’जन-गण-मन’ – फुललेली छाती, गोंधळलेले मन (प्रश्नकर्ता: श्री० मंदार मोडक)

“अशा प्रकारे आपल्या देशाभिमानाचे प्रतीक ठरलेले हे गीत गाताना आपल्या मनाला कधीही हा विचार फारसा शिवत नाही का की या गीताच्या निर्मितीमागचा इतिहास काय असावा? गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी हे जयगान स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या संदर्भात रचले असावे?”

“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्‌’ हे गीतच मुख्यतः स्वातंत्र्याचा मंत्र म्हणून सर्वमुखी झालेले असतानाही त्या गीताला पुढे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून का स्वीकारले गेले नाही असा प्रश्न मनात येऊन त्याविषयी खेद वाटल्याशिवाय राहात नाही.”

विरारचे आपले अमृतमंथन-परिवार-सदस्य श्री० मंदार मोडक ह्यांनी विचारमंथन चर्चापीठासाठी एक अभ्यासपूर्ण टिपण पाठवले होते. पण त्याच्या विषयाची लांबी-रुंदी-खोली व संवेदनशीलता (sensitivity) लक्षात घेता त्यावर एक संपूर्ण लेखच होऊ शकेल असे वाटल्यामुळे त्यासंबंधातील विवेचनासह तो एक स्वतंत्र लेख म्हणूनच प्रसिद्ध करीत आहोत. शिवाय ह्या महत्त्वाच्या विषयावर आपली मते मांडण्याचे सर्व वाचकांना आवाहन करीत आहोत.

श्री० मंदार मोडक लिहितात:

…….

प्रिय मित्रहो..

जन-गण-मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रगीताचा दर्जा असलेले आणखी एक महत्त्वपूर्ण गीत. या दोन्ही गीतांभोवती नेहमीच वादविवाद उभे राहात असतात.

खरं म्हणजे,आपण बहुतेक सर्वजण न-कळत्या वयापासूनच (निदान स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले सर्वजण) जन-गण-मन हे गीत आपल्या देशाचे राष्ट्रगीत म्हणूनच गात आलो आहोत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ध्वजारोहण करताना हे गीत आवर्जून गायले/वाजवले जाते. आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांत भारताला जेव्हा कधी सुवर्णपदक मिळते तेव्हा मध्यभागी असलेला भारताचा तिरंगा याच गीताच्या सुरांबरोबर उंच-उंच चढत जाताना आपण सर्वांनी ताठ मानेने पाहिलेला असतो. चित्रपटगृहात खेळाच्या सुरूवातीला आपण सर्वजण उभे राहून या गीताद्वारेच देशाच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देतो. अशा प्रकारे आपल्या देशाभिमानाचे प्रतीक ठरलेले हे गीत गाताना आपल्या मनाला कधीही हा विचार फारसा शिवत नाही का की या गीताच्या निर्मितीमागचा इतिहास काय असावा? गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी हे जयगान स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या संदर्भात रचले असावे?

मोडकांचे संपूर्ण विवेचन खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_जन-गण-मन–फुललेली छाती, गोंधळलेले मन_101128

आपल्याला याबद्दल काय वाटते? हा आपणा सर्वांच्या हॄदयाला हात घालणारा विषय आहे. आपल्याला याबद्दल काही अधिक माहिती असल्यास अवश्य कळवा. गीताचे व घटनांचे वेगळे अन्वय व नवीन अर्थ व त्यासंबंधातील आपली मते, शंका याबद्दलही अवश्य लिहा.

– अमृतयात्री गट

.

8 thoughts on “’जन-गण-मन’ – फुललेली छाती, गोंधळलेले मन (प्रश्नकर्ता: श्री० मंदार मोडक)

    • प्रिय श्री० गोडबोले यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या संकेतस्थळावरील माहिती खरोखरच महत्त्वाची आहे. शिवाय जन-गन-मन बद्दलचा पु० ल० देशपांडे यांचा लेखही उत्तम आहे.

      अमृतमंथनाच्या सर्वच वाचकांना तो वाचण्याची विनंती करतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. आता या काळापर्यंत खूप काळ जन गण मन हेच राष्ट्रगीत आहे ना..?

    आत्ता जिवंत असलेल्यांपैकी ९९ टक्के लोक स्वातंत्र्योत्तर काळ(च) पाहिलेले आणि जन गण मन म्हणत मोठे झालेलेच आहेत ना?

    मग इतिहासातून संदर्भ काढायची काय गरज आहे? भले ते गाणे कोणत्याही उद्देशाने लिहिलेले किंवा हिब्रू भाषेत का असेना.

