भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान (ले० डॉ० इरावती कर्वे)

“ह्या योजनेने सर्व भाषांना सारखे स्थान मिळेल. कोणत्याही एका गटाचा भाषेमुळे फायदा होणार नाही. सर्वांचे शिक्षण भारतीय भाषांमध्येच होईल. शिक्षणक्रम सुटसुटीत होतील व सर्व देशाची लिपी एक झाल्यास बहुरूपी भारतीय संस्कृतीचा वाङ्मयाव्दारा आस्वाद घेण्यास सर्व भारतीयांना सोपे जाईल. घटक राज्यांत जवळजवळ सर्व नोकर्‍या त्या त्या भाषिकांना मिळतील. काही थोडे अपवाद होतील. पण इतरांना ज्या प्रांतात राहावयाचे, तेथील भाषा शिकावी लागेल.”

इरावती कर्वेंसारख्या विदुषींनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी सुचवलेले उपाय आजही विचारात घेण्यासारखे आहेत. प्रस्तुत लेख वाचकांनी खालील दुव्यावर प्रत्यक्षच वाचावा.

अमृतमंथन_भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान_ले० इरावती कर्वे_100704

प्रस्तुत लेख अमृतमंथन परिवारातील आपले वाचकमित्र श्री० विनय मावळणकर यांनी पाठवला आहे.

आपले विचार लेखाखालील रकान्यात अवश्य मांडा.

– अमृतयात्री गट

.

Tags: ,

.

22 thoughts on “भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान (ले० डॉ० इरावती कर्वे)

 1. “भारतातील भाषाविषयक प्रश्न जगातील अन्य देशाशी मिळतेजुळते नाहीत. भारतातील सर्व भाषांनी एकच लिपी वापरावी, म्हणजे भारतीय बहुभाषी होतील आणि त्यांच्यातला एकोपा वाढेल.” इरावती कर्व्यांच्या संपूर्ण लेखातून निघालेले हेच दोन निष्कर्ष आहेत.
  म्हणजे अगदी माझी मते! शालेय शिक्षणात फक्त तीन भाषा असण्याऐवजी किमान पाच भाषा असाव्यात, हेच माझे म्हणणे मी आजवर मांडले आहे.

  सर्व भाषांनी देवनागरी लिपी वापरावी अशी सूचना करणारे वाचकाचे एक पत्र सुमारे चाळीस किंवा अधिक वर्षांपूर्वी टाइम्समध्ये आले होते. त्यावर तुटून पडणारी पाच ते दहा बंगाली भाषकांची पत्रे मी वाचली आहेत. बंगाली भाषा देवनागरीत लिहिता येणे कसे अशक्य आहे अशा तर्‍हेचा बहुतेक पत्रांचा सूर होता. एकाने तर बंगाली भाषा देवनागरीत लिहिली तर ती भाषा अपवित्र(!) होईल असा मुद्दा मांडला होता. त्या काळात बंकिमचंद्र व शरच्चंद्र चटर्जींच्या मूळ बंगाली कादंबर्‍यांच्या देवनागरीत केलेल्या लिप्यंतरित पुस्तकांचे माझे वाचन चालू होते. त्यामुळे त्या बंगालीभाषक पत्रलेखकांचा मूर्खपणा मला उमजत होता. यावर उपेक्षेने हसण्यापलीकडे काही वेगळे करणे मला शक्य नव्हते.

  इरावती कर्व्यांची ही असली मते त्या काळी एखाद्या बंगाली क्रान्तिकारकाने वाचली असती तर भलताच अनर्थ झाला असता !

  ता. क. : इरावती कर्व्यांच्या लेखाआधी लाल अक्षरांत छापलेल्या मजकुरातला व्‌दारा हा शब्द द्वारा असा टंकायला हवा होता.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   पत्राबद्दल आभार.

   {{म्हणजे अगदी माझी मते! शालेय शिक्षणात फक्त तीन भाषा असण्याऐवजी किमान पाच भाषा असाव्यात, हेच माझे म्हणणे मी आजवर मांडले आहे.}}
   आपले म्हणणे योग्यच आहे. आज जगभरातील तज्ज्ञ हेच म्हणत आहेत. युरोपीय संघातही बहुभाषिकत्वाला खूप महत्त्व दिले जात आहे. युनेस्कोचा अहवालही हेच सांगतो. अर्थात या सर्वच जणांनी असे म्हणताना मातृभाषा सर्वश्रेष्ठ हे तत्त्व मात्र नेहमीच अधोरेखित केले आहे. शिवाय अनिवार्य म्हणून दोन किंवा तीन भाषा (मातृभाषेसह) व शक्य आहे त्यांनी अधिक भाषा शिकाव्यात असे ते म्हणतात.

   {{भारतातील सर्व भाषांनी एकच लिपी वापरावी, म्हणजे भारतीय बहुभाषी होतील आणि त्यांच्यातला एकोपा वाढेल.}}
   {{त्या काळात बंकिमचंद्र व शरच्चंद्र चटर्जींच्या मूळ बंगाली कादंबर्‍यांच्या देवनागरीत केलेल्या लिप्यंतरित पुस्तकांचे माझे वाचन चालू होते.}}
   भारत सरकारच्या सीडॅक सारख्या संस्थांनी भारतीय (सिंधी व उर्दू वगळता इतर) लिपींमधील मूलभूत गुणसाधर्म्य लक्षात घेऊन विकसित केलेल्या IISCI/ISFOC च्या संकेतप्रणालींवर आधारित यूनिकोडानुकूल (Unicode compatible) टंकव्यवस्था या अशा प्रकारचे लिप्यंतर सहज करून देतात. त्यामुळे एका भाषेतील विशिष्ट लिपीमध्ये लिहिलेला मजकूर दुसर्‍या भाषेत सहज वाचता येतो. आपल्यासारख्या उत्साही मंडळींना त्या सोयीचा शक्य असेल तिथे उपयोग करून घेता येईल. पण या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सुविधेबद्दल माहिती व तिच्या महत्त्वाबद्दलची कल्पना फारच थोड्यांना समजलेली आहे. या संकल्पनेचा प्रसार व्हायला हवा. त्याने राष्ट्रीय एकात्मतेस त्याने हातभारच लागेल.

