समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का? (ले० उन्मेष इनामदार)

‘शिक्षणाचे माध्यम’ या निकषावरून समाज दुभंगला आहे. नवा शैक्षणिक जातीयवाद व उच्चनीचता निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचा एक ’देशांतर्गत देश’ तयार झाला आहे. ’राष्ट्रभावना’ ही कुचेष्टा-टवाळी करण्याची गोष्ट बनली आहे. ’गुलामगिरी’ भूषणावह मानली जात आहे. या देशाबद्दलची निष्ठा, प्रेम, बंधुत्व यांची तसेच इथल्या समृद्ध परंपरांशी इमान राखण्याची प्रतिज्ञा इथली बालके एका परभाषेतून घेतात. व ही गोष्ट कोणालाही हास्यास्पद व लाजिरवाणी न वाटणे हे राष्ट्रीय अस्मितेचा सार्वत्रिक लोप झाल्याचे अत्यंत दुर्दैवी ठळक लक्षण आहे.

अलिकडेच अमृतमंथन परिवारात सहभागी झालेले आपले नवीन मित्र श्री० उन्मेष इनामदार ह्यांनी एक उत्कृष्ट लेख पाठवला आहे. तो पुढे सादर करीत आहोत. इनामदारांनी आपल्या लेखात काही सखोल चिंतन करण्यास भाग पाडणारे विचार अत्यंत परखडपणे मांडले आहेत. आपल्याला माहित असलेल्याच गोष्टी नवीनच दृष्टीकोनातून पुन्हा आपल्यापुढे मांडताना ते इतकी उत्तम, चपखल उदाहरणे देतात की आपल्याला माहित असलेल्याच त्या मुद्द्यांवर आपल्याला पुन्हा नव्याने विचार करणे भाग पडते. आजकालच्या विनाकारण हिंदी व इंग्रजी भाषेतील धेडगुजरी शब्द व वाक्यरचना वापरण्याच्या पद्धतीच्या मानाने इनामदारांची भाषा अत्यंत शुद्ध तर आहेच; पण तरीही ती बोजड न वाटता ओघवतीच वाटते.

इनामदारांच्या लेखातून त्यांचे स्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम, स्वाभिमान इत्यादी भावना स्पष्टपणे प्रतीत होतात. त्यांची काही वाक्ये तर मराठी माणसाच्या स्वाभिमानशून्य, लोचट, न्यूनगंडग्रस्त वृत्तीवर घणाघात करणारी वाटतात.

श्री० उन्मेष इनामदारांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

अमृतमंथन_समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का_101025

वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील स्तंभामध्ये अवश्य नोंदवाव्यात आणि इनामदारांनीही लक्ष ठेवून त्यांना उत्तरे द्यावीत अशी विनंती.

– अमृतयात्री गट

ता०क० इनामदारांनी प्रशंसिलेले प्रा० राईलकरांचे काही लेख जिज्ञासू वाचक खालील दुव्यांवर वाचू शकतात.

मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

.

11 thoughts on “समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का? (ले० उन्मेष इनामदार)