    इथे आपण एक उदाहरण घेऊ.

    दत्तक घेतलेलं एक मूल.

    ते मूल तान्हं असल्यापासून आपण सांभाळलंय. आपण त्याला आणि त्यानं आपल्याला अनुक्रमे स्वतःचंच अपत्य आणि स्वतःचेच आईबाप मानलंय.

    …भले आपल्याला दुसरं सख्खं रक्ताचं मूल असेना का..

    मग आता त्या दत्तक पोराचे मूळ आईबाप, इतिहास शोधायचा आणि मग त्यामुळे त्याला “आपलं” सख्खं मूल मानणं किंवा त्याची रँक ठरवणं, यात काय अर्थ आहे? आता मनाने ते तुमचंच झालंय नं? भले ते तुमच्या शत्रूचंही पोर का असेना?

    वंदे मातरम हे ही तितकंच संवेदनशील गीत आहे आणि ते ही पुरेशा सन्मानाने म्हटलं जातंच.

    जन गण मधे थोडा जास्त जागृतपणा आहे. वंदे मातरम शांत आहे.

    म्हणूनही राष्ट्रगीत म्हणून जन गण जास्त ब्राईट वाटत असेल.

    आता ते झालंय ना आपल्या मनात फिक्स..मग कशाला पूर्वीचे संदर्भ जमवायचे? स्वातंत्र्यानंतर लगेच एखाद्या वर्षात हे ठरवणं ठीक झालं असतं. तेव्हा असोसिएशन झालेलं नव्हतं. आता अचानक, (किंवा टप्प्या टप्प्याने) यंदापासून “वंदे मातरम” राष्ट्रगीत बरं का, असं म्हणून आमची मनं ते कसं स्वीकारतील?

    • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      मंदार मोडक ह्यांच्या वतीने मी उत्तर देत नाही. त्यांचे म्हणणे ते सांगतीलच. पण मला असे वाटते की मोडकांना अचानकपणे ’वंदे मातरम्‌’ ह्या गीता ऐवजी केवळ राजकीय सोयीसाठी जन-गण-मन ह्या गीताची निवड करण्याबद्दल वैषम्य वाटले.

      {{आता ते झालंय ना आपल्या मनात फिक्स..मग कशाला पूर्वीचे संदर्भ जमवायचे? स्वातंत्र्यानंतर लगेच एखाद्या वर्षात हे ठरवणं ठीक झालं असतं. तेव्हा असोसिएशन झालेलं नव्हतं. आता अचानक, (किंवा टप्प्या टप्प्याने) यंदापासून “वंदे मातरम” राष्ट्रगीत बरं का, असं म्हणून आमची मनं ते कसं स्वीकारतील?}}

      अगदी अशीच परिस्थिती ’वंदे मातरम्‌’ची होती. तेव्हाही लोकांच्या मनात तेच गीत दृढनिश्चित झालं होतं. मग अचानक आधी कधीही राष्ट्रगीत म्हणून फारसे माहित नसलेले ’जन-गण-मन’ त्याच्याजागी प्रस्थापित केले गेले. सामान्य मुसलमानांचाही त्याला आक्षेप नसावा. धर्माधारित व जात्याधारित राजकारण हेच केवळ ज्यांचे बलस्थान आहे ते राजकारणी असे मुद्दे मोठे करून पुढे करतात व स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे आपले नेतेच धर्माचे राजकारण करण्यासाठी त्यांच्यापुढे नांगी टाकतात.

      हे सर्व आता ताबडतोब बदलावे असे मोडकांना वाटत नसावे. पण इतिहासातील प्रश्न, शंका, लोकांचे गुणदोष, चकित करणार्‍या चांगल्या-वाईट गोष्टी, यांच्याबद्दल आपण नेहमीच चर्चा करतो. त्यातून आपण धडा शिकायलाच पाहिजे. इतिहासाचा अभ्यास त्यासाठीच तर असतो.

      असो. ह्यातील कुठले मुद्दे मोडकांच्या दृष्टीने योग्य व कुठले चुकीचे हे त्यांनीच लिहिले तर बरे होईल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      ते खरे आहे. इतिहासाची पाने बदलता येत नाहीत हे सत्य आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • श्री० कल्पेश कोथळे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले मत अगदी १००% पटले. अशी पारदर्शिकत्व सर्वच सामाजिक व राजकीय क्षेत्रात असायलाच हवे. नागरिकांचा तो अधिकारच आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s