“स्टेट बॅंक ऑफ इंडिया” ची २०१० च्या वार्षिक दिनदर्शिकेचे चित्र टाचले आहे. ही दिनदर्शिका विशेषतः तामिळनाडूसाठी, तामिळीत बनवलेली आणि तामिळ संस्कृतीच्या संबंधीची प्रचलित वैशिष्ट्ये दाखवणारी अशीच आहे.
अमृतमंथन परिवारामधील आपले एक मित्र श्री० प्रसाद परांजपे आपणा सर्वांच्या विचारार्थ खालीलप्रमाणे सूचना सादर करू इच्छितात.
————————-
प्रिय मित्रांनो,
नमस्कार.
मी सध्या तामिळनाडू राज्यात कामानिमित्ताने आलो आहे. तिथलाच एक अनुभव :
खालील दुव्यावर “स्टेट बॅंक ऑफ इंडिया” ची २०१० च्या वार्षिक दिनदर्शिकेचे चित्र टाचले आहे.
अमृतमंथन_स्टेट बॅंकेची तमिळ दिनदर्शिका_101021
सदर वार्षिक दिनदर्शिकेमध्ये आकडे आणि वार-महिने इंग्रजीत आहेत. इतर सर्व माहिती संपूर्णत: तामिळमध्ये आहे. ही दिनदर्शिका विशेषतः तामिळनाडूसाठी, तामिळीत बनवलेली आणि तामिळ संस्कृतीच्या संबंधीची प्रचलित वैशिष्ट्ये दाखवणारी अशीच आहे.
मी आजवर “स्टेट बॅंक ऑफ इंडिया” ची मुद्दाम एखाद्या राज्यभाषेत बनवलेली वार्षिक दिनदर्शिका बघितलीच नव्हती. माझ्या अनुभवानुसार, “स्टेट बॅंक ऑफ इंडिया” ने खास राज्यस्तरावर बनवलेली, त्या राज्याच्या भाषेतील अशी ही पहिलीच/एकमेव वार्षिक दिनदर्शिका असावी. महाराष्ट्रात “स्टेट बॅंक ऑफ इंडिया” ची संपूर्णत: मराठीत असलेली वार्षिक दिनदर्शिका माझ्यातरी बघण्यात आजवर आलेली नाही. (चूकभूल माफ करणे !)
माझा समज जर आपल्याही अनुभवानुसार खरा असेल तर “स्टेट बॅंक ऑफ इंडिया” व अन्य “बॅंकांना” आपापली वार्षिक दिनदर्शिका मराठी भाषेत व संपूर्णत: महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित अशा स्वरूपात प्रसिद्ध करण्यास सांगायलाच हवे. त्रिभाषा सूत्रानुसार आधी मराठीत आणि नंतर हिंदीत व इंग्रजीत बॅंकेचे नाव लिहिलेले हवे. (स्टेट बॅंकेच्या प्रस्तुत दिनदर्शिकेत तामिळ नाव सर्वांच्या आधी लिहिलेले आहे.)
येते नूतन इंग्रजी वर्ष सुरु होण्यास अजून सव्वादोन महिन्याचा कालावधी असून ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यास मराठीतून सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या २०११ वर्षाच्या दिनदर्शिका महाराष्ट्रात संपूर्णपणे मराठी संस्कृतीनुसार आणि मराठी भाषेतच प्रथम नाव लिहून तयार करणे सहज शक्य आहे.
आपल्याला काय वाटते? आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे.
– प्रसाद परांजपे
.