  1. गेली पंचावन्न वर्षे मी व्यवसायानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर आहे. संगणक व माहितीशास्त्रात सगळ्या जगभर आज इग्रजी भाषा सक्तीने जगातल्या सर्व देशांतून शिकावीच लागते ही वस्तुस्थिती कोणालाच नाकारता येणार नाही. एकेकाळी युरोपभर एकमेकांशी संपर्क ठेवण्य़ासाठी फ़्रेंच भाषाच वापरावी लागत असे. गेल्या त्रेचाळीस वर्षात हळूहळू बदल होत आज वस्तुस्थिती अशी आहे की सर्व युरोपीय राष्ट्रांनी युरोपभर एक्मेकांशी संपर्क ठेवण्यासाठी इन्ग्रजीचाच वापर link language म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे.
    तेव्हा इंग्रजी शिकायला कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. पण इंग्रजी माध्यम करून आपली मातृभाषा एक ऐच्छिक विषय़ ठेवण्याचे धोरण मात्र अतिशय घातक आहे. माझे प्राथमिक व मध्यम शिक्षण नूतन मराठी विद्यालय, पुणे येथे झाले व आजही आमच्या कुटुंबात आमच्या मुलांना आमच्याशी बोलताना सहजपणे मराठी भाषाच बोलायला आवडते. दोनच महिन्यांपूर्वी आम्ही झूरिच, स्वित्झर्लंड मध्ये युरोपीय मराठी संमेलन केले.
    मी माझ्या व्यवसायातून अठरा वर्षांपूर्वी निवृत्त झालो व तेव्हापासून मराठी संत वां~मयाचा अभ्यास करीत आहे. मराठी भाषा किती समृद्ध आहे हे त्यावरून स्वानुभवाने मी सांगू शकतॊ.
    ष्री. उन्मेष इनामदारांच्या लेखाशी मी पूर्णपणे सहमत आहे.
    महाराष्ट्र सरकाराने मराठी माध्यमातून शिक्षण देणार्या शिक्षणसंस्थांना अधिक पाठिंबा द्यायलाच हवा. इंग्रजी भाषा ऐच्छिक ठेवावी. उच्च शिक्षणासाठी जे विषय इंग्रजी माध्यमातून शिकविणे पुढील व्यवसायासाठी उपयुक्त असेल तेथे इंग्रजी माध्यम जरूर ठेवावे पण कायदा, राज्यशास्त्र,वगैरे जे विषय भारताच्या अंतर्गत आवश्यक आहेत ते मातृभाषेतूनच शिकविले जावेत.
    बाळ संत

    • प्रिय श्री० बाळाराव संत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सारख्या ज्ञानवृद्ध, अनुभवी व सर्व जग जवळून पाहिलेल्या व्यक्तीचा सल्ला खरोखरीच उपयुक्त ठरावा. शिवाय स्विट्झरलंडसारख्या परदेशात आपली संस्कृती जपण्याची व पुढील तरूण पिढीला आपल्या संस्कृतीचे धडे देण्याचे काम आपण स्वसंतोषाने करता असे समजते. ते देखील मायबोलीप्रती आपले मोठेच योगदान आहे.

      {{उच्च शिक्षणासाठी जे विषय इंग्रजी माध्यमातून शिकविणे पुढील व्यवसायासाठी उपयुक्त असेल तेथे इंग्रजी माध्यम जरूर ठेवावे पण कायदा, राज्यशास्त्र,वगैरे जे विषय भारताच्या अंतर्गत आवश्यक आहेत ते मातृभाषेतूनच शिकविले जावेत.}}
      हे काही नीटसे समजले नाही. राज्यशास्त्र, कायदा हे विषय कमी महत्त्वाचे, व्यवसायाभिमुख नसलेले किंवा त्यात फारशा उच्च शिक्षणाची आवश्यकता नसलेले, शाळेतच शिकता येतील असे आहेत काय? जगभर उच्च शिक्षणही मातृभाषेतच देतात व तीच मंडळी पुढे संशोधन करून नोबेल पारितोषिके मिळवतात.

      इस्रायलला आपल्यानंतर ९ महिन्यांनी स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे भाषाही होती ती मृत झालेली. तरीही आज त्याच भाषेचे संवर्धन करून, त्याच भाषेत शिकून, उच्च शिक्षण घेऊन, भारताहून अधिक संशोधन करून दीडशे पटीने मोठा असलेल्या भारताहून कितीतरी अधिक प्रगती साधली आहे. आज अनेक क्षेत्रात आपण त्यांची मदत घेतो.

