ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि० वा० शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांनी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे य़ोजले आहे. हा आठवडा ज्या दोन महत्त्वाच्या दिवसांना जोडतो ते दोन्ही दिवस आपल्या प्रिय मायबोलीच्या सन्मानाचे दिवस आहेत हा दुग्धशर्करा योगच नव्हे काय?
आता या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व्हायला हवा. मराठीप्रेमी संस्थांनी व व्यक्तींनी शक्य त्या सर्वच माध्यमातून अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी. इतर विविध संस्थांनाही माहितीपर पत्रे पाठवावीत तसेच दूरचित्रवाणीच्या विविध मराठी (शक्य असल्यास अमराठीसुद्धा) वाहिन्यांवर त्यास बातम्या व मुलाखती इत्यादी माध्यमांतून प्रसिद्धी द्यावी. शिवाय ह्याची संक्षिप्त स्वरूपातील पत्रिका मराठी वर्तमानपत्रांना प्रसिद्धीसाठी द्यावी. मराठी वर्तमानपत्रांत या संकल्पनेबद्दल व तिच्या अनुषंगाने मराठीची संपन्न भाषा, प्रगत संस्कृती व श्रेष्ठ परंपरा यांच्याबद्दल लेखही लिहिता येतील.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी मराठी आठवडा साजरा करण्याच्या योजना आपापल्या निवडणुक वचनपत्राद्वारे घोषित केल्या होत्या. कॉंग्रेसने तर (आपले मराठीप्रेम इतरांच्यापेक्षाही दुप्पट आहे असे सिद्ध करण्यासाठी) मराठी पंधरवडा साजरा करण्याचे आश्वासन दिले होते. अर्थात निवडणुकीनंतर नेहमीप्रमाणे त्यापैकी किती पक्षांना आपल्या वचनपत्राची आठवण आहे याची कल्पना नाही. पण मराठीप्रेमी व्यक्ती व संस्थांनी स्वतः आपल्या कृतीने आपापल्या गल्लीत-गावात-नगरात-महानगरात ’मायबोली मराठी सप्ताह’ दणक्यात साजरा करून ही संकल्पना महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करावा अशी कळकळीची व आग्रहाची सूचना करावीशी वाटते. बृहन्महाराष्ट्रातील आपणा मराठीप्रेमींचे उदाहरण पाहून गल्लोगल्ली शिवजयंती व गणपत्युत्सवाबरोबरच ’मायबोली मराठी सप्ताह’ किंवा निदान ’मायबोली मराठी भाषा दिन’ प्रतिवर्षी साजरा करण्याची कल्पना प्रस्थापित व्हावी ह्यासाठी आपण प्रयत्न करूया. ह्या संकल्पनेचा पुरेसा प्रसार झाला तर आपोआप इतर सामाजिक व राजकीय पक्षांतही असा सप्ताह साजरा करण्याची अहमहमिका सुरू होईल. अर्थात (इतर राज्यांप्रमाणे) अशा स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दलच्या अभिमानाविषयी स्पर्धा होणे ही आदर्श स्थितीच मानावी लागेल. असो.
आपण सर्वच स्वभाषाप्रेमी सतत आपल्या मायबोली आईच्या समृद्धीची, श्रीमंतीची स्वप्ने पहात असतो. अशी स्वप्नेच आपल्याला आपल्या त्या संबंधातील कर्तव्याची वेळोवेळी आठवण करून देत असतात. त्या आपल्या समाईक ध्येयप्राप्तीसाठी आपण सर्वच सतत यथाशक्ती प्रयत्न करीत राहू व इतरांच्या अशा प्रयत्नांना हातभार लावू.
———–
’मायबोली मराठी भाषा दिना’च्या दिवशी होणार्या श्री० कौशल इनामदार ह्यांच्या “लाभले अम्हांस भाग्य” या मराठीच्या अभिमानगीताच्या भव्य प्रकाशन समारंभाचे आमंत्रण आपणा सर्वांना अमृतमंथनाच्या माध्यमातून मिळालेलेच आहे. त्यात एवढाच बदल झाला आहे की या अतिभव्य कार्यक्रमाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन आता कार्यक्रमासाठी आता ठाण्यातीलच दादोजी कोंडदेव क्रीडाभूमी, ठाणे (पश्चिम) हे भव्य स्थळ निश्चित केले गेले आहे. त्याबद्दल सर्वांना हार्दिक आमंत्रण. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक असे आहेत: (०२२) २५३९०७६३, ९९६७० ५१९१०, ९८२०८ ७७२७९. शिवाय खालील दुव्यावरही ह्या कार्यक्रमाची माहिती उपलब्ध आहे.