   {{ता. क. : इरावती कर्व्यांच्या लेखाआधी लाल अक्षरांत छापलेल्या मजकुरातला व्‌दारा हा शब्द द्वारा असा टंकायला हवा होता.}}
   वाङ्मयाद्वारा हा शब्द का? आम्हाला तरी व्यवस्थित दिसतो आहे. यूनिकोड हाताळण्याच्या बाबतीत अजुनही वेगवेगळ्या सॉफ्टवेअरांच्या बाबतीत सुसंगतता/सुसूत्रता नसल्यामुळे अधिकार्‍याला/अधिकार्याला, विद्वान/विद्‌वान/विव्‌दान, गार्‍हाणे/गार्‌हाणे असे घोटाळे बर्‍याच वेळा होतात. ते सध्या तरी आपण समजून घेऊ. यूनिकोडच्या पुढच्या आवृत्तीमध्ये सुधारणा झाली आहे का ते पहावे लागेल.

   इरावती बाईंचे मुद्दे अधिक स्पष्टपणे विशद करून सांगितल्याबद्दल अत्यंत आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • वाङ्मयाद्वारा हा शब्द का? आम्हाला तरी व्यवस्थित दिसतो आहे. यूनिकोड हाताळण्याच्या बाबतीत अजुनही वेगवेगळ्या सॉफ्टवेअरांच्या बाबतीत सुसंगतता/सुसूत्रता नसल्यामुळे अधिकार्‍याला/अधिकार्याला, विद्वान/विद्‌वान/विव्‌दान, गार्‍हाणे/गार्‌हाणे असे घोटाळे बर्‍याच वेळा होतात. ते सध्या तरी आपण समजून घेऊ.

    शक्य आहे, पण पीडीएफ़्‌ फ़ॉर्‌मॅटमध्येही तो शब्द वाङ्मयाव्दारे असा दिसावा, हे एक आश्चर्य आहे.

    आणखी एक शंकास्पद शब्द. पुनर्टंकन. कानाला बरोबर वाटतो, कदाचित बरोबर असेलही. तरी पण थोडी शंका आहे. या शब्दांतले पुनर्‌ आणि टंकन हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत असे आपण धरून चालू या. संस्कृतच्या संधिनियमानुसार र्‌ नंतर ह खेरीज कोणतेही व्यंजन आले की र्‌ चा विसर्ग होतोच होतो. त्या नियमाने पुनर्‌+टंकित चे पुन:टंकित झाले. पुढच्या एका नियमाने विसर्गापूर्वी अकार आणि विसर्गानंतर कठोर व्यंजन आले की विसर्गाचा श, ष, स यांतला काहीतरी एक विशिष्ट वर्ण होतो. त्या नियमानुसार पुन:टंकितचे पुनष्टंकित व्ह्यायला पाहिजे. नक्की माहीत नाही. पुनर्टंकित हा शब्द कानाला जरी बरोबर वाटला तरी बुद्धीला खटकतो हे नक्की.

    न बाधते तथा माम्‌ हि यथा बाधति बाधते ।

 2. Dr. Mrs. Iravati karve was a highly educated and inspired writer in the first half of 20th century.
  Her article referred to here shows the foresight of Dr. Iravati Karve. Unfortunately our politicians of the present generation have changed the mentality of the masses so that we have today more fanatics in every sphere of social atmosphere in the country, in which no effort to consolidate the Indian States into a Confederation which will promote national integration will ever be possible.

  • प्रिय श्री० बाळ संत यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्यासारख्या ज्येष्ठांना डॉ० इरावती कर्वेंसारख्या थोर व विद्वान मंडळींचे महत्त्व अधिक योग्य प्रकारे ठाऊक असणार. आम्हाला वेळोवेळी आपल्यासारख्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

   आपल्याला वाटणारा खेद आम्ही समजू शकतो. आपण आजच्यापेक्षा कितीतरी अधिक चांगला अप्रदूषित (लाक्षणिक अर्थाने देखील) काळ पाहिला आहे. आमच्या चांगल्याच्या कल्पनेपेक्षाही आपला अनुभव अधिक शुद्ध, समृद्ध व उच्च दर्जाचा आहे. आम्ही त्यादृष्टीने हतभागीच. तरीही आम्हाला निदान स्वातंत्र्योत्तर काळातील पहिला पंचवीस वर्षांचा दुय्यम काळ तरी पाहता आला. त्या मानाने आजची तरूण पिढी अधिकच दुर्दैवी. आताचा काळ म्हणजे तर तिय्यमही नाही, स्वतः यमाचाच काळ म्हणावा लागेल. असो.

   इंग्रजांच्या ’फोडा आणि झोडा’ पद्धतीपेक्षाही आजच्या राजकारण्यांची पद्धत अधिक भयानक आहे. धर्म-जात-उपजात-वर्ग-भाषा-राज्य व अशा अनेक निकषांवर ते लोकांमध्ये दुही निर्माण करून आपापल्या मतपेढ्या (vote banks) बळकट करण्याच्या व स्वतःला सत्ता, पैसा, प्रसिद्धी मिळवून देणार्‍या मार्गांचा ते अवलंब करतात. देव (सदसद्‌विवेकबुद्धी), देश, धर्म (कर्तव्य) अशा कुठल्याही शुद्ध कल्पनांशी त्यांची बांधिलकी नसते. देवाला आपल्या काळ्या धंद्यात भागीदार करून अशा मिळकतीच्या एखादा टक्का देवकार्य म्हणून बुवांना व मंदिरांना देणग्या म्हणून दिला की त्यांची पापे धुवून जातात. देशप्रेमाच्या नावाखालीही ते पैसे खाण्याच्या योजनाच राबवतात. तसेच धर्म-कर्तव्य म्हणून गरीबांना मदतीच्या योजना आखून त्यांचेही स्वार्थी राजकारणच करतात.

