’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य)

गणपत्युत्सव, श्रीसत्यनारायणाची पूजा व इतर विविध धार्मिक कार्यक्रमांमधील आरत्या-प्रार्थनांच्या भागात आरंभाची गणपतीची “सुखकर्ता दुःखहर्ता” ही आरती आणि शेवटची मंत्रपुष्पांजली यांचा हटकून समावेश असतोच; मग मधल्या इतर आरत्या व प्रार्थना प्रसंगौचित्याप्रमाणे कितीही बदलोत. त्यामुळे प्रारंभीची ती आरती व शेवटची मंत्रपुष्पांजली या दोन्ही आपल्याला बर्‍यापैकी पाठ असतात. अर्थात मंत्रपुष्पांजलीचे शब्दोच्चार व तिची चाल हे दोन्ही आपण आपापल्या प्रामाणिक (गैर?)समजुतीप्रमाणे ठरवीत असतो, व आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या घरातील उच्चारपद्धती व चालच सर्वात योग्य आहेत अशी खात्री वाटत असते. मात्र अशा प्रकारे तोंडपाठ असणार्‍या त्यातील मंत्रपुष्पांजलीचा अर्थ मात्र आपल्याला दूरान्वयानेसुद्धा माहित नसतो आणि गंमत म्हणजे बालपणापासून उत्साहाने म्हटल्या जाणार्‍या या प्रार्थनेचा अर्थ न समजून घेताच आपण तिची बिनडोक घोकंपट्टी करून डोळे मिटून (शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेसुद्धा) ती प्रार्थना म्हणतो आहोत हे आपल्या गावीही नसते.

मध्यंतरी आमचा एका तरूण मित्र राममोहन याला अचानक साक्षात्कार झाला आणि हा प्रश्न मनात आला की आपण आयुष्यभर वारंवार ईश्वराला उद्देशून म्हणत आलेल्या या प्रार्थनेचा अर्थ काय? त्याने आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हा प्रश्न रिंगणात टाकला. आम्ही सर्व मित्रांनी खूप प्रयत्न केले, महाजालावर तपासले, पण समाधानकारक अर्थ काही सापडला नाही. शेवटी आमच्यापैकी सर्वाधिक वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध मित्र म्हणजे प्रा० राईलकर यांनी त्यांच्या गावचे (चौलचे) बालपणीपासूनचे मित्र प्रा० मा० ना० आचार्य यांच्याकडून तो अर्थ मिळवला. प्रा० आचार्य संस्कृत आणि मराठीचे प्राध्यापक होते आणि दोन्ही भाषांवर त्यांचे मोठे प्रभुत्व आहे. संस्कृतमधील अनेक पुरातन ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला असून त्यातील काहींवर त्यांनी लिहिलेल्या टीकात्मक लेखांचे संस्कृत तज्ज्ञांनीही कौतुक केलेले आहे. मंत्रपुष्पांजलीच्या त्यांनी विशद केलेल्या अर्थाच्या छोट्याशा टिपणावरूनसुद्धा त्यांची कुशाग्र बुद्धी, त्यांचा सखोल अभ्यास आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन तिचा उलगडा करण्याचा स्वभाव यांची चुणूक दिसून येते.

संस्कृत भाषेची आवड आणि आपल्या संस्कृतीबद्दल जिज्ञासा-प्रेम-अभिमान असणार्‍या मंडळींना हे टिपण नक्कीच आवडेल.

प्रा० मा० ना० आचार्य यांनी प्रस्तुत केलेला मंत्रपुष्पांजलीचा अर्थ खालील दुव्यावर पहावा.

अमृतमंथन-मंत्रपुष्पांजलीचा अर्थ_ले० प्रा० मा० ना० आचार्य

आपल्या प्रतिमताची (feedback) खालील रकान्यात अवश्य नोंद करावी.

– अमृतयात्री गट

.

Tags: 

.