http://www.facebook.com/event.php?eid=321281952376&ref=mf
प्रत्येक मराठीप्रेमीने अगत्याने उपस्थित राहून “लाभले अम्हांस भाग्य, बोलतो मराठी” ह्या घोषवाक्याबद्दलचा आपला ठाम विश्वास मुक्तपणे, अभिमानपूर्वक जगाला दाखवून द्यावा.
———–
पुण्यामधील समर्थ मराठी संस्था व इतर विविध मराठीप्रेमी संस्था व व्यक्तींनी एकत्र येऊन २१ ते २७ फेब्रुवारी या काळात ’मराठी आठवडा’ साजरा करण्याचे ठरविले आहे. पुण्यात साजरा होणार्या या ’मराठी आठवड्या’ची कार्यक्रमपत्रिका खालील दुव्यावर पहायला मिळेल.
[मराठी आठवडा_पुणे_कार्यक्रम-पत्रिका_210210] पुण्यातील सर्व मराठीप्रेमींना आम्ही आपुलकीचे आवाहन करू इच्छितो की सर्वांनी ह्या कार्यक्रमांस अवश्य उपस्थित राहून आपल्या मायबोली मराठीभाषेचा हा कौटुंबिक सोहळा उत्साहाने एकत्रितपणे साजरा करूया.
हे दोन्ही आपले घरगुती सोहळेच आहेत. ते आनंदाने मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया.
.
– अमृतयात्री गट
.
This work needs to be done more by social organisations than political ones. Politicians are bound to take advantage of this occasion to further their ends. Marathi-Ekjoot, if it wants to be a powerful organisation, should draw up a plan and implement it.
प्रिय श्री यशवंत कर्णिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
हे कार्य मूलतः सामाजिकच आहे. पण आज सर्व राजकीय संस्थाही सामाजिक जबाबदारीचा आव आणतात. शिवाय कुठल्याही क्षेत्रात संस्थेचा आकार वाढला की त्यात राजकारण्यांचा शिरकाव होतोच.
पूर्वी टिळकादी नेत्यांनी राजकारणही समाजकार्याच्या दृश्थीकोनातून केले. आज उलट परिस्थिती आहे. समाजकारणही राजकारणाच्या दृष्टीकोनातून केले जाते.
असो. आपण स्र्वांनाच आवाहन करूया. कोणाच्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
भारताबाहेरील आमच्यासारख्या मराठी मंडळींना ह्या सप्ताहाचा आस्वाद घेता येईल अशी काही योजना करावी अशी नम्र विनंती.
(youtube, URL वगैरे)
बाळ संत
प्रिय श्री० बाळ संत यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण पुण्यातील मराठी-आठवड्याची कार्यक्रमपत्रिका पाहिली असेलच. आज डॉ० रामचंद्र देखणेंचे भारूड झाले. त्यात एकनाथी भारूड, गोंधळ, जोगवा, वासुदेव, व इतर अनेक पारंपारिक मराठी प्रकारांची प्रात्यक्षिकांसह (सादरीकरणासह) नाट्यस्वरूपात माहिती सांगितली गेली. ह्या सर्व प्रकारात बोली भाषा, लोकसंगीत यांच्याद्वारे लोकांवर अध्यात्मिक संस्कारच केले जात. महाराष्ट्राला संपन्न परंपरा आहे. पण हे सर्व आपल्यापर्यंत कसे पोचवणार?
डॉ० देखणे परदेशातही कार्यक्रम करतात. आपल्या मराठी मंडळातर्फे आमंत्रण द्यावे. आपणही प्रतिवर्षी मायबोली मराठी भाषा दिवस व मायबोली मराठी सप्ताह नक्की साजरे करावेत.
उद्या नाटक संगीत संशयकल्लोळ आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
सप्रेम नमस्कार,
आपल्या म्हनण्यानुसार आम्ही मराठी दिन साजरा करणार तर आहोच व त्याची सुरुवात सुध्दा केली. २७ ला महाविद्यालयाला सुट्टी असल्याने आम्ही २० लाच मराठि t-shirt day ची साजरा केला.