   आपल्याला होणार्‍या तीव्र दुःखाची आम्ही कल्पना करू शकतो. स्वित्झरलंडमध्ये राहूनही डोळे व कान मातृभूमीसाठी आसुसलेले असणार्‍या व शक्य त्या सर्व प्रकारे देशासाठी व देशबांधवांसाठी कार्य करणार्‍या आपणासारख्या ज्येष्ठांना अमृतयात्री परिवाराच्या वतीने सादर प्रणाम.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. नमस्कार,
  डाक्टर कर्वेंनी भारताची इतर राष्ट्रांच्या तुलनेत वेगळी परिस्थिति फार चांगल्या रितीने उदाहरणां सोबत या विद्वत्तेपूर्ण लेखात स्पष्ट केलेली आहे. तसेच हिंदी चं इतर भारतीय भाषांशी तुलना करून हिंदी चे केन्द्रभाषा ठरविण्यातले कारण बेधड़क स्पष्ट केले। दुर्दैवाने त्यांचे एक ही पूर्वानुमान खरे ठरले नाही-
  -भाषा विषयक सगळ्याच योजना वादग्रस्त राहिल्या.
  -सर्व भाषान्ना अजूनही सारखे स्थान मिळाले नाही.
  -एका गटाचा नक्कीच फायदा झाल्याचे दिसून येते.
  -शिक्षणक्रमात गोंधळ आहेच.
  -एक लिपि सध्या तरी व्यवहारिक वाटत नाही.
  -भारतीय संस्कृतीचा आस्वाद घेण्यारान्नी विविध भाषांची लिपि शिकून घेतली (मी सुद्धा तमिल, तेलुगु, कन्नड़, मलयालम, बंगाली, मराठी, उर्दू, हिंदी यांत लिहित, वाचत असतो). हे सोपे नाही पण एक लिपि बने पर्यंत थांबण्या पेक्षा सोपेच आहे.
  -मी ज्या-ज्या प्रान्तांत राहिलो तिथली भाषा शिकलो पण सर्व साधारण पणे अजून ही असे होत नाही। मराठी माणसांत स्थानिक भाषा शिकण्याचा उत्साह कमी असतो (विशेष करून दक्षिणांत). बाहेरून आलेले मात्र लवकर मराठी शिकतात.
  -घटक राज्यांत जवळ-जवळ सर्व नोकर्या त्या-त्या भाषिकान्ना अजूनहि मिळत नाही. प्रामुख्याने महाराष्ट्रात. याचे उलट ही खरे आहे. कित्येक विशिष्ट (केंद्रीय)नोकर्याँ साठी मराठी माणसं पुढे येत नाहीत. म्हणून महाराष्ट्र, गुजरात, नार्थ-ईस्ट अश्या राज्यांत सेन्ट्रल व उपक्रमांत बाहेरची माणसं जास्त दिसतांत।

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले सर्व निष्कर्ष खरेच आहेत.

   महाराष्ट्रातील परिस्थिती अपवादात्मक आहे याला कारण म्हणजे महाराष्ट्रीय माणसांची अपवादात्मक स्वाभिमानशून्यता व त्यांचा न्यूनगंडग्रस्त स्वभाव. त्याला काय औषध आहे?

   भाषा शिकण्याच्या बाबतीत मात्र मराठी मागे आहेत असे आम्ही म्हणणार नाही. जिकडे गरज पडते तिकडे म्हणजे बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, गुजराथ इत्यादी ठिकाणी मराठी माणसांनी स्थानिक भाषा व संस्कृतीशी व्यवस्थितपणे जुळवून घेतलेले आढळले. केवळ हिंदी भाषिकच आपली भाषा ही राष्ट्रभाषा आहे अशा खोट्या गर्वापायी परकी भाषा शिकण्याचे टाळतात. अर्थात महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी त्यांची डाळ फार शिजत नाही, ही गोष्ट वेगळी.

   भारतीय लिप्यात्मक एकात्मतेविषयी श्रीमती शुद्धमती राठी यांच्या पत्राच्या उत्तरादाखल आजच मांडलेले काही विचार कृपया पहावेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   {{। दुर्दैवाने त्यांचे एक ही पूर्वानुमान खरे ठरले नाही}}
   ते आपल्यादेशाचे मोठेच दुर्दैव खरे. संपूर्ण जगभरात मान्य असलेली स्वाभिमानविषयक मूलतत्त्वेदेखील आपल्या जनतेला (विशेषत: समाजात अधिक प्रभावी ठरणार्‍या मूठभर जनतेला) पटत नाहीत. ब्रिटिशसत्तेपेक्षाही अधिक दास्यवृत्ती आज बळावलेली दिसते. स्वार्थी राजकारणीही त्यालाच खतपाणी घालतात. बहुजनांचे, सर्वसामान्यांचे हित साधण्यात कोणाला रस आहे? आणि याला लोकशाही असे नावदिले जाते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. >>जिकडे गरज पडते तिकडे म्हणजे बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, गुजराथ इत्यादी ठिकाणी मराठी माणसांनी स्थानिक भाषा व संस्कृतीशी व्यवस्थितपणे जुळवून घेतलेले आढळले.<<

  गरज पडल्यावर जुळवून न घेऊन कुणाला सांगणार? गरज न पडताही इतर भारतीय भाषा शिकल्या तरच आपण खरे!