      आणखी एक गोष्ट म्हणजे सर्व ज्ञान, विज्ञान, संशोधन व शोध केवळ इंग्रजांनीच लावले हा आपला गैरसमज आहे. (आमचाच मालक सर्वश्रेष्ठ असे म्हणण्याची ही आम्हा गुलामांची वृत्ती.) अनेक शोध जर्मन, फ्रेंच, हंगेरियन, रशियन, व इतर अनेक देशांतील, इतर भाषिक शास्त्रज्ञांनी लावले. ते ज्ञान इंग्रज कसे अभ्यासतात? तर त्याचा आपल्या भाषेत म्हणजे इंग्रजीत अभ्यास करूनच. शास्त्रज्ञाची भाषा प्रत्येक अभ्यासकाला शिकण्याची आवश्यकताच नसते. इंग्रज ज्याला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ मानतात त्या न्यूटनने आपल्या संशोधनातील एकही वाक्य इंग्रजी भाषेत लिहिलेले नाही. त्याचे सर्व संशोधनात्मक प्रबंध लॅटिनमध्ये आहेत. कारण त्या काळी इंग्रजी भाषा ही खुद्द इंग्लंडमध्ये देखील उच्च शिक्षणासाठी कुचकामी मानली जात असे. इंग्रजीत वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला तर रोगी दगावतील असे त्याकाळचे इंग्रजच म्हणत असलेले उल्लेख आहेत. (आज आपल्याला हे विधान वाचून हसायला येते नाही का?) इंग्लंडमध्ये कायदे, संसदेतील चर्चा, न्यायालयातील वाद हे फ्रेंचमध्येच होत असत. इंग्रजी भाषा ही गुंडांच्या भांडणाच्या कामाची, वकीलांच्या विद्वत्‌प्रचूर वादासाठी फ्रेंचला पर्यायच नाही. असे बहुसंख्य कायदेतज्ज्ञांचे तेव्हा मत होते. त्या परिस्थितीतून त्यांनी कसा मार्ग काढला व इंग्रजीमध्ये सर्व ज्ञान कसे आले याची कल्पना खालील लेखावरून येईल.

      इंग्रजी भाषेचा विजय –> https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

      इंग्रजी भाषा अवश्य शिकावी. पण इंग्रजी म्हणजेच ज्ञान व इंग्रजीशिवाय ज्ञान शक्यच नाही; म्हणून ’इंग्रजी भाषेचेच’ नव्हे तर ’इंग्रजी भाषेतूनच’ ज्ञान मिळवले पाहिजे, इंग्रजी भाषेतूनच शासनव्यवस्था, न्यायसंस्था, पोलिसव्यवस्था, संसदव्यवस्था इत्यादी चालवल्या पाहिजेत ह्या गैरसमजातून आपण स्वतःला बाहेर काढले पाहिजे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत मागे पडायचे नसेल तर “इंग्रजीतूनच शिक्षण” घ्यायला पाहिजे असे आपले राजकीय पुढारी म्हणतात. पण वस्तुस्थिती पाहिली तर जपान, चीन, इस्रायल, स्वीडन, स्पेन, जर्मनी, कोरिया, हंगेरी, रशिया, बेल्जियम, पोर्तुगाल, ग्रीस, इटली, फ्रान्स इत्यादी सर्वच मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍या देशांच्या मानाने आपण इंग्रजीतून उच्च शिक्षण घेऊनही संशोधन, जीवनस्तर, दरडोई उत्पन्न इत्यादी सर्वच बाबतीत मागेच आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. क्षमस्व!
    हा वाद मी वाढवू इच्छित नाही.
    मी काही उदाहरणे देऊन इंग्रजी माध्यमातून उच्च शिक्षण घेणे सोयीस्कर होईल असे म्हणू इच्छित होतो. मराठी परिभाषा उपलब्ध असेल तर पदार्थविद्न्यान, रसायन शास्त्र वगैरे विषयातील उच्च शिक्षणदेखील मराठीतूनच द्यावे; संशोधनाचे प्रबन्धदेखील मराठीतच लिहिले जावेत. पण ह्या धोरणात अट्टाहास नसावा. लंबक एक टोकावरून दुसया टोकाला नेण्याची गरज नाही.
    मझ्या दृष्टीने हा मुद्दा गौण आहे.
    बाळ संत

    • प्रिय श्री० बाळ संत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      कृपया गैरसमज नसावा. आपल्या सारख्या मराठीप्रेमी, ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तीशी आम्ही कशाला वाद घालू? आम्हाला एवढेच लक्षात आणून द्यायचे होते की जगभरातील तज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे “मातृभाषेतून शिक्षण घेताना आकलन (understanding), जतन (retention), प्रत्याहरण (retrieval), आणि अभिव्यक्ती (expression) या सर्वच गोष्टी अधिक सुलभतेने व अधिक पक्क्या पद्धतीने होतात” हे मातृभाषेतील शिक्षणाचे मूलतत्त्व आपल्याला स्वानुभवावरून मान्य असले, तर मग पुढे इतर काहीच प्रश्न येणार नाहीत. पारिभाषिक संज्ञा आवश्यकतेप्रमाणे तयार होतात. इंग्लंडमध्ये जेव्हा इंग्रजी भाषा ही शिक्षणाच्या लायकीचीच नाही असे समजले जात होते, तेव्हा त्या भाषेतही शब्द नव्हते.