त्यानंतर महाविध्यालयात ३ मार्च ला मोठा मराठी दिवस साजरा करनार आहोत.
आपल्या पुण्यातील कार्यक्रमाचे पत्रक पाहीले छान कार्यक्रम आहेत.त्यासाठी शुभेच्या.
आमच्या वर्धेला सुध्दा कार्यक्रम सुरु आहेत.आमच्या घराजवळ शिवाजी महाराज्याच्यां जयंती निमित्त जिल्हास्तरिय विविध खेळाचे (कब्बडी. खो-खो, मल्लखांब इ.) आयोजन केले होते.
आपण सर्वानी आपआपल्यापरीने मराठी दिवस साजरा करुया.
सर्वाना मराठी सप्ताहाच्या व मराठी दिवसाच्या मनापासुन हार्दिक शुभेच्या.
क.लो.अ.
प्रिय श्री० अक्षय यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले पत्र वाचून अत्यंत आनंद झाला. प्रत्येक मराठीप्रेमी व्यक्तीने आपली प्रत्येक कृती आपण मराठी आहोत हे लक्षात ठेऊन केली पाहिजे. जेव्हा, जिथे शक्य तिथे, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी मराठीचे संवर्धन, प्रगती, सन्मान होईल अशीच कृती करावी. मराठी सप्ताह ही तर यादृष्टीने नामी संधी आहे.
मराठी सप्ताहानिमित्ताच्या आपल्या शुभेच्छा पोचल्या. ही सुद्द्धा उत्तम कल्पना आहे. विशेषतः मायबोली मराठी भाषा दिवसानिमित्त अधिकाधिक लोकांना शुभेच्छा संदेश पाठवू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
ता०क० पुण्यात ’टी-शर्ट’ला ’बंडी’ असा शब्द वापरणे सुरू झाले आहे व “लाभले अम्हांस भाग्य, बोलतो मराठी”, “मराठी अस्मिता” व असे इतर विविध संदेश लिहिलेल्या बंड्या घालण्याची फॅशन (टूम) सुरू झाली आहे.
नमस्कार ,
अगदी पुण्यासारखेच आम्ही सुध्दा मराठीतून छापलेल्या बंड्या घेतल्या आहेत.त्या आम्ही मुंबईवरुन आणलेत. त्यावर छान मराठी कविता वा शिवाजी महाराजांचे छायाचित्रे आहेत.त्याला मिंत्रामध्ये फ़ार मागणी आहे.
क.लो.अ.
प्रिय श्री० अक्षय यांसी,
सप्रेम नमस्कार.
उत्तम गोष्ट केलीत. मराठी काव्यपंक्ती, उक्ती, वचने, उद्गार, विनोद लिहिलेल्या किंवा मराठी संस्कृतीच्या संबंधीची चित्रे काढलेल्या बंड्या आपण अभिमानाने उघडपणे घालून आपला स्वाभिमान सर्वत्र जाहीर करू. लवकरच तीही एक टूम (फॅशन) होईल. तसे झाल्यास मराठीच का अमराठी उद्योजकही त्या धंद्यात पडतील, आज मराठी चित्रपट निर्माते बरेचसे अमराठी आहेत त्याच प्रमाणे.
काल श्री० कौशल इनामदारांचा मराठीच्या अभिमानगीताच्या जन्मकथेविषयीचा कार्यक्रम पुण्यात मराठी सप्ताहाच्या निमित्ताने झाला. हे अभिमानगीत खरोखरच मराठी माणसाच्या अभिमानाचे उज्ज्वल प्रतीक होणार आहे यात शंकाच नाही. उद्या मायबोली मराठी भाषा दिनानिमित्ताने त्याचे प्रकाशन भव्य प्रकारच्या समारंभाने होणार आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास दूरदर्शनावर त्याबद्दलचे वृत्त पहाच.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Let us resolve on these auspicious days that we will use Marathi and Marathi only. Let us also resolve that we will bycot those politicians and so-called opinion leaders who because of cowardice and selfish motive support and propagate Hindi.