  संगणकावरील युनिकोडित टंकलिखित संहितेचेच केवळ आपण बर्‍यापैकी लिप्यंतर करू शकतो. ते लिखाण जर पीडीएफ़ किंवा तत्सम अन्य स्वरूपात असेल तर त्याचे लिप्यंतर करता येणार नाही, त्यामुळे आंतरजालावरील परलिपींतील पुस्तके आपण वाचू शकणार नाही हे उघड आहे. युनिकोडचा तसा खास फायदा नाही.

  इंग्रजीतल्या Uni ने आरंभ होणार्‍या शब्दाचा अस्सल इंग्रजी उच्‍चार यूनि– असा होतो. (अन्‌आय्‌डेन्टिफ़ाइडसारखे अपवाद सोडले तर..) पण त्या शब्दाचे मराठीकरण झाले की उच्‍चार युनि हाच होतो. त्यामुळे युनिव्हर्स, युनिव्हर्सिटी, युनायटेड बॅंक या मराठी शब्दांतली यु र्‍हस्व आहे. ज्या‍अर्थी युनिकोडित, युनिकोडचा असे शब्द बनतात, त्याअर्थी युनिकोड हा मराठी शब्द आहे. मराठी शब्दातली उपान्त्यपूर्व अक्षरे नेहमी र्‍हस्व असतात, या नियमाने युनिकोड/युनिकोडित यां शब्दांमधला यु र्‍हस्वच पाहिजे. दीर्घ लिहिला तर तो शब्द इंग्रजी ठरेल आणि त्याला इत प्रत्यय लावून त्याचे कर्मणि भूतकालवाचक विशेषण करता येणार नाही.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   {{पण त्या शब्दाचे मराठीकरण झाले की उच्‍चार युनि हाच होतो. त्यामुळे युनिव्हर्स, युनिव्हर्सिटी, युनायटेड बॅंक या मराठी शब्दांतली यु र्‍हस्व आहे.}}
   या संबंधीच्या नियमाचा संदर्भ समजू शकेल काय?

   महाराष्ट्र शब्दकोशात (दाते-कर्वे – पृष्ठ २५६७) खालीलप्रमाणे उल्लेख आढळला.
   यू(यु)रोपियन – वि. यूरोप खंडातील; यूरोप खंडासंबंधी; [इं.]

   आदर्श मराठी शब्दकोश (प्र० न० जोशी – पृ० १००९) यातही वरीलप्रमाणेच उल्लेख आहे. शिवाय अशीही एक नोंद आहे.
   यूनिट – (पु) १ एक, एकांक, एकम्‌ २ व्यक्ती, व्यष्टी, एकबीज ३ मूलमान, मूलपरिमाण ४ मापन, परिमाण [इं]

   आणखी कोश चाळत नाही. याहून अधिक श्रम व वेळ खर्च करण्यात अर्थ नाही.

   क०लो०अ०

 5. नमस्कार,

  देवनागरी लिपीत बंगाली, तेलुगु, तमिल, मलयालम इत्यादि लिहिता येत नाहीत। त्या भाषांतले उच्चारणाचे विविध प्रकार हे याचे कारण। या भाषांच्या तुलनेत देवनागरीतले वर्णाक्षर देखील अपुरे आहेत। मराठी ला हा प्रश्न कधी आला नाही म्हणून सहजासहजी लक्षात येणार नाही।
  बंगालीत ‘দেয়া’ याचं लिप्यान्तरण ‘देया’ असे होइल, याचे काही अर्थ नाही ते जवळपास ‘द्यावा’ असे व्हायला पाहिजे। ‘বাদ দিয়েছি’याचा ‘वाद दियेछी ‘ होईल जे चुकीचे आहे, तर ते ‘बाद दियेछी ‘ असे व्हायला पाहिजे। ‘মতো’ याचे ‘मतो’ असे होईल वास्तविक ते जवळ पास ‘मोतो’ आहे। तमिल च लिप्यान्तरण केलं तर अक्षरशः परिहास होईल। तसेही चांगलेच हसणं होईल।

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   आम्हाला एवढ्या भाषा अवगत नाहीत. पण अंदाजाने (ठामपणे सांगत नाही) असे वाटते की हा लिपीपेक्षाही त्या भाषेतीलौच्चार पद्धतीचा दोष असावा. एकच स्पेलिंग असूनही त्याच शब्दाचा उच्चार बर्‍याच वेळा इंग्रज, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन हे वेगवेगळ्या प्रकारे करतात त्याला ती बिच्चारी लिपी काय करणार?

   इंग्रजांना तर त, द, ध असे काही उच्चार जमतच नाहीत. फ्रेंचांना ते जमतात.

   जर्मन मध्ये Y चा उच्चार ज असा होतो. म्हणजे तोच शब्द (अगदी विशेषनामही) ते वगळ्या पद्धतीने उच्चारतात. याकूब-जेकब, युसूफ-जोसेफ या नावांमधील साम्य हा योगायोग नव्हे.

   भारतीयांच्या फ’चा आणि इंग्रजांच्या फ’चा उच्चार वेगळाच असतो. आपला ळ आणि मलयाळममधील ळ (काहीसा ळ्य सारखा) हे थोडे भिन्न असतात असे वाटते.

   सिंहासन या शब्दाचा मराठीत उच्चार आपण लिहिल्याप्रमाणे सिंव्‌हासन असा काहीसा करतो. पण बंगाली, हिंदी मंडळी त्याचाच उच्चार सिंघासन (सिङ्‌घासन) असा करतात. त्यांच्या दृष्टीने (हिंदी लोक देवनागरीमध्येच लिहित असले तरीही) त्या शब्दाचा लिहिल्याप्रमाणे उच्चार तसाच आहे. आता याला कोण काय करणार?

