मराठी टिकेल काय? (अग्रलेख: दै० सामना, दि० १० डिसें. २००९)

दिनांक ११ डिसेंबर २००९ च्या ’दैनिक सामना’चा वरील शीर्षकाचा अग्रलेख वाचनीय आहे. अग्रलेखातील राजकीय छटा जरी दृष्टीआड केली तरी त्यात मांडलेले वास्तव हे एक भयानक सत्य आहे. एकीकडे नवीन मराठी शाळांना अनुमती नाकारायची व दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या शाळांच्या विविध मार्गांनी मुसक्या बांधून त्यांचा दर्जा कसा खालावेल व त्यांच्यापासून मराठी माणूस दूर जाऊन तो इंग्रजी शाळांकडे कसा वळेल यासाठी योजनाबद्ध पद्धतीने प्रयत्न करायचे हेच शासनाचे शिक्षणविषयक अलिखित धोरण आहे.

इंग्रजी शिक्षण म्हणजेच उत्तम शिक्षण व मराठी भाषेत उत्तम शिक्षण मिळूच शकत नाही असा कांगावा सर्वकडे करून मराठी शाळा बंद पाडण्यामागे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने शाळा, महाविद्यालये उघडून बसलेल्या शिक्षणक्षेत्रातील धंदेवाईक राजकारण्यांचा कसला स्वार्थी हेतु असू शकतो हे न कळण्याइतकी सामान्य जनता मूर्ख नाही. अर्थात ज्यांना त्याच्यापासून त्रास होत आहे असा वर्ग फारच विभाजित, एकजूट नसलेला असल्यामुळे राजकीय दृष्ट्या दुर्बळ ठरतो.

सामना हे जरी शिवसेनेचे मुखपत्र असले तरी या अग्रलेखात नोंदलेल्या वस्तुस्थितीत बरेच तथ्य आहे हे नक्की. अर्थात इतर अनेक कमी महत्त्वाच्या मुद्द्यांवर शासनावर विविध प्रकारच्या मार्गांनी दबाव आणणारे हेच विरोधक मराठी शिक्षणासारख्या मूलभूत मुद्द्यांच्या बाबतीत मात्र गेल्या दहा वर्षांत शासना्च्या बेपर्वाईच्या वर्तणुकीवर काहीही प्रभाव पाडू शकलेले नाहीत, हेसुद्धा मराठीचे तेवढेच मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. म्हणजे हा सर्व प्रकार म्हणजे शासन व विरोधकांची लुटुपुटुचीच लढाई असते की काय असाच संशय वाटायला निश्चितच जागा आहे.

बारा-तेरा वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू प्रा० राम जोशी यांच्या समितीने तयार केलेला शिक्षणविषयक धोरणाबद्दलचा एक अत्युत्तम अहवाल युती सरकारनेही नीटसा अंमलात आणला नाही व नंतर कॉंग्रेसच्या रामकृष्ण मोरे या शिक्षणमंत्र्याने केराच्या तो टोपलीत फेकून देऊन त्याचा उपयोग केवळ प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी केलेल्या शिफारशींच्या विरुद्ध कृती करण्यासाठीच केला. शिक्षणासारख्या अतिमहत्त्वाच्या विषयात तज्ज्ञांनी केलेल्या अहवाल कुचकामी आहे हे एक राजकारणी कसे ठरवू शकतो?

एकीकडे अमराठी शाळात मराठी विषय अनिवार्य करण्यास चालढकल आणि दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळांच्या नाड्या आखडण्याचे काम करणे, अशा दुहेरी पद्धतीने राज्य शासन मराठी शिकषणच संपवायला निघाले आहे. मराठीचे शिक्षण बंदच केले तर मराठी साहित्यनिर्मिती, मराठीतून ज्ञानाचा, संस्कृतीचा प्रसार कसा होणार? एका भाषेतील संस्कृतीचा प्रसार हा पूर्णपणे परदेशी, परकीय अशा भाषेतून होऊच शकत नाही. म्हणूनच मराठी भाषा टिकली नाही तर मग मराठीची संपन्न संस्कृती, परंपरा या सर्वांचाच तो शेवट ठरेल.

या विषयात शासनकर्ते वरवर नेहमीच मराठीप्रेमाचा देखावा करीत असले तरी त्यांची प्रत्येक कृती ही मराठी शाळांचा अधिकाधिक गळा घोटण्याच्या दिशेनेच असते. इतके की बेळगाव-कारवार यासारख्या कर्नाटकातील मराठी भागातही मराठी शाळा बंद पाडून मराठी भाषा व संस्कृती संपवण्यास कशा विविध क्लृप्त्या रचाव्या यासाठी कर्नाटक शासनाने आपल्या महाराष्ट्र शासनाचीच शिकवणी ठेवावी.

पण पुन्हा प्रश्न उरतो तो म्हणजे आपण काय करायचे? एकीकडे शासनाने ’कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ असे धोरण स्वीकारले आहे व विरोधक फक्त लांबूनच गुरगुरून दाखवायचे वरवरचे डावपेच खेळत आहेत. यातील कोणालाही आपण जनतेच्या प्रति उत्तरदायी आहोत असे वाटत नाही. अशा परिस्थितीत आपण सामान्य माणसानेच एकजूट करून विविध मुद्द्यांवर शासन आणि विरोधकांस जाब विचारला पाहिजे.

