न्हावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्रशासनाने इंग्रजी, हिंदीबरोबरच मराठीतूनही कामकाज करण्यास मंजुरी दिली असून मराठी लेटरहेड छापून तशी तयारी देखील सुरू केली आहे.
देशातील सर्व बंदरांत स्थानिक भाषेला महत्त्व दिले जाते. केंद्र सरकारी आस्थापनांना लागू असणार्या त्रिभाषा सूत्रानुसार हे पहिल्या दिवसापासूनच व्हायला हवे होते. कायद्याचे पालन होण्यासाठी देखील महाराष्ट्रात पाठपुरावा करावा लागतो, ह्याचे दुःख वाटते. पण आता न्हावाशेवा येथील बंदराच्या स्थापनेनंतर दोन दशकांनी का होईना पण स्थानिक भाषेला महत्त्व देण्याचे मान्य केले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. शिवाय त्रिभाषासूत्राप्रमाणे सर्वोच्च स्थान स्थानिक भाषेला व त्यानंतरच हिंदी व इंग्रजीला आहे, हे देखील लक्षात ठेवूया. अर्थात ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात किती पाळल्या जातात याबद्दल खरोखरच शंका वाटते. त्यावरही हे मराठी धार्जिणे पक्ष लक्ष ठेवतील अशी आशा बाळगूया.
आपले मित्र श्री० शरद गोखले (मराठी अभ्यास केंद्राचे पदाधिकारी) यांनी पाठवलेले बातमीपत्र खाली दिले आहे.
उरण, दि. ६ (सा.वा.) – जेएनपीटी बंदरात मराठीतूनही कामकाज झालेच पाहिजे यासाठी शिवसेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. बंदर प्रशासनाने इंग्रजी, हिंदीबरोबरच मराठीतूनही कामकाज करण्यास मंजुरी दिली असून मराठी लेटरहेड छापून तशी तयारी देखील सुरू केली आहे.
देशात एकूण ११ बंदरे आहेत. त्या त्या राज्यात असलेल्या बंदरात इंग्रजी, हिंदीबरोबरच तेथील प्रादेशिक भाषेचा वापर केला जात आहे. मात्र त्याला २० वर्षांपूर्वी उरण येथे उभारण्यात आलेला अत्याधुनिक जेएनपीटी बंदर अपवाद ठरले आहे. येथे मराठीतून कामकाज केले जात नव्हते. त्यामुळे देशाच्या इतर बंदरांप्रमाणे येथील जेएनपीटी बंदर प्रशासनानेही महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा असलेल्या मराठीतून कामकाज करावे अशी आग्रहाची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख तसेच जेएनपीटी कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी सातत्याने केली होती. त्यानुसार आता मुंबई पोर्ट ट्रस्टप्रमाणे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असे मराठीत लेटरहेड छापून कामकाज करण्याची तयारी बंदर प्रशासनाने सुरू केली आहे.