   कलकत्त्यामध्ये ’बॉम्बे भेल’ असे दुकानाचे नाव असले तर त्याच्या पाटीवर इंग्रजीमध्ये ’Bombay Vel’ असे लिहिलेले असते. कारण w चा उच्चार ते (बंगाली) ब असा व v चा उच्चार भ असाच करतात. सौरव (गांगुली) हा शब्द सौरभ (संस्कृत – सुवासिक) या शब्दावरूनच आला आहे. आमच्या एका World History च्या बंगाली प्राध्यापकाला कुठल्याही संस्कृतीचे वर्णन करताना views, values and virtues असे शब्द नेहमी वापरण्याची सवय होती. त्याचे उच्चार तो भ्यूज, भालूज ऍण्ड भाच्चूज असे करीत असे. आता त्यात रोमीलिपीचा काय दोष? जोडाक्षरे उच्चारताना बंगाल्यांची बोबडी वळते. राक्षस’चा उच्चार ते राक्कोस असा काहीसा करतात. म्हणूनच त्यांचे उच्चार बोबडे वाटतात. (पु० ल० देशपांडेंचे यावरील विनोदी भाष्य आठवत असेलच.) तमिळमध्ये क-ख-ग-घ, च-छ-ज-झ, प-फ-ब-भ एवढी वेगवेगळी व्यंजनेच नाहीत. बरीच कमी आहेत. (आपल्या नक्की माहित असणार.) मग ख साठी लिहिलेल्या व्यंजनाचा कोणी क असा करते. भात चा उच्चार ते बाथ असाही करतात. भारत चा उच्चार बारथ असाही करतात. मूर्ती चा उच्चार मूर्थी असाही केला जातो. शंकर-संकर, गणपती-गणपथी असे बरेच गोंधळ या दक्षिणी भाषांत असतात.

   म्हणजे शेवटी हा लिपीचा नाही तर त्या भाषेतील उच्चारपद्धतीचा दोष (किंवा वैशिष्ट्य) म्हणावा लागेल.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   आम्हाला एवढ्या भाषा अवगत नाहीत. पण अंदाजाने (ठामपणे सांगत नाही) असे वाटते की हा लिपीपेक्षाही त्या भाषेतीलौच्चार पद्धतीचा दोष असावा. एकच स्पेलिंग असूनही त्याच शब्दाचा उच्चार बर्‍याच वेळा इंग्रज, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन हे वेगवेगळ्या प्रकारे करतात त्याला ती बिच्चारी लिपी काय करणार?

   इंग्रजांना तर त, द, ध असे काही उच्चार जमतच नाहीत. फ्रेंचांना ते जमतात.

   जर्मन मध्ये Y चा उच्चार ज असा होतो. म्हणजे तोच शब्द (अगदी विशेषनामही) ते वगळ्या पद्धतीने उच्चारतात. याकूब-जेकब, युसूफ-जोसेफ या नावांमधील साम्य हा योगायोग नव्हे.

   भारतीयांच्या फ’चा आणि इंग्रजांच्या फ’चा उच्चार वेगळाच असतो. आपला ळ आणि मलयाळममधील ळ (काहीसा ळ्य सारखा) हे थोडे भिन्न असतात असे वाटते.

   सिंहासन या शब्दाचा मराठीत उच्चार आपण लिहिल्याप्रमाणे सिंव्‌हासन असा काहीसा करतो. पण बंगाली, हिंदी मंडळी त्याचाच उच्चार सिंघासन (सिङ्‌घासन) असा करतात. त्यांच्या दृष्टीने (हिंदी लोक देवनागरीमध्येच लिहित असले तरीही) त्या शब्दाचा लिहिल्याप्रमाणे उच्चार तसाच आहे. आता याला कोण काय करणार?

   कलकत्त्यामध्ये ’बॉम्बे भेल’ असे दुकानाचे नाव असले तर त्याच्या पाटीवर इंग्रजीमध्ये ’Bombay Vel’ असे लिहिलेले असते. कारण w चा उच्चार ते (बंगाली) ब असा व v चा उच्चार भ असाच करतात. सौरव (गांगुली) हा शब्द सौरभ (संस्कृत – सुवासिक) या शब्दावरूनच आला आहे. आमच्या एका World History च्या बंगाली प्राध्यापकाला कुठल्याही संस्कृतीचे वर्णन करताना views, values and virtues असे शब्द नेहमी वापरण्याची सवय होती. त्याचे उच्चार तो भ्यूज, भालूज ऍण्ड भाच्चूज असे करीत असे. आता त्यात रोमीलिपीचा काय दोष? जोडाक्षरे उच्चारताना बंगाल्यांची बोबडी वळते. राक्षस’चा उच्चार ते राक्कोस असा काहीसा करतात. म्हणूनच त्यांचे उच्चार बोबडे वाटतात. (पु० ल० देशपांडेंचे यावरील विनोदी भाष्य आठवत असेलच.) तमिळमध्ये क-ख-ग-घ, च-छ-ज-झ, प-फ-ब-भ एवढी वेगवेगळी व्यंजनेच नाहीत. बरीच कमी आहेत. (आपल्या नक्की माहित असणार.) मग ख साठी लिहिलेल्या व्यंजनाचा कोणी क असा करते. भात चा उच्चार ते बाथ असाही करतात. भारत चा उच्चार बारथ असाही करतात. मूर्ती चा उच्चार मूर्थी असाही केला जातो. शंकर-संकर, गणपती-गणपथी असे बरेच गोंधळ या दक्षिणी भाषांत असतात.

