तमिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण (वृत्त: दै० डेक्कन क्रॉनिकल, २० फेब्रु० २०१०)

तमिळ भाषेचे संवर्धन करणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण स्वतःच्या मातृभाषेत सुलभतेने शिकणे शक्य व्हावे या हेतुने तमिळनाडू राज्यशासनाने व्यावसातिक अभ्यासक्रम तमिळ भाषेत उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.

या बाबतीत जपानसारख्या देशांचा दाखला देऊन “कुठलाही विषय स्वतःच्या मातृभाषेत शिकल्यास तो सहजच अधिक चांगला समजतो” असे मत व्यक्त केले गेले.

अर्थात हे तत्त्व भारत वगळता जगातील इतर सर्वच देशातील शिक्षणतज्ज्ञांच्या मताला धरूनच आहे.

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील बी०ए०, एम०ए० साठीचे जवळ-जवळ सर्वच अभ्यासक्रम स्थानिक भाषेच्या माध्यमातून तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा राज्यांत आधीपासूनच उपलब्ध आहेत.

श्री० राममोहन खानापूरकर यांनी पाठवलेली दैनिक ’डेक्कन क्रॉनिकल’ मधील मूळ इंग्रजी बातमी अशी आहे:

Medical, B.E. courses in Tamil

Deccan Chronicle, February 20th, 2010
By DC Correspondent

.

Chennai: In an effort to promote Tamil language and help rural students pursue engineering and medical courses in their mother tongue, the Tamil Nadu government has taken steps to impart professional education in Tamil.

.

Addressing students and faculty during Anna University’s 30th annual convocation on Friday, higher education minister Dr K. Ponmudy said that the state government is taking steps to teach engineering and medical courses in the state language as it’s being done in countries like Japan.

.

“We are not averse to imparting education with English as medium, but teaching subjects in a person’s mother tongue will help him understand subjects better,” he said.

.

आपली मते लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवावीत.

– अमृतयात्री गट

.

32 thoughts on “तमिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण (वृत्त: दै० डेक्कन क्रॉनिकल, २० फेब्रु० २०१०)

 1. तमिळनाडूमध्ये तमिळमधून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिकवणार हे वाचून उगीच हुरळून जाऊ नये. तांत्रिक विषय मातृभाषेतून शिकताना सर्वनामे, प्रत्यय, शब्दयोगी अव्यये, क्रियापदे आणि अशा काही वाक्यरचनाच फ़क्त मातृभाषेतील असतील. सगळे तांत्रिक शब्द इंग्रजीच असणार. प्रतिदिवशी निर्माण होणार्‍या वैद्यकीय शब्दांना तमिळ प्रतिशब्द अस्तित्वात आणणे शक्य नाही. तामिळी लोकांना आपल्या नावाची आद्याक्षरे अजून तमिळ लिपीत लिहिता येत नाहीत, ते वैद्यकीय परिभाषा कशी लिहितील?–SMR

  • प्रिय शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपला कदाचित विश्वास बसणार नाही. पण आमच्या ऐकीवाप्रमाणे ४५-५० वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये उच्चशिक्षणासाठी विज्ञानाच्या, पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू झाले होते. त्यात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या काही ज्येष्ठ तज्ज्ञांनी, प्राध्यापकांनी ही माहिती दिली. अनेक पुस्तके लिहून, बरीचशी छापूनही झाली होती. पण नंतर राज्यशासनाने धोरण बदलले आणि सर्व तयार पुस्तकेही गोदामातच सडत राहिली. शेवटी नव्वदीच्या दशकात तीदेखिल रद्दीत काढली गेली. या महत्त्वाच्या उपक्रमात अनेक ज्येष्ठ व तज्ज्ञ मंडळींनी घेतलेले अपार श्रम व निर्माण केलेले ज्ञानग्रंथ वाळवीच्या तोंडी गेले.

   अर्थात याचे राज्यकर्त्यांना काहीच सोयरसूतक असण्याचे कारण नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • आपले भाग्य थोर म्हणून ही मराठी पुस्तके गोदामांत सडली ! नाहीतर ती वापरून जे डॉक्टर बनले असते त्यांनी वापरलेले शब्द मल्याळी नर्सला समजले नसते आणि सगळ्या शस्त्रक्रिया अपयशी ठरल्या असत्या. मात्र एक फ़ायदा झाला असता; आपले सगळे तंत्रज्ञ महाराष्ट्राच्या कूपात मंडूक बनून सुखाने नांदले असते.–SMR

    • प्रिय शुद्धमती राठी यांसी,

     सप्रेम नमस्कार. आपल्यासारख्य़ा स्वभाषाभिमानी व्यक्तीने हे विधान चेष्टेत, गंमतीने केले असावे.

     आपले विधान वाचून चार-पाचशे वर्षांपूर्वी इंग्रजांना स्वभाषेबद्दल असलेल्या न्यूनगंडाची आठवण झाली. इंग्रजीतून वैद्यकीय शिक्षण दिले तर रोगी दगावतील असे इंग्रजांना स्वतःलाच वाटत होते. तेव्हा इंग्रजीची परिस्थिती तत्कालीन मराठीपेक्षाही वाईट असली तरीही तेव्हाच्या इंग्रजांपेक्षाही आज आपल्याला स्वभाषेबद्दल अधिकच न्यूनगंड वाटतो आहे असे दिसते. अधिक माहितीसाठी खालील दुव्यावरील लेख वाचून पहावा.

     https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

     असो.

     मलयाळी परिचारिकांचे शिक्षण सहसा मलयाळी भाषेतच होते. त्यांना जर इंग्रजी शिक्षित डॉक्टरांचे म्हणणे समजू शकते तर मराठी डॉक्टरांचे का समजणार नाही?

     शिवाय मराठीमध्ये वैद्यकीय शिक्षण मिळाल्यावर डॉक्टरच का पण परिचारिकाही मोठ्या प्रमाणात मराठी शिक्षित का असू शकणार नाहीत?

     पन्नास वर्षांपूर्वी मृत समजल्या जाणार्‍या हिब्रू भाषेत शिकून उत्तम डॉक्टर होता येते तर मराठी-तमिळ भाषेत शिकून ते का शक्य नसावे?

     जपानमधील पदार्थविज्ञानशास्त्रात नोबेल पारितोषक मिळवलेल्या शास्त्रज्ञास इंग्रजी समजत नव्हते. मग त्याचे नोबेल पारितोषक फुकट म्हणावे का?

