्या शब्दाला इंग्रजीत Marga ( मार्ग ) असं न लिहिता Marg ( मार्ग् ) असं लिहितात. मला हि गोष्ट तेव्हा लक्षात आली जेव्हा मी शेजारच्या कर्नाटक राज्यात गावांची नावं हि गाणगापूर ( Ganagapura ), विजयपूर ( Vijayapura ) अशी इंग्रजीत व्यवस्थित लिहितात. आणि मराठी हि भाषा कानडीपेक्षा लिपीने आणि भाषिक कुळाने जरी वेगळी असली तरी शब्दांच्या उच्चरवाने आणि वाक्यरचना करण्याच्या अनुषंगाने बरीच जवळची आहे. पण मराठी लोकांना मराठी हि हिंदीच्या जवळची भाषा आहे असं भासवून स्वतःला हिंदी म्हणवून घेण्यात जास्त रस आहे. त्यात ते आपला सुमारे २००० वर्षे जुना इतिहास आणि शतकानुशतके कर्नाटकाशी असलेला संबंध विसरून जात आहेत.

  • प्रिय श्री० मराठीप्रेमी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक लिहिलेल्या पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत. आपल्या पत्रात मराठीभाषेबद्दलची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. (आविष्कृत होते, असे म्हणणे अधिक योग्य. पण असे शब्द कधी कधी लोकांना किचकट आणि जड वाटतात. मग त्यांच्या सुयोग्य अर्थच्छटेचा विचार न करताही आपण त्यांना मोडीत काढू पाहतो. मराठी माणसाला डिस्ट्रिब्यूशन हा शब्द वितरण, वाटप ह्या शब्दांहून हलके आणि अधिक अर्थपूर्ण वाटतात !!) असो.

   इथे आम्हाला आपला जीस्मार्ट०७ (gsmart07) ईपत्ताच दिसत आहे. त्यावरून आपल्या नावाचा अंदाज येत नाही. म्हणून आपल्याला मराठीप्रेमी असे म्हटले.

   आपल्या पत्रातील सर्वच मते पटली. मराठी माणसाने अन्य मराठी माणसाला अमुकअमुकजी न म्हणता अमुकामुकराव किंवा अमुकअमुकभाऊ अशा मराठी पद्धतीनेच संबोधले पाहिजे. प्रसंगोपात्त अगदी दादा, अप्पा, अण्णा, नाना, तात्या, काका इत्यादी किंवा ताई, माई, मावशी, आक्का, काकी/काकू इत्यादी संबोधने वापरायलाही हरकत नाही. थोडक्यात काय, तर काहीही बोलताना, (अगदी शिवी द्यायची झाली तरीही) मराठीतून बोलावे. खरे तर मराठीत बाई असेही अत्यंत आदराने संबोधण्याची पद्धत होती. पण हल्ली नव्या पिढीला अमराठी लोकांमुळे बाई म्हणण्यास का कमीपणा वाटू लागला आहे, ते कळत नाही.

   आपल्या पत्रातील दुसरा मुद्दा म्हणजे सामान्य रूपाबद्दल. मराठीच्या रूढ नियमांप्रमाणे नामाचे सामान्यरूप करूनच मग त्याला विभक्तिप्रत्यय लागतो. उदा० लेल्यांकडे, कुळकर्ण्याने, अकोल्याला किंवा आपण उल्लेखलेले सावंताला, पाटलाला, सिंधुदुर्गाचा, गुजराथेत, पंजाबात, बिहारला असे शब्दप्रयोग मराठी भाषेच्या पद्धतीप्रमाणे योग्यच आहेत.

