“प्रगट आणि प्रकट (similar to manifestation in English) या दोन शब्दांच्या अर्थात काय फरक आहे?”
अमृतमंथन परिवारातील विद्वान मराठी मित्रांनो,
आपले एक जुने वाचकमित्र डॉ० उदय वैद्य यांनी विचारमंथनाच्या रिंगणात एक नवीन प्रश्न टाकला आहे. पहा आपल्याला त्यावर काय सुचवावेसे वाटते.
प्रश्न असा आहे:
—————
“प्रगट आणि प्रकट (similar to manifestation in English) या दोन शब्दांच्या अर्थात काय फरक आहे? दोन्ही शब्द बहुधा मोकळेपणाने, स्वैरपणाने (randomly) वापरले जातात. आणि जर का या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये काहीच फरक नसला तर या दोनांपैकी कुठला शब्द अधिक योग्य आहे?”
– डॉ० उदय वैद्य
——————
पुन्हा एकदा बाह्या सरसावा, मराठी-संस्कृत शब्दकोश हाती घ्या, पाने चाळा (हो, पण सावकाशीने, कोश जुने, खिळखिळे झालेले असणार). तसेच आजुबाजूच्या विद्वानांशी चर्चा करा आणि लागा डोके खाजवायला.
.
– अमृतयात्री गट
टीप: भाषा, साहित्य, कला, संस्कृती, परंपरा, विज्ञान, निसर्ग, इतिहास, सामान्य ज्ञान… अशा कुठल्याही विषयातील प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ आपण प्रस्थापित करूया. ह्या खेळाने आपल्या सर्वांच्याच ज्ञानात भर पडू शकेल. या खेळात जय-पराजय काहीच असणार नाही. सर्वांचाच जय कारण सर्वांनाच त्याचा फायदा व्हावा. आपल्या सूचना, आपले विचार या लेखाखालील रकान्यात मांडा, म्हणजे ते आपल्या सर्वच वाचकमित्रांना वाचता येतील.
आपल्यालासुद्धा असेच काही प्रशंसू (प्रश्न-शंका-सूचना) विचारमंथनासाठी मांडायचे असतील तर ते अवश्य amrutyatri@gmail.com या पत्त्यावर पाठवा. आपल्या उत्तरांची आणि नवीन प्रशंसूंची वाट पाहतो.
.
prakat: to suddenly appear
pragat: a group of some specialized persons
प्रिय श्री० अभिजित यांसी,
सप्रेम नमस्कार.
{{pragat: a group of some specialized persons}}
इंग्रजीच्या लंगड्या लिपीमुळे प्रगत आणि प्रगतमधील फरक स्पष्ट होत नाही. प्रगत हे विशेषण प्रगतीशील, प्रगती केलेला अशा अर्थाने वापरतात हे खरे आहे. पण प्रगट म्हणजे काय? तसेच त्यात आणि प्रकट मध्ये काय फरक आहे अशी डॉक्टर साहेबांची पृच्छा आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
संस्कृत शब्द प्रकट. त्यांतला धातू कट्(पहिला गण परस्मैपद), अर्थ वेढणे, व्यापणे. प्रकटणे किंवा प्रकट होणे म्हणजे एकाएकी दृष्यमान होणे. यांच अर्थांनी मराठीत अपभ्रष्ट रूप प्रगट(णे). हे रूप खूप जुने असल्याने रूढ म्हणून मराठीत वापरता येते. प्रकट(सं)=प्रगट(मराठी). Manifestation म्हणजे प्रकट करणे किंवा उघड करणे, म्हणजे प्रकटीकरण. या अर्थाचा प्रगटीकरण असा शब्द नाही.
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
पटण्यासारखे आहे. अपभ्रंशाबद्दल म्हणाल तर ’रक्त’चा रगत, हकीकत’चा हकीगत असे अपभ्रंश झालेले आहेतच.
आपल्या इतर मित्रांना काय वाटते. शुद्धमती ताईंचे म्हणणे पूर्णपणे पटते, काही प्रमाणात पटते की पूर्णपणे अमान्य आहे? याचा प्रतिवाद कोणाला करायचा आहे का? किंवा याबद्दल अधिक काही माहिती सांगायची आहे का?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
थोड्या विचारान्ती..प्रगटीकरण शुद्ध नसेल. पण रूढ असल्यास वापरणास प्रत्यवाय नसावा. जर डांबरीकरण चालते तर प्रगटीकरण का चालणार नाही?
संस्कृतमधल्या ‘क‘चे मराठीत ‘ग‘ होते असे काही शब्द : मुकुट-मुगुट, सकल-सगळा, भक्त-भगत, युक्ति-युगत, रक्त-रगत; तसेच प्रकट आणि प्रगट. मराठीत दोन्ही बरोबर.