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

     • हिब्रू काय किंवा जपानी काय त्या त्यांच्यात्यांच्या देशातील एकमेव भाषा आहेत. मराठीचे तसे नाही. भारतातल्या एकूण २,८०० धर्मपंथाचे लोक, ६ हज़ार सहाशे एकसष्ट बोलीभाषा(त्यांतल्या १६ भाषा घटनामान्य) बोलतात, त्यांतली एक मराठी आहे. मराठीतून घेतलेल्या शिक्षणाचा महाराष्ट्राबाहेर शून्य उपयोग आहे. थोडक्यात काय तर, हिब्रू आणि जपानींची मराठीशी तुलना नको.
      मल्याळी परिचारिका कदाचित मल्याळीतून शिक्षण घेत असल्या तरी त्यांना इंग्रजी वैद्यकीय परिभाषा अवगत असते आणि त्या महाराष्ट्रात आल्यावर बर्‍यापैकी हिंदी-मराठी समजू शकतात. मराठी परिचारिका अत्यल्प असतात कारण मराठी मुलींना इंग्रजी परिभाषा समज़णे ज़ड ज़ाते आणि कामाची नावड असते. मराठी परिचारिकांना व्यवसायासाठी केरळात पाठवावे, म्हणजे त्यांना नाही तरी, आपल्याला इंग्रजीचे मह्त्त्व समज़ेल.
      ज्याला नोबेल मिळाले त्याच्या कार्याचे मूल्यमापन जपानीत केले की एखाद्या युरोपीय भाषेत? जपानीत केले असेल तर नोबेल कमिटीवर किती जपानी पंडित होते? –SMR

      • प्रिय शुद्धमती राठी यांसी,

       सप्रेम नमस्कार.

       आपले पत्र आम्ही ज्येष्ठ विद्वान प्रा० मनोहर राईलकर ह्यांना अग्रेषित केले होते. त्यांच्याकडून मिळालेले उत्तर खाली सादर केले आहे.

       ————-
       सप्रेम नमस्कार.

       मला जमेल तसं उत्तर देत आहे. पण हा सर्व काथ्याकूट उगीच चालला आहे. इंग्रजीशिवाय आपलं चालणार नाही, ह्या न्यूनगंडातून बाहेर पडायला आपण तयार नाही, हेच खरं दुखणं आहे. केंद्रीय परीक्षांत इंग्रजीत बोलता येत नाही, म्हणून मराठी मुलं मागं पडतात तर, त्याला उपाय सर्व काही इंग्रजीतून शिकणं हा नव्हेच. तर परीक्षाच त्या त्या भाषांतून घेणं आणि नंतर आवश्यक तितकं इंग्रजी शिकवणं हा आहे. तरीही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण तो वेळ दवडणं आहे. आपण आत्मविश्वास गमावून बसलो आहोत, हेही एक दुखणं आहेच. एक भाषा आहे की अनेक हा मुद्दाही गौण आहे. विषय चांगला समजणं ह्याला महत्त्व द्यायचं की नाही? असो.

       (अमृतयात्री: इंग्रजी भाषेचा प्रयोग यशस्वी ठरला नाही म्हणून त्यावरील भर वाढवणे म्हणजे एखादे चुकीचे ऍंटिबायॉटिक औषध पुरेसे लागू पडत नाही; पण आनुषंगिक दुष्परिणाम मात्र फार आढळले तर ते औषध बदलण्या ऐवजी त्याचीच मात्रा वाढवण्याच्या उपायाप्रमाणे हे सर्व ठरते आहे.)

       रशियात तर अधिकृत भाषा १४ आणि मान्य भाषा २५ पेक्षाही अधिक आहेत. चीनमध्ये नावाला चिनी भाषा असली तरी एका भागातली चिनी दुस-या भागात समजत नाही. ही माहिती तुम्हाला Childbook Encyclopaedia  मध्ये वाचायला मिळेल. मी तेथूनच मिळवली.

       मुख्यतः, किती जणांना वा किती जणींना महाराष्ट्र सोडून जावं लागणार आहे? एक टक्कासुद्धा नाही. त्यांच्याकरता सर्वच मुलांना पहिलीपासून इंग्रजी आणि सर्व विषय इंग्रजीतून शिकवण्याची काय आवश्यकता आहे? त्यातही मी एस०एस०सी० बोर्डाच्या अभ्यास मंडळावर असताना आम्ही एक गोष्ट अमलात आणायचा प्रयत्न केला होता. ती म्हणजे परिभाषा इंग्रजीच ठेवणे, अथवा तिचा सातत्यानं परिचय देत राहणे. पण जर कोणताही विषय मातृभाषेतून चांगला समजतो, हे मान्य असेल तर हे प्रश्न वाटतात तितके कठिण जात नाहीत. उदाहरणं देतो. पण परदेशांतील इतर देशात, भारतातील इतर राज्यांत तरी किती जणांना जावं लागेल, ह्याचा विचार करणार की नाही? मग फक्त इंग्रजीच का? बाकी भाषा का नाहीत? 

       मी स्वतः, ७५ तासांत फ्रेंच शिकलो. आणि त्यावेळी गणिताच्या ज्या विषयांची पुस्तकं इंग्रजीत उपलब्ध नव्हती, त्यांचं वाचन सहजगत्या करू शकत होतो. त्याकरता मला पहिलीपासून फ्रेंच शिकावं लागलं नाही. आणि अनावश्यक असलेले सगळेच विषय फ्रेंचमधून मी कशाला शिकावेत? तीच बाब जर्मन भाषेची. पाहिजे होतं तेवढं जर्मनही मला ७५ तासांत समजलं.

       माझे एक मित्र डॉ. बुचे ह्यांनी रशियात जाऊन गणितात पीएच. डी केली. त्यांना मी विचारलं, किती वर्षांत रशियन भाषा शिकलात? ते म्हणाले वर्षं कुठली? फक्त सहा आठवड्यात शिकलो. आणि त्यांनी विद्यावाचस्पती पदवी मिळवली. नंतर ते गणिताच्या रशियन पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरंही करीत. आणि अभिप्रायही लिहीत.

       थोडक्यात सांगायचं तर मातृभाषा आणि मातृभाषेतून आपला जो विषय असेल तो पक्का समजला असेल तर नंतर इतर भाषा आपापल्या विषयापुरत्या शिकायला फारसं कठिण जात नाही. शिवाय अशी गरज लागणा-या अशांचं प्रमाणही कमीच, नगण्यच असणार.

       (अमृतयात्री: हे जगभरातील भाषातज्ज्ञांना मान्य असलेले तत्त्व भारतातील मेंढरांच्या नियमाप्रमाणे निर्णय घेणार्‍या सामान्यजनांना व स्वार्थी राजकारण्यांना तर सोडाच पण आजच्या तथाकथित तज्ज्ञांनाही समजत (उमजत?) नाही. सुदैवाने भारताच्या स्वातंत्र्यानंतर गठित केलेल्या अनेक तज्ज्ञ समित्यांनी स्थानिक भाषांचे महत्त्व सर्वोच्च मानण्यावरच भर दिला होता. म्हणूनच तर आज आपल्यावर कायद्याने (तरी) कोणी हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषा लादू शकत नाही. पण स्वखुषीने स्वीकारलेल्या न्यूनतेच्या भावनेमधून कोणालाही दुसरा कोणी कसा बाहेर काढू शकेल?)

       परिचारिकांना वैद्कीय परिभाषा समजण्याच्या भाषेचा मुद्दा घ्या. आमच्या हॉस्पिटलात शाळेतसुद्धा न गेलेल्या मागासवर्गीय स्त्रिया (म्हणजे ज्यांच्या घरांतसुद्धा त्यांच्या कामापुरतीच वैद्यकीय परिभाषा त्यांना माहीत आहे) माझ्या मुलाला सक्षमतेनं मदत करू शकतात. इंग्रजीच हवं ह्या आग्रहामुळं आपल्या मुली मागं पडतात. आपल्या मनात इंग्रजीचा दबदबा आणि मराठीविषयी न्यूनगंड आहे. त्यातून बाहेर पडायला आपण तयार व्हायला हवं.