   म्हणजे शेवटी हा लिपीचा नाही तर त्या भाषेतील उच्चारपद्धतीचा दोष (किंवा वैशिष्ट्य) म्हणावा लागेल.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 6. अपभ्रंशोद्भवित प्रत्येक भाषेत गुण-दोष आहेतच. ‘कृषि’ याला हिंदी व बंगाली ‘क्रिषी’ असे उच्चारतांत तर मराठी व तेलुगु भाषिक ‘क्रुशी’ असे म्हणतांत। हिंदी भाषिक ‘कमल’ म्हणतांत, मराठी ‘कमळ’ तर बंगाली ‘कोमोल’ म्हणतांत। आता कोणते बरोबर आहे? संस्कृत ‘संस्क्रुत’ आहे की ‘संस्क्रित’ आहे? असो, हा केवळ उच्चारणाचा प्रश्न आहे।
  बंगालीत ‘तद्सम’ शब्दांचा उच्चार दोषपूर्ण मानले तरी ‘तद्भाव’ चे देवनागरीत लिहिण्यासाठी आवश्यक त्याग करायला ते तयार होतील काय? बंगालीत काही अक्षरं ‘साइलेंट’ असतांत पण देवनागरीत नाही। इंग्रजीतलं ‘Can’ हे मराठीत आणि बंगालीत लिहिता येते पण देवनागरीत? ‘मलयाळम’ देवनागरीत लिहिता येइल पण ‘अल्लेप्पी’ च ‘ल’ नाहीच देवनागरीत. तमिल मधलं ‘गांधी’ हे देवनागरीत ‘कांती’ असे लिहिता येइल पण ‘kinimozi’ च ‘ल’, ‘तमिल’ मधला ‘ल’ नाही देवनागरीत. तेलुगु, कन्नडा, मलयाळम मध्ये ‘ए’ व ‘ओ’ या स्वराचे र्हस्व आणि दीर्घ असे प्रकार असतांत आणि चांगलेच वापरले जातात. देवनागरीत हे नाहीच। देवनागरीत ‘र’ चा एकच प्रकार आहे। तमिल, मलयाळम मध्ये त्याचे दोन प्रकार आहेत व चांगल्या पैकी वापरल्या जातात। एका ‘र’ चं ‘र’ वर ‘र’ देऊन युक्ताक्षर केलं की ट असं पण होतं। हिंदीत ‘cash’ च ‘कैश’ असं लिहितांत कारण उचित स्वर नाही देवनागरीत। मराठीत असं लिहिलेलं चालेल काय?
  देवनागरीत अधिक स्वर-व्यंजन जोडून जरी लिपि समृद्ध केली, तरी शेकड़ों वर्षां पासून वापरात असलेली आपली लिपि सोडायला कोण तयार होईल?

 7. नमस्कार
  येथे भाषे संबंधित चर्चा खुप माहितीपुर्ण आहे. भारतीय भाषा भगिनी व सर्वच भारतीय लोकांत समन्वय साधण्यासाठी भारतीय भाषांचा प्रभावी प्रयोग सर्वच स्तरावर होणे आवश्यक आहे. मध्यंतरी सन्डे वीकलीत इंग्रजी ही राष्ट्रभाषा करावी का या बद्दल लेख वाचला होता. इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा व व्यवहाराची भाषा झाली आहे. इंग्रजीचा प्रसार प्रचार सर्वच राज्य सरकार व भारत सरकार सुध्दा करीतच आहे. भारतीय भाषा भगिनीत नेहमीच वाद होत आहेत. अशा वेळी कधी कधी वाटते की सरकारने इंग्रजी ही राष्ट्रभाषा आहे असे घोषित करावे. यामुळे भारतीय भाषेतील सर्वच वाद निकालात निघतील. असे काही विद्वान आता जाहिरपणे बोलत आहेत. काय करावे?

  • प्रिय श्री० विजय प्रभाकर कांबळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   सध्याची विपरीत परिस्थिती पाहून आपल्यासारखे कोणालाही बुचकळ्यात पडायला होईल. भारताची राज्यघटना, परिशिष्ट-८ (यात इंग्रजी भाषेचा अंतर्भाव नाही), भाषिक कायदे, विविध तज्ज्ञ समित्यांचे अहवाल इत्यादी पाहता इंग्रजी भाषेला राष्ट्रभाषा करणे म्हणजे त्या सर्वांच्याच मूलतत्त्वाच्या अगदी विरुद्ध आचरण होईल. राज्यघटनेने सांगितल्याप्रमाणे सर्व भारतीय भाषांची समृद्धी साधणे, प्रत्येक राज्यामध्ये संबंधित भाषा सर्वोच्च मानली जावी पण हिंदी भाषा ही सर्व भाषांमध्ये सेतुभाषा म्हणून विकसित करणे हा आदर्श उपाय. पण भारतातील सध्याची व्यावहारिक परिस्थिती पाहता ते जमेल किंवा नाही याबद्दल शंका वाटते हे खरेच.

   आधी अनेक वेळा उद्धृत केलेला परिच्छेद पुन्हा वाचून पाहूया.

   {{कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षणात कानडी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या रिट याचिकेत राज्य शासनाची बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘कोणाला आवडो अथवा न आवडो, परंतु या देशात भाषावार राज्यरचना व्यवस्थित प्रस्थापित झाली आहे. अशा भाषावार राज्यरचनेचा उद्देश असाच आहे की प्रत्येक राज्यातील लोकांची त्यांच्या राज्यातील भाषेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे.’}}

