दुर्मिळ ’मराठी रियासत’ होणार उपलब्ध (दै० सकाळ १५ नोव्हेंबर २०१०)

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला व पुढे विविध मराठी सरदारांनी त्याचा विस्तार केला. मराठा साम्राज्यामुळेच  सुमारे दोनशे वर्षे भारतदेशात मुघल व इतर राज्यकर्त्यांच्या प्रसारास व त्यांच्या बेबंद व अत्याचारी वर्तणुकीस  बर्‍याच प्रमाणात आळा घातला गेला. पूर्वेकडे कलिंग (ओडिसा) व वंगप्रदेश (बंगाल), वायव्यास थेट अटकेपर्यंत तसेच उत्तरेस दिल्लीच्याही पलिकडे व दक्षिणेस तंजावूरच्या पलिकडे अशा प्रकारे मराठेशाहीचा प्रभाव होता. मराठ्यांच्या नावाचा दबदबा संपूर्ण भरतखंडात पसरला होता. भारतातील जी काही देवळे, कलाकृती, संस्कृती टिकली त्यालाही बर्‍याच प्रमाणात मराठ्यांचे शौर्य हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्या दृष्टीने संपूर्ण भारतातील इतिहासतज्ज्ञ मराठ्यांचे ऋण मान्य करतात. इंग्रजांनी सर्वात शेवटी जिंकलेले महत्त्वाचे साम्राज्य म्हणजे मराठा साम्राज्य. अशा ह्या मराठेशाहीचा गौरवशाली इतिहास रियासतकार गो० स० सरदेसायांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने संशोधन करून आपल्या ’मराठी रियासत’ या आठ खंडी ग्रंथात मांडला आहे.

मराठी रियासत या पुस्तकाबद्दल माहिती सांगणारे दैनिक सकाळमधील ह्या वृत्ताचे कात्रण आपले मित्र श्री० प्रसाद परांजपे ह्यांनी पाठवलेले आहे, ते खालीलप्रमाणे.

दुर्मिळ ’मराठी रियासत’ होणार उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

सोमवार, १५ नोव्हेंबर २०१०

पुणे  –   मराठेशाहीच्या इतिहासाचे दुर्मिळ झालेले भक्कम संदर्भग्रंथ पुन्हा वाचकांना उपलब्ध होणार आहेत.

रियासतकार गो. स. सरदेसाई लिखित ’मराठी रियासत’च्या आठही खंडांचे मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनतर्फे पुनर्प्रकाशन करण्यात येणार आहे. मराठेशाहीचा एकमेव वस्तुनिष्ठ इतिहास म्हणून या मराठी रियासतींच्या खंडांकडे पाहिले जाते.

रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी काढलेल्या टिपणांमधून “हिंदुस्तानचा अर्वाचीन इतिहास’ लिहिला गेला. त्यापैकी सन १६०० ते सन १८१८ पर्यंतचा मराठेशाहीचा इतिहास “मराठी रियासत’ म्हणून प्रसिद्ध आहे. मालोजी भोसले यांच्यापासून ते दुसरा बाजीराव पेशव्याच्या अस्तापर्यंतचा सविस्तर इतिहास यात अंतर्भूत आहे. या खंडांचे महत्त्व जाणून “पॉप्युलर’तर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याबद्दलची माहिती “पॉप्युलर’चे रामदास भटकळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पेशवेकालीन कागदपत्रे तसेच तत्कालीन संस्थानांच्या दप्तरांतील कागदपत्रांचा वापर या इतिहासलेखनासाठी करण्यात आला होता. सरदेसाईंनी नवनवीन पुरावे आणि संशोधनातून उपलब्ध झालेल्या संदर्भांच्या आधारे या रियासतींचे पुनर्लेखनही केले. त्यामुळेच मराठेशाहीच्या इतिहासाचा एक भक्कम संदर्भग्रंथ म्हणून या रियासतींकडे पाहिले जाते. सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या समग्र इतिहासाची संपादित आवृत्ती स. मा. गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली होती. १९८८ ते १९९३ च्या काळात या इतिहासाच्या मूळ तेरा खंडांचे संपादन करून त्यांची पुनर्मांडणी “मराठी रियासत’च्या आठ खंडांमध्ये करण्यात आली. यादरम्यान मूळ साडेचार हजार पृष्ठांच्या मजकुरात बदल न करता त्यात नवे संदर्भ, ग्रंथसूची, नकाशे व इतर आवश्‍यक बाबींचा समावेश करण्यात आला. वाचकांकडून प्रचंड मागणी असणारे हे खंड दुर्मिळ झाले होते.

येत्या डिसेंबरअखेर हे आठही खंड ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. या सर्व खंडांची एकूण किंमत ५५०० रुपये आहे. ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी करणाऱ्या वाचकांसाठी प्रकाशनपूर्व सवलत म्हणून ४००० रुपयांमध्ये हे खंड उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी वाचकांनी पॉप्युलर प्रकाशनाशी ०२२-२३५३०३०३  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

—————

सर्व मराठीप्रेमींनी हा इतिहास निश्चितच वाचावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे खंड विकत घेऊन संदर्भासाठी स्वतःजवळ ठेवावेत.

– अमृतयात्री गट

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s