       डॉ. अभय बंग ह्यांनी अशिक्षित स्त्रियांना वैद्यकीय शास्त्रात (म्हणजे परिभाषेसकट) प्रशिक्षित करून स्थानिक बालमृत्यूचं प्रमाण घटवलं, हे तर माहीत असेलच. केरळीय मुली पुढं जातात, ह्याचं कारण इंग्रजी यायलाच हवं हा आग्रह. तोच चुकीचा आहे. इंग्रजी शब्द समजणं पुरेसं आहे. पण समजूत मराठीतच (मातृभाषेत) दिली तर त्यांना विषय अधिक चांगला कळेल. आणि तिकडेच इंग्रजीचा आग्रह धरणा-यांचं दुर्लक्ष होतं.

       (अमृतयात्री: शाळेत जीवशास्त्र विषयात अन्ननलिका-श्वासनलिका असे शब्द आम्ही शिकलो होतो. नंतर महाविद्यालयात गेल्यावर प्रथम वर्षाला जीवशास्त्रात oesophagus-trachea असे शब्द आम्ही शिकलो. त्यांची स्पेलिंग्स जरी आम्ही घोकून पाठ केली (इंग्रजीची कृपा) तरी त्यातील अन्नाची नळी कुठली आणि श्वासाची कुठली ह्या बाबतीत मात्र आमचा नेहमीच घोटाळा होई. म्हणजे जे शाळेत सहज समजले ते महाविद्यालयात जमेना. कारण काय? तर स्वभाषा आणि परभाषेचा फरक. खरं म्हणजे इंग्लंडमध्येसुद्धा शाळेतील मुलांना अशा शब्दांचा अर्थ लक्षात ठेवायला कठीणच जात असणार. कारण oesophagus-trachea हे शब्द तरी इंग्रजी कुठे आहेत? हे लॅटिन शब्द इंग्रज मुलांना कुठले समजणार? कारण ते शब्द त्यांच्या मातृभाषेतीलही नाहीत. परभाषिक शब्द डोळे झाकून स्वीकारल्यामुळे ह्या अशा समस्या येणारच. पण इंग्रजीच्या मोठेपणापुढे दबल्यामुळे आपल्या ध्यानात ते येत नाही.)

       त्यांनी परदेशांची उदाहरणं दिली, म्हणून मीही दिली. खरं तर आपल्याला काय सोयीचं आहे, ते पाहून धोरण ठरवलं पाहिजे.

       आणखी काही मुद्दे. त्यांचाही विचार करावा.

       इंग्रजीच्या ज्ञानात भारताच्या बर्‍याच मागे असणार्‍या चीनमध्ये आपल्या तिप्पट संगणक खपतात. त्यांच्या संगणकाचे कळपाट चिनी भाषांतच असतात. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे आपल्या तिप्पट संगणक साक्षरता आहे. संगणकही चीनमध्येच बनतात. आपल्याला का बनवता येऊ नयेत? निदान त्यात तरी आपल्याला काही कमीपणा वाटत नाही का?

       (अमृतयात्री: संगणक वापरून मिळणारे ज्ञान हे आपले साध्य असले पाहिजे. कुठलेही ज्ञान मिळवण्यास (साधन) माध्यम म्हणून वापरायची भाषा हे नव्हे. आपण साध्य आणि साधनात गल्लत केल्यामुळे आपण साध्य हे साध्य करण्यात मागे पडतो. लवकरच इतर देश स्वतःच्या मातृभाषेच्या पायावर इंग्रजीही आत्मसात करतील आणि मग आपण त्याबाबतीतही मागे पडू हे तज्ज्ञांनी केलेले भाकिअ विसरू नये.)

       पहिलीपासून इंग्रजीच्या राज्य शासनाच्या मोहिमेला आता १० वर्षं होत आली. दैनिक सकाळनं पाहणी केल्याप्रमाणं दहावीतल्या मुलांना सहावीच्या पातळीवरचे प्रश्न विचारले. तरी साठसत्तर टक्के मुलांना उत्तरं देता आली नाहीत. (पहा सकाळ अग्रलेख दि. २१-०२-२०१०) हीच सर्व शक्ती सरकारनं मराठी शाळांतील शिक्षण सुधारण्याकडे आणि मराठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याकरता वापरली असती तर आपण किती तरी प्रगती केली असती.

       (अमृतयात्री: मुलांनी इंग्रजी भाषा किती आत्मसात केली ह्याची कल्पना नाही. परंतु कोकणातील एका अत्यंत दुर्गम भागातील खेड्यात आम्ही गेलो असता प्राथमिक शाळेतील मुलांनी पूर्वीप्रमाणे “नमस्ते गुरूजी” च्या ऐवजी “गुड मॉर्निंग सर” असे दुपारी आमचे स्वागत केले. म्हण जे भाषा आली नाही तरी आपण न्यूनभावनेमुळे आपली संस्कृती टाकून परसंस्कृती मात्र शिकणार. हेच न्यूनतेचे बालकडू लहान वयापासून पुढल्या पिढींना पाजणार. आणि मग स्वातंत्र मिळवून इतकी वर्षे झाली व कोरिया, चीन, मलेशिया, ब्राझिल व इतर देश मागून पुढे का गेले याचा विचार करीत बसणार.)

       शिवाय इंग्रजी शिकायला कुणाचा विरोध आहे?
        
       आपला,

       मनोहर

       —————–

       अमृतयात्री:

       खालील लेख व त्या लेखांखालील चर्चाही अवश्य वाचाव्यात.

       https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/09/पालकांनी-चालवलेला-बालकां/

       https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/22/’मणभर-कर्तृत्वाचा-कणभर-द/

       https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/31/जगाची-भाषा-आणि-आपण-ले०-सुध/

       ११ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेला महाराष्ट्र हा स्वतः मोठ्या देशाप्रमाणेच आहे. इस्रायल देशाच्या अनेक ( २०?) पटींनी मोठा असणारा हा देश युरोपातील विविध प्रगत देशांच्यापेक्षा आकाराने व लोकसंख्येने अधिक मोठा आहे. मराठी भाषेचा भाषकसंख्येनुसार जगातील साडेसहा हजार रूढ भाषांमध्ये पंधरावा क्रमांक लागतो. असे असूनही आपण न्यूनगंडाने हातपाय गाळूनच बसणार असलो तर काहीच करू शकणार नाही. एखादा अत्यंत हुशार मुलगा परीक्षेला घाबरून वैफल्यग्रस्त होतो व पुरेसा अभ्यासच करीत नाही आणि मग अनुत्तीर्ण होतो किंवा जेमतेम उत्तीर्ण होतो आणि इतर मुले, त्यांच्यापैकी काही सामान्य बुद्धीची असूनही, जिद्द, श्रम, स्वाभिमान या गुणांमुळे कितीतरी अधिक पुढे जातात तसाच हा प्रकार चालू आहे.

