तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली (प्रेषक: श्री० आरोलकर)

लोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.

पत्रात एका वयोवृद्ध (वयवर्षे ८६) पण मनाने तरूण अशा आपल्या अतूट मराठीप्रेमी ज्येष्ठ मित्रवर्यांच्या पत्रातील हा एक महत्त्वाचा उतारा:

“परप्रांतीय भाषेचे उदाहरण देतो. माझा भाचा हैद्राबादेत पाटबंधारे खात्यात कामाला आहे. त्याने मस्टरवर ’तेलगू’ भाषेत सही करावी यासाठी त्याचे १ वर्ष increment थांबविले. तर त्याने त्याची ’तेलगू’ सही १ महिनाभर घोटली व दप्तरात ’तेलगू’त सही केली. (त्यानंतरच) त्याचे increment सुरू झाले. यावरून (महाराष्ट्र राज्य) शासनाने हा प्रश्न धसास लावला तर हा प्रश्न सोपा होईल असे वाटते. आपल्या भाषेवरील सडेतोड लेखनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! कळावे.”

असे अनेक बळजबरीने राज्यभाषा लादण्याचे प्रयत्न इतर राज्यांत बिनबोभाट चालू असतात. त्या राज्यांत कॉंग्रेसचे राज्य असो, कम्युनिस्टांचे असो, भाजपचे असो वा इतर पक्षांचे. पण त्यांच्या अशा स्वभाषाभिमानात व राज्यभाषा राज्यभर सक्तीने लादण्याच्या धोरणाखाली चाललेल्या नवनवीन प्रयत्नांत कसलाही खंड पडत नाही. त्यांना कोणीही संकुचित, देशद्रोही, फुटीरतावादी म्हणायला धजत नाही. तसे म्हटले तर न बोलता धीटपणे राज्यशासनाने करण्यासारखे खूप आहे; अगदी इतर राज्यांप्रमाणे टोकाची भूमिका न घेतासुद्धा !  पण इतर सर्व राज्यभाषांना असणारे घटनादत्त व कायदेशीर किमान अधिकारही मराठीला अंमलात आणायचे अधिकार नाहीत असा आज अलिखित नियमच झाला आहे.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात राज्यभाषा शाळांत, न्यायालयांत, शासनसंबंधित पत्रव्यवहारात, विधानसभेत, विविध शासकीय विभागांत, टॅक्सीचालक किंवा इतर परवान्यांसाठी, अनुदानासाठी, शासकीय मदतीसाठी, करार-दस्त व इतर कायदेशीर कागदपत्रांसाठी, विविध फॉर्म्ससाठी, जनसंपर्कासाठी, व अशा इतर शेकडो-हजारो क्षेत्रांमध्ये इतर राज्यांप्रमाणे अनिवार्य होऊ शकत नाही.

बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र व इतर राज्यांतील मंडळी अनेक दृष्टींनी स्वभाषा व स्वसंस्कृतीच्या बाबतीत अतिरेकी पद्धतीने वागत असले तरी त्यांना संकुचित, देशद्रोही, फुटिरतावादी असे कोणी म्हणत नाही कारण त्या विषयांत तेथिल सर्व जनता व सर्वच राजकीय पक्ष एकाच सुरात ते अभिमानगीत गातात. राज्य कॉंग्रेसचे आहे, की कम्युनिस्टांचे, किंवा भाजपचे वा एखाद्या राज्यस्तरीय पक्षाचे. त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीत खंड पडत नाही.

मात्र मराठी माणसाला भाषाभिमानाचा अधिकारच नाही असे इतरांनी (व आपल्यापैकी बर्‍याच जणांनीसुद्धा) परस्पर ठरवून टाकले आहे. त्यामुळे इतर राज्ये अगदी सहजच योजित असलेले उपाय योजून मराठी माणसाने स्वाभिमान व्यक्त करण्याचा जरादेखिल प्रयत्न केला तर त्याच्यावर केवळ परकीयच नव्हे तर त्यांच्याबरोबरीने आपले तथाकथित विशालहृदयी स्वकीयसुद्धा गिधाडासारखे तुटून पडतात. स्वतंत्र भारतात होणारा असा भेदभाव भारतावरील इंग्रजांच्या परकीय राजवटीत कधीतरी एखाद्या विशिष्ट समाजावर झाला असेल असे काय याबद्दल शंका वाटते. अर्थात हा सर्व आपणच आपणहून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.

