रेल्वे आणि मराठी (ले० वाचकमित्र बिंदुमाधव अंबिके)

“प्रत्येक गावाला, शहराला एक नाव असतं आणि ते नाव त्या ठिकाणाचे व्यक्तिमत्व असतं. त्या नावामागे काही इतिहास असतो, काही आठवणी असतात, काही भावना असतात. पूर्वी साम्राज्यविस्ताराच्या काळात जेत्यांनी पराजितांच्या देशातील ठिकाणांची नावे बदलण्यामागे तेथील संस्कृतीच्या खुणा आणि भावना जागृत करू शकतील अशा आठवणी नष्ट करणे हाच हेतू असे. हल्ली रेल्वे आणि महाराष्ट्राचे नातेही असेच जेते व पराजिताचे झाले आहे. नितीश कुमार, रामविलास पासवान व लालूप्रसाद यांनी रेल्वे मंत्रीपदाचा वापर पुरेपूर करून घेतला व महाराष्ट्राची रेल्वे उत्तर भारताच्या दावणीला नेऊन बांधली.” 

’मराठी+एकजूट’चे सभासद व आपल्यापैकीच अमृतमंथन परिवाराचे सदस्य श्री० बिंदुमाधव अंबिके ह्यांनी पाठवलेला हा एक अभ्यासपूर्ण व तळमळीने लिहिलेला लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन_रेल्वे आणि मराठी_बिंदुमाधव अंबिके

मुंबईचे मूळ रहिवासी म्हणजे कोळी. त्यांच्या वस्तीची खूण म्हणून पडलेल्या कोळीवाडा स्थानकाचे नाव त्यांच्या आठवणीसाठी जपण्याऐवजी नंतर आलेल्या परप्रांतीय शीखांना खुष करण्यासाठी तेगबहादूर नगर असे केले गेले. मराठीमध्ये गाव या शब्दात अनुस्वार नाही. पण हिंदीमधील गॉंव या शब्दाच्या प्रमाणे आपल्या गावांच्या नावात आता केवळ रेलवेच नव्हे तर राज्यशासनही गावांच्या नावांमध्ये गांव असे चुकीच्या पद्धतीने लिहू  लागले आहेत. उदा० आसनगांव, वडगांव, गोरेगांव इत्यादी. शिवाय परळला परेल म्हटले जाते, चिंचपोकळीला चिंचपोकली व भाईंदरला भायंदर. आपले नेते स्थानिकांच्या भावनांना किंमत देत नाहीत आणि आपण त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया न दाखवता सर्व निमूटपणे सहन करतो आणि बाहेरून आलेल्यांना मात्र आपण आपल्या डोक्यावर मिरी वाटू देतो.

आपले अमृतयात्री मित्र श्री० बिंदूमाधव अंबिंके यांचे मराठी भाषा व मराठी संस्कृतीबद्दलचे प्रेम या लेखावरून सहज स्पष्ट होते. त्यांच्याच चष्म्यातून पाहू लागल्यावर आपल्याला तशा प्रकारे मराठी ठिकाणांच्या, गावांच्या, नगरांच्या नावांच्या केलेल्या विकृतिकरणाची अनेक उदाहरणे दिसू लागतात. म्हणूनच आपणाला अशी नम्र विनंती करू इच्छितो की आपल्यालासुद्धा अशा प्रकारे केंद्र सरकारी संस्था, खासगी कंपन्या एवढेच नव्हे तर आपले थोर राज्यशासन यांनीसुद्धा नावाच्या पाट्या, रस्त्यांवरील-महामार्गांवरील पाट्यांमध्ये मूळ नावांचे हिंदी-इंग्रजीच्या प्रभावामुळे विकृतिकरण केलेले माहित असल्यास आपल्या इतर वाचकांच्या माहितीसाठी अवश्य कळवा. आपण सर्वच अशा प्रवृत्तीपासून सावध राहिले पाहिजे. आपण अशा चुकांपासून स्वतः सावध राहूच पण अशी उदाहरणे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या, सामाजिक नेत्यांच्याही लक्षात आणून देऊ, त्या चुका सुधारण्यास दबाव आणू.

– अमृतयात्री गट

.

8 thoughts on “रेल्वे आणि मराठी (ले० वाचकमित्र बिंदुमाधव अंबिके)

 1. चुकीची दुरुस्ती

  कोळीवाडा स्टेशनचे मूळ नाव कोलवाडा असे होते, लोक त्या गांवाला सायन-कोळीवाडा म्हणत. त्या स्टेशनचे नांव बदलून आता गुरु तेगबहादुर नगर(GTBN) असे झाले आहे, तेगबहादूर नगर असे नाही. नांव बदलले की त्याचे शुद्धलेखन बदलायचे अशी पद्धत नसते. आणखी एक ! कोलवाडाचे नांव बदलण्याचे काम नीतीश कुमार, राम विलास पासवान किंवा लालू प्रसाद यादव यांच्या आमदानीत झालेले नाही, ते यापूर्वीच केव्हातरी झालेले आहे.
  रेल्वेच्या पाटीवर नांव दोन किंवा तीन भाषांत असते. इंग्रजी-हिंदीत परेल लिहिल्यानंतर मराठीत परळ असेही लिहिलेले असते. विशेष नामांची भाषांतर होतात. गुजराथेतल्या उमरगाम या गांवाला मराठीत उंबरगाम म्हणतात, अमदावादला अहमदाबाद, वडोदराला बडौदा वगैरे.
  बिंदुमाधव हा जर एक शब्द असेल तर त्यातला दु र्‍हस्व हवा, आणि विकृतीकरणातला ती दीर्घ. आपल्याच नांवाचे विकृतीकरण सहन करू नये.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   {{कोळीवाडा स्टेशनचे मूळ नाव कोलवाडा असे होते, लोक त्या गांवाला सायन-कोळीवाडा म्हणत.}}
   गावावरून स्टेशनाचे नाव पडते की स्टेशनवरून गावाचे? आपले काय मत आहे? मराठी कोळीवाडा या गावाचे नाव स्टेशनला दिल्यावर त्याचा अपभ्रंश अमराठी लोकांनी कोलवाडा केला असेल की अमराठी कोलवाडा ह्या स्टेशनच्या नावाचा मराठी लोकांनी अपभ्रंश कोळीवाडा असा करून ते नाव आपल्या वाडीसाठी स्वीकारले असेल?

   {{त्या स्टेशनचे नांव बदलून आता गुरु तेगबहादुर नगर(GTBN) असे झाले आहे, तेगबहादूर नगर असे नाही.}}
   यावर काय बोलावे?

   {{कोलवाडाचे नांव बदलण्याचे काम नीतीश कुमार, राम विलास पासवान किंवा लालू प्रसाद यादव यांच्या आमदानीत झालेले नाही,}}
   तसे लेखक म्हणालेला नाही.

   {{गुजराथेतल्या उमरगाम या गांवाला मराठीत उंबरगाम म्हणतात}}
   मराठीत उंबरगाव म्हणतात, अमराठी उमरगाम म्हणतात. गिरगावाला गिरगाम म्हणतात तसे. तो प्रदेश महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर आहे. हा सर्व भाग, विशेषतः डांग प्रदेश इथे मराठी वस्ती (आदिवासींसकट) अधिक असूनही यशवंतरावांनी मुंबईबद्दलच्या तडजोडीत गुजराथला देणे मान्य केले. मराठी उंबरगावचा अपभ्रंश उमरगाम असा झाला आहे.

   कलकत्त्याचे अधिकृत नाव मूळ बंगालीप्रमाणे कोलकाता केल्यावर त्यास कलकत्ता म्हटल्यावर त्यांना राग येतोच. तमिळांना चेनैला मद्रास म्हटल्यावरही राग येतो. जगातील अनेक देशांनी अधिकृतपणे आपल्या देशाचे किंवा शहरांची नावे बदलली आहेत. अधिकृत कागदपत्रांत, घोषणांत किंवा नामफलकांवर (विशेषतः त्यांच्याच देशात) ती चुकीची लिहिली किंवा उच्चारली तर त्यांना राग येणारच. ती शुद्धलेखनाची चूक नव्हे ते बेपर्वाईने किंवा सहेतुक उपेक्षेने केलेले नावाचे विकृतीकरण समजले जाते. शुद्धलेखन हे चुकून होते, जाणीवपूर्वक किंवा बेपर्वाईच्या सवयीने केलेले विकृतीकरण हे सातत्याने केले जाते. आपल्या मराठी भाषेत आपण बडोदे म्हटले तरी बडोद्यात अधिकृतपणे किंवा स्थानिकांशी बोलताना आपण तसे बोलणे चूकच आहे, अगदी एकेकाळी ते मराठी संस्थान होते व तेव्हा त्याला बडोदे संस्थान असेच मराठीत म्हटले जाई तरीही आज आपण स्थानिक जनतेच्या भावनांची कदर केलीच पाहिजे.