      (वरील माहितीसाठी पुढील लेखावर दृष्टी टाका. –} https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/)

      इस्रायलच्या स्थापनेच्या काळी हिब्रू ही तर मृतभाषाच होती. तेव्हा इंग्रजी व हिब्रू या दोन्ही भाषांच्या मानाने मराठीची परिस्थिती कितीतरी अधिक चांगली आहे. शिवाय संस्कृतसारखी लवचिक भाषा मराठीच्या मागे उभी आहे.

      शिवाय पहिल्यांदाच नवीन शब्द ऐकला तर मातृभाषेतील शब्द समजायला, लक्षात ठेवायला परकीय भाषेतील नवीन शब्दापेक्षा अधिक सोपा असतो हे आपण शब्दभ्रमकार (ventriloquist), स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist), diabetes (मधुमेह), अन्ननलिका (oesophagus), श्वासनलिका (trachea), अशा उदाहरणांवरून समजू शकतो.

      गांधीजींची खालील वाक्ये अशा शंकांचे निराकरण करतात.

      “If I had the powers of a despot, I would today stop the tuitions of our boys and girls through a foreign medium and require all the teachers and professors on pain of dismissal to introduce the change forthwith.  I would not wait for the preparation of Text books. They will follow the change. It is an evil that needs a summary remedy.”

      महात्मा गांधींची वरील अवतरणे खालील लेखात सापडतील.

      Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. उन्मेश इनामदार यांचा लेख वाचला, फार प्रभावी वाटला. आज फक्त मराठी भाषेच्याच नव्हे तर सामाजिक आणि विशेषत: राजकीय क्षेत्रातील घसरलेल्या नितीमुल्यांचे रक्षण आणि पुन:स्थापन करण्याची नितांत अवश्यक्ता आहे.मी एका राजकीय पक्षाशी संबंधीत संघटनेत काम करतो. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन प्राप्त होत आहे. जेव्हा आजची राजकीय परिस्थिती पाहतो तेव्हा असे प्रकर्षाने जाणवते की आपला देश स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या अवघ्या काही वर्षांमध्ये अंधकारमयभविष्याकडे वेगाने घसरत आहे. समाजात आजही काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्यांचा परिणाम फार मर्यादीत आहे .याउलट चूकीच्या आणि वाईट गोष्टींची व्याप्ती फार मोठी आहे. हेही जाणवते की हे बदलायचे असेल तर शिक्षणाची जी चौकट आपल्याला घालून दिली आहे ती बदलावी लागेल. शिक्षणातून कारकून किंवा गलेलठ्ठ पगार घेणारे स्कॉलर निर्माण करण्यापेक्षा आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीची योग्य जाणीव, देशहीत व समाजहीत यासाठी तत्पर अशी जागरूक पिढी निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था उभी करावी लागेल. जो पर्यंत लोक शिक्षण होत नाही तो पर्यंत लोकशाही सारख्या प्रामाणिक संकल्पनेचीही विटंबना होत राहील. कारण बहूतांश समाजाला आपले कर्तव्य व अधिकार यांची जाणीवच झालेली नाही. बकाल शहरे, ग्रामीण अर्थव्यस्थेचा मोडत चाललेला कणा हे आपल्यावर आरीष्ट हे लोकांना जाणवतच नाही. शिक्षणातून या सगळ्या जाणीवा झाल्या पाहीजेत तरच अपेक्षित बदल शक्य आहे. मतदाना सारखा मुलभूत आणि प्रचंड परिणामकारक अधिकार जो आपल्याला प्राप्त झाला आहे त्याची महत्ता लोकांना समजवायची असेल तरीही शिक्षण आवश्यक आहे. पण ते शिक्षण म्हणजे आज दिले जाणारे शिक्षण होऊ शकत नाही. सलीलजी मतदानाचे महत्व काय व हे कसे वापरावे याची जागृती, जातीभेद विरहीत सामाजिक एकता अशा काही महत्त्वाच्या बाबी समाजात घडून आल्या तर चित्र पालटायला वेळ लागणार नाही. अर्थात आजची परिस्थिती पाहता हे अतिशय कठीण आव्हान आपल्यासारख्या लोकांसमोर आहे हे मला मान्य पण आशा एकच महत कठिण असेल पण अशक्य नाही. आपल्या येणार्‍या भावी पिढ्यांना उज्वल व सुरक्षित भविष्य द्यायचे असेल तर आपल्याला ही लढाई लढावीच लागणार आहे. तुमच्यासारख्या लोकांना अशा गोष्टींसाठी प्रामाणिकपणे झटताना पाहीलं की उमेद आणखी वाढते.