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 8. मराठीत भाषेत कृषि ला क्रुशी म्हणतात, हे नव्यानेच समजले. कमल, कमळ हे दोन्ही बरोबर, पहिला संस्कृत-हिंदी-बंगाली इ. आणि दुसरा मराठी. बंगालीतही ‘कमल‘ असेच लिहितात, कोमल नाही.. इरावतीबाईंनी देवनागरीत लिहावे असा विचार मांडला होता. उच्चार कसा करावा याचा नाही. इंग्रजी भाषा एकाच रोमन लिपीत लिहिली जाते, उच्चार देशोदेशी आणि प्रांतोप्रांती वेगळे होतात.युरोपातल्या बहुतेक भाषा रोमनमध्ये त्यांच्यात्यांच्यापुरत्या सुधारणा करून लिहिल्या जातात. देवनागरीला हे का अशक्य आहे?
  हिंदीत कॅन हा शब्द कैन असा लिहितात. कारण हिंदीत मराठीसारखा ऐचा, अइ/आइ हा उच्चार नाही. (क्वचित संस्कृत शब्दांसाठी तसला ऐ ऐकू येतो, एरवी नाही.) कैन लिहूनही उच्चार कॅन असाच होतो. म्हणूनच हिंदी बैंकचा उच्चार बॅङ्‌‌क होतो, बैंक असा नाही. उलट हिंदीत मराठीसारखा चंद्रबिंदू काढून तो शब्द लिहिला तर उच्चार ब‍अङ्‌क असा नाकातल्या नाकात होईल. त्यामुळे हिंदीत कॅश लिहायला उचित स्वर नाही हे म्हणणे योग्य नाही.
  अलेप्पीला हल्ली अळ्हापुळ्हा म्हणतात. मराठी त हा शब्द छान लिहिता येतो.
  जगातल्या कुठल्याही भाषेचे उच्चार साधारणपणे दुसर्‍या भाषेच्या लिपीत लिहिता येतीलच याची खात्री नसते. इंग्रजी टी, व्ही या मुळाक्षरांचे उच्चार आपण मराठीत लिहू शकत नाही. Little चा नाही. फ़्रेन्च-जर्मनचे उच्चार तर सोडूनच द्या.

  उर्दूत पाच ज, ३ स, २ त, २ ह, २ द आणि २ अ आहेत. ऋ, घ, छ, झ, थ, ढ, ध, ष, ळ, क्ष, ज्ञ ही अक्षरे नाहीत. म्हणून काय उर्दूत विज्ञानाची पुस्तके नाहीत?
  भारताच्या प्रत्येक भाषेतल्या प्रत्येक अक्षरासाठी युनिकोड फ़ॉन्टमध्ये सोय आहे. संस्कृतमध्ये अठरा अ आणि तितकेच इ, उ आणि ऋ आहेत; शिवाय प्रत्येकी १२ ए-ओ-ऌ आहेत. सर्वांची सोय आहे. युनिकोडमध्ये य़, ऱ, ऴ, व़ , ऎ, ऒ, आणि अशी अनेक अक्षरे आहेत. त्यामुळे मलयाळम्‌सकट सर्व भारतीय भाषा मराठी लिपीत सुखेनैव लिहिता येतात. मात्र, परदेशी भाषा लिहिता येतीलच असे नाही. –शुद्धमती

 9. >>महाराष्ट्र शब्दकोशात (दाते-कर्वे – पृष्ठ २५६७) खालीलप्रमाणे उल्लेख आढळला.
  यू(यु)रोपियन – वि. यूरोप खंडातील; यूरोप खंडासंबंधी; [इं.]

  आदर्श मराठी शब्दकोश (प्र० न० जोशी – पृ० १००९) यातही वरीलप्रमाणेच उल्लेख आहे. शिवाय अशीही एक नोंद आहे.
  यूनिट – (पु) १ एक, एकांक, इत्यादी.

  रस्त्यावरच्या पाट्या पाहिल्या तरी ध्यानात यावे. हिंदीतली यूनियन बैंक मराठीत युनियन बॅंक असते. कामगारांची यूनियन कधी ऐकली नसेल.
  इंग्रजीच्या प्रमाण उच्चारकोशांत Europe चा युअरप्‌ किंवा ‍यॉsरप्‌ असे उच्चार दिले आहेत. त्यांतला दुसरा उच्चार हिंदीभाषक अगदी आवर्जून करतात. मराठीभाषक युरोप असा. European चे अधिकृत उच्चार युअरपीअन्‌, योsरपीअन्‌ किंवा यॉsरपियन्‌. दाते-कर्व्यांनी दिलेला यु(यू)रोपियन कुठेच नाही. Unitचा इंग्रजी उच्चार यूनिट आहे, हे सर्वांना माहीत आहे, पण मराठीत आल्यानंतर त्याचे लेखन युनिट असेच व्हायला पाहिजे. महामंडळाच्या चौदाव्या नियमानुसार Dictionary हा शब्द शब्दकोशात देताना डिक्शनरि असा दिला असतो. तसेच सर्व इंग्रजी तांत्रिक शब्दांचे लिंग नपुंसकलिंगी असते असे महाराष्ट्र सरकारच्या कोशांत सांगितले आहे. आपण या गोष्टी पाळू? संस्कृत र्‍ह्स्वान्त शब्द मराठी शब्दकोशात र्‍हस्वान्त देतात, पण मराठीत लिहिताना पाचव्या नियमान्वये दीर्घान्त लिहितात. Police शब्दकोशात पलीस्‌ असतो, लेखनात पोलीस-पोलिसांना. संस्कृत नीलकंठ मराठीत निळकंठ असाच लिहिला पाहिजे. मराठीकरण झालेल्या शब्दातली उपान्त्यपूर्व अक्षरे र्‍हस्व उच्चारायची आणि लिहायची असा नियम आहे. त्यामुळे यूनिव्हर्सिटी, यूनिट, यूनियन, यूनिकोड हे अशुद्ध आणि तेच शब्द जर यू र्‍हस्व करून लिहिले तरच शुद्ध, हे निर्विवाद.
  ता. क. युरोपियन शब्दातला यू इंग्रजीतही दीर्घ नाही, दाते-कर्व्यांना कुठून मिळाला?