Shrikant Pundlik
प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
बरोबर बोललात. असे हे विविध दिवस साजरे करण्याचा हेतु तोच तर असतो. शिवजयंती साजरी करायची ती हिंदी चित्रपटाच्या गीतांबरोबर नाच करण्यासाठी नव्हे तर महाराजांचे कार्य, त्यांनी दाखवलेला आदर्श, त्यांचा मराठी बाणा, त्यांची हुशारी, त्यांचा स्वभाषा व स्वसंस्कृतीबद्दलचा नितांत अभिमान, ह्यांची आठवण स्वतःला व आजुबाजुच्या इतरांना करून देण्यासाठीच साजरी करायची. त्याच तर उद्देशाने लोकमान्यांनी सार्वजनिक शिवजयंत्युत्सव व गणपत्युत्सव सुरू करण्याची प्रेरणा दिली. त्यातून त्यांना लोकांचा देशाभिमान जागृत करायचा होता. आज तशीच आवश्यकता आहे. मराठी माणसाला, स्वाभिमान, स्वभाषा व स्वसंस्कृतीचा अभिमान यांची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक उत्सव सोहळ्यातून अशा प्रकारचे योग्य संदेश तरुणांच्या मनावर बिंबवले जातील ह्याची आपण काळजी घेऊ.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
TOTALLY AGREE. WE HAVE ALSO DECIDED TO CELEBRATE MAYBOLI MARATHI BHASHA DIN HERE IN DUBAI. WE ARE GOING TO WEAR SADARA IN OFFICE(LIKE GUDHIPADAWA, DASARA) AND PLANNING TO ARRANGE SOME SWEETS ON THAT DAY. EVENTHOUGH INITIALLY WE HAVE VERY SMALL GROUP OF 13 PEOPLE, WE BELIEVE NEXT YEAR IT WILL BE A GROUP OF 300. JAY MARATHI!!! JAY MAHARASHTRA!!!
THANK YOU. ABHIJIT.
PS: HERE IN OFFICE CANT DOWNLOAD MARATHI FONT. SO I HAVE WRITTEN THIS COMMENT IN ENGLISH.
प्रिय श्री० अभिजित यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या उत्साहपूर्ण कार्यक्रमाबद्दल जाणून आनंद झाला. आपल्या मराठी स्वाभिमानाचा व उत्साहाचा वणवा संपूर्ण दुबईत पसरवा. पुढल्या वर्षी मराठी गाणी, नाटके, संगीत, नृत्य, कथावाचन, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, अशापैकी काही कार्यक्रम शिवाय हळदीकुंकू, सत्यनारायण, असे धार्मिक/सांस्कृतिक सोहळेही योजता येतील.
शुभेच्छा !!
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
AAPAN SUCHWILYAPRAMANE PUDHIL VARSHI NAKKICH AMHI VARIL KARYAKRAM AAYOJIT KARU. AAPLE SAHAKARYA AANI MARGDARSHANABADDAL DHANYAWAD.
प्रिय अभिजित यांसी,
सप्रेम नमस्कार.
परदेशात वर्षातून एकच मातृदिन असतो. तेव्हा ते वृद्धाश्रमात किंवा इतर कुठेतरी वेगळ्या राहणार्या औपचारिकपणे आपल्या आईला शुभेच्छापत्र व फूल वगैरे पाठवतात. भारतात दररोजच आपला मातृदिन असतो. आपल्याला तिच्याबद्दल नेहमीच प्रेम, आपुलकी, अभिमान, कृतज्ञता वाटत असते. त्याच प्रमाणे औपचारिक पातळीवर इतर जगाला अभिमानाने आपले प्रेम दाखवून देण्यासाठी आपण एक मायबोली मराठी भाषा दिन साजरा केला तरी मायबोलीचे प्रेम, मायबोलीचा उत्सव आपण मनातून व प्रत्यक्ष कृतीने दररोजच साजरा करू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
हयावेळी बरयाच ठिकाणी चांगला आवेश दिसत आहे त्यामुळे यापुढेही हा दिवस अश्याच सम्रुदधतेने रुढ होइल अशी आशा बाळगुया..
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….!!!!
तुम्ही मराठीसाठी आजवर जे करत आहात त्याबददल खरच तुमचे मनापासुन अभिनंदन…
प्रिय श्री० देवेंद्र चुरी यांसी,
सप्रेम नमस्कार.