आणखी काय लिहावे? मन सुन्न होऊन जाते नि बोलायला शब्द सुचत नाहीत. इतर सर्व भाषक आपल्या भाषेची आपल्या स्वतःच्या राज्यात जोपासना, संवर्धन, प्रसार करीत असताना आपले शासन, आपले नेते व आपण मात्र स्वाभिमानाच्या अभावामुळे व स्वभाषेबद्दलच्या औदासिन्यामुळे आपल्या मायबोलीला व मातृसंस्कृतीला अशीच पिचून लयाला नेणार का?

अर्थात इतरांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावे असे आमचे म्हणणे नाहीच. पण इतरांनी राजरोस अतिरेक केला तरी त्याबद्दल सर्व तथाकथित उच्चभ्रू मंडळी मूग गिळून गप्प बसतात व मराठी माणसाने आपले कायदेशीर हक्क बजावायचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर संकुचितपणाचा व फुटिरतावादाचा आरोप करून त्याला नामोहराम करून टाकतात ह्याकडे आम्हाला सर्वांचेच व विशेषतः स्वतः मराठी माणसाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. अशा पक्षपाती लोकांच्या मतांच्या आहारी जाऊन त्यांच्याकडे आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच आपण एकमेकांचे दोष काढत आपापसात भांडत बसण्यापेक्षा मराठी भाषा, मराठी संस्कृती व मराठी माणसापुढील इतर सर्वच आव्हान क्षेत्रांच्या (challenge areas) बाबतीत एकजूट करून स्वाभिमानपूर्वक व निश्चयाने मराठी माणसाची सर्वच आघाड्यांवर अधिकाधिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात अशी एकी साधण्यासाठी केवळ आपले धर्म, जात, पंथच नव्हे तर आपल्या राजकीय निष्ठांनाही आपल्याला बाजूला ठेऊन केवळ मायबोलीच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे.

वर उल्लेखलेल्या पत्राची छानणीकृत प्रत सोबत टाचली आहे, ती खालील दुव्यावरून अवश्य वाचावी.

अमृतमंथन_तेलुगू सहीविणा पगारवाढ रोखली_ले० श्री आरोलकर

.

आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य मांडावे.

.

टीप: वर उल्लेख केलेला लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ हा लेख ज्यांनी वाचला नसेल ते तो लेख याच अमृतमंथन अनुदिनीवर (एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)) इथे वाचू शकतात. मराठी माणसाच्या पुढील विविध आव्हानक्षेत्रांबद्दल चर्चा त्यात केली आहे.

– अमृतयात्री गट

.

12 thoughts on “तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली (प्रेषक: श्री० आरोलकर)

 1. मला असं वाटत की अश्या प्रकारे सक्ती करून फक्त रोष आणि दुही वाढेल. तसेच मराठीत सही आणि हिंदीत सही यात तसा काहीच फरक नाही. त्यामुळे इतर भारतीयांना तसा फरक पडणार नाही दक्षिणात्य लोकांशिवाय. असो. मुद्दा हा आहे कि महाराष्ट्रात सुद्धा ६०% लोक किंवा त्याही पेक्षा जास्त लोक आपली सही इंग्रजीत करतात. भारतातील इतर भागांमध्ये, राज्यांमध्ये सुद्धा राष्ट्र भाषेत सही करणे अनिवार्य नाही. त्यामुळे ह्या असल्या गोष्टी फक्त दाख्सिनात्या राज्यांमध्येच चालू शकतात.