       स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील स्वदेशप्रेम, स्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम या स्वाभिमानाच्या विविध अविष्कारांचा प्रभाव स्वातंत्र्योत्तर काळात २०-२५ वर्षे थोडाफार टिकून होता. तेव्हा साहित्य, संस्कृती, नाट्य, लेखन, वक्तृत्व, पत्रकारिता, कला, संगीत अशा सर्वच क्षेत्रांत भारतीय व आपल्यादृष्टीने मराठी भाषेचा व संस्कृतीचा सुवर्णकाळ होता. साठीच्या दशका नंतर (१९७० वर्षानंतर) हे सर्व झपाट्याने बदलू लागलं. १९९५ नंतर जागतिकीकरणाच्या कांगाव्याखाली हे आणखीच अधोगतीला जाऊ लागलं.

       हल्ली आधुनिक जगात बहुभाषिकत्वाला बरेच उत्तेजन दिले जाते. मात्र त्यासाठी स्वतःच्या मातृभाषेचे महत्व यत्किंचितही कमी करणे अपेक्षित नसते. युरोपात इंग्रजी बोलणारे देश फारसे नाहीतच. पण त्या देशांनी जागतिकीकरणाच्या नावाखाली भारताप्रमाणे स्वतःच्या भाषेला बाजुला सारून शिक्षणव्यवस्था, न्यायदान, शासनव्यवस्था, समाजव्यवहार, इत्यादींसाठी इंग्रजी भाषा स्वीकारलेली नाही; पण तरीही युरोपातील बहुतेक सर्वच देशांचे राहणीमान भारतापेक्षा खूपच वरच्या दर्जाचे आहे.

       तसेच इस्रायलचे उदाहरण घेऊ. ( हा लेख पहा.) त्या देशाला भारतानंतर ९ महिन्यांनी स्वातंत्र्य मिळाले.त्यावेळी हिब्रू भाषा ही जवळजवळ मृतवत्‌ झालेली भाषा होती. ज्यू लोक जगभर विखुरलेले होते आणि त्यांनी त्या-त्या ठिकाणची स्थानिक भाषा तसेच संस्कृतीसुद्धा आपलीशी केली होती. अशा प्रकारे जगभरचे ज्यू इस्रायलच्या निर्मितीनंतर एकत्र आले; पण त्यातील अनेकांना हिब्रू भाषेची तोंडओळखही नव्हती. हिब्रूची शब्दसंख्याही फार मर्यादित होती. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर भाषेची प्रगल्भता आणि संपन्नता या दोन्ही दृष्टींनी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती असूनही स्वाभिमानपूर्वक इस्रायलमध्ये हिब्रू हीच देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून तिची वेगाने एवढी प्रगती केली की त्या भाषेत शिक्षण घेऊन शिकलेल्या संशोधकांच्या द्वारा इस्रायलमध्ये भारतापेक्षा कितीतरी अधिक संशोधन चालते. संरक्षण सामुग्री, शेतकी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रात तो इवलासा देश भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रगत आहे. इस्रायलने स्वभाषेच्या बाबतीत जे गेल्या ६० वर्षांत साध्य केले त्याच्या एक दशांशही आपण करू शकलो नाही हे वास्तव आहे.

       ज्या-ज्या स्वाभिमानी देशांनी आपापल्या भाषा पुरेशा सक्षम केल्या त्या इंग्रजीतर देशांनी (जपान व इस्रायल सकट) विज्ञान, गणित अशा विषयांमध्ये भरपूर प्रगती केली. त्यातील अनेक देशांनी विज्ञान, गणितातील संशोधनासाठी नोबेल पारितोषके मिळवली आहेत. आपण मात्र आमच्या भाषा या ज्ञानभाषा, उच्चशिक्षणभाषा, संवादभाषा होऊच शकत नाही असा गळा काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो व उंदरांसारखे पुंगीवाल्या इंग्रजीच्या मागे लागतो. त्याचा परिणाम एवढाच की सर्व क्षेत्रांत लायकी असूनही आपण इतर स्वकर्तृत्ववान देशांच्या मागेच राहतो.

       इंग्रजी माध्यमातील शिक्षणाबद्दल महात्मा गांधींनी दूरदृष्टीने काढलेले उद्गार आठवतात.
       “The foreign medium has caused a brain fag, put an undue strain upon the nerves of our children, and made them crammers and imitators, unfitted them for original work and thought and disabled them from filtrating learning to the family or masses.” (Young India, 1-9-1921)

       “परकीय माध्यमामुळे बालकांच्या मेंदूला थकवा येतो. त्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर अनाठायी ताण येऊन ती फक्त घोकंपट्टी करू लागली आहेत. परिणामी मूलभूत आणि स्वतंत्र संशोधन व विचारांकरता ती अपात्र बनली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कुटुंबाला अथवा बहुजनसमाजाला उपयोग होत नाही.”

       या उद्गारांत गांधीजींनी भारताच्या भाषिक यशापयशाची कुंडलीच मांडली होती असे म्हणावे लागेल. गांधीजींच्या या भविष्यवाणीचा प्रत्यय आपल्याला पावलोपावली येत आहे; पण तरीही आपण त्याच्या मूलभूत कारणांचा विचारच करीत नाही. ऍलोपॅथीमधील काही अयोग्य औषधांच्या दीर्घकालीन वापराने त्याचा दुष्परिणाम (side effects) वाढत जातो व दुखणे कमी करण्याचा चांगला परिणाम कमी होत जातो. पण तसे झाल्यावर ते औषध बंद करून दुसरे योग्य औषध देण्याऐवजी बर्‍याचदा डॉक्टर त्याच औषधाची मात्रा वाढवीत जातो. त्यामुळे दुखणे बरे न होता उलट इतर अपाय अधिकाधिक होतात; तसाच आपला भाषा धोरणाचा प्रयोग आहे.

       अमृतमंथन अनुदिनीवरील “जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)” हा लेख पहा. बेंडाळेंच्या लेखातील जपानी अधिकार्‍यांचे “जगाची भाषा? कोणत्या जगाची भाषा? आणि ती जगाची भाषा असेल तर आमचा जपान देश त्या जगात नाही !!” हे बाणेदार उद्गार जपानी माणसाच्या खर्‍या अर्थाने स्व-तंत्र व स्वावलंबी असण्याचे द्योतक आहेत. पण त्यांची भाषा (जपानी भाषा नव्हे, तर त्यांच्या भावना) आम्हा भारतीयांना कदाचित समजणारच नाहीत.

       या विषयावर शेकडो पाने लिहिता येतील. पण मूळ दृष्टीकोनातच पूर्ण तफावत असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. जेवढे पटले तेवढे घ्यावे. पटले नसेल ते विसरून जा व आम्ही अज्ञानी आहोत हे ओळखून आम्हाला क्षमा करा.

       आभारी आहोत.

       क०लो०अ०

       – अमृतयात्री गट

      • अधिक माहिती साठी ……..

       मध्यंतरी ब्रिटीश सरकारने ब्रिटीश विद्यार्थी विसा साठी इंग्रजीच्या परीक्षेत पास होण्याचे नियम कडक करण्याचा अध्यादेश काढला. त्यांना तसे करून चुकीच्या मार्गाने ब्रिटन मध्ये विद्यार्थी म्हणून येणारे आणि तिथेच बेकायदेशीर पाने राहणारे अश्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करायची होती. खुद्द Cambridge University ने याला आक्षेप घेतला. कारण तिथे ते इंग्रजीला फारसे महत्व देत नसून विद्यार्थ्याच्या हुशारीला महत्व देतात. त्यांनी सांगितले जकी इंग्रजीची परीक्षा अधिक कडक करून चांगले हुशार विद्यार्थी ज्यांचे इंग्रजी चांगले नाही असे चांगल्या शिक्षणाला मुकतील. म्हणून आम्ही या प्रस्तावाचा विरोध करतो.