अत्यंत आभारी आहोत. आपणा सर्वच अमृतमंथनाच्या परिवारातील सदस्यांना कालच्या मायबोली मराठी भाषा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण सर्व एकाच आईची लेकरे, सहोदर, बंधुभगिनी आहोत. आपल्या आईच्या सन्मानासाठी, संपन्नतेसाठी, एकजुटीने सतत प्रयत्न करीत राहू.
हे कोणा एकट्यादुकट्याचे, आमच्यासारख्या छोट्याशा मित्रगटाचे काम नाही. आपण सर्वच मराठीप्रेमींनी बहुसंख्येने एकत्र येऊन, सातत्याने, एकच ध्यास धरून मायबोलीची जोपासना, संवर्धन करीत राहिले पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे आपल्या मातेचा विचार असायला हवा. त्यासाठी जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा, जितके काही शक्य असेल ते सतत करीत राहिले पाहिजे.
याबद्दल सतत बोलतही राहू, एकमेकांना प्रोत्साहन देऊ, सहकार्य करू पण स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर सतत मायबोलीच्या सन्मानाचे भान ठेऊन वागू व जगू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
नव्या सांस्कृतिक धोरणाकडे गल्लाभरू माध्यमांचे दुर्ल़क्ष
मराठी भाषा आणि संस्कृति लयाला चालली आहे असा टाहो फोडण्यार्यांची संख्या आपल्याकडे बरीच आहे. शासन संस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा-विकास याबाबतीत उदासीन आहे असे नेहमी बोलले जाते. माध्यमेही अधून-मधून असाच सूर लावून गळे काढतात. उदासीन आणि अकार्यक्षम समजल्या जाणार्या महाराष्ट्र शासनानेही सुमारे एक महीन्यापूर्वी नव्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा सार्वजनिक चर्चेसाठी खुला करून त्यावर मते / सूचना / प्रतिक्रिया मागवल्या पण त्याची कोणीही गंभीर्याने दखल घेतल्याचे दिसले नाही याचे आश्चर्य वाटले, तसाच खेदही झाला.
एरव्ही, चर्चा, परिसंवाद आणि कार्यशाळांची ‘ठोक-तत्वावर‘ सत्रे भरवण्यार्या शैक्षणिक संस्था, साहित्य-मंडळे आणि इतर सार्वजनिक संस्था यांनी खरे तर नव्या धोरण-मसुद्याचे निमित्त साधून गावोगाव सभा, चर्चा आणि कार्यशाळांचे फड जमवायचे; वर्तमानपत्रातून आपले लेख / मुलाखती छापून आणण्यासाठी मान्यवर साहित्यिक आणि ‘विचारवंत‘ यांनी कंबरा कसायच्या; अग्रलेखांचे पेव फुटायचे परंतु यापैकी काहीच घडले नाही. याचा अर्थ असा समजायचा का की शासनापेक्षाही आमचे समाज-धुरीण, साहित्यिक, विचारवंत, शिक्षण-तज्ञ, पत्रकार ही मंडळी जास्त उदासीन आहेत? निदान जागतिक मातृभाषा दिनाचे [२७ फेब्रुआरी] औचित्य साधून तरी या धोरण-मसुद्यावर चर्चा व्हायला आणि अग्रलेख / विशेष लेख प्रसिद्ध व्हायला हरकत नव्हती परंतु मुळात मातृभाषा-दिनाचीच दखल फारशी घेतली गेली नाही तिथे नव्या संस्कृतिक धोरणाची पर्वा कोण करतो?
शासन म्हणेल, ‘आम्हाला ज्या गोष्टी योग्य आणि महत्वाच्या वाटल्या त्या आम्ही धोरणात समाविष्ट केल्या. सार्वजनिक चर्चेसाठी मसुदा खुला केला, त्यावर मते / सूचना मागवल्या. आता त्यावर काही साधक-बाधक चर्चाच झाल्या नाहीत किंवा कोणी सूचना / दुरुस्त्या मांडल्या नाहीत तर त्याला आम्ही काय करणार?‘ खरे आहे. शेवटी, आहे तोच मसुदा विधि-मंड्ळापुढे सादर होणार आणि त्याच्यावर बहुमताने शिक्कामोर्तब होऊन जाणार अशीच चिन्हे दिसतात. नाही तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आलेच आहे.