18 thoughts on “’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य)

  • प्रिय देवेंद्र चुरी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   प्रथम जेव्हा आमच्या मित्राने मंत्रपुष्पांजलीच्या अर्थाबद्दलचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा आम्हा सर्वांना लाजच वाटली. आणि म्हणूनच हा अर्थ हाती गावल्यावर फार आनंद झाला व तो आपणासारख्या सुहृदांबरोबर वाटून घ्यायची इच्छा झाली.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय अनिल पेंढारकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   हा अर्थ हाती गावल्यावर फार आनंद झाला व तो आनंद आपणासारख्या सुहृदांबरोबर वाटून घ्यायची इच्छा झाली. असा कितीतरी खजिना भारतीय संस्कृती-परंपरेत साठलेला आहे. त्यापैकी बराचसा कालौघासह नष्टही झाला असेल. पण जेवढा वाचला आहे तो देखिल प्रचंड आहे. तो जतन करून आपल्या इतर समविचारी, समरुची मित्रांना त्याच्या बद्दलची माहिती करून देणे हे आपले कर्तव्यच आहे. त्याच दृष्टीने हा अत्यल्प प्रयत्न.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्रद्धा,

   सप्रेम नमस्कार.

   उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. आपली संस्कृती ही आपल्यापेक्षा आपल्या आधीच्या पिढीला अधिक चांगली माहित असते आणि कळते. याचा अर्थ असाही होतो की आधीच्या पिढीच्या मानाने आपल्याला आपली संस्कृती नीट माहित नसते व कळतही नाही. याचे कारण काय असावे?

   संस्कृतीची जोपासना, प्रसार, संवर्धन हे त्या संस्कृतीच्या मूळ भाषेतूनच अधिक चांगले होते. आपण आपल्या मातृभाषेऐवजी परकीय भाषेच्या अधिक जवळ जाऊ लागलो, तिच्यामधून संपूर्ण शिक्षण घेऊ लागलो, मातृभाषेकडे पूर्ण दुर्लक्ष करून परभाषेचेच वाचन करू लागलो. त्याबरोबरच न कळत आपल्या संस्कृतीपासून दूर जाऊन जी आपली नाही, ज्यात आपण बसू शकत नाही, अशा पाश्चात्य संस्कृतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यामुळे आपण धड ना इथले, ना धड तिथले, अशी आपली परिस्थिती झालेली आहे, असे मला वाटते. (माझे हे निरीक्षण व्यक्तिशः आपल्याला उद्देशून नाही; तर सर्वसामान्यपणे सर्व मराठी समाजाला उद्देशून आहे, हे लक्षात घ्यावे.)

   आपल्या आईला सादर नमस्कार सांगावा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. नमस्कार,

  लेख अतिशय उत्तम आहे. लेखक प्रा.माधव आचार्य. यांचे अतिशय आभार. माहितिपुर्ण लेख आहे. आपण अशा कितितरि गोष्टि करत असतो, ज्य़ांचा अर्थ आपणास माहित नसतो. पण त्य़ा गोष्टि आपण अर्थ समजुन केल्या तर जास्त योग्य होइल असे मला वाटते.

  क. लो. भ. असावा.

  आपला,

  किशोर दीक्षित.

  • प्रिय श्री० किशोर दीक्षित यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार. आपले भाष्य अत्यंत योग्यच आहे. संस्कृतच का पण मराठीमधील देखिल अनेक प्रार्थना, आरत्या, अभंग, कविता, भावगीते, वाक्‌प्रचार, म्हणी इत्यादी आपण ऐकतो किंवा म्हणतो पण त्यांचा खरा अर्थ खोलात जाऊन शोधण्याचा प्रयत्न करीत नाही. बर्‍याच वेळा एखाद्या साहित्यकृतीचा सरलार्थ एक असतो व लाक्षणिक अर्थ किंवा मथितार्थ वेगळाच असतो.