       नोबेल कमिटीवर जेंव्हा तो प्रबंध आला असेल तेंव्हा एक तर त्याचे तज्ज्ञांनी भाषांतर केले असणार आणि त्याच प्रमाणे जपानी भाषा तज्ज्ञा कडून सुद्धा त्याची खात्री करून घेतली असणार. तुम्हाला असं वाटेल कि हे लोक एवढी तसदी कशी घेतील? पण खरोखरच आपण जेवढे इंग्रजीला महत्व देतो तेवढे ते लोक इंग्रजीला महत्व न देता विषयाच्या आकलनाला जास्त महत्व देतात. Cambridge University मध्ये जर विद्यार्थी इंग्रजी प्रथम मातृभाषा नसलेला असला तर प्रबंध सदर करण्या आधी तो प्रबंध एका इंग्रजी मातृभाषा असलेल्या व्यक्तीकडून तपासून घ्यावा भाषे साठी अशी तरतूद असते. आणि या गोष्टीला ते जास्त प्रोत्साहन देतात.

       या उलट अमेरिका या देशात TOEFL या परीक्षेमध्ये विशिष्ठ गुण मिळाले नसतील तर ते त्या विद्यार्थ्याला संधी देत नाहीत. कारण अमेरिकन विद्यापीठांमध्ये अमेरिकन इंग्रजीलाच जास्त महत्व दिले जाते. मग भले ते GRE आणि TOEFL मधले प्रचंड अवघड शब्द ते सुद्धा नेहमीच्या व्यवहारात वापरत नसतील.

       आपणच आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. पहिली पासून इंग्रजी हा महाराष्ट्र सरकारचा निर्णय म्हणजे सर्व शाळेत जाणारे विद्यार्थी महाराष्ट्र सोडून जाणार आहेत ह्या गुहीताकावर आधारलेले आहेत. आणि त्यांना असे वाटते कि इंग्रजी मध्ये २-४ वाक्य बोलता आली म्हणजे पोरगा शिकला. बौद्धिक दिवाळखोरीचा कळस आहे…….

       • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        या महत्त्वाच्या माहितीबद्दल अत्यंत आभारी आहोत. आपले पत्र सर्वच वाचकांना चिंतनीय वाटावे.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

      • प्रिय शुद्धमति साहेब
       आपणास नेमके काय म्हणायचे आहे? तुमचे अभिप्राय वाचून असा निष्कर्ष निघतो की- ‘आपण मराठीचा आग्रह धरू नये. सरळ इंग्रजीतून शिक्षण घ्यावे कारण मराठीतून शिक्षणाचा काही उपयोग नाही’–केरळी परिचारिकांचे आपण कौतुक करता पण आमचा अनुभव उलटा आहे. त्यांना धड इंग्रजी सुद्धा येत नाही!! हिंदी तर पुढची गोष्ट आणि मराठीचे नाव तर स्वप्नात देखील काढू नका! बर, एव्हडे असून त्यांना वैद्यकीय गोष्टी कळल्या पाहिजेत की नको? पण त्यात हि बोंबा बोंब. हो, एक गुण त्यांच्या कडून घ्यायला हवा तो म्हणजे उलट वाद न करणे ! आपले लोक उगाच समर्थन करत सुटतात. चूक लौकर मान्य करीत नाहीत. तुमचे वरील विचार वाचून जे उमगले ते लिहिले. ते जर चुकले असेल तर कळवावे.अनेक आभार.आपला स्नेहांकित-राजेश पाटील

       • प्रिय श्री० राजेश पाटील यांसी ,

        सप्रेम नमस्कार.

        आमचे एक निरीक्षण मात्र सांगतो की मुंबईतील जसलोकसारख्या ज्या रुग्णालयात शिवसेनेची संघटना (पूर्वीची स्थानीय लोकाधिकार समिती) प्रबळ आहे, त्या रुग्णालयात मराठी हीच राष्ट्रभाषा आहे. आपला कदाचित विश्वास बसणार नाही पण जसलोकमध्ये आम्ही दोन मलयाळी अम्मा परिचारिकांना एकमेकांत चक्क मराठी भाषेत बोलताना ’याची कानीं, याची डोळां’ पाहिलं व ऐकलं आहे.

        एरवी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयामधील परिचारिका अम्मा किंवा कनिष्ठ सहाय्यक अण्णा (हे देखिल सर्व आयातीत आहेत) ह्यांना मराठीचा गंधही नाही. त्यांच्या गावी त्यांना हिंदी माहितच नसते. ते चेन्नई, बंगलोरला गेल्यावर तमिळ, कन्नड शिकतात व बोलतात पण महाराष्ट्रात मात्र आपण त्यांना हिंदी शिकायला भाग पाडतो. अर्थात शेवटी ह्याला आपणच कारणीभूत. चालवून घेतले जाते तिथे चालते. अन्यथा कसेही धावू शकते.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० अभिजित यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत. 

   दुर्दैवाने आपले पत्र वर्डप्रेसने अनिच्छित (spam) पत्रांमध्ये टाकल्यामुळे ते आमच्या दृष्टीस पडले नव्हते. त्यामुळे पत्रोत्तरास फारच विलंब झाला याबद्दल कृपया क्षमा असावी.

   आपले म्हणणे योग्यच आहे. रोजगारनिर्मिती झाल्याशिवाय केवळ घोषणा देऊन लोक मराठीमध्ये शिक्षण घेण्यास तयार होणार नाहीत. हाच तर फरक इस्रायल, जपान, कोरिया, चीन युरोपातील सर्व देश, व जगभरातील इतर प्रगतीशील देश व भारत ह्यांच्यामध्ये आहे. खालील लेखांमध्ये हा आपलाच मुद्दा स्पष्टपणे आलेला आहे.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/31/जगाची-भाषा-आणि-आपण-ले०-सुध/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/22/’मणभर-कर्तृत्वाचा-कणभर-द/

   सवडीने अवश्य वाचून घ्या. लेखातील विचार आवडले तर इतर मंडळींनाही अग्रेषित करा. आपले विचार ह्या व्यासपीठावर मांडा. वाट पाहतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • दोन मलयाळी अम्मा परिचारिकांना एकमेकांत चक्क मराठी भाषेत बोलताना ’याची कानीं, याची डोळां’ पाहिलं व ऐकलं आहे. यांत काय आश्चर्य? जर दोन मराठी परिचारिकांना मलयाळममध्ये कुडूकुडू करताना पाहिले तर ते आश्चर्य! माणसाला कुत्रा चाबला ही बातमी नसते तर कुत्र्याला माणूस चावला की बातमी होते, इति मार्क ट्वेन–SMR.