  महाराष्ट्रातील सर्वच व्यावसायिकांनी प्रकर्षाने मराठी बोलणे, महाराष्ट्रातील लोकांनी आपापल्या मुला नातवंडाना कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी आपल्याच भाषेतून दिले पाहिजे. मराठी माध्यमातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च शिक्षण कसे सुधारेल या कडे लक्ष पुरवले पाहिजे. इतर भाषा सुद्धा म्हणजे हिंदी आणि विशेषतः इंग्रजी (सुरुवातीला तरी……म्हणजे मराठी भाषेचा सगळीकडेच जम बसे पर्यंत) शिकवावी. १-२ पिढ्यांना त्रास होईल पण तो सहन करून मराठीला तिचे वैभव प्राप्त करून देण्यास प्रत्येकाने हातभार लावावा. आपण स्वतः मराठी पुस्तके (ज्यांना शक्य आहे त्यांनी) विकत घेऊन नाही तर ग्रंथालयातून आणून वाचावीत. सर्व सार्वजनिक फलक मराठीतून असतील याची दखल घ्यावी. अश्या सह्या अनिवार्य करून काहीही चांगला साध्य ……निदान मराठीच्या बाबतीत तरी होईल असे वाटत नाही.

  अपर्णा

  • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल खरोखरीच आभारी आहोत. आपला गैरसमज झालेला आहे. कदाचित लेखामध्ये मराठी माणसाची भूमिका आम्ही योग्य रीतीने मांडू शकलो नाहीत असे वाटते. म्हणूनच दुप्पट खबरदारी म्हाणून लेखाशेवटी एका नवीन परिच्छेदाची भर घातली आहे. तो तपासून आता गैरसमज दूर होतो का त्याची खात्री करून घ्यावी व आम्हाला तसे कळवावे.

   लेखाखाली जोडलेला नवीन परिच्छेद असा आहे:

   “अर्थात इतरांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावे असे आमचे म्हणणे नाहीच. पण इतरांनी राजरोस अतिरेक केला तरी त्याबद्दल सर्व तथाकथित उच्चभ्रू मंडळी मूग गिळून गप्प बसतात व मराठी माणसाने आपले कायदेशीर हक्क बजावायचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर संकुचितपणाचा व फुटिरतावादाचा आरोप करून त्याला नामोहराम करून टाकतात ह्याकडे आम्हाला सर्वांचेच व विशेषतः स्वतः मराठी माणसाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. अशा पक्षपाती लोकांच्या मतांच्या आहारी जाऊन त्यांच्याकडे आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच आपण एकमेकांचे दोष काढत आपापसात भांडत बसण्यापेक्षा मराठी भाषा, मराठी संस्कृती व मराठी माणसापुढील इतर सर्वच आव्हान क्षेत्रांच्या (challenge areas) बाबतीत एकजूट करून स्वाभिमानपूर्वक व निश्चयाने मराठी माणसाची सर्वच आघाड्यांवर अधिकाधिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात अशी एकी साधण्यासाठी केवळ आपले धर्म, जात, पंथच नव्हे तर आपल्या राजकीय निष्ठांनाही आपल्याला बाजूला ठेऊन केवळ मायबोलीच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे.”

   गैरसमज लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहोत.

   आपल्या दुसर्‍या परिच्छेदातील सूचना पूर्णपणे योग्य आहेत ह्यात शंका नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. हो त्या नवीन जोडलेल्या परिच्छेदाने गैरसमज दूर होतो आहे. आणि अश्या प्रकारचे दुटप्पी वातावरण भारतीय राजकारण आणि शासकीय धोरण यात दिसते. म्हणजे उत्तर प्रदेशात मुलायम सिंग आणि कंपनीने हिंदीतूनच सगळे व्यवहार व्हायला पाहिजेत असं आग्रह धरून कायदा केलेला चालतो पण हेच मुंबई मध्ये शिवसेना किंवा मनसे म्हणाली कि तो म्हणजे भारतीयांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रकार. नेहरूंनी भाषावार प्रांत रचना केली म्हणजे तो त्यांचा पुरुषार्थ, बेळगाव आणि परिसरातील मराठी लोकांवर आणि मराठी या भाषेवर अन्याय होत आहे पण ते योग्य आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे म्हणजे देशद्रोह!! अजबच आहे सगळं.