   यापुढे जाऊन मला असेही म्हणायचे आहे की परभाषेतून स्वीकारलेल्या शब्दांच्या बाबतीत साधारणपणे एक नियम मानला जातो, तो असा की एकदा आपण एखादा शब्द आपल्या भाषेत स्वीकारला की मग तो आपल्याच भाषेतला होतो आणि त्याला आपल्या भाषेचे व्याकरणाचे नियम लागू होतात. उदा० इंग्रजीत स्वीकारलेल्या chappati ह्या शब्दाचे अनेकवचन इंग्रजीत chappatis असे केले जाते, chappatya नाही. त्याचप्रमाणे म्हस-शब्दाप्रमाणे बस-शब्दाचे अनेकवचन बशी व्हायला हवे आणि सामान्यरूपही बशी होऊन त्याला पुढे विभक्तिप्रत्यय लागायला हवेत. (उदा० मुंबईहून पुण्याला जाण्याच्या वातानुकूलित बशी दादरहून सुटतात. काल इथे एका बशीला अपघात झाला.)

   मराठी भाषेचे अधःपतन होण्यात आजच्या दूरदर्शन वाहिन्यांचा आणि वर्तमानपत्रांचा मोठा वाटा आहे. ‘हवा येऊ द्या’ यासारखे कार्यक्रम नियमितपणे पाहणार्यायच्या मराठीची वाट न लागली तरच नवल.

   आपल्या पत्रातील तिसरा मुद्दा हिंदीप्रमाणे उच्चार करण्याविषयीचा. सिंधुदुर्ग हा उच्चार हिंदीच्यापद्धतीने सिंधुदुर्ग्‌ असा केला जातो, असे जे आपण लिहिले आहे, ते योग्यच आहे. राज्‌ (राज्य), सर्व्‌धर्म्संभाव् (सर्वधर्मसमभाव) इत्यादी भ्रष्ट उच्चार मराठी माणसांनी खास हिंदीमधून आयात केलेले आहेत. त्याचप्रमाणे द्रौपदी, शुभदा, विरुद्ध, दशभुजा, ममता हे शब्ददेखील हल्ली मराठीत हिंदीच्या पद्धतीने द्रौप्दी, शुभ्दा, विरुध्, दश्भुजा, मम्ता असे उच्चारले जातात. ते ऐकून कपाळावर हात मारून घेण्याव्यतिरिक्त आपण काय करू शकतो? दक्षिणी भाषांत मात्र ते योग्य प्रकारे मूळ संस्कृतप्रमाणेच (म्हणजे शुद्ध मराठीत जसे अपेक्षित आहेत तसे) केले जातात. बंगालीतही मॉमॉता म्हणतात मॉम्ता नाही.

   चौथा मुद्दा म्हणजे विशेषनामांचे इंग्रजीमधील स्पेलिंगसुद्धा आपण म्हणता याप्रमाणे ‘हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌’ ह्या तत्त्वाला शिरसावंद्य मानूनच केले जाते. Sindudurg, marg ही आपण दिलेली उदाहरणे आहेतच, शिवाय Bhartiy (Bharatiya) इत्यादी. त्याउलट मराठी (किंवा संस्कृत) शब्दांचे उच्चार इंग्रजीप्रमाणे केले तरच त्यांना महत्त्व प्राप्त होते असे आपल्याला वाटते. उदा० योगा, आयुर्वेदा, रामायणा, बॅन्ड्रा, पार्ला, थाना, इत्यादी. ही सर्व दास्यवृत्ती आहे.

   पाचवा मुद्दा म्हणजे मराठी-कानडी संबंध. आपण म्हणता त्याप्रमाणे मराठी भाषेला हिंदीपेक्षादेखील कानडी आणि तेलुगू भाषा आणि त्यांच्या संस्कृती(त्या)देखील अधिक जवळच्या आहेत. महाराष्ट्रीय हे प्राचीन काळापासून दाक्षिणात्यातच मोडतात.

   असो. आपल्या पत्राबद्दल आम्ही आपले पुन्हा एकदा आभार मानतो.

   प्रस्तुत लेखाचा पुढील भाग असणारा खालील लेख आपण वाचलात काय? अवश्य वाचून पाहा.

   मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्वेष नव्हे (ले० सलील कुळकर्णी) –} http://wp.me/pzBjo-Kp

   खालील लेखांवरूनही नजर फिरवावी.

   आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख, ले० सलील कुळकर्णी) — } http://wp.me/pzBjo-Iv

   हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९) –} http://wp.me/pzBjo-9W

   “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी) –}} http://wp.me/pzBjo-e8

   (भाषांतर) हिंदीमुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी भाषा, संस्कृती व स्वत्व नष्ट होण्याचा धोका (तमिळ ट्रिब्यून) –}} http://wp.me/pzBjo-pa

   हिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र (ले० वि० भि० कोलते) –}} https://wp.me/pzBjo-rt

   द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित –} http://wp.me/pzBjo-b8

   महेश एलकुंचवार यांचे विश्व-मराठी-साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषण –}} https://wp.me/pzBjo-Gs

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • नमस्कार सलिलराव,

    आपल्या उत्तराबद्दल आपला आभारी आहे. आपण खाली दिलेल्या लेखांपैकी बरेच लेख मी वाचलेले आहेत आपल्या या लिखाणानेच माझ्या भाषाप्रेमाची जडणघडण केली आहे. माझे नाव गणेश सावंत असून मी मराठी बोला चळवळीतील एक कार्यकर्ता आहे. जी समाजमाध्यमात सक्रिय आहे, समाजमाध्यमातील गोष्टी या जरी प्रभावी असल्या तरी त्या लवकर हवेत विरुन जातात त्यामुळे दीर्घकाळ विचार जागृत राहण्याच्या दृष्टीने चळवळीनेही संकेतस्थळ सुरु केले आहे http://marhathi.com. जमल्यास नक्की भेट द्या.

    • प्रिय श्री० गणेश सावंत यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपल्या पत्राबद्दल आभार.

     आपण उद्दिष्टलेले श्री० सलील कुळकर्णी ह्यांच्यासह अमृतयात्री गटाच्या वतीने, किंबहुना सकल अमृतयात्री परिवाराच्या वतीने (त्यात अमृतमंथन अनुदिनीचे सर्व लेखक आणि वाचकही आले) आम्ही आपल्या पत्राला उत्तर देत आहोत.

     आज महाराष्ट्रात तुम्हाआम्हांसारखी माणसे अल्पसंख्य आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या निस्सीम स्वभाषाप्रेमी आणि स्वसंस्कृतिप्रेमी व्यक्तीशी ओळख झाल्यावर खरोखरच अत्यंत आनंद वाटतो, हर्ष वाटतो. स्वतःच्या रक्ताचा नातेवाईक भेटल्यासारखे वाटते.

     अमृतमंथन अनुदिनीवरील लेखांमुळे आपल्यासारख्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळत आहे, हे ऐकून आम्हाला खरोखरच कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. पण हे कितीतरी अधिक मोठ्या प्रमाणात व्हायला हवे. आपण प्रत्येकानेच आपल्या आजूबाजूच्या आप्तमित्रांमध्ये स्वत्वाची भावना रुजवण्याचा आणि उफाळवण्याचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न किंवा भारतीय स्वातंत्र्याची कल्पना एकाकडून अनेकांकडे टप्प्याटप्प्याने पसरली आणि तिचे रूपांतर एका मोठ्या चळवळीमध्ये किंबहुना सातंत्र्ययुद्धामध्ये झाले तसेच आपल्या चळवळीतून मराठीच्या सन्मानासाठी मोठे स्वातंत्र्ययुद्ध सुरू व्हायला हवे.

     ह्या मार्गात अनेक अडथळे आहेत, एकदा किंचित् यश दुरून दिसले, तर शंभर वेळा अपयश समोर येऊनच धडकते. पण आपण हताश होता कामा नये. निराशा झटकून टाकून पुन्हा कामास लागायला हवे. संत तुकाराम म्हणाले, “ह्याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा”. तशीच आपली धारणा हवी. तसाच निश्चय हवा. त्या शेवटच्या दिवशी समाधानाने जगाचा निरोप घेता व्हावा, ह्यासाठीच आपण आयुष्यभर आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करीत राहायचे. आपल्या आयुष्यात आपल्याला अंतिम यश मिळो वा न मिळो. पण जीवनव्रतानुसार सातत्याने प्रयत्न करण्याचे आपले कर्तव्य केल्याच्या इतिकर्तव्यतेची भावना आपला शेवटचा क्षण गोड करेल. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या योद्ध्यांपैकी तरी किती जणांना स्वतःच्या आयुष्यात प्रत्यक्ष स्वातंत्र्य पाहायला मिळाले? पण कर्तव्य केल्याचे अत्युच्च पातळीचे समाधान मात्र त्यांना मिळाले.