सामन्यातील प्रस्तुत अग्रलेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे; अवश्य वाचा.

अमृतमंथन-मराठी टिकेल काय_सामना अग्रलेख_111209

सामनाचा हा अग्रलेख आपले वाचकमित्र श्री० प्रसाद परांजपे यांनी पाठवला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार.

.

आपले प्रतिमत लेखाच्या खाली अवश्य नोंदवावे.

– अमृतयात्री गट

26 thoughts on “मराठी टिकेल काय? (अग्रलेख: दै० सामना, दि० १० डिसें. २००९)

 1. My education was in marathi medium, I have completed engineering and I am in US at the moment. I do not believe that education in english medium has any advantage at all !
  I see one issue with most of these articles. They always seem to blame someone or something else. When we blame the government, we need to ask “Whose government is this ?”. Also why do we take such a soft approach to most important things like making Marathi compulsory ? Why do we leave these matters only to parties like Shivsena or MNS ?. Although they must do this,
  this should be insisted by each and every Marathi person at each and every place.
  Most important thing is to do this in firm and non confrontational way.
  Most of the times we start to fight where we do not need to. This way we end up trapping ourselves and giving others a chance to do opposite of what is right.
  There is a famous saying “Marathe Ydhdhat jinkatat pan tahhat haratat” (Marathe win the war but lose the negotiations.)
  We need to learn from this saying and learn it fast.

  • प्रिय श्री० प्रदीप देशपांडे,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभार. आपले प्रत्येक वाक्य योग्यच आहे. आम्ही व आमच्या आजुबाजुचे मराठी शाळेत शिकलेले अनेक मित्र आज भारतात व जगभरात इतरत्र अत्यंत (ऐहिक व सांस्कृतिक दृष्ट्यासुद्धा) उच्च, संपन्न आणि समाधानी स्थितीत आहोत.

   शिवाय केवळ राजकारण्यांच्या नावाने खडे फोडण्याने प्रश्न सुटणार नाहीत हेसुद्धा खरे आहे. सर्वसामान्य जनतेला शासनाने काही करावे असेल असे वाटत असेल तर तसे करवून घेण्यासाठी एकजुटीने शासनावर दबाव आणला पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात एकजूट मात्र बांधली पाहिजे.

   सर्वच राज्यांतील राजकारणी थोड्याफार फरकाने सारखेच असले तरी इतर राज्यांत निदान स्वभाषा व स्वसंस्कृती या विषयांच्या बाबतीत तरी ते जनतेच्या दबावापुढे नमून असतात. दुर्दैवाने महाराष्ट्रात आपण तसा दबाव राजकारण्यांवर भाषा-संस्कृतीच्या बाबतीतही आणूच शकलेलो नाही. सर्वसामान्य जनतासुद्धा आज पुंगीवाल्याच्या मागे धावणार्‍या उंदराप्रमाणे इंग्रजीच्या मागे धावत आहे. मराठी शाळेमध्ये शिकूनही तेवढेच किंबहुना अधिक पक्के ज्ञान मिळू शकते, शिवाय इंग्रजीसुद्धा उत्तमरीत्या शिकता येते हे लोकांना शक्यच वाटत नाही. केवळ इंग्रजी भाषेतच ज्ञान मिळेल नाहीतर नाही अशी वेडगळ कल्पना आपण करून घेतली आहे. ज्ञान हे साध्य असले तर भाषा हे साधन आहे. आणि मातृभाषेवढे प्रभावी साधन दुसरे असूच शकत नाही. हे जगभरातील तज्ज्ञांनी मान्य केलेले तत्त्व आपल्याला उमजतच नाही. आणि त्याचाच फायदा राजकारणी घेतात कारण त्यांना त्यांच्या धंद्याची काळजी असते, जनतेचे भले म्हणजे काय आणि कशाशी खातात आणि त्याच्याशी राजकारण्यांचा संबध काय?

   मराठीत शिकून स्वतः प्रगती केलेले पालकही मुलांना इंग्रजी शाळेतच घालतात; हे सुद्धा एक कारण आहेच. याची विविध कारणे आहेत व त्यातील काही मूलभूत, पायाभूत सोयींशी संबंधित आहेत. त्यांच्या बाबतीत तरी शासन बरेच काही करू शकते. शाळांना इमारत, वर्ग, वाचनालये, प्रयोगशाळा, शिक्षकांचे प्रशिक्षण अशा व इतर मूलभूत सोयींसाठी शासनाने मदत करायलाच पाहिजे. जपान, इस्रायल, चीन, कोरिया व अनेक युरोपीय देशांप्रमाणे आपले शासन इंग्रजीतील ज्ञान स्वभाषेत आणून ते बहुजनसमाजाला गावोगावच्या शाळा-महाद्यालयांत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन बरेच काही करू शकते. उच्च न्यायालयाखालील कनिष्ठ न्यायालयांत तमिळ लागू करून झाल्यावर न्यायालयात तमिळभाषा लागू करण्याएवढी सक्षम करण्याच्या योजनांसाठी तमिळनाडू शासनाने ३०० कोटी उपलब्ध करून दिले. महाराष्ट्र त्याच्या एक शतांशदेखिल खर्च करीत नाही. आणि जेव्हा तसे काही करणे तर सोडून उलट वास्तवात असलेल्या सोयीसुविधासुद्धा मोडकळीस आणण्याचेच प्रयत्न महाराष्ट्र शासन करताना दिसते तेव्हा फारच दुःख होते. आपण खरोखरीच एवढे अगतिक झालो आहोत का?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० बाळ संत यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   “मौनं ’सर्व-अर्थ’ साधनम्‌” या उक्तीवर गाढा विश्वास ठेवणारे हे बुद्धिमान राजकारणी पुरुष सहसा फार त्रागा न करता आपले सर्वार्थसाधन करण्यात कुशल आहेत.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले म्हणणे अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी इंग्रज व मेकॉले यांच्या गुरूकुलविषयक धोरणाची माहिती वाचकमित्रांना द्याल काय?

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • नमस्कार!!
    लॉर्ड मेकॉले आणि त्याचे हिंदुस्थानातील शिक्षणविषयक धोरण या विषयी अधिक माहिती “The Beautiful Tree ” हे धर्मपाल यांनी लिहिलेले पुस्तक जरूर वाचावे. हिंदुस्थानातील गुरुकुल पद्धतीचे शिक्षण हेच आपल्या उच्च प्रतिच्या संस्कृतीचा पाया होता. हे लॉर्ड मेकॉले ने हेरले. (यया संदर्भात एक गोष्ट सुद्धा धर्मपाल यांच्या पुस्तकात आहे.
    एकादा नेहमी प्रमाणे लॉर्ड मेकॉले त्याच्या कचेरीत सकाळी बसला असताना त्याने खिडकीतून बाहेर एक विचित्र दृश्य बघितले. त्याच्याच कचेरीतील एक कारकून कचेरीच्या दारावरील शिपायाला वाकून नमस्कार करून आत जाताना त्याने पाहिले. नंतर त्याने त्या कारकून कडे झाल्या प्रकारची विचारणा केली. त्या कारकुनाने दिलेले उत्तर मेकॉलेला धक्का देवून गेले. तो कारकून म्हणाला कि तो दरवाजातील शिपाई त्याच्या गावातील एक वयस्कर व्यक्ती आहे. आणि आमच्या संस्कृतीत असे सांगितले आहे कि वयस्कर व्यक्तीचा आदर करावा. ते आम्हाला वडिलांच्या जागी आहेत. मग ते कोणतेही काम करत असूदेत. या प्रसंगाने त्याला समजून चुकले की जो पर्यंत ही संस्कृती जिवंत आहे तो पर्यंत हिंदुस्थान वर पूर्णपणे कब्जा करणं शक्य नाही. ही संस्कृती जर बदनाम करायला सुरुवात केली तर काही तरी फरक पडेल. मग ह्यांच्या संस्कृती मधील वाईट गोष्टीच मुख्यतः समोर आणून त्यांचा प्रचार करायचा. म्हणजे या लोकांना त्याची लाज वाटू लागेल. आणि मग ते आपोआपच आपल्या संस्कृतीचा स्वीकार करतील. पण हे वाटते तितके सोपे नव्हते. कारण या संस्कृतीचा मूळ हे गुरुकुल शिक्षण पद्धती मध्ये होते. गुरुकुलांना विविध संस्थाने तसेच काही मंडलिक राजे यांच्या कडून अनुदान मिळत असे. जेंव्हा इंग्रजांनी ही संस्थाने ताब्यात घेतली आक्रमण करून किंवा कपटाने, त्या वेळी या गुरुकुलान्चा राजाश्रय काढून घेतला गेला. त्यांचे अनुदान हळूहळू कमी करून पूर्णपणे बंद करून टाकले. त्यामुळे बरीच गुरुकुले बंद झाली. त्याचा परिणाम हिंदुस्थानातील मुले missionary लोकांच्या शाळेत जाऊ लागले. आणि हळूहळू इंग्रजांना त्यांची संस्कृती पेरण्यात यश आले. परिणामी त्यांना हिंदूस्थानवर राज्य करणे शक्य झाले.

    सध्याची परिस्थिती फारशी वेगळी वाटत नाही. सगळ्या सरकारी शाळांमध्ये तसेच मराठी अनुदानित शाळांमध्ये गुणवत्ते पेक्षा जातीवर आधारित शिक्षक भारती करून शिक्षणाचा दर्जा खालावला. आता इंग्रजीच दूध पाजून त्यांना बलवान करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. या सगळ्या राजकारणात शिक्षणाचा मूलहेतू बाजूलाच राहिला आहे. आता त्यावर कडी म्हणजे अनुदान बंद करणार आहेत. मेकॉलेच्या काळात आणि आता फरक इतकाच आहे की राज्य करू इच्छिणारे स्वकीयच आहेत आणि स्वकीयच आपल्या मातृभाषेचा गळा घोटू पाहत आहेत.

    इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा दर्जा काही उत्तम आहे असे नाही. पण आपला मूल जरा तरी स्मार्त दिसेल आणि चार इंग्रजी शब्द बोलेल म्हणून पालक पण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात. ह्यावर खालील उपाय होऊ शकतात.
    १) मराठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालून इंग्रजी पण व्यवस्थित शिकवायचा.
    २) इंग्रजी माध्यमाच्या तसेच इतर माध्यमाच्या शाळां मध्ये मराठी ही दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून शिकणे क्रमप्राप्त करणे.
    ३) ज्यांचे मराठी चांगले आहे आणि जे उच्च शिक्षित आहेत त्यांनी आपापल्या विषयाची चांगला दर्जा असलेली मराठी पुस्तके लिहून प्रसिद्ध करावीत.
    ४) मराठी भाषा शिकण्या साठी प्रोत्साहन द्यावे.
    ५) बँक व इतर व्यवहार हे मराठीतूनच होतील (सर्व बँकांमध्ये) याची खबरदारी घ्यावी.
    ६) आपल्या मुलांना तसेच आपण स्वतः ती व्ही वरील मालिका पाहण्या पेक्षा मराठी गोष्टी सांगाव्यात, वाचाव्यात, मराठी पुस्तके वाचावीत, मराठी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण करावी.
    ७) कोणतीही भाषा ही गुण मिळवण्या पुरती किंवा पास होण्या पुरती शिकायची नसते तर ती व्यवहारासाठी तसेच इतर विषय शिकण्या साठी, स्वतःला व्यक्त करण्या साठी शिकायची असते हे पक्के बिंबवावे.

    मग कशाला मराठी जगतेय का असा प्रश्नच येईल?

    धन्यवाद
    अपर्णा

    • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपल्या माहितीपूर्ण पत्राबद्दल आभार. ही बहुमोल माहिती अमृतमंथनाच्या वाचकांनासुद्धा सुरस व उपयोगी वाटावी.

     आपण केलेल्या सूचनासुद्धा विचार करायला लावणार्‍या आहेत. वाचकांनी त्यावर विचार करावा व ज्या पटतील तेवढ्यांवर तरी नक्कीच कृती करावी. आपण प्रत्येकाने राजकारणी व समाज यांना दोष देऊन मोकळे होण्यापेक्षा स्वतःपासून कृती करणे सुरू केले तर या विषयी नक्कीच सुधारणा होऊ शकेल.

     आभारी आहोत.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 2. नमसस्कार,

  अग्रलेखात सदर लेखात म्हटल्या प्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक हे बघ्याची भूमिका घेतात याचे एकमेवे कारण म्हणजे मराठीबद्दलची आस्था कोणालाच नाही. जर आस्था असती तर मग कृतीची अपेक्षा करता येते.

  दुसरे मला असे जाणवते की मराठीचे संवर्धन म्हणजे काय या बद्दल मराठीप्रेमींच्या मधे अभ्यासाच्या अभावामुळे आलेली अस्पष्टता. कोठेतरी साहित्य संमेलनाला हजेरी लावणे किंवा आपल्या गावात साहित्य संमेलन घेणे म्हणजे मराठी संकृतीचे संवर्धन नव्हे हे आमच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या लक्षातच येत नाही. चार वेगवेगळ्या रंगांच्या साहित्यीकांना काही मदत करणे म्हणजे मराठीचे संवर्धन नव्हे.

  अनेकवेळा ज्यांचा आर्थिक व्यवहार मराठीत आहे अश्या मराठी सेलिब्रिटीज (उदा: नाट्य सिनेमा कलावंत ) याच्याकडेही ही स्पष्टता नाही. त्यांच्याही मानेवर हिंदी राष्ट्रभाषा हे भूत स्वार झालेले असते. त्यांना त्यांच्या लोकप्रियतेमुळे असे वाटते की मराठीच्या संवर्धनाची काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

  मराठीचे संवर्धन म्हणजे मराठी ही ज्ञानभाषा करणे. जीवनाच्या सर्व अगांत आर्थिक, सामाजिक आणि विचार विश्वात सर्व व्यवहार मराठीतून करणे म्हणजे मराठीचे संवर्धन आहे.

  पण हे लक्षात कोण घेतो ?

  • प्रिय श्री० नितीन यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले सर्व मुद्दे योग्यच आहेत. मराठीचे संवर्धन या विषयाला निरनिराळे पैलू आहेत. त्या सर्वच पैलूंचा विचार करून विविध पातळ्यांवर काम करावे लागेल. शासन किंवा राजकारणी यांचे भाषा व संस्कृतिविषय प्रेम सहसा बेगडी असते. भाषा-संस्कृती-शिक्षण खात्याला अत्यंत कनिष्ठ मंत्री मिळतो यात बरेच काही आले.

   आता सामान्य माणसालाच जर काही लोकजागृती करून शासनावर दबाव आणता आला तरच काही आशा. अन्यथा परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होणार हे नक्की.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री

 3. आपले राज्य़ सरकार फक्त पैशांसाठि काम करते. त्य़ामुळॆ यात काहि आश्चर्य नाहि.
  आणि नविन मराठि शाळांना परवानगि देउन तरि काय करणार? कोण जाणार त्य़ा शाळेत?
  आज अशी परीस्थिती आहे कि मराठि शाळेत घालणे म्हणजे पोराचे नुकसान करणे आहे.
  असाच समज सर्वत्र आहे. त्यामुळे जे चालले आहे ते मराठि जनतेला हवे आहे असाच अर्थ
  निघतो. उद्या याचे जे काहि बरे वाइट परिणाम होतिल त्याला आजची पिढि जवाबदार असणार आहे.
  मरठि शाळेत मुले नाहि म्हणुन शिक्षकांना काढुन टाकण्याची वेळ आली आहे. चांगल्या मराठि शाळा
  उरल्यात कुठे? आधि पारतंत्र्य होते इंग्रजांचे आणि आता इंग्रजीचे. जे लॊक मराठि साठि गळा काढतात
  त्यांची मुले इंग्रजी शाळेत जातात. यातुन लोकांनि काय बोध घ्यायचा?

  आपला

  किशोर दिक्षित.

  • प्रिय श्री० किशोर दीक्षित यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपला उद्वेग आम्ही समजू शकतो कारण आमच्याही तशाच भावना आहेत. (श्री०प्रदीप देशपांडे यांच्या पत्राला दिलेले उत्तर पहावे. त्यात आम्हालाही आपल्याप्रमाणेच प्रश्न पडलेले आहेत.)

   पैसे मिळवण्याचे उद्योग खासगी क्षेत्रावर सोपवून खर्‍या अर्थाने समाजहिताची कामे करण्याच्या योजना शासनाने राबवणे अपेक्षित असते. पण केवळ पैशासाठीच काम करण्यासाठी शासनसंस्था आहे अशी जर राजकारण्यांची धारणा असेल तर गरीबांसाठी शाळा, रुग्णालये, कृषिला मदत, शिधावाटप, अपंग-मागासलेले-दलित लोकांना मदत, अशासारखे सामाजिक प्रकल्प बंद करून शासनाने दारू, सिगरेटचे कारखाने अशाप्रकारचे नैतिकानैतिकतेचा विचार न करता केवळ पैसे कमावण्याचेच उद्योग करावेत.

   केवळ आर्थिक लाभासाठीच शासनाने उद्योग करायचे असतील तर मग त्यांना कर तरी का भरायचे? त्यांनी फायदा कमवावा आणि सरकार चालवावे. त्याही पुढे जाऊन असेही म्हणता येईल की लोकप्रतिनिधींक्षा औद्योगिक क्षेत्रातील धुरिणांना जर शासन व्यवस्था, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, अगदी स्थानिक पातळीवर देखिल नगरपालिका, जिल्हाप्रशासन व ग्रामपंचायती चालवायला देऊन जास्तीत जास्त पैसे कमवावे. देशाची झाली नाही तरी मोजक्या व्यक्तिंची भरभराट होईल.

   खरंच मेंदू सुन्न व्हावा अशीच सर्व परिस्थिती आहे.

   आभारी आहोत.

 4. Aaj Marathichi hi dasha honyas baryach anshi aapanach jababdar aahot,karan nivdun dilelya netyakadun kam karun ghene aapalyala mahitach nahi. tyasathi lagnari vaicharik patrata aapan gataleli nahi.Netyane hawe tase wagayache ani aapan mug gilun gapp basayache yashivay dusare kahihi hot nahi. Marathicha angar phulanya aadhich vizun gela aahe.Khare tar hi phar mothi rajkiya kheli aahe. Mumbai Maharashtrala denar nahi ase je mhanat hote tyanna dekhil maghar ghyavi lagali pan ti phakt dakhawanya puratich hoti he ata sidha hot ahe, Kase?
  Mumbai Maharashtrat aahe pan Mumbait Maharashtra nahi he kashyache dhyotak aahe?
  Marathicha chalalela chhal ankhi kay sangate?
  Geli 50 varshe he kam agadi bin bobhat chalu aahe pan marathi samaj zopalela aahe ani novdun dilelya ekahi netyala Arthkaranashiway kahihi samajat nahi.
  Samaja che prabodhan karanari mandali aaj astitwat nahit he durbhagy.Aaj amhala phat don velachya bhakarichi kalaji aahe pan hech aaplya pudhcya pidhila mahagat padnar aahe.Aplya agodarachya pidhine swa-sukhacha tyag kela mhanun aaj apan swatantra aahot pan apalya mulech pudhachi pidhi swatachya gharatach partatryat asel.
  Phar ushir zala asala tari ajunahi vel geleli nahi.Garaj aahe ti Samajache prabodhan ghadwun aananyachi.
  Aata prashna urato to Manjarachya galyat ghanta bandhanar kon? ha.Tyasathi phar kahi karayala nako.Marathi jagaran manch stapun tyadware anek karykram karun marathi samajache prabodhan karu shakato.
  Ani shewati Mahatma Gandhijinchya Satyagrahacha awalamb karun hi rajakiy kheli modun kadata yevu shakate.Mala manya aahe, he karane titakese sope nahi parantu Avaghad Shiv Dhanushya pelane hich tar Marathi Manasachi khari olakh aahe
  Tevha Chhatrapati Shivaji Maharajyanchya, Rakat – kankhar dagadanchya desha , He Marathi Manasa uth aata tari jaga ho aani Marathi tej punha ekvar sarv jagala disha sthabh mhanun karyanvit kar.

  Anavdhanane kahi chuk zali asalyas kshamasw.

  Suresh Bhagade

  • प्रिय श्री० सुरेश भगडे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   अत्यंत उत्तम शब्दांत विचार मांडलेत. आपला शब्दन्‌-शब्द पटला. आपल्या प्रत्येक वाक्याने काळजाला घरे पडली.

   आपल्या सारख्या (तुमच्याआमच्यासारख्या) मराठीप्रेमी माणसांनी मोठ्या संख्येने एकजूट बांधली व एकत्रपणे एकेक मुद्द्यावर काम केले तर आपण बरेच काही साधू शकू. तशी चळवळ आपण सुरू करू शकू काय? तसे करण्यासाठी व एकजूट बांधण्यासाठी काय करावे? व्यक्तिशः आपण काय करू शकाल? एकत्रितपणे स्थानिक गट स्थापून व ते पुन्हा राज्य पातळीवर एकमेकांशी जोडून आपण काही करू शकू काय? सर्वच वाचकांनी नक्की विचार करून आपापली मते मांडावीत.

   यातून काही निष्पन्न झाले तर उत्तमच. आपल्या आईचे ऋण अंशतः तरी फेडण्याचा तो प्रयत्न ठरेल. नाही झाले तरी आपण आपल्या सदसद्‌विवेक बुद्धीला स्मरून यथाशक्ती सर्वकाही केल्याचे समाधान आयुष्यात मिळेल.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० विनय आठल्ये यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपले म्हणणे योग्यच आहे. शासनाला स्वतःहून काही उपरती होईल हे शक्य नाही. आपणच एकजुटीने काही करू शकलो, आणि शासनावरही दडपण आणून काही करवून घेऊ शकलो तरच काही सुधारणा होऊ शकेल. पण ते शक्य आहे का? एकजूट घडवण्यास काय करावे? आपण स्वतः त्यात कशा प्रकारचा सहभाग घ्याल?

   नक्की विचार व्हावा.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. Thank you for all the responses. In all of these responses, one thing is seen common. Every one seem to agree that situation is very serius.

  So what can be done ?
  Can people raise money where ever required ?
  Can Marathi celebraties help in raising the money ?
  One of the simplest ways is to have the charity events which seem to be popular these days. Is there any celevraty reading these discussions that can help jump start this ?

  Any other ideas ?

  I think the discussion should quickly shift to – What should be done now.

  Thanks and regards,
  Pradeep Deshpande

  • प्रिय श्री प्रदीप देशपांडे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या या चर्चेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांनी आपापले विचार व सद्यपरिस्थितीवर तोडगा काढण्याचे मार्ग सुचवले तर या व्यासपीठाचा उपयोग करून आपण सर्व मिळून एकजुटीने मायबोली मराठीच्या भल्यासाठी काहीतरी झटून काही करण्याची योजना करू. मात्र इतरांनी, समाजाने, शासनाने, पुढार्‍यांनी, काय करावे हे सांगतानाच आपण सामान्य माणसे व व्यक्तिशः स्वतः काय करू शकतो याबद्दलचे विचार नक्की मांडावे.

   पैसे जमवणे ह्याचा नंतर विचार करू. पण आधी आपण उल्लेख केल्याप्रमाणे प्रथम नक्की काय करायचे, कसे करायचे व कसलीही चळवळ उभारण्यासाठी मोठ्या संख्येने मराठीप्रेमींची एकजूट कशी बांधायची अशा मुद्द्यांवर आधी विचार करू.

   सर्वच मराठीप्रेमी वाचकांना आपले विचार मांडायचे आवाहन करूया.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   ता०क० आपला ई-मेल पत्ता दोन पत्रांमध्ये वेगवेगळा नोंदला गेला आहे. त्यापैकी नक्की योग्य कुठला? चुकीच्या पत्त्यामुळे आपल्या संवादात अडचणी निर्माण होऊ शकतात.

 6. suresh.bhagade@gmail.com this is my mail ID you can use it for communication.

  Mazya mate apan sarvani vichar mandun gapp basanyapeksha aapapalya parine survat keli pahije.
  Mhanaje kay?
  1)Saravatra Marathitach bolayala suravat karayachi.(apalya ajubajula dole ughadun pahile tar janavel ki don gujarathi ekmekanshi gujarathitach boltat,Madrasi madrsitach bolatat etc..
  Mhanaje Maharashtrat rahun dekhil te sw-Bhashecha man wadhavatat tyachya agadi virudh aapan.)
  2) Non-Marathi manasanshi dekhil Marathitach Bolayache( Tat aani tarach tyala Marathi shikanyachi garaj watel.)
  3)Jithe apan rahato kinva jyanchy sanparkat yeto tyanna Marathiche mahatwa samajawanyacha prayatna karayacha.( Jan Jagruti)
  4)Jitake mhanun marathi sahitya wachata yeil titake wachayache, tyatahi Mahatma Gandhiji,Lokmanya Tilak,swatantryavir Sawarkar etc.. yanche sahitya wachayache.Kashyasathi?
  ( Tar tyani kelelya balidanacha aaj aaplyala visar padala aahe,tasech tyanni aapapalya parine kase yogadan dile tyachi mahiti milel jyamule aapal prabodhan hoil.)
  5)Samajik staravar prabodhan ghadavanyasathi jyanchi manasik tayari aasel tyanni jithe shakya hoil tithe chhote – chhote karyakram karata yetil.
  Asha karyakramansathi phar mothya aarthik madatichi garaj nasate,karyakarte swatachya khishatun he kam karu shakatat,Tewadhech danache puny aani samadhan dekhil milate.(Sahaja Yoga hya sampurn mophat dhyan-dharanechya padhatichi mahiti denyasathi aamhi nehamich asha prakare public program aayojit karato aani hyamage samajik karatwyache bhan evadhech prayojan aasate tyatun konatehi aarthik utpann nasate karan Sahaja Yoga he sampurn pane free of cost aahe Jast mahiti sahthi http://www.sahajayoga.org.)
  6) ekada ka samajik staravar marathi sathi jan jagruti zali ki aapoapach sarakarvar dabaw aanata yeil.Sarv kayade Marathichya bajune aahet tyamule phar ladhawe laganar nahi.
  7)Sarvach thikani Marathi sathi bhandatana Radebajicha avalamb karun chalanar nahi karan dweshatun dwesha nirman hoto ragatun ragach nirman hoil.Sanadshir margatun kinva Amaran Uposhanache marg aapalyala mokale aahet tyasathi mi kadhi tayar aahe. Ethe ek gost namud karavishi vatate ki aaj aapan pratyek jan paishanchya mage dhawato aahot pan mage walun pahata ekahi paisewalya lokanchi dakhal itihasane ghetaleli nahi.Tya ulat jyanni samajasathi kary kele, aapale sarvasw tyagile, aayushy panala lavale asha ani ashach lokanchi dakhal itihasat aahe.Manav janmache sarthak kashat aahe he vegale sangane nako.Apalya porane nav kadhave mhanun aapali kevadhi dhadapad chalaleli aasate te aathaun paha ani padarat kay padate tehi bagha mhanaje sarv kahi samajel( Konachyahi bhavana dukhavanyach maza hetu nahi,chukun tase ghadalyas mothya dilane maf karal ashi apeksha…)

  Sarate shewati aapan sarv sudnya aahatach.

  Dhanyawad.

  • प्रिय श्री० सुरेश भगडे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले पत्र अत्यंत चिंतनीय आहे. आपण मांडलेले विचार नक्कीच मौलिक आहेत. सर्वच वाचक त्यांवर मनापासून विचार करतील अशी खात्री वाटते.

   केवळ अडचणींचा उहापोह करण्यापेक्षा आपण काही ठाम कृती करण्याबद्दल सूचना केल्या आहेत. जर इतरही वाचकांना स्वभाषासंवर्धनाचे आणखीही काही सुचवायचे असतील तर त्यांनीही ते मांडावेत. पण एकंदरीत पाहता सर्वच मराठीप्रेमी वाचकांची विचारांची व कृतीयोजनांची दिशा साधारणपणे बरीचशी एकसारखीच दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे.

   शासन, राजकारणी, इतिहास, समाज, अशा इतरांना दोष देऊन आपण हात झटकून टाकायचे या आपल्या वृत्तीमुळेच आत्तापर्यंत मराठीची उपेक्षा आपल्याला रोखता आलेली नाही, उलट नकळत आपल्या न्यूनगंडाने व अनास्थेने आपण त्यात भरच घातली. आता मात्र आपल्या माऊलीसाठी आपण ज्या कुठल्या मार्गाने शक्य असेल त्या मार्गाने, तन-मन-धन यापैकी जसे शक्य तसे, यथाशक्ती खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपण व्यक्तिगत पातळीवर आजपासूनच, आत्तापासूनच, सुरुवात करू आणि त्याचबरोबर मराठीप्रेमीजनांची एकजूट साधून अधिक परिणामकारकरित्या ही चळवळ बांधू.

   आपल्याला एक लहानशी विनंती करायची आहे. आपण मराठीचे अस्सल व गाढे प्रेमी असल्यामुळे आमच्या भावना समजून घ्याल अशी खात्री वाटते. आपले विचार खरोखरच अत्यंत चिंतनीय आहेत. पण ते आपण देवनागरी लिपीत लिहिलेत तर वाचण्यास, अधिक स्पष्टपणे समजण्यास, चिंतन करण्यास अधिक सहज, सोपे व सोयीचे ठरतील. रोमी (रोमन) लिपीत वाचणे जरा त्रासदायकच वाटते. पोळी-भाजी, भाकरी-पिठले, पुरणपोळी, श्रीखंड-पुरी असे आपले अस्सल मराठी पदार्थ काट्याचमच्याने खायची कोणी सक्ती केली तर कसे वाटेल तसे ते वाटते. तसे खाताना त्या पदार्थाचा आस्वाद घेणे थोडे कठीण वाटते तसाच काहीसा प्रकार घडतो. थोडा प्रयत्न आणि थोडासा सराव केला तर देवनागरीमध्ये लिहिणे मुळीच कठीण जात नाही. आपण शाळेत प्रथम पेन्सिलीने लिहिण्यास शिकलो तेव्हाच्या मानाने तर मुळीच नाही. प्रयत्न करून पहावा अशी आग्रहाची विनंती, कारण त्यामुळे आपले विचार आम्हाला अधिक सहजपणे, अधिक स्पष्टपणे व विनासायास समजू शकतील. देवनागरीत लिहिलेले जाडे मराठी पुस्तकही आपण सहज वाचू पण असे पुस्तक रोमी लिपीत लिहिले असेल तर किती पाने वाचायचा धीर काढू?

   या नम्र सूचनेबद्दल गैरसमज नसावा. आपल्या विचारपूर्ण पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • जय महाराष्ट,

    धन्यवाद आपण केलेल्या सुचनेनुसार मराठी मध्ये लिहिन्यास सुरवात केलि आहे.खरतर मलाही तसच वाटत होते पण कुठेतरी पण होताच…

    मलाही काट्या चमच्या ऐवजी हातानेच जेवायला आवडते त्यामुळे काळजी नसावी यापुढील सर्व लेख मराठीतच असतिल.

    पुन्हा एकदा आभार
    सुरेश भागडे

    • प्रिय श्री० सुरेश भगडे यांसी.

     सप्रेम नमस्कार.

     आभारी आहोत. आमची सूचना योग्य दृष्टिकोनातून समजावून घेतल्याबद्दल आभार.

     आपल्याप्रमाणेच बहुसंख्य स्वाभिमानी मराठी व्यक्तींनी एकजूट करून एकसुरात शासनावर, परप्रांतीयांवर इतरांवर दबाव आणला तर परिस्थिती भराभर सुधारूही शकते.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 7. I do not think that there is something wrong in having education in English. I believe that we Marathis have this misconception. More important is in which language you communicate. We always communicate in Hindi which is not spoken in large part of India even hated. Why communicte in this language. We at least know the names of languages of South India and Eastern part such Bengal,Orisa. How many of us know the names of languages spoken say in Mizoram or Nagaland. Why can not build bridges by learning English. All the knowledge we require is in English.Hindiland is not India
  Shrikant Pundlik

  • प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभार.

   इंग्रजीचे शिक्षण आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्ञान हे साध्य आहे तर भाषा हे साधन. त्यात गल्लत करता कामा नये. इंग्रजी म्हणजेच ज्ञान नव्हे. शिक्षणासाठी मातृभाषेसारखे उत्तम साधन नाही हे जगातील जवळजवळ प्रत्येकच (कदाचित भारतातील काही अपवाद सोडून) तज्ज्ञ म्हणतो. पण इतर देशांप्रमाणे आपण आपल्या भाषा समृद्ध न करता इंग्रजीवरच अवलंबून राहिलो आहोत. महात्मा गांधी व जगभरातील इतर अनेक भाषातज्ज्ञ यांनी नेहमीच मातृभाषेतील शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. युरोप, पूर्व आशियाई व जगातील इतर अनेक राष्ट्रांनी मातृभाषेतून प्रचंड (भारताहून कितीतरी अधिक) प्रगती साधली आहे. हल्ली आधुनिक जगात बहुभाषिकत्वाला बरेच उत्तेजन दिले जाते. मात्र त्यासाठी स्वतःच्या मातृभाषेचे महत्व यत्किंचितही कमी करणे अपेक्षित नसते. युरोपात इंग्रजी बोलणारे देश फारसे नाहीतच. पण त्या देशांनी जागतिकीकरणाच्या नावाखाली भारताप्रमाणे स्वतःच्या भाषेला बाजुला सारून शिक्षणव्यवस्था, न्यायदान, शासनव्यवस्था, समाजव्यवहार, इत्यादींसाठी इंग्रजी भाषा स्वीकारलेली नाही; पण तरीही युरोपातील बहुतेक सर्वच देशांचे राहणीमान भारतापेक्षा कितीतरी वरच्या दर्जाचे आहे.

   मातृभाषेत शिकतानाही इंग्रजी भाषेचे ज्ञान उत्तम असावे हा एक चांगला पर्याय आहे असे आम्हाला वाटते. इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शिकून आपली भाषा, आपली संस्कृती यांच्यापासून मूल दूर जाणार हे स्वाभाविकच आहे.

   हिंदी राजकारणी आपल्यावर हिंदी लादत असले तरी इंग्रजी आपण स्वतःहून, स्वखुषीने लादून घेत आहोत याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   बर्‍याच वेळा वाचकांच्या प्रतिमतांना उत्तरे देण्यामध्ये उशीर होतो हे खरेच आहे. पण आमच्यापैकी प्रत्येक जण योगक्षेमाच्या, पोटापाण्याच्या जबाबदार्‍या सांभाळून मग जास्तीत जास्त वेळ अमृतमंथन व इतर काही मराठी संबंधित कामे करण्यासाठी देतो. माहिती अधिकार व इतर मार्गांनी मराठीवर अन्याय करणार्‍यांच्या विरुद्ध कृती करणे हेसुद्धा चालू असतेच शिवाय प्रत्येक वाचकाला शक्य तेवढे प्रामाणिकपणे उत्तर देऊन स्वभाषाप्रेमाची भावना अधिकाधिक पसरावी असाच आमचा हेतु असतो. म्हणून काही पत्रोत्तरे अधिक वेळ घेतात. आपल्या पत्राच्या उत्तरासाठी आम्ही स्वतः प्रा० राईलकर सरांची मदत घेतली यावरून आपल्याला थोडी कल्पना यावी.

   आपल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत. थोडा-फार उशीर होतो, त्याबद्दल राग मानू नये. गैरसमज तर मुळीच करून घेऊ नये.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s