उद्या, या धोरणात काही त्रुटी राहिल्या आहेत, महत्वाच्या काही बाबी दुर्लक्षित झाल्या आहेत असे बोलण्याची सोय राहिलेली नाही. मराठी राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्यासाठी सांस्कृतिक धोरण असावे अशी इच्छा शासनाला होण्यासाठी पनास वर्षे लागावी हे एक दुर्दैव पण त्याही पे क्षा मोठे दुर्दैव म्हणजे त्या धोरणाच्या मसुद्यावर काही विधायक सूचना करण्याचीही तसदी कोणी घेतली नाही. आपल्या समाज-धुरीणांमधील हे औदासिन्य हेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या पीछेहाटीचे मुख्य कारण असू शकेल.
विशेषत: माध्यमांकडून या विषयाची झालेली उपे क्षा अधिक ऊठून दिसते. सामान्यजन एकवेळ म्हणू शकतात की,‘ धोरण-मसुदा केंव्हा प्रसिद्ध झाला ते आम्हाला कळलेच नाही. मग त्याच्यावर आम्ही सूचना आणि प्रतिक्रिया कशा पाठवणार?‘ त्यात तथ्यही असू शकेल पण माध्यमांचे काय? त्यांच्यासाठी ही पळवाट उपलब्ध नाही कारण शासनाच्या प्रसिद्धी आणि जनसंपर्क खात्याकडून नव्या धोरणाचा मसुदा त्यांच्याकडे नक्कीच घरपोच झाला असणार. पण कोट्यावधी रुपयांचा महसूल गोळा करण्याच्या खटाटोपात गर्क असलेल्या माध्यमांना संस्कृतिक धोरणात काही ‘लभ्यांश‘ आढळला नाही तर त्याला आपण तरी काय करणार? राखी सावंतला दिलेले ‘फूटेज‘ भरघोस महसूल देऊन जाते; सांस्कृतिक धोरणातून काही गल्ला गोळा होत नाही असाच सूज्ञ विचार माध्यमांनी केला असावा.
‘People get the Government that they deserve’ असे म्हटले जाते. त्याच चालीवर ‘आपली जशी लायकी तशी माध्यमे आपल्याला लाभतात‘ असे म्हणावे लागते.
– प्रभाकर [बापू] करंदीकर
प्रिय श्री० प्रभाकर करंदीकर (बापू) यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपला शब्दन् शब्द खरा आहे. आपली तगमग योग्यच आहे. सांस्कृतिक धोरणाबद्दल आपण ’मराठी+एकजूट’ उपक्रमाच्या वतीने मराठीजनांकडून सांस्कृतिक धोरणाबद्दल सूचना मागवल्या होत्या. त्याप्रमाणे काही अमृतमंथनाद्वारे व काही थेट मराठी+एकजूट यांना मिळालेल्या आहेत. आपल्याही काही सूचना असल्यास कळवाव्या. आपण अजुनही पाठवून देऊ. या आवाहनाबद्दल सविस्तर माहिती खालील लेखात सापडेल. आपले हे पत्र त्याच लेखाखाली लिहिलेत तर अधिक योग्य ठरेल.
https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/16/महाराष्ट्र-राज्याच्या-सा/
आपण प्रकट केलेल्या भावना जाणून घेऊन अजुनही मराठीजनांनी आपल्या सूचना कळवाव्यात असे विनंतीवजा आवाहन करतो.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
नमस्कार!
मराठीभाषादिन (२७ फ़ेब्रु)साजरा झाला.अनेक कार्यक्रम पार पडले.मिरवणुका निघाल्या.मराठीचा जयजयकार दुमदुमला. अशा कार्यक्रमांची आवश्यकता असतेच.त्यामुळे थोडी जागृती निर्माण होते.पण भाषेची प्रगती होते असे वाटत नाही. त्यासाठी सातत्याने आणि चिकाटीने काम करावे लागते.अमृतयात्री गट आपल्या परीने कार्य करीत आहे,ते प्रशंसनीय आहे.
*स्वीय संगणक असणार्या मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. पण संगणकावर देवनागरी लिपीत मराठी लिहिणार्यांची संख्या अल्प दिसते.ती वाढण्यासाठी काय करता येईल? मी याविषयीं काही प्रयत्न केला. पण अपेक्षित यश लाभले नाही.
…………………य.ना.वालावलकर
प्रिय श्री० य० ना० वालावलकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण मराठी भाषेची विविध प्रकारे करीत असलेली सेवा सर्वांना माहित आहेच.