    • प्रिय श्री० सुधीर भदे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले विवेचन योग्यच आहे. आपण मांडलेल्या विविध समस्यांचा, आवाहनांचा विचार गांधीजींनी केला होता. आणि म्हणूनच त्यांनी बहुसंख्य सर्वसामान्यांच्या भाषेतून संपूर्ण शिक्षण देण्याचा आग्रह केला होता. दुर्दैवाने मूठभर, सुदैवी, शहरी, परकीयभाषाशिक्षित लोकांना इतरांची पर्वा नसते व ते बहुसंख्यांची दिशाभूल करून स्वतःला फायदेशीर अशीच व्यवस्था शिक्षण, न्याय, व इतर सर्व सामाजिक क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करतात.

      आपण राजकीत पक्षाशी संबंधित असाल व आपल्याला मातृभाषेबद्दल प्रेम व अभिमान असेल तर आपली जबाबदारी कितीतरी अधिक पटीने वाढते. आपण आमच्यासारखे सामान्य, दुर्बल नाहीत. आपण आपली सर्व राजकीय शक्ती पणाला लावून शिक्षणक्षेत्रात सुधारणा घडवून आणायला पाहिजे. लोकशाहीमध्ये शासनव्यवस्था लोकांनी, लोकांसाठी, लोकांतर्फे, चालवलेली असली पाहिजे म्हणजेच ती (बहुसंख्य) लोकांच्या भाषेतही असली पाहिजे. अन्यथा आपली शासनव्यवस्था लोकशाही प्रकारची आहे असे म्हणता येणारच नाही.

      आपल्य़ा पक्षातर्फे हा प्रश्न रस्त्यावर, लोकसभेत, विधानसभेत, प्रत्येक गल्लीबोळात, प्रत्येक सभेत पुन्हापुन्हा मांडून तो धसास लावला पाहिजे. आम्हा अमृतमंथन परिवारातर्फे कसलीही मदत पाहिजे असल्यास सांगा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. प्रिय श्री० बाळाराव संत यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. वर अमृतयात्री गटाची जी प्रतिक्रिया आहे तेच माझेही मत आहे.

    इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा पुरस्कार करणारी मंडळी कधीही भारताच्या मागासलेपणाची शास्त्रशुद्ध कारणमीमांसा करीत नाहीत.

    उच्चशिक्षणात तरी इंग्रजी माध्यम कशासाठी हवे? या देशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण भागात किमान एक वर्ष सेवा करण्याची सक्ती का करावी लागते? बरे. अशी सक्ती करून तरी ग्रामीणच काय, निमशहरी भागातील तरी बालमृत्यू, गरोदर मातांचे कुपोषण, रोगराई कमी झाल्याचे कधी ऐकले आहे का? सर्वच क्षेत्रांतील उच्च शिक्षणाची ही अवस्था आहे. म्हणजेच खरा उपाय हा उच्च शिक्षणाचे सुद्धा मातृभाषीकरण हाच आहे.

    उन्मेष इनामदार.

  5. प्रिय श्री० सुधीर भदे यांसी,

    सप्रेम नमस्कार,

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. आपण राजकीय पक्षाशी संबंधित असूनही या विषयाबाबत संवेदनशील आहात ही गोष्ट फारच आनंदाची व आशादायी आहे. आपल्या पक्षश्रेष्ठींना आपण या लेखातील मुद्दे पटवून देण्याचा अवश्य प्रयत्न करावा. आपल्यासारख्यांचा हातभार या कामी लागल्यास अंतिम लक्ष्य नक्कीच दृष्टीपथात येऊ शकेल.मराठी एकजूट हे काम प्रामाणिकपणे करू इच्छिणार्‍या पक्षाला पक्षनिरपेक्षपणे पाठिंबा देईल
    याबद्दल मला खात्री आहे.

    धन्यवाद.

    उन्मेष इनामदार.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s