   आपली मातृभाषा मराठी ही देखिल अत्यंत संपन्न भाषा आहे. प्रसाद या गुणासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी संतसाहित्याला खरोखरच तोड नाही. जेवढे जाणून घ्यायचा प्रयत्न करू तेवढी तिच्यातील अमृताची तहान वाढत जाते आणि लक्षात येते की वाचण्यास, समजण्यास अनेक आयुष्ये पुरणार नाहीत इतके साहित्य उपलब्ध आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. निव्वळ घोकंपट्टी करणे आपल्या इतके अंगवळणी पडले आहे की त्याची जाणीवही होत नाही.या निमित्ताने ती नव्याने झाली. अतिशय उत्तम लेख.धन्यवाद. टीप : मराठी व्याकरण समजून घ्यायची इच्छा असलेल्यानी आचार्यांचे मराटी व्याकरण विवेक हे पुस्तक जरूर वाचावे.व्याकरण नव्याने समजेल व आचार्य सरांच्या बुद्धिमत्तेने थक्क व्हायला होईल.
  उपेन्द्र जोशी, ठाणे.

  • प्रिय श्री० उपेन्द्र जोशी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले म्हणणे अगदी खरे आहे. आचार्य सरांच्या समोर बसून त्यांना केवळ ऐकत राहणे ही मोठीच पर्वणी, मेजवानी असते. संस्कृत, मराठी ह्या दोन्ही विषयांवर (भाषा आणि संस्कृती) एवढे प्रभुत्त्व असणारे असे किती थोर ज्ञानी विद्वान आज राहिले असतील कोण जाणे. पण शासनाच्या या दोन्ही भाषांचे खच्चीकरण करण्याचे योजनाबद्ध धोरण पाहिले की आणखी १५-२० वर्षांतच ही जमात लुप्त होईल ह्याची फार खंत वाटते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० नरेंद्र हसबनीस यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपली अडचण समजू शकतो. आजच्या शिक्षणपद्धतीमुळे आपले (आपणा सर्वांचेच) स्वतःच्याच भाषेचे व संस्कृतीचे ज्ञान इतके आकसले आहे की जरी शब्दांचे सरलार्थ समजले तरीही बर्‍याचशा संकल्पनांबद्दल नीटशी कल्पना नसल्यामुळे आपण त्याचा मनःपूत आस्वाद घेऊ शकत नाही. मधाळ ऊस आहे पण दातांना चाववत नाही तसाच प्रकार. ज्याला शेतातील ऊस तोडून स्वतः तो दाताने सोलून व चावून खायची सवय आहे तो कांडीने रस पिऊन तृप्त होऊच शकणार नाही. पण आपण तेवढे भाग्यवान नाही.

   आपल्याला मनःपूर्वक रसग्रहण करायचे असेल तर आपण आचार्य सर किंवा त्यांच्यासारख्या एखाद्या समर्थ गुरूजवळ बसूनच ते सर्व शिकून घ्यावे. तो अनुभव काही वेगळाच असतो. ती एक अशी मेजवानी असते की पंचतारांकित हॉटेलात हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या रसास्वादाला त्याच्या काडीचीही सर येणार नाही. पहा एकदा स्वतः अनुभव घेऊन.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. नमस्कार
  अर्थ जरी समाजाला तरी प्रयोजन समजले नाही. मंत्र पुष्पांजली का म्हटली जाते? आणि त्या उद्देशाला अनुसरून ह्या अर्थाच्या स्तुतिवचनाचे स्थान काय हे देखील समजले तर बरे होईल.
  आभार
  सोनल

  • प्रिय सौ० सोनाली वायकूळ यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

   या विषयात अमृतयात्री गटातील आम्हा सर्वांचीच अक्कल फारच तोकडी पडते. खरं म्हणजे मंत्रपुष्पांजलीच्या बाबतीत आचार्यांनी दिलेला अर्थ आम्ही नुसता सादर केला आहे, त्यात आमचा कुठल्याही दृष्टीने अलपसाही सहभाग नाही; हे प्रथमच मान्य केलेले बरे. म्हणून आम्ही किंवा आमच्या आजुबाजुचे इतर कोणी कितपत मदत करू शकतील याबाबतीत शंका वाटते. स्वातंत्र्योत्तर काळात उत्तरोत्तर संस्कृत, मराठी अशा भारतीय भाषांना तुच्छ लेखून आपण इंग्रजी भाषेच्याच मागे धावत आहोत त्याचा हासुद्धा एक परिणाम.