    • प्रिय शुद्धमती राठी यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आजच्या महाराष्ट्राचे हेच तर वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात मराठी माणसांना घराबाहेर, समाजात, औपचारिकच नव्हे तर अनौपचारिक क्षेत्रांतही मराठीबद्दल न्यूनगंड वाटतो. त्यामुळे मराठीमधून संवाद, लेखन, वाचन, शिक्षण, व त्यांच्या अनुषंगिक सर्वच बाबतीत मराठी झपाट्याने मागे पडते आहे. तमिळनाडूमधील माणूस बंगालात गेल्यावर वर्षभरात जुजबी, कामचलाऊ तरी बंगाली शिकेल पण तो महाराष्ट्रात आल्यावर आपण त्याच्या कानावरही मराठी न पडण्याची दक्षता घेऊन त्याच्यावर हिंदी शिकण्याची जबरदस्ती करतो. म्हणूनच इतर राज्यांत शेपूट घालून निमूटपणे स्थानिक भाषा व संस्कृतीचे वर्चस्व मान्य करणारे परभाषक महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले की आम्हालाच दात विचकून दाखवतात. हे असे महाराष्ट्रातच घडते. (म्हणून कुत्र्याचे उदाहरण इथे सरळ लागू पडणार नाही.) आपल्या राज्यात आपल्याच भाषेला दुर्लक्षित व हीनतेची वागणूक मिळते व घटनेतील व भाषिक प्रांतरचनेमागील मूलभूत तत्त्वांचे पालनही इथे केले जात नाही. शाळा, कार्यालये किंवा समाजात इतर कुठेही स्थानिक भाषेची गरजच आपण जाणवू देत नसल्यामुळे सर्वांचे त्यावाचून सहजच चालते.

     आमचे मुख्यमंत्री जनतेसमोर निवडणूकप्रचारासाठी घेतलेल्या सभातही जनतेला उद्देशून मराठीत न बोलता सोनिया, राहूल किंवा इतर श्रेष्ठींना आपले लांगूनचालन नीट समजावे म्हणून हिंदीतच प्रचार करतात. गेल्या निवडणूकांच्यावेळी शेवटी पी० चिदंबरम ह्यांना “तुम्ही तुमच्या मराठी भाषेतच का बोलत नाही” अशी सूचना करावी लागली. बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र, गुजराथ, ओरिसा, आसाम इत्यादी ठिकाणीही महाराष्ट्राचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन ते मुख्यमंत्रीही आपल्या राज्यातील जनतेशी आपल्या राज्यातील भाषेऐवजी परभाषेत बोलू लागले तर मग तो नियम ठरेल अन्यथा सध्यातरी महाराष्ट्र हा आपल्या न्यूनतम स्वाभिमानामुळे अपवादच आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना स्वामिभक्ती व शेपूट घालणे ह्याबाबतीत श्वानवृत्तीचे उदाहरण कदाचित लागू पडावे.

     सहसा सामान्य माणूस कुत्र्याला चावायला किंवा खायला जाणार नाही. पण ईशान्य भारतातील नागभूमीमध्ये कुत्र्याचे मांस खाणे ही स्थानिक नागलोकांत पक्वान्न समजले जाते. त्यामुळे तिथे रस्त्यावर मोकळा कुत्रा दिसताच त्याला पकडून (अनेकदा शेजार्‍याचा चोरूनही) त्याला मारून त्यावर ताव मारला जातो. त्यामुळे चुकूनमाकून एखादा कुत्रा रस्त्यावर एखादा दिसलाच तरी तो नाग माणूस दिसताच (किंवा दुरूनही त्याचा वास येताच) अक्षरशः ’जीव घेऊन’ पळू लागतो. असे लोकांकडून ऐकले आहे. तेव्हा तिथे कुत्र्यांनी नाग माणसाला चावले ही खरोखरच बातमी होत असेल, उलटी नव्हे. म्हणजे आपण नमूद केलेला नियम इथे लागू होणार नाही. आपल्या प्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या मार्क ट्वेन याना जगभरातील अशा कुत्रे, साप, विंचू, झुरळे खाणार्‍या जमातींबद्दल माहिती नव्हती ह्याचे आश्चर्य वाटते. मार्कट्वेन हे विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध होते. हे त्यांचे विधान कदाचित त्याच वर्गातील असू शकते.

     असो. स्वभाषाभिमान या विषयावरील आपली मते ह्या आधीही आम्ही अनेक वेळा व्यक्त केली आहेत. त्याबद्दल अधिक काय सांगणार. एवढेच म्हणतो की “न पटले तर क्षमा करावी व विसरून जावे”.

     पण तरीही लो० अ० ही वि०.

     – अमृतयात्री गट

  • अभिजित यांना मराठीत लिहिता येते? निदान वाचता येत असावे. वैद्यकीय शिक्षण मराठीतून द्यावयाचे म्हणजे हजारो इंग्रजी किंवा अन्य युरोपीय भाषांतल्या वैद्यकीय पुस्तकांचे मराठीत भाषांतर करायचे. यापेक्षा इंग्रजीतून शिकणे कितीतरी सोपे. आमचे एक संस्कृत पंडित म्हणायचे, “पाणिनी फक्त पुस्तके वाचून शिकायचा असेल जर्मन भाषा शिकून घ्या. आपल्या देशी भाषेमधून पाणिनी कधीही समजणार नाही.” आज वेदांच्या अभ्यासासाठीसुद्धा इंग्रजी आणि जर्मन पुस्तके वाचण्याशिवाय गत्यंतर नाही. हिंदीत भरपूर पुस्तके आहेत, पण त्यांतली हिंदी भाषा संस्कृतपेक्षा अवघड असते. बनारसच्या पंडितांची हिंदी समजणे अपने बसकी बात नाही.
   साधे संस्कृतचे व्याकरण आपण मराठीतून शिकू शकत नाही, तर प्रगल्भ वैद्यकीय शिक्षण कसे काय घेणार?
   मराठी ही भारतातल्या अनेक भाषांपैकी एक स्थानिक भाषा आहे. मराठीतून घेतलेले शिक्षण गुजराथमध्येपण उपयोगी पडणार नाही, बाकी काश्मीर-आसामचा तर विचारच करू नये. महाराष्ट्राची तुलना जपान-इस्राइलशी करू नये. ते स्वतंत्र देश आहेत, महाराष्ट्र स्वतंत्र देश नाही. –SMR

   • प्रिय शुद्धमती राठी यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    ५०० वर्षांपूर्वी मानसिक गुलामगिरीत बुडलेल्या व आत्मपीडनातच आनंद मानणार्‍या न्यूनगंडग्रस्त इंग्रजांची आठवण झाली. तिथेही “इंग्रजीतून वैद्यकीय शिक्षण दिल्यास रोगी पटापट मरतील” अशा प्रकारचे स्वतःला व स्वतःच्या भाषेला क्षूद्र मानण्यात मोठेपणा व अभिमान मानणार्‍या इंग्रजांचे दृढ मत होते.

    आपण खालील लेख वाचला आहे काय?

    त्यातील अटल बिहारी वाजपेयींनी संदर्भ दिलेले ’Triumph of the English Language’ हे पुस्तक वाचावे. अर्थात स्वतः वाजपेयींनाही भारतीय भाषांचे, संस्कृतचे व इंग्रजीचे ज्ञान फारसे नव्हते असे आपण म्हणू शकता.