   {{बिंदुमाधव हा जर एक शब्द असेल तर त्यातला दु र्‍हस्व हवा, आणि विकृतीकरणातला ती दीर्घ.}}
   लेखकांच्या शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल आम्ही काहीच म्हणत नाही. आपण त्या आनंदाने काढाव्या.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. मराठी नांवांची वृत्तपत्रांतील छपाई : आत्ताच एका प्रथितयश हिंदी वर्तमानपत्रात मराठी लेखक द.भि. कुलकर्णींच्या भाषणाचा वृत्तान्त वाचला. त्यात टिळकांचे नाव बालगंगाधर असे दिले होते. पुढच्या काही वाक्यांत तर ‘गंगाधर इतके मोठे असूनही त्यांच्यावर म्हणावी तितकी पुस्तके लिहिली गेली नाहीत’, असे द. भि. म्हणाले असल्याचे समजले. हे वाचून थक्क होण्यापलीकडे काय व्हावे?
  दुसर्‍या एका बातमीत सतीश शेट्टी हे पुण्याजवळच्या तालेगॉंव (तळेगांव) या उपनगरात सक्रिय होते, असे वाचले.
  मराठी वर्तमानपत्रांतही अमराठी लोकांची नावे अशीच विचित्र छापली जातात. त्यामुळे अशा गोष्टी कुणी गंभारपणे घेऊ नयेत.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या याच लेखावरील याआधीच्या उत्तरामधील स्पष्टीकरण आपल्या ह्या मुद्द्यालाही लागू व्हावे.

   {{मराठी वर्तमानपत्रांतही अमराठी लोकांची नावे अशीच विचित्र छापली जातात. त्यामुळे अशा गोष्टी कुणी गंभारपणे घेऊ नयेत.}}
   शुद्धलेखनाच्या चुका आम्ही फार गांभीर्याने घेत नाहीच. पण व्यक्तींच्या नावांत, ठिकाणांच्या नावात अधिकृत लेखनात किंवा प्रत्यक्ष, अधिकृत चर्चेत चुका करू नयेत. हिंदी मंडळींनी तेंडूलकरला त्यांच्या राज्याच्या हिंदी वर्तमानपत्रात तेंदूलकर म्हटले तर एकवेळ त्याकडे दुर्लक्ष करता येईल पण आमच्याच राज्यात इतरांशी बोलताना, रेडियो-दूरचित्रवाणीवर, अधिकृत कागदपत्रांत किंवा नावांच्या पाट्यांमध्ये तशा चुका होता कामा नयेत. त्यात रेलवे स्थानकांवरील पाट्यांवरील नावेदेखील आली.

   लेखनातील चुकून झालेल्या अपवादात्मक शुद्धलेखनाच्या चुकांना मात्र फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही इतपत आपले म्हणणे मात्र पटते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. बिन्दुमाधव अंबिके,

  सरळ आग लावायला सुरु करा. जीथे जीथे असा प्रकार दिसेल तीथे तीथे.

  उद्या हे गैर मराठी” ळ” चुक आहे ” ल” बरोबर आहे म्हणतील. मला एक कळत नाही. राजकारणी लोकांनी ह्या ६० वर्षात पुर्न मुंबईची व महाराष्ट्राची वाट लावून टाकली आहे. थोबाडीत मारुन घ्यायची वेळ आनली ह्या लोकांनी. आता तरी जागे होवून काही तरी करा म्हनावे. आपला च प्रांत आहे. कोन आडवनार आहे? चुका ताबडतोब दुद्रुस्त करा. एक राज ठाकरे थोडा दम दिसत आहे.

  • प्रिय श्री० प्रभाकर कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपल्या भावना समजू शकतो. (आपल्या पत्राचे थोडे संपादन केले आहे. त्यामागील आमच्या मर्यादाही समजून घ्याव्यात.)

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. महाराष्ट्रा तील प्रत्येक गावाचा सत्यानाश झाला आहे. पेटुन उठायला पाहीजे. बुध्दीवानांचा कट्टर द्वेश करत आहेत विनाकारण. त्यांनीच भारत भारतीय संस्क्रुती टीकवली. सगळी नावं मराठीत झालीच पाहीजेत. मराठीच भाषा बोलली पाहीजे महाराष्ट्रात. मराठी माणसालाच आधी मराठीचा स्वाभीमान पाहिजे.

  • प्रिय श्री० प्रभाकर कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपल्या तीव्र भावना समजू शकतो. शासनाच्या अशा नालायकपणामुळेच नखलवादी निर्माण होतात, हे सत्यच आहे. (आपल्या पत्राचे थोडे संपादन केले आहे. त्यामागील आमच्या मर्यादाही समजून घ्याव्यात.)

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s