   याच लेखासंबंधातील हसबनीस व उपेंद्र जोशी यांच्या प्रतिमताला लिहिलेली उत्तरे पहावीत. अधिक तपशीलवार अर्थ समजवून घेण्यासाठी एक तर गुरू अधिक विद्वान असावा लागतो, किंवा आपली बौद्धिक पातळी अधिक तयारीची असावी लागते, किंवा दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.

   आपणच योग्य तो निर्णय घ्यावा. अधिक तपशीलासाठी संस्कृतमधील विद्वान आचार्य गाठावा लागेल किंवा स्वतः मा० ना० आचार्यांना गाठावे लागेल. ते चौलगावी (रायगड जिल्हा) राहतात.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. गेली कित्येक वर्ष मंत्रपुष्पांजलीचा अर्थ समजावा यासाठी मी धडपडत होतो. आपल्या कृपेमुळे मला आज तो समजला.आपण घेतलेल्या कष्टाबद्यल धन्यवाद व मन:पुर्वक आभार

  • प्रिय श्री० राजन वसंत साखरकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले पत्र चुकून अनिष्ट (स्पॅम) म्हणून वेगळे काढले गेल्यामुळे दृष्टीआड गेले होते. त्यामुळे आपल्या पत्रास उत्तर देण्यास उशीर झाला. त्याबद्दल क्षमा असावी.

   आपल्याला हवा असलेला मंत्रपुष्पांजलीचा अर्थ अमृतमंथनावर सापडल्याबद्दल आम्हालाही आनंद वाटला. संस्कृत भाषा आणि प्राचीन भारतीय संस्कृती ह्यांच्याबद्दल आणखीही काही लेख आपल्याला ह्या अनुदिनीवर सापडतील. अवश्य वाचून पाहावेत.

   मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्यांच्याबद्दलही बरेच लेख अमृतमंथनावर सापडतील. जरा नजर फिरवावी. जे आवडतील ते संपूर्णपणे वाचावेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. उत्तम तऱ्हेने अभ्यासपूर्ण लेखन झाले आहे. या लेखनावरून प्रा. आचार्य यांची विद्वत्ता व शोध घेण्याची अचूक पद्धती समजून येते. त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा इ मेल आय डी/फोन नंबर मिळाल्यास उपकृत होईन.
  अण्णा सोनवणे . पंचवटी नाशिक ९४२२७५६३३३

  • प्रिय श्री० मधुकर सोनावणे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   प्रा० मा० ना० आचार्यांचा मराठी संतसाहित्य आणि प्राचीन संस्कृत वाङ्‍गमय ह्यांचा मोठा व्यासंग होता. त्यांनी आपले उत्तरायुष्य (निवृत्तीनंतर) कोकणातील आपल्या चौल ह्या छोट्याशा गावी केवळ अभ्यासात व्यतीत केले. मुंबई-पुण्याहून आणि महाराष्ट्रातील इतर नगरांमधूनही मराठी आणि संस्कृतचे प्राध्यापक आणि अभ्यासक त्यांना भेटून किंवा फोनवरून शंका विचारीत असत. त्या लहानशा गावात राहूनही त्यांनी स्वतःचा अत्यंत मोठा ग्रंथसंग्रह उभा केला होता. आचार्य गुरुजींच्या समोर बसायचे आणि एखादी शंका विचारायची. मग त्या निमित्ताने विपुल ज्ञानाचे दान ते आपल्या पदरात घालीत असत. अभ्यासकाला ती मेजवानीच. शिवाय अधून मधून दारातील गोठ्यातील म्हशीच्या ताज्या दुधाचा चहा आणि त्याबरोबर काही तरी तोंडी लावणे. अशी विविध प्रकारची मेजवानी मिळवण्यासाठी चौलला मात्र जावे लागे.
   आचार्य गुरुजी माहिती सांगताना वेळोवेळी आपल्या जागेवरून उठून आतून वेगवेगळे संदर्भग्रंथ घेऊन येत आणि ते संदर्भ वाचून दाखवत असत. प्रत्येक पुस्तक नक्की कुठे ठेवले आहे आणि त्यात हवा तो संदर्भ कुठे आहे, हे त्यांना डोळे झाकूनही (अंतर्ज्ञानाने?) सांगता येत असे.