  धन्यवाद,

  अपर्णा

  • प्रिय सौ० अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या आधीच्या सूचनेबद्दल व आता व्यक्त केलेल्या समाधानाबद्दल अत्यंत आभारी आहोत.

   बर्‍याच वेळा लेखकाला आपल्या लेखात स्वतःच्या विचारांचे जे प्रतिबिंब दिसत असते ते तसेच वाचकांना दिसते असे नाही. अशा वेळी आपल्यासारख्या वाचकांनी आपुलकीने जर प्रतिमत दिले व लेखकाला लक्षात आले की आपल्याला जे म्हणायचे आहे ते तसेच व्यक्त होत नाही आहे; तर मग तो लेखात सुधारणा करू शकतो.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. हे पहा ! मी ११ वर्षे मुंबईत शासकिय सेवेत होतो. मी जाणिवपुर्वक मराठीतून अर्ज मागत असे.उत्तर मराठीतच देत असे.विवाद प्रकरणांचे अहवाल मराठीत लिहित असे. कुठेही कटुता वगैरे आली नाही.किंबहूना शासकिय नियमावलीचे माहाराष्ट्र पातळिवरचे काम मराठित करण्याची संधी मला मिळाली.त्याचा परीणाम उलट चांगलाच झाला.

  • प्रिय श्री० सावधान यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   असेच अनुभव सर्वांना येवोत, किंबहुना आपण तसे अनुभव हट्टाने, जिद्दीने, स्वाभिमानपूर्वक मिळवू.

   स्थानिक भाषेचे सर्वोच्च स्थान हा मुद्दा इतर सर्वच राज्यांत वादातीत असतो. फक्त महाराष्ट्रातच त्यावर परप्रांतीय वाद घालतात कारण ते तसा वाद घालू शकतात व तो आपण ऐकून घेतो. सर्वच ठिकाणी मराठी भाषा व्यावहारिक दृष्ट्या अनिवार्य झाली असती तर असे घडले नसते. पण स्वतःहून इतरांना मराठीपासून दूर ठेऊन हिंदी किंवा इंग्रजीच बोलायला भाग पाडणे ह्या आपल्या करंट्या वृत्तीमुळे हे सर्व घडते. ती सर्वांनी बदलली, व आपल्या राज्यात स्वाभिमानपूर्वक शक्य त्या सर्व ठिकाणी मराठीचाच उपयोग करू लागलो तरच ही परिस्थिती पूर्णपणे बदलेल. अन्यथा “हिंदी में बोलो” असे आपल्यालाच दटावलेले ऐकावे लागते, ते तसेच चालू राहील. “असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला”.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • >>तेलुगूत सही केली नाही म्हणून एक वर्ष पगारवाढ रोखली.<< असे करायला कायद्याचा कुठलाही आधार नाही. (मुळात पगारवाढ एका वर्षानेच मिळते ती गोष्ट वेगळी.) सहीला भाषा किंवा लिपी नसते. तिची सहज़ासहजी नक्कल करता येऊ नये असे काहीही सही म्हणून भरकटले तरी चालते. मात्र सही कशी करायची ते एकदा ठरवले की तिच्यात विनाकारण बदल करायला वाव नसतो. माझी इंग्रजीत केलेली सही उर्दूत केल्यासारखी दिसते. तिच्या दिसण्यावर कुणाचा कधी विरोध झालेला नाही. अर्थात माझी सही कुणालाही वाचता येत नाही पण संबंधितांना ओळखता येते. -SMR