     मराठी माणसाने ह्या लढ्यात जातपाततीचाच नव्हे तर धर्माचाही भेदाभेद मानता कामा नये. ज्याप्रमाणे बंगालमध्ये आणि केरळमध्ये विविध धर्मांची स्थानिक माणसे एकच भाषा बोलतात आणि एकाच भाषेवर आत्यंतिक प्रेम करतात, तशीच परिस्थिती एका अर्ध्या-पाऊण शतकभरापूर्वी महाराष्ट्रात होती. शिवाजी महाराजांसाठी अनेक मुसलमानांनी प्राणांचे बलिदान दिलेले आहे. पण गेल्या अर्धशतकात हिदूंव्यतिरिक्त इतर मराठीजनांना दूर सारणे आपण सुरू केले. ते पूर्णतः चुकीचे आहे. मराठी ही एक संस्कृती आहे. ती कुठल्याही एका धर्माची किंवा जातीची भाषा नाही. आपापसात फूट पडल्यामुळे मराठी अधिकच दुर्बळ होते. खरे तर अनेकदा असेही दिसून येते की विरार-वसईच्या ख्रिस्ती मराठी मंडळींना मुंबईच्या अनेक मराठी लोकांपेक्षा आपल्या मातृभाषेबद्दल अधिक प्रेम वाटते. ते अधिक चांगली मराठी बोलतात आणि तिची अधिक निगुतीने जपणूक करतात. हमीद दलवाईंसारखा साहित्यिक आणि समाजसुधारक मराठी होता, हे महाराष्ट्राचे भाग्यच आहे. महाराष्ट्रातून इस्रायलमध्ये गेलेले मराठीजन अजूनही आपली मातृभाषा जपतात. इतर (विशेषतः इंग्रजी आणि हिंदी) भाषांचे आक्रमण परतवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहूनच आपल्या मायबोलीचे संरक्षण करायला हवे.

     खालील लेख अवश्य वाचावे.

     आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख, ले० सलील कुळकर्णी) — } http://wp.me/pzBjo-Iv

     एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) –} http://wp.me/pzBjo-d8

     आपल्या ‘मराठी बोला’ चळवळीच्या http://marhathi.com/ संकेतस्थळाला भेट देऊन थोडा फेरफटका मारला. लेख वाचले. आपण करीत असलेले काम जाणून फार आनंद वाटला. अमृतमंथन अनुदिनीवरील लेख हे बरेचसे वैचारिक आणि औपपत्तिक (theoretical) पातळीवर असतात. पण त्याही पुढे जाऊन तुम्ही ती सर्व तत्त्वे, ते विचार, ती उपपत्ती, प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आपण चळवळ उभारली आहेत, हे पाहून आम्हा सर्वांचाच ऊर भरून आला. कुठल्याही युद्धासाठी कागदावर कितीही आडाखे बांधले, डावपेच केले, तरी शेवटी युद्ध प्रत्यक्ष रणांगणावर लढले जाते आणि जिंकले जाते. त्याला पर्यायच नाही. आणि म्हणूनच तुम्ही करत असलेले काम अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हा सर्वांना ह्या चळवळीसाठी अमृतमंथन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !!

     अमृतमंथन अनुदिनीला अनुसरण (Follow) करण्यासाठी आपला ईपत्ता नोंदवावा. आपल्यासारख्या इतर समानधर्मी मित्रांनाही सांगावे.

     संपर्कात राहा.

     सर्वांनी मिळून मायबोली गतवैभव प्राप्त करून देऊन वैभवाच्या शिकरावर नेऊन बसवण्याची शपथ घेऊ या.

     मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्नधर्मानुयायी असू,
     पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू.
     हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्ममंदिरी,
     जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी.

     क०लो०अ०

     आपला स्नेहांकित,

     अमृतयात्री परिवार

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s