    स्वतः इंग्रजी व मराठीमधून एम०ए० पर्यंत गणित विषय शिकवलेल्या व पुस्तके लिहिलेल्या प्रा० राईलकर सरांचे अमृतमंथनावरील लेख नक्की वाचावेत. स्वामिनाथन अंकलेश्वरीया अय्यर ह्यांचा टाईम्स ऑफ इंडियासारख्या अत्यंत इंग्रज, इंग्रजी व भारतीय इंग्रज ह्यांचीच तळी उचलणार्‍या वर्तमान पत्रातील खालीललेखही अवश्य वाचावा. (टाईम्स ऑफ इंडिया भारताच्या बाजूने इंडियाचा घात करेल असे वाटले नव्हते !)

    असो. या विषयावरही अमृतमंथनावर आपण खूपच काथ्याकूट केलेला आहे. पूर्वीची ती सर्व उत्तरे पुन्हापुन्हा देता येतील, पण त्याचा फायदा नाही. सर्व जगातील भाषातज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ (इंग्रज भाषक तज्ज्ञांसह) मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे महत्त्व सांगत असताही आपल्याला (म्हणजे एकंदरीत बहुसंख्य भारतीयांना) स्वभाषेच्या हीनतेबद्दल व भारतीय लोकांच्या नालायकीबद्दल एवढा दृढ आत्मविश्वास आहे; त्यापुढे आम्ही आणखी काय बोलणार?

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

 2. बघा! जे तमीळ करू शकतात ते महाराष्ट्रयीन कां करू शकत नाहीत.मातृभाषेतून शिकवले तर मुलाना जास्त चांगल्या रितिने तो विषय समजतो असा माझा अनुभव आहे. २-३ वर्षापुर्वी आम्ही एक शिबिर घेतले होते त्याचा अहवालावर आधारीत लिहिलेला लेख अवश्य वाचा. त्याचा दुवा
  http://savadhan.wordpress.com/2010/01/30/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/

  • प्रिय श्री० सावधान यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तम. आपण स्वतः करून दाखवले आणि मगच सांगितले. सर्वांनीच यथाशक्ती असे काही केले पाहिजे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • वीज़तंत्रीचे शिक्षण देताना सावधानींनी स्विच. बोर्ड, अर्थिंग, प्लेट, कनेक्शन, टेस्ट, मेगर, कंडक्टर, फ़्यूज़, न्यूट्रल , ऑफ़, प्लग वगैरेंसाठी आधीच अस्तित्वात असलेले पारिभाषिक शब्द वापरण्याची सावधगिरी घेतली असती तर मानले असते. हे कसले मराठीतून शिक्षण? सगळी नामे इंग्रजी आणि क्रियापदे फक्त मराठी!–SMR

   • प्रिय शुद्धमती राठी यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    आपल्या प्रत्येक पत्रात एक वेगळेच व्यक्तिमत्त्व दिसून येते. आम्ही तर पार गोंधळून गेलो आहोत.

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

   • rathi mahodayaa,
    Aapan varil duvyavarachaa lekh nit vachala asta tar ase mat vyakt kele nasate. je aaj vyavaharaat rulalele aahe Te shabda badalun mulanaa shikavane haa uddesha aamacha navata tar Vijtantri tayar karane haa uddesh hota,.Vijkamaabaddal aavad nirmaan karane ha uddesha hota. Ugicha Aapale adhich astitwat asalele paribhashik shabda vaparun ji shillak mule rahili hoti ti hi palun geli asati. yaa peksha baaki kaahi jhale nasate.
    Jyaa mulaanaa marathicha lihita yet navhate ti mulaat 9-10 vi paryant aalich kashi haa mahatwaachaa prashna hota.Tarihi Tyanaa marathit shikvun tayar karanyat ek vegalach aanand Milala. Aaja hich yojanaa Lonere yethil dr.Babasaheb Ambedkar tantrashastra vIdyapithachya madatine javal javal 25 madyamik shalaatun Aamhi ”Mophat Prashikashan Pratisthan” chya madyamatun maadyamik shaleltil mulansathi rabavat aahot.
    pdkulkarni
    NY-USA
    22-7-10

 3. अहो, समाजातील लोकच आपल्यासाठी योग्य असे शब्द करत असतात.मी पालघर च्या जवळ एका पाड्यावर अपघाताची चौकशी साठी गेलो होतो १९९० च्या दरम्यान.तेथे अपघातग्रस्थाच्या आजीकडे चौकशी केली.बोलता बोलता त्या माऊलीने एक शब्द वापरला “खय नाई बा त्या भुईत्यानं नेलं माझं पोर! आम्हाला समजेना कि ह्या आजीना काय सांगायचय.२-३ वेळा विचारल्यावर मग लक्षात आलं तिच्या हातवार्‍यावरनं.ती अर्थींग साठी भूईता असा शब्द वापरत होती.जमिनीत गाडलेली तार या अर्थी “भूईता”. किती सुंदर शब्द तिने स्वतःसाठी तयार केला आहे. पुढे माझ्या अनेक लेखात मी हाच वापरायचा प्रघात ठेवला.यशदा,आयएसएमएस,वीजकं अशा सगळ्या ठिकाणी आवर्जून हा शब्द मी वापरतो.पण म्हणावा तसं तो अजून रुळलेला नाही.
  तसाच दुसरा शब्द “शॉकबसर” शॉक अब्सॉर्बर यासाठी.असे किती तरी शब्द आपल्या भाषेच्या ढंगाने लोक तयार करतात.अर्थ समजून घेतात.मला वाटतं भाषा अशीच समद्ध होते.संपूर्ण परक्या भाषेत शिकणं हे केव्हाही अनाकलनीयच. असो. पिंडे पिंडे—-!

  • मराठीत जर शब्द सापडत नसेल तर आधी त्याला सामान्य जन काय म्हणतात ते बघावे व ते शब्द घ्यावेत जसे ‘अर्थिंग’ ला ‘भूईता’ हा शब्द कोकणातील एक आजी वापरत होती… तो आपल्या संस्कृतीचा शब्द असल्याने लगेच घ्यावा तसे नसेल तर ‘संस्कृत’ चा आधार घ्यावा व शब्द बनवावेत. आजी चा पण उपयोग करून घ्यावा. अनेक शब्द असेच आणण्यात आले आहेत आणि ते छान पैकी रूळलेत देखील !!! महापौर शब्द त्या पैकीच. ‘पतपत्र’ (क्रेडीट कार्ड साठी) हा शब्द पण तसाच आला !! किती अर्थवाही आणि काव्यात्मक शब्द आहे हा !! लगेच वापरायला हवा !! अशा शब्दांमुळे मराठी बोली भाषेला साहित्यिक उंची मिळते !!! आणि आपल्या मराठीला ही उंची देणे हे आपले कर्तव्य नाही का ? नक्कीच आहे !!!

   • प्रिय श्री० राजेश पाटील यांसी ,

    सप्रेम नमस्कार.

    आपले मत पूर्णपणे पटले. दुःख एवढेच आहे की नवे नवनवीन, उत्तमोत्तम शब्द शोधून स्वभाषेला अधिकाधिक संपन्न करण्याच्या ऐवजी आपण हल्ली रूढ झालेले अनेक शब्दही काढून टाकून तेथे परभाषिक (इंग्रजी किंवा हिंदी) शब्द वापरून रूढ करण्यात धन्यता मानतो. अर्थात ह्यात मराठी वर्तमानपत्रे व दूरदर्शन वाहिन्या सर्वाधिक कारणीभूत आहेत. मनातील न्यूनगंड वाढू लागला की अधिक गुलामगिरी कोण करतो याचीच स्पर्धा लागते.