    • प्रिय शुद्धमती राठी यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     काही राज्यांत राज्यशासनाच्या अधिकार्‍यांनी राज्यभाषेतच सही केली पाहिजे असा नियम असल्याचे ऐकले आहे. तसा महाराष्ट्रातही आहे असे कोणी सांगितले. संदर्भ मिळालेला नाही. अर्थात तसा नियम यदाकदाचित असला तरीही त्याची अंमलबजावणी करण्याची हिंमत आपल्या शासनकर्त्यांकडे नाही हे सागायला नकोच.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 4. marathi matrubhashiks, especially rj/dj,political leaders/mantris and santris etc., should not bring the words from english/hindi in their own bhasha unnecessary and spoil their language. They should not address or give speach in english/hindi to print/electronic media. They should remember that 95% of marathi speaking people do not like this.
  So let every marathi should take an oath to speak in marathi (and not when they are fighting with words with other bhashiks) at least on the auspicious day of gudi padwa-2010.

  • प्रिय श्री० डी० डी० पानसे यांसी,

   आपले म्हणणे १००% योग्य आहे.

   आपले मराठी नवीन वर्षानिमित्त करायच्या प्रतिज्ञेबद्दलचे आवाहन पाळण्याचा सर्वजणांनी कसोशीने प्रयत्न करावा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० नीलेश लिंबोरे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपली तीनही विधाने योग्य वाटतात. मराठी माणसे आपापसात भांडत बसतात व त्यामुळे शतृचा फायदा होतो. इतर माणसे आपापसात भांडतच नाहीत असे नाही. पण आपले राज्य, आपली भाषा, आपली संस्कृती यांच्या विरोधात कोणीही काही वक्तव्य किंवा कृती केली तर ते सर्व एक होऊन त्याच्यावर धावून जातात. बंगालात एरवी एकमेकांचे गळे धरणारे कम्युनिस्ट, कॉंग्रेसवाले, तृणमूल व फॉर्वर्ड ब्लॉकवाले बंगाली विरुद्ध कोणी ब्र जरी काड्जला तरी एकजुटीने त्याला नेस्तनाबूत करतात. त्यामुळे बंगाल, तमिळ नाडू, कर्नाटक, अशाच राज्यांत नव्हे तर आसाम, ओरिसा अशी तुलनेने आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या राज्यांतही स्थानिक जनतेच्या भावनांचा, भाषेचा, संस्कृतीचा मान राखला जातो. मात्र इथे आमच्या महाराष्ट्रात आम्ही एकमेकांशी लढण्यातच धन्यता मानतो व आमचे राजकारणीही आम्हाला तसेच झुंजवत ठेवतात. त्यामुळे आम्ही इतरांपुढे अत्यंत दुर्बळ व क्षीण ठरतो. म्हणूनच सर्व भेदभाव विसरून “धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी” ह्याच भावनेने आपण एकत्र आले पाहिजे व सतत तसेच एकजुटीने राहायला पाहिजे. आपण खालील लेख वाचले नसल्यास अवश्य वाचा.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

   राजकीय पक्षांबद्दल म्हणाल तर आपल्याला कुठल्याही एका राजकीय पक्षाच्या आहारी जायचे नाही. पण ज्यांना आपली मते पटतात त्यांनी आपापल्या पद्धतीने, मार्गाने त्यांचा पाठपुरावा अवश्य करावा. मायबोलीचे प्रेम ही आपली मक्तेदारी नव्हे. ज्या कोणालाही आपल्या आईबद्दल प्रेम वाटेल त्याने तिच्या भल्यासाठी, संपन्नतेसाठी प्रयत्न करावेत. बंगालात जसे कॉंग्रेस, तृणमूल, कम्यूनिस्ट व इतर सर्व स्थानिक पक्ष मायबोलीच्या मुद्द्यावर झटतात तसे इथेही घडायला हरकत नाही, किंबहुना तसे घडले तर आपणा सर्वाना आनंदच वाटेल, नाही का?

   वरील “एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट” या लेखात आपल्याच मुद्द्यांबद्दल अधिक विस्ताराने भाष्य केले आहे. अवश्य तपासून पाहा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s