मराठी माणसाला मराठी बोलण्याची लाज वाटते, किंबहुना त्याला मराठी बोलण्याबद्दल न्यूनगंड वाटतो, हे तर खरेच. हेच कारण मराठीमध्ये न लिहिण्याबद्दल असू शकते. पण लिहिण्याच्या बाबतीत तरी परिस्थिती संथपणे का होईना, पण नक्कीच बदलत आहे. अधिकाधिक मंडळी युनिकोडाधारित मराठी टंक वापरून लेखन करीत आहेत. त्यांच्या मदतीसाठी याच अमृतमंथन अनुदिनीवर काही लेखही प्रकाशित केले गेले आहेत.
वाचकांची पत्रे वाचल्यास आपल्याला आढळून येईल की अधिकाधिक वाचकांनी मराठीमध्ये लिहिणे सुरू केले आहे. प्रथम मराठीत लिहिण्यास बिचकणारी, घाबरणारी किंवा कंटाळा करणारी मंडळी आता राजरोस भरपूर मराठीत लेखन करीत आहेत. काही मंडळी तर इतकी लांबलचक, सुंदर, मुद्देसूद पत्रे लिहितात की त्यांचे प्रतिमत (feedback) हे सुद्धा एका लेखाप्रमाणेच वाटते.
आपले मराठीचे ज्ञान, अनुभव मोठा. आपण ज्येष्ठ. आपण आमच्यासारख्या इतर नवशिक्यांना मराठी लेखन, व्याकरण इत्यादी बाबतीतही मदत करावी. इच्छा असल्यास आपल्या आवडीच्या विषयांवर अमृतमंथनावर लेख लिहावेत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
marathicha abhiman sarvanni balagun marathi
cha jastit jast vapar karava ani mulanna
10 th paryant marathi mediummadhech
shikvave
प्रिय श्रीमती अरुंधती गुंजकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले मायबोलीच्या प्रेमाने भरलेले पत्र वाचून आनंद झाला. आपण सर्व प्रयत्नपूर्वक हीच स्वभाषा व स्वसंस्कृतीच्या विषयीची भावना अधिकाधिक मराठीजनांच्यापर्यंत पोचवू शकलो आणि मराठी माणसाच्या स्वतःच्या भाषेबद्दलची अनास्था आणि न्यूनगंड दूर करू शकलो तर मग मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र निश्चितच जोराने प्रगती करू शकेल.
आपण खालील लेख वाचले आहेत का?
Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8
https://amrutmanthan.wordpress.com/2010/07/11/मातृभाषेचं-मानवी-जीवनातल/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/08/31/महाराष्ट्राच्या-सुजाण-जन/
राज्य मराठीचे.. इंग्रजी शाळांचे (ले० डॉ० प्रकाश परब, दै० लोकसत्ता, २२ नोव्हें० २०१०) –} http://wp.me/pzBjo-yx
Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH
वाचले नसल्यास सवडीने वाचून पहा. त्याबद्दलचे आपले मत आम्हाला कळवा. आवडलेले लेख आपल्या समविचारी मित्रबांधवांना वाचण्यास द्या.
शक्य त्या सर्व मार्गांनी मायबोलीप्रेमाच्या भावनेचा प्रसार करू या !!
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मराठी राजभाषा दिन साजरा करता करता ती व्यवहारात येवूदे…….
प्रिय श्री० दिलीप नवेले यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले म्हणणे अगदी खरे आहे. मराठी-भाषा-दिवस हा केवळ आपापसात पोकळ अभिमान व्यक्त करून फुकटच्या फुशारक्या मारायचा दिवस झालेला आहे. ज्याप्रमाणे राजकारणी मंडळी थोरामोठ्यांच्या जयंत्या वगैरे साजर्याे करतात, पण त्यांचे विचार मात्र कृतीत आणण्याचा प्रयत्न करीत नाहीत, उलट अनेकदा त्याविरुद्धच वर्तन करतात, तसाच हा सर्व प्रकार आहे.
मराठी-भाषा-दिनाच्या दिवशी केवळ मराठी माणसांत एकमेकांत मराठीचा अभिमान बोलून दाखवायचा आणि घराबाहेर पडल्यावर शेपूट आत घालायची आणि हिंदीचे (आणि इंग्रजीचे) पाय चाटायचे, ही मराठी माणसाची स्वाभिमानाची कल्पना !!
