गेल्या पन्नास-साठ वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील कुठल्याही क्षेत्रात मराठी माणसाला सर्वोच्च अभिमान वाटावा असे सातत्याने कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारल्यावर आपल्या मनात कुठले नाव येते? ‘पन्नास-साठ वर्षे’, ‘राष्ट्रीय पातळी’, ‘सर्वोच्च अभिमान’ व ‘सातत्याने’ हे निकष पाहिल्यावर भारतरत्न लता मंगेशकर किंवा पद्मविभूषण आशा भोसले (किंवा दोघीही) यांच्याशिवाय दुसरे कुठलेही नाव आपल्या मनात येईल असे वाटत नाही.
‘‘ही माधुरी दीक्षित माझ्याशी हिंदीतून का बोलते हो?’’ लताने एकदा मला विचारले, ‘‘मी मराठीतून बोलत्येय आणि ही हिंदीतून बोलत्येय. आम्ही इतर कोणाही इतकचं चांगलं हिंदी बोलतो. हयात घालवल्येय या फिल्म इंडस्ट्रीत पण म्हणून मी उद्या घरी आल्यावर माईला म्हणाले, ‘क्यौं माई, कैसी हो?’ तर ते तिला खटकणार नाही का?’’
अमृतमंथन परिवारातील आपले एक सहयोगी श्री० प्रसाद परांजपे ह्यांनी पाठवलेला या वर्षीच्या लोकप्रभेच्या दिवाळी अंकातील ’लता की आशा?’ हा शिरीष कणेकरांचा लेख वाचल्यावर अगदीच राहवले नाही. अमृतमंथनाच्या वाचकांपुढे तो ठेवण्याचा मोह आवरेना. खालील दुव्यावरील तो लेख नक्की वाचा.
अमृतमंथन_लता की आशा_लोकप्रभा_101031
लेख वाचा व भरपूर अभिमानपूर्ण आनंद लुटा.
– अमृतयात्री गट
.
शिरीष कणेकरांसारख्या चित्रपट संगीत समीक्षकाला आशाची दहा सर्वोत्कृष्ट गाणी निवडता आली, पण लताची तशी दहा सर्वोत्कृष्ट गाणी निवडणे अशक्यप्राय आहे असे त्यांचे मत आहे. हे पुष्कळ काही सांगून जाते.
प्रिय श्री० संजय नाईक यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले म्हणणे खरे आहे. लताची दहा सर्वोत्तम गाणी निवडणे अशक्यच आहे. परंतु तीच गोष्ट आम्हाला आशा व रफीच्या बाबतीत वाटते. केवळ मराठी भावगीते धरली तरीही आशाची दहा सर्वोत्कृष्ट गाणी निवडणे अशक्य आहे. तशीच गोष्ट आम्हाला साहिर लुधियानवी, कैफी आझमी, ग०दि०मा० यांच्या सारखे गीतकार, मदन मोहन, एस०डी०, नौशाद, रोशन, वसंत प्रभू, सुधीर फडके, इत्यादी संगीतकार ह्यांच्या असंख्य उत्तमोत्तम गाण्यांच्या बाबतीतही वाटते. अनेक भारतीय शास्त्रीय गायक व वादकांच्या विषयीदेखील अशीच समस्या उभी राहील. आणि श्रेष्ठ कवी, लेखकादी साहुत्यिकांचे काय? किंबहुना कुठल्याही अत्युच्च दर्जाच्या पण तरीही बहुप्रसव अशा श्रेष्ठ कलाकाराच्या बाबतीत आपणा बापड्या रसिकांची स्थिती अशीच केविलवाणी व्हावी. ते देतात भरपूर पण आपण घेणार किती दो करांनी किंवा पाहणार/वाचणार किती दोन डोळ्यांनी?
मात्र लता आणि आशा या विशेषेकरून मराठी माणसाच्या यशगौरवाच्या अत्युच्च सीमा आहेत.
आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व मित्रबांधवांना ही दिवाळी व येते वर्ष सुखाचे, आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी समस्त अमृतमंथन परिवाराच्या वतीने शुभेच्छा.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट