मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन !
संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत सादर करीत आहोत.
प्रस्तुत निर्णयाच्यामागे शासनाने विविध विद्वानांची मते विचारात घेतली असावीत असे दिसते आहे. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. अर्थात ह्या निर्णयाच्या विविध अंगांची योग्यायोग्यता ही आता यापुढे यावर व्यापक चर्चा घडल्यावरच मग लक्षात येईल.
शासनाच्या या आदेशपत्रामध्ये ’सध्याचे माहितीतंत्रज्ञानाचे युग’, ’शासकीय कार्यालयांचे संगणकीकरण’, ’वेगाने व विविधांगाने कामे होणे’, ’शासनाने काळाची पावले ओळखून’, ’महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार’, ’संगणक तंत्रज्ञानाचा मराठी भाषा व संस्कृती इत्यादींच्या विकासासाठी’, असे जड शब्दप्रयोग केले असले तरी प्रस्तुत निर्णय प्रकाशित करताना तो जागतिक स्तरावर प्रमाणभूत ठरलेल्या युनिकोड प्रणालीवर आधारित संगणकीय टंकात मुद्रित न करता त्याचे अप्रमाणित टंकनपद्धतीने मुद्रण करून व नंतर त्याची पीडीएफ धारिणी बनवून ती प्रसिद्धीस सादर केली आहे, यावरून शासनाच्या संगणकीकरणाच्या महत्त्वाकांक्षेबद्दलच्या गांभीर्याविषयी प्रगल्भतेविषयी व थोडी शंका वाटू लागते. शासनाच्या स्वतःच्या संकेतस्थळावर बहुतेक माहिती इंग्रजीतूनच उपलब्ध करून दिलेली आहे; मराठीतून फारच कमी माहिती उपलब्ध आहे. अर्थात आहे तीसुद्धा प्रमाणित युनिकोडानुकूल टंकात नसल्यामुळे बर्याचदा मराठीत उपलब्ध असलेली माहितीसुद्धा वाचणे शक्य होत नाही. राज्यभाषा मराठी व्यवस्थितपणे बोलू-वाचू-लिहू शकणार्या सामान्य नागरिकाला त्याच्या स्वतःच्याच राज्यात त्याचे स्वतःचे राज्यशासन माहितीपासून वंचित ठेवते यालाच लोकशाही पद्धतीचा भारतीय, निदान महाराष्ट्रीय नमुना म्हणायचा का?
मराठीतील मूळच्या लसणासारख्या (लुगड्यासारख्या?) गोल ल ऐवजी दंडासह ल, शेंडीफोड्या श ऐवजी डोक्यावर गाठ दिसणारा श, तसेच ऍ या वर्णास अ वर चंद्रकोर दाखवण्याऐवजी ए वर चंद्रकोर दाखवणे; असे बरेच गोंधळ हे शासनाच्या डोळे झाकून हिंदीचे शेपूट धरून चालण्याच्या हुजर्या प्रवृत्तीमुळे सुरू झाले व १०+२+३ च्या नवीन अभ्यासक्रमाच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमधून प्रथम अंतर्भूत केले गेल्यावर मग शाळांद्वारे व संगणकाद्वारे सर्वत्र पसरले. खरं म्हणजे ऍ व ऑ हे उच्चार, जे दूरदृष्टीने मराठीने भाषेत कधीच सामावून घेतले होते, ते हिंदीत अजुनही फारसे वापरले जात नाहीत. पण तरीही त्या विषयी हिंदी पंडितांचा निर्णय मराठीवर का लादून घेतला गेला हे समजत नाही. असो. स्वतःच केलेला गाढवपणा सुधारण्याची बुद्धी राज्य शासनाला उशीरा (पस्तीस वर्षांनी) का होईना पण आता तरी झाली ह्याबद्दल देवाचे आभार.
काही सूचना आम्हाला सुचल्या त्या अशा:
देवनागरी अंक आणि त्यांचे प्रमाणीकृत अक्षरी लेखन:
१००: शंभर -> योग्य
१०००: हजार -> सहस्र हा विकल्प द्यावयास हवा.
लाख/दहालाख -> लक्ष/दशलक्ष हे विकल्प उपलब्ध असावेत.
कोटी/दहा कोटी -> करोड ह्या इंग्रजी अपभ्रंशाचा विकल्प दिला नाही हे योग्यच आहे. पण शाळेत आम्ही दशकोटीसुद्धा म्हणत असू.
(एकम् स्थान, दहम्, शतम्, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज… इत्यादी).
या सूचनांचीही शासनाने दखल घ्यावी.
प्रत्येक मराठीभाषाप्रेमीने माहिती करून घ्यावी अशा या शासनादेशाची प्रत खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन-मराठी वर्णमालेत सुधारणा_राज्यशासन निर्णय_061109
शासनाच्या प्रस्तुत महत्त्वाच्या निर्णयाची माहिती श्री० सुशांत देवळेकर यांनी पाठवली आहे; त्यांचे मनःपूर्वक आभार.
आपली मते लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवावीत.
– अमृतयात्री गट
प्रत्येक मराठीभाषाप्रेमीने माहिती करून घ्यावी अशा या शासनादेशाची प्रत उपलब्ध अभ्यासली. श्री० सुशांत देवळेकर, श्री० सलील कुळकर्णी यांनa Dhanyawad.
प्रिय श्री० पुरुषोत्तम यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत.
आपले आभारपर अभिप्राय श्री० सुशांत देवळेकर यांच्या पर्यंत नक्कीच पोचवू.
कळावे, असाच लोभ असावा.
– अमृतयात्री गट
>>काही सूचना आम्हाला सुचल्या त्या अशा:
देवनागरी अंक आणि त्यांचे प्रमाणीकृत अक्षरी लेखन:
१००: शंभर -> योग्य<>१०००: हजार -> सहस्र हा विकल्प द्यावयास हवा.
लाख/दहालाख -> लक्ष/दशलक्ष हे विकल्प उपलब्ध असावेत.
कोटी/दहा कोटी -> करोड हा विकल्प दिला नाही हे योग्यच आहे. पण शाळेत आम्ही दशकोटीसुद्धा म्हणत असू.<>(एकम् स्थान, दहम्, शतम्, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज… इत्यादी).<< दहम् आणि दशम्सुद्धा.
देवनागरी अंक म्हणू नये, मराठी अंक म्हणावे. हिंदी अंक मराठीपेक्षा भिन्न असू शकतात.
आणि एक तुमच्यासारख्या मराठीप्रेमींना न पटणारी सूचना : मराठी आकडे फक्त ललित लेखन, पोथ्या, भक्तिवाङ्मय, मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यांच्या जाहिराती आणि जुन्या पुस्तकांच्या पुनर्मुद्रणामध्येच वापरावेत. विज्ञान, गणित आदी तांत्रिक तसे इतिहास, भूगोल आदी शास्त्रीय ग्रंथांत, तसेच सार्वजनिक जागी फ़क्त हिंदू आकडे वापरावेत. हे हिंदू आकडे सध्या जगात आंतराराष्ट्रीय हिंदू-अरेबिक न्यूमरल्स म्हणून ओळखले जातात आणि महाराष्ट्र-गुजराथ-पंजाब सोडले तर उर्वरित भारतात आणि जगातल्या अन्य सर्व पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांत वापरले जातात. अंकलिपीत दोन्ही, मराठी आणि हिंदू, आकडे असावेत आणि शाळेत एकानंतर दुसरे शिकवावेत.
प्रिय शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
सूचनांबद्दल आभार.
क. दशम्, मराठी अंक इत्यादी. सर्वच सूचना योग्य आहेत.
ख. {{आणि एक तुमच्यासारख्या मराठीप्रेमींना न पटणारी सूचना}}
ही सूचना वाचल्यावर खालील विचार मनात आले.
१. आधी झालेल्या आपल्या चर्चेप्रमाणे हा एक विवाद्य मुद्दा ठरू शकतो हे नक्की. अर्थात याचा अर्थ असा नाही की तो सर्रास चुकीचा, अयोग्य, रद्दड आहे. त्या मुद्द्याचे काय करायचे हे मराठी+एकजूट गटाने ठरवावे. (आमच्यावर ती आफत नको !!)
२. आपल्या ह्या विधानातून आणखी एक मुद्दा सूचित होतो. तो म्हणजे, आपण सरळ सरळ दोन स्वतंत्र गट पाडलेत. एक आमच्यासारख्या (?) मराठीप्रेमींचा. दुसरा आपल्यासारख्या मराठीप्रेमी नसलेल्यांचा (?). आपण मराठीप्रेमी नाही का? गेल्या महिन्याभरातील आपला पत्रव्यवहार पाहिल्यावर तसे म्हणण्याचे धाडस आम्ही तरी करू शकलो नसतो. (आपला विरोपपत्ता हा प्युअरमराठी आहे की पुरेमराठी?) आपली काही मते कदाचित अनन्य, वैशिष्ट्यपूर्ण (unique, uncommon) ठरू शकतील पण सरळसरळ मराठीविरोधी ठरतील का ह्याबद्दल आम्हाला शंका आहे. शिवाय आपले बोधवाक्य/घोषवाक्य (न बाधते तथा माम्हि यथा बाधति बाधते ।) हे केवळ संस्कृतपुरतेच मर्यादित आहे असे वाटत नाही. म्हणूनच आपण स्वतःला मराठी-अप्रेमी गटात टाकल्याबद्दल आश्चर्य-मौज-कुतुहल इत्यादी संमिश्र भावना मनात आल्या. अर्थात मधूनमधून अनपेक्षित प्रतिक्रिया देऊन समोरच्यास झटका देण्याची आपली ही पहिली वेळ नव्हे. तसेच हे असेल अशी आम्ही आशा करतो. (उगीच आधीच कमी असलेल्या मराठीप्रेमींच्या संख्येमध्ये शक्यतो अधिक घट होऊ न देणे असा एक स्वार्थी आणि धूर्त डावही आमच्या ह्या पवित्र्यात आहे हे आपण ओळखले असेलच.)
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
एक राहिले. शतप्रमाणेच शे आणि शेकडा हेही शब्द मराठीत राहू द्यावेत. नाही तर तीनचारशे, द.सा.द.शे. असे शेकडो वर्षांपूर्वीचे ज्ञान नष्ट व्हायचे.
प्रिय शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
एकशे एक टक्के मान्य. टक्केवारी आपण बर्याचवेळा शेकडा या परिमाणातच सांगतो. उदा० “कोकणात आंबा शेकडा हजार भावाने मिळाला.”
द०सा०द०शे० हे तर उत्तम सुटसुटीत लघुरूप आहे. अर्थात आता त्याचे कितीही कौतुक वातले तरी एकेकाळी शाळेत त्या शब्दाने घामटे काधलेले आहे हे देखिल लक्षात आल्यावर मौज वातते.
हल्ली हिंदीच्या संसर्गाने शेकडा किंवा टक्के ह्या अस्तित्वात असलेल्या मराठी शब्दांच्या ऐवजी प्रतिशत असे म्हणण्याचे खूळ काही लोकांनी घेतले आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
‘मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा
करण्यासाठी’ शासनाने दिनांक- 6 नोव्हेंबर, 2009 रोजी निर्णय प्रसुत केला होता. संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत येथेही उपलब्ध आहे…
Click to access 20091106130447001.pdf
परंतु वरील दुव्यामध्ये पुरेशी माहीती देण्यात आलेली नाही. याच कारणास्तव मी हा शासनचा ‘निर्णय’ज्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती, लीना मेहेंदळे यांच्या अधिकारकक्षेत घेतला गेलेला होता त्यांना ईमेल पाठवून ह्या विषयाबाबत काही माहिती मिळू शकेल कां? अशी विचारणा केली होती पण मला अजून तरी माहिती मिळालेली नाही. माझे प्रश्न असे आहेत.-
ह्या निर्णया मध्ये खालील बाबींच्या माहीतीची पुर्तता करण्यात आलेली नाही.-
1) शासन संस्थेने कोणत्या समितीकडे, संस्थेकडे, व्यक्तींकडे अशा
संदर्भातील ‘अहवाल मागविला’ होता? त्यांची नावे काय?
2) शासकिय संस्थेने कोणत्या दिवशी, कोणत्या नावाची, कोणाच्या
अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली होती? ह्या समिती मध्ये लिपीतद्न्य,
भाषातद्न्य, व्याकरणाचे जाणकार, संगणक व ‘लेखन-मुद्रण विषया’ तील तद्न्य,
तत्वद्न्य यांचा सामावेश करण्यात आला होता का?
3) कळफलकामध्ये एकरूपता (‘स्वरूपात एकवाक्यता’) आणण्यासाठी कोणते निर्णय
घेण्यात आले? म्हणजे, कळफलकाच्या कुठल्या बटनाला कोणता वर्ण राखून
ठेवायचा? व तसे केल्याने टंकनकलेच्या मदतीने ‘वेगाने व विविधांगी काम
होणे’ कसे शक्य होणार? हे सांगितलेले नाही. म्हणजे प्रयोगात्मक चाचणी कशी घेतली होती?
4) मराठी साठीची आतापर्यंत वापरात असलेली बरीच सॉफ्टवेअर ‘युनिकोड डाटा
एनकोडींग’ च्या प्रसाराने कुचकामी झालेली आहेत. तसे असताना आता विविध
सॉफ्टवेअर मध्ये एकरूपता (‘तांत्रिक व व्याकरणिक स्तरावरील एकवाक्यता’)
आणण्या बाबत चे काम का बरे विचारात घेतले? उद्या युनिकोड पेक्षा
अद्ययावत नवे डाटा
एनकोडींग तंत्रद्न्यान प्रचारात आले तर मराठी भाषेतील लेखन-मुद्रणाला
कोणत्या समस्या भेडसावू शकतात? हे विचारात घेतले गेले आहे का?
5) परिशिष्ठ सहा व सात नुसार, (उद्याच्या पिढीसाठी) ‘शालेय स्तरासाठीची
व्यंजने’ व ‘सर्वसाधारण (जनतेच्या) वापराच्या व्यंजने’ यांमध्ये तफावत का
ठेवण्यात आलेली आहे? त्या मागची कारण-मिमांसा काय?
प्रिय श्री० सतीश रावले यांसी,
सप्रेम नमस्कार.
लीना मेहेंदळे काही महिन्यांपूर्वी व्यवसायनिवृत्त झाल्या. वरील माहिती अधिकृतपणे माहितीअधिकाराखाली मागवू शकता. अर्थात त्यातूनही सर्वच प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळतील ह्याची शाश्वती नाही.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
ही टिप्पणी मी आजच पाहिली, व मला श्री रावले यांची ईमेल मिळालेली नाही. प्र 1 व 2 बाबत महा. साहित्य परिषद व राज्य मराठी विकास संस्ता यांनी सुमारे 2 वर्ष चर्चा करून निर्णय घेतले आहे. मात्र त्यांत संगणक तज्ज्ञांचा सहभाग नव्हता त्यामुळे संगणक, कळपाटी, युनिकोड इ. बाबत विचार झाला नाही. त्यासाछी आम्ही कांही बैठका घेतल्या पण काम अपुरे आहे. प्र 4 मधे मोठ्या अंशी केंद्रशासन व सीडॅकची अनास्था आहे, पण मराठीपुरते कांही चांगले निर्णय आपण घेऊ शकतो असे आम्ही सुचवले होते.त्यांत मोठा पल्ला गाठायचा आहे.