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   {{पण त्या शब्दाचे मराठीकरण झाले की उच्‍चार युनि हाच होतो. त्यामुळे युनिव्हर्स, युनिव्हर्सिटी, युनायटेड बॅंक या मराठी शब्दांतली यु र्‍हस्व आहे.}}
   आपण वरील विधान ज्याप्रकारे ठासून लिहिलेत त्या वरून तसा एखादा भाषानियम आपणास माहित असावा असे वाटले म्हणून त्याचा संदर्भ विचारला होता. आम्ही शब्दकोश पाहिल्यावर त्याविरुद्ध उल्लेखही मिळाले म्हणून ते उद्धृत केले. अर्थात शब्दकोशांपेक्षाही रस्त्यावरील पाट्या ह्याच प्रमाणित मानायच्या असल्यास बोलणेच खुंटले. रस्त्यावरील पाट्यांवरून एकाच शब्दाचे विविध प्रकारचे शुद्धलेखन व अनेक प्रकारचे उच्चार होऊ शकतात. हा प्रकार इंग्रजी शब्दांच्या बाबतीत तर अधिकच विचित्र असतो. निरनिराळ्या देशांत, राज्यांत, समाजात बोली उच्चार भिन्न असतात म्हणून आतापर्यंत अशा बाबतीत संशय वाटल्यास आम्ही शब्दकोश (त्या त्या भाषेतील) पाहत होतो. असो. मूळ लेखाशी संबंद्ग नसलेल्या या मुद्द्यावर अधिक वेळ, शक्ती, डोके खर्च करण्यात अर्थ नाही.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 10. सप्रेम नमस्कार,

  माझे अभिप्राय वाचून मत दिल्याबद्दल शुद्धमती ताईंचे आभार. आपण म्हणता तसे आपल्या भाषेतील शब्दांचे उच्चारण आपल्याला माहीत असल्याने ते इतर कोणत्याही भाषेच्या लिपीत कसे तरी (आवश्यक स्वर/ व्यंजन नसतांना ही) लिहून आपण वाचू शकतो न समजू ही शकतो, खरे. पण आपली भाषा अवगत नसलेल्यान्नी ते कसे वाचावे न समजावे. काही काळ अगोदर घडलेली एक गमतीदार गोष्ट सर्व प्रबुद्ध वाचकांच्या नक्कीच लक्षांत असेल. ‘अज़गिरी’ की ‘अलागिरी’ हा एक मोठा वाद उद्भवला. ब्लॉगसाईट वर किंवा कुठल्या रस्त्यावर नव्हे, खुद्द पार्ल्यामेंट मधेच. वाद संपवायला ‘azagiri’ चे ‘alagiri’ केले गेले पण हा तोडगा नाही कारण तमिळ लिपीत/ भाषेत असा ‘ळ’ आहे ज्याचा इंग्रजीत/ देवनागरीत समरूप नाही. तमिळ बोलणारे ‘azagiri’ ला बरोबर वाचातांत व उच्चारातांत पण तसला ‘ळ’ देवनागरीत ही नसल्यामुळ कित्येकांना ते कसे बोलायाचे ठाऊक़ नाही. तुम्ही म्हंटलेलं ‘azappuza(अळप्पुळ)’ (इंग्रजांनी त्याला ‘अलेप्पी’ केले) यांतला ‘ळ’ देखील तसाच आहे. तो आपल्या मराठीतल्या ‘ळ’ सारखा नाही (कोणतेही मलयाळम शिकवणारे पुस्तक पहावे) परन्तु हा ‘तमिळ’ व ‘अळगिरी’ च्या ‘ळ’ सारखा आहे. असे हज़ारो उदाहरण आहेत. मलयाळम मधे आहेत एवढे स्वर, व्यंजन, युक्ताक्षर क्वचितच दुसर्या भारतीय भाषेत असतील. त्यामुळ मलयाळम बोलणारे मूल द्रविड़ी किंवा मूल संकृत असे सर्वच शब्द उचित रित्या ल्हितांत, वाचातांत व बोलातांत (उच्चारण चा दोष वगळता). एवढेच काय, इन्ग्रजीतले शब्द देखील लिहायला मराठी पेक्ष मलयाळम मधे जास्त सोयीस्कर असते. उदाहरणार्थ इन्ग्रजीतले ‘pen’ किंवा ‘pain’ दोन्ही मराठीत लिहितांना एक सारखेच लिहावे लागतांत कारण मराठीत ‘ए’ या स्वराचे र्हस्व आणि दीर्घ असे दोन प्रकार नाहीत. असे अनेक उदाहरण आहेत. असो.

  केवळ आपणच आपली भाषा लिहायची किंवा वाचायची असेल तर कशासाठी हवी आहे एक सामान्य (common) लिपि?

 11. महामंडळाचा शुद्धलेखन नियम क्रमांक ८ असा आहे. : उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा इकार-उकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी र्‍हस्व लिहावा. उदाहरणार्थ, ‘गरीब‘चे सामान्यरूप गरिबा, सूनचे सुने, वगैरे. या नियमाचे स्पष्टीकरण देताना पुढील उपनियम सांगितला जातो. तो असा : अस्सल मराठी शब्दातला उपान्त्य इकार-उकार र्‍हस्व असतो.
  अशाच प्रकारे, महामंडळाच्या अनेक नियमांना स्पष्टीकरण लागते. उदाहरणार्थ नियम पहिला: स्पष्टोच्चारित अनुस्वाराबद्दल शीर्षबिंदू द्यावा. (स्पष्टीकरण : असा अनुस्वार दिलेल्या अक्षरांच्या वेलांट्या किंवा उकार र्‍हस्वच असतात.)
  नियम ५ वा : तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावेत.(स्पष्टीकरण : शब्दकोशात देताना ते मुळात होते त्यामाणेच र्‍हस्व वा दीर्घ द्यावेत.)
  मराठीत अनेक शुद्धलेखनतज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत केलीत की आपल्या बर्‍याच शंका दूर होतील.

 12. […] भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान (ले० ड… –}} https://wp.me/pzBjo-ou […]

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s