माझ्याच राज्यात, माझ्याच गावात, मी माझ्या भाषेमध्ये साधे दैनंदिन व्यवहारही करू शकत नाही, घराबाहेर मला माझी भाषा ऐकूच येत नाही, फारशी कुठे वाचायला मिळत नाही, उलट कोणी मराठी बोलल्यास त्याच्याकडे बाहेरील फालतू मुंबईमधील उपरे टॅक्सी-रिक्षावालेसुद्धा तुच्छतेने पाहून “मराठी नही समझता.हिंदी बोलो !!” असे फर्मावतात, ह्याबद्दल मराठी माणसाला कसलीच खंत वाटत नाही. “महाराष्ट्रातील मराठीकनांनी आपापसात काय हवी ती स्वाभिमानाची नाटकं करावी, प्रत्यक्ष समाजव्यवहारांत त्यांनी दुय्यम नागरिक म्हणूनच महाराष्ट्रात राहायला हवे” हा नियम आता सर्वसम्मत झालेला दिसतो.
रेल्वे आणि इतर सरकारी संस्थांतच नव्हे तर खासगी संस्थांत आणि कंपन्यांतदेखील मोठ्या संख्येने राज्याबाहेरच्या माणसांना आणून नोकर्या आणि कामाची कंत्राटे दिली जातात, तसे इतरत्र चालत नाही, फक्त महाराष्ट्रातच चालू शकते. इतर राज्यांत स्थानिक भाषेत पाट्या, फॉर्म (प्रपत्रे) उपलब्ध करणार्या, बॅंकाना महाराष्ट्रात ती गोष्ट अशक्य आणि अपमानास्पद वाटते, कारण हिंदी ऐकल्यावर किंवा वाचल्यावर मराठीची गरजच नाही अशी त्यांचीच नव्हे तर मराठी माणसांचीही खात्री झालेली असते. त्यामुळे सामान्यजनांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातील लोकांना नेमण्यापेक्षा उर्वरित भारतातून आपापल्या पित्त्यांना नेमून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे आणि मराठी माणसाला मात्र उपाशी ठेवणे, हे सहजशक्य होते.
गेल्या पन्नास वर्षांत विदर्भाचे हिंदीकरण पूर्ण झाल्यावर आता लवकरच तो महाराष्ट्रापासून तोडून ‘स्वतंत्र’ केला जाईल. ते यशस्वी झाल्यावर मुंबईची मनपा आणि राज्यशासन अमराठी लोकांच्या हातात गेल्यावर पुढील काही वर्षांत मुंबईलादेखील ‘स्व-तंत्र’ करण्याचे प्रयत्न केले जातील. मध्यंतरीच्या काळात पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी शहरे हिंदीकरणाच्या रांगेत पुढे सरकत आहेतच. शेवटी हरियाणा आणि राजस्थान ह्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्राची भाषादेखील हिंदीची पूर्णतः मांडलिक/गुलाम सिद्ध होईल आणि मग तिचेही हिंदीमध्ये विसर्जन केले जाईल आणि त्यांच्या भाषांप्रमाणे जनगणनेच्या वेळी मराठीभाषकांची संख्यादेखील हिंदीच्या भाषकसंख्येत जमा केली जाईल. अशाप्रकारे ह-रा-म ह्या राज्यांवरील हिंदीची सत्ता सिद्ध होईल. त्याहून अधिक राज्यातील जनता अशा प्रकारे लाचार आणि न्यूनगंडग्रस्त नसल्यामुळे हिंदीला अधिक मांडलिक मिळण्याची शक्यता मात्र कमी आहे.
तेव्हा मराठी-भाषा-दिनी मराठी माणसाने तोंडाने कितीही मराठीप्रेमाच्या बाता मारल्या तरी ह्या स्वाभिमानशून्य समाजाच्या नाड्या ज्यांच्या हातात आहे असे मराठीद्वेष्टे राजकारणी, उद्योगपती, सरकारी अधिकारी, नेते इत्यादी मंडळी आपल्याला मनातून छद्मीपणे हसतच आहेत, हे भान ठेवून निमूटपणे आपण मांडलिकाचे कर्तव्य चोखपणे बजावत राहायला हवे.
क०लो०अ०
अमृतयात्री गट