   प्रा० आचार्य व्यक्तिशः अत्यंत प्रसिद्धिपराङ्गमुख असल्यामुळे ते साहित्यक्षेत्रातील इतर राजकारणापासून दूर राहून आपल्या अभ्यास-व्यासंगातच गढलेले असत. त्यातच त्यांना आनंद मिळत असे. प्रसिद्धीचा सोस त्यांना मुळीच नव्हता. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रशासन, मराठी विद्वान आणि मराठी सामान्यजन यांनी त्यांच्याकडे बरेचसे दुर्लक्ष केले. मतांसाठी बहुसंख्यांना खुश करण्यासाठी शिक्षण अधिकाधिक पातळ करण्यात गढलेल्या राजकारण्यांना आणि तशाच अधिकाधिक मागण्या करणार्‍या जनतेला अशा विद्वानांचे महत्त्व ते काय कळणार?

   आचार्यांचे “ध्वनिताचें केणें” हे पुस्तक म्हणजे अभ्यासू आणि संस्कृतप्रेमी मराठी मंडळींना मेजवानीच आहे. प्रत्येक लेख अत्यंत सखोल अभ्यासावर आधारित. आचार्य गुरुजी आपले प्रत्येक विशिष्ट विधान ससंदर्भ किंवा सतर्कच मांडीत असत. त्या पुस्तकांतील झडती ह्या विभागात त्यांनी विविध विद्वानांच्या प्रामादिक लेखनाची झडती घेऊन त्यातील प्रमाद, चुका स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यांचे लेख वाचताना त्यांनी त्या लेखाच्या अनुषंगाने केलेला विविधांगी सखोल अभ्यास लक्षात येतो. त्यांच्या टीकेमधून थोर मराठी विदुषी दुर्गा भागवत ह्यांचीही सुटका झालेली नाही. व्यासपर्व ह्या प्रसिद्ध पुस्तकावरील आचार्यांच्या टीकेला दुर्गाबाईंनी उत्तर देण्याचे शेवटपर्यंत टाळले. दुर्गाबाईंच्या व्यासपर्व ह्या प्रसिद्ध पुस्तकाच्या पुढे जशाच्या तशा (सप्रमाद) अनेक आवृत्त्या निघाल्या. टीकेला तर्काधिष्ठित उत्तर देणे शक्य नसल्यास आणि आपली चूक मानण्यात कमीपणा वाटत असल्यास शेवटी “टीकेला दुर्लक्षाने मारणे” हाच उपाय सर्व विद्वान योजतात, ह्याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.

   आचार्यांच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे अभ्यासू वाचकाच्या बुद्धीला आणि तर्काला आव्हान असे.

   दुर्दैवाने आचार्य गुरुजी आज आपल्यात नाहीत. त्यांचे अनेक प्रकल्प त्यामुळे अपूर्ण राहिले. पण त्यातूनही त्यांनी मराठी भाषेत जे प्रामाणिकपणे महत्त्वाचे आणि विद्वत्तापूर्ण कार्य केलेले आहे, त्याची दखल आम्ही घेणार आहोत काय? की झगमगती चित्रपटसृष्टी, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण आणि सवंग साहित्य ह्यांच्यापुढे मराठी माणसाची बौद्धिक मजल आज जाऊच शकत नाही?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s