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

 4. सप्रेम नमस्कार,
  आपण चालवलेल्या चर्चेने बरेच ज्ञान मिळाले.
  जसे की शुद्धमती राठी यांनी म्हटले आहे, की

  >> आपले भाग्य थोर म्हणून ही मराठी पुस्तके गोदामांत सडली ! नाहीतर ती वापरून जे डॉक्टर बनले असते त्यांनी वापरलेले शब्द मल्याळी नर्सला समजले नसते आणि सगळ्या शस्त्रक्रिया अपयशी ठरल्या असत्या. >>

  मला हे वाचून काही प्रश्न पडले. जे मुर्खपणाचे सुध्दा असु शकतात. तरीही विचारतो,
  १. जर आज भारतात शिक्षण आग्लं भाषेतून चालते. तर मग आजचे नोबेल तर सोडाच, पण ज्याला बदल घडवणारे (revolutionary ) शोध का लागत नाहीत?
  २. का आजही sotfpower असलेला भारत, फ़क्त बॅंका इ. साठीच software बनवतो?
  ३. का आजही एक iitian ( ज्यांकडे आम्ही बाकी अभियंते भीतीयुक्त आदरांनी पाहतो) नोबेल मिळवू शकला वा google,microsoft (pioneer business companies) सारख्या कंपन्या का नाही काढु शकला?
  ४. एके काळचा भारतीय ज्याने भौमितीक समीकरणे, शुन्याचा शोध ते सुश्रुत सारखे नेत्रवैद्य झाले ते तर त्याच्या मातृभाषा संस्कृतमधुनच झाले.

  याला मातृभाषेतुन न झालेले शिक्षण जबाबदार आहे का.
  माझ्या मते आपण भारतेतले खुप genius फ़त्त आग्ल भाषेच्या प्रेमापोटी आपण गमावले. नाहितर आपल्या येथेही बरेच जापान्यासारखे खरे संशोधन झाले असते.मला भेट्लेल्या मराठीतुन तांत्रिक शिक्षण घेतेलेले लोकांचा ही पाया पक्काच असतो,असे आढळले.

  >> सगळी नामे इंग्रजी आणि क्रियापदे फक्त मराठी .>>
  आग्लं भाषेतील बरेचशे शब्द इतर भाषेतुन आहे. जर ते काही शब्द जसेच्या तसे घेवू शकतात,तर आपण का नाही.
  तसेही शब्द हे फ़क्त वस्तु, ठिकाण, नाव, भावना इ. गोष्टी दर्शवण्यासाठी असतात.असे मला वाटते. आपण आपल्या भावना मराठीतुन सांगु शकतो. प्रश्न आहे, नवीन नावांचा.जर google व्चा शोध त्यानी लावला तर “google करणे” ला पर्यायी शब्द शोधने चुकिचे होइल. Second , Minute यात आपला व्यवहार कधी झालाच नाही ( आपल्याकडे तास, पहार ई होते) , तर त्याला शब्द मिळणार कसे. पण जे आपल्याजळचे आहेत असे पर्यायी शब्द न वापरणे ,योग्य का ?

  काही चुकल्यास कळावे.

  • प्रिय श्री० अक्षय यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या बहुतेक शंकांना शुद्धमतींच्या पत्राला उत्तरादाखल सादर केलेले प्रा० राईलकरसरांचे पत्र व त्यात मध्येमध्ये आम्ही गोवलेली टिपणे ह्यामध्ये बर्‍याच प्रमाणात उत्तरे सापडली असतील. खरं म्हणजे ह्या विषयावर जगभरातील (त्यात भारत येतो की नाही ते सांगू शकत नाही) तज्ज्ञांचे दाखले देऊन शेकडो पाने लिहिता येतील. पण मूलतः आपली गृहिततत्त्वेच जर विपरीत (वेगळी या अर्थी) असतील तर त्याचा काहीही फायदा नाही.

   आपणा सर्वांना एकच कळकळीची विनंती. अमृतमंथनावर लिहिले गेलेला प्रत्येक शब्द आपल्यासाठी आहे, प्रत्येक मराठीप्रेमीसाठी आहे. त्यातील जे काही पटेल, आवडेल, त्याचा अधिकाधिक प्रसार करा, एवढीव आग्रहाची व कळकळीची वितंती.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. >>एव्हडे असून त्यांना वैद्यकीय गोष्टी कळल्या पाहिजेत की नको? पण त्यात हि बोंबा बोंब<< केरळी परिचारिका आज जगभर त्यांच्या कामासाठी आणि सेवावृत्तीसाठी पहिल्या क्रमांकावर आहेत. पूर्वी भारतात फक्त ख्रिश्चन परिचारिका असायच्या. आता केरळमधून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन आणि मुसलमान परिचारिकाच प्रामुख्याने दिसतात, याला काही खास कारण नसेल? प्रवासादरम्यान मला अनेक केरळी मुली नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी भारताच्या इतर राज्यांत ज़ाताना आढळतात. त्या बर्‍यापैकी हिंदी-इंग्रजी बोलतात. दुबईला स्थानिक परिचारिका नाहीतच, आहेत त्या बहुतांशी मल्याळी मुली आहेत, त्या उत्तम अरबी बोलतात. नोबेल पारितोषिकांच्या आणि ऑस्करच्या निवडीसाठी ज्या जी समित्या असतात त्यांच्यात किती वशिलेबाजी, लॉबीइंग(lobbying) आणि राजकारण असते त्यावर अनेक लिखाणे वाचली आहेत. टागोरांचे नाव जेव्हा नोबेल समितीसमोर आले किंवा समितीत कायकाय चर्चा झाल्या त्याबद्दल आंतरजालावर भरपूर माहिती आहे. भारतातल्या एका हिंदू माणसाला नोबेल कसे काय देता येईल हा चर्चेचा मुख्य विषय होता. शेवटी ’ते भारतीय नसून ब्रिटिशांचे प्रजानन आहेत आणि शिवाय ते जन्माने हिंदू असले तरी त्यांची विचारसरणी जवळजवळ ख्रिश्चन आहे. त्यामुळे त्यांच्या गीतांजलीच्या इंग्रजी भाषांतराला नोबेल दिल्यास फारसे बिघडणार नाही’, अशा अर्थाची ही चर्चा आहे. महात्मा गांधींना याच कारणासाठी नोबेल मिळाले नाही आणि ओबामाला मिळाले. याचा अर्थ नोबेल मिळवणारे सर्वच वशिल्याचे तट्टू असतात असे समज़ण्याचे कारण नाही. ऑस्करची तीच कथा. भारतातले दारिद्र्य दाखवणारे चित्रपट फक्त ऑस्करसाठी विचारात घेतले जातात. ’जय हो’ सारखे सामान्य गाणे ऑस्कर मिळवते यावरून काय ते समज़ावे. ते गाणे हिंदी असले तरी त्यातली सुरावट पाश्चात्य आहे हा मुद्दा विचारात घेतला गेला होता, हे विसरू नये. –SMR

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s